छोटीसी बाग

छोटीसी बाग


आपण माणसं कुठंही रहात असू. अगदी जगाच्या पाठीवर कुठंही. झालंच तर रहाण्याचं ठिकाण कुठलंही असु दे, चाळीतली एखादी सिंगल रूम असु दे किंवा बादशाही थाटाचा महाल असु दे किमान एक तरी झाड आपण लावतोच. अगदीच काही नाही तर लहानशा डब्यात तुळस तरी असतेच असते. पुर्वीचे ब्लॅक-ऍण्ड-व्हाईट मराठी चित्रपट आठवून पहा. चाळीतल्या कॉमन गॅलरीत प्रत्येक दारासमोर डालडाच्या पत्र्याच्या डब्यात तुम्हाला तुळस दिसणारच.

या साऱ्याच्या मागचं कारण एकच. आपण कितीही उंच भराऱ्या मारल्या तरी आपली मुळं ही मातीतच आहेत. या मातीबद्दल प्रत्येकाच्या मनात ओढ आहेच. कुणी ती जाणतं तर कुणाला कल्पनाही नसते. कुणी ती दाखवतं तर कुणी न दाखवता ती ओढ अन ते प्रेम जपतं. हे माती अन निसर्गावरचं प्रेम असंच प्रत्येक माणसा-माणसाच्या मनात कायम अन चिरंतन राहील. अगदी जगाच्या अंतानंतरही. पण हे प्रेम जपण्याच्या मार्गात अनंत अडचणी येत असतात. त्यात जागेची अडचण ही सर्वात मोठी. त्यानंतर मग सोसायटीतली अडेलतट्टू कार्यकारिणी अन त्यानंतर असते बजेट नावाची अडचण.

तर ही जागेची अडचण आपल्याला सहज सोडवता येईल. त्यासाठीच हे एवढे शब्द खर्ची घातले. हा लेख वाचल्यावर तुम्ही जागेच्या अडचणीवर तर मात करु शकालच, पण त्यासोबतच बजेटचीही अडचण दूर होईल. हं, फक्त सोसायटीची अडचण मात्र तुमची तुम्हालाच दूर करावी लागेल. त्यावर मी तरी काही सांगू शकणार नाही. लेख वाचल्यावर, किंवा वाचत असतानाही तुमच्या क्रिएटिव्ह डोक्यात अजुनही काही कल्पना येतील. त्या अंमलात आणून घरी बाग फुलवलीत की माझा हा लेख सार्थकी लागेल. तुम्ही आवर्जुन सांगितलं नाहीत तरी मला समाधान मिळेल एवढं नक्की.

आजच्या ऑनलाईनच्या अन पॅकेज्ड फूडच्या जमान्यात घरोघरी असंख्य अन विविध आकाराची खोकी अन प्लास्टिक कंटेनर्स जमा झालेले असतात. सगळेच असं काही भंगारात देत नाहीत. काही फेकुनही देत असतात. तर असं काही फेकून वा विकुन टाकण्याऐवजी आपण तेच सारं कल्पकतेनं वापरायचं. कार्डबोर्डची खोकी जी किमान चार इंच तरी खोल असतील त्यात तुम्ही पालक, मेथी, शेपू वगैरेंसारख्या पालेभाज्या व मेथी-पुदीन्यासारखे मसाले लावू शकता. एवढंच काय तर कांदा लसूणही त्यात लावू शकता. कांदा लसणाची पात नियमित काढत राहिलात तर तीन-चार वेळा नक्कीच काढता येईल. काही खोकी वा डबे जे दहा ते बारा इंच खोल असतील त्य़ात मुळा, बीट सारख्या कंदभाज्या व टोमॅटो, वांगी, मिरची सारख्या फळभाज्याही लावु शकता. यातल्या प्रत्येक भाजीच्या लागवडीसंदर्भात माझे जुने लेख आहेत ते शोधुन तुम्ही ती ती लागवड करु शकता. खोकी ठेवण्यासाठी जर काही अडचण असेल तर पीव्हिसी पाईप्सपासून तुम्ही उपलब्ध जागेनुसार ते कापून एल्बोज अन टी जंक्शन्स वगैरे वापरुन घरच्या घरी स्टॅन्डही बनवुन त्यावर ठेवू शकता. (केवळ संदर्भासाठी म्हणून असे रॅक्स वा स्टॅन्ड्स कसे बनवायचे यासाठी एक व्हिडिओ लिंक सोबत जोडत आहे. हे जरी शू रॅकसाठी असलं तरी आपापल्या आवश्यकतेनुसार लांबी-रुंदी व दोन कप्प्यांतील गॅप तुम्ही ठेवु शकता. https://www.youtube.com/watch?v=WHeZUWd6U5M )

हा झाला बजेटच्या दृष्टीनं केलेला विचार. पण बजेट हा अडसर नसेल पण जागाच कमी असेल तर तुम्ही जागेच्या मापात बसतील असे खोके बनवुन घेऊ शकता. आंब्याच्या पेट्या नुकत्याच सगळीकडं उपलब्ध आहेत. अशा पेट्यांना काहीही करण्याची गरज नाही. या दोन ते तीन वर्षं आरामात टिकू शकतात. हवं असल्यास तुम्ही त्यांना आतुन बाहेरून वॉर्निश लावून व्यवस्थित वाळवुन घेऊन त्या वापरायला घेऊ शकता. कुणाला यात केमिकलबद्दल काही हरकत असेल तरीही काही बिघडत नाही. तसेही वापरलेत तरी चालेल. मेडिकल स्टोअर्समधे थर्माकोलचे रिकामे बॉक्सेस मिळतात. तसंही ते टाकुनच देत असतात. तुम्ही मागितलेत तर ते फुकटही देऊ करतील. तेही आणून त्यात खोली अन लांबी-रुंदीनुसार तुम्ही लागवड करु शकता.

या अशा छोटेखानी बागेचे तेही मातीविना बागेचे काही फायदे आहेत. अन ते म्हणजे;

कीड : अशा खोक्यांत मातीच वापरली नाही तर त्याअनुषंगानं येणारी कीडही नसेल. जी काही पेरलेल्या बियांवाटे व लावलेल्या रोपांमुळं येईल तिचं निर्मूलन करणंही सोपं होईल. अन परवाच सांगितल्याप्रमाणं जर भाज्यांचा फेरपालट करत राहिलात तर कीडही वेळीच मरुन जाईल. तसंच एकाच खोक्यात जर एकापेक्षा जास्त मित्रपिकं घेतलीत तर ती एकमेकांच्या सहाय्यानं कीडीचा नायनाट करतील.

हाताळण्यास सोपी : अशी बाग ही जमिनीतली वा गच्ची-बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यांमधली नसल्यानं तुम्हाला खाली वाकून काम करावं लागत नाही. आत जी माती वा जे काही पॉटींग मिक्स तुम्ही उपलब्धतेनुसार वापरलं आहे ते नियमित वापरानं हलकंच राहिलेलं असणार आहे. त्यामुळं अनावश्यक गवत वाढलंय, तण वाढलेत वगैरे समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागणार नाही. मातीही घट्ट झाली आहे असं देखील होणार नाही.

अल्प खर्च : जमिनीवरची वा कुंड्यांतली बाग असल्यावर त्यांची वेळोवेळी खुरपणी, खतं अन मुबलक प्रमाणात वापरलं जाणारं पाणी हे सगळं आलं. पण मोकळी खोकी अन तीही एका खाली एक अशी रचल्यावर कमी पाण्यात काम होतं. झालंच तर खतंही कमी दिलेली चालतात. कारण वजन कमी ठेवण्यासाठी आपण माती न वापरता कंपोस्ट, ओला-सुका कचरा यांचं मिश्रण वगैरे गोष्टीच वापरलेल्या असल्यानं ते सारं त्यांत लावलेल्या रोपांना आवश्यक ती अन्नद्रव्यं अन पोषणमुल्य जागीच उपलब्ध करुन देत असतं. त्यामुळं खतांवर अन पर्यायानं कीटकनाशकांवर केला जाणार खर्चही टाळता येतो.

सुलभ वापर : कंबरदुखी वा पाठदुखी असणाऱ्यांसाठी व घरातील मुलांसाठीही ही बाग करणं वा अशा बागेत काम करणं अतिशय सोपं जातं. कारण यात वारंवार वाकायची गरज नसते. त्यामुळं कंबर वा पाठ दुखतेय असं काहीच काम नसतं. तसंच फक्त अधुन मधुन थोडं पाणी घालणं अन टोमॅटो, वांगी, मिरची वगैरेंची वाढ पहाणं ही सोपी कामं असल्यानं बच्चेमंडळीही अशा बागेत लक्ष घालतात.

हलविण्यास सोपी : अशी बाग जरुर पडल्यास एका जागेहुन दुसऱ्या जागी सहजतेनं हलवता येते. तेही झाडांना फारसा धक्का न लावता. त्यामुळं नुकसान काहीच होत नाही. जमिनीवरची बाग तर हलवणं शक्यच नसतं. पण कुंड्यांमधे वा मोठ्या ड्रम्समधे जर झाडं लावलेली असतील तर ते काम मदतनीसांशिवाय अन खर्च केल्याशिवाय होणं कठीणच असतं. त्या तुलनेत अशी बाग कुठल्याही कारणासाठी हलविणं सोपं पडतं. मग ते शिफ्टींग असो की साफसफाईसाठी असो. थोड्याच वेळात अन कष्टात बाग हलवुन पुन्हा नव्या जागी अतिशय सोप्या पद्धतीनं लावता येते.

चाळीत रहणारे व बंदिस्त बिल्डींगमधे रहाणारे अशांसाठी अशी बाग फारच उपयुक्त ठरते. बागेत काम केल्यानं थकवा जातो वगैरे गोष्टी आज सर्वमान्यच आहेत. पण त्यासाठी लागणारी मोठी बाग सर्वांनाच मिळते असं नाही. बरेचजण निवृत्त झाल्यावर आपण मोठं घर घेऊ अन स्वतःची बाग करु म्हणून स्वप्नं पहात असतात. ती खरी होईपर्यंत आपलं वय वाढलेलं असतं अन त्या वयात ती जमिनीवरची बाग फुलवणं कठीण होऊन बसतं. तसं जरी नाही झालं तरी ती तशी बाग होईल तेव्हा होईल. पण ती होईपर्यंत वाट पहाण्यापेक्षा आता उपलब्ध जागेत जास्तीत जास्त झाडं लावली वा पिकं घेतली तर ते उत्तमच आहे की. निदान मोठी बाग करेपर्यंत प्रॅक्टीस तरी होईल. अशा बागांचा अजुन एक फायदा म्हणजे यामधे आपण आपल्याला हवी ती पिकं घेऊ शकतो. सीझन वगैरेंचा विचार करण्याची गरज आपल्याला नसते. आपल्याला जे हवं ते आपण आपल्याला हवं तेव्हा पेरुन उगवु शकतो. अती पावसानं पालेभाज्या खराब झाल्या वगैरे आपल्या बाबतीत कधीच नसतं. कारण आपली बाग पोर्टेबल असल्यानं आपण ती केव्हाही हलवु शकतो.

तेव्हा मंडळी, जे जागा नाही म्हणून बाग नाही असा विचार करत असतील त्यांनी लगेचच कामाला लागावं. पाऊस सुरु होण्यास आता फार वेळ नाही. पण त्याआधी आपली जागा अन त्या जागेत काय केल्यावर आपल्याला जास्तीत जास्त बाग फुलवता येईल याचा लगेचच विचार करा अन लागा कामाला. ज्यांच्याकडं जमिनीवरची वा गच्ची-बाल्कनीमधली बाग असुनही जर थोडीशी जागा उपलब्ध असेल व अशा जागेचा वापर करायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठीही हा लेख उपयुक्त ठरु शकेल. काही लागलंच तर आहोतच आम्ही सांगायला.


© राजन लोहगांवकर

वानस्पत्य®

सकस व भरपूर टोमॅटोचं पीक घेण्यासाठी काही टीप्स

सकस व भरपूर टोमॅटोचं पीक घेण्यासाठी काही टीप्स


बरेंचदा आपण घरच्या बागेत टोमॅटो लावतो. अगदी पद्धतशीर. संपूर्ण काळजी घेऊन. म्हणजे नर्सरीतुन बिया आणून अथवा भाजीसाठी विकत घेतलेल्या टोमॅटोच्या बिया पेरुन रोपं करतो. रोपं योग्य त्या उंचीची झाल्यावर ती कुंडीत अथवा तत्सम कंटेनरमधे ट्रान्सप्लांट करतो. त्यापूर्वी कुंडीत तज्ञांनी (?) सांगितल्याप्रमाणं पॉटींग मिक्स घालतो. रोपं लावुन त्यांना पाणी वगैरे देतो. त्यांची दृष्य स्वरुपातली वाढही अगदी योग्य असते. अधुन मधून कंपोस्ट वगैरे देत असतो. पाणीही बहुतेक वेळा अगदी टाईमटेबलनुसार देत असतो. अर्थात कधी हे वेळापत्रक पुढं मागं होतं, नाही असं नाही. पण दोन दिवसांचा खाडा झाला तर बॅकलॉग भरुन काढत दोन दिवसांचं मिळून जास्त पाणीही देत असतो. रोपंही आपल्या चुकांना माफ करत छान तरारत असतात. कधीमधी कीड असते, पण त्यावर आपण उपाय केल्यावर किंवा अगदीच आटोक्यात नाही आली तर तेवढी पानं तोडून टाकत असतो. मग वेळच्यावेळी रोपांवर छान नाजूकशी पिवळी फुलं दिसु लागतात. यथावकाश वाटाण्याच्या आकाराचा फिकट हिरवा गोल दिसु लागतो. दिसामाजी वाढणारं ते फळ आपण रोज नित्यनेमानं पहात रोपांना पाणी देत रहातो. पण कुठंतरी माशी शिंकते अन गुलाबजामएवढा आकार झाला की तेवढाच रहात हळूहळू टोमॅटो रंग बदलु लागतो. आठ दहा दिवसांतच टोमॅटो लाल बुंद होतो. आपण लावलेला टोमॅटो आता काढायला तयार झाल्याचं आपल्याला जाणवतं. पण बियांच्या पाकीटावर दाखवलेला आकार किंवा जो टोमॅटो कापून आपण ज्यातल्या बिया पेरल्या होत्या त्याच्या मानानं हे केवळ पंचवीस-तीस टक्के आकाराचं फळ पाहुन आपण हिरमुसून जातो. सगळं तर वेळच्या वेळी अन सांगितल्याप्रमाणं आपण केलेलं असतं. अगदी काटेकोरपणं नसेलही केलं कदाचित, पण नव्वद टक्के सारं केलं असतंच की. मग काय़ झालं? कुठं चुकलं अन हे पाप्याचं पितर आपल्या हाती आलं? असे प्रश्न पडून आपण विचारात पडतो अन कदाचित रासायनिक खतंच द्यायला हवीत असा विचार करतो. रासायनिक म्हणजे पापच ते. नकोच ते म्हणत आपण टोमॅटो लावण्याच्या वाटेला जात नाही. पण थोडेच दिवस आपला हा निश्चय टिकतो अन पुन्हा आपण सारे सोपस्कार पार पाडत पुन्हा तो लाल गुलाबजाम झाडावरुन तोडतो. काय चुकतं आपलं? तेच सांगतो.

टोमॅटोला भरपूर सुर्यप्रकाश लागतो अन खतं व अन्नद्रव्यांच्या बाबतीत हे पीक फारच संवेदनशील असतं. या पीकाची खतांची भूक फार तीव्र असते. त्यामुळं वेळच्यावेळी अन योग्य प्रमाणात खतं देणं फार गरजेचं असतं. या दोन गोष्टी सांभाळल्या तर आपल्या बागेत भरपूर टोमॅटो येतील. त्यासोबतीनंच खाली दिलेल्या सूचना पाळल्यास अधिक फायदा होईल.

बियांची निवड : टोमॅटोची लागवड करण्याआधी रोपं करुन घेणं गरजेचं असतं, त्यामुळं रोपं करायला ठेवण्यासाठी योग्य बियांची निवड करणं फार महत्वाचं असतं. बाजारातुन घेतलेल्या टोमॅटोच्या बिया वापरुन जरी त्या रुजल्या व योग्य वेळी आपल्याला टोमॅटो जरी मिळाले तरी ते तेवढ्याच आकाराचे असतील याची खात्री नसते. कारण स्वाभाविकच आहे की बाजारातले टोमॅटो हे रासायनिक खतांवर पोसलेले असतात. तसंच ते झाडांवर पूर्ण पिकण्याआधीच काढलेले असतात. अशा स्थितीत ते आपण देत असलेल्या कंपोस्ट वगैरे सेंद्रिय खतांवर वाढतीलच याची खात्री नसते. म्हणून शक्यतो बिया नर्सरीतुनच विकत आणाव्यात. आपली टोमॅटोची एक सायकल पुर्ण होत असताना केवळ बियांसाठी म्हणून किमान दोन फळं झाडावरच पूर्ण पिकु द्यावीत व अशा बिया पुढील लागवडीसाठी वापराव्यात. हे दरवेळी करत राहिलं तर आपल्याला प्रत्येक वेळी खात्रीशीर बियाणं उपलब्ध असेल. हे केवळ टोमॅटोच्याच बाबतीत नव्हे तर इतरही फळं अन फळभाज्यांच्या बाबतीत करावं.

पुनर्लागवड : टोमॅटोच्या रोपांची पुनर्लागवड म्हणजेच ती ट्रान्सप्लांट करावी लागतात. टोमॅटो व्यतिरिक्त बऱ्याचशा प्रकारात रोपं बनवुन त्यांची पुनर्लागवड करतात. पण टोमॅटोच्या बाबतीत पुनर्लागवड करताना अधिक काळजी घेण्याची गरज असते. टोमॅटोचं रोप जमिनिला जिथं टेकतं तिथं नवीन मुळ्या फुटतात. त्यामुळं रोप मातीत लावताना रोपाच्या खालच्या भागावर असलेल्या पानांपर्यंत खोडाचा भाग आत जाईल एवढा खड्डा करुन त्यात रोप लावुन मातीनं बुजवुन घ्यावा. म्हणजे रोपाला अधिक मुळ्या फुटुन त्याची वाढ जोमानं होईल अन पर्यायानं पीकही जास्त मिळेल. आपण जेव्हा बिया पेरुन रोपं तयार करतो तेव्हा सगळेच सीडलिंग ट्रे वापरत नाहीत. कुंडीत वा एखाद्या तात्पुरत्या जागी बिया पेरतो. त्याही सुट्या पडतीलच याची खात्री नसते. त्यामुळं रोपं दाटीवाटीनं तयार होतात अन एकमेकांशी स्पर्धा करत मोठी होतात. सहाजिकच बहुतांशी रोपं वाकडीतिकडी तयार होतात अन मातीच्या पातळीवर कोन घेऊन सुर्याच्या दिशेनं वाढत मोठी होतात. अशा रोपांची पुनर्लागवड करताना ती वरच्या दिशेनं सरळ रहातील अशी लावण्यासाठी जिथपर्यंत वाकडी वाढली आहेत तिथपर्यंत ती मातीत हळुवार खोचली तर त्यांची पुढील वाढ सकस होते. रोपं निम्म्या खोडापर्यंत, अगदी खालच्या पानांच्या गुच्छापर्यंत मातीत लावल्यामुळं भरपुर नवीन मुळंही फुटतात अन रोपही त्यामुळं व्यवस्थित उभं रहातं.

छाटणी (प्रूनिंग) : रोपांची पुनर्लागवड करुन ती नवीन जागी स्थिरावल्यावर नवीन पालवी फुटू लागते. शेंड्यावर नाजुकशी पानं असलेल्या छोट्याशा फांद्या वाढू लागतात. पुढं इथंच फुलं येऊन टोमॅटो येणार असतात. तसंच खोडावर असलेल्या फांद्यांच्यामधेही खोडापाशीच नवीन लहान फांद्या येऊ लागतात. यांना सकर्स म्हणतात. तेही जर वाढले तर यांच्यावरही फुलं अन नंतर फळं लागतात. परंतु जर आपल्याला अधिक फळं अन तीही सकस हवी असतील तर एक छोटासा दगड आपल्यावर हृदयावर ठेऊन हातात कात्री घेण्याची गरज असते. (दगड कुठल्या रंगाचा अन किती वजनाचा याचा विचार करु नये अन ते विचारुही नये.) तर कात्री घेऊन शेंड्यावरच्या छोट्या फांद्या अन हे सकर्स नजरेस पडल्यावर लगेच कापून टाकावेत. शेंडा कट केल्यानं नवीन फांद्या फुटतील अन जास्त टोमॅटो लागतील. तसंच सकर्स वेळीच कापल्यामुळं रोपाच्या मध्यभागी फांद्यांची दाटी होणार नाही अन पर्यायानं हवा खेळती राहील अन रोपाच्या आतल्या भागातही सूर्यप्रकाश पोहोचेल. असं न केल्यास  सुर्यप्रकाशाअभावी रोपांस व फळांस बुरशीजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असते. अशा फांद्या जर निरोगी असतील तर त्या रोपाच्या बुंध्यापाशीच मल्चिंग म्हणून टाकाव्यात.

याबरोबरच जुनी अन जुनी होऊ घातलेली पानंही छाटावीत. काही जुन्या पानांवर चित्रविचित्र नक्षीकाम तयार झालं असेल किंवा काही पानांच्या मागल्या बाजुला पावडरीसारखं काही दिसत असेल तर अशाही फांद्या कापून टाकाव्यात. फक्त या फांद्या दूर फेकून द्याव्यात वा अन्य मार्गानं नष्ट कराव्यात. मल्चिंग म्हणून वा कंपोस्टमधे यांचा उपयोग करु नये.

सुर्यप्रकाश, खतं अन अन्नद्रव्यं : टोमॅटोला भरपूर सुर्यप्रकाशाची गरज असते. किमान ५ ते ६ तासांचा सुर्यप्रकाश मिळाल्यावर रोपांची वाढही चांगली होते अन रोगाचं प्रमाणही कमी असतं.

टोमॅटोच्या रोपाची भूक प्रचंड असते. योग्य प्रमाणात अन योग्य वेळी याला अन्न मिळत गेल्यास सकस फळं मिळतात. भरपूर सूर्यप्रकाश अन अन्न, तेही नत्रयुक्त मिळाल्यावर रोपांची वाढ निकोप होते अन पर्यायानं फळंही जास्त मिळतात. यासाठी रोपांची पुनर्लागवड करण्याआधी परिपूर्ण माती तयार करुन घेणं गरजेचं असतं. रोपं नवीन जागी स्थिरावेपर्यंत त्याला लागणारी सारी अन्नद्रव्यं ही मातीमधे अगोदरपासूनच, अन तीही सेट झालेली असणं गरजेचं असतं. यासाठी कुंड्या वा वाफे तयार करत असतानाच त्यात भरपूर सेंद्रिय खतं घालावीत. कंपोस्ट, शेणखत, बोनमील / स्टेरामील, नीमपेंड वगैरे घटक इतर झाडांपेक्षा जास्त प्रमाणात घालून कुंड्या अन वाफे तयार करुन सेट होऊ दिल्यावर जर रोपांची त्यात पुनर्लागवड केली तर टोमॅटोला सुरुवातीपासुनच भरपुर अन्नद्रव्यं मिळत रहातील अन रोपं जोमानं वाढतील. टोमॅटोच्या झाडावर फुलं येण्यास सुरुवात झाल्यापासून झाडाला खतं देताना त्यात नत्राची मात्रा कमी ठेवावी. नत्र जास्त प्रमाणात दिलं गेल्यास झाडावर पानं भरपूर प्रमाणात येतील अन झाड टवटवीत दिसेल पण फुलं अन नंतर फळं वाढण्याच्या दृष्टीनं त्याचा काही उपयोग नसतो. किंबहुना फळांच्या वाढीला अशी अतिरिक्त पानं अडथळाच ठरतात. कारण अशी दाट अन हिरवी पानं मुळांद्वारे मातीतुन घेतला गेलेला कॅल्शियम स्वतःच घेतात अन फळांना मिळू देत नाहीत. त्यामुळं फळं एक तर लहान अन कुपोषित रहातात किंवा ब्लॉसम एंड रॉट या रोगाला बळी पडतात.

पाणी : टोमॅटोची जशी भूक प्रचंड असते तशीच तहानही. त्यामुळं पाण्याचा खाडा करणं शक्यतो टाळावं. उन्हाळ्यात तर नियमितपणं पाणी देणं गरजेचं असतं. अगदी गरज भासल्यास दिवसातुन दोन वा अधिक वेळाही द्यावं लागलं तरी ते द्यावं. आळस करु नये. पाणी देण्याची वेळ ओळखणं म्हणजे मातीत बोट इंचभर आत खुपसुन पहाणं. ओलसर लागलं तर हरकत नाही. पण कोरडं वाटलं तर लगेचच पाणी द्यावं. तसंच रोप सरळ उभं न रहाता कललेलं दिसत असल्यास वा पानं कोरडी दिसल्यास लगेचच पाणी द्यावं.

रोग : टोमॅटोवर प्रामुख्याने पडणारे रोग म्हणजे कीड अन अळ्या. नागअळीच्या प्रादुर्भावामुळं रोपाच्या पानांवर चित्रविचित्र नक्षी तयार होते. अशी पानं नजरेस पडल्यावर लगेचच ती काढून नष्ट करावीत. तसंच, पानांच्या मागच्या बाजूला पावडर फवारल्याप्रमाणे मावा हा रोग असतो. कधी पानांच्या गुच्छांवर खालच्या बाजुला मिलीबग्जही दिसतात. यांवर नीमतेल वा नीमतेल बेस असलेलं कुठलही द्रव फवारावं. प्रसार जास्त असेल तर रोपाचा तेवढा भाग काढून नष्ट करावा.

याव्यतिरिक्त टोमॅटो वाढत असतानाच्या काळात जर कॅल्शियमची कमतरता असेल तर काही फळं खालच्या बाजुनं करपलेली अन नंतर सडल्यासारखी दिसतात. याला ब्लॉसम एंड रॉट असं म्हणतात. असं दिसून आल्यास झाडाला त्वरित कॅल्शियम पुरवणारी खतं देण्याची गरज असते. यासाठी अंड्यांच्या कवचांची भुकटी वा बोनमील वा डायल्यूट केलेलं आंबट ताक हे रोपांना द्यावं व पानांवरही फवारावं. वास्तविकतः मातीमधुन मिळणारा कॅल्शियम हा रोपांसाठी पुरेसा असतो. फक्त तो शोषून घेण्यासाठी मातीमधे ओलावा असणं गरजेचं असतं. जेव्हा फळं वाढीच्या काळात पाणी कमी दिलं गेलं की हे असं होतं. त्यासाठी फळं वाढण्याच्या काळात पाण्याचा खाडा करु नये. पाणी नियमित मिळाल्यास मातीमधला कॅल्शियम, झाड मुळांवाटे रोपाच्या सर्व भागात पसरवु शकतं.

कधी पानांवर पांढरे ठिपके दिसु लागतात. याला कारण म्हणजे पाण्याचा ताण, गरजेपेक्षा जास्त उन्ह किंवा खताची कमतरता. आधी सांगितल्याप्रमाणं या पीकाची खतांची भूक अधिक तीव्र असते. त्यामुळं वेळच्या वेळी खतं देणं, पाण्याच्या वेळा कटाक्षानं पाळणं हे तर करावंच लागतं. पण त्याहीसोबत उन्हाची तीव्रता जिथं जास्त असेल अशा ठिकाणी टोमॅटो लागवड न करणं अन जर कुंड्यांमधे लागवड केली असेल तर त्या अशा जागी ठेवाव्यात की जिथं दुपारचं तीव्र उन्ह जास्त वेळ पडणार नाही. अन अशी जागा टाळणं शक्य नसेल तर किमान उन्हाळ्यात कुंड्यांवर आच्छादन घालावं.

रोपांची अन फळांची नियमित तपासणी करत रहाणं अन काही वेगळं दृष्टीस पडताच कारवाई करणं हे फार आवश्यक असतं. या नियमित तपासणीत जर खालील गोष्टी नजरेस पडल्यास त्यावर त्वरित उपाय करावा,

१) पानांवर छिद्रं - पानांवर छिद्रं दिसताच कुंडीत वा रोपाच्या आजुबाजुला रोपांवर व मातीमधेही कुठं कीड दिसते का ते पहावं. काही किडी या रात्री सक्रीय होतात. दिवसा अशा किडी मातीमधे स्वतःला गाडून घेतात. अशा वेळी माती उकरुन कुठं कीड दिसते का ते पहावं. दिवसाही काही किडी नजरेस पडल्यास त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा.

२) रोपं निस्तेज दिसणे - अतीउष्णतेमुळं अन पाण्याच्या कमतरतेमुळं टोमॅटोची रोपं मलूल पडतात. ती सरळ उभीही राहु शकत नाहीत. पानं कोमेजून जातात. असं दिसल्यास त्यांना त्वरित भरपूर पाणी द्यावं. वर म्हटल्याप्रमाणं टोमॅटोच्या रोपाची तहान भरपूर असल्यानं पाण्याचा ताण देऊ नये. रोपाला योग्य प्रमाणात पाणी नियमितपणं देणं गरजेचंच आहे.

३) पानं काळी वा तपकिरी पडणे - टोमॅटोच्या रोपांची दाटी झाल्यास वा एकाच वाफ्यात किंवा कुंडीत सतत टोमॅटोची लागवड करत राहिल्यास असा रोग पडण्याची दाट शक्यता असते. म्हणून दोन रोपांत किमान दीड ते दोन फूट तरी अंतर राखणं गरजेचं असतं. त्यामुळं रोपाला सर्व बाजुनं खेळती हवा अन सुर्यप्रकाश मिळतो. तसंच एकाच मातीत सतत लागवड करत राहिल्यास बुरशीजन्य रोगांची वाढ होत रहाते अन त्याला रोप बळी पडतं.

४) फळं तडकणे - कधी कधी झाडावर असलेल्या टोमॅटोंना तडा गेलेला दिसतो. बरेच दिवस पाणी दिलं गेलं नाही अन देताना जास्त पाणी दिलं गेलं की असं घडतं. यासाठी नियमितपणं पाणी देणं आवश्यक असतं. कधी खाडा झालाच तर पाणी देताना सावकाश अन आवश्यक तेवढंच द्यावं. उगीच जास्त पाणी देऊ नये.

आधार : टोमॅटोची रोपं फार नाजूक असतात, अगदी एखाद्या वेलीप्रमाणंच. त्यामुळं ती सरळ वाढू शकत नाहीत. आधाराच्या बाजुला झुकणं वा सरळ जमिनीवर लोळण घेणं हे याबाबतीत नेहमीचंच असतं. म्हणून वाढीच्या काळात, वेळेआधीच रोपांना आधाराची व्यवस्था करुन ठेवावी लागते. टोमॅटोची लागवड कुठं अन कशात केली आहे यावर आधार देण्याचा प्रकार अवलंबून असतो. जर कुंडी वा तत्सम प्रकारात लागवड केली असल्यास त्यामधे एक काठी उभी करुन त्या काठीला रोप बांधून ठेवता येतं. जर वाफ्यात लागवड केली असेल तर प्रत्येक रोपासाठी एक काठी किंवा दोन टोकांना दोन मोठ्या अन जाडसर काठ्या अन त्यावर दोरी अथवा तार बांधून प्रत्येक रोपाच्या डोक्यावर येईल अशी दोरी वा सुतळ त्य़ा तारेला बांधुन घेऊन ती दोरी रोपाभोवती गुंडाळता येते.

पण हे सगळं सुरुवातीपासुनच करावं. एकदा टोमॅटो धरले की त्यांच्या वजनामुळं रोपं कलंडतात. अन टोमॅटो जमिनीला, मातीला टेकले की ते खालच्या टोकाकडून खराब होतात.

हे सगळे उपाय वेळच्यावेळी केल्यावर तुमच्या बागेत भरपूर अन रसरशीत टोमॅटो नक्कीच येतील.

©राजन लोहगांवकर

सर्व हक्क लेखकाचे स्वाधीन

वानस्पत्य 

पावसाळ्यापूर्वीची कामं - जमिनीवरील बाग असणाऱ्यांसाठी

पावसाळ्यापूर्वीची कामं - जमिनीवरील बाग असणाऱ्यांसाठी


मंडळी थोड्याच दिवसांत पावसाला सुरुवात होईल. पाऊस एकदा सुरु झाला की सुरुवातीचे काही दिवस आपल्याला फार काही करता येणार नाही. अन पाऊस जेव्हा उसंत घेईल तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल. म्हणून अजून हातात वेळ आहे तोवर पावसाळ्यापूर्वीची काही कामं आपण केली तर पावसाळ्यात आपल्याला भाज्या व इतर फुलझाडं वगैरेंनी आपली बाग आपल्याला सुशोभित करता येईल. तेव्हा त्यासाठी काही सुचना व सल्ले. बागकाम करणाऱ्या तीनही प्रकारांसाठी. म्हणजे कुंडीमधली बाग, गच्चीवरची बाग अन जमिनीवरची मातीमधली बाग करणाऱ्या सर्वांसाठीच.


१. झाडाच्या आकारमानाप्रमाणे आपण आळं करुन घेतलं असेल. त्यातली माती कुदळीच्या सहाय्यानं मोकळी करुन घ्या. उन्हाळ्यात जर पाला पाचोळ्याचं मल्चिंग केलं असेल तर तो बाहेर काढून घ्या. मल्चिंग नसेल तर माती कडक झाली असेल. ती मोकळी करुन घ्या. खोडाला वा मुळांना धक्का लागणार नाही अशा बेतानं हे करा.

२. वरच्या थरातील चार पाच इंच माती काढून घ्या. आतला भाग कडक असेल तर तोही हलक्या हाताने, मुळांना धक्का पोहोचणार नाही अशा बेताने मोकळा करुन घ्या.

३. आता मोकळ्या झालेल्या भागात कंपोस्ट / शेणखत / गांडूळखत वगैरे जे काही उपलब्ध असेल किंवा जे काही नेहमी वापरत असाल ते घालून घ्या. या खताचं प्रमाण साधारणपणे झाडाचं जेवढं वय तेवढी घमेली खत असं असावं. छोट्या व मध्यम आकाराच्या झाडांना एक घमेलं शेणखत वा कंपोस्ट खत पुरतं.

४. खत घातल्यावर आधी काढलेला पालापाचोळा वरुन टाकून घ्या. त्यावर मातीचा एक थर देऊन आळं पुन्हा पुर्वीसारखं करा. अर्थात मोठा पाऊस सुरु झाल्यावर जर आळ्यात पाणी साचून रहात असेल तेव्हा आळं फोडून अतिरिक्त पाण्याला बाहेर वाहून जाण्याचाठी रस्ता करुन द्यायला विसरू नका.

५. पाऊस सुरु होताना किंवा त्यापूर्वी वेगाने वारे वाहू लागण्यापूर्वी झाडांचा आकार आटोपशीर करुन घ्या. फांद्यांचे वरचे भाग छाटून घ्या. झाडाचा आकार आटोपशीर ठेवा. अर्थात पाऊस अजून सुरु झाला नसेल व उन्हाची तीव्रता अधिक असेल तर असं प्रुनिंग करु नका. एखाद दोन सरी येऊन गेल्या, वातावरणार गारवा आला की मगच करा. झाडाची योग्य आकारात शाखीय वाढ होण्यासाठी हे गरजेचं असतं. नंतर फळं फुलं काढण्य़ासाठीही हे सोपं जातं.

६. बागेत जास्तीचा पाचोळा असेल तर सर्व झाडांच्या बुंध्यापाशी तो सारख्या प्रमाणात साठवून ठेवा. यामुळे रानटी गवत आटोक्यात रहातंच पण झाडालाही खत मिळतं.

७. जमिनीलगतच्या फांद्या छाटून घ्या. जमिनीपासून झाडाच्या आकारमानाप्रमाणे दीड ते दोन फूट जागा मोकळी असायला हवी. पावसाळ्यात जास्तीचं गवत वाढेल तेव्हा बुंध्यापाशी साप वगैरे काही जाऊन बसलं असेल तर ते सहजच नजरेस पडेल याकरिता खालची जागा शक्यतेवढी मोकळी ठेवा.

८. कितीही कंट्रोल केलं तरी पावसाळी गवत येतच रहातं. साधारणपणे आपल्या हातात सहज येईल त्यावेळीच व गवत फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच मुळासह उपटून काढून घेऊन त्याचे किमान दोन तरी तुकडे करुन झाडाच्या बुंध्यातच टाका. तिथेच त्याचं खत होईल.


© राजन लोहगांवकर

वानस्पत्य 

पावसाळ्यापूर्वीची कामं - गच्चीवर बाग असणाऱ्यांसाठी

पावसाळ्यापूर्वीची कामं - गच्चीवर बाग असणाऱ्यांसाठी


मंडळी थोड्याच दिवसांत पावसाला सुरुवात होईल. पाऊस एकदा सुरु झाला की सुरुवातीचे काही दिवस आपल्याला फार काही करता येणार नाही. अन पाऊस जेव्हा उसंत घेईल तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल. म्हणून अजून हातात वेळ आहे तोवर पावसाळ्यापूर्वीची काही कामं आपण केली तर पावसाळ्यात आपल्याला भाज्या व इतर फुलझाडं वगैरेंनी आपली बाग आपल्याला सुशोभित करता येईल. तेव्हा त्यासाठी काही सुचना व सल्ले. बागकाम करणाऱ्या तीनही प्रकारांसाठी. म्हणजे कुंडीमधली बाग, गच्चीवरची बाग अन जमिनीवरची मातीमधली बाग करणाऱ्या सर्वांसाठीच.


१. काय भाजी लावायची आहे व कुठे हे निश्चित करुन घ्या. 

२. उपलब्ध जागेप्रमाणे वाफे बनवुन घ्या. गच्चीवर वाफे बनवणं शक्य नसेल किंवा व्यवहार्य अथवा सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याचं असेल तर मोठे ट्रे वा कुंड्या घ्याव्या. घरगुती भाज्यांची मुळं सहा ते आठ इंच एवढीच असतात. त्यामुळे जास्तीत जास्त फूटभर खोल कुंडी वा तत्सम गोष्ट आपण भाजी लावण्यासाठी घेऊ शकतो.

३. दोन्ही प्रकारात, म्हणजे कुंडी वा वाफा यापैकी कुठल्याही प्रकारात मातीमधे खतं मिसळणं गरजेचं आहे. यामधे माती+शेणखत+कंपोस्ट खत+निमपेंड हे सगळं मिसळून घ्यावं. खालच्या भागात पालापाचोळा वा उसाची चिपाडं पसरवून घेऊन त्यावर हे सगळं मिश्रण घालून मध्यभागी थोडासा उंचवटा व सर्व कडांनी उतार अशा प्रकारे कुंडी वा वाफा भरुन घ्यावा. हलक्या हाताने पाणी घालून घडी न मोडता सारी माती भिजवून घ्यावी. पाच सहा दिवसांत रानटी बिया असल्या तर त्या रुजून वर येतील. छोटं खुरपं असेल तर किंवा लोखंडी पंजा किंवा काहीच नसलं तर हाताने मातीचा वरचा भाग चांगला वर खाली करावा. म्हणजे ही रानटी रोपं मुळासह निघून मातीत मिसळली जातील.

४. माती सारखी करून पुन्हा पहिल्यासारखी करुन घ्यावी. मग आपण ठरवल्याप्रमाणे बिया जास्तीत जास्त एक सेंमी जमिनीखाली जातील अशा बेताने पेराव्या. माती सारखी करुन हलक्या हाताने पाणी द्यावं.

५. माती पृष्ठभागावर कोरडी वाटली तरच थोडं पाणी देऊन ओलावा करुन घ्यावा. चार ते पाच दिवसांत बिया रुजुन वरच्या भागावर कोंब फुटलेले दिसू लागतील. जरूर भासली तरच पाणी द्यावं. या दिवसांत पाण्याचं बाष्पीभवन लवकर होत नसल्यामुळे वारंवार पाणी देण्याची गरज नसते.

६. आठ ते दहा दिवसांत रोपं बऱ्यापैकी वर येतील. काही बिया रुजल्या नाहीत अन त्या ठिकाणी मोकळी जागा असेल तर नवीन बिया पेराव्यात.

७. दोन आठवड्यांत आपण लावलेल्या रोपांव्यतिरिक्त वेगळं काही उगवून आलं असेल तर ते काढून त्याचे तुकडे करुन मातीतच टाका. त्याचं खत होईल.

८. पालेभाज्या असतील तर २१ दिवसांनंतर आपल्याला हवी तेवढी भाजी हलक्या हाताने कापून घ्या. नवीन फुटवे येत रहातील.

९. जर आपण टोमॅटो, वांगी, सर्व प्रकारची मिरची यापैकी कसल्या बिया पेरल्या असतील तर तीन आठड्यात रोपं वीतभर तरी झाली असतील. अशी सर्व रोपं काढून घ्या. वेगळ्या कुंड्या किंवा वाफा असेल तर तिथे किंवा आहे त्याच कुंडीत वा वाफ्यात आपल्याला ही रोपं पुन्हा लावायची आहेत.

१०. कुंडी किंवा वाफ्यातली माती वरखाली हलवून घ्या. घातलेलं खत मातीशी एकजीव झालं असेल. खाली घातलेला पाला किंवा उसाचं चिपाड कुजू लागलं असेल. ते खालीच राहूद्या. माती व्यवस्थित सारखी करून घ्या. आवश्यकता भासल्यास नीमपेंड किंवा इतर कुठलं कीडनाशक असेल तर ते घाला. खतही घातल्यास उत्तम.

११. माती पुन्हा पहिल्यासारखी करुन घेतल्यावर काढलेली रोपं लावून घ्या. मुळं संपूर्णपणे आत जातील हे पहा. रोपं ताठ उभी रहायला हवीत. आडवी पडू देऊ नका. गरज असल्यासच पाणी द्या. जास्त पाण्याने रोपं झोपण्याची शक्यता असते.

१२. वेळच्या वेळी रोपांची अवस्था पाहून, तिरकी झाली असतील तर बुंध्यापाशी हलक्या हाताने माती दाबून व गरज असेल तरच पाणी देऊन रोपांची काळजी घ्या.

१३. रोपं फूट दीड फूट उंच झाली की ती आपल्याच आधाराने उभी रहातील. पण तेवढं पुरेसं नाही. खासकरून वांगी व टोमॅटोसाठी तरी. यांना आधाराची गरज लागेल. तेव्हा रोपांच्या बाजूला जाडसर काठी मातीत खोचून रोपं हलक्या हाताने काठीला बांधून घ्या.

१४. साधारण चौथ्या ते पाचव्या आठवड्यात फुलं दिसू लागतील. काही जाती सेल्फ पोलिनेशनच्या असतात तर काहींना पोलीनेशन करावं लागतं. फुलांवर हलक्या हाताने टिचकी मारून पोलिनेशन होतं तर कधी कधी एका फुलावरून बोट फिरवून ते दुसऱ्या फुलावर लावलं की पोलिनेशन होतं. वस्तुतः नैसर्गिक रित्या पोलिनेशन होतच असतं. पण समजा नाहीच झालं तरच आपण हस्तक्षेप करावा. अन्यथा निसर्गाचं काम त्याच्यावरच सोपवून द्यावं.

१५. फुलं दिसल्यावर साधारण तीन ते चार आठवड्यात आपण फळभाज्या वापरासाठी तोडू शकतो. अर्थात प्रत्येक भाजीचा कालावधी हा वेगवेगळा असतो. पालेभाज्या तीन ते चार आठवड्यात तयार होतात. भेंडीही चार आठवड्यात तयार होते. गवार ५-६ आठवडे घेते तर वांगी टोमॅटो ६-७ आठवडे घेतात. भाजी व फळांची अवस्था बघून आपल्या लक्षात येईल की ती कधी काढणीला तयार होतील.

१६. पालेभाज्यांची काही रोपं व फळभाज्यांची काही फळं ही तशीच झाडावर राहूद्या. पालेभाज्यांना फुलं येतील. ती फुलं पूर्ण फुलुन गेल्यावर तिथेच आपल्याला पुढील लागवडीसाठी बिया मिळतील. तसंच भेंडी, वांगी वगैरे फळं पूर्ण पक्व झाल्यावर वाळली की आपल्याला बिया मिळू शकतील.

१७. रोपांकडे वेळोवेळी लक्ष द्या. कीड लागली आहे असं दिसताच बाधीत पानं लगेचच काढून दूर फेकून द्या व झाडांवर कडूलिंबाचा अर्क वा तंबाखूचं पाणी वगैरे फवारा. सध्या अतिशय लोकप्रिय असलेलं कांद्याच्या सालींचं पाणीही फवारायला हरकत नाही.


© राजन लोहगांवकर

वानस्पत्य 

पावसाळ्यापूर्वीची कामं - कुंडीकऱ्यांसाठी

पावसाळ्यापूर्वीची कामं - कुंडीकऱ्यांसाठी

मंडळी थोड्याच दिवसांत पावसाला सुरुवात होईल. पाऊस एकदा सुरु झाला की सुरुवातीचे काही दिवस आपल्याला फार काही करता येणार नाही. अन पाऊस जेव्हा उसंत घेईल तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल. म्हणून अजून हातात वेळ आहे तोवर पावसाळ्यापूर्वीची काही कामं आपण केली तर पावसाळ्यात आपल्याला भाज्या व इतर फुलझाडं वगैरेंनी आपली बाग आपल्याला सुशोभित करता येईल. तेव्हा त्यासाठी काही सुचना व सल्ले. बागकाम करणाऱ्या तीनही प्रकारांसाठी. म्हणजे कुंडीमधली बाग, गच्चीवरची बाग अन जमिनीवरची मातीमधली बाग करणाऱ्या सर्वांसाठीच.

१. कुंड्यांच्या खालच्या भागात जी छिद्रं केली आहेत ती मोकळी करुन घ्या. नेहमीच्या पाणी देण्याने त्यामधे माती वा अन्य घटक जाऊन ती बुजली असण्याची शक्यता असते. ती जर मोकळी केली नाहीत तर पावसाचं पाणी कुंडीतच साठून राहून मुळं कुजण्याची शक्यता आहे.

२. पृष्ठभागावरची माती खोलवर मोकळी करुन घ्या. नेहमीच्या खतं अन पाणी देण्याने मातीचा वरचा थर कडक होतो. त्यामुळे पाणी वरच्या भागातच साठून रहातं. हा थर मोकळा केला तर पाणी आतपर्यंत जाऊ शकेल तसंच मुळांपाशी हवाही खेळती राहील.

३. कुंडीच्या वरच्या थरातील दोन इंच माती काढून घ्या. आतला भाग कडक असेल तर तोही हलक्या हाताने, मुळांना धक्का पोहोचणार नाही अशा बेताने मोकळा करुन घ्या.

४. आता मोकळ्या झालेल्या भागात कंपोस्ट / शेणखत / गांडूळखत वगैरे जे काही उपलब्ध असेल किंवा जे काही नेहमी वापरत असाल ते घालून घ्या. ते हलक्या हाताने दाबून घेऊन काढलेली माती वरुन घाला व तीही हलक्या हाताने दाबून घ्या. कुंडी पुर्ण भराय़ची नाहीये. वरच्या बाजूने एक ते दीड इंच मोकळीच ठेवायची आहे. यासाठी की जास्तीचं पाणी जेव्हा वरुनच वाहून जाईल तेव्हा आपण दिलेलं खत किंवा माती वाहून जायला नको.

५. पाऊस सुरु होताना किंवा त्यापूर्वी वेगाने वारे वाहू लागण्यापूर्वी झाडांचा आकार आटोपशीर करुन घ्या. फांद्यांचे वरचे भाग छाटून घ्या. मोठी झालेली झाडं वाऱ्या-पावसाच्या माऱ्याने कलंडण्याची शक्यता असते. म्हणून झाडाचा आकार आटोपशीर ठेवा. अर्थात पाऊस अजून सुरु झाला नसेल व उन्हाची तीव्रता अधिक असेल तर असं प्रुनिंग करु नका. एखाद दोन सरी येऊन गेल्या, वातावरणार गारवा आला की मगच करा.

© राजन लोहगांवकर

वानस्पत्य 

भाज्यांचा_फेरपालट

भाज्यांचा_फेरपालट


जेव्हा आपण आपल्या बागेत ठराविक कालावधीची झाडं लावत असतो, मग आपली बाग गच्ची-बाल्कनीमधली असो किंवा परसदारातली जमिनीवरची असो. तसंच ठराविक कालावधीची झाडं म्हणजे फुलझाडं असोत किंवा फळझाडं असोत की वांगी, टोमॅटोसारख्या भाज्या असोत वा मका असो अथवा वेलभाज्या असोत. त्यांच्या त्यांच्या जीवनचक्राप्रमाणं जेव्हा या वनस्पती मृत पावतात तेव्हा आपण त्या लावलेल्या ठिकाणाहून काढून टाकत असतो. अशा काढलेल्या वनस्पती कधी आपण कंपोस्टमधे वापरतो तर कधी तुकडे करुन मल्चिंगसाठी म्हणूनही वापरतो. पण जेव्हा त्याच प्रकारची नवीन झाडं लावायची झाल्यास ती पुन्हा त्याच जागेत किंवा कुंडीत न लावता वेगळ्या ठिकाणी लावावीत. या लेखाच्या पुढील भागात आपण याची कारणं पाहूया.

रोपं आपल्या वाढीच्या काळात मातीमधून बरीचशी अन्नद्रव्यं अन पोषकतत्वं सतत घेत असतात. आपण जरी नियमितपणं खतं देऊन त्याची भर करत असलो तरीही रोपांचं ठराविक अन्नद्रव्यं घेण्याचं प्रमाण अन आपलं ते देण्याचं प्रमाण यात तफावत ही होतच असते. तसंच त्यांचं नैसर्गिक गुणोत्तर अन प्रमाणही बदलत असतं. ते पुन्हा पूर्ववत करण्याचं काम निसर्गच करत असतो. त्यासाठी निसर्ग पाऊस, वारा, सूर्यप्रकाश यांची मदत घेत असतो. हे बिघडलेलं प्रमाण आपणही ठीक करु शकतो. पण त्यासाठी जसा अभ्यास अन अनुभव हवा तसंच वेळोवेळी माती परीक्षण वगैरे गोष्टीही करायला हव्या असतात. आपल्या छोट्या बागेसाठी त्या करणं अशक्य अन खर्चिक असतं. त्यामुळं हे काम आपण निसर्गावर सोपवुन द्यावं.

परंतु आपल्या हातात एक मात्र नक्कीच असतं अन ते म्हणजे एका जागेतुन एक पीक काढून झाल्यावर तिथं दुसरं असं पीक घेणं की जे आधीच्या पीकानं मातीतुन वा इतर माध्यमातुन जे काही घेतलं आहे ते नवीन पीक मातीला पुन्हा परत  देऊ शकेल. उदाहरणार्थ, मका हा मातीतुन मोठ्या प्रमाणात नत्र (नायट्रोजन) घेत असतो. मुबलक प्रमाणात नत्र पुरवल्यावर मक्याचं पीक उत्तम येत असतं. परंतु एकदा मक्याची ताटं काढून टाकल्यावर जर पुन्हा त्या जागी मकाच लावल्यास त्याला नत्र कमी प्रमाणात मिळेल अन परिणामी दुसऱ्यांदा लावलेल्या मक्यापासून आपल्याला मिळणारी कणसं कमी दर्जाची अन संख्येनंही कमी मिळतील.

याप्रमाणंच इतरही पिकं कमीअधिक प्रमाणात मातीतुन नायट्रोजन, पोटॅशियम अन फॉस्फरस यासोबतच इतरही अन्नघटक व इतर घटक जसं कॅल्शियम, मॅग्नेशियम वगैरे घेत असतात. त्यांची पूर्तता वा पुनर्भरण खतांद्वारे करतानाच पीकं बदलली तर माती अधिक सुपीक होते अन हे काम जलदही होतं. उदा. मका घेतल्यानंतर तर त्याच ठिकाणी चवळी, भुईमूग (शेंगदाणा), बटाटा वा इतर द्विदल धान्य घेतल्यास त्यांच्या मुळांवरील गाठींद्वारे हवेतील नत्र शोषून घेऊन ते पुन्हा मातीत जमा करता येतं.

पिकांच्या वाढीच्या काळात त्यांच्यावर पडणारे रोग अन ते पसरवणारे वा अशा रोगांना जबाबदार असणारे कीड वा जंतु व त्यांची अंडी हे मातीतच त्या रोपाभोवतीच वास्तव्य करत असतात. एकाच जागी पुन्हा तेच पीक घेतल्यास त्या किडीला फारसे कष्ट न घेता त्यांचं अन्न जागीच उपलब्ध होतं. पण त्याऐवजी आपण दुसरं पीक घेतल्यास मातीतून ही कीड आपोआप नष्ट होते. जर आपण पुन्हा तेच पीक पण दुसऱ्या जागी घेतलं तर ही कीड नवीन जागी स्थलांतरित होण्यास अनंत अडचणी येत असतात अन त्यामुळं त्या नवीन ठिकाणी जात नाहीत. त्यामुळं पीकांच्या फेरबदलामुळं किडीचाही प्रश्न सोडवण्यास मदत होते.

याचा अजुन एक फायदा म्हणजे पिकांच्या बदलत्या जागांमुळं ठराविक काळांनंतर आपली बागही रुप बदलत असते अन त्यामुळं आपण वेगवेगळ्या प्रयोगांनी बागेतील सौंदर्यात भरही घालू शकतो.


© राजन लोहगांवकर

वानस्पत्य

झाडांसाठीची_पोषकतत्वं - लेखांक ०७

झाडांसाठीची_पोषकतत्वं

लेखांक ०७


तसं पहाता बी पेरल्यापासून ते झाडं फुलं-फळं देईपर्यंत सारीच अन्नद्रव्यं प्रमाणात उपलब्ध असणं किंवा करुन देणं आवश्यक असतं. हे प्रत्येक झाडांच्या बाबतीतच असतं, अगदी इन्डोअर प्लांट्स अन सक्युलंट्सच्याही बाबतीत. फक्त त्यांच्या गरजा वेगळ्या. त्या विषयांतील तज्ञ त्यावर अधिक प्रकाश टाकु शकतील. माझा तो विषय नाही. 

पुढे आपण नियमितपणे आपल्या गच्चीवरच्या बागेत लावत असलेली किंवा आजच्या काळात घेण्याची गरज असलेली काही पिकं अथवा झाडं आणि त्यांना लागणारी प्रमुख अन्नद्रव्यं देत आहे ;

टोमॅटो - रोपाची पूर्ण आणि निरोगी वाढ होण्यासाठी नत्र, तर भरपूर फुलं येण्यासाठी फॉस्फरस आणि हेल्दी व मोठी फळं येण्यासाठी पोटॅशियम आणि कॅल्शियमची आवश्यकता असते.

लाल व दुधी भोपळा - पुरेसा फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम मिळाल्यास फुलगळ होणार नाही आणि भोपळेही हेल्दी मिळतील.

गाजर - चांगल्या प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅशियम मिळाल्यास पूर्ण वाढ झालेली अन चविष्ट गाजरं मिळतात.

लसूण - लसणाची मुळं आणि कांदा व्यवस्थित भरण्यासाठी फॉस्फरस आणि पोटॅशियम द्यावा

लेट्यूस - पुरेसं नत्र आणि मॅग्नेशियम मिळाल्यास हिरवागार व भरपूर प्रमाणात लेट्यूस मिळेल

गुलाब - पुरेशा फॉस्फरसच्या मात्रेमुळे भरपूर आणि टपोरी फुलं मिळतात. 

आतापर्यंत आपण माती, विविध अन्नद्रव्यं तसंच पोषणद्रव्यं यांबाबत अन त्यांचा बगेतील रोपा-झाडांवर होणारा परिणाम याबाबत जाणून घेतलं. परंतु कितीही काळजी घेतली तरी कधी कधी कुठलं ना कुठलं अन्नद्रव्य कमी पडतं. कारणं कितीही अन कुठलीही असु द्या. पण हे होतंच. त्याचा परिणाम आपल्याला अल्पावधीतच दिसुन येतो. अन तो म्हणजे रोपांवर पडलेल्या रोग व किडी यांच्या द्वारे. याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊ या.

रोग :

काही अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे रोपांवर कीड पडते. आपण कितीही काळजी घेत असलो तरी कधी आपल्या रोपांना बुरशीजन्य रोग तर कधी व्हायरल तर कधी विषाणूजन्य आजारांना तोंड द्यावं लागतं. जसं आपल्या बाबतीत घडतं, कितीही सकस आहार घेतला तरी कधी कुठल्याशा आजाराचा सामना करावा लागतो, सर्दी पडसं होतं तसंच झाडांच्याही बाबतीत होतं. हे कसं होतं ते आपण पाहू या.

पिकावरील बुरशीजन्य, जीवाणूजन्य अन बुरशीजन्य आजार जसं की मावा, मर रोग, मूळकूज, करपा, लीफ कर्ल सारख्या आजारांची मुख्य कारणं म्हणजे त्यांच्यात असलेली अन्नद्रव्यांची कमतरता. बुरशीजन्य रोगांची कारणं म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमची कमतरता असणं. झाडांवरील व्हायरल आजारांसाठी नत्र व फॉस्फरस यांची प्रमाणापेक्षा जास्त मात्रा हेच कारण असतं. अशा वेळी पोटॅशियम जास्त देऊन इतर दोन अन्नद्रव्यांचं संतुलन करणं आवश्यक असतं.

आजाराची लक्षणं दिसून आल्यावर आणि त्यावर काही उपाय केल्यावर साधारण एक आठवडा वाट पहावी. त्यानंतरही जर रोप वाढीला लागलं नाही अन रोगांची लक्षणं तशीच राहिली तर कसलाही विचार न करता सरळ रोप काढून टाकावं. त्यामुळे बागेतील इतर रोपांना बाधा होऊ नये याची काळजी घ्यायला हवी.

कीड

रोपा-झाडांना आहार आणि पोषणद्रव्यं कमी पडली की सहाजिकच त्यांच्यावर रोग व किड यांचा हल्ला होणारच. कारण अन्न व प्रोटीन्सच्या अभावाने रोपांची प्रतिकारशक्ती कमी पडते. अशी रोपं हे किडींचं लक्ष्य असतं. अशा परिस्थितीत मातीमधेही कीड वाढीस लागते अन रोपांवरील मुळं, खोड, पानं, फुलं, फळं हेही रोगग्रस्त होतं.

नत्र जर जास्त प्रमाणात दिलं गेलं तरीही कीड लागते. विशेषतः मावा वगैरे किडी या अधिकच्या नत्रामुळेच होत असतात. तेव्हा नत्राचं प्रमाणही मर्यादितच असायला हवं. कधीकधी पुरेशा अन्नाअभावी मरणपंथाला लागलेली रोपंही किडींना संदेश पाठवुन आपला मरणकाळ कमी करतात. तेव्हा हे सगळं वेळीच ओळखून त्याप्रमाणे उपाययोजना करणं गरजेचं असतं. तर कधी सशक्त व पुरेसं पोषण होत असलेली रोपं मित्रकिडींना आपल्याकडे आकर्षित करुन घेतात. अशा मित्रकिडी त्रासदायक किडीचा खात्मा करुन बाग निरोगी ठेवण्याचं काम करतात. म्हणून खतांसोबतच विविध अन्नद्रव्यं अन पोषणद्रव्यं वेळच्यावेळी अन ठराविक मात्रेत दिल्यास फुलं-फळं अन भाज्याही उत्तम मिळतील व कीडीपासूनही संरक्षण होईल. याबरोबरीनं, आपली बाग स्वच्छ ठेवली तर बागेत भरपूर खेळती हवा अन सूर्यप्रकाश राहील. मोकळ्या हवेत, स्वच्छ वातावरणात आपण जसे आनंदी रहातो तसंच झाडंही आनंदी रहातात. त्यामुळे तीही भरपूर फुलतात, फळतात.

हे सारं जे काही सांगितलं आहे ते फक्त भाज्यांच्याच बाबतीत नव्हे तर फुलं देणाऱ्या झाडांसाठी अन इतर फळझाडांसाठीही आहे. आशा आहे की हा लेख आपणांस उपयुक्त ठरेल व आपल्याही बागेतील कुंड्या फळा-फुलांनी बहरलेल्या असतील.

या लेखमालेमधला हा शेवटचा लेख. प्रारंभीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे ही लेखमाला खरोखरच नवोदितांसाठी म्हणून लिहिली आहे. आणि म्हणूनच यामधे कुठलेही बोजड, पारंपारिक अन शास्त्रीय शब्द न वापरता रोजच्या वापरामधलेच, प्रसंगी इंग्रजी शब्दही वापरले आहेत. तसंच उदाहरणं देतानाही ती घरचीच दिली आहेत, जसं की लहान मूल आपण कशा पद्धतीनं वाढवतो वगैरे. कारण बीपासून आपण जेव्हा झाडं वाढवतो तेव्हा तीही लहान मुलांसारखीच असतात. त्यांना काय़ हवं आहे ते आपणच ओळखून द्यावं लागतं. लहान मुलांप्रमाणेच त्यांनाही बोलता येत नाही. तीही त्यांना काय सांगायचंय ते त्यांच्याच भाषेत सांगत असतात. गरज असते ती आपण त्यांची भाषा ओळखण्याची, समजण्याची. त्यात ना शब्द असतात ना स्वर. ना ती मराठी असते ना इंग्रजी. ती अनुभवातुनच शिकता येते. मी तर तज्ञ नाहीच पण कुठलाही तज्ञ ते शिकवु शकणार नाही. 

तेव्हा मंडळी बागेत काम करताना डोळ्यांसह नाक, कान अन स्पर्शज्ञान या सर्वांचा वापर करा. नोंदी ठेवा. भलेही तुम्हाला कुठला थिसिस लिहायचा नसेल. हरकत नाही. पण नोंदी ठेवल्या तर तुमच्याच पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल. त्यांना पहिल्या इयत्तेपासून सुरुवात करावी लागणार नाही. आणि तुम्हालाही नवीन काही लागवड करताना कुठला लेख वा कुठली वेबसाईट रेफर करावी लागणार नाही. प्रत्येकजण हिरवा हात घेऊनच जन्माला येतो असं काही नाही. तो नंतरही तयार करता येतो. साचेबद्ध मेहनतीनं.

आणि हो, दररोज निरीक्षण करा म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्तही काळजी घेऊ नका. पालकांनी ओव्हरप्रोटेक्टिव्ह असणंही चुकीचंच असतं. मुलांच्या अन झाडांच्या प्रगतीमधे असं अतीकाळजी घेणंही बरेचदा अडसरच ठरत असतं. बरीच झाडं अतीकाळजी अन अतीप्रेमामुळे फुलं-फळं मुळीच किंवा अत्यल्प देणारी मी स्वतः पाहिली आहेत. माझ्याही बागेत अशी झाडं आहेत. फक्त ती मी कधीच काढून टाकली नाहीत. मी एवढं लिहितो म्हणजे माझ्या बागेत फळा-फुलांची रेलचेल आहे असं काही नाही. मी फक्त कष्ट घेतो. झाडानं फुलायलाच हवं असा अट्टाहास करत नाही. असो. हा झाला माझा विचार. तुमचा तो असायलाच हवा असं नाही.

या लेखनात जिथे जिथे म्हणून काही रेफरन्सेसची गरज पडली तिथे माहितीच्या आंतरजालावरील काही वेबसाईट्सची मदत घेण्यात आलेली आहे.

© राजन लोहगांवकर

वानस्पत्य

झाडांसाठीची_पोषकतत्वं - लेखांक ०६

झाडांसाठीची_पोषकतत्वं

लेखांक ०६


एवढी सगळी खतं, अन्नद्रव्यं पुरवणारे घटक अन त्यांचं विघटन करुन रोपांना घेता येईल अशा स्वरुपात ती त्यांना उपलब्ध करुन देणाऱ्या जीवाणूंची वाढ करणारे घटक हे आपण पाहिलं. पण या सगळ्यांपैकी काय, केव्हा अन किती प्रमाणात अन का द्याय़चं हेही पहायला हवं. चला, आपण ते पाहू.

केवळ आपल्याकडे भरपूर प्रमाणात कंपोस्ट, शेणखत, गांडूळखत वगैरे आहे आणि मल्चिंगसाठी विविध पर्यायही उपलब्ध आहेत म्हणून रोपांना सतत अन भरपूर खतं दिली तर फुलं वा फळं जास्त लागणार नाहीत. उलटपक्षी ते रोपा-झाडांसाठी घातकच ठरेल. लेखाच्या सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे शेतकरी व अनुभवी बागकर्मीही आपल्या पिकांना भरमसाठ खतं व पुरकं देत नाहीत. तर ते अनुभवातुन आलेलं वेळापत्रक सांभाळतात. पिकांवरची लक्षणं पाहून काय़ अन किती प्रमाणात द्यायचं ते ठरवतात अन ते आवश्यक तेवढंच देऊन अपेक्षित परिणाम साधतात. नियमित निरीक्षण अन वेळच्यावेळी ठेवलेल्या नोंदी यातुन आपणही हे सगळं आत्मसात करु शकतो आणि कमी खर्चात अन कमी कष्टांत जास्त उत्पन्न मिळवु शकतो. त्यासाठी बागकामाकडं केवळ छंद म्हणून न पहाता बाजारावर होणारा खर्च अन त्यातुन मिळणारं रासायनिक खतांवर पोसलेलं अन्न हे सगळं टाळून अत्यल्प खर्चात उत्तम पद्धतीनं स्वकष्टानं मिळवलेलं सकस अन चविष्ट अन्न हा फायदा अन त्यातुन मिळणारं सृजनाचं समाधान हे सगळं लक्षात घ्यायला हवं, त्या नजरेनंच बागकामाकडं आपण पहायला हवं.

आपल्या बागेतील रोपांकडे नुसतं पाहूनच आपल्याला त्यातली विकृती अथवा कुपोषणामुळे किंवा अल्प पोषणामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात यायला हवी. अर्थात त्यासाठी सकस अन सुयोग्य वाढ झालेलं झाड म्हणजे काय अन ते कसं दिसतं हे आपल्याला माहीत असायला हवं. असंही असु शकतं की नजरेला दिसत असलेलं वैगुण्य हेही काहीसं नॉर्मल अन नैसर्गिक असु शकतं. पण ते तसंच राहिलं तर मात्र त्यावर काम करण्याची गरज आहे हे ओळखता यायला हवं. साधारणपणे खाली दिलेली लक्षणं दिसु लागल्यास त्याप्रमाणे खतं वा अन्नद्रव्यं देण्यास हरकत नाही.

पानं पिवळी होणं - नत्राची कमतरता

पानांच्या कडा पिवळ्या होणं - मॅग्नेशियमची कमतरता

चुरगळलेली वा वाकडीतिकडी वाढ असलेली नवीन पालवी - कॅल्शियमची कमतरता

गुलाबी किंवा लालसर पानं - फॉस्फरसची कमतरता

विकृत आकारातली फळं - पोटॅशियमची कमतरता किंवा नत्राची मात्रा अती होणं

ब्लॉसम एंड रॉट - टोमॅटोमधे हे जास्त आढळतं. खालच्या बाजूला टोमॅटोवर काळे डाग दिसून येतात. याला कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता

फुलं न येणं अथवा फुलं गळून पडणं - फॉस्फरसची कमतरता

पानांवर हलका हिरवा रंग असणं अथवा पानं निस्तेज दिसणं - नत्राची कमतरता

पानं जळल्यासारखी दिसणं - मातीमधली फॉस्फरसची पातळी कमी झाल्याची लक्षणं.

जुनी पानं दाट हिरवी असणं - फॉस्फरसची कमतरता

पानं काळपट अथवा जळल्यासारखे डाग - पोटॅशियमची कमतरता

पानं कोमेजलेली दिसणं - पोटॅशियमची कमतरता

जसं नजरेला काही वेगळं अथवा विकृत दिसणं हे खतं देण्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे तसंच रोपांच्या विविध वाढीच्या वेळी योग्य ती खतं देणंही आवश्यक असतं. यासाठी रोप वाढण्याच्या वेगवेगळ्या स्थितींची माहिती करुन घेणंही गरजेचं आहे.

रोपं वाढण्याच्या विविध स्थिती 

१. बी पेरल्यापासूनचा काळ हा रोपांच्या वाढीचा काळ असतो. यावेळी त्यांच्या शरिराची योग्य ती वाढ होणं गरजेचं असतं. तसं पहाता या काळात सर्वच अन्नद्रव्यं उपलब्ध असणं आवश्यक असतं पण त्यातुनही नत्राची कमतरता या काळात पडू देऊ नये.

२. जी रोपं आपण ट्रान्सप्लांट करतो, उदा. मिरची, टोमॅटो, वांगी वगैरे. अशा वेळी मुळांची सुदृढ वाढ होणं गरजेचं असतं. अशावेळी फॉस्फरस आणि पोटॅशियम भरपूर दिल्यास पुढे काही अडचणी येत नाहीत.

३. रोपांवर फुलं येण्याच्या काळात फॉस्फरस, पोटॅशियम आणि खास करुन कॅल्शियम मातीमधे उपलब्ध असणं गरजेचं असतं.

४. फळं धरण्याच्या काळात चांगल्या प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅशियम देणं गरजेचं असतं. या काळात नत्र देताना त्याचं प्रमाण अती होऊ देऊ नये.

© राजन लोहगांवकर

वानस्पत्य 

झाडांसाठीची_पोषकतत्वं - लेखांक ०५

झाडांसाठीची_पोषकतत्वं

लेखांक ०५

गेल्या चार लेखांत आपण माती व झाडांसाठी लागणाऱ्या विविध अन्नद्रव्यं व पोषणद्रव्यांबद्दल जाणून घेतलं. आता पाहूया ही अन्नद्रव्यं अन पोषणद्रव्यं आपल्या झाडांना कशी द्यायची.

अन्नद्रव्यं वगैरे देताना घ्यावयाची काळजी :

१. पूर्ण प्रक्रिया झालेलं कंपोस्टच वापरा : कंपोस्ट झाडांसाठी वापरताना त्यामधील सारे घटक पूर्णपणे डिकंपोज झालेले असतील तेव्हाच वापरावं. अर्धकच्चं कंपोस्ट रोपांसाठी मारकही ठरु शकतं.

२. योग्य त्या मात्रेतच खत द्यावं : कंपोस्ट योग्य त्या मात्रेतच झाडांना देणं गरजेचं असतं. जास्त झाल्यास ते मातीमधे जास्त प्रमाणात अन्नद्रव्यं निर्माण करेल ज्याचा रोपांच्या वाढीमधे फायदा होण्याऐवजी अडसर ठरु शकेल. योग्य मात्रा ठरवण्याचा ठोकताळा म्हणजे कुंडीमधे अथवा वाफ्यामधे एक इंच जाडीचा थर होईल एवढंच कंपोस्ट द्यावं.

३. कंपोस्टमधे पोषक घटक घालावेत : घरी कंपोस्ट बनवत असताना जे काही घटक घातले जातात त्यामधे ज्या घटकांपासून जास्त अन्नद्रव्यं मिळतील असे घटक घालावेत. उदा. केळीच्या साली घातल्या तर अधिक मात्रेत पोटॅशियम मिळेल तर अंड्यांची टरफलं घातल्यास कॅल्शियम मिळेल.

४. कंपोस्टसोबत किंवा आलटून पालटून देण्यासाठी गांडूळखताचा अवश्य़ वापर करावा. कारण या दोन्हींमधे तुलना केली तर गांडूळखतात जास्त पोषणमुल्यं आहेत. त्यामुळे घरीच गांडूळखतही बनवावं अथवा आपल्या गरजेनुसार उत्तम गांडूळखत विकत आणून वापरावं.

५. शेणखत, गायीचं किंवा म्हशीचं, कुठलंही वापरावं. देशी गायीचं असेल तर उत्तमच. पण म्हशींचंही वापरण्यास हरकत नाही. थेट उपलब्ध नसल्यास पुजासाहित्य मिळाणाऱ्या दुकानांत गोवऱ्या उपलब्ध असतात. आपल्या गरजेनुसार त्याही आणून पाण्यात भिजवुन ते पाणी द्यावं आणि चुरा करुन कुंड्यांमधे घालावा.

मल्चिंग अर्थात जैविक आच्छादन : 

ओलं हिरवं गवत अथवा सुका पालापाचोळा मातीवर रोपाभोवताली किंवा रोपांच्या दोन ओळींमधुन अंथरल्यास तो खालची माती ओलसर ठेवतो. सावली ठेवतो. त्यामुळं अनेक जीवाणूंचं कार्य सुरु रहातं अन पर्यायानं दिलेल्या खताचं विघटन होऊन ते रोपांना खाण्याजोगं होण्यास मदत होते. मल्चिंगमुळं अनावश्यक तण उगवणही रोखली जाते. पर्यायानं दिलेलं खत हे केवळ आपल्या पिकासाठीच वापरलं जातं.

मल्चिंगसाठी वापरले जाणारे पर्याय : झाडांची गळून पडलेली पानं, वाळलेलं गवत, छाटलेल्या काड्या, गवत, जुनी वर्तमानपत्रं, पुठ्ठे.

मल्चिंग हे दिलेल्या खताचं विघटन होण्यास मदत करणारा एक घटक आहे. ते खत नाही की झाडांसाठीचं अन्न नाही. मल्चिंगमुळे मातीवर कार्बनचा एक थर निर्माण होतो ज्यामुळे वरुन दिलेल्या खत व अन्नामधील घटकांतलं नत्र रोपांसाठी लवकर उपलब्ध होईल अशी रचना मातीमधे तयार होते.


झाडांसाठी इतर काही नैसर्गिक आणि सेंद्रिय खाद्यं : मुख्य खतं, कंपोस्ट आणि मल्चिंगशिवाय अजुनही काही गोष्टी आहेत ज्या वेळोवेळी देऊन आपण मातीमधे मायक्रोब्स वाढवण्यास अन पर्यायानं सुपीकता निर्माण करण्यास मदत करु शकतो.

लाकडाची राख, कुंडीच्या आकारमानाप्रमाणे अर्धा ते एक चमचा राख महिन्यातुन एकदा दिली तर मातीमधे नैसर्गिक पोटॅश वाढतं तसंच मातीचा सामू (पीएच) अल्कलाईन होण्यासही मदत होते. अर्थात ज्या झाडांना अधिक आम्लयुक्त जमिनीची आवश्यकता असते अशा झाडांना राख घालणं टाळावं.

चुना, जेव्हा मातीमधे मॅग्नेशियमची कमतरता जाणवते अशा वेळी थोडा चुना पाण्यात मिसळुन द्यावा. पण त्यामुळे जमिन आम्लयुक्त होते. तेव्हा चुनाही अगदीच थोडा, तेही आवश्यक असलं तरच द्यावा.

जिप्सम, यामुळे मातीमधला कॅल्शियम वाढतो. तसंच घट्ट माती, विशेषतः क्ले सदृश माती मोकळी होण्यासही मदत होते. पण जिप्समचा अतिवापर करणं अयोग्य आहे.

याव्यतिरिक्त जोडपिकं जी मुख्य पिकाच्या अथवा रोपाच्या वा झाडाच्या सोबतीनं वाढून पूरक ठरतील अशी लावावीत. या विषयावर मी काही दिवसांपूर्वी इथंच लेख लिहिला होता तो वाचावा.

© राजन लोहगांवकर

वानस्पत्य 

झाडांसाठीची_पोषकतत्वं - लेखांक ०४

झाडांसाठीची_पोषकतत्वं

लेखांक ०४


शेतकरी जेव्हा मोठ्या प्रमाणात शेती करतो तेव्हा ही सारी अन्नद्रव्यं पेरणीच्या आधीपासून ते पीक काढून पुन्हा जमीन मोकळी करेपर्यंत वेळच्या वेळी देतच असतो. त्याला या खतांच्या वेळा अन मात्रा म्हणजे जमिनीच्या किती भागाला किती क्वांटिटीमधे खतं द्यायची हे पूर्ण माहित असतं. त्यामुळे तो कधीही पिकांमधे यापैकी कुठल्याही अन्नाची कमतरता असल्यास लक्षणं दिसण्याची वाट पहात नाही.

पण आपल्याकडे तो अनुभव नाही की ती नजरही नाही. आपण आहोत हौशी कुंडीकरी. बी पेरल्यापासून ते तिच्यापासून भेंडी वा टोमॅटो बनुन आपल्या ताटात पडणं हा आपल्यासाठी आहे एक छंद. आपण त्याचं कॉस्टिंगही कधी काढत नाही, की काढलेली एक किलो भेंडी किंवा टोमॅटो आपल्याला काय भावाने पडले. तर लावलेल्या रोपांच्या खतपाण्याच्या वेळा सांभाळणं अन लक्षणं पहाणं हे आपण काय करणार? अन या सगळ्या नोंदी ठेवुन त्याप्रमाणे सगळं करणं हे अपेक्षितही नाही. अर्थात तशी जागरुकता वाढवण्याची गरज आहे. तरच खर्च कमी करुन आपल्यालाही जास्त उत्पादन मिळवणं शक्य होईल. अन त्याचसाठी हा लेख.

तर ही सगळी अन्नद्रव्यं आपण कशा प्रकारे, तेही सेंद्रिय प्रकारे कशी देऊ शकतो? साधारणपणे एनपीके व डीएपी तसंच कॅल्शियम व गंधक वगैरे शेतकरी सहसा रासायनिक पद्धतीनंच देत असतात. कारण एकच. जो फरक ऍलोपथी व आयुर्वेदिक औषधं यांमधे आहे तोच. दोन्ही प्रकारांमधली खतं वा औषधं खतांसाठी उपलब्ध होण्यास लागणारा वेळ. सेंद्रिय खतं देऊन ती मातीमधे मिसळून पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध होईपर्यंत काही आठवडे जाऊ शकतात पण तेच जर रासायनिक खतं वापरली तर कमी मात्रेत जास्त परिणाम अन तोही काही दिवसांतच दिसतो. अर्थात यामुळे मातीचा कस वा पोत कमी होणं वगैरे गोष्टी निश्चितच आहेत. पण त्यावरही पुन्हा रासायनिक उपायच केले जात असल्यामुळे एका दुष्टचक्रात अडकल्यासारखी स्थिती होते.

आपण हे सगळं टाळून सेंद्रिय प्रकारे आपल्या घरच्या बागेत जर या भाज्या व फळं घेतली, त्यांची खतांची व अन्नद्र्व्यांची गरज लक्षात घेऊन, सुरुवातीच्या काही फेऱ्यांमधे निरीक्षणं करुन व त्यांच्या नोंदी ठेऊन जर त्याप्रमाणे वेळापत्रक बनवुन ते व्यवस्थित अन काटेकोरपणे पाळलं तर सकस भाज्या अन फळफळावळं आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. तेही कुठलंही कीटकनाशक न फवारता.

आपण नेहमी जी सेंद्रीय खतं वापरतो ती म्हणजे शेणखत, गांडूळखत व कंपोस्ट. या तीन खतांमधून वरील सर्व अन्नद्रव्यांची पूर्तता होतेच. पण याबरोबरीनं जर आपण अशा खतांच्यासोबतच बोनमील, नर्सरीमधे उपलब्ध असलेलं जनावरांच्या रक्त-मांस मिश्रीत खत, सीवीड, मासळीखत, भुईमुगाच्या शेंगांची टरफलं, अंड्यांच्या कवचांचे बारीक तुकडे, कंपोस्ट टी, वापरलेली कॉफी पावडर, ताकाचं पाणी हे सगळं देत राहिलो तर इतर कुठलंही खत देण्याची आपल्याला गरज पडणार नाही. सोबतीनं जीवामृत अथवा वेस्ट डिकंपोजरचं पाणी दिलंत किंवा वरील खतं वेस्ट डिकंपोजरच्या पाण्यात विरघळवुन वा मिसळून दिली तर ती रोपांना सेवन करण्यास लवकर उपलब्ध होतील. अन एकदा रोपं निरोगीपणे वाढली की त्यांच्यावर फारशी कीडही पडणार नाही.

वर लिहिलेली तीन प्रमुख सेंद्रिय खतं दर दोन आठवड्यांनी कुंडीच्या आकारमानाप्रमाणे मूठभर ते ओंजळभर देताना त्यामधे इतर खतं चमचा दोन चमचे मिसळली तरी पुष्कळ होतं. किंवा शेणखत वगैरे कुंडीच्या वरच्या भागात दिल्यावर दोन दिवस आधी वेस्ट डिकंपोजरच्या पाण्यात बोनमील वा इतर खतं भिजवुन ठेवुन ते पाणी कुंड्यांत दिल्यास त्याचा फायदा अधिक होतो. आपल्या कुंडीची साईज व तीमधील रोपाचा आकार अन वय यांचं प्रमाण अंदाजे ठरवुन घ्यावं अन त्याप्रमाणे खतं द्यावीत. फक्त खतं आलटुन पालटुन द्यावीत. म्हणजे आज शेणखत दिलं असेल तर पुढल्या खेपेला गांडूळखत द्यावं, त्याच्या पुढच्या वेळी कंपोस्ट द्यावं. यासोबतीनं न चुकता मल्चिंग केलं म्हणजे अशा खतांची कामं जलद गतीनं सुरु होऊन रोपांसाठी ती लवकरात लवकर उपलब्धही होतील.

पुढे दिलेली यादी व उपायांमधून आपल्याला याविषयी अधिक माहिती मिळेल;

मासळीखत : मासळी धुतल्यावरचं पाणी किंवा मासे साफ करुन उरलेल्या कचऱ्यापासून बनवलेलं खत. यामधे ऑर्गॅनिक एनपीके असतो. त्यातही नत्राचं प्रमाण पी अन के पेक्षा जास्त असतं.

बोनमील : म्हणजे हाडांचा चुरा. यामधे फॉस्फरस आणि नत्र विपुल प्रमाणात असतं. कंदवर्गिय भाज्या वा जी फुलं कंद लावुन घेतली जातात आणि जी रोपं ट्रान्सप्लांट करुन लावली जातात अशांसाठी हे फारच उपयुक्त आहे.

ब्लडमील : खाटीकखान्यात जेव्हा प्राणी कापले जातात तेव्हा त्यांचं रक्त, हाडांचे व मांसाचे बारीक तुकडे मातीमधे मिसळले जातात. अशी माती नर्सरीमधे उपलब्ध असते. यामधेही नत्राचं प्रमाण भरपूर असतं.

कोंबडीखत आणि लेंडी खत : पोल्ट्रीमधुन कोंबड्यांची विष्ठा मिसळलेली माती तसंच शेळ्या-मेंढ्या-बकऱ्यांपासून मिळालेलं लेंडीखत हेही एक उत्तम सेंद्रिय खत आहे. फक्त वापरताना याचं प्रमाण खूपच कमी असायला हवं. कारण हे अतिशय उष्ण असतं व जास्त प्रमाण झाल्यास रोपं दगावण्याचीही शक्यता असते.

गुळाचं पाणी : गुळामधे भरपूर प्रमाणात फॉस्फरस असतो. आणि हेच कारण असतं गुळाचा आपल्या आहारात जास्तीत जास्त वापर करण्यामागे. हेच कारण जीवामृत व वेस्ट डिकंपोजरचं द्रावण बनवतानाही गुळ का वापरला जातो याचंही असतं. केवळ हेच नाही तर विविध फळांची एन्झाईम्स व इतर सेंद्रिय खतं बनवताना सेंद्रीय गुळाचा वापर केला जातो. तेव्हा इतर कुठलंही द्रवस्वरुपामधलं खत नसेल तर कंपोस्ट टी बनवुन त्यामधे थोडा गुळ मिसळून दिल्यास खुपच फायदा होतो.

© राजन लोहगांवकर

वानस्पत्य

झाडांसाठीची_पोषकतत्वं - लेखांक ०३

#झाडांसाठीची_पोषकतत्वं

लेखांक ०३

आशा आहे की मागील माहितीचा आपल्याला उपयोग झाला असावा. आता पुढील लेखात आपण रोपांसाठी लागणाऱ्या प्रमुख अन्नद्रव्यांचं रोपाच्या वाढीत व त्याच्या जीवनचक्रात काय कार्यं आहेत ते पाहू.

प्राथमिक पोषक तत्वं :

१. नत्र NITROGEN (N) : रोपांच्या वाढीसाठी, त्यावरील पर्णसंभार वाढवण्यासाठी नत्राचा उपयोग होतो. जशी आपल्या शरिराला प्रथिनांची आवश्यकता असते तशीच ती झाडांनाही असते. हीच प्रथिनं पुरवण्याचं काम नत्र करत असतं. आवश्यकतेनुसार पुरेसं नत्र असेल तर रोपं हिरव्या गार पानांनी बहरलेली असतात. पण हेच नत्र जर जास्त प्रमाणात दिलं गेलं तर झाडं नुसतीच हिरव्या पानांनी बहरलेली असतात. त्यांच्यात फुलण्या-फळण्याची क्षमता उरत नाही. म्हणजे जसं डोक्यावर अगदी पायांपर्यंत पोहोचणारे केस आहेत अन शरीरच दुबळं असेल तर काय फायदा? म्हणूनच याचाही वापर योग्य त्या प्रमाणातच व्हायला लागतो. नत्राची कमतरता असेल तर पाणी देऊनही रोपाची खालच्या बाजूची पानं पिवळी पडतात. पालेभाज्यांसाठी नत्र भारपूर प्रमाणात उपलब्ध असल्यास हिरव्यागार व तजेलदार भाज्या आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. 

२. स्फुरद PHOSPHORUS (P) : रोपा-झाडांचं सर्वात मोठं शक्तिस्थान म्हणजे त्यांची मुळं. मुळं भक्कम असतील तर ती वाऱ्या-वादळाला तोंड देत उभी रहातील. हे स्फुरद मुळांना भक्कम करण्याचं काम करतं. त्यांच्यात रोपांमधली फुलण्या-फळण्याची अन बीजनिर्मितीची क्षमता वाढवतं. स्फुरद आवश्यक प्रमाणात रोपांसाठी उपलब्ध असेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे होते. रोपांच्या फांद्या, फुलं यांची वाढ होण्यासाठी स्फुरद योग्य प्रमाणात उपलब्ध असणं गरजेचं आहे. रोपांची प्रतिकारशक्ती वाढवण्याचंही काम स्फुरद करतं. रोपं व्यवस्थित वाढुनही जर फुलं वा फळं कमी लागत असतील, पानं लालसर जांभळट रंगाची होत असतील तर रोपांना स्फुरद कमी पडत असल्याचं समजावं.

३. पालाश (पोटॅश) POTASSIUM (K) : पालाश अर्थात पोटॅशियम झाडांच्या फुलण्या-फळण्याची क्षमता वाढवतं. रोपा-झाडांच्या पानांवर असंख्य छोटी छोटी छिद्रं असतात. प्रकाश संश्लेषण क्रियेत ती ऊघडझाप करत असतात. हवेतील कार्बन डाय ऑक्साईड घेऊन ऑक्सिजन बाहेर उत्सर्जित करण्याचं काम अशाच छिद्रांवाटे होत असतं. झाडांना पालाश योग्य प्रमाणात उपलब्ध असल्यास ही छिद्रं योग्य प्रकारे उघडझाप करतात, ही संश्लेषणाची क्रिया योग्य प्रकारे होते. तसंच पानांद्वारे तयार केलेलं अन्न झाडांत योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचं कामही हे पालाश करत असतं. पालाश योग्य प्रमाणात झाडांना मिळाल्यास फळं व झाडांच्या पुढच्या पिढीसाठी लागणाऱ्या बिया उत्तम प्रतीच्या बनतात. तसंच झाडांची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. पालाश रोपांची पाणी धारण करुन ठेवण्याची क्षमता वाढवत असल्यामुळे पाण्याचा तुटवडा असलेल्या काळातही रोप तग धरुन रहातं. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे रोपा-झाडांचे शेंडे, विशेषतः फळझाडांचे शेंडे वाळू लागतात. पानं वाटीसारखी आतल्या बाजुस वळुन वाळू लागतात. पालाशचा डोस जर जास्त झाला तर रोपांची व मुळांची इतर महत्वाच्या अन्नद्रव्यांची शोषणक्षमता खुंटते, उदा. कॅल्शियम मॅग्नेशियम.


माध्यमिक वा दुय्यम तत्वं


१. कॅल्शियम : आपल्या शरिरात जशी आंतर्व्यवस्था आहे, म्हणजे हाडं, शिरा वगैरे तशीच झाडा-रोपांच्याही बाबतीत असते. त्यांनाही पेशी असतात ज्यातून मुळांवाटे शोषलेली द्रव्यं पानांपर्यंत पोहोचली जातात. अशा पेशींच्या भिंती भक्कम करण्याचं काम कॅल्शियम करतो. कॅल्शियम हे रोपांसाठीचं एक अत्यावश्यक असं पोषणद्रव्य आहे. झाडांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचंही काम हे कॅल्शियम करतं. कॅल्शियम रोपांच्या पेशींना सक्षम करतं. तसंच ते रोपांची सर्वांगीण वाढ होण्यासाठी मदत करतं.

कॅल्शियमची रोपा-झाडांच्या शरिरात जी काही कामं असतात ती सर्वसाधारणपणे सांगायची झाल्यास ;

पेशी मजबूत ठेवतं, पेशी भित्तिका (सेल वॉल्स) मजबूत ठेवण्याबरोबरच त्या जाडही बनतात. पिकांच्या अवयवांची वाढ लवकर होते. पिकांमधे फुलं व फळधारणा होण्याची क्षमता वाढते. पिकांची प्रत व टिकाऊपणा वाढण्यास मदत होते. पिकांची बुरशी व जिवाणुजन्य रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. कॅल्शियमची कमतरता असली की बुरशीजन्य रोग होऊन रोपांच्या अंतर्गत पाणी वहन नलिकांवर विपरित परिणाम होतो त्यामुळे मर रोगाचा सामना रोपांना करावा लागतो. झालंच तर कॅल्शियममुळे रोपांना आवश्यक असलेल्या इतर मायक्रो न्युट्रिअंट्सचं शोषण सुलभ रित्या होण्यास मदत होते.

कॅल्शियमची जर रोपांमधे कमतरता असेल तर रोपा-झाडांची शेंड्याकडील वाढ तसंच कळ्या अन मुळांची वाढ खुंटते. रोपांच्या पानांच्या कडा करपणे, पिवळे डाग पडणे, टोके जळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. रोपा-झाडांवरील फळं, फुले व टोकाकडील भागाचा आकार लहान होतो. फुलं व फळांची गळती होते व टोके जळतात. टोमॅटोच्या खालच्या भागावर काळे डाग पडून तो भाग सडतो. तसंच काही वेळा टोमॅटोला वरच्या भागावर तडा पडतो.

मातीमधील कॅल्शियम रोपांमधील वापराने तसंच अधिक पाऊस झाल्यास कमी होतो. कॅल्शियमचं नत्रासारखं पाण्याद्वारे वहन होत नसल्यामुळे तो नत्रयुक्त खतांबरोबर तसंच सेंद्रिय खतांसोबतीनं दिल्यास रोपांना लवकर उपलब्ध होतो. कॅल्शियम मुळांत देण्याऐवजी जर फवारणीद्वारे दिल्यास तो शेंड्याकडील भागास लवकर आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असल्याने पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

२. मॅग्नेशियम : मॅग्नेशियम हा रोपांच्या पानांमधे हिरवा रंग भरण्यास मदत करतो. रोपांच्या वाढीसाठी तो फॉस्फरसचं सहाय्य करतो. प्रकाश संश्लेषण क्रियेतही तो फॉस्फरसच्या बरोबरीनं काम करतो. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पानांच्या शिरा पिवळ्या पडू लागतात तसंच पानं वरच्या बाजुन आत वळतात. अशी पानं चुरगळली तर पानाचा तुकडा पडतो. रोपाच्या खालच्या बाजुच्या पानांवर लालसर छटा येते. आपल्यापुरतं सांगाय़चं झाल्यास मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळं पानांची अशी अवस्था टोमॅटो, द्राक्षं व वेलवर्गिय भाज्यांच्या बाबतीत जास्त जाणवते.

३. सल्फर : सल्फर हा रोपां-झाडांमध्ये प्रथिने तयार करण्यासाठी महत्वाचा घटक आहे. तसंच तो पिकांमध्ये विविध हॉर्मोन्सची व व्हिटॅमिन्सची कार्यं व त्यांचा विकास होण्यासाठी मदत करतो. सल्फरच्या उपलब्धतेमुळे झाडांच्या पानांत हरितकण तयार होतात. तसंच मुळांची वाढ आणि फळं तयार होण्यासही याची मदत होते. सल्फरमुळे द्विदल धान्य तसंच शेंगवर्गिय पिकांच्या मुळांवर असलेल्या नत्राच्या गाठी तयार होण्यास मदत होते. अशा पिकांमधे जेव्हा दाणे भरण्याची वेळ येते तेव्हा सल्फर आपलं कार्य करतो अन शेंगांमधे दाणे भरण्यास मदत करतो. फुला-फळांमधे रंग, सुगंध अन चव भरण्याचं काम सल्फर करतो. रोपांमधे सल्फर मुळातून शेंड्याकडे वाहून नेण्याची क्षमता नसल्यामुळे सल्फरची कमतरता झाल्यास शेंड्याची कोवळी पानं पिवळी पडतात परंतु काही वेळा पानांच्या शिरा फिकट हिरव्या अन पान पिवळं असंही दिसतं. (नत्राच्या कमतरतेमुळं रोपाची खालच्या बाजूची पानं पिवळी पडतात. सल्फर फारच कमी पडल्यास संपूर्ण रोप पिवळं पडतं, त्याची वाढ खुंटते, झाडांवर फळं तयार झाली तरी ती काढण्याजोगी होण्याचा कालावधी वाढतो.) जनावरांनी उत्सर्जित केलेल्या गोष्टींपासून बनलेल्या खतांत सल्फर विपुल प्रमाणात उपलब्ध असते.

सूक्ष्म अन्नद्रव्यं 

सूक्ष्म अन्नद्रवं रोपांच्या वाढीसाठी, फुलं व फळधारणेसाठी आवश्यक असतात. पानं हिरवी ठेवणं, त्यावर नैसर्गिक चमक आणणं व ती राखणं फुलं व फळांना आकार, रंग रुप देणं, त्यांचं वजन वाढवणं हेही काम ही द्रव्यं करत असतात. रोपा-झाडांमधे लवचिकता ठेवण्याबरोबरच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अबाधित ठेवण्याचं महत्वाचं कामही ही अन्नद्रव्यं करत असतात.

© राजन लोहगांवकर

वानस्पत्य

झाडांसाठीची_पोषकतत्वं - लेखांक ०२

झाडांसाठीची_पोषकतत्वं

लेखांक ०२

मागल्या लेखात आपण अन्नद्रव्यांविषयी थोडक्यात जाणून घेतलं. पुढील लेखात त्यांच्याबद्दल विस्तृतपणे जाणुन घेऊच. पण त्याआधी सर्वात प्रमुख घटक, म्हणजे माती या विषयी जाणून घेऊ.

माती

पिकांच्या सुदृढ निरोगी वाढीसाठी भरपूर पोषणद्रव्यं अन अन्नद्रव्यं यांची गरज असतेच. पण त्याचं खरं मर्म आहे अन ते म्हणजे माती, आपल्या गच्चीवरच्या हलक्या वा कमी वजनाच्या बागेत ज्याला आपण पॉटिंग मिक्स म्हणतो ती. या मातीचा सामू (pH) जमिनीचा अथवा कुंडीतल्या मातीचा पोत ठरवतो. माती आम्लयुक्त आहे की अल्कलीयुक्त म्हणजे क्षारयुक्त आहे ते हा सामू अथवा पीएच तपासल्यावर कळतं. चांगला पोत असलेली माती रोपांचं, त्यापासून मिळणाऱ्या फुला-फळांचं आरोग्य सांभाळत असते. अशा मातीत आपल्याला कुठलंही खत अथवा पोषणमुल्य वरतुन देण्याची फारशी गरज पडत नाही.

जमिनीचा सामू हा १ ते १४ या अंकांच्या दरम्यान असतो. साधारणपणे ६.५ ते ७.५ या दरम्यान सामू असेल तर तो उदासीन अथवा न्यूट्रल मानला जातो. ६.५ च्या खाली सामू असेल तर जमिन आम्लयुक्त असते. अशा मातीत अन्नद्रव्यांचं प्रमाण व्यस्त असतं. काही अन्नद्रव्यं नसतात किंवा अल्प प्रमाणात असतात तर काही अती प्रमाणात असतात. साधारणपणे अशा मातीमधे कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम कमी प्रमाणात असतात.

आणि सामू ७.५ च्या वर असेल तर माती क्षारयुक्त असते, अशा मातीमधे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. अशाही मातीत व्यस्त प्रमाणात पोषणद्रव्यं असतात. तसंच अशा मातीमधे कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असतात

दोन्ही प्रकारच्या मातीमधे काही पूरकं म्हणजेच सप्लिमेंटरी अन्नद्रव्यं देऊन त्यांचा सामू सुधारता येऊ शकतो. पण त्यासाठी सामू चेक करणं आवश्यक असतं. पण हे झालं व्यापारी तत्वांवर जमिनीवरची शेती करणाऱ्यांसाठी. आपण जेव्हा कुंड्यांमधे शेती करतो तेव्हा आपल्याला ही गरज फारशी भासत नाही. कारण आपण कुंडी भरतानाच त्यात सगळी पोषणद्रव्यं अन अन्नद्रव्यं मिसळलेली असतात. पण ज्यांना मातीचा सामू घरीच तपासायचा असेल ते अगदी घरगुती स्वरुपात अन घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात तो तपासू शकतात.

मातीचा सामू (pH) घरच्या घरी कसा तपासाल?

अर्धा कप व्हाईट व्हिनेगर घेऊन त्यात २ चमचे आपल्या बागेतील माती घालून जरासं ढवळल्यावर जर फेस येत असेल तर ती माती अल्कलीयुक्त म्हणजे क्षारयुक्त आहे असं समजावं. अशा मातीचा सामू हा ७ ते ८ च्या दरम्यान असतो.

समजा अशा चाचणीत फेस नाही आला तर एका ग्लासमधे डिस्टिल्ड वॉटर (घरात इन्व्हर्टर असेल तर त्याच्या बॅटरीकरता किंवा कार वा बाईकच्या बॅटरीकरता जे पाणी बाजारातुन विकत आणता ते पाणी म्हणजे डिस्टिल्ड वॉटर.) घेऊन त्यात दोन चमचे माती घालुन पातळसर चिखल होईल असं पहावं. त्यामधे दोन चमचे बेकिंग सोडा घातल्यावर जर फेस आला तर माती आम्लयुक्त आहे अन सामू ५ ते ६ च्या दरम्यान आहे असं समजायला हरकत नाही.

जर दोन्हीही चाचण्यात फेस आला नाही तर माती उत्तम आहे अन तिचा सामू ७ च्या आसपास आहे असं समजावं.

सामू प्रमाणापेक्षा कमी अथवा जास्त असेल तर तो दुरुस्त नक्कीच करता येतो अन शेतकरी तसा तो करतातच. पण आपल्याला त्यामधे पडण्याची गरज नाही. आपण आपल्या कुंड्यांमधे अथवा जमिनीवरील बागेमधे झाडांच्या आळ्यांत तसंच वाफ्यांमधे नियमितपणे सेंद्रिय खतं, अधिक जीवाणूयुक्त खतं, उत्तमप्रकारे बनवलेलं कंपोस्ट, गांडूळखत वगैरे देत राहिल्यास त्यामधील जीवाणूंच्या मदतीनं मातीचा पोत नक्कीच सुधारतो. फक्त या प्रक्रियेत रासायनिकपेक्षा जास्त वेळ लागेल. पण ही पद्धत नैसर्गिक आहे ज्याचे कुठलेही दुष्परिणाम नसतील.

© राजन लोहगांवकर

वानस्पत्य

झाडांसाठीची_पोषकतत्वं - लेखांक ०१

झाडांसाठीची_पोषकतत्वं

लेखांक ०१

रोपांच्या वाढीसाठीची आवश्यक पोषणद्रव्यं

नमस्कार मंडळी,

मागच्या भाजीपाल्यावरील लेखमालेसारखीच ही छोटीशी लेखमालाही नवोदितांसाठीच आहे. जे यातले माहितगार वा कुशल असतील त्यांनीही ही लेखमाला वाचण्यास हरकत नाही. फक्त अशा जाणकार व सर्वज्ञ मंडळींकडून अपेक्षा इतकीच आहे की माझ्या हातून काही राहुन गेलं असल्यास ते सांगावं अथवा अधिकची माहिती देता आली तर ती द्यावी. गेल्या वेळेसारखं उगीचच माझी परिक्षा घेणारे प्रश्न विचारु नयेत. याच कारणानं बरेच जण लिहायचे बंद झाले आहेत, अन त्यामुळंच समूहावर केवळ जास्वंद, गुलाब अन कंपोस्टमधल्या अळ्या यांचाच संचार जास्त झाला आहे.

या लेखमालेत आपण पहाणार आहोत बिया पेरल्यापासून ते भाज्या, फळं, फुलं तयार होऊन आपल्या हातात पडेपर्यंत काय काय करावं लागतं ते. म्हणजे खरं तर आपण काहीच करत नाही किंवा काही करायची गरजही नसते. जे काही होतं ते नैसर्गिकपणेच होत असतं. आपण फक्त ते कसं होतं, काय काय घटना अन कोणकोणत्या वेळी घडत असतात याची माहिती करुन घेणार आहोत. बागेत आपला हस्तक्षेप फक्त काही चुकलंच तर केवळ दुरुस्ती करण्यापुरता अथवा आधार देण्यापुरता असावा. जसं आपलं मुल चालायला लागतं तेव्हा कसं आपण फक्त लक्ष देऊन ते पडत असेल तरच सावरतो. त्याची पावलं उचलुन पुढे ठेवत नाही, तसंच. आपल्याला फक्त पेरणीपासून काढणीपर्यंत बीच्या आयुष्यात काय काय होतं तेच जाणून घ्यायचं आहे. अन तेच आपण या लेखमालेत पहाणार आहोत. आशा आहे की या लेखमालेतुनही आपण विशेषतः नूतन बागकर्मी बरंच काही शिकतील. मुख्य म्हणजे बाग करणं म्हणजे काही विशेष एक्स्पर्टीजची बाब आहे असा गैरसमज दूर करुन त्यातलं मर्म उघड करुन दाखवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. यातुन काही शिकुन जर वाचकांपैकी थोडे जरी बाग करण्यास उद्युक्त झाले तरी अंशतः का होईना पण या लेखमालेमागचा हेतू साध्य होईल.

बी रुजण्यापासून ते झाडाचा जीवनकाल पुर्ण होईपर्यंत त्याच्या प्रत्येक टप्प्यावरील वाढीसाठी तसंच होणाऱ्या संभाव्य रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून बरीचशी पोषणद्रव्यं लागत असतात. जसं आपण आपल्या मुलांना त्यांच्या जन्मापासून देत असलेल्या आहार, औषधं, मसाज, केस व सांध्यांसह पूर्ण शरीरभर लावत असलेली तेलं वगैरेंतुन त्यांच्या संपुर्ण शरिराचं पोषण होऊन ते कुठल्याही रोगाचा प्रतिकार करु शकतील अशा प्रकारे त्यांना अंतर्बाह्य धडधाकट करत असतो, त्यांची इम्युन सिस्टिम स्ट्रॉन्ग करत असतो तसंच. त्यांच्या आहारात लोह, कॅल्शियम वगैरेंचा किंवा आताच्या भाषेत विविध प्रोटिन्स व सप्लिमेंट्सचा जसा समावेश राहील याची काळजी घेतो तसंच सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे काही आजार होऊ नयेत याचीही काळजी घेतो. हे जे काही आपण देत असतो ते सारंच काही त्यांच्या तोंडावाटे पोटात जाऊन पचनसंस्थेतली सगळे टप्पे पार करत रक्तात मिसळत नाही. बऱ्याच गोष्टी, जसं तेलं, काजळ वगैरे गोष्टी इतर मार्गांनी त्यांच्या शरिरातील त्या त्या ठिकाणी जाऊन ती ती ठिकाणं मजबूत करत असतात.

त्याच प्रमाणे झाडांनाही देण्यात येणारी पोषणद्रव्यं वेगवेगळ्या प्रकारे द्यावी लागतात. काही मातीतून, तर काही रोपांवर फवारुन तर काही मुळाशी दिलं जाणाऱ्या पाण्यातुन. हे सगळं देण्याच्या वेळाही अगदी ती छोट्याशा बीच्या रुपात असतात तेव्हापासूनच सुरु होतात. तसं पहाता मातीमधून बरीचशी अन्नद्रव्यं अन पोषणद्रव्यं झाडांना मिळतच असतात. पण आपल्या वाढीच्या काळात झाडांनी ती सेवन करुन ती कमी होतात तर कधी आपण दिलेल्या पाण्यावाटे तर कधी पावसाच्या पाण्यावाटे ती वाहुनही जातात. समजा आपली झाडं जमिनीवर लावलेली असतील तर अन्नद्रव्याच्या शोधार्थ मुळं अधिक खोल किंवा आजुबाजुला पसरुही शकतील, तशी ती वाढतात अथवा पसरतात देखील. पण आपली झाडं जेव्हा कुंडीत असतात, तेही खाली मातीचा संपर्क नसुन सिमेंट कॉंक्रिटचा संपर्क असेल तर त्यांना पोषणद्रव्यांसाठी आपल्यावरच अवलंबून रहावं लागतं.

तर अशी कुठली पोषणद्रव्यं अन अन्नद्रव्यं आहेत जी झाडांच्या, त्यांवरील पानाफुलांच्या व फळांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत ते आपल्याला जाणून घ्यायला हवं. अशा द्रव्यांची कमतरता भासली तर झाडं काही बोलुन दाखवणार नाहीत. ती आपल्या रंग, रुप, चव, आकार यावरुन आपल्याला संदेश देतील. अनुभवी बागकर्मी अन प्रत्येक शेतकरी हे नक्कीच जाणतो. अन त्याप्रमाणे उपायही करतो. किंबहुना अनुभवावरुन केव्हा काय द्यायला हवं हे त्याला पक्कं माहित असल्यामुळे तो झाडांनी संदेश देण्याचीही वाट पहात नाही. वेळच्यावेळी सगळं वेळापत्रक सांभाळत आपल्या पिकाला अन्नद्रव्यं पुरवत असतो. आपणही ते समजुन घेऊन त्याप्रमाणे आपल्या रोपांना त्यांचं खाद्य वेळच्या वेळी दिलं तर कुठल्याही रोगा-किडीशिवाय ती वाढतील अन अपेक्षित फुलं अन फळं देतील. या लेखात आपण अशाच पोषणद्रव्यांची माहिती करुन घेऊ. अन ती कधी अन कशी देता येतील ते पाहू. तसंच त्यांचा अभाव असल्यास काय होतं तेही आपण पाहू. अर्थातच आपला प्रयत्न राहील की ही सारी द्रव्यं सेंद्रियच असतील.

पिकांना, रोपांना व झाडांना बी रुजण्यापासून ती त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत जी काही पोषकतत्वं लागतात अन ज्यांद्वारे त्यांची ८५ ते ९०% शरीररचना व भरणपोषण होतं ती निसर्गतःच उपलब्ध असतात. ही तत्वं म्हणजे कार्बन, हायड्रोजन अन ऑक्सिजन. हे तीनही प्रमुख घटक रोपं वा झाडं हवा, माती व पाणी यातुन मिळवत असतात. या व्यतिरिक्त इतर जे घटक आहेत त्यांचं वर्गीकरण करायचं झाल्यास ते प्राथमिक अन्नद्रव्यं, दुय्यम अन्नद्रव्यं आणि सूक्ष्म अन्नद्रव्यं असं करता येईल.

प्राथमिक अन्नद्रव्यांत येतात नायट्रोजन म्हणजेच नत्र (N), फॉस्फरस म्हणजेच स्फुरद (P) आणि पोटॅशियम म्हणजे पालाश (K) ही द्रव्यं खतांद्वारे द्यावी लागतात.

दुय्यम अन्नद्रव्यांमधे कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर हे तीन घटक मोडतात. ही द्रव्यं मातीमधे असतातच. पण ती जर रोपांना मुळांवाटे घेण्याच्या रुपात नसतील तर वरुन द्यावी लागतात.

सूक्ष्म अन्नद्रव्यांमधे झिंक, बोरॉन, कॉपर, लोह, क्लोराईड, मॅंगनिज आणि मॉलिब्डेनम हे मोडतात. ही द्रव्यं देखील मातीमधेच असतात. पण ती जर रोपांना मुळांवाटे घेण्याच्या रुपात नसतील तर वरुन द्यावी लागतात.

पुढील लेखात आपण यातील प्रमुख अन्नद्रव्यांची ओळख व रोपाच्या वाढीत व त्याच्या जीवनचक्रात या अन्नद्रव्यांचं काय कार्यं आहेत ते पाहू. पण त्याही आधी आपण वापरत असलेली माती कशी आहे, तिचा पोत कसा आहे. पोत जर खराब असेल तर तो सुधारण्यासाठी काय करावं लागेल. त्याआधी आपल्या मातीचा पोत कसा तपासावा. त्यासाठी कुठल्याही प्रयोगशाळेत न जाता घरच्या घरीच तो कसा तपासावा हे पाहू.

© राजन लोहगांवकर
वानस्पत्य

गच्चीवरील_भाजीपाला - शंकासमाधान आणि समारोप

गच्चीवरील_भाजीपाला

लेखांक १२

शंकासमाधान आणि समारोप


मंडळी, या लेखमालेतील हा समारोपाचा लेख. आशा आहे की या लेखमालेतील सर्व लेख आपणां सर्वांस उपयुक्त वाटले असावेत. ही लेखमाला लिहिण्यामागचा उद्देश एकच होता अन तो म्हणजे वर्षभर विविध सीझनमधे बाजारात ज्या ज्या भाज्या उपलब्ध असतात व सामान्यतः ज्या भाज्या खाल्ल्या जातात त्या आपल्याला आपल्या घरच्याच बागेत उगवता याव्यात अन त्याही घरीच केलेल्या सेंद्रीय खतात. याद्वारे पिकांचं भरघोस उत्पन्न अन केवळ नजरेलाच दिसणारं आकर्षक रुप यासाठी दिलेली रासायनिक खतं टाळून संपूर्णपणे सेंद्रीय खतांवरचंच अन तेही स्वतःच पिकवलेलं अन्न आपल्या पोटांत जावं, त्या त्या भाज्यांच्या नैसर्गिक गुणांसोबत अन चवींसोबत. ज्यांनी ज्यांनी ही लेखमाला वाचली त्यांच्यापैकी अगदी दहा टक्के लोकांनी जरी स्वतः भाजीपाल्याचं उत्पादन आपापल्या घरीच घेणं सुरु केलं तरीही ते खूपच मोठं यश आहे असं मी समजेन. काही भाज्या ज्या खूपच कॉमन आहेत व त्या थोड्याशाही प्रयत्नांमधे आपण उगवु शकतो त्या भाज्यांचा समावेश या लेखमालेत करण्याचं टाळलं आहे. तोचतोचपणा येऊ नये व मालिका कंटाळवाणी होऊ नये यासाठीच. या लेखांमधे काही प्रश्न विचारले गेले होते त्यांचं त्या त्या वेळी निरसन केलं होतं. पण काही प्रश्नांची उत्तरं देऊनही मी ती इथं वेगळं देतो कारण ते कदाचित अधिक वाचलं जाईल. एक म्हणजे मल्चिंग आणि दुसरं म्हणजे प्रत्येक लेखाशेवटी असलेली सूचना की या मातीत पुन्हा ती भाजी लावू नये.

मल्चिंग म्हणजे जमिनीवर वा कुंडीतल्या मातीवर रोपाभोवती घातलेलं जैविक आच्छादन अथवा पांघरुण. आपण झाडांना जेव्हा पाणी देतो तेव्हा जे पाणी मातीमधे उरतं त्यातल्या बहुतांश भागाचं हवेतील उष्म्यामुळे बाष्पीभवन होतं. ते होऊ नये व मातीमधे असलेलं पाणी रोपांनाच उपलब्ध व्हावं म्हणून केलेली योजना आहे ती. यासाठी आपण असं काही वापरायचं असतं की ज्याचं काही दिवसांतच खत होईल. म्हणजे सुका पाचोळा, झाडांच्याच काड्या, बारीक तुकडे केलेल्या फांद्या, वाळलेलं वा ओलं हिरवं गवत, वा या साऱ्याचं मिश्रण. अशा मल्चिंगचं पॉटिंग मिक्समधे असलेल्या कंपोस्टच्या सहाय्यानं कंपोस्ट होतं व ते काही दिवसांतच मातीशी एकरुप होऊन जातं.

मातीचा पुनर्वापर आपण मातीमधे काही भाज्या लावून त्यांची सायकल अथवा जीवनचक्र पूर्ण करतो. यादरम्यान कितीही काळजी घेतली तरी काही कीड ही जशी झाडांवर जन्म घेते तशीच ती मातीतही जन्म घेते. म्हणजे तिची अंडी मातीत असतात. काही किडी जेव्हा झाडं मृतावस्थेत जातात तेव्हा मातीमधे असलेल्या ओलाव्याचा आधार घेऊन तिथ लपून बसतात. तसंच काही किडी या त्याच भाज्यांवर येत असतात. त्यामुळे एकदा भाजीचं पूर्ण चक्र पूर्ण झाल्यावर पुन्हा तीच भाजी त्याच मातीत घेतली तर किडींची वसाहतही कायमस्वरुपी तिथं नांदू लागते. यासाठी मातीला थोडा विराम देऊन, हवा अन उन्ह देऊन त्यातील किडीचा नाश करावा. एवढंच नाही तर विरोधी पीक घेऊन त्यातील किड वा अंडी जागीच नष्ट होईल असं पहावं. यासाठीच पुन्हा तेच पीक अथवा भाजी न घेता त्या मातीत दुसरी कुठली तरी भाजी लावावी.

ही लेखमाला सुरु करण्याआधीच्या प्रास्तविकात मी या लेखांसाठी असलेला टार्गेट वाचक हा नवखा, नव्यानं बागकाम सुरु करणारा वा करण्याच्या विचारात असलेला आहे हे स्पष्टपणं नमूद केलं होतं. त्यामुळेच मी अशा व्यक्तींकडून आलेल्या प्रश्नांना यथायोग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. काहींच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं नजरचुकीनं राहुनही गेलं असेल. त्यांनाही जमल्यास मी उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ज्यांना अधिक काही माहिती हवी असेल त्यांनी तसंच ज्यांना काही शंका असतील त्यांनी vaanaspatya@gmail.com किंवा rajanonmail@gmail.com या इमेल आयडींपैकी कुठल्याही आयडीवर संपर्क साधावा. मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.


©राजन लोहगांवकर. 

गच्चीवरील_भाजीपाला - कोबी व फ्लॉवर

गच्चीवरील_भाजीपाला

लेखांक ११

कोबी व फ्लॉवर


कोबी व फ्लॉवर या भाज्यांमधे खनिज द्रव्यं व जीवनसत्वं मुबलक प्रमाणात असल्यामुळे या भाज्यांचा समावेश नियमितपणे आपल्या आहारात ठेवल्यास रोगप्रतिकारशक्ती तर वाढेलच पण शरीरही निरोगी रहाण्यास मदत होईल. बाजारात जे कोबी अन फ्लॉवरचे गड्डे विक्रीसाठी उपलब्ध असतात ते शिजवताना बहुतेकवेळा उग्र वास येतो. या वासामुळे बरेचजण अशा भाज्यांना नाकं मुरडत असतात. परंतु आपण जर आपल्या घरीच, अगदी छोट्या कुंडीत या भाज्या सेंद्रीय खतावर उगवल्यास या चविष्ट तर लागतीलच पण घातक केमिकल्सही आपल्या पोटात जाणार नाहीत. कोबी व फ्लॉवर हे थंड हवामानात घेतलं जाणारं पीक आहे. त्यामुळे थंडीमधे हे छान वाढतं. परंतु आपल्या गच्ची-बाल्कनीतल्या बागेत अन तेही छोट्या प्रमाणात लागवड करत असताना आपण हवामान काही प्रमाणात नियंत्रित करु शकतो. त्यामुळे आपण हे पीक तीव्र उन्हाळ्याचे काही महिने सोडल्यास वर्षातले बाकी महिने घेऊ शकतो. चला तर आपण माहिती घेऊया घरच्या बागेत कुंडीत कसे कोबी व फ्लॉवर पिकवायचं ते.

कोबी व फ्लॉवर कुंडीमधे लावत असताना आपण थेट बी मातीमधे पेरु शकतो. पण रोपं बनवुन घेऊन ती ट्रान्सप्लांट करणं कधीही चांगलं. बिया पेरण्यासाठी ट्रे, अथवा फळांची खोकी वगैरेंचा वापर करावा. पॉटिंग मिक्सनं व्यवस्थित भरुन घेऊन, पाणी फवारुन घेऊन साधारण पाव ते अर्धा इंच खोल बोटानं खड्डा करुन घेऊन त्यात बी पेरुन माती सारखी करुन घ्यावी व स्प्रे बॉटलनं पाणी द्यावं. ट्रे वा खोकं सावलीत पण सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेऊन द्यावं. माती कोरडी वाटली तरच पाणी द्यावं. साधारण आठवड्याभरात कोंब रुजुन येतील.

कोबी व फ्लॉवरची मुळं फार खोलवर जात नाहीत. त्यामुळे एका रोपासाठी एक १५ ते २० लिटर्स क्षमतेची कुंडी पुरेशी होते. फक्त खोली १२ इंच तरी असायला हवी. या भाज्यांची मातीखालची वाढ जरी कमी असली तरी मातीच्या पृष्ठभागावरचा पसारा खूप असल्यामुळे एका कुंडीत एकच रोप लावावं. कुंडी मोठी असल्यास वा वाफ्यामधे लागवड करायची असल्यास दोन रोपांत १२ इंच आणि दोन ओळींत १८ इंच अंतर राखावं. कोबी व फ्लॉवरची खतांची भूक फार असते. त्यामुळे खतांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी नेहमी घेणं गरजेचं आहे.

साधारण ४ ते ६ आठवड्यांची रोपं झाली की ती कुंडीमधे ट्रान्सप्लांट करावी. कोबी व फ्लॉवरची रोपं फार नाजूक असतात. त्यामुळे सीडलिंग ट्रे असेल तर प्रश्न नाही, पण खोक्यामधे बिया पेरल्या असतील तर रोपं काढताना शक्यतो जमेल तेवढी आजुबाजुच्या मातीसह घ्यावी. कुंडीत अथवा जिथं रोपं लावणार आहात तिथे तेवढ्याच आकाराचा खड्डा हातानंच करुन त्यामधे मातीसह काढलेलं रोप ठेवावं व त्याभोवती माती हलकेच दाबून घ्यावी. लगेचच पाणी देऊन माती ओलसर करुन घ्यावी. कुंडी दुपारचं तीव्र उन्ह मिळणार नाही पण सूर्यप्रकाश मात्र भरपूर मिळेल अशा बेतानं ठेवावी.

रोपं सेट झाल्यावर सकाळ-संध्याकाळचं उन्ह मिळेल याची काळजी घ्यावी. वर सांगितल्याप्रमाणे या भाजीला खतं जास्त लागत असल्यामुळे साधारण महिना सव्वा महिनाभराने कंपोस्ट वा इतर उपलब्ध असेल ते सेंद्रीय खत द्यावं. पाणी देताना मधल्या शेंड्यावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो पाणी नेहमी खालच्या मातीमधेच थेट द्यावं. कोबी व फ्लॉवर मध्यभागी वाढत असताना, विशेषतः फ्लॉवरवर थेट उन्ह पडू नये याची काळजी घ्यावी. उन्ह पडल्यास रंग बदलू शकतो. म्हणून आजुबाजुची मोठी पानं एकत्र करुन ती गरज पडल्यास सुतळीनं हलकेच बांधून घ्यावी.

कोबी व फ्लॉवर कीडीला फार लवकर बळी पडतात. त्यामुळे नियमित निरीक्षण करणं अतिशय गरजेचं असतं. पानं खाल्ल्यासारखी अथवा पानांना भोकं पडलेली दिसली की लगेचच तपासणी करावी. अशी तपासणी नेहमी सकाळच्या वेळी लवकर करावी. मावा किडे व कोबीवरील अळ्या हमखास नजरेस पडतील. किडे व अळ्या हातानं उचलून दूर फेकून द्याव्या. नीम तेल अथवा नीम अर्क विकतचा किंवा घरी बनवलेला, जो असेल तो योग्य प्रमाणात फवारावा.

रोपं ट्रान्स्प्लांट केल्यापासून दोन ते अडीच महिन्यांत कोबी व फ्लॉवर काढणीला येतात. कोबी तयार झाल्याची खूण म्हणजे मध्यभागी तयार झालेला गड्डा दाबून पाहिल्यास कडक लागतो. तो जास्त कडक होण्याआधीच कापून घ्यावा. अन्यथा निबर होऊन कडवटपणा वाढतो. फ्लॉवर तयार झाल्याची खूण म्हणजे गड्ड्यातील गुच्छ एकमेकांपासून वेगळे होऊ लागतात. वाढीदरम्यान उन्ह पडलं तर रंगही बदलू लागतो. त्यामुळे पूर्ण वाढ होऊ लागताच वरचा गड्डा कापुन काढावा. कोबी व फ्लॉवर काढल्यावर खालची रोपं तुकडे करुन कंपोस्टमधे टाकावीत किंवा इतर कुंड्यांत बारीक तुकडे करुन टाकून वर माती टाकावी. कुंड्यांतलं पॉटिंग मिक्स काढून सावलीत दोन आठवडे पसरुन ठेवावं अन नंतर कोबी व फ्लॉवर व्यतिरिक्त इतर कुठल्याही रोपांसाठी वा भाज्यांसाठी वापरावं.

© राजन लोहगांवकर

गच्चीवरील_भाजीपाला - कोथिंबीर आणि पुदीना

गच्चीवरील_भाजीपाला

लेखांक १०

कोथिंबीर आणि पुदीना

कोथिंबीर :

कोथिंबीर ही बियांपासून होत असली तरी या बिया आपल्याला कुठल्याही नर्सरीतुन आणायची गरज नाही. आपल्या स्वैपाकघरातच त्या असतात. धणे. हे धणे पेरण्याच्या विविध पद्धती आहेत. कुणी ते चपलेनं अथवा लाटण्यानं रगडून दोन भाग करुन घेतं तर कुणी अख्खेच पेरतं. कुणी फोडलेले अथवा अख्खे धणे दहा बारा तास पाण्यात भिजवुन मग पेरतं तर कुणी तसं कोरडंच पेरतं. ज्याला ज्या पद्धतीत यश मिळालं तीच पद्धत त्याच्यासाठी योग्य पद्धत. म्हणजेच यासाठी एकच अशी पद्धत योग्य असं काही नाही. पण सर्वसाधारणपणे धणे हलकेच रगडून त्याचे दोन भाग करुनच ते पेरले जातात. फक्त रगडताना जास्त जोर लागून बियांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. 

कोथिंबीरीची मुळं मातीत फारशी खोल जात नाहीत. त्यामुळे सहा इंचांची कुंडी अथवा खोका जे काही असेल ते चालतं. ज्यात तुम्ही कोथिंबीर लावणार आहात त्याला अधिकचं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य ती सोय करुन घ्या. वरुन दोन अडीच इंच जागा सोडून कुंडी पॉटींग मिक्सनं भरुन घ्या. भरुन झाल्यावर थोडं पाणी वाहून जाईपर्यंत सगळं ओलं करुन घ्या. एक दिवस तसंच ठेवा. दुसऱ्या दिवशी काळजीपूर्वक दोन भाग केलेले धणे समतल केलेल्या पृष्ठभागावर व्यवस्थित पसरुन घ्या. ओळी करायच्या असतील तर ओळींमधे किंवा सर्व कुंडीभर, जसं हवं तसं धणे पसरुन घ्या. त्यावर अर्धा ते पाऊण इंचाचा पॉटींग मिक्सचा थर देऊन सर्व धणे झाकून घ्या. शक्यतो झारीनं पाणी देऊन धण्यांवरची माती हलुन ते उघडे पडणार नाहीत याची दक्षता घ्या. माती कायम ओलसर राहील याची काळजी घ्या. कोरडी वाटली तरच पाणी द्या. तेही झारीनंच. धणे रुजुन कोंब बाहेर येण्यास वेळ लागतो. कधी कधी पंधरा वीस दिवसही लागतात. तेव्हा धीरानं घ्या. या काळात माती फक्त ओलसर ठेवायची आहे. पाणी जास्त होणार नाही हे बघा.

पाऊस जास्त असलेल्या काळात धणे रुजुन यायला वेळ लागतो तसंच या काळात सूर्याचं दर्शनही होत नाही अन वाराही जास्त असल्यामुळे रोपं रुजुन आलीच तर आडवी पडतात. त्यामुळे पावसाळ्यात प्रयत्न करायला हरकत नाही. पण अपयश आलंच तर हिरमोड होऊ देऊ नये अन हवामान बदलताच किंवा पाऊस कमी होताच पुन्हा प्रयत्न करा.

कोंब रुजुन आले की नियमित पाणी द्या. पॉटींग मिक्समधे जेवढं खत घातलं आहे तेवढं खत पुरेसं होतं. पण वाटलंच तर कंपोस्ट टी, जीवामृत वगैरे जे काही शक्य आहे ते शक्यतो द्रवस्वरुपात द्या. शेण अथवा शेणाची स्लरी नको. कोंब रुजुन वर आल्यावर तीन-चार आठवड्यांत कुंडी चांगली भरुन येईल. रोज हवी तेवढी कोथिंबीर खुडून घ्या. नवीन फुटवे येत रहातील. असं तीन चार वेळा झाल्यानंतर फुलं येऊ लागतील. फुलं येत आहेत म्हणजे रोपांचं नियत कार्य पूर्ण होण्याची वेळ आली असं समजायला हरकत नाही. नंतर हवं असल्यास रोपांना आपला जीवनकाळ पूर्ण करु द्यावा. फुलांपासूनच फळं म्हणजेच धणे तयार होतील. पूर्ण तयार झालेले धणे थोडे पुढील लागवडीसाठी ठेऊन बाकीचे स्वयंपाकघरात रोजच्या वापरासाठी ठेवु शकता. नंतर सगळी रोपं काढून कंपोस्टमधे टाका. माती व्यवस्थित मोकळी करुन घ्या. दोन तीन दिवस तशीच उघडी ठेऊन मगच वापरायला घ्या. फक्त पुन्हा याच मातीत कोथिंबीर लावणं टाळा. कोथिंबिरीवर फारशी कीड पडत नाही. त्यामुळं कीटकनाशकांची फवारणी वगैरे काही करावं लागत नाही.

-------------------------------

पुदीना

पुदीन्यासारखं सोपं पीक नाही. कुंडीमधे हे पीक घेणं अतिशय सोपं. मी तर म्हणेन की हे काम घरातल्या बच्चे कंपनीला द्यावं. त्यांच्यामधे बागकामाची आवडही निर्माण होईल अन यामधे सक्सेस रेट ९९ टक्क्यांच्याही वर असल्यानं अन रिझल्ट्सही आठ दहा दिवसांतच दिसु लागल्यानं त्यांनाही बागकामामधे इंटरेस्ट निर्माण होईल.

पुदीन्याच्या बिया नर्सरीमधे मिळत असल्या तरी त्या घेण्याची काहीच गरज नाही. बाजारातुन जेव्हा आपण पुदीन्याची जुडी आणतो त्यातीलच बॉलपेनमधल्या रिफीलच्या अथवा उदबत्तीच्या जाडीएवढ्या ब्राऊन कलरच्या काड्या वेगळ्या काढून ठेवायच्या. त्यावरील मोठी पानं काढून घ्यायची. अशा काड्यांवर सहसा खालच्या बाजूची पानं निबर झालेली असतात. क्वचित प्रसंगी कीड पडल्यामुळं पानांवर छिद्रंही असतात. अशी पानं काढून टाकायची. शेंड्याकडची छोटी पानं काड्यांवर तशीच ठेवायची.

आता दोन पर्याय आपल्यापुढे असतील. एक तर या काड्या ग्लासमधे पाणी घेऊन त्यामधे ठेऊन थेट उन्ह मिळणार नाही पण सुर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवायचा. दिवसाआड पाणी बदलायचं. काड्यांना शक्यतो डिस्टर्ब न करता. म्हणजे काड्यांची मोळी हातात धरुन ग्लास आडवा करुन पाणी ओतुन द्यायचं आणि हलक्या हातानं ग्लासमधे पुन्हा पाणी घालायचं. पाच सहा दिवसांत काड्यांच्या टोकांना इवलीशी पानं दिसू लागतील अन ग्लासामधल्या टोकांवर छोटी पांढरी मुळं दिसु लागतील. दुसरा पर्याय म्हणजे निवडून बाजूला केलेल्या काड्या थेट मातीत खोचायच्या. उरलेलं काम काड्या अन माती एकमेकांच्या सहाय्यानं करतील.

पुदीन्याच्या रोपांची मुळं फार खोल जात नाहीत. त्यामुळं साधारण सहा इंच खोल कुंडी पुष्कळ होते. पुदीना एखाद्या वीडसारखा म्हणजे पावसाळ्यांत अंगणात उगवणाऱ्या गवतासारखा आडवा पसरत असल्यामुळे कुंडीचा व्यास मोठा असलेला कधीही चांगला. म्हणून कुंडीऐवजी पसरट टब वगैरे घेणं श्रेयस्कर ठरतं.

कुंडी नेहमीप्रमाणं पॉटींग मिक्सनं भरुन घ्यायची. व्यवस्थित ओली करुन घ्यायची. त्यामधे मुळं फुटलेल्या काड्या किंवा दुसरा पर्याय निवडणार असाल तर काड्या बोटानं खड्डा करुन त्यात खोचायच्या. अधिक अन लवकर फुटण्यासाठी मातीच्या लेव्हलला पंचेचाळीस अंशाच्या कोनात तिरक्या खोचल्या तर उत्तम. अशा वेळी काडीचा अर्धा भाग मातीत जाऊ द्यावा. जास्त मुळं फुटुन जास्त फुटवे फुटतील अन पर्यायानं पुदीना जास्त प्रमाणात मिळेल.

माती कोरडी वाटली की स्प्रेनं पाणी देत रहावं. साधारण महिना ते सव्वा महिन्यात कुंडी भरुन जाईल. आपल्या गरजेप्रमाणे पुदीन्याची पानं खुडुन घ्यायची. चालत असल्यास वरचे शेंडेही कापून घ्यावे. तसं केल्यास नवनवीन फुटवे येत रहातील.

एक विशेष टीप. पावसाळ्यात खास काळजी घ्यायची. माझे दोन टब जे आताच्या पावसाळ्यापुर्वी हिरव्या कंच पुदीन्यानं भरले होते ते केवळ आळसामुळे दुर्लक्ष झाल्यामुळे शंखांच्या पोटात गेले अन मी त्यांच्या नावानं शंख करत राहिलो. थोडक्यात पावसाळा असो की नसो नेहमीप्रमाणेच प्रत्येक कुंडीची अन प्रत्येक रोपाची नियमितपणे तपासणी करावी.

© राजन लोहगांवकर 

गच्चीवरील_भाजीपाला - वांगी

गच्चीवरील_भाजीपाला

लेखांक ०९

वांगी 

वांग्यांचा आपल्या आहारात नियमित वापर असतो. वांगी जशी विविध आकारात येत असतात तसाच त्यांचा स्वैपाकातील वापरही वेगवेगळा आहे. भाजी, भरीत, काप, भजी वगैरे वगैरे भरपूर प्रकारे वांगी आपल्या पोटात जात असतात. वांगी आपल्या गच्ची-बाल्कनीवरच्या व परसबागेत आपण वर्षभर घेऊ शकतो.

बागेत वांगी घेण्याआधी आपल्याला त्यांची रोपं करुन घेण्याची गरज असते. वांग्यांच्या बिया नर्सरीमधुन आणाव्यात. भरताची काळी-जांभळी व हिरवी वांगी, छोटी हिरवी व काळी-जांभळी वांगी, पांढरी वांगी वगैरे प्रकारानुसार वेगवेगळ्या बिया नर्सरीमधे उपलब्ध असतात. आपल्याला हव्या त्या प्रकारच्या बिया आणाव्यात. रोपं तयार करण्यासाठी ट्रे असेल तर किंवा कागदी ग्लास अथवा छोटे खोके किंवा स्ट्रॉबेरी, द्राक्षं, चेरीज किंवा अंजिरासोबत जे प्लास्टीकचे वा पुठ्ठ्याचे बॉक्सेस मिळतात ते घ्यावे. खाली पाणी वाहून जाण्यासाठी छिद्रं करुन घ्यावीत. रेडीमेड ट्रेजना तशी व्यवस्था असतेच. यात पॉटींग मिक्स निम्म्याच्या वर भरुन घेऊन ओलं करुन घ्यावं. समतल करुन घेऊन त्यावर ओळींमधे वांग्याच्या बिया पसरवुन घ्याव्यात. शक्यतो वेगवेगळ्या प्रकारच्या वांग्यांसाठी वेगळे ट्रेज अथवा बॉक्सेस वापरावेत. एकच वापरायचा असल्यास वेगळ्या रांगेत बिया लावुन आईसक्रीमचा लाकडी चमचा अथवा तत्सम काही खोचून त्यावर लिहून ठेवावं किंवा सगळ्यात सोपं म्हणजे मोबाईलवर फोटो काढून ठेवावा. त्यामधे तारीख वार अन वेळही आपोआप नोंदली जात असल्यामुळं गोंधळ होत नाही.

बियांवर अर्धा-पाऊण इंच पॉटींग मिक्स पसरुन झारीनं पाणी स्प्रे करावं. मुंग्या लागणार नाहीत अशा ठिकाणी सावलीत पण सुर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेऊन बॉक्स ठेवावा. पाच ते सात दिवसांत बिया रुजुन येतील. स्प्रेनं नियमित पाणी द्यावं. पाण्याचा जोर जास्त राहिला तर रोपं आडवी होतील तेव्हा हलकेच पाणी द्यावं. साधारणपणे तीन-चार आठवड्यात रोपं छान मोठी होतील. रोपं सहा ते आठ इंच झाली, त्यावर प्रत्येकी चार-सहा पानं आली की आपण ती ट्रान्स्प्लांट करु शकतो.

वांग्याच्या एका रोपासाठी १५ ते २० लिटर्स क्षमतेची कुंडी पुरेशी होते. कुंडीची खोली एक ते सव्वा फूट असणं गरजेचं आहे. कुंडीला तळाशी व सर्व बाजुंनी आवश्यक तेवढी छिद्रं करुन ती नेहमीप्रमाणं भरुन घ्यावी. आतलं पॉटिंग मिक्स ओलं करुन घेऊन मधोमध हातानं अथवा जे काही तुम्ही रोपं लावण्यासाठी वापरत असाल त्यानं खड्डा करुन रोप लावून त्याभोवती हलक्या हातानं माती दाबून घ्यावी. थोडं पाणीही द्यावं. वांग्याच्याही रोपाला वांगी लागल्यावर आधाराची गरज असते. म्हणून रोपं लहान असतानाच कुंडीत काठी रोवून ठेवावी. कुंडी मोठी असेल तर दोन रोपांमधे एक ते दीड फूट अंतर ठेवावं. जमिनीवर रोपं लावणार असाल तर दोन रोपांत दीड फूट आणि दोन ओळींत दोन फूट अंतर ठेवावं. आधार देण्यासाठी प्रत्येकी एक काठी रोवावी किंवा वाफ्याच्या दोन बाजूंना दोन मोठ्या काठ्या रोवून त्या आपसांत तारेनं अथवा जाड दोरीनं बांधून घेऊन रोपाच्या वर येईल अशा तऱ्हेने सुतळ वा काथ्या लोंबता सोडून रोपं सेट झाल्यावर रोपाभोवती हलकेच गुंडाळून घ्यावा. खोडाला घट्ट बांधू नये.

रोपं सेट झाल्यावर वाढू लागतील. मातीच्या लेव्हलवर जेवढी पानं असतील ती कटरनं कट करुन तिथेच खाली मल्चिंगसारखी वापरावी. तसंच टोमॅटोप्रमाणेच याही रोपांच्या खोड अन पानांच्या डहाळीदरम्यान छोटी पानं दिसतील. तीही काढून टाकावीत. मातीच्या लेव्हलपर्यंत उन्ह व्यवस्थित पोहोचेल अशा पद्धतीनं खालच्या भागातली पानं काढावीत. शेंडा खुडल्यास रोपाची आडवी वाढ होऊन जास्त फांद्या फुटतील व अधिक वांगी मिळतील.

वांग्याच्या रोपांना पाण्याची कमतरता भासू देऊ नये. नियमित पाणी दिल्यानं झाडं निरोगी रहातील. मल्चिंगचा वापर अवश्य करावा. यामुळं हवा तेवढा ओलावा मातीमधे राहील. दर पंधरा दिवसांनी द्रवरुप खताची फवारणी व दोन तीन आठवड्यांनी कंपोस्ट घालत रहावं. कंपोस्ट देताना मल्चिंगच्या आवरणाखाली देऊन पुन्हा मल्चिंग करावं. वांगी आणि टोमॅटो या पीकांवर मावा व पीठ्या ढेकूण यांचा त्रास होतच असतो. यासाठी झाडांचं नियमित निरीक्षण करत रहावं. अशी कीड दिसताच ती त्वरित काढून टाकावी. पाण्याचा फवारा मारल्यास कीड निघून जाते. नीमार्क किंवा गोमूत्र वा अन्य काही सेंद्रीय कीटकनाशक असेल तर ते फवारावे. म्हणजे कीड फार पसरणार नाही. फळमाशीचाही त्रास या पिकात फार असतो. त्यासाठी घरीच सापळे तयार करुन बागेत ठेवले तर त्यावरही चांगलं नियंत्रण होतं.

साधारण सव्वा ते दीड महिन्यात फुलं येऊ लागतात. याही पिकामधे परागीभवन आपोआप होते. एकाच फुलात दोन्ही केंसर असल्यानं वाऱ्याचा हलका झोतही हे काम करण्यास पुरेसा होतो. फुलं गळत असतील तर हलकीशी टिचकी मारली तरी परागीभवन होऊन फळ धरतं. फळ धरल्यापासून १५ ते २० दिवसांत वांगी काढण्यासाठी तयार होतात. दाबून बघितल्यावर जी काहीशी कडक लागतील ती तयार आहेत असं समजावं. साध्या हातानं वांगी तोडू अथवा ओढू नयेत. नेहमी कात्री किंवा धारदार चाकूनंच काढावी. झाडाला इजा होईल असं काही करु नये.

एकदा वांगी येऊ लागली की पुढील ६ ते ७ महिने वांगी मिळत रहातील. नंतर वांग्यांचा आकार अन संख्या रोडावेल. अशा वेळी त्याची छाटणी करावी. शेंडा छाटावा. ३-४ चांगल्या फांद्या आणि ८-१० निरोगी पानं ठेऊन उर्वरित भाग छाटून टाकावा. तीव्र उन्हाळ्यात हे करु नये. शक्यतो पावसाळ्यात करावं. साधारण महिन्याभरात पुन्हा नवीन पालवी फुटेल अन पुन्हा पहिल्यासारखी वांगी मिळू लागतील. खतपाणी देण्याचं वेळापत्रक मात्र अगदी शिस्तपूर्वक पाळावं.

चार माणसांच्या कुटुंबाकरिता १५ ते २० रोपं लावावीत. छाटणीनंतरचा दुसरा बहर जर समाधानकारक नसेल तर रोपांच्या दुसऱ्या बॅचची तयारी सुरु करावी. फक्त पुन्हा त्याच मातीत नवीन रोपं लावणं टाळावं.

© राजन लोहगांवकर

गच्चीवरील_भाजीपाला - आंतरपिकं वा मिश्र पिकं

गच्चीवरील_भाजीपाला

लेखांक ०८

आंतरपिकं वा मिश्र पिकं

जमीनीवरील शेतीमधील आंतरपीक किंवा मिश्र पीक या पद्धतींचे अर्थ आपल्या गच्चीवरच्या अथवा बाल्कनीमधल्या बागेच्या तुलनेत वेगळे असतात. जेव्हा व्यापारी तत्वावर शेती केली जाते तेव्हा अशा पद्धतीनं पिकं घेण्याची अनेक कारणं असतात. त्यातील बह्वंशी कारणं ही आर्थिक बाबींशी संबंधित असतात. म्हणजे मुख्य पिकाचा कालावधी जर जास्त असेल तर तेवढ्या कालावधीत कमी कालावधीत तयार होणारी पिकं घेणं, उदा. लवकर तयार होणाऱ्या भाज्या अथवा झेंडू सारखी फुलं. यामधे मुख्य पिकाला दिलेल्या खतपाण्यामधेच अशी पिकं जोपासली जातात व ती मुख्य पिकाला हानीही पोहोचवत नाहीत. दुसरा प्रकार म्हणजे मुख्य पिकावर येणाऱ्या कीडीला अटकाव करणं. त्यावर येणाऱ्या किडीला आपल्याकडे आकर्षित करुन घेणं अथवा तिचा परस्पर नायनाट करणं. या प्रकारात कीटकनाशकं फवारणीचा खर्च वाचतोच पण आंतरपिकांद्वारे अर्थार्जनही होतं.

हे झाले व्यापक प्रमाणावर शेती करत असतानाच्या अनेक फायद्यांमधले काही फायदे. आपली शेती कुंड्यांमधली अन काहीशे स्क्वेअरफुटांमधली. त्यामुळे जमिनीवरील शेतीमधे असणाऱ्या आंतरपीक पद्धतीवरच्या फायद्यांची नुसती तोंडओळख आपल्यासाठी पुरेशी आहे. पण आपल्यासाठी ही पद्धत जसे हे दोन फायदेही करुन देते तसंच ती कमी जागेत आपल्याला जास्त पिकं घेण्यास मदत करते.

साधारणपणे जेव्हा एकाच जागेत किंवा एकमेकांजवळ दोन पिकं एकाच वेळी घेतली जातात तेव्हा ती एकमेकांना त्रासदायक न ठरता सहाय्य करणारी, कॉम्प्लिमेंट करणारी असावी लागतात. तसंच कुंडीमधे उपलब्ध होणाऱ्या खताचा वापर करताना एकमेकांशी स्पर्धा न करता प्राप्त झालेलं खत आपसांत वाटून घेऊन वाढणारी असावी लागतात. तसंच दोन पिकं एकाच दिशेनं वाढणारी असून चालत नाही. म्हणजे उदा, कुंडी छोटी असेल अन पिकंही एकमेकांना पूरक असली तरी मुळा आणि गाजर किंवा बटाटा एकत्र घेऊन फायदा नाही. तसंच वांगी अन टोमॅटोही एकत्र घेऊन फायदा नाही. यासाठी आपल्याला आधी मित्र पिकं कुठची अन शत्रू पिकं कुठची हे पहायला हवं झालंच तर पिकांच्या वाढीची दिशाही विचारात घ्यायला हवी.

झाडांमधे काही प्रकार असे आहेत की जे कुठल्याही भाज्यांसोबत घेतले तरी चालतात. ते नुसतेच फुलं अथवा फळं देत नाहीत तर बागेतील किडींवरही नियंत्रण ठेवतात अन मातीही सुपीक करतात. अशी पिकं म्हणजे झेंडू आणि चवळी. झेंडू किडींना आपल्याकडे आकर्षित करुन घेतो. तसंच आपल्या मुळांद्वारे सूत्रकृमींवरही ( Nematodes ) नियंत्रण ठेवतो (यावर आपल्या ग्रुपचे अभ्यासू व बुरशी या विषयावरील तज्ञ श्री कौस्तुभ यद्रे यांनी विस्तृत लेख दिला होता तो समूहावरील फाईल्स सेक्शनमधे ठेवला आहे. त्याची लिंक इथं देत आहे. सर्वांनी तो जरूर वाचावा. बाग कितीही छोटी असली तरीही. https://www.facebook.com/groups/pltambe/permalink/2436388553268462/ ) तसंच चवळी शेंगा अथवा चवळीचे दाणे देण्यासोबतच मातीमधे नत्राची पातळी वाढवुन नत्रप्रिय झाडांना वाढीसाठी मदतच करत असते.

शेतीच्या या दोन पद्धतींच्या बरोबरीनंच अजुन एक प्रकार लोकप्रिय आहे, त्यातही खास करुन गच्ची-बाल्कनीतील बाग असणाऱ्यांमधे अन तो म्हणजे बहुस्तरीय शेती अर्थात मल्टीलेअर फार्मिंग. या प्रकारेही झाडं लावणं चांगलंच आहे. फक्त या प्रकारातही वरील दोन मुद्दे लक्षात घ्याय़ला हवेत. कारण नुसत्याच फिजिकल गरजा अन झाडांच्या उंची ध्यानात घेऊन फायदा नाही तर माती, खत व पाणी यांची मात्रा, एकमेकांना वाढण्यासाठीची जागा, एकमेकांना ते सहाय्य करतात की स्पर्धा करतात तेही बघणं गरजेचं आहे. कुठं काय लावावं, कुठली पिकं एकत्र लावावी, त्यासाठी प्रत्येकाची आवड, जागेची उपलब्धता हे विचारात घेणं गरजेचं आहेच. फक्त अशी एकत्र लावण्यात येणारी पिकं ही मित्र पिकं असायला हवीत.

खाली मित्रपिकं अन शक्य तिथं शत्रू पिकं यांची यादी दिली आहे.

टोमॅटो सोबत झेंडू, लसूण, कांदा, तुळस, कोथिंबीर, गाजर पण बटाटा, बीट, बडीशेप आणि मक्यापासून दूर

वांगी सोबत भेंडी, सर्व प्रकारचे बीन्स, भोपळी मिरची, बटाटा आणि पालक

भेंडी सोबत वांगी, कलिंगड, काकडी, रताळी, भोपळी मिरची

मिरची सोबत तुळस, गाजर, कांदा, लेट्युस, पालक, भेंडी, मुळा, बीट, मका, टोमॅटो, लसूण, काकडी, वांगी

बटाट्यासोबत झेंडू, वाटाणा, सर्व प्रकारचे बीन्स, मका, कोबी, वांगी, गाजर, कांदा पण काकडी, भोपळा, टोमॅटो आणि सूर्यफुलापासून दूर लावावा.

कारली सोबत सर्व प्रकारचे बीन्स, वाटाणा, लाल भोपळा इ. लावु शकता. फक्त बटाटे व पुदीना वगैरे पासून दूर.

गवारीसोबत कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, गाजर, वाटाणा 

भोपळी मिरचीसोबत झेंडू, कांदा, लसूण, तुळस, गाजर, वांगी आणि काकडी पण कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, मोहरी व बडीशेपपासून दूर

गाजरांसोबत झेंडू, लेट्युस, सर्व प्रकारचे बीन्स, भोपळी मिरची. तसंच एक ओळ गाजर तर एक ओळ मुळा किंवा कांदा लावला तरीही चालतं.

काकडीसोबत झेंडू, सर्व प्रकारचे बीन्स, वाटाणा, गाजर, मुळा, लेट्यूस आणि कांदा पण बटाटे आणि सुर्यफुल पासून दूर

पालक अन्य झाडांच्या सावलीत चांगला बहरत असल्यानं सर्व प्रकारचे बीन्स, मका आणि मुळ्यासोबतीनं लावल्यास उत्तम.

गुलाबासोबत लसूण लावल्यानं गुलाबावरच्या किडीचंही नियंत्रण होतं.

कोबीसोबत पुदीना आणि पालक

कोबी व फ्लॉवरसोबत झिनिया लावला तर त्यावर लेडीबग्ज आकर्षित होतात अन कोबी-फ्लॉवरवरील कीड खातात. झालंच तर कांदा, बटाटा व झेंडूही सोबत लावले तर उत्तम. टोमॅटो अन स्ट्रॉबेरीपासून दूर लावावेत.

कांदा कुठल्याही झाडांसोबत लावता येतो. आपल्या उग्र वासामुळं तो किडींना दूर ठेवतो. पण शक्यतो सर्व प्रकारचे बीन्स आणि वाटाण्यासोबत लावणं टाळावं

स्ट्रॉबेरी सोबत लेट्युस, पालक, सर्व प्रकारचे बीन्स आणि कांदा लावावा पण कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोलीपासून दूर लावावा

कलिंगड व टरबूजासोबत मका आणि मुळा लावु शकता पण बटाट्यापासून दूर

बीटसोबत लेट्युस, कांदा व कोबीवर्गीय भाज्या लावता येतील पण घेवड्यापासून दूर

घेवड्यासोबत मका, मुळा, स्ट्रॉबेरी, काकडी

कुकुर्बिट फॅमिली, म्हणजे काकडी, दुधी, पडवळ, लाल भोपळा, कोहळा, कलिंगड इ. सोबत मका, सर्व प्रकारचे बीन्स, बीट, मुळा, पण बटाट्यांपासून दूर.

लेट्युस सोबत काहीही लावू शकता. किंबहुना कुणाही सोबत लेट्यूस लावा. कुंडीतील मातीमधे सहज लावता येतं.

मेथी सोबत ज्या भाज्यांना अधिक नत्र लागतं अशा भाज्या उदा., कोबी, फ्लॉवर, मका, ब्रोकोली लावाव्यात.

कोथिंबीर सोबत कोबी, फ्लॉवर, पालक, सर्व प्रकारचे बीन्स, लेट्युस, वाटाणा लावु शकता.

रताळी सोबत भेंडी, बीट, घेवडा. शक्यतो लाल भोपळा रताळ्यासोबत लावू नये. याचं प्रमुख कारण असं की दोन्ही वेल जमिनीवर खूप पसरतात आणि एकमेकांना वाढीसाठी अडथळा निर्माण करतात. म्हणून शक्यतो हे दोन्ही एकत्र लावणं टाळावं.

आल्यासोबत जास्वंद, गवतीचहा, मिरची, ऑर्किड, 

हळदीसोबत मिरची, गवतीचहा, कोथिंबीर. तसं पहाता कुठल्याही मोठ्या फळझाडाखाली हळद लावल्यास ती उत्तम वाढते. कारण हळदीला झाडांच्या पानांतुन येणारं उन्ह असलं तर ती छान वाढते.

बहुतांशी भाज्या ज्या आपण आपल्या गच्ची व बाल्कनीमधल्या छोटेखानी बागेत घेऊ शकतो त्यांचा विचार वर दिलेल्या यादीमधे केला आहे. आशा आहे की उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करत जमतील तितक्या भाज्या घरच्याघरी घेणं अन तेही सेंद्रीय खतावरच, आपणांस शक्य होईल.

तळटीप : आवश्यक तिथं आणि आधारासाठी आंतरजालावरील विविध साईट्सचा वापर केला आहे.

© राजन लोहगांवकर

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...