बिया - देशी, हायब्रिड आणि जीएमओ

बिया - देशी, हायब्रिड आणि जीएमओ

आपण मोठ्या हौसेनं बाग करायला घेतो. कुठून कुठून रोपं, फांद्या आणुन लावतो. कुणी फुलझाडांच्या बिया देतं. त्याही आपण बागेत लावतो अन बाग जराशी वाढली, वाऱ्यावर डोलू लागली की आपला उत्साह अन आत्मविश्वास दोन्ही वाढतं. बऱ्यापैकी अनुभवही गाठीशी जमा झालेला असतो. मग इकडचं तिकडचं वाचून, फोटो पाहून आपल्यालाही वाटू लागतं की आपणही बागेत भाज्या लावूया. किमान एक पट्टा तरी फक्त भाज्यांसाठी ठेवूया. मग त्यादृष्टीनं आपण तयारी करायला लागतो. जागा वा कुंड्या ठरवतो. माती तयार करुन ठेवतो वगैरे वगैरे सगळं करतो.

मग मुख्य प्रश्न येतो अन तो म्हणजे बिया. यासाठी आपण नर्सरी तरी शोधतो किंवा ऑनलाईन कुठं मिळतात ते पहायला सुरुवात करतो. नर्सरीत गेल्यावर आपण ज्या बिया मागू त्या ते छोट्या पाकीटातुन लगोलग आपल्या समोर ठेवतात. पण ऑनलाईन शोधाल तर त्यात आपल्याला विविध प्रकार दिसतात. कुठं हायब्रिड असं लिहिलेलं असतं तर कुठं ओपी म्हणजेच ओपन पोलिनेटेड असं कंसात लिहिलेलं असतं. तर अजुन एक प्रकार असतो अन तो म्हणजे हेअरलूम. किंमती पाहिल्यात तर हायब्रिडपेक्षा ओपीची किंमत थोड्याफार फरकानं सारखीच असते. पण यांच्या किंमतीत अन हेअरलूम बियांच्या किंमतीत मात्र फारच मोठा फरक असतो. अर्थात त्यामागची गणितं अन मार्केटींग गिमिक्स याबाबतीत आपण पूर्णतया अनभिज्ञ असतो.

मग आपल्याला प्रश्न पडतो की हे असं का? काय फरक आहे तिन्ही प्रकारांत की किंमतीत एवढी तफावत असावी? तरी आपल्याला हे ठाऊक नसतं की हे ओपी अन हेअरलूम सर्वसाधारणपणं एकच आहे. पण अजुन एक प्रकार बियांमधे आहे अन तो म्हणजे जीएमओ. म्हणजेच जेनेटिकली मोडिफाईड ऑर्गॅनिझम्स. या बिया साधारणपणं व्यापारी तत्वावर अन मोठ्या प्रमाणावर शेती करणाऱ्यांसाठी उपलब्ध असतात. रिटेलमधे अजुन तरी अशा बिया उपलब्ध नाहीत.

काय आहे ही भानगड, काय फरक आहे या हायब्रिड, हेअरलूम अन जीएमओ बियांमधे? हेच आपण जाणून घेऊया. अन मग ठरवूया की आपल्या बागेसाठी अन पर्यायानं आपल्या रोजच्या आहारासाठी आपण कुठल्या प्रकारच्या म्हणजे आपल्या बोली भाषेत कुठल्या वाणाच्या बिया निवडाव्या.

देशी वाणाच्या बिया : हेअरलूम बिया म्हणजे ज्या पूर्वापार, अगदी एखाद्या वारसासारख्या चालत आल्या आहेत त्या. त्यांना आपण देशी वाणाच्या बियाही म्हणतो. तर अशा बिया या मुख्यत्वे तयार झालेल्या असतात त्या नैसर्गिक रित्या पिकं घेऊन अन फुलांचं निसर्गतःच परागीभवन होऊन. म्हणजेच ओपन पोलिनेशन होऊन. अर्थातच सर्वात पहिलं झाड जेव्हा लावलं गेलं असेल त्यात असलेले सारेच गुण आता जी कुठली अन कितवी पिढी सुरु असेल तिच्यामधेही तेच गुण असणार. जसे आपले डीएनए आहेत तसेच ते अशा झाडांचेही असतात. त्यामुळं चव, रंग, आकार या बाह्य गोष्टींमधेच नव्हे तर त्यांतील गुणधर्म, रोपांची रोगांना तोंड देण्याची क्षमता वगैरेंही सगळं सारखंच असणार. थोड्याफार फरकानं सगळंच सारखं. त्यामुळं कोणत्या वेळी झाड कसं वागेल, कुठल्या सीझनला किती फळं येतील हे आपण खात्रीशीर सांगू शकतो. म्हणजे पूर्वापार जे भाज्यांचे हंगाम, ठराविक भाज्यांसाठी वा पिकांसाठी ठराविक भूभाग, ठराविक माती अन ठराविक हवामान हे जे सगळं निश्चित केलं होतं ते जर व्यवस्थित पाळलं तर एक झाड जेवढी फळं, उदा. टोमॅटो दहा वर्षांपूर्वी देत होतं त्याच झाडाच्या बियांची आताची पिढीही कमी अधिक प्रमाणात तेवढेच टोमॅटो देईल, तेही त्याच चवीचे, रंगाचे अन आकाराचे. म्हणजे थोडक्यात तेव्हा बिया जर विकत आणलेल्या असतील, तेही त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणं तर त्या आजही खात्रीशीररित्या उगवणार अन फळणार याची खात्री. म्हणजेच आजच्या व्यवहार्य भाषेत सांगायचं झाल्यास वन टाईम पर्चेस.

हायब्रीड बिया : यापेक्षा वेगळ्या असतात त्या हायब्रीड बिया. या व्यापारी दृष्टीकोन समोर ठेवुन तयार केल्या जात असतात. होय, तयार केल्या जातात. निसर्गाचीच मदत घेऊन पण काहीसं अनैसर्गिकपणं. हेअरलूम अथवा देशी वा स्थानिक बियाणांमधेही पुष्कळ प्रकार असतात. म्हणजे उदा. टोमॅटो. त्यामधेही विविध प्रकार असतात. एखादा लाल रंगाचा तर एखादा रसाळ. कुठला जास्त गोड असेल तर कुठल्याची कांती तुकतुकीत असेल. एखादा गोल तर एखादा लंबगोलाकार असेल. एखादा आकारानं मोठा तर एखादा अगदीच छोटा असेल. यापैकी पर्म्युटेशन-कॉम्बिनेशन करत कुठल्याही दोन प्रकारच्या रोपांवर प्रयोग करत, कृत्रिमरीत्या परागीभवन करत एखादं नवीन वाण जन्माला घातलं जातं. कुटुंब एकच असल्यानं असा संकरही फलदायी होतो. फक्त यश येण्यासाठी अन त्याची खात्री पटण्यासाठी असंख्य प्रयोग अन त्याला हवा तेवढा वेळ मात्र द्यावा लागतो. त्यासाठी जमिनीचा काही भाग केवळ याच प्रयोगासाठी द्यावा लागतो. म्हणजे त्या जमिनीतून इतर व्यापारी पिकं घेता येत नाहीतच. पण या नवीन वाणाची वाढ, त्यावर वाढीदरम्यान होणारे परिणाम, रोग, कीड या सगळ्याची नोंद ठेवणं वगैरे सगळंच आलं. म्हणजेच हे खर्चाचं काम. व्यापारी तत्वांवर बिया विकणाऱ्या कंपन्याच हे करु शकतात. नेहमीच्या काही एकरांमधे वा हेक्टरांमधे शेती करुन त्यावरच गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांचं हे कामच नव्हे.

अशा कंपन्यांसाठीही हे सोपं काम नसतं. म्हणजे नवीन टोमॅटोपासून बिया कमवायच्या अन त्या लावून नवीन वाणाचा टोमॅटो घ्यायचा असं सोपं गणित नसतं हे. अनेक प्रकारच्या चाचण्या, नवीन वाण पारंपारिक रोगांना तोंड देत आहे की नाही, नवीन काही रोग तर पडत नाहीत ना वगैरे सगळं पहायचं असतं. अन हे सगळं इन्स्टंट नसतं. कृत्रिम असलं तरी प्रत्येक गोष्टीला निसर्गतः जो कालावधी लागतो, ज्याला जस्टेशन पिरियड म्हणतात तो तर द्यावाच लागतो. प्रयोगांदरम्यान एखाद्या पिकाचा कालावधी फार फार तर आठ दहा दिवसांनी कमी जास्त करता येतो, नाही असं नाही. पण तो अगदीच निम्मा नाही करता येत.

यश दृष्टीच्या टप्प्यात आल्यानंतर आपल्याच शेतात ते पीक मोठ्या प्रमाणावर घ्याय़चं. फार काही त्रास होत नसेल व अपयशही नसेल तर मग मोठ्या प्रमाणात बिया पकडून (हे बिया पकडणं म्हणजे एक कला आहे. यावर पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिन.) त्या ठराविक काळात बाजारात आणणं, त्यासाठीचं मार्केटिंग करणं हेही बरंच वेळखाऊ अन खर्चिक काम असतं. अन वाटतं तसं साधं सरळही नसतं. कारण अशा बिया तुम्ही घेतल्या अन त्याही देशी वाणांसारख्या पिढ्याऩपिढ्या चालवल्या तर मग पुढच्या सिझनला कंपन्या काय विकणार? आज ना उद्या सॅच्युरेशन येणार अन हळूहळू कंपनीला देशी वाणाचं कुलूप लागणार? कसं परवडायचं ते?

म्हणून मग चाचण्यांच्या दरम्यान अनेक प्रयोग केले जातात त्याच दरम्यान कुठंतरी येणाऱ्या बियांपासून नवीन रोपं होणार नाहीत अन झालीच तर त्याला मातृवृक्षासारखी फळं लागणार नाहीत याची दक्षता घेतली जाते. अन म्हणूनच हायब्रिड फळांची पुढची पिढी तशीच्या तशी तयार होताना आपल्याला दिसत नाही. कधी बिया रुजतच नाहीत, रुजल्याच तर त्या फळतच नाहीत. फळल्याच काही तर फळं कशी निघतील हे त्यांचा आधुनिक ब्रह्मदेव म्हणजे ती विक्रेती कंपनीही सांगू शकणार नाही. 

म्हणून मग नवा सिझन, नवी खरेदी. त्याशिवाय दुकान कसं चालणार? बरं, या संकरित वाणाचा पाया भक्कम नसल्यामुळं त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. किंवा ठराविक रोगांनाच ते सक्षमपणं तोंड देऊ शकतात. एक छोटं अन दैनंदिन व्यवहारातलं उदाहरण घेऊया. काही वर्षांपूर्वी घरातले डास साध्या कसल्याशा धुरीनंही निघून जात असत. काहीच दिवसांत अशा सामान्य धुरीला ते सरावले. मग त्या धुरीत आली मिरची वा कडुलिंबाची पानं, मग त्याचाही सराव झाल्यावर आल्या विविध कंपन्या. कुठं कासव छाप आली तर कुठं गुडनाईटच्या कागदी वड्या. त्याचाही परिणाम हळूहळू कमी होत गेला पण डास नाही. मग आले लिक्विड रिपेलंट्स. आता त्यालाही डास सरावले आहेत. पण हे सरावणं नाही तर त्यांची प्रतिकारशक्ती वाढत गेली आहे. पिढ्या दर पिढ्या हे बदल त्यांच्या जनुकांमधे होत गेले. 

हेच अशा बियांमधे होत जातं. कंपन्यांना बिया विकताना ठाऊक असतं कुठले रोग पडू शकतील ते. मग ते त्या अनुषंगानं कीटकनाशकंही विकतात. कधी स्वतःच्याच नावानं तर कधी कुणाशी करार करुन. मग त्यांच्याकडं तयार होणाऱ्या बियाही त्या त्या कीटकनाशकांना तोंड देण्यास तयार होतात पण दुसरेच कुठलेतरी रोग शिरतात. मग त्यासाठी दुसरं औषध. ते स्ट्रॉन्ग असेल तर त्यावरचा उतारा म्हणून दुसरं औषध असा नेव्हर एंडिंग खेळ सुरु रहातो. तोपर्यंत दुसऱ्या कॉम्बिमेशनच्या बिया तयार झालेल्या असतात. त्या बिया मागच्या बियांच्यापुढं दोन पावलं कशा आहेत अन त्यांची रोगप्रतिकारशक्ती कशी उत्तम आहे. अन त्यादरम्यान बस्तान बसवलेल्या रोगावरही हे नवीन बियाणं कसं मात करतं वगैरे परिणामकारकरित्या सांगितलं जातं अन आपण नवीन जाळ्यात अडकतो. हेही अडकणं पिढी दर पिढी सुरु रहातं.

जीएमओ : जीएमओ म्हणजे जेनेटिकली मोडिफाईड ऑर्गॅनिझम्स. हे केवळ बियांमधेच नसतं तर जगामधल्या कुठल्याही प्रकारात होऊ शकतं. अगदी माणसातसुद्धा. पण आपण इथं यावरचा विचार बियांपुरताच मर्यादित ठेवू. याआधीच्या लेखात अन वर सांगितल्याप्रमाणं वनस्पतींमधेही डीएनए असतो. त्यांचेही परंपरागत चालत आलेले जीन्स असतात. प्रयोगशाळेत अशा जीन्समधे फेरफार करुन नवीन बियाणं जन्माला घातलं जातं. फारसे दृष्य बदल केले जात नाहीत. निदान सध्या तरी. प्रथम हा प्रयोग मका अन कापसावर केला गेला. या दोन्ही पिकांवर ठराविक प्रकारचे रोग पडतात. त्यांचं प्रमाण इतकं असतं की शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड असतं.

मातीमधे निसर्गतःच एक विशिष्ट बॅक्टेरिया असतो. Bacillus thuringiensis (Bt) या नावाचा. संपूर्ण सेंद्रीय. याचं काम म्हणजे काही ठराविक किडींचा नायनाट करणं. परंतु हा जीवाणू नैसर्गिक पद्धतीनं कुठल्या वनस्पतीमधे जाऊन त्यांवर पडणाऱ्या किडींचा सामना नाही करु शकत, म्हणून मग अशा बॅक्टेरियाचे काही अंश ज्या बियांवर प्रयोग करायचा आहे त्यांच्या जीन्समधे फेरफार करुन समाविष्ट केले जातात. पुढं मग अशा बिया तयार करुन त्यावरही विविध चाचण्या अन निरीक्षणं करुन बाजारात आणल्या जातात. अशा बियांपासून घेतलेल्या पीकांवर विशिष्ट किडी पडत नाहीत. सुरुवातीला मका अन कापूस यांवरच केलेल्या प्रयोगांची व्याप्ती वाढत जाऊन ती वांगी, पपई वगैरे पिकांवरही आता होऊ लागली आहे. अजुन तरी यावर प्रयोग सुरु असले तरी अमेरिकेत मात्र अशा बियांचा वापर वाढता आहे.

या बियांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कीटकनाशकांचा वापर अन त्यांच्यावरचा खर्च कमी करणं अन ते तसं सिद्धही झालं आहे. कीड कमी म्हणजेच उत्पादन जास्त. एकीकडं खर्च कमी अन उत्पादनही जास्त. म्हणजे दुप्पट फायदा. फक्त अशा बियाणांपासून घेतलेलं पीक खाऊन माणसांवर काही परिणाम होतो का याची चाचणी अन चाचपणी अजुनही सुरु आहे. आतापर्यंत तरी कुठं काही दुर्घटना घडल्याचं पुढं आलेलं नसलं तरी याबाबतीत अजुनही सावधानता बाळगली जात आहे.

आता प्रश्न येतो तो म्हणजे अशा जीएमओ बियांचा पुनर्वापर होऊ शकतो की नाही हा. तर अशा बियांपासून पिकं घेतल्यावर त्यांच्यापासून बियांची नवीन पिढी निर्माण होत असते. फक्त जीएमओ बिया बनवणाऱ्या कंपन्या आपली मक्तेदारी टिकून रहाण्यासाठी अन भावी विक्री सुरु व अबाधित रहाण्यासाठी ग्राहक शेतकऱ्याकडून एका करारावर सही करुन घेत असतात, ज्यायोगे तो शेतकरी प्रत्येक सीझनला नवीन बियाणं विकत घेईल. तसंही व्यापारी तत्वावर शेती करणारे शेतकरी पुनुरुत्पादित बियांपेक्षा नवीन बियांनाच जास्त प्राधान्य देत असतात. पण सध्या तरी जीएमओ बियांचे तोटे दिसत नसले तरी कीटकनाशक असो की बॅक्टेरियाचं प्रमाण, अती असणं हे वाईटच.

तर बियाणांच्या बाबतीत या तीनही प्रकारांचा सर्वंकष विचार करता, अधिक अन निसर्गापासून काहीशी फारकत घेत तर कधी त्य़ावर मात करत केलेले प्रयोग याचा विपरीत परिणाम काय होईल हे आजच सांगता येत नाही. रासायनिक खतं अन हायब्रीड बिया यांपासून होणारे नवनवीन व जीवघेणे आजार, वाढता खर्च अन त्या प्रमाणात मिळणारा अल्प परतावा हेही पहाता खात्रीशीर अशी आपली देशी बियाणं कधीही चांगली असं म्हणणं हेच योग्य ठरेल. नव्याची कास कितीही धरायची म्हटलं तरीही जेव्हा जीवाचा अन उत्तम आरोग्याचा प्रश्न आहे म्हटल्यावर त्याच्याशी खेळ न करणंच श्रेयस्कर ठरेल.

आता आपल्या बागेत काय़ वापरायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त हायब्रीड बिया वापरल्यावर होणारा किडींचा त्रास अन त्यावर करावा लागणारा कीटकनाशकांचा फवारा, त्यावरचा खर्च अन दर लगवडीला बिया विकत घेणं आणि त्यासमोर देशी बियांची लागवड करुन नैसर्गिक चवीचं अन उत्तम पोषणमूल्यं असलेलं अन्न व त्यासाठी लागणारे अल्प कष्ट अन अल्प खर्च हे दोन्ही मुद्दे विचारात घेऊन त्याप्रमाणं ज्याचं त्यानं ठरवायचं आहे.

लेखात सर्वच बाजूंचा विचार केला असला आणि तो एकांगी ठरणार नाही याची काळजी घेतली असली तरी आजवरच्या अनुभवातुन आलेल्या शहाणपणामुळं अन सद्यस्थितीतल्या पूर्वी कधीही होत नसलेल्या आजारांकडं पहाता देशी वाणाचाच वापर करणं इष्ट ठरेल यात शंका नाही.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

माझा हा लेख व आधीचेही लेख माझ्या https://www.facebook.com/Vaanaspatya या ब्लॉगवरही उपलब्ध आहेत. 

कंपोस्टमधील बिया

कंपोस्टमधील बियाकंपोस्ट बिनमधे आपण जे जे काही टाकतो त्याचं ठराविक कालानंतर दाणेदार कंपोस्टमधे रुपांतर होतं. अगदी कशाचंही. कमी अधिक कालात प्रत्येक गोष्ट जी डिकंपोज होऊ शकते तिचं कंपोस्ट तयार होतं. मग असं असुनही याच कंपोस्टमधे टाकलेल्या वा पडलेल्या बिया का डिकंपोज होत नाहीत? तिथंच त्या कशा काय रुजतात अन ते नाजूकसं रोपटं ढीगाबाहेर येऊन वाऱ्यावर कसं डोलत रहातं?

पडलाय कधी असा प्रश्न तुम्हाला? पडला असेल तर त्याचं उत्तर इथं खाली देतो. अन नसेल पडला तरीही या उत्तराचा उपयोग तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी होईल हे नक्की, अगदी प्रश्न न पडताही.

सर्वात प्रथम एक लक्षात घ्या की कंपोस्टमधे जे जे काही मृत आहे फक्त आणि फक्त तेच डिकंपोज होत असतं. वाळलेला पालापाचोळा अन काड्या-काटक्या या तर मेलेल्याच असतात हे आपल्याला त्यांच्याकडं पाहूनच कळतं. पण हिरवा पाला जो छाटणी केलेल्या फांद्यांवरुन तुम्ही स्वतःच कंपोस्टमधे टाकलेला असतो. तो तर छान हिरवागार असतो. तोही मृतच असतो. झाडापासुन तुम्ही ज्या क्षणी त्याला वेगळं करता तेव्हाच त्याचं "प्रानपखेरू" उडून गेलेलं असतं. हाती असतं ते त्याचं कलेवर. अन म्हणूनच तो मृत पाला डिकंपोज होतो. फक्त तो हिरवा असल्यानं त्यातलं नत्र कंपोस्टमधला ओलसरपणा टिकवुन ठेवतं अन सुक्या पाचोळ्याला कुजायला मदत करतं. याआधी सांगितलेलं लक्षात असेलच की सुका पालापाचोळा कुजण्यासाठी त्याला नत्र लागतं. मग ते हवेतुन मिळो वा जमिनीतून किंवा अशा ओल्या हिरव्या पाल्यातुन. पण नत्र योग्य प्रमाणात मिळाल्याशिवाय सुका पाचोळा वा इतर काहीही कुजू शकत नाही.

तर पुन्हा आपल्या प्रश्नाकडं वळू. अशा कंपोस्टात पडलेली वा टाकलेली बी कशी रुजु शकते? ती तर कधीचीच काढलेली असते किंवा सडलेल्या टोमॅटोतुन ती कंपोस्ट बिनमधे गेलेली असते. म्हणजे ती मृतच असायला हवी. तर ते तसं नसतं. बिया जेव्हा फळात तयार होतात, मग ते फळ असो की फळभाजी वा शेंग, त्या तयार होत असताना त्यामधे फळातले गुण, चव वगैरे सारं जमा होत असतं. फळ पिकू लागतं अन ते कुणीतरी येऊन काढण्याची वेळ जसजशी जवळ येउ लागते तेव्हा झाड आपली पुढची पिढी तयार होण्यासाठी त्या बियांच्या पाठवणीची तयारी करु लागतं. फळ कुणीतरी खाल्ल्यावर वा जमिनीवर पडून फुटल्यावर त्या बिया वेगळ्या होतात. कधी त्या खाल्ल्याही जात असतात तर कधी काढून बाजूला टाकल्या जातात. अशा बियांमधे एक कप्पा असतो ज्याला कोटिलेंडन (cotyledon) असं म्हणतात. यामधे एका ठराविक कालावधीपर्यंत बीला जिवंत ठेवण्यासाठी झाड उर्जा म्हणजेच एनर्जी देऊन ठेवतं. बी फळापासून वेगळी झाल्यावर या ठराविक कालावधीत तिला योग्य ओलसरपणा, उष्णता, उजेड म्हणजे सुर्यप्रकाश वगैरे मिळाल्यावर ती रुजते.

आता या कालावधीत जर ती बी खाल्ली गेली म्हणजे मुंग्या, चिमण्यांसारखे पक्षी वगैरेंनी किंवा आपणही खाल्ली तर ती रुजण्याचा प्रश्नच येत नाही. तसंच तिला योग्य ते तापमान, ओलसरपणा अन प्रकाश वगैरे काही मिळालं नाही तरीही ती रुजत नाही. म्हणजेच प्रत्येक बीच्या नशिबी रुजणं असतंच असं नाही. थोड्याच बिया अशा नशिबवान असतात ज्या योग्य वेळी रुजतात. अन ज्या बियांना योग्य वेळ अन तापमान वगैरे मिळत नाही त्या त्यांच्या नियत काळानंतर जागच्या जागीच मरुन जातात अन कंपोस्टमधील इतर सेंद्रीय गोष्टींप्रमाणं डिकंपोज होतात. आपल्याला ते कळतही नाही. म्हणजे "जंगलमें मोर नाचा, किसने देखा"सारखा प्रकार.

जशी आपली एक पिढी असते. अगदी खापर खापर पणजोबांपासून ते खापर खापर नातवंडापर्यंत, मग ते जगाच्या पाठीवर कुठंही असो. ते सारे एका अदृश्य धाग्यानं बांधलेले असतात तसंच झाडांचंही असतं. फक्त त्याचं रेकॉर्ड नसल्यानं कुठलं ब्रीड कुणाकडं वाढतंय याचा पत्ता कुणाला नसतो. पण प्रत्येक झाड हे आपल्या पुढच्या पिढीची तयारी त्याचा शेवट जवळ येऊ लागल्यावर किंवा त्याच्या आयुष्यात स्थैर्य म्हणजेच स्टॅग्नन्सी आल्यावर करु लागतं. तसंही फळांचा सीझन गेल्यावर ते झाड नवं रूप अन पर्यायानं नवा जन्मच घेत असतं. झाड फळणारं असेल तर त्याच्या फळांमधे बिया तयार होऊन त्या मानव वा पशु पक्षी यांच्यामार्फत जमिनीवर पसरुन रुजतात तर कधी फळ पिकून फुटुन त्यातील बिया वाऱ्याच्या मदतीनं इतस्ततः पसरुन तिथं त्या योग्य वेळी रुजतात. उदा, काटेसावर, कॉसमॉस वगैरे.

जी झाडं फळत नाहीत अन जी फांद्यां रुजवूनच तयार होत असतात अशा झाडांच्या फांद्यांवर नवीन अंकूर फुटतात. काही झाडांच्या अशा नवीन फांद्या मातीला टेकल्यावर त्यांना मुळं फुटतात अन नवीन रोप तयार होतं. मग हळूहळू त्य़ाचीही स्वतःची एक जीवनसाखळी तयार होते. एकमेकांत गुंतलेली दिसली तरी अशी झाडं वेगवेगळी असतात. उदा. अडुळसा, कण्हेर, गुलबक्षी, वगैरे. ती वेगळी केल्यावर दुसरीकडंही वाढू लागतात. तर काही झाडांच्या जमिनीच्या लेव्हलच्याही वर असलेल्या फांद्यांना मुळं फुटुन ती जमिनीच्या दिशेनं खाली येऊन मातीत रुजतात. उदा. गुळवेल वगैरे.

हे सगळं म्हणजे बियांमधे उर्जा देणं किंवा फांद्यांना मुळं फुटून ती जमिनीच्या दिशेनं नेऊन ती मातीत रुजवण्याचं काम निसर्गच करत असतो. मग त्याला तुम्ही निसर्ग म्हणा की देव म्हणा. हा सगळा श्रद्धा अन भावना या दोघा बहिणींचा प्रश्न आहे. पण हे कार्य विनाखंड निसर्गात होतच असतं. एका ठराविक कालावधीनंतर. कधी झाड स्वतःचं स्वतः करतं तर कधी मानव वा इतर कुठला पशूपक्षी किंवा वारा, पाऊस यांच्या मदतीनं करतं. पण हे काम अव्याहत सुरु असतं.

त्यामुळंच तुमच्या कंपोस्टमधे पडलेली बी नशीबवान असेल तर ती तिथंच रुजते, तिथल्या जीवजंतूंना अन उष्णतेत होणाऱ्या कमीअधिक बदलांना तोंड देत पुरुन उरते, फळते फुलते अन मग तुम्हाला संधी मिळते फोटो काढून पोस्ट करायला "माझ्या कंपोस्टमधे आपोआप आलेल्या झाडाला लागलेले टोमॅटो."

आता यानंतर अजुन एक प्रश्न किंवा उपप्रश्न मनात उभा रहातो. अन तो म्हणजे बाजारातुन आणलेल्या टोमॅटो, मिरची वा झेंडू वगैरेंच्या बिया रुजत टाकल्या. बऱ्याचशा रुजल्याही नाहीत. ज्या रुजल्या त्या फळल्या-फुलल्या नाहीत अन ज्यांना फळं वा फुलं आली ती आणलेल्या फळा-फुलासारखी मोठी व गेंदेदार नव्हती, असं का?

तर बाजारातली बव्हंशी फळं-फुलं वा फळभाज्या या हायब्रिड बियाणं वापरुन पिकवलेल्या असतात. हायब्रीड म्हणजे दोन एकाच प्रकारच्या पण वेगवेगळ्या प्रजातींचा केलेला संकर. म्हणजे उदाहरणार्थ, एका जातीच्या टोमॅटो वा वांग्याच्या फुलांतला पुंकेसर दुसऱ्या जातीच्या टोमॅटो वा वांग्याच्या फुलांतील स्त्रीकेसरावर ठेवून केलेला संकर. अशा पद्धतीतुन येणारं फळ हे तिसऱ्याच पद्धतीचं असतं. या अशा फळातील बिया म्हणजेच हायब्रीड बिया. अशा क्रॉस पोलिनेशनपासून घेतलेल्या फळांमधील बियांमधे, उदा. टोमॅटोतील बियांमधे दोन्ही प्रजातींचे गुण असु शकतात किंवा एकाच कुणातरी प्रजातीचे गुण असु शकतात. अन म्हणूनच आपण जेव्हा बाजारातुन आणलेल्या टोमॅटो वा झेंडूपासुन रोपं करतो तेव्हा तसेच टोमॅटो वा झेंडूची फुलं सहसा मिळत नाहीत.

ब्रॅण्डेड कंपन्या जेव्हा हायब्रीड बिया त्यांच्या फार्मवर तयार करतात तेव्हा तेही काही सोपं काम नसतं अशा बियांची पहिली बॅच निघते जिला फर्स्ट जनरेशन किंवा F1 types म्हणतात, ती ते वर्षानुवर्षं आपल्याच फार्मवर टेस्ट करतात. अन मनासारखे रिझल्ट्स मिळाल्यावरच मग बाजारात आणतात. पण तरीही आपण अशा विकत घेतलेल्या बियांपासुन येणाऱ्या फळांमधुन निघालेल्या बिया तशीच फळं देतील याची खात्री नसते. अन म्हणूनच शेतकरी असो वा आपल्यासारखा कुंडीकरी. दर सीझनला नवीन बियाच विकत घेतो.

याच्याविरुद्ध एक प्रकार आहे अन तो म्हणजे ओपन पॉलिनेशनचा. यात एकाच झाडावर सरळ सरळ पोलिनेशन केलेलं असतं अन यातुन वर्षानुवर्षं, पिढ्यान पिढ्या एकाच प्रकारची फळं वा फुलं, जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता. म्हणून जे ऑनलाईन बिया मागवतात त्यांनी कटाक्षानं OP म्हणाजेच ओपन पोलिनेटेड बिया मागवाव्यात. म्हणजे दर वेळेस नवीन बिया घ्यायला नको.

आशा आहे की बियांच्या बाबतीतले मनात येणाऱ्या व न आलेल्याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखातुन मिळाली असावीत. बिया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणं किंवा सोयीप्रमाणं कुठल्याही वापरा, हायब्रीड घ्या वा ओपन पोलिनेटेड. फक्त आपण काय वापरत आहोत हे नक्की पाहून घ्या. अन त्याप्रमाणंच त्या बियांकडून जी हवी ती अन तेवढीच अपेक्षा ठेवा.

बियांचा अजुन एक प्रकार म्हणजे देशी वाणाची बियाणं, हेअरलूम बियाणं. हा सर्वात खात्रीशीर प्रकार. यांच्याकडून तुम्ही रंग, चव, आकार याविषयी पूर्ण खात्री ठेवू शकता असा. पण त्य़ाविषयी पुन्हा कधीतरी. अहं, लेखांची संख्या वाढावी म्हणून नाही तर सगळं एकदम खाऊन पचायला सोपं जावं म्हणून. सावकाश खाल तर जास्त खाल. मला काय, मी लिहित राहीन. तुम्हीच कंटाळाल.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

माझा हा लेख व आधीचेही लेख माझ्या https://www.facebook.com/Vaanaspatya या ब्लॉगवरही उपलब्ध आहेत.

पावसाळ्यातील प्राणी

पावसाळ्यातील प्राणीआता पावसाळ्यात बरेचसे प्राणी, गांडूळं, गोगलगायी, शंख, लहान लहान किडे, छोटे सरपटणारे जीव, वेगवेगळ्या रंगाचे कीडे, कधी एकएकटे तर कधी समूहानं, जथ्थ्यानं बागेत वावरताना दिसतील. प्रत्येक प्राण्याचं एक विहित कार्य आहे. ते पार पाडण्यासाठी ते जन्माला आलेले आहेत. कुणी परागीभवनासाठी तर कुणी या ओल्या गच्च दिवसांत पक्षांसाठी अन्न म्हणून जन्माला आलेले आहेत. यातीलच काही पुढं फुलपाखरं बनतील व तुमच्या बागेतील फुलांसोबतीनंच तुमच्या बागेलाही देखणी करतील.

हे सारे निरुपद्रवी आहेत. एवढंच नव्हे तर यापैकी बरेचसे बिनविषारीही आहेत. जे विषारी असतील त्यांच्यांमुळं तुमच्या जीवाला अपाय नक्कीच होणार नाही. काही किडे वा अळ्या झाडांची पानं खातील. ते त्यांचं अन्नच आहे. कीड लागून खराब झालेली पानं अन अशा अळ्यांनी उदा. फुलपाखरांच्या अळ्यांनी खाल्लेली पानं ही नजरेसच वेगळी दिसतात. जर झाडाला खरंच कीड लागली असेल तरच त्यावर उपाय करा. फुलपाखरांच्या अळ्यांनी पानं खाल्ली तर नवीन पानं येतील. त्यासाठी अळ्यांना मारू नका. झाड अगदीच मरेल असं वाटलं तर आणि तरच त्यावर उपाय करा. अन्यथा काही गोष्टी निसर्गावर सोडा. फुलपाखरांच्या अळ्यांची तर भूक प्रचंड असते. कित्येकदा झाडं अक्षरशः निष्पर्ण करुन टाकतात त्या. पण शेवटचं पान खाल्लं जात नाही तोवर नवीन पालवी फुटायला सुरुवातही झालेली असते. तिकडंही लक्ष द्या. सगळी पानं गेली म्हणून झाडही काही लगेच मरत नाही.

अळ्यांव्यतिरिक्त खेकडे, विविध रंगांचे बेडूक वा इतरही प्राणी जमिनीवरच्या बागेत या दिवसांत दिसतील. बेडूक तर बिचारा चावणारही नाही. उलट तो तुमच्या बागेतले उपद्रवी कीडे अन कीटक खातो. उदा, गोगलगायी वगैरे. म्हणजे तो तुम्हाला मदतच करत असतो. फक्त त्याची जाहिरात तो करत नसल्यानं तुम्हाला ते कळत नाही. पण खेकडा मात्र त्रास दिल्यावर वा पाय पडल्यावर नांगी मारेल. त्यानं कुणीही मरणार नाही. फक्त रक्त तेवढं काढेल. पण म्हणून त्याच्या टाळक्यात दगड घालायलाच हवा असं काही नाही. ते बिचारे वर्षभर जमिनीत खोलवर जाऊन बसलेले असतात. जिथं ओलसरपणा असेल तिथवर ते खोल जाऊन बसतात. पाऊस पडून माती खोलवर ओली झाली की ते वर येतात अन आपल्या बिळाच्या जवळपास असलेली कोवळी पानं, गवत, फळं वा फुलं खातात. माझ्या तर कितीतरी नुकत्याच अंकुरलेल्या शिराळी वगैरेंच्या वेली यांनी फस्त केल्या आहेत. अगदी दर वर्षी करतात. पण त्याला काही इलाज नाही. मांजर, कावळे, भारद्वाज सारखे डेअरिंगबाज किंवा गनिमी कावा करणारे पक्षी अन प्राणी यांची शिकार करतात. काळे खेकडे असतील तर माणसं रात्रीच्या वेळी मशाल पेटवून अन खेकड्यांना काहीतरी खाय़चा पदार्थ आहे असं भासवुन बिळाबाहेर आणतात अन कौशल्यानं पकडतात अन खातात. (शिजवुन की कच्चं ते मला माहीत नाही त्यामुळं लिहिलं नाही.) 

तर या खेकड्याचाही बागेतली कोवळी पानं खाण्यापलिकडं आपल्याला काहीच उपद्रव नाही. खेकडे मारण्यासाठी काही तज्ञ औषधं सुचवतील. पण एक लक्षात घ्या. त्यांची बिळं असतात खोलवर गेलेली. तुम्ही जे औषध टाकणार ते असणार रासायनिक. कडुलिंबाचं किंवा मिरचीचं नक्कीच नसणार. असं रसायन बिळांतून प्रवास करत जमिनीत मुरणार. वरच्या भागातल्या तुमच्या बागेचं नुकसान करणार अन खाली, म्हणजे जमिनीतल्या पाण्याच्या साठ्यातही मिसळून ते खराब करणार. त्यापेक्षा त्या खेकड्याला बागेतली पानं खाऊद्या किंवा तो खेकडा मांजरीच्या वा कुठल्या पक्षाच्या पोटात जाणार असेल तर जाऊद्या. उगीच निसर्गाचा समतोल बिघडवू नका. हे प्राणी वा पक्षी जेव्हा खेकडा खातात तेव्हा त्याच्या शरिराचा टणक भाग म्हणजे पाय, नांग्या वगैरे तसाच टाकून देतात. तो भाग मात्र ज्या झाडांना कॅल्शियमची आवश्यकता असते त्यांच्या बुंध्याशी मातीत शक्य तेवढे बारीक तुकडे करुन पुरुन त्यावर माती ओढून घ्या. कॅल्शियमचा नैसर्गिक स्त्रोत आहे तो. खुपच फायद्याचा होईल तो त्या झाडासाठी.

त्यामुळं दिसला कीडा की त्याला मार असं काही करु नका. अन दुसरं महत्वाचं म्हणजे प्रत्येक किड्याचं नांव अन जात, पोटजात, धर्म, गोत्र, शाकाहारी की मांसाहारी, चालतो की उडतो या गोष्टी आपल्याला कळायलाच हव्यात असं काही नाही. असेलच रस अशा गोष्टीत अन करायचाच असेल अभ्यास तर त्य़ासाठी एखादं ऍप आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल करुन घ्यावं.

अन सर्वात महत्वाचं म्हणजे लगेच घाबरुन जाऊ नका. तुमच्याहीपेक्षा झाडाला स्वतःची काळजी जास्त आहे. ते बरोबर काय़ ते करतं. आपण फक्त पायात चपला, शूज अन हातात मोजे वगैरे घालणं, बागकाम केल्यावर हात स्वच्छ धुऊन मगच चहाचा कप तोंडाला लावणं एवढी काळजी घ्यावी. किड्या-कीटकांनाही पावसाची मजा घेऊ द्या. जगा व जगु द्या. आनंद घ्या अन इतरांनाही घेऊ द्या. पाऊस केवळ माणसालाच आवडतो असं नाही. माणसाशिवायही इतर पुष्कळ प्राणी आहेत ज्यांना पाऊस आवडतो. तेव्हा इतर किड्यांकडं अन प्राण्यांकडं केवळ ते आपल्यामुळं डिस्टर्ब तर होत नाहीत ना हे पहाण्यासाठीच त्यांच्याकडं लक्ष द्या. त्यांना जेव्हा आपली भिती वाटेल तेव्हाच ते हल्ला करतील अन्यथा साधी मुंगीही आपल्या अंगावरुन न चावता चालत जाते. आपल्या मनात जेव्हा तिला मारण्याचा विचार येतो तेव्हाच त्या लहरी पकडून ती हल्ला करते. तोवर नाही.

पावसाळ्याच्या आपणां सर्वांना ओल्या गच्च शुभेच्छा. मजा करा अन मजेतच बागही करा.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

माझा हा लेख व आधीचेही लेख माझ्या  https://www.facebook.com/Vaanaspatya या ब्लॉगवरही उपलब्ध आहेत.

कंपोस्ट अन त्यामधले विविध जीव

कंपोस्ट अन त्यामधले विविध जीवसामान्यतः जे घरी कंपोस्ट करत असतात त्यांच्या दृष्टीनं कंपोस्ट म्हणजे ओल्या सुक्या कचऱ्याचं योग्य ते प्रमाण राखून ठराविक कालावधीनंतर हाती आलेलं काळं वा मातकट रंगाचं अन मातीसदृश वा चहापावडरसारखं दाणेदार मॅटर. या दरम्यान त्यात आवश्यक ओलावा राखणं अन अधुनमधुन वरखाली करणं एवढंच. पण हे कचऱ्याच्या मोठमोठ्या तुकड्यांचं मग ती फळांची सालं असोत की वाळक्या फांद्यांचे तुकडे, या साऱ्यांचं रुपडं पालटून दाणेदार पावडर कशी होते याबाबत फारशी जागरुकता नाही. अन त्यातुनच "माझ्या कंपोस्टबिनमधे मुंग्या आहेत किंवा अळ्या आहेत वा अगम्य कीडे आहेत" सारखे प्रश्न येऊ लागतात. तर काय काय असतं आपल्या कंपोस्टच्या ढिगाऱ्यात अन काय भूमिका असते त्यांची. काय काम करतात हे सारे आपल्या कंपोस्टात. चला पाहू या.

कंपोस्टींगच्या तीन अवस्था असतात हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. एक सुरुवातीची म्हणजे इनिशिएशन किंवा मेसोफिलिक फेज. कंपोस्टींग नुकतंच सुरु झालेलं असतं. तापमानही अगदीच नॉर्मल, म्हणजे बाहेर हवेत असेल तेवढंच किंवा ओलं मॅटर जास्त असेल किंवा पांणी घातलं असेल तर त्याहुनही कमी. म्हणजे २० डिग्री सेल्सिअस वगैरे. नंतरची फेज म्हणजे थर्मोफिलिक फेज. यावेळी आतले जीवाणू व इतर जंतु कामाला लागलेले असतात. सहाजिकच तापमान वाढलेलं असतं. अगदी ७०-८० डिग्री सेल्सिअसपर्यंतही जातं. क्वचित जास्तही वर जातं. यानंतर शेवटची फेज म्हणजे मॅच्युरेशन किंवा क्युरिंग फेज. यात सगळं जड अन जाड मॅटर आत जन्माला आलेल्या पठ्ठ्यांनी खाऊन फस्त केलेलं असतं. सगळा आकार उकार गायब झालेला असतो. सगळं मातीत मिसळण्याची सुरुवात झालेली असते. तापमान खाली खाली येत ओलसरपणामुळं २०-३० डिग्रीपर्यंत येत रहातं. अन ही फेज पूर्ण झाल्यावर उरतं ते पूर्ण तयार झालेलं कंपोस्ट, काळं सोनं.

कंपोस्टींगची प्रक्रिया एकदा सुरु झाली की त्यामधे बरेचसे जीवाणू, किटक, बुरशा वगैरे उत्पन्न होऊन कामाला लागतात. प्रत्येकजण आपापली निसर्गानं नेमून दिलेली कामं करायला लागतो. अगदी दिवसाचे चोवीस तास. कुठल्याही सुट्टीविना अन वर्किंग अवर्सविना. जीवात जीव असेपर्यंत प्रत्येक जीव जन्माला आल्यापासुन त्याचं नेमून दिलेलं काम करत असतो. कंपोस्टिंगच्या तीनही फेजेसमधे अन त्या त्या तापमानात तग धरुन हे सगळे आपापलं काम करत असतात. काही जीव आपल्याला सहज दिसतात तर काही दिसण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राची मदत घ्यावी लागते. काही तर इतके सूक्ष्म असतात की दुर्बिणीतुनही आपल्याला दिसत नाहीत. या प्रत्येकाची कचऱ्याचं विघटन करण्याची पद्धतही निरनिराळी असते. या सगळ्यांची वर्गवारी साधारणपणं पुढं दिलेल्या तीन प्रकारांत केली जाते;

पहिली फळी : यामध्ये प्रामुख्यानं येतात ते म्हणजे अत्यंत बारीक बुरशी, बॅक्टेरिया, ऍक्टिनोमायसेट्स (बुरशीचीच एक प्रजात. फक्त यामुळं मनुष्य व प्राणी यांना रोग होऊ शकतो. अन म्हणूनच कंपोस्ट वापरताना सहसा हातमोजे घालावेत किंवा नाही घातले तर नंतर लगेचच हात स्वच्छ पाण्यानं धुवावेत. तसंच घरच्या पाळीव प्राण्यांना यात नाक खुपसण्यापासून रोखावं.) गोगलगायी, गांडुळं, माशा, पांढऱ्या अळ्या अन नेमाटोड्स. हे कंपोस्टमधल्या सेंद्रीय पदार्थांवर जगतात. कंपोस्टमधल्या जैविक पदार्थांचं विघटन करतात.

दुसरी फळी : यामध्ये येतात त्या माशा, पंख असलेले कीटक, नेमाटोड्स, अळ्या, वगैरे. काही एकपेशीय कीडेही
असतात. शाळेत आपण अमिबा हे नांव वाचलं असेल. तसेच काही प्राणी या दुसऱ्या फळीत मोडतात. यांचं प्रमुख अन्न म्हणजे पहिल्या फळीतले कीटक अन कंपोस्टमधलं ऑर्गॅनिक मॅटर. हे सगळे कंपोस्टमधल्या विघटीत होणाऱ्या पदार्थांचे टिश्युज मोडण्यास मदत करतात.

तिसरी फळी : यामध्ये येतात त्या मुंग्या, घोण वा गोम, माशा, रोव्ह बीटल्स म्हणजे पंख अन दोन ऍन्टिनासारख्या सोंडी असलेला किडा व विविध प्रकारच्या माशा. दुसऱ्या फळीतले किटक हे यांचं अन्न.कंपोस्टिंगची प्रोसेस जेव्हा सुरु होते तेव्हा त्यात जीवाणू, कीटक अन विविध प्रकारच्या बुरशा उत्पन्न होतात. मधल्या भागात जसं जसं तापमान वाढू लागतं तसे काही कीटक मरुन जातात. अन डिकंपोजिंगची प्रक्रिया मंदावत जाते. यासाठीच अधुन मधुन कंपोस्ट वरखाली हलवण्याची गरज असते. त्यामुळं तापमान कमी होतं अन पुन्हा नवीन कीटक, बॅक्टेरिया वगैरे त्यात येतात.

ऍक्टिनोमायसेट्स ही बुरशी व इतरही काही प्रकारच्या बुरशा कंपोस्टमधील फांद्यांच्या तुकड्यांमधलं लिग्निन तोडतात. त्यामुळं फांद्यांचे तुकडे, वाळक्या काटक्या वगैरेंचं विघटन होऊ लागतं. कंपोस्टिंगच्या सुरुवातीच्या काळात अन शेवटच्या काळात या जास्त ऍक्टिव्ह असतात. मधल्या काळात जेव्हा तापमान वाढलेलं असतं तेव्हा या काम करु शकत नाहीत.

याव्यतिरिक्त सोल्जर फ्लाईज अन त्यांच्या अळ्या याही कंपोस्टमधे असतात. गांडूळांप्रमाणंच कंपोस्टमधील सेंद्रीय पदार्थांचं विघटन करुन नत्रयुक्त मॅटरमधे रुपांतर आपल्या विष्ठेद्वारे हे करत असतात. तेही गांडूळांपेक्षा जास्त वेगानं. कंपोस्टमधे शिळं अन्न, मटण वगैरे असेल तर हे नेहमी असतातच. यांना ओलसरपणा फार आवडतो. त्यामुळं कंपोस्टमधे जर जरुरीपेक्षा जास्त ओलावा असेल तर यांची संख्या वाढते. म्हणून कंपोस्टमधे आवश्यक तेवढाच ओलसरपणा ठेवावा. बरेचजणांना यांची किळस वाटते. पण या काही अपाय करत नाहीत अन यांना पंख फुटल्यावर त्यांचं प्रौढ माशांमधे रुपांतर झाल्यावर त्या तसंही उडूनच जाणार असतात. या माशांच्या पायांवर केस नसल्यामुळं त्या कुठलाही आजार वा जंतु यांचा प्रसार करु शकत नाहीत. तरीही या अळ्या नको असतील तर कोरडं मॅटर म्हणजेच ब्राऊन मटेरिअल घालून अधिकचा ओलसरपणा कमी करावा. आवश्यकता भासल्यास नीमपेंडही घालावी.

वर उल्लेखिलेले बहुतांश कीटक, माशा, बुरशा हे कंपोस्टमधे असतात. अन हे असतात म्हणूनच ओल्या-सुक्या कचऱ्याचं, शिळ्या पदार्थांचं विघटन होऊन आपल्याला उत्तम काळं सोनं मिळतं. याशिवायही काही जीवाणू अन बॅक्टेरियाही असतात. अर्थात कंपोस्टच्या प्रत्येक बॅचमधे हे सारे असतीलच असं नाही. कारण प्रत्येक जीवाची रहाण्याची, अन्नाची अन तापमानाची गरज निरनिराळी असते. त्या त्या परिस्थितीनुसार ते ते जीवाणू व कीटक कंपोस्टमधे येतात अन आपलं कार्य करुन नाहीसे होतात.

यातले बरेचसे किळसवाणे वाटले अन वरवर अपायकारक भासले तरीही त्यांच्यापासून आपल्याला काहीही त्रास होत नाही. ते त्यांचं काम तिथंच कचऱ्यात राहून करत असल्यामुळं आपण तिथं जाऊन त्यांना डिस्टर्ब करण्याची गरज नसते. त्यांना त्यांचं काम करु द्यावं. कंपोस्ट जेव्हा वरखाली करायचं असेल तेव्हा हातमोजे घालावेत. अधिक काळजी घ्यायची असल्यास तोंडाला मास्क बांधावा. शक्यतो नुसत्या हातानं कंपोस्ट हलवु नये. अन सर्वात महत्वाचं म्हणजे कंपोस्ट हलवुन झाल्यावर हात स्वच्छ पाण्यानं धुवावेत. मग कसलंच टेन्शन रहाणार नाही. निसर्गामधल्या प्रत्येक जीवाला काही अर्थ आहे, त्याचं निश्चित असं काम आहे. माणूस सोडल्यास इतर कुठलाही जीव दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करत नाही की नाक खुपसत नाही. तेव्हा जगा व जगू द्या. हे कीटक अन जीवाणू जे काही करत असतात ते आपल्याच फायद्याचं असतं. नाहीतर कचऱ्याच्या डोंगरानं एव्हरेस्टशी स्पर्धा केली असती अन सगळीकडं दुर्गंधी पसरलेली असती.

नोंद : आवश्यक तिथं इंटरनेटवरील काही साईट्सचा आधार घेतला आहे

फोटो सौजन्य डेली डंप - कंपोस्ट ऍट होम

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

माझा हा लेख व आधीचेही लेख माझ्या https://www.facebook.com/Vaanaspatya याही ब्लॉगवर उपलब्ध आहेत.

सप्तपर्णी - समज-गैरसमज आणि आरोप-प्रत्यारोप

सप्तपर्णी - समज-गैरसमज आणि आरोप-प्रत्यारोप


सप्तपर्णी हे देशी की विदेशी झाड हा वाद जसा जुना आहे तसाच सप्तपर्णी विषारी की बिनविषारी, अर्थात हे झाड माणसाच्या तब्येतीला योग्य की अयोग्य हेही वाद जुनेच आहेत. कोर्टात एखादी केस पिढ्याऩ पिढ्या चालते तसेच हे वादही चालूच आहेत. दोन्ही बाजूंनी कितीही सबळ पुरावे दिले तरीही. बरं, यातले बहुतांश पुरावे हे गुगल, विकिपिडिया अथवा अन्य कुठुनतरी घेतलेले असतात. अभ्यास वगैरे काही नसतं. फक्त प्रतिवाद करताना आत्मविश्वास दाखवला की झालं. समोरचा कितीही अभ्यासू असला तरी उच्चशिक्षणामुळं आलेल्या विनयानं गप्प बसतो. त्यामुळं आपलं पांडित्य आपोआप सिद्ध होतं. असो. तसंही आपसांत वाद घातले की काही लोकांना बरं वाटतं. अन वाद घालण्यासाठी अभ्यास करायलाच हवा असं कुठं लिहिलं आहे?

सप्तपर्णीचा दुस्वास किंवा या झाडाला विरोध करणारे बरेच लोक आहेत. टक्केवारी काढायची झाल्यास विरोध करणारेच स्पष्ट बहुमताच्या आधारे जिंकतील. मी तरी हे झाड कुणी आवड म्हणून आपल्या अंगणात लावल्याचं पाहिलं नाही. मीही कधी लावलं नाही अन लावणारही नाही. कारण घरापासून दीडशे मीटर्सवर मेन रोड आहे अन तिथं दुतर्फा हीच झाडं आहेत. घरबसल्या वास अथवा सुगंध येत असल्यावर पुन्हा अंगणातली जागा का अडवू?

या फुलांचा गंध सुरुवातीला फारच मोहक असतो. पण जसजशी सगळी झाडं फुलू लागली की सहन होण्यापलिकडे जातो. इथुनच मग या झाडाच्या प्रेमात असलेला माणूस विरोधात जाऊन बसतो. अन मग आधीपासूनच तिथं बसलेले हा जणू आपलाच विजय आहे अशा थाटात त्याच्याशी वागतात.

मग असं असुनही हे झाड सगळीकडे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी किंवा सोसायट्यांमधे का दिसतं? कारण सोपं आहे. याचं रोप लावा अन विसरुन जा. पावसाळ्यात मिळणाऱ्या पाण्यावर हे वर्ष काढतं. ना कसल्या खताची मागणी ना पाण्याची मागणी. आपण आपल्या बागेतल्या झाडाची जशी काळजी घेतो तसं या झाडांच्या बाबतीत मुळीच नसतं. देखभालच नाही म्हणजे खर्च नाही. वेगळा माळी ठेवायला नको. सहाजिकच खर्च शून्य. हेच कारण आहे ही झाडं सार्वजनिक ठिकाणी असण्याचं.

पक्षांचं म्हणाल तर पावसाळ्यात त्यांना विणीच्या काळात अंडी घालायला अन पिल्लं मोठी होईपर्यंत आडोसा लागतो. त्यामुळं ती ज्या झाडावर घरटं बांधणं शक्य आहे तिथं बांधत असतात. कधी तर घराच्या वळचणीलाही बांधत असतात. त्यामुळं सप्तपर्णीच्याही झाडावर तुम्हाला पक्षी बसलेले दिसतील अन त्यांची घरटीही दिसतील. मी तरी ती नेहमीच पहात असतो. त्यामुळं निदान माझ्यासाठी तरी हे ऐकीव किंवा गुगलवरुन शोधलेलं विधान नाहीये.

आता, या झाडाच्या उपयोगांबद्दल आणि औषधी गुणांबद्दल बोलणाऱ्यांना जे सज्जन लोक विरोध करतात त्यांना खरं तर हे पक्कं माहित असतं की सार्वजनिक ठिकाणी झाडं कुणा व्यक्तीनं अथवा या झाडाबद्दल चांगलं लिहिणाऱ्यानं लावलेली नसून ती जागोजागच्या महानगरपालिका व सोसायटीमधल्या मूठभर लोकांच्या कमिटीनं लावली आहेत. पण यांना विरोध करणं सर्वांनाच जमत नाही. म्हणून जिथं म्हणून या झाडाविषयी चांगलं लिहिलं असेल तिथं जाऊन कचरा केला की यांना धन्यता वाटते. सोबतीला गुगल वगैरे संदर्भ फेकले की समोरचा थंड पडतो.

आपल्या समूहावर सर्च ऑप्शन आहे. त्या खिडकीवर एखादा शब्द टाईप करुन दुर्बिणीवर टॅप केलं की तो शब्द असलेल्या असंख्य पोस्ट्स समोर दिसू लागतात. आता या पोस्ट्स म्हणजे काय़ असतं, तर आजवर अनेकांनी लिहिलेल्या पोस्ट्स, ज्यात माहिती जशी असते तसेच प्रश्नही असतात.

गुगल म्हणजे काय आहे? दिलेल्या जागी आपण आपला प्रश्न टाईप करुन एंटर हीट केलं की असंख्य पोस्ट्स अथवा लेख यांची यादी विविध साईट्ससह आपल्यासमोर दिसते. तेही सतराशे साठ कोटी सर्चेस ४ सेकंदात असं लिहिलेलं दिसतं. अन जेवढी पानं तेवढे गुगलच्या स्पेलिंगमधले "ओ" दिसतात. आता या यादीत जसे त्या विषयाच्या बाजूनं लिहिलेले लेख असु शकतील तसेच विरोधीही. गुगलचं काम तेवढंच. त्यामुळं गुगलवर अमकं लिहिलंय म्हणजे ते खरंच असतं वगैरेंमधे काही तथ्य नसतं. माझा जर एखाद्या गोष्टीला विरोध आहे तर मी विरोधी लिखाण वाचून माझ्या म्हणण्याला पुष्टी मिळवणार अन माझंच कसं खरं असं दाखवणार.

विकिपिडियाचंही तेच. तिथं तर तुम्ही आम्ही कुणीही तिथला लेख एडीट करु शकतो. त्यांना तुमचं म्हणणं पटलं किंवा तुम्ही ते पटवुन दिलं की तुम्ही एडिट केलेली माहिती फायनल. अर्थात पुन्हा कुणी ती एडीट करेपर्यंतच.

त्यामुळं, समोर आलेला लेख, मग तो एखाद्या ब्लॉगवर असो की बागकामासंबंधी कुठल्याही समूहावर आलेला असो. तो पूर्ण वाचावा. पटला तर लाईक करुन किंवा त्यावर कमेंट करुन पुढं जावं. नाही पटला तर सभ्य शब्दांत आपलं म्हणणं मांडावं. लेख लिहिणारा कुठं म्हणतोय की मी लिहिलंय तेच खरं आहे आणि तेच फायनल आहे म्हणून? बर, लेख आला म्हणून काही कुणी लगेच नर्सरीत जाऊन ते झाड आणून लावणार नाही.

तर मंडळी, सप्तपर्णी चांगली की वाईट, उपयुक्त की धोकादायक, औषधी की विषारी वगैरे पुष्कळ वैचारिक प्रवाह आहेत. आजवर या झाडामुळं कुणाचा जीव गेलेला जसं मी ऐकलं नाही तसंच याच्या मुळं कुणाचा जीव वाचलेलाही ऐकलं नाही.

अन तसंही कुठलं झाड अथवा रोपटं औषधी आहे वगैरे कुणीही सांगितलं तरी ते तुम्ही सांगणारा वैद्यकीय क्षेत्रातला नसेल तर ऐकूच नये. आजवर काही झाडं, जसं तुळस, दुर्वा वगैरे गोष्टी या औषधी असल्याचं सिद्ध झालं आहे त्यामुळं ते सेवन करायला हरकत नाही. पण एकसारखी दिसणारी पण विरोधी गुणधर्म असलेली पुष्कळ झाडं आहेत. त्यामुळं कुठंतरी वाचलं म्हणून दिसलं झाड की काढ पानं, काढ रस अन ओत तोंडात असं मुळीच करु नका. जीवाचा प्रश्न असतो. जीवन असेल तरच जीवन की बगिया महकेल. नाहीतर काय कराय़चीत ती फुललेली बाग?

जाता जाता, या सप्तपर्णीवर वाद घालणाऱ्या दोन्ही पक्षांना नम्र विनंती की हाती भक्कम पुरावे असल्याशिवाय बोलू नका अन वाद तर त्याहुनही घालु नका. सप्तपर्णीच्याच बाबतीत नाही तर कुठल्याही झाडाच्या बाबतीत. 


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

तुळस

तुळसतुळशीचे खूप सारे औषधी उपयोग आहेत. हिंदूंसाठी ती पूजनीय आहे. प्रत्येक घराच्या दारात तुळशीचं रोप लावलेली कुंडी ही असतेच असते. आपल्या पूर्वजांनी तुळशीचं औषधीमूल्य जाणल्यामुळंच तिला देवत्व बहाल केलं अन त्यामुळं नसते गैरसमजही पसरले. तेही गेल्या काही वर्षांतच. त्यावर आजवर पुषकळशी चर्चा अन लिखाण झालेलं असल्यामुळं त्यात नवीन सांगण्यासारखं काहीच उरलेलं नाही अन म्हणूनच ते लिहिण्याचं टाळत आपण तुळशीच्या रोपाची काय काळजी घ्यावी यावरच चर्चा करु. 

तुळशीची रोपं तयार करणं ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे. घरोघरच्या तुळशीच्या बिया उन्हाळ्यातल्या वाऱ्यामुळं इतस्ततः पसरतात अन पावसाळ्यात रुजतात. अशी रोपं काढून आपण आपल्या बागेत योग्य त्या ठिकाणी लावु शकतो. तसंच बियांपासूनही आपण रोपं करु शकतो व फांद्यांपासुनही रोपं तयार करु शकतो. तुळशीतही अनेक प्रकार आहेत. आपण आपल्या आवडीप्रमाणं अन मुख्य म्हणजे आपल्या परिसरात जे वाण जास्त टिकतं वा बहरतं ते वाण निवडून लावावं.

साधारणपणं तुळशीच्या रोपाचं आयुर्मान सरासरी ३ वर्षं असतं. अपवादात्मक परिस्थितीत अन जातीनुरुप हे कमीजास्तही होत असतं. काही ठिकाणी वर्षानुवर्षं तुळशीची रोपं असल्याचंही पहायला मिळतं. तुळस जरी कुठल्याही मातीमधे रुजत असली तरी पाण्याचा चांगला निचरा होणारी अन भरपूर पोषणमुल्यं असणारी जमीन तिला मानवते. कुंडीत जर तुळस लावायची असेल तर त्यातील माती सेंद्रीय खतांनी पुरेशी युक्त असायला हवी. त्याबरोबरच पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होणारी हवी. जर आपल्या अंगणात तुळशीसाठी कायमस्वरुपी वृंदावन केलेलं असेल तर ते बांधतानाच जास्तीचं पाणी वाहून जाण्यासाठीची व्यवस्था केलेली असावी. त्यामधे माती भरताना कंपोस्ट, गांडूळखत किंवा शेणखत हे भरपूर प्रमाणात घालावं.

तुळशीला उन्ह जरी मानवत असलं तरी तिला उन्हाळ्यातलं तीव्र उन्ह सहन होत नाही. सहा ते आठ तासांचा सूर्यप्रकाश जरी आवश्यक असला तरी मध्यान्हीच्या तीव्र उन्हात रोपाची काळजी घ्यायलाच हवी. महिन्यातुन किमान एकदा तरी सेंद्रिय खत देणं हे गरजेचंच असतं. तुळस म्हणजे देवता, मग तिला शेणखत कसं चालेल किंवा कांद्याचं पाणी कसं चालेल वगैरे विचारांच्या फंदात न पडता रोपासाठी आवश्यक ती अन्नद्रव्यं देण्याचं काम करावं. केवळ पाण्यावर कुठलाही जीव फार काळ जगत नाही हे वैश्विक सत्य आहे हे मनात ठसवुन घ्यावं.

सर्वात महत्वाचं म्हणजे तुळशीकडं बागेतलीच एक वनस्पती याच नजरेनं पहाण्याची गरज आहे. म्हणजे तिची छान निगा राखता येईल. तिला आवश्यक ते खतपाणी देता येईल. वेळच्यावेळी तिची छाटणीही करता येईल. तुळशीला दिलेलं देवत्व हे तिच्या औषधी गुणधर्मांवरुनच आहे. त्यामुळं देवांना आंघोळ घालुन ते पुजेचं पाणी ज्यात हळद अन बाजारात मिळणारं केमिकलयुक्त कुंकु मिसळलेलं असतं ते घालू नये. असं पाणी कुठं टाकावं हे आपलं आपण ठरवावं पण ते तुळशीलाच नव्हे तर कुठल्याही झाडांना घालू नये.

बरेंचदा तुळस जगत नाही अशा तक्रारी येत असतात. तशी अवस्था टाळण्यासाठी पुढील उपाय करावेत;

* अती पाणी देणं टाळायला हवं. मातीचा वरचा इंचभराचा थर वाळल्याशिवाय पाणी देऊ नये.

* तुळशीला उन्ह जरी मानवत असलं तरी तीव्र उन्हात तुळशीला अर्धसावलीत ठेवणं वा हलवता येत नसेल तर वर कापडाचा मांडव घालणं हे आवश्यक आहे.

* तुळशीवरही कीड पडत असते. तेव्हा कीड घालवण्यासाठी पाण्याचा जोरदार फवारा, किंवा त्यात थोडा साबण वा किंचितसं मीठ घालून जोरदार फवारा केल्यावरही कीड जाते.

* तुळशीच्या रोपाच्या आजुबाजुला झेंडू, कांदा, लसूण लावल्यास देखील कीडीपासून संरक्षण करता येतं.

* तुळशीच्या वाळलेल्या फांद्या अन मंजिऱ्या यांची नियमित छाटणी करावी.

* तुळशीलाही खताची गरज असते. तेव्हा कंपोस्ट, शेणखत, गांडूळखत, जीवामृत वा वेस्ट डिकंपोजरचं पाणी वगैरे नियमितपणं देत रहावं.

* बागेतील इतर झाडांना जर कांद्याच्या सालींचं पाणी, नीमपेंड वगैरे देत असाल तर ते तुळशीलाही द्यायला हरकत नाही.

* तुळशीच्या रोपाची नियमित छाटणी करत राहिल्यास त्याला नवीन फुटवे येतात अन रोप सदाहरित रहाण्यास मदत होते.

* बिया नको असतील तर मंजिऱ्या पूर्ण वाळेपर्यंत न थांबता वरची दोन-चार फुलं फुलल्यावर लगेचच देठापर्यंत तोडावी. म्हणजे रोपामधलं अन्न मंजिऱ्यांचं पोषण करण्यासाठी न वापरता नवीन पानं तयार करण्यासाठी वापरलं जाईल.

* तुळस ही झुडुप प्रकारातील वनस्पती असल्यानं तिची योग्य छाटणी करत राहिल्यास ती व्यवस्थित बहरत रहाते,

एकदा तुळस हे बागेतील इतर रोपांप्रमाणंच एक, फक्त अधिकचे औषधी गुण असलेलं रोप असं मनात पक्कं केल्यावर त्याची निगा राखण्यात कुठलीही अडचण येत नाही. अन काही कारणानं रोप दगावलंच तर त्यातून कुठलाही गैरअर्थ किंवा नकारात्मक इशारा न समजता दुसरं रोप लावावं. तुळस बागेत एक औषधी वनस्पती म्हणून लावा. तिची पानं नियमित चहामधे घालून वा इतर कुठला काढा वगैरे करत असाल तर त्यात घालुन प्या. कारण तुळशीच्या पानात एक गुण आहे जो इतर कुठल्याही वनस्पतींच्या पानांत नाही. अन तो म्हणजे ज्या औषधासोबत वा काढ्यासोबत तुम्ही तुळशीच्या पानाचा काढा वा रस घ्याल तो काढा रक्तात लवकर मिसळण्यास मदत होते. अन हेच कारण आहे तुळशीची पानं काढ्यात घालण्याचं व नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचं पान ठेवण्याचं. तुळशीचं महत्व लोकांमधे पसरवण्यासाठीच तिला देवत्व दिलं गेलं आहे.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

बटाटा

बटाटा


बटाटा, आपल्या रोजच्या जेवणात, बहुतेक वेळा इतर कुठलीही भाजी नसल्यास वापरात येणारी भाजी. उपास असल्यास हमखास वापरली जाणारी कंदवर्गीय भाजी. याचे जेवणात बनवता येणारे असंख्य प्रकार आहेत हे आपण सारेच जाणता.

बटाटे घरच्या बागेत सहजपणे घेता येणारं पीक म्हणून ओळखलं जातं. बटाट्याचं पीक घरच्या बागेत घेणं फारसं अवघड मुळीच नाही. तसं पाहिलं तर जेवढी जागा जास्त तेवढं पीक जास्त असं असलं तरी गच्ची-बाल्कनीतही आपण आपल्या गरजेपुरतं पीक निश्चितच घेऊ शकता. मग ते कुंडीत असो वा ग्रो-बॅगमधे असो. अगदी गोणपाट असो वा उशांचे अभ्रे/खोळी असोत. कशातही आपण बटाट्याचं पीक घेऊ शकता.

बटाटे हे सहज येणारं व अत्यंत कमी खर्चातलं पीक आहे. ते कंदवर्गातील पीक असल्यामुळं मातीच्या ढिगाऱ्यात सर्वसाधारणपणं घेतलं जातं. या पद्धतीत बटाट्याचे कंद मातीत झाकले जातात व त्यामुळं जास्त पीक घेता येतं. अर्थात त्यासाठी जास्त जागेची आवश्यकता असते. त्यामुळं शहरात बाग असलेले तसंच गच्ची वा बाल्कनीत बाग असलेल्यांसाठी ही पद्धत अशक्य आहे. आणि मातीच्या ढिगाऱ्यातुन तयार झालेलं पीक काढणंही कठीण जातं. त्यामुळं ग्रो बॅग्ज किंवा पोती वगैरेंमधे बटाटे लावणं हे तुलनेनं सोपं पडतं. अगदी बटाटे लावण्यापासून ते तयार बटाटे काढण्यापर्यंत साऱ्याच टप्प्यांमधे कुठल्याही अडचणीविना आपण घरच्या घरी बटाटे घेऊ शकतो.

घरच्या, गच्चीवरच्या अथवा बाल्कनीमधल्या बागेत बटाटे कसे लावायचे हे आपण पाहुया.

⦁ कुंडी अथवा बॅगेची निवड : अनेक नर्सरीज वा ऑनलाईन विक्रेत्यांकडं खास बटाटे लागवडीसाठी वेगळ्या प्रकारच्या बॅग्ज उपलब्ध असल्या तरी तशा घेण्यापेक्षा गोणपाट, तीस वा पन्नास किलो धान्याची पोती, वीस लिटर्सच्या पाण्याच्या बाटल्या किंवा नेहमीच्या कुंड्या काहीही चालेल. उलट कुंडीपेक्षा फ्लेग्झिबल पोती वापरली तर अधिक उत्पन्न मिळू शकेल. कारण कुंड्यांपेक्षा पिशव्यांमधे बटाटे वाढण्यासाठी जास्त मोकळी जागा मिळते.

⦁ बटाट्याला रोज किमान पाच ते सहा तास थेट उन्हाची गरज असते. त्यामुळे ज्यात बटाटे लावणार आहात ते योग्य ठिकाणी ठेवा. बटाटे जसजसे वाढत जातील तसं उन्हाप्रमाणे ते पोतं अथवा कुंडी जे काही असेल ते हलवणं जमणार नाही. त्यामुळे योग्य ती जागा आधीच ठरवुन घ्या.

माती : आम्लीय (ऍसिडिक) माती बटाट्यांना जास्त मानवते. यासाठी मातीमधे कंपोस्ट बरोबरीनं घ्यावं. जर बटाटे लावण्यासाठी पोतं अथवा पिशवी घेणार असाल तर पिशवीचं टोक बाहेरच्या बाजूनं वळवत नेऊन अर्ध्याच्याही खाली न्यावं व खालच्या भागात साधारणपणे चार इंचांपर्यंत माती-कंपोस्टचं मिश्रण भरुन घ्यावं. हलकंसं पाणी मारुन ते ओलसर करुन घ्यावं.

⦁ बटाट्यांवर डोळे असतात. पावसाळ्यात व हिवाळ्यातही अशा डोळ्यांमधुन अंकुर फुटलेले आपल्याला दिसतात. उन्हाळ्यात असे डोळे असलेले बटाटे पाहून घ्यावे लागतात. ज्या बटाट्यांना जास्त अंकुर फुटलेले असतील ते आपण लागवडीसाठी निवडावे. पिशवीच्या अथवा कुंडीच्या आकारमानाप्रमाणे एक किंवा दोन बटाटे घेऊन ते मातीमधे ठेऊन किमान दोन इंच आत जातील इतपत हलकेच माती पसरावी व पाणी द्यावं. बट्याचे तुकडे करुनही आपण लावु शकतो. परंतु कधी सुरुवातीच्या काळात जर पाणी जास्त दिलं गेलं तर तुकडे सडण्याची शक्यता असते. म्हणून अख्खा बटाटा लावणं कधीही श्रेयस्कर. 

⦁ मातीतुन कोंब जसजसे वर येत जातील तसतशी त्याभोवती खतमिश्रीत माती टाकत जावी जेणेकरुन कोंब सरळ उभे रहातील. बटाट्याच्या रोपांचं खोड खूप नाजूक असल्यामुळं त्यांना आधार देण्याची गरज असते.

⦁ माती कमी पडुन कधी बटाटे मातीच्या वरच्या भागात डोकावले तर ते मातीनं त्वरित झाकून घ्यावे अन्यथा बटाट्याचा वर आलेला भाग हिरवा पडू शकतो.

⦁ बटाट्यांवर सहसा कीड पडत नाही. पण एक विशिष्ट प्रकारचा कीडा (कोलोरॅडो पोटॅटो बीटल) कधी त्रास देऊ शकतो. याची पिवळ्या रंगाची अंडी पानांच्या खाली असतात. ती कधी नजरेस पडली तर त्वरित काढून नष्ट करावीत.

⦁ वेळोवेळी माती घालत राहिल्यावर कुंडी किंवा बॅग भरली की नंतर फक्त अधून मधून पाणी देणं एवढंच करत रहावं. तीन ते चार महिन्यांत रोपांची पानं पिवळी पडू लागतील. क्वचित फुलंही येतील. रोपं मलूल पडून आडवी पडतील. अशा अवस्थेत आठवडा जाऊन दिल्यावर आपलं बटाट्याचं पीक काढणीसाठी तयार झालं आहे असं समजावं. या दरम्यान बटाट्याला पाणी देऊ नये.

⦁ ज्यामधे बटाटे लावले आहेत ती कुंडी अथवा बॅग सावलीमधे मोकळ्या जागी नेऊन उलटी करावी. मातीमधून तयार झालेले बटाटे हातानं बाहेर काढावेत. व वाळलेली रोपं कंपोस्टमधे टाकावी किंवा इतर कुंड्यांमधे मल्चिंग म्हणून घालावी. कुंडीतली माती पुनर्वापराकरिता घेण्याआधी आठवडाभर सावलीत पसरुन ठेवावी,

पेरणी ते काढणी हा तीन साडेतीन महिन्यांचा काळ व घरात लागणारी बटाट्यांची गरज या दोन्ही गोष्टी लक्षात घेता दर महिन्यात बटाटे लावत राहिल्यास घरात नेहमीच घरचे सेंद्रीय खतावरचे बटाटे उपलब्ध होत रहातील. पहिल्या दोन तीन वेळेस जरी बाहेरचे बाजारातुन आणलेले बटाटे पेरणीसाठी वापरले तरी नंतर मात्र घरचेच एक दोन बटाटे पुनर्लागवडीसाठी वापरता येतील.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

आलं लागवड

आलं लागवडआलं हे उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असलेलं कंदवर्गातील एक पीक. याच्या नियमित सेवनानं बरेचसे आजार दूर रहातात. चहात घालून अथवा याचा रस मध व लिंबाच्या रसात घालून पिण्यानं त्वचा नितळ तर होतेच पण वजनही आटोक्यात रहातं. असं हे बहुगुणी आलं आपण आपल्या घरच्या बागेत कुंडीतही घेऊ शकतो. अगदी बाल्कनीमधल्या छोट्याशा बागेतही.

आलं जर व्यावसायिक तत्वावर लावायचं झाल्यास एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात लावावं, अगदीच उशीर झाला तर दुसऱ्या पंधरवड्यात हरकत नाही. पण त्यापेक्षा उशीर करु नये. पण आपण इथं सारे शहरातले कुंडीकरी. तर आपण जर एक-दोन कुंड्यांतच लावणार असू तर ते वर्षभरात केव्हाही लावता येतं.

सर्वात आधी म्हणजे कुंडीची निवड. तर आलं हे जमिनीखाली साधारण सहा ते आठ इंचांवरच तयार होत असल्यामुळे फुटभर खोलीची कुंडी पुरेशी होते. आल्याचा पसारा आडवा जास्त पसरत असल्यामुळे कुंडी मोठ्या व्यासाची किंवा शक्यतो आयताकार घ्यावी. आंब्याची लाकडी पेटी घेतली तर उत्तमच. आल्याला अशा पेटीमधे वाढण्यासही भरपूर जागा मिळेल अन खेळत्या हवेमुळे त्याची वाढही चांगली होईल. मातीतच आलं जास्त वाढून पसरत असल्यामुळे सहाजिकच माती मोकळी असायला हवी. त्यामुळे मातीमधे पालापाचोळा, शेणखत/कंपोस्ट जास्त प्रमाणात घ्यावं. खाली विटांचे तुकडे, वर पाचोळा, त्यावर कंपोस्ट/शेणखत, त्यावर नीमपेंडचा पातळसा थर, वरुन थोडी माती व पुन्हा हे सगळं रिपीट करुन कुंडी तया करुन घ्यावी. जवळपास कडुनिंबाचं झाड असल्यास त्याचा पाचोळा सहज उपलब्ध होतो. असा पाला, हिरवा वा वाळलेला भरपूर प्रमाणात वापरल्यास खतही होईल अन कीडही लागणार नाही.

आपण नेहमी बाजारातुन जे आलं आणतो त्यापैकीच डोळे असलेले आल्याचे काही तुकडे आपल्याला लागवडीसाठी वापरायचे असतात. त्यामुळं बियाणं आणण्यासाठी आपल्याला वेगळं काहीच करावं लागत नाही. डोळे म्हणजे आल्याच्या पृष्ठभागावर जिथं रेषा असतील अन काहीसा भाग फुगीर असेल तो भाग. शेजारच्या फोटोमधे सर्कल करुन दाखवल्याप्रमाणे आल्याचा तेवढा कोंब असलेला भाग काढून घेऊन तो कुंडीत कुंडीच्या आकाराप्रमाणे पण कडेला दोन-तीन इंच भाग सोडून मातीमधे दोन अडीच इंच खोलवर पेरावा. पेरल्यावर माती ओलसर होईल इतपतच पाणी द्यावं. आपण आल्याचा कोंब असलेला भागच तोडून लावत असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या भागात आलं उघडं पडलेलं असतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जास्त पाण्यामुळं आलं सडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून माती ओलसर होण्यापुरतंच पाणी द्यावं. नंतरचं पाणीही अशाच पद्धतीनं द्यावं.

आल्याला फार उन लागत नाही. त्यामुळं दिवसभरात दोन अडीच तास उन मिळालं तरी पुष्कळ होतं. कुंडी शक्यतो सकाळपासून ते दुपारचे साडेअकरा-बारा पर्यंत उन मिळेल अशा ठिकाणीच ठेवल्यास उत्तम. आलं तयार होण्यासाठी साधारणपणे सहा ते सात महिने लागतात. अर्थात सुंठ वगैरे तयार करण्यासाठी जर आलं लावायचं असेल तर ते आठ दहा महिन्यांनी काढलं तरी चालतं. पण घरच्या वापरासाठी सहा सात महिन्यांनी काढावं. अन्यथा त्यात जास्त तंतु तयार होऊन रस कमी मिळतो.

पानं पिवळी पडायला सुरुवात झाली की आलं तयार होत आलं आहे असं समजावं. क्वचित कधी आल्याच्या काही प्रकारांमधे फुलही येतं. कळी स्वरुपात असलेलं फुल एखाद्या कणसासारखं दिसतं.घरीच वापरणार असाल तर दोन तीन दिवस पुरेल इतकंच आलं कुंडीतून काढून घ्यावं व उरलेलं मातीत तसंच राहू द्यावं. म्हणजे नवीन फुटवे येऊ लागतील. एप्रिलमधे आलं लावल्यावर सुरुवातीला ३-४ दिवसांतनं पाणी द्यावं. नंतर पावसाचं पाणी आल्याला पुरे होतं. एरवी माती कोरडी वाटली तरच पाणी द्यावं. दर पंधरा दिवसांनी कंपोस्ट व शेणखत आळीपाळीनं द्यावं व अधुन-मधुन नीमपेंड दिली तर इतर कुठल्याही खताची गरज पडत नाही. नीमपेंड असल्यामुळे रोगही पडत नाही.

पावसाळ्यांत सगळीकडेच असलेला त्रास म्हणजे पानं खाणाऱ्या अळ्या. पण त्यांच्यामुळे आल्याला कसल्याही प्रकारची इजा होत नाही. फक्त हुमणी वगैरे नाही ना हे अधून मधून बघत रहावं. अन्यथा एकदा लावून सहा महिने ढुंकुनही बघण्याची गरज नसलेलं हे पीक.

पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या काळात पृष्ठभागावरची जागा मोकळीच असते. त्यामुळे या काळात ज्याला शेतकरी आंतरपीक म्हणतात ते घेण्यास हरकत नाही. म्हणजे पालेभाज्या किंवा टोमॅटो, वांगी वगैरे. म्हणजे एकाच खतात अन पाण्यात दोन पीकं घेऊन जागा, खत, पाणी अन कष्ट या सगळ्यांची बचत होऊ शकते. त्यामुळं जागेची, खताची अन पाण्याचीही बचत होते. म्हणून घरात नेहमी लागणारं, कमी कष्टातलं आलं प्रत्येक बागकर्मीनं लावायलाच हवं.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

गुलाब - लागवड अन व्यवस्थापन

गुलाब - लागवड अन व्यवस्थापनजिथं जिथं बाग आहे तिथं गुलाबाचं किमान एक तरी रोप असतंच असतं. मग ते गावठी गुलाबाचं असो की कलमी. गुलाबी असो की पांढरं वा इतर कुठल्याही रंगाच्या फुलांचं. काही झाडं ही प्रत्येक बागेत असतातच. गुलाब हा त्यापैकीच एक. गुलाबाचं काटेरी झुडुपसदृश रोप कुंडीत अथवा जमिनीवर किंवा कशाच्याही आधारानं वर चढवलेली वेल अन त्यावर फुललेली फुलं पहाण्यास अत्यंत सुंदर दिसतात. फक्त याची देखभाल, खतपाणी, यावरचे रोग अन त्यावरचे उपाय हे सगळं अगदी काटेकोरपणं सांभाळावं लागतं. अन्यथा हे झाड गेलंच म्हणून समजा. त्यातुनही कलमी गुलाब असेल तर त्याचे सारे नखरे, सारी पथ्यं सांभाळावीच लागतात नाहीतर पदरी अपयश अन निराशा ठरलेली. या लेखात आपण गुलाबाची निवड ते त्याची पूर्ण देखभाल अन निगा कशी राखायची, त्यावर कोणकोणते रोग पडतात अन त्याचं निराकरण कसं कराय़चं यावर चर्चा करणार आहोत.

गुलाबाला पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सेंद्रीय खतानं समृद्ध अशी माती हवी. गुलाब कुंडीत लावा अथवा जमिनीवर, मातीमधे भरपूर सेंद्रीय खतं मिसळून घ्यावी. कुंडीत लावायचा झाल्यास कुंडी  किमान फूटभर तरी खोल असलेली घ्यावी. कुंडीत लावताना मातीमधे ४०% कंपोस्ट, २०%-२५% नदीमधली ज्वारी-बाजरीच्या आकारातली वाळू, २०% शेणखत, चमचाभर ट्रायकोडर्मा अन २०% माती, दोन चमचे बोनमील वा स्टेरामील, असल्यास चमचाभर एप्सम सॉल्ट अन मुठभर नीमपेंड एकत्र करुन घेऊन रोप लावण्यापूर्वी आठवडाभर सेट होऊ द्यावी. वाळू नसेल तर त्याऐवजी कोकोपीट अथवा लीफमोल्ड जास्त प्रमाणात वापरावं. गुलाबाला मुळाशी पाणी साठलेलं अजिबात चालत नाही. त्यामुळं पाण्याचा निचरा होईल याची कटाक्षानं काळजी घ्यावी. मातीचा सामू म्हणजे पीएच ५.५. ते ७ असा म्हणजे ऍसिडिक असल्यास गुलाब उत्तम फुलतो. माती ऍसिडिक करण्यास कंपोस्ट हा एक उत्तम सेंद्रिय पर्याय आहे. अन त्यासाठीच गुलाबाला सुरुवातीपासुनच भरपूर कंपोस्ट देत रहावं.

गावठी गुलाबाचं रोप जर काडीपासुन तयार करायचं असेल तर साधारण पेन्सिलीच्या आकाराची किमान वीतभर लांबीची काडी घेऊन खालचा भाग पंचेचाळीस अंशाच्या कोनात कापून त्याला मध किंवा दालचिनीची पावडर किंवा कोरफडीच्या गरात भिजवुन ती एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत कंपोस्टमिश्रित माती घेऊन त्यात हलकेच खुपसुन माती दाबून घ्यावी अन पाणी द्यावं. तीन ते चार आठवड्यात हे रोप जिथं लावायचं आहे तिथं लावण्यास तयार होईल.

नर्सरीतुन रोप घेताना ते साधारण एक वर्शः वयाचं असावं. कलम गाठीपासून वर किमान तीन तरी फांद्या फुटलेल्या असाव्यात. रोपावर जास्त फुलं असतील तर ती द्रवरुप रसायनांमुळंच असतील.  त्यामुळं असं रोप म्हणजे सकस रोप हा निकष लावु नये. छोट्या कुंडीत वा प्लास्टिकच्या पिशवीत असलेलं गुलाबाचं कलम जर नर्सरीतुन आणलं असेल तर ते तसंच आठवडाभर अर्धसावलीत ठेऊन द्यावं. अशा रोपावर नर्सरीत वापरत असलेली द्रवरुप रासायनिक खतं धुऊन जाण्यासाठी संपूर्ण रोपावर व मुळाशीही रोज पाणी द्यावं. फक्त पाणी रोपाच्या खोडापाशी साठून रहाणार नाही याची काळजी घ्यावी.

घरीच काडीपासुन रोप तयार केलं असेल किंवा नर्सरीतुन तयार रोप आणून आठवडा झाला असेल अन आता अशा
रोपाचं कायमस्वरुपी स्थलांतर करण्याची वेळ आली असेल तर आधी तीन चार दिवस कुंडी वर सांगितल्याप्रमाणं भरुन घेऊन ती सेट होऊ द्यावी. नंतर रोप कुठल्याही बुरशीनाशकात दहा मिनिटं बुडवुन घ्यावं. नर्सरीच्या पिशवीतुन रोप अलगद काढून शक्य तेवढी माती मुळाला धक्का न लागेल अशा पद्धतीनं हलकेच काढून घ्यावी अन मगच बुरशीनाशकाच्या पाण्यात बुडवावं.

त्यानंतर कुंडीमधे रोपाच्या मुळाच्या आकारापेक्षा मोठा खड्डा करुन घ्यावा. म्हणजे तेवढी माती बाहेर काढून घ्यावी किंवा कुंडीतच वरच्या बाजुनं कडेला सरकवुन घ्यावी. रोप खालच्या पानांपासून मातीकडच्या बाजूला चार-पाच इंच खोडाचा भाग मातीच्या वरच्या भागात राहील अशा बेतानं अलगद खड्ड्याच्या मध्यभागी ठेवुन त्याभोवती थोडं कंपोस्ट अन बाजुला काढून ठेवलेली माती हलक्या हातानं भरुन घ्यावी. खोडाभोवती खोड मध्यभागी राहील अशा पद्धतीनं कुंडीच्या कडांकडे उतरेल असा ढीग करुन तो हाताच्या पंजानं हलकासा दाब देऊन माती दाबून घ्यावी. जेणेकरुन रोप सरळ उभं राहील अन पाणी दिल्यावरही बाजुला कलणार नाही. आवश्यकता भासल्यास एखादी काठी रोवुन रोप सरळ उभं राहील असं पहावं. यानंतर कुंडीतील सर्व माती व्यवस्थित भिजेल इतपत पाणी द्यावं. जर कलम असेल तर कलमाचा सांधा मातीखाली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. या सांध्यापासून खालच्या भागातुन पुढं फांद्या फुटू शकतात ज्यांना सकर्स म्हणतात. अशा फांद्यांना फुलं तर येत नाहीतच, पण झाडाला आपण दिलेलं खत हेच खात असतात अन त्यामुळं जिथं फुलं येणार आहेत त्या कलमांची उपासमार होते अन ते रोगाला बळी पडतात अन सुकून जातात.

कुंडीत रोप लावल्यावर कुंडी किमान आठवडाभर अर्धसावलीत ठेवावी. दिवसाआड किंवा आवश्यकता भासल्यास रोज पाणी द्यावं. पाणी कुंडीच्या खालून वाहुन जाईल इतपत पाणी न देता कुंडीत ओलसरपणा राहील इतपतच पाणी द्यावं. या दरम्यान रोपाचं निरीक्षण करावं. पानांवरुन लक्षात येईल की रोपानं बदल स्वीकारला आहे अन जीव धरला आहे. नवीन पानं किंवा कोंब फुटताना दिसले तर रोप नवीन जागी रुजलं असं समजायला हरकत नाही. कुंडीत किमान दोन चार लसणीच्या पाकळ्या पेरल्यास संभाव्य कीडीपासून बचाव होण्यास मदत तर होतेच. पण स्वैपाकात वापरण्यासाठी लसणीची पातही मिळते. कुंडीच्या आकारमानाप्रमाणं वर्ष-दीड वर्षातुन रिपॉटींग करावं. त्यासाठीही अशीच कुंडी भरण्याची अन रोप त्यात लावण्याची पद्धत वापरावी. फक्त सेट झालेलं रोप कुंडीतुन काढताना अतीशय काळजीपूर्वक काढावं. मुळांना धक्का लागता कामा नये याची पुरेपूर काळजी घ्यावी. 

अजुन दोन तीन दिवस कुंडी तशीच ठेऊन मग जिथं किमान पाच सहा तास, शक्य असल्यास सकाळचं उन्ह मिळेल अशा ठिकाणी हलवावी. गुलाबाला थेट उन्ह चांगलं मानवतं. फक्त उन्हाळ्यात दुपारचं तीव्र उन्ह जर डोक्यावरच पडत असेल तर त्या दिवसांत काळजी घ्यावी. कुंडी वारंवार हलवण्यापेक्षा डोक्यावरच्या उन्हापासुन बचाव होईल अशी काहीतरी तात्पुरती व्यवस्था करावी. म्हणजे डोक्यावर पातळसर ओढणी वा तत्सम काही बांधुन छोटा मांडव करता आला तर करावा. गुलाबाच्या रोपांना हवा खेळती लागते. त्यामुळं आजुबाजूला दाटी होणार नाही याची काळजी घ्यावी. वेल गुलाब असेल तर तो चढवण्याची व्यवस्था करावी. गावठी गुलाब वेलीसारखा वर वाढतो. त्याची वाढ नियंत्रणात ठेवायची असेल तर वरची टोकं छाटायला हरकत नाही.

गुलाबाच्या रोपांची छाटणी करण्यासाठी योग्य काळ म्हणजे जुन महिन्याच्या शेवटी अन डिसेंबरच्या सुरुवातीला. जुन्या फांद्या अर्ध्यावर कापाव्यात. झाडाला छान झुडूपाचा शेप द्यावा. ज्या फांद्या वाळल्या असतील वा रोगग्रस्त असतील त्याही काढून टाकाव्यात. छाटणी नंतर कंपोस्ट किंवा शेणखत किंवा दोन्ही भरपूर देऊन पाणी द्यावं. सोबतीनं थोडी नीमपेंडही भुरभुरावी. छाटणी वर्षभरातुन एकदाच करावी. त्यापेक्षा जास्त वेळा केल्यास रोप कमकुवत होतं.

गुलाबाला पाणी आवश्यक असतं पण अती पाणी दिल्यास ओलसरपणा जास्त राहून रोपावर बुरशीजन्य रोग पडू शकतात. म्हणून मातीत ओलसरपणा राहील इतपतच पाणी द्यावं. उन्हाळ्यात दोन ते तीन दिवसांनी अन हिवाळ्यात सहा ते सात दिवसांनी पाणी दिलं तरी ते पुरेसं होतं. आपापल्या भागातील वातावरणानुसार पाण्याच्या पाळ्या अन प्रमाण बदलू शकतं. पाणी जास्त झाल्यास किंवा जास्तीच्या पाण्याचा निचरा होत नसल्यास गुलाबाची पानं पिवळी पडू लागतात. अशात रोपावर कळ्या असल्यास त्याही गळून पडतात किंवा फुलं विकृत स्वरुपात उमलतात. त्यामुळं पाण्याच्या योग्य प्रमाणाबरोबरच त्याचा योग्य निचरा होत आहे याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात सुक्या पालापाचोळ्याचं किंवा काडीकचऱ्याचं वा कुठल्याही डिकंपोज होणाऱ्या गोष्टीचं मल्चिंग केल्यास मातीत ओलसरपणा राखला जाईल. नारळाच्या शेंड्याही वापरल्या तरी हरकत नाही. शहाळी विकणाऱ्याकडून शहाळ्याचे तुकडे आणून ते बारीक करुन मातीच्या वरच्या भागात ठेवले तरी चालतील. फक्त यांना बुरशी लागण्याचा संभव जास्त असल्यानं त्यावर ट्रायकोडर्मा अथवा इतर कुठलंही बुरशीनाशक फवारावं. उन्हाळ्यात रोपाच्या पानांवर धूळ बसते. पाणी देताना पानांवरही थोडं फवारल्यास अशी धूळ निघून जाते अन रोपं टवटवीत दिसतात. फाक्त असं पाणी पानांवर थांबुन रहाणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.

गुलाबाला शक्यतो सेंद्रीय खतंच द्यावीत. कंपोस्ट, शेणखत भरपूर दिल्यास इतर कुठली खतं देण्याची गरज पडत नाही. चहाचा चोथा मातीत मिसळून दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्याबरोबरच केळ्यांच्या सालींचाही गुलाबाच्या वाढीसाठी अन फुलण्यासाठी चांगला उपयोग होतो. केळीच्या साली वाळवुन त्यांचा चुरा करुन मातीत मिसळल्यास वा साली पाण्यात एक दोन दिवस भिजवुन ते पाणी गुलाबाला दिल्यास त्यातले गुणधर्म रोपासाठी लवकर उपलब्ध होतात. परंतु खास गुलाबासाठी म्हणून चहाचा चोथा, केळीच्या साली अन कांद्याच्या साली यांचं कंपोस्ट बनवुन ते दिल्यास जास्त उपयोग होतो.

गुलाबाच्या रोपावर फुलं आल्यावर ती एक दोन दिवसांत तोडून घ्यावीत. तोडायची नसल्यास ती सुकू लागताच तोडावीत. जिथुन फुल फुललं आहे तिथपर्यंत कात्रीनं वा प्रुनरनं फुलं कापून घ्यावीत. हातानं तोडण्यासाठी झटापट केल्यास रोपाला धक्का बसु शकतो. म्हणून शक्यतो धारदार अन निर्जंतुक केलेली कात्री वापरावी. वाळलेली फुलं झाडावर तशीच ठेवु नये. मुळांवाटे घेतलेलं अन्न अशा फुलांनी घेऊन ते वाया जातं. त्यापेक्षा नवीन फुटीला अन नवीन कळ्यांना ते मिळाल्यास जास्त चांगलं.

गुलाबाचं रोप उन्हात असल्यामुळं जरी त्यावर फारसे रोग पडत नसले तरीही जे काही पडतात त्याकडं वेळीच लक्ष दिलं नाही तर रोप दगावण्याची शक्यता अधिक असते. गुलाबावर साधारणपणे खाली दिलेले रोग पडतात ;

पानांवर काळे ठिपके : पानांवर नेहमी पाणी मारण्यानं किंवा पावसाळ्यात पानांवर सतत पाणी पडल्यामुळं पानांवर काळे डाग पडतात. नंतर ही पानं पिवळी पडून गळतात. अशावेळी एखादं बुरशीनाशक वा कडूलिंबाच्या पाल्याचा अर्क किंवा नीमतेल डायल्यूट करुन पानांवर फवारावं. उन्हाळ्यात केलेलं मल्च डिकंपोज झालं नसेल तर ते काढून घेऊन कुंडी स्वच्छ ठेवावी. ते अर्धकच्चं मल्च इतर कुठल्या मोठ्या कुंडीत वा कंपोस्टबिनमधे टाकावं.

शेंडा वाळणे : हाही एक बुरशीचाच प्रकार आहे. बागेत अस्वच्छता असल्यावर अशी बुरशी वाढण्यास मदतच होत असते. जिथून फुलं काढली आहेत तिथुन किंवा छाटणी केली आहे तिथुन फांदी खालच्या बाजुनं वाळायला सुरुवात होते. ती पसरत खालच्या भागाकडे जात जात संपूर्ण झाड या रोगाला बळी पडतं. अशी वाळलेली फांदी नजरेस पडताच लगेचच खालच्या दोन ते तीन इंचांपर्यंतचा हिरवा भागही छाटून टाकावा. शेणखत असेल तर अशा कापलेल्या भागावर त्याचा ओलसर गोळा करुन तो लावावा. जवळ कुठलंही बुरशीनाशक उपलब्ध असेल तर तेही फवारावं. छाटणी करताना किंवा फुलं काढताना सरळ कापली किंवा हातानं खुडली की ही बुरशी वाढण्यास मदतच होते. म्हणून नेहमी छाटणी करताना अन फुलं तोडताना धारदार कात्री वापरावी, तसंच छेद आडवा न देता तिरका द्यावा. म्हणजे अशा कापलेल्या भागावर पाणी थांबणार नाही.

भुरी अथवा पावडरी माईल्ड्यू : रोपांच्या नवीन फुटीवर किंवा फुलं काढल्यावर अथवा छाटणी केल्यानंतर
येणाऱ्या नवीन फुटीवर सुरुवात होऊन हा पांढऱ्या पावडरीसारखा दिसणारा रोग सर्व रोपभर पसरतो. पानांच्या खालच्या बाजूला अशी पावडर व्यापलेली असते. कडुलिंबाच्या पानांचा अर्क किंवा नीमतेल डायल्यूट करुन ते पानांवर फवारावं. हा रोग लक्षात आल्यावर लगेचच त्यावर उपाय करावेत. खराब झालेली पानं काढून टाकून दूरवर फेकून द्यावीत वा इतर कुठल्याही प्रकारे नष्ट करावीत. कंपोस्टमधे वा इतरांच्या बागेत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

मावा : रोपाच्या कोवळ्या व नवीन फांद्यांवर, न उमललेल्या नवीन कळ्यांवर पांढरे वा क्वचित हिरवे छोट्या पाखरांसारखे किडे दिसतात. हे किडे कोवळ्या पानांवर वा फांद्यांमधे छिद्रं पाडून आतला रस शोषून घेतात. परिणामी रोप निस्तेज दिसु लागते. कळी उमलल्यावर फुल रोगट दिसतं. असे किडे दिसुन येताच पाण्याचा फवारा वेगात मारल्यावर ते उडून जातात. कीड जर कमी असेल तर असं करायला हरकत नाही. पण कीड जास्त असेल किंवा वेगात पाणी मारुनही वारंवार येत असेल तर कडुलिंबाच्या पानांचा अर्क किंवा नीमतेल साध्या पाण्यात मिसळून फवारावं. याऐवजी लिक्विड डिश सोप एक लिटर पाण्यात एक चमचाभर मिसळून फवारल्यासही उपयोग होतो.


खवले कीड : रोपाच्या खोडावर व फांद्यांवर अगदी खोडाशी एकजीव झाल्यासारखी ही कीड असते. छोटे छोटे तपकीरी रंगाचे फुगेसदृश काहीतरी खोडावर दिसुन येतं. वरवर पहाता सुरुवातीला झाडाला काही अपाय झाल्याचं दिसुन येत नाही. पण ही कीड झाडातील रस अन अन्नद्रव्यं शोषून घेते अन झाड हळुहळू निस्तेज होत मरणपंथाला लागतं. शक्य असेल तेवढ्या फांद्या छाटून नष्ट कराव्यात. खोडावरची कीड जुन्या टूथब्रशनं अथवा चाकू-सुरीनं खरवडून काढावी. त्या भागावर लगेचच कडुलिंबाच्या पानांचा अर्क वा नीमतेल पाण्यात डायल्यूट करुन फवारावं. या किडीचा संपूर्ण नायनाट होईपर्यंत व्यवस्थित लक्ष देऊन सारे उपाय करावेत.

कुठल्याही रोगासाठी जी स्थिती जबाबदार असते ती म्हणजे पाण्याचा योग्य तो निचरा न होणं, अस्वच्छता अन खतपाण्याची वेळ न पाळणं. ही पथ्यं जर पाळली तर गुलाबावरच नव्हे तर बागेतल्या कुठल्याही रोपांवर रोग पडणार नाहीत. पाणी साचलं की मुळांचा जीव गुदमरतो अन त्यांना अन्न तयार करता येत नाही अन केलेलं अन्न वर शेंड्यापर्यंत पोहोचत नाही. खत वेळच्यावेळी दिलं नाही तरीही अन्नाचा तुटवडा निर्माण होतो. दोन्हीही स्थितींमधे रोपाचा आहार पूर्ण न मिळाल्यानं रोप कमकुवत होतं अन रोगाला बळी पडतं. म्हणून बाग नेहमीच स्वच्छ ठेवावी. पाण्याचा उत्तम निचरा होण्यासाठी कुंडीतील माती नियमितपणं हलक्या हातानं, मुळांना धक्का न पोहोचवता वरखाली करुन घ्यावी अन खतं नियमितपणं अगदी काटेकोरपणं वेळच्यावेळी द्यावी. गुलाब जर जमिनीवर लावले असतील तर त्यासाठी केलेली आळी पावसाळ्यात मोडावीत म्हणजे जास्तीचं पाणी साचणार नाही.

कलमी गुलाबाचं रोप संपूर्ण काळजी घेतली अन खतपाण्याचं पथ्य न चुकता व्यवस्थित पाळलं, रोग पडणार नाहीत याची दक्षता घेतली अन पडलेच रोग तर वेळीच उपाययोजना केली तर साधारणतः आठ ते दहा वर्षं व्यवस्थित टिकतं. गावठी गुलाब मात्र कणखर असल्यानं जास्त टिकतात.


फुलांचे फोटो घरच्या बागेतले तर किडींचे फोटो इंटरनेटवरुन साभार.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

परागीभवन

परागीभवनबागकर्मींना खासकरुन नवीन बागकर्मींना नेहमी एक प्रश्न पडत असतो की फळभाज्यांच्या रोपांवर फुलं येतात अन गळून जातात. काकडी, कारली, दुधी, डांगर वा लाल भोपळा, शिराळी वा दोडकी, घोसाळी वगैरे धरत नाही अन धरलंच तर बोटभर होऊन काळं पडून गळून पडतं.

यामागं प्रामुख्यानं एकच कारण असतं अन ते म्हणजे पॉलिनेशन, अर्थात परागीकरण वा परागीभवन. फुलांमधे परागीकरण झालं नाही तर फळधारणा होत नाही. ज्या वेलींवर नर अन मादी अशी दोन वेगवेगळी फुलं येतात त्यांमधे जी मादी फुलं असतात त्यांच्या मागल्या बाजूस छोटी फळं असतात अन नर फुलांच्या मागल्या म्हणजे देठाकडच्या बाजूला काहीही नसतं. परागीभवन म्हणजे नर फुलांतले पूंकेसर मादी फुलांतल्या स्त्रीकेसरांवर पडावे लागतात. हे काम वाऱ्यानंही होतं किंवा मधमाशी, भुंगे, फुलपाखरं वगैरेंद्वारे होत असतं. जर असं परागीकरण झालं नाही तर मादी फुलाच्या मागल्या बाजूला असलेली छोटी बाल्यावस्थेतली फळं गळून पडतात.

मिरची, टोमॅटो, वांगी वगैरे रोपांवर एकाच प्रकारची फुलं असतात. या फुलांना द्विलिंगी फुलं म्हणतात. अशा फुलांमधे आतल्या बाजूला स्त्रीकेसर असतात तर बाहेरच्या भागात पूंकेसर गोल करुन उभे असतात. या दोघांचं मिलन वाऱ्याच्या हलक्याशा झुळुकीनं होत असतं. किंवा फुलपाखरं वगैरेंद्वारेही होत असतं. (वांग्याच्या फुलांची परागीभवनाअभावी होणारी फुलगळ या माझ्या लेखात ही माहिती विस्तृतपणं दिली आहे. त्याची लिंक इथं देत आहे https://vaanaspatya.blogspot.com/2021/06/blog-post_44.html. ) जे वांग्याच्या बाबतीत तेच इतरही एकेरी पण द्विलिंगी फुलं असलेल्या रोपांबाबतीत आहे.

प्रत्येक फुलाचं आयुष्य फारच मर्यादित असतं. दोन ते तीन दिवस फार फार तर. याच काळात परागीकरण झालं तरच पुढचं सगळं सुरळीत घडून येतं. अन नाहीच झालं तर फुल आपलं आयुष्य आपलं विहित कार्य न करताच संपवुन टाकतं.

हे परागीकरण होण्याचे दोन ठोस उपाय. एक म्हणजे आपण हातानं परागीकरण करावं. छोटा पेंटब्रश घेऊन अथवा बोटाच्या हलक्याशा स्पर्शानं आधी नर अन मग मादी फुलाला मध्यभागी स्पर्श करुन असं परागीकरण घडवून आणायचं. पण यासाठी हवा तो अभ्यास अन योग्य वेळ.

दुसरा यापेक्षा जास्त महत्वाचा, नैसर्गिक अन खात्रीशीर उपाय म्हणजे जैवविविधतेत ढवळाढवळ न करता जे काही होत आहे ते होऊ देणं.

पण आपल्याला तर आपल्या बागेत आपल्याशिवाय इतर कुठलाही प्राणी आलेला चालत नाही. दिसला किडा की मार, कर काहीतरी फवारणी, काढ फोटो अन टाक पोस्ट एखाद्या बागकामाशी संबंधित समूहावर, मग लोक बसलेले असतातच हातात स्प्रे बॉटल्स घेऊन. लगेच सगळे "जाणकार" सांगतात तंबाखूचं पाणी अन इतर केमिकल्स फवारायला. अन आपल्या झाडावरची कीड आपलं झाडच नव्हे तर गच्चीवरचं कॉंक्रीटही खाईल या भितीनं या जाणकारांचे अनुयायी फवारणी करुन किड्यांना अन अळ्यांना यमसदनी देतात पाठवुन अन पुढच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी स्वतः जाणकाराच्या भूमिकेत शिरुन सज्ज होऊन बसतात.

मान्य की झाडावरची प्रत्येक अळी अन किडा हा परागीकरण करत नाही. पण तसंही परागीकरण करणारे पक्षी म्हणा अथवा फुलपाखरं म्हणा, ते परागीकरण कराय़चंच असं ठरवून फुलांवर बसत नाहीत. ती त्यांच्याकडून नकळत घडणारी एक क्रिया असते. त्यांच्या मध खाण्याच्या अथवा इतर कुठलं खाद्य भक्षण करताना घडलेली पण सृष्टीच्या फायद्याचीच.

तसंही जशी आपल्यात प्रतिकारशक्ती असते जी साध्या सर्दी पडशावर मात करु शकते, कुठल्याही औषधाशिवाय. तशीच प्रतिकारशक्ती झाडांतही असते. तीही हलक्या प्रमाणातले रोग केवळ सहनच करु शकतात असं नाही तर त्यावर मातही करु शकतात. पण आपण आपल्या झाडांवर ती वेळच येऊ देत नाही. जसं आपण आपल्या बाळाला बिसलेरीचं पाणी अन शुद्ध सकस असं (आपल्या मते) पॅकबंद खाणं देऊन त्याला खरं तर दुबळं करत असतो तसंच आपण आपल्या झाडांच्याही बाबतीत करत असतो.

नैसर्गिक दृष्ट्या कुजवण्याऐवजी आपण मिक्सरमधून ओला कचरा बारीक करुन गांडूळांना अन विविध जीवाणूंना खायला देतो, पालापाचोळा अन काडीकचरा श्रेडरमधून बारीक करुन कंपोस्ट बनवायला ठेवतो. हाही प्रकार निसर्गाच्या विरुद्धच आहे. पण आपण हे सगळं झटपटच्या नादात करत रहातो. मोठ्या फांद्या डिकंपोज होण्यासाठी निसर्गानंही उपाय केलेच आहेत की. वाळवी आहे, विविध बुरशा आहेत. ते तरी काय़ करत असतात? मोठे ओंडके फोडून त्याची मातीच तर करत असतात. पण आपण पडलो दयाळू अन सर्व आजच हवं असा अट्टाहास करुन बसलेले.

असो. विषय मोठा आहे. सध्या फक्त एवढंच की परागीकरण योग्य रितीनं होऊ द्या. म्हणजे फळभाज्या मुबलक प्रमाणात मिळतील. बागेत येणाऱ्या पाखरांना मज्जाव करु नका. येत नसतील तर ती येण्यासाठी विविध उपाय करा. बागेत केवळ भाजीपाला घेण्याऐवजी फुलपाखरांना आकर्षित करुन घेणारी फुलझाडंही लावा. वर्षभर प्रत्येक ऋतुमधे वेगवेगळी फुलं फुलत असतात. अशी झाडं बागेत लावा. ती एकाच जागी ठेवण्याऐवजी बागभर पसरुन ठेवा. म्ह्णजे फुलपाखरांचा संपुर्ण बागेत संचर राहील. मधमाशा आल्या तर स्वतःला नशीबवान माना. त्यांच्यासारखं परागीभवन करणारा निसर्गात दुसरा कुणीच नाही.

झालंच तर बागेत विविध पक्षी येण्यासाठी त्यांना खाऊ म्हणून ज्वारी, बाजरी वगैरेंचे चार पाच दाणे पेरा. ज्वारी-बाजरीची कणसं साधारण तीन साडेतीन महिन्यांत धरतात. ते कोवळे दाणे खाण्यासाठी चिमण्या वगैरे बागेत येतील. ज्वारी-बाजरीबरोबरच चवीत बदल म्हणून कुठल्या रोपांवर कीड असेल तर तीही ते गट्टम करतील. म्हणजे किडीसाठी वेगळा उपाय करण्याचीही गरज पडणार नाही. पक्षांना पिण्यासाठी थोडं पाणीही ठेवलंत तर उत्तम.

जर अशी निसर्गातली जैवविविधता तुमच्या बागेत नांदू लागली तर परागीभवन वगैरे गोष्टी आपोआप होतील अन बाग फळा-फुलांनी बहरलेली असेल.

फोटो इंटरनेटवरुन साभार.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

वांग्याची फुलगळ

वांग्याची फुलगळवांग्यांचे विविध प्रकार आहेत. छोटी वांगी, मोठी, भरीत करण्याची वांगी, लांब वांगी वगैरे. तसंच यात रंगही बरेच आहेत. प्रत्येक प्रकारच्या वांग्यांचा आहारात वापरही वेगवेगळा आहे. तसं हे पीक फार काटक. तीव्र उन्हाचे दिवस तसंच तीव्र थंडीचे दिवस सोडता इतर दिवसांत याची फार काळजी घेण्याची गरज नसते. अर्थात उन्हाच्या दिवसांतही सकाळ संध्याकाळ पाणी दिल्यास रोपं छान तग धरतात. थंडीत रोपांची वाढ संथ असते. त्यामुळं योग्य ते खतपाणी देत राहिल्यास कडक थंडीचे दिवस सरल्यावर वांग्याला पुन्हा बहर येतो.

एकदा वांगी काढून झाल्यावर इतर पिकांप्रमाणं ही रोपं काढून टाकण्याची गरज नसते. खोलवर छाटणी करुन खतपाणी दिल्यावर पुन्हा नवीन फूट येऊन वांगी मिळू शकतात. फक्त नंतरचे बहर पहिल्या बहराएवढे नसल्यामुळं व्यापारी तत्वावर वा मोठ्या प्रमाणात शेती करणारे सहसा नवीन रोपं लावतात. वांग्यांची लागवड ही रोपं तयार करुन ती ट्रान्स्प्लांट करुन केली जाते. वांग्याच्या रोपांवर येणारी फुलं ही द्विलिंगी असतात. म्हणजे या रोपांवर नर फुलं अन मादी फुलं असं वेगळं नसुन एकाच फुलांत दोन्ही केसर, पुंकेसर अन स्त्रीकेसर असतात. त्यामुळं वाऱ्याच्या मदतीनं किंवा फुलपाखरं, मधमाशी वगैरेंच्या मदतीनं परागीभवन होतं. कधी परागीभवन न झाल्यास हातानंही करता येतं.

कधी कधी रोपांवर भरपूर प्रमाणात असलेली फुलं गळून पडू लागतात. खतपाणी वगैरे आपण सगळं काही वेळेवर करुनही फुलं पूर्ण फुलुन गळून पडतात. तसं फुलं गळून पडणं हे कॉमनच असतं. कारण रोपाचा जीव लक्षात घेता सर्व फुलांचं रुपांतर फळांमधे झालं तर रोपाला ते सहनही होणार नाही. पण हीच फुलगळ जर जास्त प्रमाणात होत असेल तर मात्र आपण काळजी घ्यायला हवी. या लेखात आपण फुलगळ होण्याची कारणं अन त्यावरचे उपाय हे पहाणार आहोत.

पाण्याची कमतरता : वांग्याच्या रोपांची तहान अन भूकही जास्त असते. त्यामुळं त्यांना वेळच्यावेळी खतं अन पाणी देणं आवश्यक असतं. जमिनीत वा मोठ्या कुंडीत जर वांग्याची रोपं असतील तर त्यांची मुळं फूट - दीड फूट खोलवर गेलेली असतात. कुंडी लहान असेल तर मुळं कुंडीच्या तळापर्यंतही जातात. मुळाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेल किंवा तिथवरची माती ओली होईल एवढं पाणी या पिकाला देणं आवश्यक असतं. याबरोबरीनंच खोडाशेजारी मातीवरच्या भागात किमान ३ ते ४ इंचांचं मल्चिंग केल्यास मातीमधे ओलावा टिकून रहाण्यास मदत होते. तेव्हा वांग्यांच्या रोपांजवळील माती ही नेहमीच ओलसर (मॉईस्ट) राहील याची खबरदारी घेणं गरजेचं असतं. अती किंवा सतत पाणी देण्यापेक्षा मल्चिंगचा फायदा निश्चितच जास्त होतो. त्यामुळं पाल्यापाचोळ्याचा वा अन्य कसलाही जाडसर थर मल्चिंग म्हणून द्यावा. अर्थात त्यामुळं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळं नियमितपणं नीमपेंड मल्चिंगमधे टाकणंही तितकंच आवश्यक असतं.

परागीभवन न होणं : वर सांगितल्याप्रमाणं वांग्याचं पीक हे सेल्फपोलिनेटिंग प्रकारात मोडतं. म्हणजेच पोलिनेशन, अर्थात परागीभवनासाठी हे मधमाशी वा अन्य कुठल्याही कीटक वा पक्षांवर अवलंबुन रहात नाही. सामान्यतः वाऱ्याच्या मदतीनं परागीभवन होत असतं. परंतु वहाता वारा नसेल किंवा हवेत उष्मा जास्त असेल तेव्हा हे परागीभवन होत नाही. कधीकधी हवेतील आर्द्रतेमुळं फुलांतील परागकण ओलसर वा चिकट होत असल्यानंही ते फुलांतील स्त्रीकेसरांपर्यंत पोहोचु शकत नाहीत. अनुभवांवर आधारित जर हवामानाचा अभ्यास किंवा एक दोन फुलं गळल्यावर जर आपापल्या बागेतील परागीभवन न होण्याकरिता जबाबदार असलेली कारणं शोधल्यास आपण योग्य तो उपाय करु शकतो. त्यामुळं परागीभवनाकरिता वाऱ्यावर अवलंबून न रहाता आपणच हातानं परागीभवन करावं.

कृत्रिम परागीभवन करण्याचे पर्याय : यासाठी आपण आधी वांग्याच्या फुलाची रचना पाहूया. फुलाला सर्वात बाहेरच्या भागात किमान ५ पाकळ्या असतात. वांग्याच्या जातीनुसार या पाकळ्यांचा रंग असतो. पर्पल, पांढरा किंवा गुलाबी रंग साधारणतः आपल्याकडे दिसतात. फुलांचा आकारही लहान मोठा असतो. म्हणजे छोट्या वांग्यांची फुलं लहान असतात तर भरीत वगैरे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वांग्यांची फुलं आकारानं मोठी असतात. वांग्याच्या रोपांवर फुलं उमलली की ती साधारणतः तीन दिवस दिवसाच्या वेळी पूर्ण उमललेल्या अवस्थेत असतात व रात्री पाकळ्या मिटुन घेतलेल्या असतात. या तीन दिवसांत परागीभवन झालं नाही तर पुढचे काही दिवस ती अर्धवट उमलल्या अवस्थेत रहातात. याही दिवसांत काही कारणानं परागीभवन झालं नाही तर अशी फुलं सुकुन जाऊन गळून जातात.

पाकळ्यांनंतर असतात ते पिवळ्या रंगाचे पुंकेसर. संख्येनं जातीनुसार ५ ते १० असतात. त्याच्या आतल्या भागात पुंकेसरांना चिकटुन किमान ६ परागकोष असतात. त्याच्या आतल्या बाजुला असतात स्त्रीकेसर. अन या स्त्रीकेसरांच्या गराड्यात असतो स्टिग्मा, जो असतो एक नाजुकसा दांडा. फुलाच्या अगदी मध्यभागी. या दांड्याच्या मुळाशी असतात ओव्हरीज.

नैसर्गिकरित्या जेव्हा परागीभवन होत असतं तेव्हा परागकोषांतील परागकण या स्टिग्मावर चिकटतात अन ओव्हरीजमधे असलेल्या बीजांडांशी एकरूप झाल्यावर फळ तयार होतं. पण ही क्रिया जर नैसर्गिकरीत्या झाली नाही तर आपल्याला ती कृत्रिमरीत्या करावी लागते. यासाठी फुलावर हलक्या हातानं मारलेली टिचकीही कधी पुरेशी ठरते. पण तरीही जर परागीभवन होत नसेल तर छोटासा रंगाचा ब्रश घेऊन तो परागकोषांवर हलकेच फिरवुन मधल्या स्टिग्मावर अथवा त्या संपूर्ण दांड्यावर फिरवावा.

बरेंचदा फुलं एवढी छोटी असतात की ब्रश वा बोट नक्की लावायचं कुठं अन फिरवायचं कुठं असा प्रश्न पडतो. अशा वेळी फुलाचा पाकळ्यांनंतरचा भाग अंगठा व शेजारील दोन बोटांचा चंबू करुन त्यात घेऊन हलक्या हातानं दाबावा. त्यानंही परागीभवन होऊ शकतं. हे करण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी, जेव्हा तापमान कमी असतं अन हवेत ओलावा असतो.

नैसर्गिकरीत्या परागीभवन होण्यासाठी वांग्यांच्या रोपांचे वाफे वा कुंडीत लावली असल्यास कुंड्या अशा जागी ठेवाव्यात की जिथं वारा भरपूर प्रमाणात मिळू शकेल. वाफा वा कुंड्या उंच ठिकाणी ठेवल्यास असा प्रश्न येत नाही. तसंच वांग्यांभोवती जवळच मोठी व दाट पानं असलेली रोपं वा झाडं लावू नयेत. जमल्यास दोन ओळींमधे फुलझाडं लावल्यास अशी वेळच येणार नाही.

अयोग्य तापमान : वांग्याच्या पीकाला जास्त तापमान मानवतं. पण तापमान जर खाली आलं किंवा थंडीच्या दिवसांत वांग्याच्या रोपांची वाढ संथ गतीनं होत असते. सहाजिकच या दिवसांत फुलगळ जास्त प्रमाणात होत असते.

खतांची कमतरता : वांग्याच्या रोपांच्या सुदृढ अन निकोप वाढीसाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्यं अन खतं जर कमी प्रमाणात दिली गेली की एक तर फुलं धरत नाही किंवा धरलीच तर ती जास्त प्रमाणात गळतात. यासाठी नायट्रोजन व फॉस्फरस आवश्यक त्या प्रमाणात पुरवणं गरजेचं ठरतं. रोपाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी प्रोटीन्स नायट्रोजन पुरवतो तर फॉस्फरसमुळं फुलं अन फळं जोमदार होण्यास मदत होते.

अतीउष्णता : तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांतही वांग्यांची फुलगळ होते. जर उन्हाचा तडाखा असह्य झाला तर रोपांची वाढही मंदावते अन दिवसा पानं कोमेजल्यासारखी दिसतात. या काळात रोपाच्या दृष्टीनं आपला जीव वाचवणं हे पहिलं प्राधान्य असल्यामुळं त्यावर एक तर फुलं धरत नाही वा धरली असल्यास लवकर वाळतात अन गळून जातात. यासाठी अशा दिवसांत कुंड्या थेट उन्हाचा तडाखा बसणार नाही अशा ठिकाणी ठेवाव्यात किंवा हलवणं शक्य नसल्यास रोपांवर मध्यान्ही सावली येईल अशा बेतानं मांडव घालावा.

वांग्यांप्रमाणेच मिरची, टोमॅटो वगैरे पिकांमधेही होणाऱ्या फुलगळीसाठी हीच कारणं प्रामुख्यानं जबाबदार आहेत. त्यामुळं योग्य त्या प्रमाणात खतं, अन्नद्रव्यं, पाणी अन पिकाच्या गरजेप्रमाणं उन्ह व तापमान हे सगळं व्यवस्थित राखल्यास फुलगळ न होता आपल्याला भरपूर प्रमाणात पीक घेता येईल. तेव्हा आपापल्या भागातील हवामान, तापमान याचा अभ्यास करुन अन कंपोस्ट, शेणखत अन गांडूळखत हे आलटून पालटून दर दहा ते पंधरा दिवसांच्या अंतरानं देत गेल्यास अन पावसाचे दिवस वगळता एरवी रोपांभोवतीची माती ओलसर राखण्याइतपत पाणी देत राहिल्यास फळं भरपूरही येतील अन ती सकस व सुदृढही असतील.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

एप्सम सॉल्ट - ऑर्गॅनिक की इनॉर्गॅनिक

एप्सम सॉल्ट - ऑर्गॅनिक की इनॉर्गॅनिक

सध्या सगळीकडंच एप्सम सॉल्टचं वारं आहे. बाग फुलवण्याच्या अन भरपूर फळांनी लगडलेली पहाण्याच्या नादात एप्सम सॉल्टचा वापर सर्रास करायला सांगितला जात आहे. त्याच्या जोडीनं एप्सम सॉल्ट कसं नैसर्गिक आहे हे सांगण्यासाठी इंग्लंडमधे एप्सम नावाचं शहर असुन तिथल्या खाणीतील दगडांचा चुरा म्हणजेच एप्सम सॉल्ट असं छातीठोकपणं सांगितलं जातं. यात अजिबात तथ्य नाही असं नाही. परंतु ते नैसर्गिक स्वरुपातलं एप्सम सॉल्ट सतराव्या शतकात, म्हणजे १६१८-१६२० च्या आसपास सापडलं अन १७०० च्या सुरुवातीला त्या विहिरी कोरड्याही झाल्या. त्यानंतर जे काही जगभरात एप्सम सॉल्ट मिळत आहे ते प्रयोगशाळेत बनलेलं.

एप्सम सॉल्टची म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेटची रासायनिक संज्ञा आहे MgSO4. अर्थात ते आहे एक संयुग. मॅग्नेशियम हा धातू मॅग्नेशियम क्लोराईडचं विद्युतविघटन करुन ते समुद्राच्या पाण्याचा वापर करुन प्रोसेस करुन अन इतर प्रक्रिया करुन प्राप्त केला जातो. आपल्या बागकामाशी संबंधित नसलेल्या या गोष्टी असल्यानं थोडक्यात सांगायचं झाल्यास या मॅग्नेशियमचे असंख्य उपयोग आहेत अन ते प्रत्यक्षात आणायचे झाल्यास मोठी क्रांती होईल. हा धातू ऍल्युमिनियमपेक्षा वजनाला कितीतरी हलका असल्यानं ऑटोमोबाईल, तसंच एव्हिएशन इंडस्ट्रीला सर्वात जास्त फायदा होणार आहे. या मॅग्नेशियमच्या जगातील एकूण उत्पादनापैकी ८०% ते ८५% मॅग्नेशियम हे चीनमधे बनवलं जातं उरलेल्या १५% मधे रशिया, ब्राझिल, तुर्कस्तान, ऑस्ट्रिया वगैरे देशांत बनतं.

तर हे आपलं एप्सम सॉल्ट नांवाचं संयुग म्हणजे मॅग्नेशियम हायड्रोऑक्साईड, सल्फर डायॉक्साईड आणि हवा यांपासून बनलेलं चूर्ण (हे बनवण्याचा एक छोटा व्हिडिओ यु ट्युबवर उपलब्ध आहे. त्याची लिंक इथं देत आहे. अवश्य पहा. ( https://www.youtube.com/watch?v=YILHeMIkhSU ))

याचे बरेच उपयोग आहेत. आपल्या सामान्य जीवनातली उदाहरणं घेतलीत तर आंघोळीच्या पाण्यात चमचाभार एप्सम सॉल्ट घातलं तर अंगदुखी वा सांधेदुखीसारख्या तक्रारींपासून आराम मिळतो. सिमेंट अन रासायनिक खतं, कापडं रंगवणं वगैरे इंडस्ट्रीजमधे ते आपल्या पाणी शोषून घेण्याच्या गुणामुळं ड्राईंग एजंट म्हणून काम करतं तर औषध इंडस्ट्रीमधे रेचक म्हणून काम करतं.

मॅग्नेशियमची रोपाच्या वाढीमधली भूमिका वादातीतच आहे यात शंकाच नाही. झाडांच्या पानांमधील हरितद्रव्यांसाठी मॅग्नेशियम हा एक महत्वाचा घटक आहे. पानं जेवढी जास्त हिरवी तेवढी प्रकाशसंश्लेशणक्रिया वेगानं होण्यास मदत होते. मॅग्नेशियमचं संयुग प्रकाशउर्जेला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यापासून झाडाला पोषक अन्नद्रव्यं बनवण्यासाठी मदत करतं.

त्यामुळं हे मॅग्नेशियम सल्फेट अर्थात एप्सम सॉल्ट दोन-तीन महिन्यांतुन झाडांसाठी थोडं वापरणं चांगलं आहे. फक्त त्याचा अतिरेक होऊ देऊ नये. याच्या अतीवापरामुळं किंवा ओव्हरडोसमुळं माती निकस बनु शकते. टोमॅटोवरचा ब्लॉसम एंड रॉट वगैरेंसारखे रोग, पोटॅशियमची कमतरता वा झाड मरणं यासारखे प्रश्न उद्भवु शकतात. म्हणून एक तर वापर टाळावा. किंवा गरजेचंच असल्यास कमीत कमी वापर ठेवावा.

पण एक मात्र खरं की एप्सम सॉल्ट हे सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक आहे असा जो प्रचार सुरु आहे ते काही खरं नाही. सध्या जे बाजारात एप्सम सॉल्ट उपलब्ध आहे ते रासायनिकच आहे. तेव्हा आपल्या बागेत वापरताना ही गोष्ट लक्षात असावी. ज्यांना आपल्या बागेसाठी फक्त आणि फक्त सेंद्रिय गोष्टीच वापरायच्या आहेत त्यांनी अशा खोट्या प्रचाराला बळी पडू नये. अन वाटलंच एप्सम सॉल्ट वापरावंसं, तर मी केवळ सेंद्रियच खतं वापरतो असं म्हणणं सोडून द्यावं. म्हणजे ’मी फक्त रविवारीच मांसाहारी आहे, एरवी पूर्ण शाकाहारीच.’ किंवा ’मी फक्त अंडंच खातो. बाकी शाकाहारीच.’ असं म्हणून लंगडं समर्थन करण्यासारखं. त्यापेक्षा सरळ सांगावं. निवड तुमची आहे. कारण बगियाही तुमचीच अन जीवनही तुमचंच आहे.

टीप : शास्त्रीय माहितीसाठी माहितीच्या आंतरजालावरील काही संकेतस्थळांची मदत घेतली आहे.

फोटो इंटरनेटवरुन साभार.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

नैसर्गिक स्त्रोतांचा सुयोग्य वापर

नैसर्गिक स्त्रोतांचा अल्प नव्हे सुयोग्य वापरपरवा एक आर्टिकल वाचलं. पाण्याचा अतिवापर कसा टाळता येईल यावरचं होतं. प्रत्येक गोष्ट, त्यातही नैसर्गिक स्त्रोत सजगपणं तोलून मापून वापरायच्या पद्धतीवरुन अन त्याचा खोलवर विचार करुन त्यावर सोल्युशन शोधून ती अंमलात आणण्यावरुन आर्टिकल अर्थातच युरोप-अमेरिकेतलं असणार हे उघडच आहे. आपल्यापैकीही बऱ्याचजणांनी ते वाचलं असेल. कारण ते लाईक केलेली काही नांवं ओळखीची दिसली. तर यामधे पाण्याचा वापर कमी करण्यासाठी चर्चिलेल्या अनेक उपायांपैकी काही उपाय मला भावले. अन विशेष म्हणजे ते अनुकरणीयही आहेत.

पहिला म्हणजे स्थानिक वाणाच्या बियांचा अन झाडांचा वापर करणं. यामधे कसं असतं, आपापल्या भागातील बियांना अन झाडांना आपल्या वातावरणाशी जुळवुन घेण्याची सवय त्यांच्या जीन्समधेच असते. त्यामुळं स्थानिक बिया न रुजण्याचं प्रमाणही अगदीच नगण्य असतं तेच रोपं अन फांद्यांपासून वृद्धी करण्याबाबत. अशा फांद्या नैसर्गिक अन वातावरणातील बदलांना तोंड देऊन जीव धरतात अन फुललात-फळतातही. स्थानिक वातावरणातील नैसर्गिक स्त्रोत म्हणजे पाणी, हवामानातील बदल हे रक्तातच म्हणजे त्यांच्या गुणसूत्रातच असल्यामुळं ते सहन करण्याची ताकदही अर्थातच त्यांच्यात असते.

दुसरा म्हणजे त्या त्या सीझनप्रमाणं फळं अन फुलं यांची लागवड करणं. आजकाल जग छोटं झाल्यामुळं अन व्यापारी दृष्टीकोनातुन आपण आपल्याकडं न होणारी फळंही लावतो अन अशा फळांत किती अन कसे पौष्टिक गुणधर्म आहेत वगैरे लेखही सोशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळं वाचायला मिळतात अन मग आपणही बहुसंख्येनं त्याला बळी पडतो. अवोकॅडो, किवी ही काही उदाहरणं. पण या फळांना लागणारं पाण्याचं प्रमाण, त्यांच्या निकोप वाढीसाठी लगणारं हवामान आपल्याकडं नसल्यानं आपण त्याची भरपाई भरपूर खतपाणी करुन करतो. त्यांच्या वाढीचा सिझनही आपण पहात नाही.

वास्तविक पहाता साधारणपणं कुठलीही बी पेरल्यावर, सुरुवातीची काळजी घेतल्यावर रुजतेच. रुजल्यावर त्याचं रोप वाढू लागतं अन तशा आपल्या अपेक्षाही वाढत जातात. मग सुरु होते त्या रोपाला वाढवण्याची अन त्यावर फळं धरायला लावण्याची धडपड. त्यासाठी गुगल, यु ट्युब, बागकामाला वाहून घेतलेले विविध समूह अन आपल्यासारखे ब्लॉग्ज असतातच. एवढ्या सगळ्या पर्यायात प्रॅक्टिकल सल्ले हे नकारात्मक सल्ल्यांत गणले जातात अन मग "माझ्या मावशीच्या शेजाऱ्यांच्या नणंदेच्या माहेरी अस्संच झाड होतं, कित्ती फळं लगडलेली म्हणून सांगू! फोटोमधे फक्त फळंच दिसत होती, एकही पान म्हणून दिसत नव्हतं, अगदी औषधालाही." असा एखादा सल्ला वा अभिप्राय आपल्या आशा अंकुरित करतो अन मग आपण त्या रोपाच्या खनपटीस बसतो. 

निसर्गनियमाप्रमाणं झाड फळायच्या वयात आल्यावर थोडीशी फळं देतंही. पण त्याचा आकार छोटा रहातो. अंगभूत गुणांमुळं चव, रंग अन रुप मात्र तेच रहात असल्यामुळं फाळांची संख्या अन आकार यासाठी आपण सरसकट खतांची कमतरता हेच कारण समजतो अन अधिक मात्रेत खतं देतो. खतांची मात्रा जेवढी अधिक तेवढंच पाण्याचंही प्रमाण अधिक. घरच्या बागेत घेतलेल्या नेहमीच्या भाज्यांचं कॉस्टिंग जिथं आपण काढत नाही तिथं या अशा फळांचं कुठनं काढणार? युरोप-अमेरिकेत पिकणारी फळं आपण महाराष्ट्रातल्या आपल्या गॅलरीतल्या अठरा-वीस इंची कुंडीत घेतल्याच्या कौतुकात आपण आकंठ बुडलेलो असल्यानं आल्या खर्चाचं गणित आपल्या डोक्यातही येत नाही. पण त्यासाठी जेवढं पाणी लागलं तेवढ्या पाण्यात स्थानिक वाणाची किती तरी फळं त्यांच्या मूळ आकारात अन तेही चव व रंग-रुपासह घेता आली असती हे आपण विसरतो.

तिसरं म्हणजे, पाण्याचा सुयोग्य वापर होण्यासाठी सेंद्रीय पद्धतीवर भर द्यायला हवा. रासायनिक खताची कास निदान आपण आपल्यापुरताच भाजीपाला पिकवणाऱ्या कुंडीकऱ्यांनी तरी सोडायला हवी. या ना त्या स्वरुपात अन "थोडं तरी रासायनिक खत द्यावंच लागतं हो, तुम्ही काहीही म्हणा, पण त्याशिवाय गत्यंतर नाही" असं स्वतःचंच लंगडं समर्थन करत आपल्यापैकी बरेचजण रासायनिक खतं वापरतात. मग ते एनपीके असो की डीएपी. चमचाभर असो की चिमूटभर. झाडांना ती घेण्यासाठी अतिरिक्त पाणी द्यावंच लागतं. पण अजुनही आपण "वरलिया रंगा"च भुलत असल्यामुळं अशा खतांचा वापर करण्यासोबत आपण त्याचा कळत-नकळत प्रसार अन प्रचारही करत असतो.

हे सगळं एका दिवसांत किंवा एकट्यानं करुन थांबणार नाही हे मलाही माहीत आहे. पण सुरुवात करायला काय हरकत आहे? झालंच तर कुंड्यांना योग्य प्रमाणात पाणी देण्याबरोबरच अधिकचं वाहून जाणारं पाणी तसंच वाहून जाऊन वाया घालवण्याऐवजी ते अडवुन त्याची साठवणूक करुन पाण्याच्या पुढच्या पाळीला आपण तेच वापरु शकतो. कल्पना पुष्कळ आहेत. आपापल्या सोयीनुसार, कुवतीनुसार अन बजेटनुसार त्यांचा वापर करायला हवा. तरच आपलं बागेसाठीचं बजेट कोलमडणार नाही. आता जर आपण आपल्या बाल्कनीत अन गच्चीत भाजीपाला यशस्वीरीत्या घेत असाल तर बागकामाचा पहिला टप्पा आपण यशस्वीपणे पार पाडला आहे असं समजायला हरकत नाही. आता गरज आहे पुढच्या वर्गात जायची. त्यादृष्टीनं केवळ विचार न करता कृतीही करायला हवी. अन तीही लगेचच. कारण पाऊस सरासरीपेक्षा कितीही जास्त झाला अन पावसाळा कितीही लांबला तरी फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच पाण्याचं रेशनिंग सुरु होत असतं. त्यामागची कारणं कितीही राजकीय असली तरी वस्तुस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आपल्यांत नाही, अन असलं तरी त्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे आपणच पाण्याचा वापर योग्य तो ठेवण्याची गरज आहे. आत्ता सुरुवात कराल तर सवय लागेपर्यंत पाण्याचं रेशनिंगची वेळ येईल.

बघा, विचार करा. शेवटी बागही तुमचीच अन खर्चही तुमचाच.

फोटो इंटरनेटवरुन साभार.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...