बागेतील मश्रूम्स (अळंबी) काय़ दर्शवितात

बागेतील मश्रूम्स (अळंबी) काय़ दर्शवितात


कुंडीतील अथवा जमिनीतील बागेमधे पावसाळ्यात ठिकठिकाणी मश्रूम्स उगवलेले दिसतात. साधारणपणं पाऊस सुरु होऊन महिना झाल्यावर म्हणजे माती पूर्णपणं ओली झाल्यावर अचानक आपली नजर कुंड्यांमधे वा जमिनीवर, झाडांच्या आळ्यांमधे उगवलेल्या विविध रंगांच्या अन आकारांच्या अळंब्यांकडे जाते. कधी त्या बॉलपेनाच्या रिफीलच्या आकाराच्या दांड्यांवर रुपयाच्या नाण्याएवढ्या आकाराच्या काळपट पांढऱ्या असतील किंवा कधी तपकिरी रंगाच्या तर कधी पावासारख्या फुगलेल्या अन मध्यभागी एक दीड इंची व्यासाचा दांडा असलेल्या पिवळट रंगाच्या असतील. कधी पाच सहा इंचांच्या असतील तर कधी बोटभर वा त्याहुनही कमी उंचीच्या असतील. पाऊस कमी झाल्यावर या आपोआप निघुनही जातात किंवा जास्त पाऊस पडल्यास जागीच कुजुन जात मातीत मिसळुनही जात असतात. पण तरीही, आपण न पेरता किंवा काहीही न करता या अळंब्या किंवा मश्रूम्स बागेत येतात कुठून? काय कारण असतं? किंवा यांचा बागेसाठी उपयोग असतो की बागेला वा झाडाला यांच्यापासून अपाय होतो का? पाहूया आपण पुढं.

अळंबी हा बुरशीचाच एक प्रकार आहे. जमिनीवर पडलेल्या फांद्या, वाळलेली पानं, काटक्या, ज्या ज्या काही कुजणाऱ्या गोष्टी आहेत, डिकंपोज होणाऱे घटक आहेत त्यांचं विघटन करण्यासाठी निसर्गात जे काही घटक आहेत त्यांपैकीच बुरशी हाही एक घटक आहे. कुंडीत अथवा जमिनीवरील बागेमधील झाडांच्या बुंध्याशी आपण उन्हाळ्यात जेव्हा मल्चिंगसाठी पालापाचोळा, लाकडाच्या ढलप्या, वाळलेला काडीकचरा घालत असतो तसंच आपण बागेत जर वाफे केले असतील अन या वाफ्यांमधेही भरपूर पालापाचोळा व वाळलेल्या फांद्यांचे तुकडे वगैरे घातलं असेल तर हे सगळं कुजताना बुरशी तयार होऊन ती या सगळ्यातले मोठे भाग कुजवण्याच्या कामाला लागते. चार दोन पाऊस झाल्यावर सगळीकडे ओलावा निर्माण झाल्यावर ही बुरशीही वाढीला लागते.

वाढीदरम्यान या बुरशीची टोकं ओल्या झालेल्या मातीबाहेर येऊन डोकावतात. जसं एखाद्या झाडाला फळं लागतात तशीच ही बुरशीची फळं असं म्हणता येईल. कारण जमिनीच्या पृष्ठभागावर आलेल्या या अळंब्या तोडल्या तरी आत, वरच्या थराच्या खाली असलेल्या बुरशीला काहीही अपाय होत नाही. ती तिचं काम करतच असते. या अळंब्यांच्याद्वारे ती आपल्या बिया ज्या सामान्य नजरेला दिसतही नाहीत त्या पसरवत असते अन त्याद्वारे आपला प्रसारही करत असते. अशा बिया अशाच कुठल्यातरी जागी जाऊन रुजतात जिथं ओलावाही आहे अन त्यांना खाण्यासाठी पुरेसं अन्नही आहे.

बागेतील एखाद्या ठिकाणी आपण ना वाफा केलेला असतो ना कुठला विघटनशील पदार्थ तिथं पडलेला असतो. तरीही अशा ठिकाणी आपल्याला अळंब्या दिसून येतात. पण अशा ठिकाणी जर खणून पाहिलं तर एखाद्या तोडलेल्या झाडाचा बुंधा किंवा मोठी मृत मुळं सापडतील. ती कुजुन मातीमधेच मिसळणार असतात. पण त्य़ासाठी त्यांचं विघटन होणं गरजेचं असतं अन तेच काम तिथं तयार झालेली बुरशी करत असते अन अशाच बुरशीचं फळं मातीतुन जागा मिळताच वरच्या भागात येऊन आपल्याला अळंबीच्या स्वरुपात दिसते. बागेतील मातीमधे अशी बुरशी तिला जोपर्यंत खाद्य मिळत राहील तोपर्यंत वर्षानुवर्षं असते. योग्य ओलावा अन वातावरण मिळाल्यावर तिचा फळस्वरुप कोंब बाहेर येऊन आपल्याला अळंबीच्या रुपात दिसतो.

बागेमधे अळंब्या असणं हे माती चांगली असण्याचंच लक्षण असतं. मातीमधे भरपूर सेंद्रीय द्रव्यं असुन त्यामधे रोपांना अन झाडांना सहज घेता येण्यासारखी पुष्कळ अन्नद्रव्यं उपस्थित आहेत हेच अळंब्यांच्या असण्यानं सिद्ध होत असतं. ज्याप्रमाणं मातीमधे गांडूळं असणं हे एक माती उत्तम प्रतीची असण्याचं लक्षण आहे त्याप्रमाणंच अळंबी असणं म्हणजेही मातीची प्रत उत्तम असल्याचं द्योतक आहे.

जर कुंड्यांमधे अथवा जमिनीवरच्या झाडांच्या आळ्यांमधे अळंब्या उगवल्या असतील तर त्यापासुन तुमच्या झाडाला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. उलट त्यांच्या असण्यामुळं झाडांना पोषक तत्वं अन अन्नद्रव्यं सहजी उपलब्ध होतील. त्यामुळं अशा अळंब्या काढण्याचा चुकुनही विचार करु नका. अन जर काढायच्याच असतील तर एक तर त्या जागेवरच दाबुन मातीमधे मिसळून द्या किंवा काढून कंपोस्टबिनमधे टाका. त्यांच्यामुळं कंपोस्टींगची प्रक्रिया जलद होण्यास मदतच होईल. अर्थात मातीवर दिसणारी अळंबी काढली म्हणजे मातीखालची बुरशी जात नसते. ती तशीच तिथं राहुन आपलं काम करत रहाते. अर्थात अळंब्या काढल्या तर त्यांच्याद्वारे होणारा प्रसार थांबुन नवीन ठिकाणी बुरशी तयार होणार नाही अन तिथं कालांतरानं अळंबीही उगवणार नाही. पण शक्यतो असं करु नये. वर सांगितल्याप्रमाणं अळंब्या बागेत असणं हे बागेसाठी फायद्याचंच आहे.

त्यापेक्षा उत्तम उपाय म्हणजे बागेत पाणी साचू न देणं. माती जास्त ओलसर राहिली तरच अळंब्या उगवत असतात. त्यामुळं जिथं अळंबी आहे तिथं पाणी जास्त आहे हे नक्की. त्यामुळं अशा जागी पाणी साचत असेल तर ते का अन निचरा होत नसेल तर काही उपाय करायची गरज आहे का ते पहावं.

प्रत्येक अळंबी किंवा मश्रूम हा खाण्याजोगाच असतो असं नाही. बुरशीचे काही प्रकार विषारीही असतात. त्यामुळं जर तुमच्याकडं लहान मुलं असतील किंवा ज्यात त्यात नाक खुपसणारी कुत्री वा इतर पाळीव प्राणी असतील तर त्यांना अशा अळंब्यांपर्यंत पोहोचू देऊ नका. ते ऐकत नसतील तर मात्र अळंब्या काढणं हाच एकमेव उपाय आहे. खाण्यासाठी लावण्यात येणाऱ्या अळंब्या वेगळ्या असतात. हवं असल्यास त्यांच्या लगवडीविषयी माहिती काढून त्या योग्य जागी लावाव्यात. पण पावसाळ्यात वा अतीओलसरपणामुळं आपोआप आलेल्या अळंब्या कुठल्याही परिस्थितीत खाऊ नये.

पपई वगैरेसारख्या ज्या झाडांमधे रूटरॉटचा म्हणजे मुळं कुजण्याचा धोका असतो त्या झाडांच्या मुळाशी वा आळ्यात जर अळंब्या असतील तर अशा ठिकाणची माती खुरप्यानं काळजीपूर्वक खुरपुन मोकळी करुन घ्यावी. ओलसरपणा जास्त असेल तर कोरडी माती वा तत्सम काही लगेच टाकावं जेणेकरुन अधिकचा ओलसरपणा निघुन जाईल.

एकंदरीत पहाता बागेत मश्रूम्स असणं हे आपली माती सुपीक असल्याचंच लक्षण आहे. त्यामुळं मश्रूम्स काढून न टाकता त्यांना तसंच राहु दिलं तरी काही बिघडत नाही. फक्त अतीओलसरपणामुळं आपल्या मुख्य झाडाला काही त्रास होणार नाही ना याची काळजी घ्या.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

बागेतील तण - अनावश्यक की आवश्यक

बागेतील तण - अनावश्यक की आवश्यक


या पावसाळी दिवसांत बागेत, कुंडीत अनावश्यक गवत / तण वाढतं. ज्या बिया आपण पेरल्या नाहीत किंवा कुठलंही कटींग आणून लावलं नसेल तर जे काही उगवुन आलंय ते तण असं समजायला हरकत नाही. अर्थात, काही हव्या त्या अन उपयोगी झाडांच्या बिया वाऱ्यानं उडून येऊन किंवा खताबरोबर वा पक्षांद्वारे कुंडीत अथवा बागेत नक्कीच रुजु शकतात. अशी रोपं ओळखून हवी असल्यास त्यांचं अन्यत्र अन योग्य जागी स्थानांतरण करावं किंवा जे योग्य असेल ते करावं. पण तण मात्र काढून टाकणं कधीही श्रेयस्कर ठरतं. अन्यथा आपण आपल्या रोपाला वा झाडाला जे खत घालतो ते हे तण गट्टम़् करुन टाकतं अन आपलं झाड खुरटतं. असं होऊ नये, आपण दिलेला खाऊ आपल्याच बाळानं खावा असं वाटत असेल तर असं तण उपटण्याचीच गरज असते.

पावसाळी तण ओळखण्याचा माझा अनुभवातुन आलेला मार्ग म्हणजे जे गवत सहजासहजी उपटलं जातं ते अनावश्यक तण. अर्थात हा काही रामबाण मार्ग नाही. हा झाला एक ठोकताळा. आता अनुभवातुन नुसतं पाहूनच मी सांगू शकतो कुठलं गवत कामाचं आहे अन कुठलं अनावश्यक ते. पण निदान मी रहातो त्या भागात तरी दोन प्रकारचं तण, एक गवताचा प्रकार आहे अन एक छोट्या म्हणजे पूर्ण वाढल्यावर गुडघ्याएवढं होणारं रोपटं आहे ज्याची मुळं मातीत घट्ट रोवली गेलेली असतात. हे दोन प्रकार मात्र काळजीपूर्वक काढावे लागतात. कारण ओलसरपणामुळं बरेंचदा जमिनीच्या लेव्हलवर ते तुटुन हातात येतं अन मुळं तशीच राहुन जातात. त्यानंतर पावसाळा लांबला वा नंतर एक दोन सरी जरी आल्या तरी ते पुन्हा फुटतं अन दरम्यानच्या काळात मुळं खोलवर जात असल्यामुळं मुळापासून काढण्यासाठी आजुबाजुला थोडं खणावं लागतं.

तण उपटताना घ्यायची काळजी म्हणजे ते मुळासकट उपटावं. आपल्या मुख्य झाडाला धक्का लागणार नाही याची काळजी घेत गवत मुळासकट काढावं. वाटल्यास छोटं खुरपं अथवा काहीही टोकदार हत्यार ते घेऊन मुळासकट काढावं. बरेंचदा काही प्रकारच्या गवताची मुळं गुच्छानं वाढतात. असं गवत उपटताना बरीचशी माती सोबत घेऊन वर येतं. कुंडीत आधीच माती वा पॉटिंग मिक्स कमी असतं. जे काही असतं ते पावसानं खाली बसलेलं असतं. त्यात हे गवत वर येताना जर माती वर आणत असेल तर मुख्य झाडाला धक्का नक्कीच बसतो. त्यामुळं पूर्ण काळजी घेतच गवत काढावं. मुख्य झाडाच्या बुंध्याभोवती हाताचा पंजा दाबून धरत ते हलणार नाही अन वर येणार नाही याची काळजी घेतच गवत उपटुन काढावं. एरवीही कुंडीमधे कुठलंही गवत वा तण नजरेस पडताच उपटुन तुकडे करुन जागेवरच गाडावं. म्हणजे मातीत मिसळून द्यावं. ते तिथंच कुजुन मुख्य झाडाला नत्राचा पुरवठा करेल.

पाऊस सुरु असताना, थोडी उघडीप मिळाल्यावर खासकरुन जमिनीवरील बागेमधील तण काढणं सोपं जातं. माती ओली असते. तण काढण्यास फार उशीर करु नये. तण फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच, म्हणजे त्यानं फुलं धरुन बिया तयार होण्यापूर्वीच काढलं तर पुन्हा उगवण्यासाठी बिया रहात नाहीत.

काढलेलं गवत तुकडे करुन कंपोस्टमधे अथवा गांडूळखतासाठी जे काही टब, माठ, कुंडी वगैरे वापरत असाल त्यामधे किंवा बागेत जागा असेल तर खड्डा खणून त्यामधे वा बागेतच ढीग करुन किंवा सर्व झाडांत अन कुंड्यांमधे टाकून त्यावर माती पसरुन द्यावी. अशा हिरवळीच्या खतातुन आपल्या झाडांना चांगलं खाद्य मिळू शकतं. अशा खताचे फायदे खालीलप्रमाणे;

 • हे खत मातीत नत्र वाढवतं.
 • जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवतं.
 • मातीची पाणी व अन्नद्रव्यं धरून ठेवण्याची क्षमता वाढवतं.
 • मातीत फायदेशीर सूक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवतं
 • सर्वात महत्वाचं म्हणजे हे खत आपल्याला फुकटात उपलब्ध असतं.

बरेच जण आपल्या बागेत, शेतात तणनाशक फवारतात. पण त्यामुळं नुकसानच जास्त होत असतं. कधी आपण पेरलेल्या बियाच या औषधाची शिकार होत असतात किंवा मातीच्या तेवढ्या भागाची रुजवण्याची क्षमताच कमी वा नाहीशी होते. त्यापेक्षा उगवलेलं तण ते कोवळं असतानाच काढलं तर ते सोपंही पडतं अन त्यापासून सुंदर, नैसर्गिक अन आपण लावलेल्या रोपांना वा पिकाला लगेचच उपलब्ध होणारं खतही मिळतं.

बागेत तण उगवणं ही आपली माती सुपीक असल्याची एक प्रकारे पावतीच असते. पण तरीही बागेत तण येऊ नये म्हणून काही नैसर्गिक उपायही आहेत.

 • बाग जर केवळ कुंडीमधलीच असेल तर नियमितपणे माती खुरपणीच्या सहाय्यानं खुरपत रहाणं, म्हणजेच खालीवर करत रहाणं. हे करत असताना अर्थातच झाडांच्या मुळांना धक्का लागु न देण्याची काळजी घ्यावी.
 • नेहमीच कुंडीत मल्चिंगचा वापर केल्यास तण उगवण्यास जागाच रहाणार नाही.
 • कुंड्यांमधे मुख्य झाडाच्या मुळापाशी पालक, कोथिंबीर वा तत्सम पालेभाज्या घेत राहिल्यास उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करता येतो. यामधे एकाच खतपाण्यात आपल्याला दोन पिकंही मिळतात अन तणांना रुजण्यासही जागा मिळत नाही.
 • जमिनीवरची बाग असेल तर झाडांच्या आळ्यांमधेही मुळांना धक्का पोहोचू न देता माती नियमितपणं खालीवर करत रहाणं हा उपाय आहे.
 • अशा बागेतही मल्चिंग फायद्याचं ठरतं.
 • मोठ्या झाडांच्या आळ्यातही पालेभाज्या लावल्यास भाज्याही मिळत रहातील अन तण उगवणंही नियंत्रणात ठेवता येईल.
 • बागेमधील मोकळी जागा नियमित खराट्यानं/बुताऱ्यानं व्यवस्थित झाडत राहिलं अन त्या जागेवर सततचा वावर राहिला तर कालांतरानं अशा जागेवर तण उगवत नाही. बाग साफ ठेवण्याच्या अनंत फायद्यांपैकी हाही एक फायदा असल्यानं बाग नेहमीच साफसूफ अन स्वच्छ ठेवावी.

तण उगवणं हे नक्कीच मातीची सुपीकता दर्शवतं. आपली माती जिवंत आहे अन अशा मातीमधे पेरलेल्या वा पेरल्या गेलेल्या बिया त्यात रुजतात हेच तणांद्वारे ती दर्शवत असते. त्यामुळं तणांकडं सकारात्मक दृष्टीनं पहावं. पण अर्थातच ते आपण लावलेल्या झाडांच्या मुळावर उठू नये याचीही दक्षता घेणं गरजेचं असतं. तणानं त्याच्या वाढीच्या काळात मातीमधुन घेतलेली अन्नद्रव्यं ते काढून जागेवरच गाडल्यास मुख्य झाडाला ते अनायसेच उपलब्ध होत असल्यामुळं तणांचे फायदेच पुष्कळ आहेत. फक्त त्याकडं वेळच्या वेळी पहाणं अन योग्य ती कारवाई करणं गरजेचं असतं.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

बियांची साठवण - भाग २

बियांची साठवण - भाग २

आपण आपल्या बागेत भाज्यांचं पीक घेतो, (आता भाषा बदलायला हवी. भाज्या लावतोऐवजी पीक घेतो म्हटल्यावर नैतिक जबाबदारी वाढते अन कामात अधिक गांभीर्यही येतं. ) तर त्या पिकांचं आयुष्य असतं तीन ते चार महिन्यांचं. वांगी, मिरची वगैरे काही पिकं सोडल्यास इतर फळभाज्या अन पालेभाज्या यांची पुढील लागवड करण्यासाठी बियांची गरज असते. गरज यांच्याही बियांची असते. फक्त दर सीझननंतर भरीव छाटणी केल्यास नवीन फूटींवरही पुढच्या सीझनला भाज्या मिळतात. फक्त पहिल्या खेपेपेक्षा संख्या अन क्वचित आकार कमी पडतो. असं साधारण तीन ते चार सीझन चालतं. नर्सरी वा बियाणांच्या दुकानातुन मिळणाऱ्या बिया या जर हायब्रीड असतील तर दर वेळच्या लागवडीसाठी आपल्याला बिया विकत आणाव्या लागतात. पण जर आपण देशी बियाणं वापरत असू तर पुढील लागवडीसाठी लागणाऱ्या बिया आपल्या आपणच तयार करुन त्या साठवु शकतो. असं केल्यानं वेळ आणि पैसा तर वाचतोच पण आपल्याला खात्रीशीर बियाणं उपलब्ध होतं.

साधारणतः, आपापल्या विभागातील जमीन, हवामान, पाऊसमान याचा विचार भाज्याच नव्हे तर कुठलंही पीक घेत असताना केला जात असतो. हे अगदी पुर्वापार चालत आलेलं आहे अन त्यामागं अभ्यास आहे, अनुभव आहे. निसर्गतः कुठलीही बी, तिला आवश्यक तो ओलावा, तापमान अन उर्जा मिळाल्यावर ती रुजतेच. परंतु तिची पुढील वाढ, त्या बीपासुन आलेलं झाड फुलणं, फळणं यासाठी माती, हवामान, सुर्यप्रकाश अन त्यामधली तीव्रता या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात अन त्या आपण पुरवू शकत नाही. अन्यथा बर्फाळ प्रदेशातही नारळाची झाडं दिसु शकली असती. श्रम अन पैसा वाचवण्यासाठी स्थानिक वाणाची अन पीक प्रकाराची निवड केली जाते.

आपण जेव्हा पहिल्यांदाच कुठल्या बिया वापरणार असू तर त्यासाठी देशी वा हेअरलूम प्रकारातील बिया निवडल्या अन त्या दर सीझननंतर आपण साठवत जाऊन पुढील लागवडीसाठी त्याच वापरल्या तर आपल्या येथील हवामानास तोंड देण्यास अशा बिया पिढी दर पिढी सक्षम होत जातात. बियांच्या साठवणीमागं हाही एक मुद्दा महत्वाचा असतो.

साठवणीसाठी अन पुढील लागवडीसाठी बिया धरण्यासाठी योग्य रोपाची निवड, रोपावरील फळ काढण्याचा योग्य कालावधी आणि बियांवर प्रक्रिया करुन त्यांची योग्य पद्धतीनं साठवण या प्रमुख गोष्टींकडं लक्ष द्यायची गरज असते. हे सारं अतिशय सोपं काम आहे. फक्त त्याची योग्य ती पद्धत जाणून घेणं गरजेचं आहे अन तीच आपण पाहूया.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर हायब्रीड बिया लावल्या असतील तर अशा झाडांपासून मिळणाऱ्या बिया या पुनर्लागवडीसाठी उपयोगी पडत नाहीत.

ज्या रोपांमधे वा भाज्यांच्या प्रकारांमधे सेल्फ पोलिनेशन आणि ओपन पोलिनेशन होत असतं अशीच रोपं बियांच्या साठवणीकरता निवडवीत.

बागेत जर हायब्रीड आणि देशी किंवा ओपन पोलिनेटेड बिया या दोन्ही प्रकारांतील बिया पेरल्या असतील तर बियांच्या पुढील साठवणूकीसाठी देशी प्रकारातील सुदृढ अन निरोगी झाडांची निवड करुन ती वेगळी ठेवावीत. वाऱ्यामुळं वा एकमेकांजवळ ठेवल्यामुळं क्रॉस पोलिनेशन होण्याची शक्यता असते अन येणारी पुढील पिढी कशी येईल हे सांगता येत नसतं म्हणून ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं.

बियांच्या साठवणूकीसाठी निवडलेल्या रोपांवर काही फळं, शक्यतो प्रथम आलेल्या फळांपैकी काही फळं ही तशीच रोपांवर ठेवून ती पूर्ण पिकू द्यावीत. पिकत असताना त्यांच्यात होत असलेले बदल यांवर लक्ष ठेवावं. फळं वा शेंगा पूर्ण तयार होत असताना त्यांचा आकार एका मर्यादेपर्यंत वाढून त्यानंतर वाढ थांबते अन रंग बदलु लागतो. काही फळांच्या बाबतीत त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. असे बदल नजरेस पडताच ती गळून खाली पडायच्या आधीच काढून घेऊन सावलीत ठेवावी.

सर्वसाधारणपणं सर्वच प्रकारच्या बियांच्या साठवणूकीची पद्धत एकच असली तरी काही फळांच्या बाबतीत खास काळजी घ्यावी लागते. कशी ते पुढे पाहूया.

टोमॅटो : जर तुम्ही एकापेक्षा अधिक प्रकारचे देशी टोमॅटोंचं पीक घेत असाल तर अशी रोपं वेगवेगळी ठेवून त्याची व्यवस्थित नोंद करावी. शक्य असेल तर प्रत्येक प्रकारातील दोन ते तीन रोपं वेगळी ठेवल्यास उत्तम होईल. प्रत्येक प्रकारांतील तीन ते चार टोमॅटो झाडांवर पूर्ण पिकू द्यावेत. पूर्ण पिकलेले टोमॅटो अर्धे कापून त्यातील गर स्वच्छ केलेल्या चमच्यानं एखाद्या भांड्यात काढून घ्यावा. भांडं पारदर्शक असल्यास उत्तम. हे करण्यापूर्वी हात अन भांडं दोन्हीही स्वच्छ केलेलं असावं. काढलेला गर तसाच ३ - ४ दिवस सावलीत ठेवावा. भांड्यावर झाकण ठेवावं. याला मुंग्या लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. टोमॅटोच्या बियांवर एक पातळसा पापुद्रा असतो. तो आपल्याला काढायचा आहे. पण तो बिया धुवुन हातानं काढताना बियांना इजा होण्याची शक्यता असल्यामुळं आपल्याला भरपूर काळजी घेण्याची गरज असते.

या ३ - ४ दिवसांत गर रोज एकदाच स्वच्छ चमच्यानं हलवत रहावं. या दरम्यान वरच्या बाजूला पांढरट थर जमा होईल. तो साचू देऊ नये. अन म्हणूनच चमच्यानं ढवळणं गरजेचं असतं. असा पांढरा थर जर जास्त असेल अन तो वेगळा करता येत असेल तर तो चमच्यानंच काढून टाकावा. ३-४ दिवसांनी भांड्यात बिया खाली बसलेल्या दिसतील. मग चमच्यानं हलकेच वरचा गर काढून टाकावा. आता भांड्यात फक्त बिया राहिल्या असतील. त्यांवर पाणी घालून ठेवावं. काही बिया वर तरंगताना दिसल्या तर त्या काढून टाकाव्यात. नंतर २ ते ३ वेळा बिया पाण्यानं व्यवस्थित धुवुन घेऊन त्या कागदावर अथवा एखाद्या प्लेटमधे वाळवत ठेवाव्यात. बिया पूर्ण कोरड्या झाल्यावर त्या झिप लॉक पिशवीमधे, वा कागदाच्या पाकिटात किंवा एखाद्या हवाबंद डबीमधे ठेऊन वर लेबल लावून त्यावर बीचा प्रकार, साठवण्याची तारीख हे सगळं लिहावं. म्हणजे पुढच्या सीझनला हे सारं उपयोगी पडेल. डबी वा पिशवी जे काही बिया ठेवण्यासाठी वापरलं असेल ते साधारण तापमानात व कोरड्या ठिकाणी ठेवावं.

वांगी : वांग्याचे जेवढे प्रकार लावले आहेत त्यापैकी प्रत्येकी किमान एक तरी रोप वेगळं काढून इतर रोपांपासून दूर ठेवावं. त्यावरील वांगी पूर्ण तयार होऊ द्यावीत. वांगी आधी पिवळी होऊन मग तपकिरी रंगाची होतील. त्वचेचा तुकतुकीतपणा जाईल. कडकपणा जाऊन मऊ पडतील. पूर्ण पिकल्यावर वांगी एक तर झाडावरुन गळून पडतील किंवा हात लावताच सहजासहजी हातात येतील. अशी वांगी काढून चार पाच दिवस घरातच उघड्यावर ठेऊन द्यावीत. नंतर सुरीनं हलकेच कापून घ्यावीत. आतला गर कोरडा पडला असेल. त्यातच तपकिरी रंगाच्या बिया दिसतील. टोकदार सुरीनं बियांना न दुखवता त्या वेगळ्या कराव्या. एखाद्या भांड्यात घेऊन त्या दोन तीन वेळा धुऊन घेऊन सगळा गर गेला असल्याची खात्री करावी. नंतर गाळून घेऊन एखाद्या कागदावर वा प्लेटमधे पसरुन ठेवाव्यात. वाळल्यावर कागदी पाकीटात ठेऊन देऊन वर प्रकार व तारीख वगैरे डिटेल्स लिहून ठेवाव्यात.

मिरची वर्गीय फळं : मिरचीचा जो प्रकार आपण लावला असेल त्यापैकीही प्रत्येकी एक ते दोन रोपं वेगवेगळी ठेऊन देऊन त्यावरील किमान ५ ते ६ पळं बियांसाठी राखून ठेवावीत. आपल्याला अधिक बिया हव्या असतील तर जास्त फळं ठेवावीत. हिरव्या मिरच्या झाडावरच पिकुन लाल होतील. त्यांची वाढ पूर्ण होत आली की त्या सुरकुततील. पूर्ण सुरकुतलेल्या मिरच्यांची सालं जाड होतील. मिरच्या झाडावरच वाळल्या तरी चालेल. अशा वाळलेल्या मिरच्या झाडावरुन काढून घेऊन कागदावर त्यातील बिया काढून घ्याव्यात. हे करताना शक्यतो चमचा वा सुरी वापरावी. उपलब्ध असतील तर हातमोजे वापरावेत. कारण मिरचीचा तिखटपणा हातांना लागतो अन त्याचा त्रास होतो. बिया कागदावर वा प्लेटमधे काढून घेऊन त्या ३-४ दिवस पूर्ण वाळू द्याव्या. अशा वाळलेल्या बिया पिशवीत वा डब्यामधे ठेऊन त्यावर लेबल लिहून वर सांगितल्याप्रमाणं सारा तपशील लिहून थंड, कोरड्या ठिकाणी ठेवाव्या.

शेंग वर्गीय फळं : घेवडा, चवळी, मूग, वाटाणा वगैरे ज्या शेंगवर्गीय भाज्या आहेत त्यांच्या शेंगा जर तुम्ही कोवळ्या असताना भाजीसाठी काढत असाल तर काही शेंगा वेलींवर वा झुडूपांवरच पूर्ण पिकून वाळू द्याव्यात. शेंगा पूर्ण तयार होत असताना तुम्हाला त्या फुगीर दिसतील. म्हणजेच आतले दाणे तयार होत असतील. शेंगा वाळत आल्यावर शेंगांचा वरचा भाग तपकिरी होईल. हाताला अशा शेंगा कडक लागल्यावरच काढून घ्याव्यात. तशाच राहिल्या तर त्या फुटतील अन बिया इतस्ततः पडतील. काढलेल्या शेंगा कुठल्याही खोलगट भांड्यात वा डब्यात वाळण्यासाठी ठेवाव्यात. वरच्या भागावर कापड बांधावं किंवा एखादं झाकण हलकेच ठेवावं जेणेकरुन आत हवा तर जाईल पण वाळताना शेंगा जर फुटल्याच तर बिया बाहेर उडणार नाहीत. शेंगा पूर्ण वाळल्यावर त्या फोडून आतील सशक्त बियाच फक्त एखाद्या हवाबंद डब्यात वा पिशवीत ठेऊन त्यावर लेबल लावुन सारा तपशील लिहावा. काही बिया पोचट वा अशक्त दिसल्या तर त्या फोडून कंपोस्टमधे टाकाव्यात. शेंगा न फोडता ठेवल्यास उत्तम. त्यामुळं हवेचा संपर्क न होता बिया सुरक्षित रहातील.

पालेभाज्या : पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, माठ, लेट्युस वगैरेंचीही काही सशक्त अन निरोगी रोपं तशीच ठेवावीत. वेळ पूर्ण होत असतानाच यांच्यावर तुरे येतील. फुलतील अन नंतर त्यांच्यातच बिया तयार होतील. फुलं येऊन ती वाढू लागल्यावर अशा रोपांवरील पानं निबर होऊ लागतील. भाजीसाठी काढलेल्या कोवळ्या पानांपेक्षा यांची चव काहीशी कडवट असेल. म्हणून पानं काढू नयेत. तसंही बियांचं पोषण होण्यासाठी रोपांवर पानं असणं गरजेचंच असतं. फुलांमधेच बिया असतील. फुलांचा रंग बदलेल. ती वाळू लागतील. रोपही मान टाकू लागेल. बियांचं वजन त्यांच्या दांड्याला पेलवेनासं झाल्यावर ते बाजुला कलंडु लागेल. ज्या रोपांवर म्हणजे उदा. पालक वगैरेंवर अनेक फुलांच तुरा येतो त्या तुऱ्यातल्या खालच्या भागातल्या बिया लवकर पक्व होऊन वाळू लागतात. त्यामुळं खालच्या भागातल्या बिया अथवा फुलं तपकिरी रंगाकडं झुकू लागताच ती काढून घेऊन घरात कागदावर सावलीत पण उजेड पडेल अशा ठिकाणी ठेवावीत. इतर भाज्यांच्या बाबतीत फुल बरंचसं वाळल्यावर ते हलक्या हातानं काढून घेऊन घरात आणुन एखाद्या कागदाच्या पाकीटात ते ठेऊन द्यावं. पाच सहा दिवसांत ते पूर्ण वाळेल. मग हातानं हलकेच चुरगळून बिया काढून घ्याव्यात. इतर कचरा, बीवरची वाळलेली सालं व पाकळ्यांचे तुकडे दूर करावेत. वेगळ्या केलेल्या बिया काढून डबीमधे वा कागदाच्या पाकीटात ठेऊन वर लेबल लावुन बियांची माहिती लिहावी.

वेलवर्गीय भाज्या : दुधी, लाल भोपळा, काकडी, शिराळी, घोसाळी, कारली, पडवळ वगैरेंच्याही बाबतीत थोड्याफार फरकानं असंच असतं. वेलींवर काही फळं ठेऊन देऊन ती पुर्ण तयार होऊ द्यावीत. ज्या फळांमधे पाण्याचा अंश जास्त असतो, उदा. काकडी, कारली, पडवळ, इ. ती फळं निबर झाल्यावर त्यांना बाहेरुन हलक्या हातानं छेद देऊन आतला गर काढून घेऊन तो एखाद्या भांड्यात घेऊन आतल्या बियांपासून गर वेगळा करुन घ्यावा. भांड्यात राहिलेल्या बिया एक दोन वेळा धुऊन घेऊन, वर तरंगणाऱ्या बिया काढून टाकाव्यात. खाली राहिलेल्या बिया कागदावर वाळत ठेवाव्यात. वाळल्यावर त्या कागदाच्या पाकिटात ठेऊन वर नोंद करुन ठेवावी.

दुधी, शिराळी, घोसाळी वगैरेंची निबर फळं वेलींवरुन तोडून घेऊन वाळवावी. काही दिवसांतच यातला गरही वाळून जातो अन आतमधे वाढ होत असताना तया झालेल्या शिरा उरतात. अशी वाळलेली फळं हलवुन पाहिल्यास आतल्या बियांचा आवाजही येतो. अशी वाळलेली फळं तशीच ठेऊन दिल्यास बिया खराब होत नाहीत. पुढील लागवड करताना ही वाललेली फळं फॊडून आतल्या बिया घ्याव्यात. तसं करायचं नसेल तर बिया काढून घेऊन त्या कागदाच्या पाकिटात ठेऊनही देऊ शकता.

इतर भाज्या, कंदमुळं प्रकारातल्या भाज्यांच्या बिया घेण्यासाठीही ती वेगळी ठेवुन पूर्ण तयार होऊ द्यावीत. अशा रोपांची पानं वा मुळं खाण्यासाठी घेऊ नयेत. यथावकाश यांच्यावर फुलं येऊन, परागीभवन होऊन शेंगा अथवा फुलांचे गुच्छ तयार होतात. ते वाळू लागताच काढून घेऊन पूर्ण वाळू देऊन सावकाश बिया काढून घ्याव्या. आपण साठवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया या एकत्र करु नयेत. मोठ्या फळांच्या बिया मोजक्याच असतील तरीही त्य़ासाठी वेगळी पिशवी वा डबी वापरावी.

भेंडी, गवार सारख्या भाज्यांची काही फळं रोपांवर तशीच निबर होऊन वाळू द्यावी. भेंडीच्या टोकाकडची बाजू विलग होऊ लागताच अशा भेंड्या काढून घेऊन दोरा बांधून वा रबर बॅंड लाऊन वाळवत ठेवाव्या. गवारीच्या शेंगाही काढून वाळवत ठेवाव्या. वाळल्यावर जेव्हा हव्या तेव्हा आतील बिया काढून पेराव्या.

साधारणतः परसबागेत लावल्या जाणाऱ्या जवळपास सर्वच भाज्यांच्या बिया कशा साठवाव्या यावर वर लिहिलं आहे. कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली यांच्या बिया साठवणं खुप जिकिरीचं काम असतं अन ते एका सीझनमधे होत नाही. अन म्हणूनच त्यावर लिहिलं नाही. याव्यतिरिक्त काही प्रकार असल्यास अन त्याची माहिती हवी असल्यास तसं विचारावं. आशा आहे की वर दिलेली माहिती आपणांस उपयोगी ठरेल.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

बियांची साठवण - भाग १

बियांची साठवण - भाग १

बियांची साठवण कशी करायची या विषयाला हात घालण्यापुर्वी आपण ती का करायची हे पहाणं जास्त महत्वाचं आहे. बियांच्या साठवणीमागं आपला वेळ अन पैसा वाचवणं ही कारणं फारच क्षुल्लक आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांत हायब्रीड बिया वापरुन घेतलेल्या पिकाचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत. बऱ्याचशा प्रकारच्या देशी बिया या अस्तंगत झालेल्या आहेत. याला जबाबदार जशा हायब्रीड बियांची विक्री करणाऱ्या कंपन्या आहेत तसंच आपणही आहोत. किंबहुना या परिस्थितीला आपणच जास्त जबाबदार आहोत. तुलनेनं स्वस्तात काही मिळतंय अन ते सुरुवातीला कमी त्रासाचं अन जास्त उत्पन्न देणारं जरी भासलं तरी पुढं जाऊन ते किती महाग पडलं हे आज आपल्याला बऱ्यापैकी उमजलेलं आहे.

जमिनीची सुपीकता गेली आहे, निसर्गचक्रात केलेले बदल दुरुस्तीपलिकडं जात आहेत. पिकांवर विविध प्रकारचे रोग पडत आहेत. त्यांचं निर्मुलन करण्यासाठी विविध प्रकारची रासायनिक खतं अन कीटकनाशकं यांचा वापर होत आहे. यापैकी काहींचे अंश हे अन्नावाटे आपल्याही शरिरात जात आहेत. कारण पिकांना दिलं गेलेलं रसायन जास्त प्रमाणात वापरलं गेलं असेल किंवा दिलेला भाग पिकानं घेऊन पचवला नसेल तर त्याचा थोडातरी अंश आपल्या पोटात जाणं अपरिहार्यच आहे. तो पचवण्यासाठी आपली शारिरीक ठेवण अन अंतर्गत रचना पूरक नसल्यानं तो शरीरातच कुठंतरी साचणं अन त्याचे दुष्परिणाम भयंकर रोगांद्वारे आपल्याला भोगावे लागणं हे आता नवीन राहिलेलं नाहीये. लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर सारखे विकार, अकाली वृद्धत्व हे सगळं आता समाजाच्या सर्वच वर्गात दिसू लागलंय. हिशेब केलात तर आपल्या अन्नासाठी केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च आज आपल्याला वेगवेगळ्या औषधांसाठी करावा लागत आहे. रासायनिक खतांची अन औषधांची ही कधीही न संपणारी साखळी आहे अन कळत नकळत अन इच्छा नसतानाही आपण त्यात ओढले गेलो आहोत. (आठवत असेल तर आठवुन पहा. काही वर्षांपुर्वी पंजाबमधे सॉफ्ट ड्रिंकमधे अधिक प्रमाणात रसायनांचा अंश सापडल्यावर असं सिद्ध झालं होतं किंवा करुन दाखवलं होतं की शेतात वापरली जाणारी रासायनिक खतं अन कीटकनाशकं ही पाण्याबरोबर वहात जाऊन ती नदीत मिसळली गेली अन ते पाणी पेप्सी अन कोकाकोला कंपन्यांनी आपल्या प्रॉडक्शनसाठी वापरल्यामुळं ती रसायनं पेप्सी अन कोकमधे अधिक प्रमाणात सापडली होती.)

हायब्रीड बीजांच्या कंपन्यांनी केवळ आपल्याला त्यांच्या नादीच लावलं असं नाहीये तर आपल्याकडच्या देशी वाणाच्या बिया घेऊन त्या नष्टही केल्या आहेत. त्यासाठी जे काही साम-दाम-दंड-भेद अवलंबावं लागलं तेही त्यांनी केलं आहे. तात्कालिक फायद्याला बळी पडून आपण त्यांच्या म्हणण्याला बळी पडलो आहोत हे सत्य नाकारता येणार नाही. एक लक्षात घ्या, या कंपन्या फार मोठ्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या आपला व्यवसाय करीत असतात. या कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक असल्या तरी सामान्य शेतकऱ्यांशी लढताना त्या एकत्र येतातच. अशा कंपन्या स्थानिक वाणाच्या पुरवठादारांबरोबर कायदेशीर लढाया जिंकल्याचीही उदाहरणं आहेत. (https://kulturpflanzen-nutztiervielfalt.org/press-release-july-16-2012-european-court-justice-confirms-sales-hurdles-plant-biodiversity) आणि (https://european-seed.com/2020/09/the-court-of-justice-of-the-european-union-sheds-light-in-case-c-176-18-on-the-scope-of-eu-plant-variety-rights/) (इथं एक गोष्ट लक्षात घ्या की या कंपन्या तुमच्या शेतातही शिरुन तुम्ही लावलेली झाडं अन त्यापासुन येणारी फळं या वर वर पहाता क्षुल्लक गोष्टीही कोर्टात घेऊन जाण्यास मागंपुढं पहात नाहीत. अन आपल्याकडं रस्त्यावरुन जाताजाता आपण सहजच एखाद्याच्या बागेतली फांदी तोडून नेतो, वर घरमालक काही बोलला तर त्यालाच सुनावतो. लिंकमधे दिलेल्यांपेक्षाही पुष्कळ दाखले आहेत जिथं "कंपन्याच" जिंकल्या आहेत अन त्यांना वकीलांच्या "फिया" परवडत असतात. सामान्य शेतकरी केस शेवटपर्यंत लढला तर जिंकुही शकेल, पण त्यासाठी हवं आर्थिक बळ अन साथीला उभे रहाणारे अन्य शेतकरी अन पुढारी.)

असो. या सगळ्या कोर्टकज्जे, कायदेशीर अधिकार, बलवानांच्या पाठीशी उभे रहाणारे कायदे अन सत्ताधीश यांच्यामुळंच बियांचे जे काही वाण आज शिल्लक आहेत ते वाचवणं अन वाढवणं याची जबाबदारी आपल्याच शिरावर आहे. अन ती आपण पूर्णपणे पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा पुढील पिढीला केवळ हायब्रीड किंवा जेनेटिकली मॉडिफाईडच नव्हे तर इतरही प्रकारे मॉडिफिकेशन्स केलेल्या बियांपासून घेतलेलं अन्न खाण्यावाचून कुठलाही पर्याय उपलब्ध रहाणार नाही अन आपण कळत नकळत कुणाच्यातरी हातचं बाहुलं बनून गेलेलो असू. सध्याच्या करोनाच्या स्थितीवरुन तरी ते आपल्या ध्यानात यायला हवं अन पटायलाही हवं आहे.

तेव्हा देशी वाणाचं रक्षण अन संवर्धन करणं हे आपण "मीच का?" किंवा "सरकारनंच काहीतरी करायला हवं" असा कुठलाही विचार न करता करायला हवं आहे. नव्हे, ती काळाची गरज आहे हे ध्यानात घ्यायला हवं. एकदा आपण हे कार्य हाती घेतलं की जे समाधान आपल्याला मिळेल ते केवळ बागकामानं मिळणाऱ्या समाधानापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त असेल याची खात्री बाळगा.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

सेंद्रीय ते सेंद्रिय व्हाया रासायनिक

सेंद्रीय ते सेंद्रिय व्हाया रासायनिक


एक काळ होता जेव्हा शेती निसर्गचक्रावर अवलंबून होती. तीन प्रमुख ऋतु असायचे, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. हे चक्र निरंतर अन वेळापत्रकानुसार सुरु असायचं. त्यात फारसा खंड पडायचा नाही. तिघंही आपापली वेळ पाळायचे. थोडंफार पुढंमागं होत असे, पण त्यानं फारसा फरक पडायचा नाही. ना माणसांवर ना शेतीवर ना निसर्गावर. शेतांमधे कुठल्याही रसायनाविना अन्नधान्य पिकत असे अन ते सर्वांना पुरुनही उरत असे.

मग हळूहळू लोकसंख्या वाढू लागली तसं शेतात पिकणारं धान्य कमी पडू लागलं. त्यातुनच जरी साठेबाजी अन कृत्रिम तुटवडा हे जन्माला आलं असलं तरी शेतात पिकणारं धान्य अन भाजीपाला वगैरे कमी पडत गेलं. मग शेती करण्याच्या पद्धतीत बदल येत गेला. त्य़ापाठचं आंतरराष्ट्रीय अन आपल्याइथलंही राजकारण सोडलं तरी शेतांमधे रासायनिक खतांचा वापर सुरु झाला. अन एक दोघांना मिळणारं यश पाहून बहुतांश शेती रासायनिक खतांवरच पोसली जाऊ लागली. आकर्षक दिसतं तेच विकलं जातं या नव्या अर्थशास्त्राला सारेच बळी पडले. पिकवणारेही अन ग्रहण करणारेही. गबर झाले ते राजकारणी अन रासायनिक खतं अन हायब्रिड बियाणं बनवणाऱ्या कंपन्या. बळी तो कान पिळी या तत्वानुसार मग ते करतील ते, अन म्हणतील ती पूर्व दिशा होऊ लागलं अन कळत नकळत आपण सारेच यांच्या आहारी गेलो.

या रासायनिक खतांचा दुष्परिणाम दिसण्यासाठी अन ते नको असं म्हणण्यासाठी तीन ते चार पिढ्या जाव्या लागल्या. आज जरी रासायनिक खतांविरोधात बरीच जागरुकता निर्माण झाली असली तरी अजुन बरंच मैदान मारायचं आहे. त्यासाठी अजुन एक ते दोन पिढ्या जाव्या लागतील. अर्थात हे जसं कुणा एकट्या दुकट्याचं काम नाही तसंच प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून रहायचीही गरज नाही. ज्याचं प्रॉडक्ट उत्तम त्याची विक्री उत्तम असा साधा सरळ हिशोब ठेवल्यास सारं काही पुन्हा पहिल्यासारखं होईल. फक्त धीर न सोडता, एक व्रत म्हणून हे कार्य स्वीकारल्यास ते अशक्य नाही. आजवरच्या साऱ्याच सरकारांनी जनतेला आपल्यावर अवलंबून ठेवलं. हे जोखड झुगारुन देता येऊ शकतं. फक्त त्यासाठी हिंमत असायला हवी.

हे झालं शेतीमधे वापरलं जाणाऱ्या खतांविषयी. त्याविरोधात जरी जनजागृती होत असली अन त्याला यश मिळु लागलं तरी या रासायनिक खतं बनवणाऱ्या कंपन्याही काही हातावर हात ठेऊन गप्प बसणार नाहीत. शहरी अन निमशहरी माणसांतला उच्चशिक्षित बिनडोकपणा अन त्यांच्यातला आळस व अशा लोकांची आपसांमधलीच स्पर्धा वगैरे सगळं या कंपन्यांनी बरोबर हेरलं आहे. अन आता त्यांचं टार्गेट हे शेती अन शेतकरी न रहाता आणि शेतकऱ्यांच्या गळी आपली प्रॉडक्ट्स उतरवताना राज्यकर्त्यांना हाताशी धरुन त्यांचे खिसे भरण्यापेक्षा कमी खर्चात अन माध्यम बदलून त्यांनी आपली कार्यप्रणाली बदलली आहे.

आता त्यांचं टार्गेट झालं आहे हेच हाती मोठमोठ्या डिग्र्या अन त्या जोरावर लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवणारे पण कुठल्या तरी सेलिब्रिटीचं डोळे झाकून अनुकरण करणारे वस्तुतः अर्धशिक्षित लोक. म्हणून मग यांच्यासाठी प्रिंट अन इलेक्ट्रॉनिक मिडियामधे विविध अन मोठमोठ्या जाहिराती येत रहातात. कुठं कृत्रिम अन प्रयोगशाळेत जन्माला घातलेला कॅल्शिअम तर कुठं जे व्हिटामिन सुर्याच्या किरणांपासून फुकट मिळत असतं ते डी३. कुठं कसली टॉनिक्स तर कुठं कसले काढे, तेही आयुर्वेदिक आहेत असं वर वर भासवणारे. त्यासाठी भलेमोठे बोजड अन अगम्य शब्द जन्माला घालून जे नसेल तर आपला मृत्यु अटळ आहे असा लोकांचा समज करुन देणारे.

कुठलातरी हिरो वा क्रिकेटर काम किंवा व्यायाम करता करता मधेच खिशातुन एक बाटली काढतो अन एक गोळी तोंडात टाकून पुन्हा ट्रेडमिलवर चालायला तरी लागतो किंवा पळायला अथवा जिना चढायला लागतो. लोक येडे, सलमान किंवा धोनी करतो म्हणून आपणही केलंच पाहिजे याला आपलं कर्तव्य मानतो अन मेडीकल स्टोअरमधून लगेच ती बाटली आणतो.

आता आपल्याला एवढ्या कॅल्शिअमची गरज आहे का? एका गोळीतून आपल्याला किती कॅल्शिअम मिळेल, आपली दिवसभराची कॅल्शिअमची गरज किती आहे. आपण जे अन्न रोज खातो, त्यातुन आपल्याला किती कॅल्शिअम मिळतो वगैरे गोष्टींमधे तो पडतही नाही. एक माणूस सोडला तर निसर्गातला कुठलाही सजीव आपल्या नित्य गरजेपेक्षा अधिक काही खातही नाही अन साठवुन तर कधीच ठेवत नाही. पण माणसाला मात्र हे काही कळत नाही. जीभेचे चोचले अन जीभच या सगळ्याला कारणीभूत आहे असं म्हणत आवडेल ते तो खात सुटतो. आणि बाहेर एवढा गोंगाट असतो की त्याला आतला आवाज ऐकुही येत नाही.

मग अती झालं की औषधं सुरु होतात. एका औषधाचा परिणाम घालवण्यासाठी किंवा न्युट्रल करण्यासाठी दुसरं औषध. दुसऱ्यासाठी तिसरं, त्यात प्लासिबो थिअरी आहेच, म्हणजे अजुन एक दोन औषधं. मग त्याचं लंगडं समर्थन करण्यासाठी म्हणून ऑफिसात, प्रवासात प्रौढी मिरवत मी दिवसभरात किती गोळ्या खातो हे सांगितलं जातं. त्य़ात आपण चुकीचं काही करत आहोत याहीपेक्षा मी कसा औषधं अन व्हिटामिन्स घेतो अन त्यावर किती खर्च करतो हे सांगण्याचा उद्देश जास्त असतो.

साधारणतः प्रौढ व्यक्तीला दिवसभरात १००० ते १२०० मिलिग्रॅम कॅल्शिअम पुरेसा होत असतो. सतरा-अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांची हीच गरज १३०० मिलिग्रॅम असते. आपण जर आपला आहार नेहमीचाच पण पौष्टिक ठेवला तर कॅल्शिअमची ही गरज त्यातुन नक्कीच पुरवली जात असते. अगदीच गरीब जे असतील त्यांना ज्या गोळ्या वा सकस आहार जास्त गरजेचा आहे त्यांना मात्र ते फुकट वा स्वस्तात मिळत नाही. अन ज्यांना गरज नाही त्यांच्यावर भडीमार होत असतो.

आपलं शरीर मात्र एका मर्यादेपलिकडं जास्त काही मिळाल्यावर ते विविध मार्गांनी टाकून देतं अन टाकता नाही आलं तर मग शरिरात विकृती निर्माण करतं. म्हणजे उदा. कॅल्शिअम जरुरीपेक्षा जास्त झाल्यास डायरिआ किंवा कॉन्स्टिपेशन यापैकी तब्येतीनुसार काहीही होतं, उलट्या, मळमळ, रक्तदाब, सांधेदुखी वगैरेही बरंच काही होऊ शकतं.

पण आपल्या नित्याच्या आहारात आमटी, भात, पोळी, भाजी, ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरेंपैकी ऋतुमानाप्रमाणं कशाचीही भाकरी, कधी थालिपिठं, कधी कडधान्यांच्या उसळी तर कधी इडली डोसांसारखे आंबवलेले पदार्थ, कच्च्या कोशिंबिरी, या सोबतच दूध, दही, ताक, लोणी, तूप अन सीझनप्रमाणं उपलब्ध असलेली फळं, अंजिर, बदाम, काजू सारखे ड्रायफ्रूट्स व चणे, फुटाणे, शेंगदाणे हे सगळं उपलब्धता, तब्येत अन मुख्य म्हणजे बजेट यानुसार खात राहिल्यास बाहेरुन कुठल्याही व्हिटामिन वा सप्लिमेंटची आवश्यकताच भासणार नाही. याला रोजच्या किमान दहा मिनिटांच्या व्यायामाची जोड असेल तर कुठलाही आजार होणार नाही. पण या सगळ्यापेक्षा लोकांना एक गोळी तोंडात टाकून घोटभर पाणी पिणं जास्त सोयीचं वाटतं.

म्हणून म्हणतो, आजपासून तीस चाळीस वर्षांनी "से नो टू केमिकल सप्लिमेंट्स" अशी चळवळ चालवण्यापेक्षा आजच अशा गोळ्या घेणं टाळा. शरिराला हवी असलेली व्हिटामिन्स आपल्या आहारातुनच मिळवा. डाळ, तांदूळ, गहु, ज्वारी, बाजरी वगैरे आपल्यापैकी प्रत्येकाला घरी उगवणं शक्य नसेल पण निदान भाज्या, फळं हे तर आपण नक्कीच घरी पिकवु शकतो. अंजिरासारख्या फळातुन भरपूर कॅल्शिअम मिळू शकतो. हे अंजिराचं झाड आपण किमान दोन अडीच फूट खोल कुंडीत आपल्या गच्ची-बाल्कनीतल्या बागेत नक्कीच लावू शकतो. नियमित केलेल्या छाटणीनं त्याची उंची चार फूटांपर्यंत मर्यादित ठेवुन अधिक फांद्या फुटतील याची काळजी घेतली तर सेंद्रिय खतांवर आपण आपल्यापुरती अंजिरं नक्कीच घेऊ शकतो.

भाज्यांसाठीही देशी बियाणं वापरलीत तर उत्तम चवीच्या भाज्या, शेणखत अन घरी स्वतः बनवलेलं कंपोस्ट यावरच घेऊन कुठल्याही रासायनिक खतांच्या वापराशिवाय घरच्या घरी घेऊ शकतो. त्यामुळं उत्तम आहाराबरोबरच स्वतःची गरज स्वतःच भागवण्याचं समाधान मिळून सुदृढ मानसिकताही निर्माण होईल. शरीर कितीही स्ट्रॉंग असलं तरी मन कमकुवत असेल तर कशाचाही उपयोग होत नाही. पण आपल्या घरच्याच बागेत भेंडी, वांगी, टोमॅटो, काकड्या, कारली, दुधी, पडवळ वगैरे तयार होत असताना पहाण्याचा आनंद अन सुख काही वेगळंच असतं. हे ना शब्दांत मांडता येणार ना पैशांनी विकत घेता येणार.

हे सगळं अगदी छोट्यातल्या छोट्या म्हणजे ७०-८० स्क्वे.फूंच्या बाल्कनीतही शक्य होतं. यापेक्षा मोठी बाल्कनी किंवा मोठा टेरेस असेल तर मग कसलंच बंधन नाही. रहिवासी सोसायट्यांमधे तर हे सगळं सामुहिक तत्वावर केलं तर संपूर्ण सोसायटीलाही पुरुन उरतील एवढ्या प्रमाणात विविध भाज्या तुम्ही घेऊ शकता. बागकाम करण्यासारखा दुसरा स्ट्रेसबस्टरही नाही अन व्यायामाचा दुसरा प्रकारही नाही. दिवसभरातल्या बागेमधे घालवलेल्या अर्ध्या तासानंही मन उत्साही होतं अन तिथल्या कामामुळं मधुमेह वगैरे गोष्टीही दूर रहातात. हे स्वानुभवाचे बोल आहेत त्यामुळं कुठलंच रेफरन्स बुक नाही की कुठली वेबसाईट नाही जिचा पत्ता देऊन तुम्हाला क्रॉसचेक करता येईल.

बाग करायला सुरुवात तर करा. केल्यावर जशा शाळेतल्या, कॉलेजातल्या वा नोकरीच्या पहिल्या दिवशी अडचणी आल्या तशा येतीलही. पण आजवर जशी प्रत्येक अडचणीवर मात केलीत तशी यावरही कराल. आणि मुख्य म्हणजे निसर्गासारखा क्षमाशील दुसरा कुठलाच गुरु वा शिक्षक नाही. कितीही चुकलात तरी तो या ना प्रकारे त्याची भरपाई करतच असतो. अन लागलीच काही मदत वा मार्गदर्शन तर माझ्यासारखे असंख्य लोक आहेत जे स्वतः बाग करतातच पण त्याहीपेक्षा दुसऱ्याला जास्त उद्युक्त करुन हे काम अधिकाधिक लोकांनी करुन आपलं शारिरिक अन मानसिक आरोग्य उत्तम ठेवावं याला जास्त महत्व अन प्राधान्य देत असतात.

तेव्हा जे बाग करतात त्यांनी केवळ फुलांची बाग न करता भाज्या, फळं यांकडंही लक्ष द्यावं, जे बाग करत नाहीत त्यांनी सुरुवात करावी. काहींनी आलेल्या अपयशातुन विचार रद्द केला असेल त्यांनी आत्मपरीक्षण करुन चुका शोधाव्या अन त्या कशा टाळता येतील हे पाहून पुन्हा नव्यानं सुरुवात करावी. देश आत्मनिर्भर व्हायचा तेव्हा होईल, आपण तर होऊया. आपण झालो तर आपोआपच सगळं होईल.

चला सुरुवात करुया. पाऊस पुन्हा सुरु होतोय, आपणही सुरु होऊया.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

काकडी कडू कशी होते?

काकडी कडू कशी होते?बरेंचदा आपण पहातो काकडी खाताना कडू निघते. त्यातही दोन्ही टोकं कडू निघण्याचं प्रमाण अधिक असतंच पण संपूर्ण काकडीही कधीकधी कडू निघते. आधी आपण काकडी कडू कशी अन कधी होते ते पाहूया.

काकडी, शिराळी/दोडकी, सर्व प्रकारचे भोपळे, कारली, हे सगळे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. कुकुर्बिट फॅमिली नांव या कुटुंबाचं. या कुटुंबाचं एक नैसर्गिक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फळ चवीला जरी वेगवेगळं अन काही प्रमाणात वेगवेगळ्या गुणधर्मांचं असलं तरी वेलींच्या वाढीपासून ते फळं तयार होऊन काढेपर्यंत, म्हणजे वेलीच्या संपूर्ण आयुष्यात त्यात एक कडवट रसायन असतं. कुकुर्बिटासिन हे त्याचं नांव. हे रसायन संपूर्ण वेलीला कडवट ठेवतं. याचं कारण म्हणजे वेल ऐन भरात असताना कुठल्याही प्राण्यानं अथवा गायी-गुरांनी खाऊ नये म्हणून निसर्गानं घेतलेली खबरदारी असते ही.

हे कुकुर्बिटासिन साधारणपणे वेलीचं खोड अन पानं यांपुरतंच मर्यादित असतं. पण कधीकधी ते फळांमधे उतरतं अन ते तिथंच मुक्काम करतं. पण ते शक्यतो फळांच्या दोन्ही टोकांकडेच जाऊन थांबतं. संपूर्ण फळभर व्यापून रहात नाही. प्रत्येक गोष्टीला जसे अपवाद असतात तसेच या गोष्टीतही आहेत. अन म्हणूनच कधीकधी अख्खी काकडी अथवा दोडका कडू निघतो. लाल भोपळ्यांत हे फारच क्वचित दिसतं. कदाचित त्याचा आकार अन हे रसायन यांचं गुणोत्तर पहाता तो कडवटपणा आपल्याला जाणवत नसावा.

असं होण्याचं कारण म्हणजे वाढीदरम्यान वेलीला ताण सहन करावा लागला तरच कडवटपणा जास्त प्रमाणात येतो. कधी संपूर्ण काकडी कडू तर कधी मधला भाग वगळता इतर भागात ती कडू निघते. आता ताण म्हणजे काय? तर, अती थंडी. अती उन्ह, दिवसा तीव्र उन्ह अन रात्री थंड हवामान, वेलीला मार लागणं (हे होण्याचं कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीनं सर्रास टूजी अन थ्रीजी कटींग करणं.) वेलीला पाणी कमी पडून ती वाळू लागणं. अन्नद्रव्य, त्यातही प्रामुख्यानं नत्र कमी पडणं, पानांवर बुरशीजन्य रोग पडणं वगैरे वगैरे.

आपण हे सगळं टाळू शकतो. अगदी हवामानावरही काही प्रमाणात मात करु शकतो. (पॉलीहाऊसमधे हवामान कंट्रोल केल्यामुळं तिथं उत्पादन घेतलेल्या काकड्यांमधे कडवटपणाचं प्रमाण अगदीच नगण्य असतं) वेल असलेली जागा स्वच्छ ठेवणं, खतपाणी वेळच्या वेळी देणं, शेंडा मारणं, म्हणजेच आधुनिक भाषेत टूजी अन थ्रीजी कटींग काळजीपूर्वक करणं, वेल फुलांवर असताना अन फळं भरताना खताची अन अन्नद्रव्यांची कमतरता भासू न देणं. वेलीवर छोटी फळं असताना तयार झालेली फळं हातानं तोडताना वेलीला धक्का बसणं टाळावं. तयार फळं वेलीवरुन काढताना नेहमी हलक्या हातानं अन कात्री वा कटर तेही धारदार वापरावेत. वरचेवर वेलींचं निरिक्षण करुन कसलाही रोग नाही, अगदी फळमाशीही नाही याची खात्री करणं अन दिसलीच लक्षणं तर वेळ न घालवता उपाय करणं. हे सगळं केलंत तर सालासह काकडी खाऊ शकाल.

आता मुख्य प्रश्न, काकडीकडे नुसतं पाहून ती कडू आहे हे कसं ओळखायचं? तर यासाठी काही ठोस असा रामबाण उपाय नाही की उघड लक्षणं नाहीत. ठोकताळा म्हणजे काकडीवर असलेले डाग किंवा काटेरी असणं, फळाचा आकार विकृत असणं, वगैरे असल्यास ते फळ कडू असण्याची शक्यता जास्त असते. आता काही अनुभवी शेतकरी नुसत्या नजरेनं कडू काकडी कशी ओळखत असतील हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. कारण आजही आपल्याकडे असे शेतकरी आहेत जे गाढवाच्या कानांची स्थिती अन कावळ्यानं घरटं किती उंचीवर अन कुठल्या झाडावर बांधलंय हे पाहून पाऊस केव्हा येईल अन किती येईल हे सांगतात अन ते शंभर टक्के खरं निघतं. फक्त दुर्दैवानं हे कुठंच लिहिलेलं सापडणार नाही.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

बागेतील रोपांवरील रोग व कीड

बागेतील रोपांवरील रोग व कीड - भाग २

रोपांवरील रोग - करपा आणि ब्लॉसम एंड रॉट

करपा :बागेतील रोपांवरील पानांवर सुरुवातीला काळपट तपकिरी रंगाचे ठिपके दिसु लागतात. सर्वच प्रकारातील झाडांवर. फुलझाडं असो वा भाज्या. छोटी फळझाडं असो की आंबा, पेरू सारखी मोठी झाडं. पानांवर असे ठिपके पडतात. नवी कोवळी पानं अन नव्या फुटणाऱ्या फांद्यांवर हे ठिपके पडुन ते वाढत जातात. मध्यभागी खोलगट भाग असलेल्या अशा ठिपक्यांचा आकार वाढत जातो. पानं वाळल्यासारखी दिसू लागतात. कधी फांद्यांवरही असा रोग पसरत जाऊन छोटी रोपं मरणपंथाला लागतात. खास करुन पावसाळ्यात याचा प्रादुर्भाव जास्त असतो. वारा, पाऊस, कीटक, माती, पाणी अन बागकामाची हत्यारं यांच्या माध्यमातुन याचा प्रसार होतो. पावसाळ्यात तर याचा प्रसार फारच लवकर अन मोठ्या प्रमाणात होतो.

हा एक बुरशीजन्य रोग आहे. याची सुरुवात होते तेव्हा रोपांच्या पानांवर छोटे तपकिरी ठिपके दिसतात. वेळीच जर उपाय केले नाहीत तर हे ठिपके पसरत जातात. मोठे होत होत ते रोपांच्या पानांवर व छोट्या फांद्यांवर, खोडावर पसरु लागतात. फळांवरही असे तेलकट डाग दिसु लागतात. मोठ्या झाडांच्या नवीन फुटींवर असे डाग होऊन ते पसरत जातात. प्रमाण अधिक असेल तर पानं गळतात.

असा रोग दिसताक्षणीच रोगग्रस्त पानं काढून दूर फेकून द्यावीत किंवा शक्य असेल तर जाळून टाकावीत. 

रोगाचा प्रसार जास्त असेल तर असं रोपही काढून फेकून द्यावं. 

मोठ्या झाडांवर रोग दिसल्यास तेवढा भाग कापून टाकून दूरवर नेऊन टाकावा. कापलेल्या भागी झाडाला बुरशीनाशक किंवा बोर्डो पेस्ट लावावी.

बियाणं निरोगी अन खात्रीशीर वापरावं. बियाणं पेरण्यापुर्वी ते ट्रायकोडर्मासारख्या बुरशीमधे मिसळून मगच पेरावं.

रोपांची पुनर्लागवड करतानाही बुरशीनाशकात किंवा ट्रायकोडर्मासारख्या बुरशीच्या पाण्यामधे दहा मिनिटं मुळं बुडवुन ठेवुन मगच लागवड करावी.

बागकामाची हत्यारं वापरल्यानंतर स्वच्छ व निर्जंतुक करावीत.

ज्या झाडावर असा रोग पडला असेल त्याच्या फळांपासून पुढील लागवडीसाठी बिया घेऊ नयेत.

अशी पानं वा रोपं कंपोस्टमधे वापरु नयेत.

नीमतेलाचा स्प्रे नियमितपणं करत रहावं. साधारणतः दर आठ ते दहा दिवसांनी नीमतेल किंवा कडुलिंबाच्या पाल्यापासुन घरीच अर्क करुन तो रोपांवर फवारावा.

फळं व फळभाज्या मातीला टेकणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

नेहमी कंपोस्टचा भरपूर वापर करावा. कंपोस्टमधील विविध घटकांमधून झाडाला आवश्यक ती सर्वच अन्नद्रव्यं अन पोषकद्रव्यं मिळत असल्यानं त्य़ांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

पाणी देताना नेहमीच कुंडीतल्या मातीमधे द्यावं. उन्हाळ्यात पानांवर फवारलं तरी ते जास्त वेळ पानांवर रहाणार नाही याची काळजी घ्यावी.

कॉपरयुक्त कुठलंही औषध फवारावं. फक्त ते कमी प्रमाणात वापरावं. कारण मातीमधे तांब्याचं प्रमाण वाढल्यास ते गांडुळांसाठी अपायकारक होऊ शकतं.

पिकांचा फेरपालट करावा. कुंडीतील बहुवर्षायु झाडांचं दर दीड ते दोन वर्षातुन रिपॉटिंग करावं. जुन्या कुंडीतील माती दहा-बारा दिवस उन्ह देऊन निर्जंतुक करुन पुन्हा नीमपेंड वगैरे गोष्टी घालून पुनर्जिवीत करुन मगच वापरण्यास घ्यावी. अशा मातीमधे आधी काढलेलं पीक सोडून वेगळं पीक घ्यावं वा इतर दुसऱ्या प्रकारच्या रोपासाठी ती माती वापरावी.

----------------------

ब्लॉसम एंड रॉट :हा रोग फळभाज्या, त्यातही टोमॅटो, वांगी, सर्व प्रकारच्या मिरच्या आणि भोपळ्यातील सर्व प्रकारांवर पडत असतो. मातीमधील कॅल्शिअमची कमतरता याला कारणीभूत असते. रोपांवर येणाऱ्या पहिल्या काही फळांमधे सहसा हा रोग सापडतो. सुरुवातीला फळाच्या तळाशी काळसर तपकिरी डाग दिसतो. वेळीच उपचार केल्यास तो डाग म्हणजे रोगाची झालेली लागण थांबवता येते, पण काढून टाकता येत नाही. वेळीच लक्ष न दिल्यास हा डाग वाढत जातो.

हा रोग प्रामुख्यानं कुंडीमधील झाडांवरच पडतो. जमिनीवरील झाडांवर पडत नाही. याचं कारण म्हणजे जमिनीवरील झाडांना त्यांना आवश्यक असलेली जीवनसत्वं, पोषकद्रव्यं घेण्यासाठी मुळं खोलवर पाठवता येतात. परंतु कुंडीत हे शक्य नसतं. त्यामुळं कुंडीतील रोपांना आपण देऊ त्या खतांवर अन पाण्यावरच अवलंबुन रहावं लागतं.

रोपं आपल्या वाढीच्या काळात मातीमधुन कॅल्शिअम घेत असतात. जमिनीमधे कॅल्शिअम आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध असतो. तो रोपं आपल्या मुळांवाटे घेऊ शकतात. कुंडीमधल्या मातीमधला कॅल्शिअम जेव्हा रोपं घेऊन संपवतात तेव्हा ती या रोगाला बळी पडतात. कधी कधी पाणी देण्यात अनियमितता होते. कधी पाणी जास्त होतं तर कधी जास्त मोठा खंड पडतो. म्हणजेच मातीमधे ओलसरपणा राखला जात नाही. हे सतत होत राहिल्यास मातीत कॅल्शिअम असुनही मुळांना तो घेता येत नाही.

वर उल्लेखिलेली फळं जेव्हा आकारानं पूर्ण होत असताना कच्चीच असतात किंवा पिकण्याच्या मार्गावर असतात तेव्हा एखाद दुसऱ्या फळावर खालच्या बाजुनं एखादा व्रण असल्यासारखा डाग येतो. हा डाग वाढत जाऊन फळाचा खालचा भाग व्यापतो. अशी फळं प्रभावित भाग काढून टाकून खाता येतात.

असं होऊ नये म्हणून पाण्याच्या वेळा नियमितपणं पाळाव्यात. कधी काही कारणानं खंड पडलाच तर पुढच्या वेळी पाणी देताना बॅकलॉग भरुन न काढता ते नेहमीच्याच प्रमाणात द्यावं.

कुंड्या सुटसुटीतपणं ठेवल्यास सगळ्या बाजुंनी निरीक्षण करता येतं. रोपांवर फळं धरल्यापासुन नियमितपणं निरीक्षण करत रहावं. काही विकृती दिसल्यास त्वरित उपाय योजावेत.

पाण्याचा निचरा योग्य होत आहे याची खात्री करावी. खास करुन पावसाळ्यात पाणी साचुन रहाणार नाही हे पहावं. पावसात खंड पडल्यास अन मातीचा वरचा भाग कोरडा दिसल्यास थोडं पाणी द्यावं.

कुंडीत ओलसरपणा रहाण्यासाठी मल्चिंग अवश्य करावं.

कॅल्शिअमचा नैसर्गिक स्त्रोत म्हणजे बोनमील अन अंड्यांच्या कवचांचा चुरा. रोपांची पुनर्लागवड करत असतानाच पॉटिंगमिक्समधे कुंडीच्या आकारमानाप्रमाणं एक ते दोन चमचे बोनमील किंवा अंड्याच्या कवचांचा चुरा घालावा.

दर पंधरा दिवसांनी कंपोस्ट अन शेणखत वा गांडूळखत आळीपाळीनं देत असताना त्यातही अर्धा ते एक चमचा बोनमील वा अंड्यांच्या शेल्सचा चुरा घालावा.

खतं योग्य प्रमाणात अन योग्य त्या अंतरानंच द्यावीत. उगीचच जास्त खतं घालू नयेत. साधारणतः सेंद्रीय खतं देताना कुंडीचा वरचा एक इंचाचा थर भरेल एवढंच द्यावं. देताना माती मोकळी करुन खत घालून ते मातीत मिसळून घ्यावं.

माती ओली होईल इतपतच पाणी द्यावं.

रोपांना फळं येत असताना जास्त खतं देऊ नयेत.

कुंडीतील माती उकरताना मुळांना इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. तुटलेली मुळं पाणी अन अन्नद्रव्यं व्यवस्थितपणं घेऊ शकत नाहीत.


फोटो स्त्रोत : माहितीचं आंतरजाल

क्रमशः

©राजन लोहगांवकर

बागेतील रोपांवरील रोग व कीड

बागेतील रोपांवरील रोग व कीड

भाग १

प्रस्तावना

आपण आपल्या बागेत विविध प्रकारची झाडं लावत असतो. फुलझाडं, फळझाडं तसंच विविध प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या. या साऱ्यांपैकी काही सीझनल झाडं असतात तर काही बहुवर्षायु. काहींचं जीवन एकदाच फुलुन वा फळं देऊन संपून जातं तर काही अनेक वर्षं आपल्या बागेत असतात. ऋतुप्रमाणं जशी फुलं वा फळं येतात तशीच ऋतुप्रमाणं या झाडांवर कीड पडत असते तर काही रोगही पडत असतात. आपण कितीही काळजी घेतली तरीही बरेंचदा कीड येणं अन रोग पडणं मात्र आपण टाळू शकत नाही. या लेखात आपण अशा किडी व रोगांविषयी जाणून घेणार आहोत. लेखनमर्यादेमुळं अन लेखांत सुटसुटीतपणा येण्यासाठी म्हणून लेखाचे जसे भाग केले आहेत तसंच कीड अन रोग असेही दोन प्रमुख भाग केले आहेत.

सर्वप्रथम आपण कीड वा रोग हे का पडतात याची कारणं जाणून घेऊया. रोप वा झाड हे कमकुवत असेल, त्याला वेळच्यावेळी सुयोग्य असा आहार मिळत नसेल, त्याची वाढ सुदृढ होत नसेल तर ते रोगाला हमखास बळी पडतं. तसंच बागेत स्वच्छता नसेल, काडीकचरा इतस्ततः पडला असेल, त्यात पाणी मुरत असेल तर अशा ठिकाणी बुरशीजन्य कीड जन्माला येऊन ती वाढते अन त्यांना जेव्हा आहाराची गरज पडते तेव्हा ते बागेतील झाडांकडं मोर्चा वळवतात. सुरुवातीला आपल्या हे लक्षात येत नाही. पण जेव्हा येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. वनस्पतींमधला रस हाच या किडींचा आहार असतो. ते त्यावरच जगत असतात. त्यांच्या या रसशोषणामुळं आपण दिलेल्या खतपाण्याच्या मदतीनं वनस्पतींची कितीही चांगली वाढ झाली तरी त्यांच्यात फुलण्याची अन फळण्याची ताकद रहात नाही. आलीच काही फुलं अन फळं तर तीही रोगट निघतात, यासाठीच बाग नियमितपणं स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं असतं.

त्याप्रमाणंच कुंड्यांमधे वा जमिनीवरच्याही झाडांच्या मुळाशी जास्त पाणी साचुन रहात असेल, पाण्याचा योग्य निचरा होत नसेल तरीही मूळकूज, हुमणी यांसारखे रोग अन कीड यांचा त्रास होत असतो. जास्त पाणी म्हणजे झाड उत्तम बहरतं हा बरेचजणांचा गैरसमज असतो. त्यामुळं कित्येकजण अगदी पावसाळ्यात पाणी पडतं त्याप्रमाणं झाडांवर पाण्याचा वर्षाव करत असतात. झाडाची पाण्याची गरज ओळखून त्याप्रमाणं अन तेवढंच पाणी देणं हेच योग्य असतं.

काही बियाणंही रोगट असतात. अशी बियाणं आपल्या साध्या नजरेला रोगट दिसतही नाहीत. त्यामुळं तज्ञ सांगतात त्याप्रमाणं बियाणं लावण्यापूर्वी ती निर्जंतुक करुन घ्यावीत. गोमुत्र, जीवामृत, वेस्ट डिकंपोजरचं द्रावण यापैकी जे काही असेल त्यात ती भिजवुन मगच लावावीत. ट्रायकोडर्मा वगैरेंसारख्या पावडरीमधेही ती भिजवुन घ्यावीत. केवळ बियाणंच नव्हे तर रोपं पुनर्लावडीसाठी घेतानाही अशाच प्रकारे ट्रीटमेंट करुन लावावीत. म्हणजे कीड वा रोग पडण्याची बहुतांश कारणं वेळच्यावेळीच दूर केली जातात.

विकतची सेंद्रीय खतं वा घरी केलेलं कंपोस्ट वगैरेंमधेही कीड असते किंवा किडींची अंडी असतात. अशी कीड वा अंडी, आपण रोपांना ती दिल्यावर अन पाणी घातल्यावर कार्यरत होतात अन स्वतः जिवंत रहाण्यासाठी झाडांचं शोषण सुरु करतात. यासाठी घरचं कंपोस्ट पूर्णपणं तयार झाल्याशिवाय अन ते थंड झाल्याशिवाय म्हणजेच त्याची क्युअरिंग स्टेज पूर्ण झाल्याशिवाय वापरण्यास घेऊ नये. विकत घेतलेली सेंद्रीय खतंही, उदा. शेणखत, नीमपेंड, बोनमील, स्टेरामील इत्यादी घरी आणल्यावर काही दिवस सावलीत उघडी करुन ठेवावीत अन मगच वापरायला घ्यावीत. इतर खतं देतानाच त्यासोबतीनं नीमपेंड जरुर द्यावी. तसंच ट्रायकोडर्मा वा तत्सम मित्रबुरशी पावडर मिसळावी. म्हणजे खतांत असलेली त्रासदायक कीडीचा नायनाट होईल.

बागेत कुंड्या ठेवतानाही झाडांची दाटी होईल अशा ठेवू नयेत. त्यातही एकाच प्रकारची झाडं जवळ जवळ ठेवू नयेत. कीड अन रोगांमधेही प्रकार असतात. प्रत्येक रोग वा कीड हे ठराविक प्रकारच्याच झाडांवर येत असतात. काही आजार वा कीड सामायिक असतीलही. पण टोमॅटोवर पडणारी कीड कोथिंबीरीवर पडणार नाही. वांग्यावर पडणारी कीड भेंडीवर सापडणार नाही. यासाठी अन रोगांचा वा किडींचा प्रसार मर्यादित ठेवण्यासाठी एकाच जागी समसमान रोपांच्या कुंड्या ठेवणं शक्यतो टाळावं.

किडींवर वा रोगांवर औषधं नक्कीच आहेत, सेंद्रीयही आहेत अन रासायनिकही आहेत. पण शक्यतो ती वेळ येऊच नये म्हणून एक तर आपणच काळजी घ्यावी अन कीडीला निसर्गतःच विरोध करतील अशी झाडं मुख्य झाडाच्या कुंडीत वा आळ्यात लावावी. जेणेकरुन किडीचं निर्मूलन वा नियंत्रण नैसर्गिक रित्याच होईल अन आपलं नुकसान होणार नाही.

इथुन पुढं ही लेखमालिका दोन प्रमुख भागात विभागुन देण्यात येईल. पहिला भाग म्हणजे वनस्पतींवर पडणारे रोग अन दुसरा भाग म्हणजे विविध प्रकारची कीड. याबाबतीत सर्वंकष माहिती देण्याचा प्रयत्न राहीलच. पण कुठं काही त्रुटी असल्यास वा कुणी अन्य अन जास्त परिणामकारक उपाय करत असतील त्यांनी कमेंटमधे तसं लिहिण्यास हरकत नाही. आशा आहे की नवोदित बागकर्मींसाठी अन कुंडीकऱ्यांसाठी ही नवी मालिका उपयोगी पडेल.

क्रमशः

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...