गुलाब - लागवड अन व्यवस्थापन
जिथं जिथं बाग आहे तिथं गुलाबाचं किमान एक तरी रोप असतंच असतं. मग ते गावठी गुलाबाचं असो की कलमी. गुलाबी असो की पांढरं वा इतर कुठल्याही रंगाच्या फुलांचं. काही झाडं ही प्रत्येक बागेत असतातच. गुलाब हा त्यापैकीच एक. गुलाबाचं काटेरी झुडुपसदृश रोप कुंडीत अथवा जमिनीवर किंवा कशाच्याही आधारानं वर चढवलेली वेल अन त्यावर फुललेली फुलं पहाण्यास अत्यंत सुंदर दिसतात. फक्त याची देखभाल, खतपाणी, यावरचे रोग अन त्यावरचे उपाय हे सगळं अगदी काटेकोरपणं सांभाळावं लागतं. अन्यथा हे झाड गेलंच म्हणून समजा. त्यातुनही कलमी गुलाब असेल तर त्याचे सारे नखरे, सारी पथ्यं सांभाळावीच लागतात नाहीतर पदरी अपयश अन निराशा ठरलेली. या लेखात आपण गुलाबाची निवड ते त्याची पूर्ण देखभाल अन निगा कशी राखायची, त्यावर कोणकोणते रोग पडतात अन त्याचं निराकरण कसं कराय़चं यावर चर्चा करणार आहोत.
गुलाबाला पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सेंद्रीय खतानं समृद्ध अशी माती हवी. गुलाब कुंडीत लावा अथवा जमिनीवर, मातीमधे भरपूर सेंद्रीय खतं मिसळून घ्यावी. कुंडीत लावायचा झाल्यास कुंडी किमान फूटभर तरी खोल असलेली घ्यावी. कुंडीत लावताना मातीमधे ४०% कंपोस्ट, २०%-२५% नदीमधली ज्वारी-बाजरीच्या आकारातली वाळू, २०% शेणखत, चमचाभर ट्रायकोडर्मा अन २०% माती, दोन चमचे बोनमील वा स्टेरामील, असल्यास चमचाभर एप्सम सॉल्ट अन मुठभर नीमपेंड एकत्र करुन घेऊन रोप लावण्यापूर्वी आठवडाभर सेट होऊ द्यावी. वाळू नसेल तर त्याऐवजी कोकोपीट अथवा लीफमोल्ड जास्त प्रमाणात वापरावं. गुलाबाला मुळाशी पाणी साठलेलं अजिबात चालत नाही. त्यामुळं पाण्याचा निचरा होईल याची कटाक्षानं काळजी घ्यावी. मातीचा सामू म्हणजे पीएच ५.५. ते ७ असा म्हणजे ऍसिडिक असल्यास गुलाब उत्तम फुलतो. माती ऍसिडिक करण्यास कंपोस्ट हा एक उत्तम सेंद्रिय पर्याय आहे. अन त्यासाठीच गुलाबाला सुरुवातीपासुनच भरपूर कंपोस्ट देत रहावं.
गावठी गुलाबाचं रोप जर काडीपासुन तयार करायचं असेल तर साधारण पेन्सिलीच्या आकाराची किमान वीतभर लांबीची काडी घेऊन खालचा भाग पंचेचाळीस अंशाच्या कोनात कापून त्याला मध किंवा दालचिनीची पावडर किंवा कोरफडीच्या गरात भिजवुन ती एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत कंपोस्टमिश्रित माती घेऊन त्यात हलकेच खुपसुन माती दाबून घ्यावी अन पाणी द्यावं. तीन ते चार आठवड्यात हे रोप जिथं लावायचं आहे तिथं लावण्यास तयार होईल.नर्सरीतुन रोप घेताना ते साधारण एक वर्शः वयाचं असावं. कलम गाठीपासून वर किमान तीन तरी फांद्या फुटलेल्या असाव्यात. रोपावर जास्त फुलं असतील तर ती द्रवरुप रसायनांमुळंच असतील. त्यामुळं असं रोप म्हणजे सकस रोप हा निकष लावु नये. छोट्या कुंडीत वा प्लास्टिकच्या पिशवीत असलेलं गुलाबाचं कलम जर नर्सरीतुन आणलं असेल तर ते तसंच आठवडाभर अर्धसावलीत ठेऊन द्यावं. अशा रोपावर नर्सरीत वापरत असलेली द्रवरुप रासायनिक खतं धुऊन जाण्यासाठी संपूर्ण रोपावर व मुळाशीही रोज पाणी द्यावं. फक्त पाणी रोपाच्या खोडापाशी साठून रहाणार नाही याची काळजी घ्यावी.
घरीच काडीपासुन रोप तयार केलं असेल किंवा नर्सरीतुन तयार रोप आणून आठवडा झाला असेल अन आता अशारोपाचं कायमस्वरुपी स्थलांतर करण्याची वेळ आली असेल तर आधी तीन चार दिवस कुंडी वर सांगितल्याप्रमाणं भरुन घेऊन ती सेट होऊ द्यावी. नंतर रोप कुठल्याही बुरशीनाशकात दहा मिनिटं बुडवुन घ्यावं. नर्सरीच्या पिशवीतुन रोप अलगद काढून शक्य तेवढी माती मुळाला धक्का न लागेल अशा पद्धतीनं हलकेच काढून घ्यावी अन मगच बुरशीनाशकाच्या पाण्यात बुडवावं.
त्यानंतर कुंडीमधे रोपाच्या मुळाच्या आकारापेक्षा मोठा खड्डा करुन घ्यावा. म्हणजे तेवढी माती बाहेर काढून घ्यावी किंवा कुंडीतच वरच्या बाजुनं कडेला सरकवुन घ्यावी. रोप खालच्या पानांपासून मातीकडच्या बाजूला चार-पाच इंच खोडाचा भाग मातीच्या वरच्या भागात राहील अशा बेतानं अलगद खड्ड्याच्या मध्यभागी ठेवुन त्याभोवती थोडं कंपोस्ट अन बाजुला काढून ठेवलेली माती हलक्या हातानं भरुन घ्यावी. खोडाभोवती खोड मध्यभागी राहील अशा पद्धतीनं कुंडीच्या कडांकडे उतरेल असा ढीग करुन तो हाताच्या पंजानं हलकासा दाब देऊन माती दाबून घ्यावी. जेणेकरुन रोप सरळ उभं राहील अन पाणी दिल्यावरही बाजुला कलणार नाही. आवश्यकता भासल्यास एखादी काठी रोवुन रोप सरळ उभं राहील असं पहावं. यानंतर कुंडीतील सर्व माती व्यवस्थित भिजेल इतपत पाणी द्यावं. जर कलम असेल तर कलमाचा सांधा मातीखाली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. या सांध्यापासून खालच्या भागातुन पुढं फांद्या फुटू शकतात ज्यांना सकर्स म्हणतात. अशा फांद्यांना फुलं तर येत नाहीतच, पण झाडाला आपण दिलेलं खत हेच खात असतात अन त्यामुळं जिथं फुलं येणार आहेत त्या कलमांची उपासमार होते अन ते रोगाला बळी पडतात अन सुकून जातात.
कुंडीत रोप लावल्यावर कुंडी किमान आठवडाभर अर्धसावलीत ठेवावी. दिवसाआड किंवा आवश्यकता भासल्यास रोज पाणी द्यावं. पाणी कुंडीच्या खालून वाहुन जाईल इतपत पाणी न देता कुंडीत ओलसरपणा राहील इतपतच पाणी द्यावं. या दरम्यान रोपाचं निरीक्षण करावं. पानांवरुन लक्षात येईल की रोपानं बदल स्वीकारला आहे अन जीव धरला आहे. नवीन पानं किंवा कोंब फुटताना दिसले तर रोप नवीन जागी रुजलं असं समजायला हरकत नाही. कुंडीत किमान दोन चार लसणीच्या पाकळ्या पेरल्यास संभाव्य कीडीपासून बचाव होण्यास मदत तर होतेच. पण स्वैपाकात वापरण्यासाठी लसणीची पातही मिळते. कुंडीच्या आकारमानाप्रमाणं वर्ष-दीड वर्षातुन रिपॉटींग करावं. त्यासाठीही अशीच कुंडी भरण्याची अन रोप त्यात लावण्याची पद्धत वापरावी. फक्त सेट झालेलं रोप कुंडीतुन काढताना अतीशय काळजीपूर्वक काढावं. मुळांना धक्का लागता कामा नये याची पुरेपूर काळजी घ्यावी.
अजुन दोन तीन दिवस कुंडी तशीच ठेऊन मग जिथं किमान पाच सहा तास, शक्य असल्यास सकाळचं उन्ह मिळेल अशा ठिकाणी हलवावी. गुलाबाला थेट उन्ह चांगलं मानवतं. फक्त उन्हाळ्यात दुपारचं तीव्र उन्ह जर डोक्यावरच पडत असेल तर त्या दिवसांत काळजी घ्यावी. कुंडी वारंवार हलवण्यापेक्षा डोक्यावरच्या उन्हापासुन बचाव होईल अशी काहीतरी तात्पुरती व्यवस्था करावी. म्हणजे डोक्यावर पातळसर ओढणी वा तत्सम काही बांधुन छोटा मांडव करता आला तर करावा. गुलाबाच्या रोपांना हवा खेळती लागते. त्यामुळं आजुबाजूला दाटी होणार नाही याची काळजी घ्यावी. वेल गुलाब असेल तर तो चढवण्याची व्यवस्था करावी. गावठी गुलाब वेलीसारखा वर वाढतो. त्याची वाढ नियंत्रणात ठेवायची असेल तर वरची टोकं छाटायला हरकत नाही.
गुलाबाच्या रोपांची छाटणी करण्यासाठी योग्य काळ म्हणजे जुन महिन्याच्या शेवटी अन डिसेंबरच्या सुरुवातीला. जुन्या फांद्या अर्ध्यावर कापाव्यात. झाडाला छान झुडूपाचा शेप द्यावा. ज्या फांद्या वाळल्या असतील वा रोगग्रस्त असतील त्याही काढून टाकाव्यात. छाटणी नंतर कंपोस्ट किंवा शेणखत किंवा दोन्ही भरपूर देऊन पाणी द्यावं. सोबतीनं थोडी नीमपेंडही भुरभुरावी. छाटणी वर्षभरातुन एकदाच करावी. त्यापेक्षा जास्त वेळा केल्यास रोप कमकुवत होतं.
गुलाबाला पाणी आवश्यक असतं पण अती पाणी दिल्यास ओलसरपणा जास्त राहून रोपावर बुरशीजन्य रोग पडू शकतात. म्हणून मातीत ओलसरपणा राहील इतपतच पाणी द्यावं. उन्हाळ्यात दोन ते तीन दिवसांनी अन हिवाळ्यात सहा ते सात दिवसांनी पाणी दिलं तरी ते पुरेसं होतं. आपापल्या भागातील वातावरणानुसार पाण्याच्या पाळ्या अन प्रमाण बदलू शकतं. पाणी जास्त झाल्यास किंवा जास्तीच्या पाण्याचा निचरा होत नसल्यास गुलाबाची पानं पिवळी पडू लागतात. अशात रोपावर कळ्या असल्यास त्याही गळून पडतात किंवा फुलं विकृत स्वरुपात उमलतात. त्यामुळं पाण्याच्या योग्य प्रमाणाबरोबरच त्याचा योग्य निचरा होत आहे याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात सुक्या पालापाचोळ्याचं किंवा काडीकचऱ्याचं वा कुठल्याही डिकंपोज होणाऱ्या गोष्टीचं मल्चिंग केल्यास मातीत ओलसरपणा राखला जाईल. नारळाच्या शेंड्याही वापरल्या तरी हरकत नाही. शहाळी विकणाऱ्याकडून शहाळ्याचे तुकडे आणून ते बारीक करुन मातीच्या वरच्या भागात ठेवले तरी चालतील. फक्त यांना बुरशी लागण्याचा संभव जास्त असल्यानं त्यावर ट्रायकोडर्मा अथवा इतर कुठलंही बुरशीनाशक फवारावं. उन्हाळ्यात रोपाच्या पानांवर धूळ बसते. पाणी देताना पानांवरही थोडं फवारल्यास अशी धूळ निघून जाते अन रोपं टवटवीत दिसतात. फाक्त असं पाणी पानांवर थांबुन रहाणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.
गुलाबाला शक्यतो सेंद्रीय खतंच द्यावीत. कंपोस्ट, शेणखत भरपूर दिल्यास इतर कुठली खतं देण्याची गरज पडत नाही. चहाचा चोथा मातीत मिसळून दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्याबरोबरच केळ्यांच्या सालींचाही गुलाबाच्या वाढीसाठी अन फुलण्यासाठी चांगला उपयोग होतो. केळीच्या साली वाळवुन त्यांचा चुरा करुन मातीत मिसळल्यास वा साली पाण्यात एक दोन दिवस भिजवुन ते पाणी गुलाबाला दिल्यास त्यातले गुणधर्म रोपासाठी लवकर उपलब्ध होतात. परंतु खास गुलाबासाठी म्हणून चहाचा चोथा, केळीच्या साली अन कांद्याच्या साली यांचं कंपोस्ट बनवुन ते दिल्यास जास्त उपयोग होतो.
गुलाबाच्या रोपावर फुलं आल्यावर ती एक दोन दिवसांत तोडून घ्यावीत. तोडायची नसल्यास ती सुकू लागताच तोडावीत. जिथुन फुल फुललं आहे तिथपर्यंत कात्रीनं वा प्रुनरनं फुलं कापून घ्यावीत. हातानं तोडण्यासाठी झटापट केल्यास रोपाला धक्का बसु शकतो. म्हणून शक्यतो धारदार अन निर्जंतुक केलेली कात्री वापरावी. वाळलेली फुलं झाडावर तशीच ठेवु नये. मुळांवाटे घेतलेलं अन्न अशा फुलांनी घेऊन ते वाया जातं. त्यापेक्षा नवीन फुटीला अन नवीन कळ्यांना ते मिळाल्यास जास्त चांगलं.
गुलाबाचं रोप उन्हात असल्यामुळं जरी त्यावर फारसे रोग पडत नसले तरीही जे काही पडतात त्याकडं वेळीच लक्ष दिलं नाही तर रोप दगावण्याची शक्यता अधिक असते. गुलाबावर साधारणपणे खाली दिलेले रोग पडतात ;
पानांवर काळे ठिपके : पानांवर नेहमी पाणी मारण्यानं किंवा पावसाळ्यात पानांवर सतत पाणी पडल्यामुळं पानांवर काळे डाग पडतात. नंतर ही पानं पिवळी पडून गळतात. अशावेळी एखादं बुरशीनाशक वा कडूलिंबाच्या पाल्याचा अर्क किंवा नीमतेल डायल्यूट करुन पानांवर फवारावं. उन्हाळ्यात केलेलं मल्च डिकंपोज झालं नसेल तर ते काढून घेऊन कुंडी स्वच्छ ठेवावी. ते अर्धकच्चं मल्च इतर कुठल्या मोठ्या कुंडीत वा कंपोस्टबिनमधे टाकावं.शेंडा वाळणे : हाही एक बुरशीचाच प्रकार आहे. बागेत अस्वच्छता असल्यावर अशी बुरशी वाढण्यास मदतच होत असते. जिथून फुलं काढली आहेत तिथुन किंवा छाटणी केली आहे तिथुन फांदी खालच्या बाजुनं वाळायला सुरुवात होते. ती पसरत खालच्या भागाकडे जात जात संपूर्ण झाड या रोगाला बळी पडतं. अशी वाळलेली फांदी नजरेस पडताच लगेचच खालच्या दोन ते तीन इंचांपर्यंतचा हिरवा भागही छाटून टाकावा. शेणखत असेल तर अशा कापलेल्या भागावर त्याचा ओलसर गोळा करुन तो लावावा. जवळ कुठलंही बुरशीनाशक उपलब्ध असेल तर तेही फवारावं. छाटणी करताना किंवा फुलं काढताना सरळ कापली किंवा हातानं खुडली की ही बुरशी वाढण्यास मदतच होते. म्हणून नेहमी छाटणी करताना अन फुलं तोडताना धारदार कात्री वापरावी, तसंच छेद आडवा न देता तिरका द्यावा. म्हणजे अशा कापलेल्या भागावर पाणी थांबणार नाही.
भुरी अथवा पावडरी माईल्ड्यू : रोपांच्या नवीन फुटीवर किंवा फुलं काढल्यावर अथवा छाटणी केल्यानंतरयेणाऱ्या नवीन फुटीवर सुरुवात होऊन हा पांढऱ्या पावडरीसारखा दिसणारा रोग सर्व रोपभर पसरतो. पानांच्या खालच्या बाजूला अशी पावडर व्यापलेली असते. कडुलिंबाच्या पानांचा अर्क किंवा नीमतेल डायल्यूट करुन ते पानांवर फवारावं. हा रोग लक्षात आल्यावर लगेचच त्यावर उपाय करावेत. खराब झालेली पानं काढून टाकून दूरवर फेकून द्यावीत वा इतर कुठल्याही प्रकारे नष्ट करावीत. कंपोस्टमधे वा इतरांच्या बागेत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.मावा : रोपाच्या कोवळ्या व नवीन फांद्यांवर, न उमललेल्या नवीन कळ्यांवर पांढरे वा क्वचित हिरवे छोट्या पाखरांसारखे किडे दिसतात. हे किडे कोवळ्या पानांवर वा फांद्यांमधे छिद्रं पाडून आतला रस शोषून घेतात. परिणामी रोप निस्तेज दिसु लागते. कळी उमलल्यावर फुल रोगट दिसतं. असे किडे दिसुन येताच पाण्याचा फवारा वेगात मारल्यावर ते उडून जातात. कीड जर कमी असेल तर असं करायला हरकत नाही. पण कीड जास्त असेल किंवा वेगात पाणी मारुनही वारंवार येत असेल तर कडुलिंबाच्या पानांचा अर्क किंवा नीमतेल साध्या पाण्यात मिसळून फवारावं. याऐवजी लिक्विड डिश सोप एक लिटर पाण्यात एक चमचाभर मिसळून फवारल्यासही उपयोग होतो.
कुठल्याही रोगासाठी जी स्थिती जबाबदार असते ती म्हणजे पाण्याचा योग्य तो निचरा न होणं, अस्वच्छता अन खतपाण्याची वेळ न पाळणं. ही पथ्यं जर पाळली तर गुलाबावरच नव्हे तर बागेतल्या कुठल्याही रोपांवर रोग पडणार नाहीत. पाणी साचलं की मुळांचा जीव गुदमरतो अन त्यांना अन्न तयार करता येत नाही अन केलेलं अन्न वर शेंड्यापर्यंत पोहोचत नाही. खत वेळच्यावेळी दिलं नाही तरीही अन्नाचा तुटवडा निर्माण होतो. दोन्हीही स्थितींमधे रोपाचा आहार पूर्ण न मिळाल्यानं रोप कमकुवत होतं अन रोगाला बळी पडतं. म्हणून बाग नेहमीच स्वच्छ ठेवावी. पाण्याचा उत्तम निचरा होण्यासाठी कुंडीतील माती नियमितपणं हलक्या हातानं, मुळांना धक्का न पोहोचवता वरखाली करुन घ्यावी अन खतं नियमितपणं अगदी काटेकोरपणं वेळच्यावेळी द्यावी. गुलाब जर जमिनीवर लावले असतील तर त्यासाठी केलेली आळी पावसाळ्यात मोडावीत म्हणजे जास्तीचं पाणी साचणार नाही.
कलमी गुलाबाचं रोप संपूर्ण काळजी घेतली अन खतपाण्याचं पथ्य न चुकता व्यवस्थित पाळलं, रोग पडणार नाहीत याची दक्षता घेतली अन पडलेच रोग तर वेळीच उपाययोजना केली तर साधारणतः आठ ते दहा वर्षं व्यवस्थित टिकतं. गावठी गुलाब मात्र कणखर असल्यानं जास्त टिकतात.
फुलांचे फोटो घरच्या बागेतले तर किडींचे फोटो इंटरनेटवरुन साभार.
©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
खूप माहितीपूर्ण, धन्यवाद!
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवाSir so informative about rose everything included many thanks
उत्तर द्याहटवाThanks a lot for your kind words.
हटवाखूपच छान आणि उपयोगी माहिती. share केल्याबद्दल धन्यवाद सर..
उत्तर द्याहटवापोस्ट वाचल्याबद्दल अन ती आवडल्याचं आवर्जुन सांगितल्याबद्दल धन्यवाद.
हटवाखूपच छान आणि उपयोगी माहिती. share केल्याबद्दल धन्यवाद सर.. 🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवाखूप उपयोगी माहिती.
उत्तर द्याहटवाधन्यवाद.तुमच्या शब्दांनी हुरुप आला.
हटवा