सकस व भरपूर टोमॅटोचं पीक घेण्यासाठी काही टीप्स

सकस व भरपूर टोमॅटोचं पीक घेण्यासाठी काही टीप्स


बरेंचदा आपण घरच्या बागेत टोमॅटो लावतो. अगदी पद्धतशीर. संपूर्ण काळजी घेऊन. म्हणजे नर्सरीतुन बिया आणून अथवा भाजीसाठी विकत घेतलेल्या टोमॅटोच्या बिया पेरुन रोपं करतो. रोपं योग्य त्या उंचीची झाल्यावर ती कुंडीत अथवा तत्सम कंटेनरमधे ट्रान्सप्लांट करतो. त्यापूर्वी कुंडीत तज्ञांनी (?) सांगितल्याप्रमाणं पॉटींग मिक्स घालतो. रोपं लावुन त्यांना पाणी वगैरे देतो. त्यांची दृष्य स्वरुपातली वाढही अगदी योग्य असते. अधुन मधून कंपोस्ट वगैरे देत असतो. पाणीही बहुतेक वेळा अगदी टाईमटेबलनुसार देत असतो. अर्थात कधी हे वेळापत्रक पुढं मागं होतं, नाही असं नाही. पण दोन दिवसांचा खाडा झाला तर बॅकलॉग भरुन काढत दोन दिवसांचं मिळून जास्त पाणीही देत असतो. रोपंही आपल्या चुकांना माफ करत छान तरारत असतात. कधीमधी कीड असते, पण त्यावर आपण उपाय केल्यावर किंवा अगदीच आटोक्यात नाही आली तर तेवढी पानं तोडून टाकत असतो. मग वेळच्यावेळी रोपांवर छान नाजूकशी पिवळी फुलं दिसु लागतात. यथावकाश वाटाण्याच्या आकाराचा फिकट हिरवा गोल दिसु लागतो. दिसामाजी वाढणारं ते फळ आपण रोज नित्यनेमानं पहात रोपांना पाणी देत रहातो. पण कुठंतरी माशी शिंकते अन गुलाबजामएवढा आकार झाला की तेवढाच रहात हळूहळू टोमॅटो रंग बदलु लागतो. आठ दहा दिवसांतच टोमॅटो लाल बुंद होतो. आपण लावलेला टोमॅटो आता काढायला तयार झाल्याचं आपल्याला जाणवतं. पण बियांच्या पाकीटावर दाखवलेला आकार किंवा जो टोमॅटो कापून आपण ज्यातल्या बिया पेरल्या होत्या त्याच्या मानानं हे केवळ पंचवीस-तीस टक्के आकाराचं फळ पाहुन आपण हिरमुसून जातो. सगळं तर वेळच्या वेळी अन सांगितल्याप्रमाणं आपण केलेलं असतं. अगदी काटेकोरपणं नसेलही केलं कदाचित, पण नव्वद टक्के सारं केलं असतंच की. मग काय़ झालं? कुठं चुकलं अन हे पाप्याचं पितर आपल्या हाती आलं? असे प्रश्न पडून आपण विचारात पडतो अन कदाचित रासायनिक खतंच द्यायला हवीत असा विचार करतो. रासायनिक म्हणजे पापच ते. नकोच ते म्हणत आपण टोमॅटो लावण्याच्या वाटेला जात नाही. पण थोडेच दिवस आपला हा निश्चय टिकतो अन पुन्हा आपण सारे सोपस्कार पार पाडत पुन्हा तो लाल गुलाबजाम झाडावरुन तोडतो. काय चुकतं आपलं? तेच सांगतो.

टोमॅटोला भरपूर सुर्यप्रकाश लागतो अन खतं व अन्नद्रव्यांच्या बाबतीत हे पीक फारच संवेदनशील असतं. या पीकाची खतांची भूक फार तीव्र असते. त्यामुळं वेळच्यावेळी अन योग्य प्रमाणात खतं देणं फार गरजेचं असतं. या दोन गोष्टी सांभाळल्या तर आपल्या बागेत भरपूर टोमॅटो येतील. त्यासोबतीनंच खाली दिलेल्या सूचना पाळल्यास अधिक फायदा होईल.

बियांची निवड : टोमॅटोची लागवड करण्याआधी रोपं करुन घेणं गरजेचं असतं, त्यामुळं रोपं करायला ठेवण्यासाठी योग्य बियांची निवड करणं फार महत्वाचं असतं. बाजारातुन घेतलेल्या टोमॅटोच्या बिया वापरुन जरी त्या रुजल्या व योग्य वेळी आपल्याला टोमॅटो जरी मिळाले तरी ते तेवढ्याच आकाराचे असतील याची खात्री नसते. कारण स्वाभाविकच आहे की बाजारातले टोमॅटो हे रासायनिक खतांवर पोसलेले असतात. तसंच ते झाडांवर पूर्ण पिकण्याआधीच काढलेले असतात. अशा स्थितीत ते आपण देत असलेल्या कंपोस्ट वगैरे सेंद्रिय खतांवर वाढतीलच याची खात्री नसते. म्हणून शक्यतो बिया नर्सरीतुनच विकत आणाव्यात. आपली टोमॅटोची एक सायकल पुर्ण होत असताना केवळ बियांसाठी म्हणून किमान दोन फळं झाडावरच पूर्ण पिकु द्यावीत व अशा बिया पुढील लागवडीसाठी वापराव्यात. हे दरवेळी करत राहिलं तर आपल्याला प्रत्येक वेळी खात्रीशीर बियाणं उपलब्ध असेल. हे केवळ टोमॅटोच्याच बाबतीत नव्हे तर इतरही फळं अन फळभाज्यांच्या बाबतीत करावं.

पुनर्लागवड : टोमॅटोच्या रोपांची पुनर्लागवड म्हणजेच ती ट्रान्सप्लांट करावी लागतात. टोमॅटो व्यतिरिक्त बऱ्याचशा प्रकारात रोपं बनवुन त्यांची पुनर्लागवड करतात. पण टोमॅटोच्या बाबतीत पुनर्लागवड करताना अधिक काळजी घेण्याची गरज असते. टोमॅटोचं रोप जमिनिला जिथं टेकतं तिथं नवीन मुळ्या फुटतात. त्यामुळं रोप मातीत लावताना रोपाच्या खालच्या भागावर असलेल्या पानांपर्यंत खोडाचा भाग आत जाईल एवढा खड्डा करुन त्यात रोप लावुन मातीनं बुजवुन घ्यावा. म्हणजे रोपाला अधिक मुळ्या फुटुन त्याची वाढ जोमानं होईल अन पर्यायानं पीकही जास्त मिळेल. आपण जेव्हा बिया पेरुन रोपं तयार करतो तेव्हा सगळेच सीडलिंग ट्रे वापरत नाहीत. कुंडीत वा एखाद्या तात्पुरत्या जागी बिया पेरतो. त्याही सुट्या पडतीलच याची खात्री नसते. त्यामुळं रोपं दाटीवाटीनं तयार होतात अन एकमेकांशी स्पर्धा करत मोठी होतात. सहाजिकच बहुतांशी रोपं वाकडीतिकडी तयार होतात अन मातीच्या पातळीवर कोन घेऊन सुर्याच्या दिशेनं वाढत मोठी होतात. अशा रोपांची पुनर्लागवड करताना ती वरच्या दिशेनं सरळ रहातील अशी लावण्यासाठी जिथपर्यंत वाकडी वाढली आहेत तिथपर्यंत ती मातीत हळुवार खोचली तर त्यांची पुढील वाढ सकस होते. रोपं निम्म्या खोडापर्यंत, अगदी खालच्या पानांच्या गुच्छापर्यंत मातीत लावल्यामुळं भरपुर नवीन मुळंही फुटतात अन रोपही त्यामुळं व्यवस्थित उभं रहातं.

छाटणी (प्रूनिंग) : रोपांची पुनर्लागवड करुन ती नवीन जागी स्थिरावल्यावर नवीन पालवी फुटू लागते. शेंड्यावर नाजुकशी पानं असलेल्या छोट्याशा फांद्या वाढू लागतात. पुढं इथंच फुलं येऊन टोमॅटो येणार असतात. तसंच खोडावर असलेल्या फांद्यांच्यामधेही खोडापाशीच नवीन लहान फांद्या येऊ लागतात. यांना सकर्स म्हणतात. तेही जर वाढले तर यांच्यावरही फुलं अन नंतर फळं लागतात. परंतु जर आपल्याला अधिक फळं अन तीही सकस हवी असतील तर एक छोटासा दगड आपल्यावर हृदयावर ठेऊन हातात कात्री घेण्याची गरज असते. (दगड कुठल्या रंगाचा अन किती वजनाचा याचा विचार करु नये अन ते विचारुही नये.) तर कात्री घेऊन शेंड्यावरच्या छोट्या फांद्या अन हे सकर्स नजरेस पडल्यावर लगेच कापून टाकावेत. शेंडा कट केल्यानं नवीन फांद्या फुटतील अन जास्त टोमॅटो लागतील. तसंच सकर्स वेळीच कापल्यामुळं रोपाच्या मध्यभागी फांद्यांची दाटी होणार नाही अन पर्यायानं हवा खेळती राहील अन रोपाच्या आतल्या भागातही सूर्यप्रकाश पोहोचेल. असं न केल्यास  सुर्यप्रकाशाअभावी रोपांस व फळांस बुरशीजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असते. अशा फांद्या जर निरोगी असतील तर त्या रोपाच्या बुंध्यापाशीच मल्चिंग म्हणून टाकाव्यात.

याबरोबरच जुनी अन जुनी होऊ घातलेली पानंही छाटावीत. काही जुन्या पानांवर चित्रविचित्र नक्षीकाम तयार झालं असेल किंवा काही पानांच्या मागल्या बाजुला पावडरीसारखं काही दिसत असेल तर अशाही फांद्या कापून टाकाव्यात. फक्त या फांद्या दूर फेकून द्याव्यात वा अन्य मार्गानं नष्ट कराव्यात. मल्चिंग म्हणून वा कंपोस्टमधे यांचा उपयोग करु नये.

सुर्यप्रकाश, खतं अन अन्नद्रव्यं : टोमॅटोला भरपूर सुर्यप्रकाशाची गरज असते. किमान ५ ते ६ तासांचा सुर्यप्रकाश मिळाल्यावर रोपांची वाढही चांगली होते अन रोगाचं प्रमाणही कमी असतं.

टोमॅटोच्या रोपाची भूक प्रचंड असते. योग्य प्रमाणात अन योग्य वेळी याला अन्न मिळत गेल्यास सकस फळं मिळतात. भरपूर सूर्यप्रकाश अन अन्न, तेही नत्रयुक्त मिळाल्यावर रोपांची वाढ निकोप होते अन पर्यायानं फळंही जास्त मिळतात. यासाठी रोपांची पुनर्लागवड करण्याआधी परिपूर्ण माती तयार करुन घेणं गरजेचं असतं. रोपं नवीन जागी स्थिरावेपर्यंत त्याला लागणारी सारी अन्नद्रव्यं ही मातीमधे अगोदरपासूनच, अन तीही सेट झालेली असणं गरजेचं असतं. यासाठी कुंड्या वा वाफे तयार करत असतानाच त्यात भरपूर सेंद्रिय खतं घालावीत. कंपोस्ट, शेणखत, बोनमील / स्टेरामील, नीमपेंड वगैरे घटक इतर झाडांपेक्षा जास्त प्रमाणात घालून कुंड्या अन वाफे तयार करुन सेट होऊ दिल्यावर जर रोपांची त्यात पुनर्लागवड केली तर टोमॅटोला सुरुवातीपासुनच भरपुर अन्नद्रव्यं मिळत रहातील अन रोपं जोमानं वाढतील. टोमॅटोच्या झाडावर फुलं येण्यास सुरुवात झाल्यापासून झाडाला खतं देताना त्यात नत्राची मात्रा कमी ठेवावी. नत्र जास्त प्रमाणात दिलं गेल्यास झाडावर पानं भरपूर प्रमाणात येतील अन झाड टवटवीत दिसेल पण फुलं अन नंतर फळं वाढण्याच्या दृष्टीनं त्याचा काही उपयोग नसतो. किंबहुना फळांच्या वाढीला अशी अतिरिक्त पानं अडथळाच ठरतात. कारण अशी दाट अन हिरवी पानं मुळांद्वारे मातीतुन घेतला गेलेला कॅल्शियम स्वतःच घेतात अन फळांना मिळू देत नाहीत. त्यामुळं फळं एक तर लहान अन कुपोषित रहातात किंवा ब्लॉसम एंड रॉट या रोगाला बळी पडतात.

पाणी : टोमॅटोची जशी भूक प्रचंड असते तशीच तहानही. त्यामुळं पाण्याचा खाडा करणं शक्यतो टाळावं. उन्हाळ्यात तर नियमितपणं पाणी देणं गरजेचं असतं. अगदी गरज भासल्यास दिवसातुन दोन वा अधिक वेळाही द्यावं लागलं तरी ते द्यावं. आळस करु नये. पाणी देण्याची वेळ ओळखणं म्हणजे मातीत बोट इंचभर आत खुपसुन पहाणं. ओलसर लागलं तर हरकत नाही. पण कोरडं वाटलं तर लगेचच पाणी द्यावं. तसंच रोप सरळ उभं न रहाता कललेलं दिसत असल्यास वा पानं कोरडी दिसल्यास लगेचच पाणी द्यावं.

रोग : टोमॅटोवर प्रामुख्याने पडणारे रोग म्हणजे कीड अन अळ्या. नागअळीच्या प्रादुर्भावामुळं रोपाच्या पानांवर चित्रविचित्र नक्षी तयार होते. अशी पानं नजरेस पडल्यावर लगेचच ती काढून नष्ट करावीत. तसंच, पानांच्या मागच्या बाजूला पावडर फवारल्याप्रमाणे मावा हा रोग असतो. कधी पानांच्या गुच्छांवर खालच्या बाजुला मिलीबग्जही दिसतात. यांवर नीमतेल वा नीमतेल बेस असलेलं कुठलही द्रव फवारावं. प्रसार जास्त असेल तर रोपाचा तेवढा भाग काढून नष्ट करावा.

याव्यतिरिक्त टोमॅटो वाढत असतानाच्या काळात जर कॅल्शियमची कमतरता असेल तर काही फळं खालच्या बाजुनं करपलेली अन नंतर सडल्यासारखी दिसतात. याला ब्लॉसम एंड रॉट असं म्हणतात. असं दिसून आल्यास झाडाला त्वरित कॅल्शियम पुरवणारी खतं देण्याची गरज असते. यासाठी अंड्यांच्या कवचांची भुकटी वा बोनमील वा डायल्यूट केलेलं आंबट ताक हे रोपांना द्यावं व पानांवरही फवारावं. वास्तविकतः मातीमधुन मिळणारा कॅल्शियम हा रोपांसाठी पुरेसा असतो. फक्त तो शोषून घेण्यासाठी मातीमधे ओलावा असणं गरजेचं असतं. जेव्हा फळं वाढीच्या काळात पाणी कमी दिलं गेलं की हे असं होतं. त्यासाठी फळं वाढण्याच्या काळात पाण्याचा खाडा करु नये. पाणी नियमित मिळाल्यास मातीमधला कॅल्शियम, झाड मुळांवाटे रोपाच्या सर्व भागात पसरवु शकतं.

कधी पानांवर पांढरे ठिपके दिसु लागतात. याला कारण म्हणजे पाण्याचा ताण, गरजेपेक्षा जास्त उन्ह किंवा खताची कमतरता. आधी सांगितल्याप्रमाणं या पीकाची खतांची भूक अधिक तीव्र असते. त्यामुळं वेळच्या वेळी खतं देणं, पाण्याच्या वेळा कटाक्षानं पाळणं हे तर करावंच लागतं. पण त्याहीसोबत उन्हाची तीव्रता जिथं जास्त असेल अशा ठिकाणी टोमॅटो लागवड न करणं अन जर कुंड्यांमधे लागवड केली असेल तर त्या अशा जागी ठेवाव्यात की जिथं दुपारचं तीव्र उन्ह जास्त वेळ पडणार नाही. अन अशी जागा टाळणं शक्य नसेल तर किमान उन्हाळ्यात कुंड्यांवर आच्छादन घालावं.

रोपांची अन फळांची नियमित तपासणी करत रहाणं अन काही वेगळं दृष्टीस पडताच कारवाई करणं हे फार आवश्यक असतं. या नियमित तपासणीत जर खालील गोष्टी नजरेस पडल्यास त्यावर त्वरित उपाय करावा,

१) पानांवर छिद्रं - पानांवर छिद्रं दिसताच कुंडीत वा रोपाच्या आजुबाजुला रोपांवर व मातीमधेही कुठं कीड दिसते का ते पहावं. काही किडी या रात्री सक्रीय होतात. दिवसा अशा किडी मातीमधे स्वतःला गाडून घेतात. अशा वेळी माती उकरुन कुठं कीड दिसते का ते पहावं. दिवसाही काही किडी नजरेस पडल्यास त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा.

२) रोपं निस्तेज दिसणे - अतीउष्णतेमुळं अन पाण्याच्या कमतरतेमुळं टोमॅटोची रोपं मलूल पडतात. ती सरळ उभीही राहु शकत नाहीत. पानं कोमेजून जातात. असं दिसल्यास त्यांना त्वरित भरपूर पाणी द्यावं. वर म्हटल्याप्रमाणं टोमॅटोच्या रोपाची तहान भरपूर असल्यानं पाण्याचा ताण देऊ नये. रोपाला योग्य प्रमाणात पाणी नियमितपणं देणं गरजेचंच आहे.

३) पानं काळी वा तपकिरी पडणे - टोमॅटोच्या रोपांची दाटी झाल्यास वा एकाच वाफ्यात किंवा कुंडीत सतत टोमॅटोची लागवड करत राहिल्यास असा रोग पडण्याची दाट शक्यता असते. म्हणून दोन रोपांत किमान दीड ते दोन फूट तरी अंतर राखणं गरजेचं असतं. त्यामुळं रोपाला सर्व बाजुनं खेळती हवा अन सुर्यप्रकाश मिळतो. तसंच एकाच मातीत सतत लागवड करत राहिल्यास बुरशीजन्य रोगांची वाढ होत रहाते अन त्याला रोप बळी पडतं.

४) फळं तडकणे - कधी कधी झाडावर असलेल्या टोमॅटोंना तडा गेलेला दिसतो. बरेच दिवस पाणी दिलं गेलं नाही अन देताना जास्त पाणी दिलं गेलं की असं घडतं. यासाठी नियमितपणं पाणी देणं आवश्यक असतं. कधी खाडा झालाच तर पाणी देताना सावकाश अन आवश्यक तेवढंच द्यावं. उगीच जास्त पाणी देऊ नये.

आधार : टोमॅटोची रोपं फार नाजूक असतात, अगदी एखाद्या वेलीप्रमाणंच. त्यामुळं ती सरळ वाढू शकत नाहीत. आधाराच्या बाजुला झुकणं वा सरळ जमिनीवर लोळण घेणं हे याबाबतीत नेहमीचंच असतं. म्हणून वाढीच्या काळात, वेळेआधीच रोपांना आधाराची व्यवस्था करुन ठेवावी लागते. टोमॅटोची लागवड कुठं अन कशात केली आहे यावर आधार देण्याचा प्रकार अवलंबून असतो. जर कुंडी वा तत्सम प्रकारात लागवड केली असल्यास त्यामधे एक काठी उभी करुन त्या काठीला रोप बांधून ठेवता येतं. जर वाफ्यात लागवड केली असेल तर प्रत्येक रोपासाठी एक काठी किंवा दोन टोकांना दोन मोठ्या अन जाडसर काठ्या अन त्यावर दोरी अथवा तार बांधून प्रत्येक रोपाच्या डोक्यावर येईल अशी दोरी वा सुतळ त्य़ा तारेला बांधुन घेऊन ती दोरी रोपाभोवती गुंडाळता येते.

पण हे सगळं सुरुवातीपासुनच करावं. एकदा टोमॅटो धरले की त्यांच्या वजनामुळं रोपं कलंडतात. अन टोमॅटो जमिनीला, मातीला टेकले की ते खालच्या टोकाकडून खराब होतात.

हे सगळे उपाय वेळच्यावेळी केल्यावर तुमच्या बागेत भरपूर अन रसरशीत टोमॅटो नक्कीच येतील.

©राजन लोहगांवकर

सर्व हक्क लेखकाचे स्वाधीन

वानस्पत्य 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...