गच्चीवरील_भाजीपाला - आंतरपिकं वा मिश्र पिकं

गच्चीवरील_भाजीपाला

लेखांक ०८

आंतरपिकं वा मिश्र पिकं

जमीनीवरील शेतीमधील आंतरपीक किंवा मिश्र पीक या पद्धतींचे अर्थ आपल्या गच्चीवरच्या अथवा बाल्कनीमधल्या बागेच्या तुलनेत वेगळे असतात. जेव्हा व्यापारी तत्वावर शेती केली जाते तेव्हा अशा पद्धतीनं पिकं घेण्याची अनेक कारणं असतात. त्यातील बह्वंशी कारणं ही आर्थिक बाबींशी संबंधित असतात. म्हणजे मुख्य पिकाचा कालावधी जर जास्त असेल तर तेवढ्या कालावधीत कमी कालावधीत तयार होणारी पिकं घेणं, उदा. लवकर तयार होणाऱ्या भाज्या अथवा झेंडू सारखी फुलं. यामधे मुख्य पिकाला दिलेल्या खतपाण्यामधेच अशी पिकं जोपासली जातात व ती मुख्य पिकाला हानीही पोहोचवत नाहीत. दुसरा प्रकार म्हणजे मुख्य पिकावर येणाऱ्या कीडीला अटकाव करणं. त्यावर येणाऱ्या किडीला आपल्याकडे आकर्षित करुन घेणं अथवा तिचा परस्पर नायनाट करणं. या प्रकारात कीटकनाशकं फवारणीचा खर्च वाचतोच पण आंतरपिकांद्वारे अर्थार्जनही होतं.

हे झाले व्यापक प्रमाणावर शेती करत असतानाच्या अनेक फायद्यांमधले काही फायदे. आपली शेती कुंड्यांमधली अन काहीशे स्क्वेअरफुटांमधली. त्यामुळे जमिनीवरील शेतीमधे असणाऱ्या आंतरपीक पद्धतीवरच्या फायद्यांची नुसती तोंडओळख आपल्यासाठी पुरेशी आहे. पण आपल्यासाठी ही पद्धत जसे हे दोन फायदेही करुन देते तसंच ती कमी जागेत आपल्याला जास्त पिकं घेण्यास मदत करते.

साधारणपणे जेव्हा एकाच जागेत किंवा एकमेकांजवळ दोन पिकं एकाच वेळी घेतली जातात तेव्हा ती एकमेकांना त्रासदायक न ठरता सहाय्य करणारी, कॉम्प्लिमेंट करणारी असावी लागतात. तसंच कुंडीमधे उपलब्ध होणाऱ्या खताचा वापर करताना एकमेकांशी स्पर्धा न करता प्राप्त झालेलं खत आपसांत वाटून घेऊन वाढणारी असावी लागतात. तसंच दोन पिकं एकाच दिशेनं वाढणारी असून चालत नाही. म्हणजे उदा, कुंडी छोटी असेल अन पिकंही एकमेकांना पूरक असली तरी मुळा आणि गाजर किंवा बटाटा एकत्र घेऊन फायदा नाही. तसंच वांगी अन टोमॅटोही एकत्र घेऊन फायदा नाही. यासाठी आपल्याला आधी मित्र पिकं कुठची अन शत्रू पिकं कुठची हे पहायला हवं झालंच तर पिकांच्या वाढीची दिशाही विचारात घ्यायला हवी.

झाडांमधे काही प्रकार असे आहेत की जे कुठल्याही भाज्यांसोबत घेतले तरी चालतात. ते नुसतेच फुलं अथवा फळं देत नाहीत तर बागेतील किडींवरही नियंत्रण ठेवतात अन मातीही सुपीक करतात. अशी पिकं म्हणजे झेंडू आणि चवळी. झेंडू किडींना आपल्याकडे आकर्षित करुन घेतो. तसंच आपल्या मुळांद्वारे सूत्रकृमींवरही ( Nematodes ) नियंत्रण ठेवतो (यावर आपल्या ग्रुपचे अभ्यासू व बुरशी या विषयावरील तज्ञ श्री कौस्तुभ यद्रे यांनी विस्तृत लेख दिला होता तो समूहावरील फाईल्स सेक्शनमधे ठेवला आहे. त्याची लिंक इथं देत आहे. सर्वांनी तो जरूर वाचावा. बाग कितीही छोटी असली तरीही. https://www.facebook.com/groups/pltambe/permalink/2436388553268462/ ) तसंच चवळी शेंगा अथवा चवळीचे दाणे देण्यासोबतच मातीमधे नत्राची पातळी वाढवुन नत्रप्रिय झाडांना वाढीसाठी मदतच करत असते.

शेतीच्या या दोन पद्धतींच्या बरोबरीनंच अजुन एक प्रकार लोकप्रिय आहे, त्यातही खास करुन गच्ची-बाल्कनीतील बाग असणाऱ्यांमधे अन तो म्हणजे बहुस्तरीय शेती अर्थात मल्टीलेअर फार्मिंग. या प्रकारेही झाडं लावणं चांगलंच आहे. फक्त या प्रकारातही वरील दोन मुद्दे लक्षात घ्याय़ला हवेत. कारण नुसत्याच फिजिकल गरजा अन झाडांच्या उंची ध्यानात घेऊन फायदा नाही तर माती, खत व पाणी यांची मात्रा, एकमेकांना वाढण्यासाठीची जागा, एकमेकांना ते सहाय्य करतात की स्पर्धा करतात तेही बघणं गरजेचं आहे. कुठं काय लावावं, कुठली पिकं एकत्र लावावी, त्यासाठी प्रत्येकाची आवड, जागेची उपलब्धता हे विचारात घेणं गरजेचं आहेच. फक्त अशी एकत्र लावण्यात येणारी पिकं ही मित्र पिकं असायला हवीत.

खाली मित्रपिकं अन शक्य तिथं शत्रू पिकं यांची यादी दिली आहे.

टोमॅटो सोबत झेंडू, लसूण, कांदा, तुळस, कोथिंबीर, गाजर पण बटाटा, बीट, बडीशेप आणि मक्यापासून दूर

वांगी सोबत भेंडी, सर्व प्रकारचे बीन्स, भोपळी मिरची, बटाटा आणि पालक

भेंडी सोबत वांगी, कलिंगड, काकडी, रताळी, भोपळी मिरची

मिरची सोबत तुळस, गाजर, कांदा, लेट्युस, पालक, भेंडी, मुळा, बीट, मका, टोमॅटो, लसूण, काकडी, वांगी

बटाट्यासोबत झेंडू, वाटाणा, सर्व प्रकारचे बीन्स, मका, कोबी, वांगी, गाजर, कांदा पण काकडी, भोपळा, टोमॅटो आणि सूर्यफुलापासून दूर लावावा.

कारली सोबत सर्व प्रकारचे बीन्स, वाटाणा, लाल भोपळा इ. लावु शकता. फक्त बटाटे व पुदीना वगैरे पासून दूर.

गवारीसोबत कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, गाजर, वाटाणा 

भोपळी मिरचीसोबत झेंडू, कांदा, लसूण, तुळस, गाजर, वांगी आणि काकडी पण कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, मोहरी व बडीशेपपासून दूर

गाजरांसोबत झेंडू, लेट्युस, सर्व प्रकारचे बीन्स, भोपळी मिरची. तसंच एक ओळ गाजर तर एक ओळ मुळा किंवा कांदा लावला तरीही चालतं.

काकडीसोबत झेंडू, सर्व प्रकारचे बीन्स, वाटाणा, गाजर, मुळा, लेट्यूस आणि कांदा पण बटाटे आणि सुर्यफुल पासून दूर

पालक अन्य झाडांच्या सावलीत चांगला बहरत असल्यानं सर्व प्रकारचे बीन्स, मका आणि मुळ्यासोबतीनं लावल्यास उत्तम.

गुलाबासोबत लसूण लावल्यानं गुलाबावरच्या किडीचंही नियंत्रण होतं.

कोबीसोबत पुदीना आणि पालक

कोबी व फ्लॉवरसोबत झिनिया लावला तर त्यावर लेडीबग्ज आकर्षित होतात अन कोबी-फ्लॉवरवरील कीड खातात. झालंच तर कांदा, बटाटा व झेंडूही सोबत लावले तर उत्तम. टोमॅटो अन स्ट्रॉबेरीपासून दूर लावावेत.

कांदा कुठल्याही झाडांसोबत लावता येतो. आपल्या उग्र वासामुळं तो किडींना दूर ठेवतो. पण शक्यतो सर्व प्रकारचे बीन्स आणि वाटाण्यासोबत लावणं टाळावं

स्ट्रॉबेरी सोबत लेट्युस, पालक, सर्व प्रकारचे बीन्स आणि कांदा लावावा पण कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोलीपासून दूर लावावा

कलिंगड व टरबूजासोबत मका आणि मुळा लावु शकता पण बटाट्यापासून दूर

बीटसोबत लेट्युस, कांदा व कोबीवर्गीय भाज्या लावता येतील पण घेवड्यापासून दूर

घेवड्यासोबत मका, मुळा, स्ट्रॉबेरी, काकडी

कुकुर्बिट फॅमिली, म्हणजे काकडी, दुधी, पडवळ, लाल भोपळा, कोहळा, कलिंगड इ. सोबत मका, सर्व प्रकारचे बीन्स, बीट, मुळा, पण बटाट्यांपासून दूर.

लेट्युस सोबत काहीही लावू शकता. किंबहुना कुणाही सोबत लेट्यूस लावा. कुंडीतील मातीमधे सहज लावता येतं.

मेथी सोबत ज्या भाज्यांना अधिक नत्र लागतं अशा भाज्या उदा., कोबी, फ्लॉवर, मका, ब्रोकोली लावाव्यात.

कोथिंबीर सोबत कोबी, फ्लॉवर, पालक, सर्व प्रकारचे बीन्स, लेट्युस, वाटाणा लावु शकता.

रताळी सोबत भेंडी, बीट, घेवडा. शक्यतो लाल भोपळा रताळ्यासोबत लावू नये. याचं प्रमुख कारण असं की दोन्ही वेल जमिनीवर खूप पसरतात आणि एकमेकांना वाढीसाठी अडथळा निर्माण करतात. म्हणून शक्यतो हे दोन्ही एकत्र लावणं टाळावं.

आल्यासोबत जास्वंद, गवतीचहा, मिरची, ऑर्किड, 

हळदीसोबत मिरची, गवतीचहा, कोथिंबीर. तसं पहाता कुठल्याही मोठ्या फळझाडाखाली हळद लावल्यास ती उत्तम वाढते. कारण हळदीला झाडांच्या पानांतुन येणारं उन्ह असलं तर ती छान वाढते.

बहुतांशी भाज्या ज्या आपण आपल्या गच्ची व बाल्कनीमधल्या छोटेखानी बागेत घेऊ शकतो त्यांचा विचार वर दिलेल्या यादीमधे केला आहे. आशा आहे की उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करत जमतील तितक्या भाज्या घरच्याघरी घेणं अन तेही सेंद्रीय खतावरच, आपणांस शक्य होईल.

तळटीप : आवश्यक तिथं आणि आधारासाठी आंतरजालावरील विविध साईट्सचा वापर केला आहे.

© राजन लोहगांवकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...