कुंड्यांसाठी खताचं योग्य प्रमाण

कुंड्यांसाठी_खताचं_योग्य_प्रमाण

प्रत्येक बागकर्मीला काही ठराविक प्रश्न असतात. त्या प्रश्नांतला एक सामायिक प्रश्न असतो अन तो म्हणजे कुंडीतील झाडाला खत किती मात्रेत म्हणजे किती प्रमाणात द्यावं. खत, मग ते सेंद्रीय असो की रासायनिक, प्रत्येक खताचं प्रमाण हे रोपाच्या आकारावरुन अन त्याच्या वयावरुनच ठरत असतं. आपण जेव्हा घरच्या बागेविषयी विचार करत असतो तेव्हा रासायनिक खतांच्या वाटेला न गेलेलंच बरं. तेव्हा या लेखात आपण केवळ सेंद्रीय खतांचाच विचार करु.

सेंद्रीय खतांमधे प्रामुख्यानं येतात ती म्हणजे ज्यात रोपांना त्यांच्या वाढीसाठी अन फुलण्या-फळण्यासाठी जी काही अन्नद्रव्यं लागतात व रोपांना सहजपणं घेता येतात ती खतं. यामधे मोडतात ती कंपोस्ट, शेणखत, गांडूळखत, लेंडीखत, बोनमील, नीमपेंड, ब्लडमील, फिशमील, ह्युमिक ऍसिड, जीवामृत, वेस्टडिकंपोजरचं द्रावण, लाकडाची राख इत्यादी. याव्यतिरिक्त कांद्याची सालं व इतर फळांच्या सालींचं पाणी वगैरे जे काही आहे ते म्हणजे पूरकं वा ज्याला आपण सप्लिमेंट्स म्हणू शकतो ती खतं. ही खतं मुख्य खतांना पूरक असतात. जी असली तर उत्तमच. पण नाही दिली तरी चालू शकतं अशा वर्गात ही मोडतात. 


तसं पहाता बहुतांश सेंद्रीय खतं देण्याचं प्रमाण जरी एखाद्या वेळेस जास्त झालं तरी फारशी चिंता करण्यासारखं काही नसतं. कारण त्यामधे असलेलं अन्नद्रव्यांचं प्रमाण हे मर्यादित स्वरुपात असतं. पण काही सेंद्रीय खतं अशी आहेत की ती प्रमाणाबाहेर दिली गेल्यास रोपांचं नुकसान होऊ शकतं. उदा. लेंडीखत. लेंडीखत हे शेळ्या-मेंढ्या-बकऱ्यांच्या लेंड्यांपासून अन कोंबडीच्या विष्ठेपासून बनवलं जातं. य़ा प्राण्यांची शारिरीक जडण-घडण अन त्यांनी खाल्लेला पाला, काटेकुटे वगैरे पचवण्यासाठी असलेली त्य़ांच्या शरीरातली आंतरिक योजना पहाता त्यांच्या विष्ठेत अतिशय उष्णता असते. ही उष्णता आधी घालवावी लागते.

त्यामुळं कुठल्याही प्रकारचं खत जे प्राण्यांच्या विष्ठेपासुन बनवलं जातं ते आधी पुर्णपणं डिकंपोज होऊ देणं गरजेचं असतं. गायीचं शेण असो की म्हशीचं. त्यात विविध प्रकारचे जीवाणू असतात. त्यांच्या ताज्या शेणात तर मिथेनसारखे वायूही असतात. त्यामुळं तुम्ही जर ही सारी खतं विकत घेत असाल तर ती पूर्णपणे डिकंपोज झाली आहेत याची खात्री करुन घेणं गरजेचं असतं. जर हे सगळं साहित्य आणून घरीच खतं करणार असाल तर ती पूर्णपणं डिकंपोज करुन मगच बागेत वापरण्यास घ्यावी. यातील प्रत्येक घटकाची, म्हणजे गायी-म्हशीच्या शेणाची, कोंबडी व शेळ्या-मेंढ्या यांची लेंडीस्वरुपात असलेली विष्ठा वगैरेंची डिकंपोज होण्याची पद्धत जरी एक असली तरी त्य़ासाठी लागणारा कालावधी कमी-अधिक असु शकतो. त्यामुळं हे सगळं पूर्णपणं डिकंपोज होऊन त्यात निर्माण झालेली उष्णता पूर्णपणं निघून गेल्यावरच ती वापरण्यास घ्यावी. म्हशीचं शेण खत म्हणून दिलं तर त्यात हमखास हुमणीच्या अळ्या होतातच. म्हणून शेणखत दिल्यावर पुढचे काही दिवस माती सतत उकरुन पहावं लागतं. अर्थात हुमणी असेल तर ते रोपाच्या निस्तेज पानांवरुन ते लक्षात येतंच. पण काळजी ही घ्यावीच लागते. 

आता मुख्य प्रश्न असा येतो की कुंड्यांमधे रोपांना देताना या साऱ्याचं प्रमाण किती असावं. तर वर उल्लेखिलेली जी खतं आहेत त्यापैकी, कंपोस्टचं प्रमाण जास्त झालं तरी चालु शकतं. मध्यम ते मोठ्या कुंडीतील मातीच्या थरावर जास्तीत जास्त एक इंच भरेल एवढं कंपोस्ट आपण दर दोन आठवड्यांनी देऊ शकतो. अर्थात ते देताना मातीमधे मिसळूनच द्यायचं असतं. लहान कुंड्यांसाठी हे प्रमाण अर्धा ते पाऊण इंचाचं असावं.

कंपोस्ट वगळता इतर खतं छोट्या कुंड्यांना एक चमचा, मध्यम आकाराच्या कुंड्यांना दीड ते दोन चमचे अन मोठ्या म्हणजे वीस लिटर्सच्या पुढच्या कुंड्यांना एक मूठभर द्यावं. हे देण्याच्या कालावधीही साधारण दोन आठवडे ठेवावा. पूर्ण तयार असलेलं कंपोस्ट जर उपलब्ध असेल तर हे सगळं या प्रमाणात कंपोस्टमधे मिसळून ते दोन-तीन दिवस सेट होऊ देऊन मग दिलं तर उत्तम. असं मिश्रण कुंडीमधे एक इंच थर होईल असं पण मातीत मिसळून द्यावं. जीवामृत वा वेस्टडिकंपोजरचं द्रावण पाचपट पाण्यात मिसळून कुंडीच्या आकाराप्रमाणं अर्धा ते एक मग द्यावं. हे देताना कंपोस्टच्याच वेळी द्यावं असं काही नाही. दिल्यास उत्तमच. पण दोन्हींमधे एक आठवड्याचं अंतर राखलं तरीही चालु शकतं. म्हणजे समजा आज कंपोस्ट दिलं तर आठवड्यानं जीवामृत वा वेस्ट डिकंपोजरचं द्रावण द्यावं. हे दोन्ही नसलं तरी फारसं काही बिघडत नाही. तुमच्याकडं कंपोस्ट, शेणखत वगैरे प्रमुख खतं असल्यावर जीवामृत वा वेस्ट डिकंपोजरचं द्रावण यापैकी अमूक एक खत हवंच आहे असं नाही. असल्यास उत्तम. त्यामुळं रोपांनाही आहारात बदल मिळू शकतो अन एकाच खताची सवय होऊन जात नाही.

कुठलीही खतं देण्याआधी माती ओलसर करुन घेऊन खतं दिल्यावर देखील पाणी द्यावं. नंतरचे दोन तीन दिवस माती ओलसर राहील इतपतच पाणी आवश्यकता भासल्यास द्यावं. जास्त पाणी दिलं तर खतांमधली अन्नद्रव्यं पाण्यावाटे निघून जातील अन पाणी नाही दिलं व माती कोरडीच राहिली तर दिलेल्या खताचा रोपांना उपयोग शून्य होईल. म्हणून ही खतं दिल्यावरचे चार पाच दिवस पाण्याच्या बाबतीत खूपच काळजी घेण्याची गरज असते.

ही खतं जर पूर्णपणं डिकंपोज झालेली असतील अन त्य़ात आवश्यक ती सारी अन्नद्रव्यं असतील तर इतर कुठल्याही पूरकांची गरज पडत नाही. बरेचजणांना कांद्याच्या सालींचं पाणी म्हणजे झाडांचं टॉनिक वाटतं अन ते दिल्यावर झाड फुला-फळांनी लगडलेलं दिसेल अशी त्यांची कल्पना असते. जर कांद्याची सालंही कंपोस्टमधे वेळच्यावेळी घातलेली असतील तर त्यांचे गुणधर्म हे अशा कंपोस्टमधे उतरलेले असतातच. त्यामुळं वेगळं असं हे पाणी देण्याची काहीच आवश्यकता नसते. पण तरीही द्याय़चं असेल तर ते झाडाला झेपेल एवढंच अन तेही साध्या पाण्यात मिसळून द्यावं.

एखादं टॉनिक किंवा काजू-बदाम वा अंडी खाऊन ताकद येत असेल तर एक किलो बदाम किंवा डझनभर अंडी एकाच वेळी खाल्ली तर काय होईल? तसंच झाडांच्याही बाबतीत असतं. त्यामुळं अशी पुरकं जी द्रवस्वरुपात द्यावी. तीही देताना जर कंपोस्ट वगैरेंच्या साथीनं दिल्यास त्याचा जास्त फायदा होतो. अशी पूरकंही कुंडीच्या आकारानुसार अर्धा ते एक मग अशी भरुन द्यावी. कुंडीत देतानाही ती रोपाच्या खोडापासुन लांब बांगडीपद्धतीनं द्यावीत किंवा पानांवर फवारावी.

याहीव्यतिरिक्त अंड्यांची टरफलं, चहाचा चोथा, वापरलेली कॉफी पावडर वगैरे शक्यतो कंपोस्टमधेच टाकली तर उत्तम. परंतु जर ती वेगळी द्याय़ची असतील तर झाडाच्या तब्येतीनुसार एक ते दोन चमचे एवढीच द्यावी. कुठलंही खत वा पुरकं देताना ते नेहमीच मातीत मिसळून द्यावं. म्हणजे मुंग्या वा इतर पक्षी वा कीडे वगैरे यांचा त्रास होत नाही.

रोपं जेव्हा जमिनीवर लावलेली असतात तेव्हा ती त्यांना हवी असलेली अन्नद्रव्यं मातीमधुन घेतात. ती घेण्यासाठी मुळांना हवं तेवढं जमिनीत खाली खोलवर जाण्याची मुभा असते. पण कुंडीत या सगळ्यावर पुष्कळ मर्यादा असतात. ती कुंडीच्या आकाराबाहेर जाऊच शकत नाहीत. त्यामुळं कुंडीतील रोपांना लागणारी अन्नद्रव्यं त्यांना वेळच्यावेळी उपलब्ध करुन देणं अतिशय गरजेचं असतं. म्हणून एखाद दोन दिवस पुढं मागं झालं तरी चालण्यासारखं असतं पण हे वेळापत्रक सांभाळणं आवश्यक असतं.

हे सगळं म्हणजे वेळ अन प्रमाण पाळलं तर तुमची बाग नेहमीच फुललेली राहील, तेही निसर्गतःच. विशेषतः रोपं जेव्हा फुलांवर अन फळांवर असतात तेव्हा त्यांना अन्नद्रव्यांची नितांत गरज असते. याच काळात जर ती कमी पडली तर फुलं अन फळं अकाली गळून तरी पडतील किंवा आकारानं छोटी वा विकृत येऊ शकतील. म्हणून त्यांना खतं देताना त्यांच्या वेळा अवश्य पाळाव्यात. हे जर व्यवस्थित पाळलं तर इतर रासायनिक पण कमी घातक गोष्टी जसं की एप्सम सॉल्ट वगैरे काहीही देण्याची गरजही भासणार नाही. तसंही एप्सम सॉल्ट हे मातीमधे मॅग्नेशियम वाढवण्याचं काम करतं. रोपांना जास्त मॅग्नेशियमची गरजही नसते. जी काही असते ती मातीमधुन अन कंपोस्टमधुन पुरवली जातच असते. ते जास्त देण्यानं काही फरक पडणार नसतो की झाड अधिक फुलणार नसतं. पण युट्युबवरचे आकर्षक व्हिडिओ अन खोटा प्रचार याला बळी पडणारे बागेत एप्सम सॉल्टचा सर्रास अन वरचेवर वापर करतच असतात. अर्थात ज्यांना ते वापराय़चं असेल ते वापरोत पण ज्यांचा स्वतःवर अन सेंद्रीय खतांच्या उपयुक्ततेवर अन ताकदीवर विश्वास असेल त्यांनी अशा खोट्या प्रचाराला बळी पडण्याची गरज नाही. जर मॅग्नेशियमसोबतच इतरही सूक्ष्मअन्नद्रव्यं द्याय़ची असतील तर लिटरभर कंपोस्ट टीमधे दोन चमचे काकवी घालून ते लिटरभर साध्या पाण्यात मिसळून कुंडीच्या आकाराप्रमाणं अर्धा ते एक मग दिलं तरी तेवढाच परिणाम साधता येतो.

झाडांना त्यांच्या नैसर्गिक वेळापत्रकाप्रमाणं वाढू अन फुलू दिलं तर ती वेळच्यावेळी फुलतातही अन फळतातही. जर त्यांच्यामधे काही विकृती अथवा रोग वा कीड उत्पन्न झाली असेल तर ती आपल्याच चुकीनं किंवा त्यांना देण्यात येणाऱ्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेतच असते हे लक्षात घ्या. यासोबतीनंच पाण्याचं कमी जास्त होणं यामुळंही कळ्या अकाली गळणं वगैरेंसारख्या गोष्टी घडत असतात. त्यामुळं दृष्य स्वरुपात दिसणाऱ्या रोगाचा खोलवर जाऊन तपास घेऊन त्याप्रमाणं उपाययोजना करायला हवी. खत अन पाणी वेळच्यावेळी अन योग्य त्या प्रमाणात दिल्यावर झाडंही त्यांच्या कर्तव्यात कसूर करणार नाहीत.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

६ टिप्पण्या:

 1. खूप सुंदर माहिती,धान्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 2. छान माहिती मिळाली, कोणत्या खातात काय असते, कोणत्या खताची केव्हा गरज असते रोपाला.याबद्दल माहिती मिळेल का?

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. याबद्दल विस्तृत माहिती माझ्या इथंच पोस्ट केलेल्या "झाडांसाठीची पोषकतत्वं" या ७ भागांतील लेखमालेमधे मिळेल. आपण ती लेखमाला वाचावी. अन तरीही काही शंका असल्यास जरुर विचाराव्यात.

   हटवा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...