झाडांसाठीची_पोषकतत्वं - लेखांक ०१

झाडांसाठीची_पोषकतत्वं

लेखांक ०१

रोपांच्या वाढीसाठीची आवश्यक पोषणद्रव्यं

नमस्कार मंडळी,

मागच्या भाजीपाल्यावरील लेखमालेसारखीच ही छोटीशी लेखमालाही नवोदितांसाठीच आहे. जे यातले माहितगार वा कुशल असतील त्यांनीही ही लेखमाला वाचण्यास हरकत नाही. फक्त अशा जाणकार व सर्वज्ञ मंडळींकडून अपेक्षा इतकीच आहे की माझ्या हातून काही राहुन गेलं असल्यास ते सांगावं अथवा अधिकची माहिती देता आली तर ती द्यावी. गेल्या वेळेसारखं उगीचच माझी परिक्षा घेणारे प्रश्न विचारु नयेत. याच कारणानं बरेच जण लिहायचे बंद झाले आहेत, अन त्यामुळंच समूहावर केवळ जास्वंद, गुलाब अन कंपोस्टमधल्या अळ्या यांचाच संचार जास्त झाला आहे.

या लेखमालेत आपण पहाणार आहोत बिया पेरल्यापासून ते भाज्या, फळं, फुलं तयार होऊन आपल्या हातात पडेपर्यंत काय काय करावं लागतं ते. म्हणजे खरं तर आपण काहीच करत नाही किंवा काही करायची गरजही नसते. जे काही होतं ते नैसर्गिकपणेच होत असतं. आपण फक्त ते कसं होतं, काय काय घटना अन कोणकोणत्या वेळी घडत असतात याची माहिती करुन घेणार आहोत. बागेत आपला हस्तक्षेप फक्त काही चुकलंच तर केवळ दुरुस्ती करण्यापुरता अथवा आधार देण्यापुरता असावा. जसं आपलं मुल चालायला लागतं तेव्हा कसं आपण फक्त लक्ष देऊन ते पडत असेल तरच सावरतो. त्याची पावलं उचलुन पुढे ठेवत नाही, तसंच. आपल्याला फक्त पेरणीपासून काढणीपर्यंत बीच्या आयुष्यात काय काय होतं तेच जाणून घ्यायचं आहे. अन तेच आपण या लेखमालेत पहाणार आहोत. आशा आहे की या लेखमालेतुनही आपण विशेषतः नूतन बागकर्मी बरंच काही शिकतील. मुख्य म्हणजे बाग करणं म्हणजे काही विशेष एक्स्पर्टीजची बाब आहे असा गैरसमज दूर करुन त्यातलं मर्म उघड करुन दाखवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. यातुन काही शिकुन जर वाचकांपैकी थोडे जरी बाग करण्यास उद्युक्त झाले तरी अंशतः का होईना पण या लेखमालेमागचा हेतू साध्य होईल.

बी रुजण्यापासून ते झाडाचा जीवनकाल पुर्ण होईपर्यंत त्याच्या प्रत्येक टप्प्यावरील वाढीसाठी तसंच होणाऱ्या संभाव्य रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून बरीचशी पोषणद्रव्यं लागत असतात. जसं आपण आपल्या मुलांना त्यांच्या जन्मापासून देत असलेल्या आहार, औषधं, मसाज, केस व सांध्यांसह पूर्ण शरीरभर लावत असलेली तेलं वगैरेंतुन त्यांच्या संपुर्ण शरिराचं पोषण होऊन ते कुठल्याही रोगाचा प्रतिकार करु शकतील अशा प्रकारे त्यांना अंतर्बाह्य धडधाकट करत असतो, त्यांची इम्युन सिस्टिम स्ट्रॉन्ग करत असतो तसंच. त्यांच्या आहारात लोह, कॅल्शियम वगैरेंचा किंवा आताच्या भाषेत विविध प्रोटिन्स व सप्लिमेंट्सचा जसा समावेश राहील याची काळजी घेतो तसंच सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे काही आजार होऊ नयेत याचीही काळजी घेतो. हे जे काही आपण देत असतो ते सारंच काही त्यांच्या तोंडावाटे पोटात जाऊन पचनसंस्थेतली सगळे टप्पे पार करत रक्तात मिसळत नाही. बऱ्याच गोष्टी, जसं तेलं, काजळ वगैरे गोष्टी इतर मार्गांनी त्यांच्या शरिरातील त्या त्या ठिकाणी जाऊन ती ती ठिकाणं मजबूत करत असतात.

त्याच प्रमाणे झाडांनाही देण्यात येणारी पोषणद्रव्यं वेगवेगळ्या प्रकारे द्यावी लागतात. काही मातीतून, तर काही रोपांवर फवारुन तर काही मुळाशी दिलं जाणाऱ्या पाण्यातुन. हे सगळं देण्याच्या वेळाही अगदी ती छोट्याशा बीच्या रुपात असतात तेव्हापासूनच सुरु होतात. तसं पहाता मातीमधून बरीचशी अन्नद्रव्यं अन पोषणद्रव्यं झाडांना मिळतच असतात. पण आपल्या वाढीच्या काळात झाडांनी ती सेवन करुन ती कमी होतात तर कधी आपण दिलेल्या पाण्यावाटे तर कधी पावसाच्या पाण्यावाटे ती वाहुनही जातात. समजा आपली झाडं जमिनीवर लावलेली असतील तर अन्नद्रव्याच्या शोधार्थ मुळं अधिक खोल किंवा आजुबाजुला पसरुही शकतील, तशी ती वाढतात अथवा पसरतात देखील. पण आपली झाडं जेव्हा कुंडीत असतात, तेही खाली मातीचा संपर्क नसुन सिमेंट कॉंक्रिटचा संपर्क असेल तर त्यांना पोषणद्रव्यांसाठी आपल्यावरच अवलंबून रहावं लागतं.

तर अशी कुठली पोषणद्रव्यं अन अन्नद्रव्यं आहेत जी झाडांच्या, त्यांवरील पानाफुलांच्या व फळांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत ते आपल्याला जाणून घ्यायला हवं. अशा द्रव्यांची कमतरता भासली तर झाडं काही बोलुन दाखवणार नाहीत. ती आपल्या रंग, रुप, चव, आकार यावरुन आपल्याला संदेश देतील. अनुभवी बागकर्मी अन प्रत्येक शेतकरी हे नक्कीच जाणतो. अन त्याप्रमाणे उपायही करतो. किंबहुना अनुभवावरुन केव्हा काय द्यायला हवं हे त्याला पक्कं माहित असल्यामुळे तो झाडांनी संदेश देण्याचीही वाट पहात नाही. वेळच्यावेळी सगळं वेळापत्रक सांभाळत आपल्या पिकाला अन्नद्रव्यं पुरवत असतो. आपणही ते समजुन घेऊन त्याप्रमाणे आपल्या रोपांना त्यांचं खाद्य वेळच्या वेळी दिलं तर कुठल्याही रोगा-किडीशिवाय ती वाढतील अन अपेक्षित फुलं अन फळं देतील. या लेखात आपण अशाच पोषणद्रव्यांची माहिती करुन घेऊ. अन ती कधी अन कशी देता येतील ते पाहू. तसंच त्यांचा अभाव असल्यास काय होतं तेही आपण पाहू. अर्थातच आपला प्रयत्न राहील की ही सारी द्रव्यं सेंद्रियच असतील.

पिकांना, रोपांना व झाडांना बी रुजण्यापासून ती त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत जी काही पोषकतत्वं लागतात अन ज्यांद्वारे त्यांची ८५ ते ९०% शरीररचना व भरणपोषण होतं ती निसर्गतःच उपलब्ध असतात. ही तत्वं म्हणजे कार्बन, हायड्रोजन अन ऑक्सिजन. हे तीनही प्रमुख घटक रोपं वा झाडं हवा, माती व पाणी यातुन मिळवत असतात. या व्यतिरिक्त इतर जे घटक आहेत त्यांचं वर्गीकरण करायचं झाल्यास ते प्राथमिक अन्नद्रव्यं, दुय्यम अन्नद्रव्यं आणि सूक्ष्म अन्नद्रव्यं असं करता येईल.

प्राथमिक अन्नद्रव्यांत येतात नायट्रोजन म्हणजेच नत्र (N), फॉस्फरस म्हणजेच स्फुरद (P) आणि पोटॅशियम म्हणजे पालाश (K) ही द्रव्यं खतांद्वारे द्यावी लागतात.

दुय्यम अन्नद्रव्यांमधे कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर हे तीन घटक मोडतात. ही द्रव्यं मातीमधे असतातच. पण ती जर रोपांना मुळांवाटे घेण्याच्या रुपात नसतील तर वरुन द्यावी लागतात.

सूक्ष्म अन्नद्रव्यांमधे झिंक, बोरॉन, कॉपर, लोह, क्लोराईड, मॅंगनिज आणि मॉलिब्डेनम हे मोडतात. ही द्रव्यं देखील मातीमधेच असतात. पण ती जर रोपांना मुळांवाटे घेण्याच्या रुपात नसतील तर वरुन द्यावी लागतात.

पुढील लेखात आपण यातील प्रमुख अन्नद्रव्यांची ओळख व रोपाच्या वाढीत व त्याच्या जीवनचक्रात या अन्नद्रव्यांचं काय कार्यं आहेत ते पाहू. पण त्याही आधी आपण वापरत असलेली माती कशी आहे, तिचा पोत कसा आहे. पोत जर खराब असेल तर तो सुधारण्यासाठी काय करावं लागेल. त्याआधी आपल्या मातीचा पोत कसा तपासावा. त्यासाठी कुठल्याही प्रयोगशाळेत न जाता घरच्या घरीच तो कसा तपासावा हे पाहू.

© राजन लोहगांवकर
वानस्पत्य

२ टिप्पण्या:

  1. मातीचा पोत म्हणजे नेमके काय व तो कसा अोळखायचा?

    उत्तर द्याहटवा
  2. मातीचा पोत म्हणजे तिच्यामधली अन्नद्रव्यांची उपलब्धता. कुठलंही रोप मातीत लावल्यानंतर त्याची वाढ होण्यासाठी जी काही अन्नद्रव्यं लागतात ती मातीमधे उपलब्ध असतील तर त्या मातीचा पोत चांगला आहे असं समजता येईल. पण जर रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होत नसेल, त्यांना फुलं अन फळं येत नसतील किंवा ती रोगट अथवा निकृष्ट दर्जाची असतील तर अशा मातीमधे अन्नद्रव्यांची कमतरता असते, म्हणजेच दुसऱ्या शब्दांत तिचा पोत खराब आहे असं समजावं. अशा मातीचं शेतकी प्रयोगशाळेत वा नजीकच्या कृषी खात्याच्या ऑफिसमधे जाऊन परीक्षण करता येतं. मोठ्या शेतकऱ्यांसाठी हे करणं गरजेचं असतं. पण घरची बाग असेल तर काही निरीक्षणं अन अनुभव यावरुन आपण मातीमधे काय कमी आहे ते आपण पाहू शकतो. फक्त यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. म्हणजे फुलं वा फळं रोगट असतील किंवा आकारानं अगदीच लहान असतील तर मातीमधे काय कमी आहे अन काय दिल्यावर ती कमतरता भरून निघेल हे आपल्याला ओळखता येतं. पुढील लेखांमधे यावर विस्तृतपणे लिहिलेलं आहे. ते वाचल्यास आपल्या ते लक्षात येईल.
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...