गच्चीवरील_भाजीपाला - वांगी

गच्चीवरील_भाजीपाला

लेखांक ०९

वांगी 

वांग्यांचा आपल्या आहारात नियमित वापर असतो. वांगी जशी विविध आकारात येत असतात तसाच त्यांचा स्वैपाकातील वापरही वेगवेगळा आहे. भाजी, भरीत, काप, भजी वगैरे वगैरे भरपूर प्रकारे वांगी आपल्या पोटात जात असतात. वांगी आपल्या गच्ची-बाल्कनीवरच्या व परसबागेत आपण वर्षभर घेऊ शकतो.

बागेत वांगी घेण्याआधी आपल्याला त्यांची रोपं करुन घेण्याची गरज असते. वांग्यांच्या बिया नर्सरीमधुन आणाव्यात. भरताची काळी-जांभळी व हिरवी वांगी, छोटी हिरवी व काळी-जांभळी वांगी, पांढरी वांगी वगैरे प्रकारानुसार वेगवेगळ्या बिया नर्सरीमधे उपलब्ध असतात. आपल्याला हव्या त्या प्रकारच्या बिया आणाव्यात. रोपं तयार करण्यासाठी ट्रे असेल तर किंवा कागदी ग्लास अथवा छोटे खोके किंवा स्ट्रॉबेरी, द्राक्षं, चेरीज किंवा अंजिरासोबत जे प्लास्टीकचे वा पुठ्ठ्याचे बॉक्सेस मिळतात ते घ्यावे. खाली पाणी वाहून जाण्यासाठी छिद्रं करुन घ्यावीत. रेडीमेड ट्रेजना तशी व्यवस्था असतेच. यात पॉटींग मिक्स निम्म्याच्या वर भरुन घेऊन ओलं करुन घ्यावं. समतल करुन घेऊन त्यावर ओळींमधे वांग्याच्या बिया पसरवुन घ्याव्यात. शक्यतो वेगवेगळ्या प्रकारच्या वांग्यांसाठी वेगळे ट्रेज अथवा बॉक्सेस वापरावेत. एकच वापरायचा असल्यास वेगळ्या रांगेत बिया लावुन आईसक्रीमचा लाकडी चमचा अथवा तत्सम काही खोचून त्यावर लिहून ठेवावं किंवा सगळ्यात सोपं म्हणजे मोबाईलवर फोटो काढून ठेवावा. त्यामधे तारीख वार अन वेळही आपोआप नोंदली जात असल्यामुळं गोंधळ होत नाही.

बियांवर अर्धा-पाऊण इंच पॉटींग मिक्स पसरुन झारीनं पाणी स्प्रे करावं. मुंग्या लागणार नाहीत अशा ठिकाणी सावलीत पण सुर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेऊन बॉक्स ठेवावा. पाच ते सात दिवसांत बिया रुजुन येतील. स्प्रेनं नियमित पाणी द्यावं. पाण्याचा जोर जास्त राहिला तर रोपं आडवी होतील तेव्हा हलकेच पाणी द्यावं. साधारणपणे तीन-चार आठवड्यात रोपं छान मोठी होतील. रोपं सहा ते आठ इंच झाली, त्यावर प्रत्येकी चार-सहा पानं आली की आपण ती ट्रान्स्प्लांट करु शकतो.

वांग्याच्या एका रोपासाठी १५ ते २० लिटर्स क्षमतेची कुंडी पुरेशी होते. कुंडीची खोली एक ते सव्वा फूट असणं गरजेचं आहे. कुंडीला तळाशी व सर्व बाजुंनी आवश्यक तेवढी छिद्रं करुन ती नेहमीप्रमाणं भरुन घ्यावी. आतलं पॉटिंग मिक्स ओलं करुन घेऊन मधोमध हातानं अथवा जे काही तुम्ही रोपं लावण्यासाठी वापरत असाल त्यानं खड्डा करुन रोप लावून त्याभोवती हलक्या हातानं माती दाबून घ्यावी. थोडं पाणीही द्यावं. वांग्याच्याही रोपाला वांगी लागल्यावर आधाराची गरज असते. म्हणून रोपं लहान असतानाच कुंडीत काठी रोवून ठेवावी. कुंडी मोठी असेल तर दोन रोपांमधे एक ते दीड फूट अंतर ठेवावं. जमिनीवर रोपं लावणार असाल तर दोन रोपांत दीड फूट आणि दोन ओळींत दोन फूट अंतर ठेवावं. आधार देण्यासाठी प्रत्येकी एक काठी रोवावी किंवा वाफ्याच्या दोन बाजूंना दोन मोठ्या काठ्या रोवून त्या आपसांत तारेनं अथवा जाड दोरीनं बांधून घेऊन रोपाच्या वर येईल अशा तऱ्हेने सुतळ वा काथ्या लोंबता सोडून रोपं सेट झाल्यावर रोपाभोवती हलकेच गुंडाळून घ्यावा. खोडाला घट्ट बांधू नये.

रोपं सेट झाल्यावर वाढू लागतील. मातीच्या लेव्हलवर जेवढी पानं असतील ती कटरनं कट करुन तिथेच खाली मल्चिंगसारखी वापरावी. तसंच टोमॅटोप्रमाणेच याही रोपांच्या खोड अन पानांच्या डहाळीदरम्यान छोटी पानं दिसतील. तीही काढून टाकावीत. मातीच्या लेव्हलपर्यंत उन्ह व्यवस्थित पोहोचेल अशा पद्धतीनं खालच्या भागातली पानं काढावीत. शेंडा खुडल्यास रोपाची आडवी वाढ होऊन जास्त फांद्या फुटतील व अधिक वांगी मिळतील.

वांग्याच्या रोपांना पाण्याची कमतरता भासू देऊ नये. नियमित पाणी दिल्यानं झाडं निरोगी रहातील. मल्चिंगचा वापर अवश्य करावा. यामुळं हवा तेवढा ओलावा मातीमधे राहील. दर पंधरा दिवसांनी द्रवरुप खताची फवारणी व दोन तीन आठवड्यांनी कंपोस्ट घालत रहावं. कंपोस्ट देताना मल्चिंगच्या आवरणाखाली देऊन पुन्हा मल्चिंग करावं. वांगी आणि टोमॅटो या पीकांवर मावा व पीठ्या ढेकूण यांचा त्रास होतच असतो. यासाठी झाडांचं नियमित निरीक्षण करत रहावं. अशी कीड दिसताच ती त्वरित काढून टाकावी. पाण्याचा फवारा मारल्यास कीड निघून जाते. नीमार्क किंवा गोमूत्र वा अन्य काही सेंद्रीय कीटकनाशक असेल तर ते फवारावे. म्हणजे कीड फार पसरणार नाही. फळमाशीचाही त्रास या पिकात फार असतो. त्यासाठी घरीच सापळे तयार करुन बागेत ठेवले तर त्यावरही चांगलं नियंत्रण होतं.

साधारण सव्वा ते दीड महिन्यात फुलं येऊ लागतात. याही पिकामधे परागीभवन आपोआप होते. एकाच फुलात दोन्ही केंसर असल्यानं वाऱ्याचा हलका झोतही हे काम करण्यास पुरेसा होतो. फुलं गळत असतील तर हलकीशी टिचकी मारली तरी परागीभवन होऊन फळ धरतं. फळ धरल्यापासून १५ ते २० दिवसांत वांगी काढण्यासाठी तयार होतात. दाबून बघितल्यावर जी काहीशी कडक लागतील ती तयार आहेत असं समजावं. साध्या हातानं वांगी तोडू अथवा ओढू नयेत. नेहमी कात्री किंवा धारदार चाकूनंच काढावी. झाडाला इजा होईल असं काही करु नये.

एकदा वांगी येऊ लागली की पुढील ६ ते ७ महिने वांगी मिळत रहातील. नंतर वांग्यांचा आकार अन संख्या रोडावेल. अशा वेळी त्याची छाटणी करावी. शेंडा छाटावा. ३-४ चांगल्या फांद्या आणि ८-१० निरोगी पानं ठेऊन उर्वरित भाग छाटून टाकावा. तीव्र उन्हाळ्यात हे करु नये. शक्यतो पावसाळ्यात करावं. साधारण महिन्याभरात पुन्हा नवीन पालवी फुटेल अन पुन्हा पहिल्यासारखी वांगी मिळू लागतील. खतपाणी देण्याचं वेळापत्रक मात्र अगदी शिस्तपूर्वक पाळावं.

चार माणसांच्या कुटुंबाकरिता १५ ते २० रोपं लावावीत. छाटणीनंतरचा दुसरा बहर जर समाधानकारक नसेल तर रोपांच्या दुसऱ्या बॅचची तयारी सुरु करावी. फक्त पुन्हा त्याच मातीत नवीन रोपं लावणं टाळावं.

© राजन लोहगांवकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...