गच्चीवरचा पोर्टेबल मांडव (DIY)

गच्चीवरचा पोर्टेबल मांडव (DIY)
आपल्यापैकी बरेचजणांची बाग गच्चीवर आहे. मग ती गच्ची स्वतःच्या बंगल्याची असो की सोसायटीची असो. अशा गच्चीवर कुंड्यांमधे फुलझाडं, फळझाडं, भाज्या वगैरे तर आपण नेहमीच लावत असाल. पण जेव्हा वेलवर्गीय भाज्या किंवा फुलं लावता तेव्हा त्या वेलींना वर चढण्यासाठी आधार देण्याची गरज असते. अशा वेळी काही कायमस्वरुपी व्यवस्था असेल तर उत्तमच. पण एखादा मांडव जो आपल्या गरजेप्रमाणं केव्हाही कुठंही हलवता येऊ शकेल किंवा काढून ठेवता येत असेल, अन हे सारं कमी खर्चात अन स्वतः, म्हणजे बाहेरील कुणाचीही मोबदला देऊन मदत न घेता करता येत असेल तर? मी माझ्या घराच्या गच्चीवर गेल्याच महिन्यात असा एक मांडव तयार केला. अगदी एकट्यानं. वय अन कंबरेच्या दुखण्यामुळं बंधनं आली आहेत म्हणून मला दोन दिवस लागले. त्यात सतत पाऊसही सुरु होता. पण सारं साहित्य तयार असेल तर तुम्ही सिमेंटच्या क्युअरिंगचे चोवीस तास वेगळे काढलेत तर अक्षरशः तासाभरात हा मांडव उभा करुन त्यावर वेली सोडू शकता. लागणारं साहित्य अन सोबत जोडलेल्या फोटोंवरुन तुम्हालाही कल्पना येईल अन तुम्हीही असा मांडव तुमच्या गच्चीवर उभा करु शकाल. याहीपेक्षा सुंदर अन स्टर्डी.

साहित्य : १० फूट लांबी बाय ६ फूट रुंदी बाय ७ फूट उंचीच्या मांडवासाठी

अर्धा इंच व्यासाचे पीव्हीसी पाईप्स ६ (आपली गरज अन उपलब्ध जागेप्रमाणं ही संख्या वाढू शकेल.)
थ्री वे कनेक्टर्स  ४
कपलर्स २
पत्र्याचे डबे किंवा प्लास्टिकच्या कुंड्या अथवा रंगाच्या बादल्या ४
सिमेंट ४ किलो
वाळू व/वा विटांचा चुरा ४ घमेली
करवत किंवा करवतीप्रमाणं दाते असलेली सुरी.
जाळी बांधण्यासाठी नायलॉन दोरी किंवा काथ्या

हार्डवेअर स्टोअरमधे हे पाईप्स, त्याला लागणारे कपलर्स, कनेक्टर्स मिळतात. माझी गरज वर दिलेल्या मापानुसार असल्यानं मी असे ६ पाईप्स आणले. दुकानदार विकताना हे पाईप जरी दहा फूट असल्याचं सांगत असले तरी ते ३ ते ४ इंच कमीच असतात. हे अशासाठी सांगितलं की कागदावर गणितं सोडवून साहित्य आणण्यापेक्षा प्रत्यक्ष साहित्य पाहूनच मापं घ्यावीत. (हेलपाटे वाचवण्यासाठी उरलेलं सामान तसंच्या तसं असल्यास परत घेण्याच्या बोलीवरच घ्यावं.)

(एक सूचना : अर्धा इंच व्यासाचे पाईप्स दोऱ्या बांधताना दिल्या गेलेल्या ताणामुळं वाकतात किंवा नंतर दुधी भोपळा वगैरेंच्या वजनानंही वाकतात. त्यामुळं एक इंच व्यासाचा पाईप घेतला तरी चालेल.) 

मला उंची दहा फूट नको होती कारण माझ्या पत्नीला उभ्याने, स्टूल वा शिडीचा वापर न करताही भाज्या सहजासहजी काढता याव्यात म्हणून. तर या सोयीसाठी म्हणून ७ फूटांची उंची घेण्याचं ठरवलं. त्यानुसार सात फूट लांबीचे चार पाईप्स कापून घेतले. हे जे चार छोटे तुकडे मिळाले ते एका कपलरच्या सहाय्यानं दोन तुकडे जोडून घेतल्यामुळं मांडवाच्या रुंदीसाठीचे दोन पाईप्स तयार झाले. ते प्रत्येकी झाले साधारण सव्वासहा फूट लांब. ही झाली माझ्या मांडवाची रुंदी. दहा फूटी दोन पाईप्स लांबीसाठी वापरले. त्यामुळं मांडवाचा आकार झाला १० (९’९") बाय ६’३" बाय ७ फूट.

माझ्याकडं पत्र्याचे चार डबे होते. १५ लिटर तेलाचे असतात ते. त्यांना खाली अन बाजूंना आधी लोखंडी टोच्याच्या सहाय्यानं छिद्रं पाडून घेतली. नंतर त्यात पाईप मध्यभागी उभा धरुन बाजुनं डबा अर्धा भरेल एवढा विटांचा चुरा टाकला. (मला वाळू मिळणं खूपच कठीण गेलं. त्यामुळं मी तो नाद सोडून दिला.) हातोडीच्या सहाय्यानं विटांचा चुरा व्यवस्थित दाबून घेऊन पाईप त्यात विनाआधार उभा राहील असं पाहिलं. त्यावर पाणी मारुन तो चुरा ओलसर करुन घेऊन त्यावर एक किलो सिमेंट पिठल्यासारखं ओलसर कालवुन घेऊन ओतलं. डबा व्यवस्थित हलवल्यावर ते सिमेंट सरळ लेव्हलला येतं. असे चारही डबे करुन त्यात पाईप उभे केले. सिमेंट वाळल्यावर रात्रभर डब्यात वर एक दीड इंच राहील एवढं पाणी भरून ठेवलं. 

सकाळी सिमेंट घट्ट बसलेलं दिसलं. पाईप हलवुन पाहिला तर तो व्यवस्थित उभा होता. डब्यातल्या सिमेंटच्या लेव्हलवर येतील अशी चारही बाजूंनी छिद्रं करुन घेतली अन त्यातील पाणी वाहून जाऊ दिलं. अर्धा डबाच का, कारण एक तर पूर्ण डबा भरण्याएवढी आपली गरज नाही. अन दुसरं म्हणजे डब्याच्या वरच्या उरलेल्या अर्ध्या भागात माती घालून काही रोपं, शक्यतो पोलिनेटर्सना आकर्षित करुन घेणारी फुलझाडं लावता यावीत किंवा चिनी गुलाब सारखी मुळांची वाढ कमी असणारी रोपं लावता यावीत यासाठी. यानंतर या पिलर पाईपच्या टोकाला थ्री वे कनेक्टर बसवला. डबे योग्य त्या अंतरावर अन हवे तिथं ठेवल्यावर वरचे लांबी अन रुंदी वाले पाईप्स जोडून घेतले. हा झाला मांडवाचा सांगाडा. हे कनेक्टर्स जोडताना ते वारंवार निघू नयेत म्हणूण सोल्युशनही हार्डवेअरच्या दुकानात मिळतं. पण मग असे पाईप्स त्यातुन सोडवता येत नाहीत. त्यामुळं मांडव एकदा फिक्स झाला की काढता येत नाही. म्हणून मी सोल्युशन वापरलं नाही. ज्यांची इच्छा आहे ते सोल्युशन वापरुन मांडव कायमस्वरुपी करु शकतात.

हा झाला सांगाडा. नंतर यावर उभ्या आडव्या अशा नायलॉनच्या दोऱ्या बांधून झाल्यावर तयार झाला पोर्टेबल मांडव. नायलॉनच्या दोऱ्यांऐवजी तुम्ही काथ्याही वापरु शकता. पण उन्ह-पाऊस यामुळं काथ्या लवकर खराब होतो अन हे काम दर वर्षी करावं लागतं. म्हणून मी काथ्या वापरला नाही. नायलॉनची दोरी वापरलीत तर ती किमान ५ वर्षं तरी नक्कीच टिकेल. या मांडवाचं आयुष्य किमान आठ ते दहा वर्षं धरुन चालायला हरकत नाही. वापरलेले पाईप्स कसे आहेत यावर सारं अवलंबुन आहे. पण हे पाईप बऱ्यापैकी टिकतात.

दोऱ्या बांधताना आपण त्या घट्ट बांधतो अन त्यामुळं वरच्या चौकटीचा शेप बदलुन समोरासमोरच्या दोन्ही बाजू आत वळुन आयताचा आकार जातो. त्यामुळं दोऱ्या बांधताना सैलसर बांधल्या तर उत्तम. फक्त फळं लागल्यावर त्या खाली झुकतील. हे टाळण्यासाठी थोड बजेट वाढवावं लागेल. म्हणजे मोठ्या लांबीच्या मध्यभागी समोरासमोर दोन उभे पाईप घेऊन, चार पायांएवढीच उंची घेऊन ते पाईप वरच्या आडव्या पाईपला "टी" कनेक्टरनं जोडून घ्यायचे. म्हणजे ते खाली झुकणार नाहीत. किंवा दुसरा पर्याय म्हणजे इथं "टी" कनेक्टर घेण्याऐवजी चार कोपऱ्यांसाठी घेतलेला थ्री वे कनेक्टर घेऊन वरही रुंदीच्याच मापाएवढा पाईप लावून लांबीच्या दोन्ही बाजू वरच्याही बाजूनं जोडून घ्यायच्य़ा. हे दोन वाढीव खांब खाली टेकण्यासाठी तुम्ही अजुन दोन डबे घेऊन तेही आधीच्याच पद्धतीनं विटांचा चुरा अन सिमेंटच्या सहाय्यानं पाया बनवु शकता अन त्यातही हवी ती रोपं लावू शकता.

मांडव तयार केल्यावर त्यावर तुम्ही वेली चढवु शकता. उन्हाळ्यात जेव्हा वेलवर्गीय भाज्या नसतील तेव्हा याच मांडवावर पातळसर कापडं, जुन्या साड्या किंवा ओढण्या घालून शेडनेट करुन नाजूक रोपांचं तीव्र उन्हापासून संरक्षण करु शकता. तसंच टोमॅटो, वांगी सारखी रोपं ज्यांना आधार लागतो तीही या मांडवाखाली ठेवुन वरुन दोऱ्या सोडून त्या रोपांना बांधू शकता. तसंच चवळी वगैरेंसारख्या वेलीही यावर आपण चढवु शकता. फक्त मांडवावर जास्त दाटी होणार नाही अन मुख्य म्हणजे क्रॉस पॉलिनेशन होणार नाही यासाठी मोजक्याच वेली यावर चढवाव्यात.

पहा करुन. दोऱ्या बांधल्यावर अन वेली चढल्यावर मूळचा आयताकार नक्कीच जातो. कधी तर चार खांब ९० अंशात न राहून वरच्या बाजूनं वयोवृद्ध झाल्यासारखे वाकलेलेही दिसतील, पण हरकत नाही. आपलं लक्ष्य आहे वेलवर्गीय भाज्या घेणं, मांडव बांधणं नव्हे. मांडव हे एक माध्यम आहे किंवा वेलींची ती गरज आहे. साध्य नव्हे.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

एप्सम सॉल्ट - बागेत वापरावं की वापरु नये?

एप्सम सॉल्ट - बागेत वापरावं की वापरु नये?आजकाल बागकामातले सारेच तज्ञ कुठल्याही प्रश्नावर दोन उत्तरं हमखास देत असतात. एक म्हणजे कांद्याच्या सालींचं पाणी आणि दुसरं म्हणजे एप्सम सॉल्ट. या कांद्याच्या सालींच्या पाण्यावर नंतर केव्हातरी, पण आज एप्सम सॉल्टवर चर्चा करुया. बागकामांतील तज्ञ, अनेक ऑनलाईन सल्ले देणाऱ्या साईट्स अन ब्लॉगर्स पॉटींग मिक्स तयार करण्यापासून ते रोपांना फळं-फुलं धरेनाशी झाल्यावर एप्सम सॉल्ट वापरण्याचाच सल्ला देत असतात. परंतु याचा नियमित किंवा अती वापर केल्यास फारसा फायदा तर होत नाहीच पण तोटेच जास्त होतात.

काय असतं हे एप्सम सॉल्ट? तर एप्सम सॉल्ट म्हणजेच मॅग्नेशिअम सल्फेट अर्थात MgSO4 हे आहे एक रासायनिक संयुग. यात असतं मॅग्नेशिअम, सल्फर आणि ऑक्सिजन. हे अर्थातच कुठंतरी "बनवलं" जातं. म्हणजेच हे ना नैसर्गिक आहे ना सेंद्रिय. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास या एप्सम सॉल्टमधे असतं मॅग्नेशिअम, सल्फर आणि थोडं पाणी. खरंतर हे एप्सम सॉल्ट जे बनवलं जातं अन मेडिकल दुकानांतुन विकलं जातं ते वेगळ्याच म्हणजे औषधी उपचार व इतर शारिरीक व्याधींवरील उपचार वगैरे या कारणांसाठी असतं. बागेतील उपयोगांसाठी ते बनवलेलंच नसतं. अन्यथा ते नर्सरीज किंवा ऍग्रीकल्चरल स्टोअर्समधे उपलब्ध असतं. 

वनस्पतींना वाढीसाठी अन फुलण्या-फळण्यासाठी त्यांच्या जीवनकालात जी काही अन्नद्रव्यं लागतात त्यामधे मॅग्नेशिअम हे एक अत्यल्प प्रमाणात लागणारं अन्नद्रव्य आहे. म्हणजे ज्याला आपण दुय्यम अन्नद्रव्यं म्हणजेच सेकंडरी न्युट्रिअंट म्हणतो ते. आणि पृथ्वीच्या पाठीवरच्या बहुतांश भागातील मातीमधे हे मॅग्नेशिअम आवश्यक त्या प्रमाणात असतंच. काही ठिकाणी ते जास्तही असु शकतं. पण अजिबात नाही असा भूभाग अभावानंच असेल.

मॅग्नेशिअमबरोबरच या एप्सम सॉल्टमधे असलेला दुसरा घटक म्हणजे सल्फेट. सल्फेटमधे असतं सल्फर आणि ऑक्सिजन. हा सल्फेटही मातीमधे उपलब्ध असतो अन तोही वनस्पतींसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांपैकी एक दुय्यम अन्नद्रव्य म्हणजेच सेकंडरी न्युट्रिअंटच आहे. मातीमधील हा सल्फेटही वनस्पतींची मुळं झाडाच्या आवश्यकतेनुसार हवा तेवढाच शोषून घेत असतात.

असं असताना हे दोन्ही घटक वेगळे वरतुन देण्याची आवश्यकता नसते. किंबहुना ते तसे दिले गेल्यास मातीमधील त्यांचं नैसर्गिकरीत्या असलेलं प्रमाण अन रेशोच आपण बिघडवत असतो. जर आपण बागेतील त्यातही खास करुन कुंडीतील झाडांना नियमितपणं कंपोस्ट देत असाल तर हे दोन्ही घटक वनस्पतींसाठी उपलब्ध होतच असतात.

तथाकथित वा स्वयंघोषित जाणकार, तज्ञ मंडळींकडून वनस्पतींमधील काही रोगांवर अन लक्षणांवर हे एप्सम सॉल्ट वापरण्यासाठी सांगितलं जातं. उदा.

टोमॅटोवर पडणाऱ्या "ब्लॉसम एंड रॉट"साठी. याला कारणीभूत असतं ते म्हणजे कॅल्शिअमची कमतरता वा पाणी देण्यामधली अनियमितता. ती भरुन काढण्यासाठी कॅल्शिअमच देण्याची आवश्यकता असते. त्याऐवजी मॅग्नेशिअम देऊन चालणार नाही. अन पाणीही नियमितपणं द्यावं लागतं. या कारणासाठी जर एप्सम सॉल्ट दिलं तर कुंडीत मॅग्नेशिअमचं प्रमाण वाढेल अन मुळं मॅग्नेशिअमच जास्त घेतील, कॅल्शिअम वरुन दिला गेला तरी. परिणामी मूळ रोग तसाच राहील किंवा वाढेलही कारण कॅल्शिअमची कमतरता तशीच रहाणार. म्हणून या रोगासाठी कॅल्शिअमयुक्त खतंच देणं अन मल्चिंगसारखे उपाय प्रभावी ठरत असतात.
वनस्पतींची पानं पिवळी पडणं ही तशी साधारण बाब असते. पण पानं अकाली पिवळी पडणं वा हिरवेपणा कमी होणं यासाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात. त्यातही मुख्यत्वे लोहाची कमतरता हे कारण जास्त जबाबदार असतं. ती भरुन काढण्यासाठी लोहयुक्त खतं देणंच गरजेचं असतं. एप्सम सॉल्ट ही कमतरता भरून काढू शकत नाही. खारं तर एप्सम सॉल्टच काय पण हा रोग कुठल्याही फवारणीनं आटोक्यात येत नाही, तर त्यासाठी जे उपाय करायचे असतात ते मातीतुनच करायचे असतात. अन आपल्या बागेत त्यासाठी (सेंद्रीय) खतांचीच मदत होते.
बियांची उगवण चांगली अन उगवण्याची टक्केवारी वाढवण्यासाठी म्हणूनही एप्सम सॉल्ट वापरायला सांगितलं जातं. निसर्गतः जेव्हा वनस्पतींच्या पुढील पिढीसाठी बियांची निर्मिती केली जाते तेव्हा त्या बियांमधे माती, पाणी अन हवा यांच्या संपर्कात येईपर्यंत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी जे काही लागतं ते सारं काही आतमधेच उपलब्ध करुन ठेवलेलं असतं. हे निसर्गतःच होत असतं. आपण जेव्हा या बिया आपल्या बागेत लावतो तेव्हा फक्त या तीन गोष्टी त्यांना उपलब्ध करुन देण्याची गरज असते, मानवाचा हस्तक्षेप असलाच तर तो इतकाच. अन्यथा बिया या तीन आवश्यक गोष्टी मिळाल्यावर रुजतच असतात. त्यामुळं एप्सम सॉल्ट दिल्यामुळं बिया हमखास रुजतात हा भ्रम आहे. काही प्रकारच्या बिया वा कंद तर हवा अन पाणी यांच्या संपर्कात आल्यावरही रुजत असताना आपण पहातो. उदा. कारंद, कांदा, सूबाभूळ, कडधान्यं वगैरे वगैरे.
इनडोअर प्लांट्ससाठीही एप्सम सॉल्ट देण्यास सांगितलं जातं. इनडोअर प्लांट्सची पाण्याची गरज अल्प असते. यांचं पॉटींग मिक्सही एरवीपेक्षा वेगळं असतं. या वनस्पतींना लागणारी अन्नद्रव्यं कंपोस्ट वा इतर सेंद्रीय खतांमधुन मिळतच असतात. अशा रोपांना पाणी जास्त दिलं जात नसल्यानं खतं अन अन्नद्रव्यं वाहून जाण्याची शक्यता नसते. त्यामुळं जी अन्नद्रव्यं नियमित अन जास्त प्रमाणात वापरली जात नाहीत ती वाहून न जाता कुंडीतच रहात असतात. परिणामी ती मुळांना उपयोगी ठरण्याऐवजी त्रासदायक ठरत असतात. छोट्या आकाराच्या कुंडीतल्या मातीत जास्त प्रमाणात घातलेलं मॅग्नेशिअम अन सल्फेट उपयोगाविना तसंच पडून राहिल्यास ते मुळांना अपायकारकच ठरतं.
झाडांवर फुलं फळं कमी लागत असतील तरीही एप्सम सॉल्ट वापरण्यास सांगितलं जात असतं. मुळात म्हणजे झाडं जर फुलांना अन फळांना जन्म देण्यास सक्षम असतील तर आणि तरच ती फुलतात वा फळतात. दुसरं म्हणजे झाडांना फुलण्यासाठी योग्य अन पोषक वातावरण असेल तर ती फुलणारच. या दोन्ही गोष्टींसाठी योग्य ती खतं योग्य त्या प्रमाणात देणं, वेळच्या वेळी पाणी देणं हेच सर्वात जास्त महत्वाचं असतं. रोपांसाठीची माती मुख्य अन्नद्रव्यांनी युक्त असेल तर फुलं वा फळं येणं हे होतच असतं. जर फुलं वा फळं येत नसतील तर त्याची कारणं वेगळी असु शकतील. ती शोधण्याची अन त्यावर उपाय करण्याची गरज असते. परंतु केवळ कुणीतरी सांगतंय म्हणून काहीही उपाय करणं चुकीचं असतं. केवळ चुकीचंच नव्हे तर त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. त्यामुळं खतपाणी वेळच्यावेळी करणं हाच उपाय करणं आवश्यक आहे.

इथं एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे अन ती म्हणजे मातीमधे सर्वच अन्नद्रव्यं एका ठराविक प्रमाणात निसर्गतःच असतात. आपण जेव्हा वरखतं देत असतो तेव्हा हे प्रमाण बिघडत असतं. पीकं घेतल्यानंतर मातीमधली अन्नद्रव्यं नक्कीच कमी होत असतात अन त्यांचं गुणोत्तरही बदलत असतं. पण जेव्हा आपण पीकांच्या एका हंगामानंतर थोडे दिवस त्या मातीला विश्रांती देत असतो तेव्हा हे गुणोत्तर निसर्गतःच पूर्ववत होत असतं. अन यासाठीच बागेतील वापरलेल्या मातीला काही काळ विश्रांती दिली जात असते. जमिनीवरील बागेतही हे पथ्य पाळलं जात असतं. फक्त मातीमधली मुख्य अन्नद्रव्यं म्हणजे उदा. एन, पी, के, कॅल्शिअम वगैरे पीकांच्या वाढीदरम्यान जास्त प्रमाणात वापरली जात असल्यानं अन त्यांचं पुनर्भरण होण्याचा वेग तुलनेनं मंद असल्यामुळंच ती खतांद्वारे दिली जातात. अन्यथा तीही आपल्याला द्यावी लागली नसती.

परंतु जी अन्नद्रव्यं दुय्यम अन्नद्रव्य म्हणजेच सेकंडरी न्युट्रिअंट्स या सदरात मोडतात ती वनस्पती अल्प प्रमाणात घेत असतात अन ती मातीमधे पुन्हा नैसर्गिक रित्या तयारही होत असतात. त्यामुळं ती वरुन देण्याची आवश्यकता नसते. एक नैसर्गिक सत्य आपण लक्षात घ्यायला हवं अन ते म्हणजे जे अधिकचं असतं अन जे वापरलं जात नसतं ते कुठंतरी साचत रहातं. मग ते फॅट म्हणजे मेद असो वा इतर काहीही. एप्सम सॉल्टद्वारे मिळणारं अधिकचं मॅग्नेशिअम अन सल्फेट हेही कुठं ना कुठ साचतच जात असतं. एप्सम सॉल्ट हे पाण्यात विरघळणारं अन परिणामी प्रवाही असल्यामुळं ते आपल्या गच्चीवरल्या बागेतुन वहात जाऊन जमिनीतच कुठं ना कुठं साचत जातं. म्हणजेच आपण नकळत मातीमधील अन्नद्रव्यांचं गुणोत्तर बिघडवत असतो. वेगळ्या शब्दांत सांगायचं झाल्यास हेही एक प्रकारचं प्रदूषणच. अन त्याला आपलाच हातभार लागत असतो.

पण मग एप्सम सॉल्ट बागेत वापरायचं की नाही? तर बागेपेक्षा ते मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या शेतीमधे जास्त फायद्याचं होऊ शकेल. अर्थात जर मातीचं परीक्षण केल्यावर त्यात मॅग्नेशिअम अन सल्फेटची तीव्र कमतरता असेल तरच. अन अशा मातीत घेतल्या जाणाऱ्या पीकाची या अन्नद्रव्यांची ती गरज असेल तरच. अन्यथा जगात या एप्सम सॉल्टविनाही असंख्य बागा फुललेल्या अन फळलेल्या आहेतच की. तेव्हा अशा गरज नसलेल्या गोष्टींचा वापर आपल्या बागेत करु नये. त्यामुळं फायदा तर काहीच होत नाही, उलट झालंच तर नुकसानच जास्त आहे, तुमच्या बागेला अन पर्यावरणालाही.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

सहचर रोपांची लागवड (Companion Planting)

सहचर रोपांची लागवड (Companion Planting)

निसर्गतः काही वनस्पती या एकमेकांचे जोडीदार असतात किंवा त्यांच्यात मैत्री असते. दोन्ही वनस्पती भलेही भिन्न प्रकारातील वा कुळातील असल्या तरीही त्यांच्यात घट्ट मैत्री असते अन एकत्र वा जवळजवळ लावल्यास त्या एकमेकांच्या साथीनं वाढतात. एवढंच नव्हे तर एकमेकांची काळजीही घेतात. एकीवर कीड वा रोग पडला तर दुसरी त्या कीडीचा वा रोगाचा नायनाट करते किंवा एकीनं उत्सर्जित केलेला टाकाऊ भाग दुसरी खताप्रमाणं सेवन करुन वाढते. दोन्ही वनस्पती एकमेकांच्या सहाय्यानं अन आधारानं एकोप्यानं वाढतात. कुणावरही कुरघोडी न करता, सकारात्मक स्पर्धा करत दोन्ही वनस्पती वाढतात अन फुलतात व फळतात. एकत्र वाढताना त्या एकमेकांना विरोध करण्याऐवजी एकमेकांना पूरक ठरतात.

अशा वनस्पती ओळखून त्या जर जवळजवळ वा एकाच जागी लावल्यास आपले बरेचसे कष्टही वाचतात अन खर्चही आटोक्यात रहातो. या प्रकारालाच सहचर रोपांची लागवड किंवा Companion Planting असं म्हणतात. याचे बरेचसे फायदे आहेत. आपल्या सीमीत स्वरुपातील बागेला, बाग गच्ची-बाल्कनीतील असुद्या किंवा परसातील असुद्या, निसर्गाच्या या गुणामुळं आपण जसं जागेची बचत करु शकतो किंवा कमी जागेत जास्त रोपं लावू शकतो तसंच कीडींवर अन तणांवरही नियंत्रण ठेवु शकतो. सहचर रोपांची लागवड करण्याचे काही फायदे पुढीलप्रमाणं आहेत;

कमी जागेत जास्त पीकं : गच्ची असो की बाल्कनी, बाग एकदा करायला घेतली की तिच्यासाठी थोड्याच दिवसांत जागा कमी पडू लागते. कुंड्या, त्यातही गोलाकार कुंड्या असल्या की हे हमखास होतंच. अशा वेळी या पद्धतीनं रोपांची लागवड केल्यास उपलब्ध जागेतही जास्त रोपं लावता येतात. पर्यायानं बागेत वैविध्यही जपता येतं अन जर आपण बागेत भाज्या लावत असु तर उत्पादनही जास्त मिळतं.

अनावश्यक तणांवर नियंत्रण : बाग म्हटली की तिथं अनावश्यक तण हे आलंच. तणांच्या बिया कधी वाऱ्यानं उडून येत असतात किंवा खतांद्वारेही येत असतात. अशा बियांना एकदा मोकळी जागा मिळाली की त्यांची वाढ भराभर होते. आपण लावलेल्या रोपांना आपण जे खत वा इतर अन्नद्रव्यं देत असतो ते खाऊन हे तणही जोमानं वाढत रहातं. परंतु जर एकाच कुंडीत दोन वेगवेगळ्या प्रकारची रोपं असतील तर तणांना वाढण्यासाठी जागाच उरत नाही. पर्यायानं कुंडीत तणच रहात नाही. किंवा असलंच तर ते अल्प प्रमाणात असतं.

कीडीचं नियंत्रण : बागेत कुठलीही रोपं लावली की त्यावर कीड ही येतच असते. निसर्गतःच हे होत असतं. अर्थात त्यामागं निसर्गाचीही काही कारणं आहेत. पण त्यामुळं आपल्या बागेचं मात्र अतोनात नुकसान होत असतं. परंतु या कीडींचंही एक शास्त्र असतं. कुठलीही कीड कुठल्याही रोपांवर नाही पडत. रोपांच्या अन फळा-फुलांच्या प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळी कीड असते. काही किडी असतीलही ज्या बहुतेक प्रकारच्या झाडांना त्रास देतात. पण तशा किडींचा वेगळा उपाय करता येतो. पण कुंडीत जेव्हा दोन वेगळ्या प्रकारची झाडं लावली जातात तेव्हा कीडीला जर एक प्रकारचं झाड आवडत असेल किंवा आकर्षित करुन घेत असेल तर तिथंच असणारं दुसरं झाड हे किडीच्या दृष्टीनं त्रासदायक असेल. सहाजिकच कीड अशा ठिकाणी येण्याचं टाळते.

परागीभावन : परागीभवन करणारे जे माशा वा फुलपाखरं वगैरे मित्र आहेत ते कुंडीतील विविध प्रकारच्या फुलांकडं आकर्षित होऊन रोपांवर येऊन त्यातील मध प्राशन करण्यासाठी येतात अन त्यामुळं आपोआप परागीभवन होऊन रोपांवर फळं जास्त धरली जातात. याचा फायदा आपल्यालाच होत असतो. रोपांवर येणाऱ्या सर्व मादी फुलांचं रुपांतर जर फळांमधे होत असेल तर सहाजिकच आपल्याला जास्त भाज्या वा फळं मिळतील.

उन्हापासून संरक्षण : काही नाजूक प्रकृतीची रोपं असतात ज्यांना फार तीव्र वा थेट उन्ह सहन होत नाही. अशी रोपं जर मोठी वाढ होणाऱ्या रोपांजवळ लावली तर त्यांना आवश्यक तेवढंच उन्ह मिळून त्यांची वाढही व्यवस्थित होते. त्यांना दुपारच्या तीव्र अन थेट डोक्यावर पडणाऱ्या उन्हाचा सामना करावा लागत नाही. सकाळचं कोवळं किंवा संध्याकाळाचं सरतं उन्ह मिळून त्यावर त्यांची वाढ चांगली होते.

वनस्पतींमधे प्रत्येक वनस्पतीची बी रुजण्यापासून ते फळं देऊन जीवन संपेपर्यंत जी जी अवस्था अन अन्नद्रव्यांची गरज असते ती सर्वस्वी वेगवेगळी अन अद्वितीय असते. दोन विभिन्न प्रकारच्या वनस्पतींची अन्नाची व खतपाण्याची गरज ही वेगवेगळी असते. परंतु त्यातही दोन वेगळ्या प्रजातींच्या वनस्पती एकमेकांना पूरक ठरत अन एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत वाढवल्यास खतपाण्याचीही बचत होते अन कमी जागेतही जास्त उत्पादन घेता येतं.

बागेत सहचर रोपांची लागवड करण्यासाठी पुष्कळ प्रकारच्या मित्र वनस्पती आहेत. अर्थात या वनस्पतींची निवड करताना, आपलं ठिकाण, तिथला पाऊस, हवामान, रोपांसाठीचा योग्य तो हंगाम, मातीचा पोत वगैरेंचा विचार करुनच निवड करावी. व्यवस्थित नियोजन करुन या प्रकारे रोपांची लागवड केल्यास आपल्याला मर्यादित जागेतही भरपूर उत्पादन घेता येईल.

सोबत दिलेल्या यादीत मित्र वनस्पतींची नांवं जशी दिली आहेत तसंच कुठली रोपं कुणाबरोबर लावू नयेत हेही लिहिलं आहे. ही यादी सर्वसमावेशक नक्कीच नाही. आपण साधारणतः ज्या ज्या प्रकारची रोपं वा भाज्या आपल्या बागेत लावत असतो तीच नांवं दिली आहेत. या यादीशिवायही वनस्पतींचे पुष्कळ प्रकार आहेत जे एकमेकांसोबत वाढतात. परंतु आपल्या मर्यादित बागेचा विचार करत असताना या सर्वच वनस्पतींचा विचार करण्याची आपल्याला आवश्यकता नाही.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya 

बियाणांमधे पुसा आणि अर्का यांचा अर्थ काय?

बियाणांमधे पुसा आणि अर्का यांचा अर्थ काय?

बरेंचदा आपण नर्सरीमधून वा बियाणांच्या दुकानांतुन भाज्यांच्या बिया घेत असतो. प्रत्येक भाजीच्या बियाणांमधे बरेच प्रकार असतात. त्या त्या प्रकाराचं नांव पाकीटावर छापलेलं असतंच पण त्यासोबत वाणाच्या आधी पुसा किंवा अर्का अशी नांवंही छापलेली असतात. या बिया अर्थातच हायब्रीड असतात. बियाणं हायब्रीड असल्याची हीही एक खूण आहे. तर काय अर्थ असतो या शब्दांचा?

भारतीय शेतकी संशोधन संस्था अर्थात Indian Agriculture Research Institute ही देशातील शेतकी संशोधन करणारी सर्वोच्च अन शसकीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९०६ मधे बिहारमधील पुसा या गावी झाली होती. त्यावेळी तिचं नांव "पुसा इन्स्टिट्युट" एवढंच होतं. १९३४ मधे झालेल्या भूकंपात या संस्थेचं पुष्कळ नुकसान झालं. त्यामुळं १९३६ मधे ती दिल्लीला हलविण्यात आली. या संस्थेद्वारे बियाणांवर जे काही संशोधन होतं अन जी वाणं प्रसारित केली जातात त्यांना नांवं देताना आधी "पुसा" हे नांव देऊन मग त्या वाणाचे गुण सांगणारं नांव दिलं जातं. उदा. भेंडीची एक जात "पुसा सावनी" अशी आहे. याचा अर्थ भेंडीचं वाण जे पुसा संस्थेकडून विकसित करुन प्रसारित केलं ती अन हे वाण पावसाळी मोसमात घेतलं तर अधिक उत्पादन देतं. तसंच "पुसा ज्वाला" या नावाचं मिरचीचं एक वाण आहे. नांवावरुनच लक्षात येतं की ही मिरची अतिशय तिखट असते.

याच भारतीय शेतकी संशोधन संस्था अर्थात Indian Agriculture Research Institute ची दक्षिण भारतामधील शाखा म्हणजे The Indian Institute of Horticultural Research अर्थात IIHR. बंगळुरातील अर्कावती नदीच्या काठी या संस्थेचा कारभार चालत असल्यानं इथं संशोधित केलेल्या बियांचं "अर्का" हे नामाभिधान केलं जातं. अर्थात या संस्थेची नांवं देण्याची पद्धत थोडी निराळी असल्यानं नांवावरुन वाणाचे गुण समजत नाहीत. म्हणजे उदा. भेंडीच्या काही वाणांची नांवं "अर्का अनामिका", "अर्का निकिता" अशी आहेत.

या संस्था थेट बियाणं विकत नाहीत तर "ऍग्रीलाभ" वगैरेंसारख्या कंपन्यांद्वारे नर्सरीज वगैरेंना ते त्या विकतात. त्यामुळं जेव्हा तुम्ही बिया खरेदी करता तेव्हा बिया हायब्रीड आहेत की कशा, त्या एफ वन म्हणजे F1 आहेत की F2 हेही विचारा. बियाणं जेव्हा संकरित केली जातात तेव्हा त्यांच्या पहिल्या पिढीला F1 म्हणजे Filial 1 असं म्हणतात. अन त्यानुसार दुसऱ्या पिढीला F2 अन तिसऱ्या पिढीला F3 अशी नांवं दिली जातात. अर्थात एकाच प्रकारच्या जास्त पिढ्या तयार केल्या जात नाहीत. बियाणं वातावरणाशी सुसंगत झाल्यावर त्यात काही वैगुण्यं तयार होत जातात किंवा त्यातले दोष टाळून एखादी नवी जात विकसित केली जाते अन नव्या नावानं ती बाजारात येते. मग पुन्हा नवं नांव अन त्यासोबतच F1, F2, F3 वगैरे दिलं जातं.

तेव्हा बियाणं घेताना या सगळ्या गोष्टींची चौकशी करा. आपण जे काही घेत आहोत ते सर्व बाजुंनी सुरक्षित आहे ना, त्याचा बागेतील इतर झाडांवर काही परिणाम होणार नाही ना याची खात्री करुनच बिया विकत घ्या.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

अती पावसात बागेची काळजी कशी घ्यालजुलै महिना तसा सगळीकडंच अतीपावसाचा. जुन महिन्यात जास्त पाऊस पडला तरी उन्हाळ्यात सगळीकडं कोरडं ठक्क झालेलं असतं. त्यामुळं जुनमधला पाऊस मातीमधे आतपर्यंत जाऊन सगळं भिजवतो. सगळीकडं हिरवंगार अन ताजं टवटवीत दिसू लागतं. पण जुलै महिन्यात हे सगळं चित्र पालटू लागतं. पाऊस रौद्र रूप धारण करु लागतो. काही ठिकाणी छतही गळू लागलेलं असतं. रस्त्यांमधे, रेल्वे रुळांवर सगळीकडं पाणी साचु लागतं. इतर गोष्टी जास्त महत्वाच्या असल्यामुळं सहाजिकच बागेकडं थोडंफार दुर्लक्षच होतं.

जुलै संपता संपता वाराही जोर धरु लागतो. त्यामुळं जमिनीवरची आसुपालव वगैरेंसारखी झाडं जमिनीला डोकं टेकवु पहातात, मुळं फारशी खोलवर न जाणारी पण सहा-सात फुटांपेक्षाही उंच झालेली पपई, केळीसारखी झाडं कलु लागतात. त्यात त्यांच्यावर फळं असतील तर हे हमखास होतंच. गच्चीवरच्या बागेतही बऱ्यापैकी पडझड व्हायला सुरुवात झालेली असते. पावसाला सुरुवात होण्यापुर्वी कितीही काळजी घेतलेली असली तरी थोडंफार नुकसान हे होतच असतं. जमिनीवरच्या जुन्या झाडांच्या काही वाळलेल्या फांद्या खाली पडतात तर काही फांद्या हा हा म्हणता एवढ्या वाढतात की त्या लगेच छाटणंही गरजेचं होऊन जातं. अशातच कारंदं किंवा कुठल्याही मॉर्निंग ग्लोरी कुटुंबातील वेल भराभर वाढून मुख्य झाडाचा श्वास गुदमरुन जाईल अशा प्रकारे त्यांना वेढे घालुन बसलेले असतात. उन्हाळ्यात छाटलेल्या झाडांना पालवी फुटून तिची दाटीही प्रमाणाबाहेर झालेली असते. बरं, घरातुन पहाताना हे सगळं डोळ्यांना दिसत असुनही चिखलात जाण्याची इच्छाही होत नसते.

पण थोडी उघडीप मिळताच हे सगळं सावरणं गरजेचं असतं. नाहीतर पावसाळ्यानंतर बागेची दुरवस्था झालेली असते. ती सावरण्यात पाठ-कंबर एक होते. अन तो पसारा अन कचरा काढल्यावर काय दिसतं तर बरीचशी झाडं अन वेली रोगाला बळी पडली आहेत. भाज्यांच्या वेली अन रोपांवर काही भाज्या लागल्या होत्या पण त्या एक तर पावसानं सडून गेल्या आहेत किंवा निबर झाल्या आहेत. काही विकृत आकारात वाढल्या आहेत तर काही गळून पडल्या आहेत. तेव्हा हा पसारा आवरण्यात बराच वेळ जातो. अशातच बागकामाच्या मूडला किंवा इंटरेस्टलाच सुरुंग लागू शकतो. ते तर फारच भयानक.

पाऊस जेव्हा आक्रमक असतो अन त्यामुळं आपण बागेत पाऊलही ठेऊ शकत नाही तेव्हा काय काय घडतं पहा;

विविध रोग : सगळी बाग ओलीगच्च झालेली असते. उन्ह जवळपास नसतंच अन असलं तरी त्यात फारशी उष्णता नसते. त्यामुळं बागेतील झाडांवर विविध प्रकारचे बुरशीजन्य रोग हल्ला करतात. थोडी उघडीप मिळाल्यावर मावाही हल्ला करतो. बुरशी लागलेल्या फांद्या अन पानं तोडली तर रोपावरील तेवढा भाग तसाच नवीन रोगासाठी उघडा पडतो. अधुनमधुन पडणाऱ्या पावसामुळं त्या उघड्या भागावर काही लावताही येत नाही की कसलं औषधही फवारता येत नाही. फवारलेली औषधं पाऊस पडल्यावर वाहुन जातात. उन्हाळ्यात केलेल्या मल्चिंगमुळं बुरशीला रहाण्यासाठी तयार घर मिळतं. 

कीटक अन किड : ओलसरपणा आवडणारे प्राणी म्हणजे शंख अन गोगलगायी. तसंच इतरही असंख्य प्रकारच्या अळ्या. हे सगळे आपल्या झाडांवर हल्ला करतात. कोवळी पानं खाऊन फस्त करतात. यापैकी पुढं जाऊन फुलपाखरं होणाऱ्या अळ्या सोडल्यास इतर सारेच त्रासदायक असतात. त्यांची संख्या नियंत्रणात असेल तर ठीक, पण संख्या जास्त असेल तर मात्र बागेचं काही खरं नाही.

परागीभवनात अडथळे : नैसर्गिकरित्या परागीभवन करणारे कितीतरी सैनिक पावसामुळं आपलं काम करु शकत नाहीत. त्यामुळं कित्येक मादीफुलं परागीभवनाअभावी तशीच गळुन पडतात. त्यामुळं फळं अन फळभाज्यांच्या उत्पन्नातही घट होते.

फळं तडकणे : टोमॅटो, लिंबू वगैरे काही फळं आहेत ज्यांना पाणी जास्त झाल्यास ती तडकतात. झाडानं जास्त पाणी प्याय़लं की अशा फळांची त्वचा फाटते. अशी फाटलेली जागा बुरशीजन्य रोगांनाही आमंत्रण देते. म्हणून पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं, अन वरुन संततधार लागली तर त्यापासुनही बचाव करण्याची गरज असते.

अनावश्यक गवत : बागेत वावर कमी असेल तर तसंच रोपां-झाडांमधली माती नियमितपणं खुरपणं थांबल्यावर तण अन गवत वाढत जातं. तणांची वाढही इतकी प्रचंड वेगानं होत असते की दोन दिवसांपूर्वी दोन इंचांचं एखाद्या मिलीमिटरएवढी जाड दांडी असलेलं रोपटंही आठ दहा इंचांचं होऊन त्यावर कळ्या आलेल्या असतात. तण वेळेत काढले नाहीत तर नंतर कामही वाढतं, अन तेव्हा ते अधिक कष्टाचंही होतं. अन तोपर्यंत किडींनाही नवीन आश्रय मिळतो.

यासाठी, पावसाची उघडीप मिळताच पायात रबरी बूट, हातात मोजे. डासांपासून बचाव म्हणून अंगभर कपडे घालायचे अन बागेत उतरायचं. जवळ धारदार कात्री वा सिकेटर, खुरपं घ्यायचं. पालापाचोळा, गवत अन छाटलेल्या फांद्या ठेवण्यासाठी एखादा टब किंवा टोपलीही घ्यायची अन लागायचं कामाला.

सर्वात आधी आपण लावलेल्या झाडांना मोकळा श्वास घेता येईल याची व्यवस्था करा. आळ्यातलं वा कुंडीमधलं गवत काढून याचे तुकडे करुन ते तिथंच गाडा. रोपांवर वेल चढले असतील तर तेही सावकाश हलक्या हातानं सोडवुन घेऊन त्याचेही तुकडे करुन जागीच गाडा. हे करत असताना मुख्य झाडाआ धक्का लागणार नाही. त्यावर काही फुलं अथवा फळं असतील तर ती तुटणार नाहीत याची काळजी घ्या. आळी मोकळी झाल्यावर आळ्यांमधे पाणी साचून रहातंय का ते पहा. साचत असेल तर आळं तोडून पाणी वाहून जाईल याची व्यवस्था करा. आळ्यांमधली पानं व इतर काडीकचरा अन नंतर गवत घातलं असेल तर ते मातीमधे व्यवस्थित मिसळून घ्या. थोडी नीमपेंड पसरुन घाला. कोरडं कंपोस्ट अथवा चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर ते वरुन पसरुन द्या. यामुळं अधिकचा ओलावाही शोषला जाईल अन पावसाळ्याच्या सुरुवातीला दिलेल्या खतांमधली अन्नंद्रव्यं जर वाहून गेली असतील तर तीही पुन्हा झाडांना मिळतील. हे खासकरुन कुंड्यांसाठी अवश्य करावं.

कुंड्यांमधे झाडं असतील तर त्यांच्याभोवती पाणी साठून रहाणार नाही याची काळजी घ्या. कुंड्या विटांवर वा तत्सम काही वस्तूंवर ठेऊन खालून पाणी आत शोषलं जाणार नाही याची काळजी घ्या. त्यांची पाणी वाहून जाण्यासाठी केलेली छिद्रं मोकळी करुन घ्या. छतावरुन पडणारं पाणी जर जवळपासच्या झाडांजवळ किंवा वाफे केले असतील तर तिथं जमा होत असेल तर त्याला योग्य ती दिशा देऊन झाडांपाशी मुरणार नाही हे बघा. वाफे पावसाच्या जोरानं खाली बसले असतील तर त्यांच्या कडा उंचावुन घ्या. जेणेकरुन बाहेरचं पाणी आत घुसणार नाही. अर्थात मधे खोलगटपणा करु नका. नाहीतर त्यावर पडलेलं पाणी तिथंच साठेल. शक्य तेवढं करुनही काही झाडं पावसाच्या माऱ्याला तोंड देणार नाहीत असं वाटत असेल तर त्याच्या फांद्या काढून काही रोपं तयार करायला ठेवा. म्हणजे तुमच्याकडं पर्यायी व्यवस्था उपलब्ध असेल.

वर्षभर बागेत प्रचंड कामं असतात. फक्त प्रत्येक ऋतुप्रमाणं ती बदलत असतात. पावसाळ्यात तसा बऱ्यापैकी आराम असला तरी बागेचा पावसापासून बचाव करणं हे सगळ्यात महत्वाचं काम असतं. अन ते ठराविक दिवसांनी करावंच लागतं. तेव्हा चिखलात हातच नव्हे तर पायही घालण्याची तयारी ठेवा. पण हो, स्वतःला सांभाळूनच. उगीच पाय घसरुन पडाल. आकाश रात्री बघायला छान वाटतं. पण दिवसा बागेत पाठीवर पडून ते तितकंसं छान नाही वाटत.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...