गच्चीवरील_भाजीपाला - कोबी व फ्लॉवर

गच्चीवरील_भाजीपाला

लेखांक ११

कोबी व फ्लॉवर


कोबी व फ्लॉवर या भाज्यांमधे खनिज द्रव्यं व जीवनसत्वं मुबलक प्रमाणात असल्यामुळे या भाज्यांचा समावेश नियमितपणे आपल्या आहारात ठेवल्यास रोगप्रतिकारशक्ती तर वाढेलच पण शरीरही निरोगी रहाण्यास मदत होईल. बाजारात जे कोबी अन फ्लॉवरचे गड्डे विक्रीसाठी उपलब्ध असतात ते शिजवताना बहुतेकवेळा उग्र वास येतो. या वासामुळे बरेचजण अशा भाज्यांना नाकं मुरडत असतात. परंतु आपण जर आपल्या घरीच, अगदी छोट्या कुंडीत या भाज्या सेंद्रीय खतावर उगवल्यास या चविष्ट तर लागतीलच पण घातक केमिकल्सही आपल्या पोटात जाणार नाहीत. कोबी व फ्लॉवर हे थंड हवामानात घेतलं जाणारं पीक आहे. त्यामुळे थंडीमधे हे छान वाढतं. परंतु आपल्या गच्ची-बाल्कनीतल्या बागेत अन तेही छोट्या प्रमाणात लागवड करत असताना आपण हवामान काही प्रमाणात नियंत्रित करु शकतो. त्यामुळे आपण हे पीक तीव्र उन्हाळ्याचे काही महिने सोडल्यास वर्षातले बाकी महिने घेऊ शकतो. चला तर आपण माहिती घेऊया घरच्या बागेत कुंडीत कसे कोबी व फ्लॉवर पिकवायचं ते.

कोबी व फ्लॉवर कुंडीमधे लावत असताना आपण थेट बी मातीमधे पेरु शकतो. पण रोपं बनवुन घेऊन ती ट्रान्सप्लांट करणं कधीही चांगलं. बिया पेरण्यासाठी ट्रे, अथवा फळांची खोकी वगैरेंचा वापर करावा. पॉटिंग मिक्सनं व्यवस्थित भरुन घेऊन, पाणी फवारुन घेऊन साधारण पाव ते अर्धा इंच खोल बोटानं खड्डा करुन घेऊन त्यात बी पेरुन माती सारखी करुन घ्यावी व स्प्रे बॉटलनं पाणी द्यावं. ट्रे वा खोकं सावलीत पण सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेऊन द्यावं. माती कोरडी वाटली तरच पाणी द्यावं. साधारण आठवड्याभरात कोंब रुजुन येतील.

कोबी व फ्लॉवरची मुळं फार खोलवर जात नाहीत. त्यामुळे एका रोपासाठी एक १५ ते २० लिटर्स क्षमतेची कुंडी पुरेशी होते. फक्त खोली १२ इंच तरी असायला हवी. या भाज्यांची मातीखालची वाढ जरी कमी असली तरी मातीच्या पृष्ठभागावरचा पसारा खूप असल्यामुळे एका कुंडीत एकच रोप लावावं. कुंडी मोठी असल्यास वा वाफ्यामधे लागवड करायची असल्यास दोन रोपांत १२ इंच आणि दोन ओळींत १८ इंच अंतर राखावं. कोबी व फ्लॉवरची खतांची भूक फार असते. त्यामुळे खतांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी नेहमी घेणं गरजेचं आहे.

साधारण ४ ते ६ आठवड्यांची रोपं झाली की ती कुंडीमधे ट्रान्सप्लांट करावी. कोबी व फ्लॉवरची रोपं फार नाजूक असतात. त्यामुळे सीडलिंग ट्रे असेल तर प्रश्न नाही, पण खोक्यामधे बिया पेरल्या असतील तर रोपं काढताना शक्यतो जमेल तेवढी आजुबाजुच्या मातीसह घ्यावी. कुंडीत अथवा जिथं रोपं लावणार आहात तिथे तेवढ्याच आकाराचा खड्डा हातानंच करुन त्यामधे मातीसह काढलेलं रोप ठेवावं व त्याभोवती माती हलकेच दाबून घ्यावी. लगेचच पाणी देऊन माती ओलसर करुन घ्यावी. कुंडी दुपारचं तीव्र उन्ह मिळणार नाही पण सूर्यप्रकाश मात्र भरपूर मिळेल अशा बेतानं ठेवावी.

रोपं सेट झाल्यावर सकाळ-संध्याकाळचं उन्ह मिळेल याची काळजी घ्यावी. वर सांगितल्याप्रमाणे या भाजीला खतं जास्त लागत असल्यामुळे साधारण महिना सव्वा महिनाभराने कंपोस्ट वा इतर उपलब्ध असेल ते सेंद्रीय खत द्यावं. पाणी देताना मधल्या शेंड्यावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो पाणी नेहमी खालच्या मातीमधेच थेट द्यावं. कोबी व फ्लॉवर मध्यभागी वाढत असताना, विशेषतः फ्लॉवरवर थेट उन्ह पडू नये याची काळजी घ्यावी. उन्ह पडल्यास रंग बदलू शकतो. म्हणून आजुबाजुची मोठी पानं एकत्र करुन ती गरज पडल्यास सुतळीनं हलकेच बांधून घ्यावी.

कोबी व फ्लॉवर कीडीला फार लवकर बळी पडतात. त्यामुळे नियमित निरीक्षण करणं अतिशय गरजेचं असतं. पानं खाल्ल्यासारखी अथवा पानांना भोकं पडलेली दिसली की लगेचच तपासणी करावी. अशी तपासणी नेहमी सकाळच्या वेळी लवकर करावी. मावा किडे व कोबीवरील अळ्या हमखास नजरेस पडतील. किडे व अळ्या हातानं उचलून दूर फेकून द्याव्या. नीम तेल अथवा नीम अर्क विकतचा किंवा घरी बनवलेला, जो असेल तो योग्य प्रमाणात फवारावा.

रोपं ट्रान्स्प्लांट केल्यापासून दोन ते अडीच महिन्यांत कोबी व फ्लॉवर काढणीला येतात. कोबी तयार झाल्याची खूण म्हणजे मध्यभागी तयार झालेला गड्डा दाबून पाहिल्यास कडक लागतो. तो जास्त कडक होण्याआधीच कापून घ्यावा. अन्यथा निबर होऊन कडवटपणा वाढतो. फ्लॉवर तयार झाल्याची खूण म्हणजे गड्ड्यातील गुच्छ एकमेकांपासून वेगळे होऊ लागतात. वाढीदरम्यान उन्ह पडलं तर रंगही बदलू लागतो. त्यामुळे पूर्ण वाढ होऊ लागताच वरचा गड्डा कापुन काढावा. कोबी व फ्लॉवर काढल्यावर खालची रोपं तुकडे करुन कंपोस्टमधे टाकावीत किंवा इतर कुंड्यांत बारीक तुकडे करुन टाकून वर माती टाकावी. कुंड्यांतलं पॉटिंग मिक्स काढून सावलीत दोन आठवडे पसरुन ठेवावं अन नंतर कोबी व फ्लॉवर व्यतिरिक्त इतर कुठल्याही रोपांसाठी वा भाज्यांसाठी वापरावं.

© राजन लोहगांवकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...