ज्यांची बाग संपूर्णपणं सेंद्रीय आहे त्यांच्यासाठी

ज्यांची बाग संपूर्णपणं सेंद्रीय आहे त्यांच्यासाठी.तुमच्या बागेत जर तुम्ही फक्त अन फक्त सेंद्रीय खतंच वापरत असाल, म्हणजेच जर तुम्ही तुमच्या बागेचं बहुतांश सारं काम जीवाणूंमार्फतच करुन घेत असाल आणि जीवामृत वा इतर कुठलीही द्रवरुप खतं बनविण्यासाठी नळाचं पाणी थेट वापरत असाल तर एक सावधगिरीचा सल्ला.

तुम्ही जर बागेत नळाचं पाणी थेट देत असाल तर त्यात महानगरपालिकेद्वारे अथवा स्थानिक पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थेनं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी घातलेल्या क्लोरिनमुळं कंपोस्ट, गांडूळखत, शेणखत इत्यादी सेंद्रिय खतांमधले जीवाणू मरतात. त्यामुळं झाडांना दिलेली खतं त्यांना खाण्यायोग्य करण्यासाठी जीवाणू शिल्लक उरत नाहीत. यासाठी पाण्यातील क्लोरीन घालवणं गरजेचं असतं.

  • पाणी उकळून गार करुन झाडांना देणं हा एक मार्ग आहे पण तो खर्चिक अन तापदायक आहे.
  • बाजारात पाण्यात विरघळणाऱ्या "व्हिटामिन सी"च्या गोळ्या मिळतात. शंभर लिटर पाण्यात एक गोळी घालून दहा-पंधरा मिनिटं थांबल्यावर पाणी ढवळून घेतल्यास त्यातील क्लोरिन निघुन जातो. हाही उपाय खर्चिक आहे अन व्हिटामिन सी जास्त प्रमाणात घातलं गेल्यास मातीचा पीएच बदलु शकतो.
  • पाणी भरलेलं पिंप वा बादली चोवीस तास उघडं ठेवल्यासही त्यातील क्लोरिन निघुन जातो. हा उपाय सर्वात सोपा अन बिनखर्चाचा आहे. फक्त यासाठी प्लानिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे मला बागेला उद्या पाणी द्याय़चं असेल तर मी आजच बागेच्या गरजेनुसार पाणी भरुन ते पिंप तसंच उघडं ठेवणं किंवा त्यात काही पडू नये म्हणून पातळ अन जाळीदार फडक्यानं झाकुन ठेवणं आवश्यक आहे.

वरीलपैकी कुठलाही पर्याय वापरणार असाल तरीही बागेला पाणी देताना ते ढवळून दिल्यास त्याचा मातीला जास्त उपयोग होतो.

अर्थात, जीवाणूंच्या संख्येत सतत वाढ होत असल्यानं जे जीवाणू मरतात त्यांच्या जागी नवीन जीवाणू काही कालावधीतच येत असतात. पण आपण काळजी घेतलेली बरी. म्हणून हा आगंतुक सल्ला.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...