भाज्यांची उन्हाची गरज

भाज्यांची उन्हाची गरजबरेंचदा सर्वांनाच, त्यातही नवीन बागकर्मींना एक प्रश्न हमखास पडत असतो अन तो म्हणजे कुठल्या भाज्यांना किती उन लागतं. भाज्यांच्या, पेरणी ते काढणी या संपूर्ण जीवनचक्रात त्यांची उन्हाची गरज काय़ असते अन आपल्याकडं उपलब्ध असलेल्या उन्हात, मग ते थेट उन असो की सूर्यप्रकाश आपण कोणकोणत्या भाज्या घेऊ शकतो.

आपापल्या बागेमधे दिवसभरात पडणाऱ्या उन्हाच्या वेळा, प्रमाण, जागा अन त्याची तीव्रता हे सारं वेगवेगळं असतं. यामधे सुर्याच्या उत्तरायण अन दक्षिणायन यामुळं तर वर्षभर सतत बदल होत असतोच पण शेजारी-पाजारी होणारी बांधकामं अन बाहेरील किंवा आपणच आपल्या बागेत लावलेल्या झाडांची सतत होणारी वाढ यामुळंही उन्हाचे तास कमी अधिक होत असतात तसंच त्याची तीव्रताही कमी अधिक होत असते. हे सगळं आपल्या ताब्यात नसतं. यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. फार फार तर आपण आपल्या बागेतील वाढलेल्या झाडांची छाटणी करु शकतो. पण इतर बाबतीत मात्र आपल्याला अन आपण लावलेल्या रोपांना मिळेल तेवढ्या उन्हावर अन सूर्यप्रकाशावरच भागवून घ्यावं लागतं.

या लेखात आपण किती उन्हात कोणकोणत्या भाज्या लावू शकतो हे पहाणार आहोत. यासाठी आपण तीन प्रमुख गटांत भाज्यांची विभागणी करणार आहोत.
ते गट असे ;
६ ते ८ तास थेट उन आवश्यक असलेल्या भाज्या
४ ते ६ तास उन आवश्यक असलेल्या भाज्या
२ ते ४ तास उन आवश्यक असलेल्या भाज्या

इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी अन ती म्हणजे कुठल्याही वनस्पतीच्या वाढीसाठी उन्हाची गरज ही कमी-जास्त प्रमाणात आवश्यकच असते. त्यामुळंच फळांना चव अन फुलांना रंग मिळत असतो. परंतु काही भाज्या कमी उन्हातही तग धरु शकतात अन फुलतात व फळतातही. अर्थात अशा भाज्या जर उन्हात असत्या अन आपण त्यांची पूर्ण काळजी घेत त्यांना वाढवलं असतं तर त्यांच्या रंगरुपात अन चवीत नक्कीच फरक पडला असता. पण तरीही समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग या न्यायानं त्या वाढतात अन आपली अन्नाची गरज भागवतात.

६ ते ८ तास थेट उन आवश्यक असलेल्या भाज्या : टोमॅटो, वांगी, काकडी, मिरची, मका, दुधी व लाल भोपळा, भेंडी, चवळी व इतर शेंगवर्गीय भाज्या, तसंच सर्व वेलवर्गीय भाज्या यांना जेवढं जास्त उन मिळेल तेवढी त्यांची वाढ उत्तम होते. अर्थात तीव्र उन्हाच्या दिवसांत दुपारच्या वेळी म्हणजे साधारण सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच-तीन या वेळांत या भाज्यांवर सावली येईल अशी व्यवस्था केली तर ते अधिक फायद्याचं होईल. उन जास्त म्हणजे पाण्याची गरज जास्त हे गणित ठरलेलं. कारण कुंडीत लावलेल्या भाज्यांना पाण्यासाठी सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून रहावं लागतं. त्यामुळं या भाज्यांना पाण्याचा ताण बसू देऊ नये. 

४ ते ६ तास उन आवश्यक असलेल्या भाज्या : बीट, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, गाजर, कांदा, लसूण, मटार, बटाटा, मुळा, आलं वगैरे भाज्या, म्हणजेच बहुतांशी कंदवर्गीय भाज्या अर्धसावलीत छान वाढतात. तीव्र उन वा प्रमाणाबाहेर जास्त उन असल्यास यांची वाढ व्यवस्थित होत नाही. कोबी, फ्लॉवर सारख्या भाज्यांची वाढ अतीउन्हात कमी होतेच पण त्यांच्या चवीतही फरक पडतो. ज्या भागात उन तीव्र असतं तिथं मोठ्या वृक्षांच्या सावलीत यांची लागवड केली तर उपलब्ध जागेचा वापरही होतो अन भाज्याही मिळतात.

२ ते ४ तास उन आवश्यक असलेल्या भाज्या : मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर वगैरे सर्व पालेभाज्या तसंच लेट्यूस वगैरेंसाठी कमी उन असल्यास त्यांची वाढ उत्तम होते. साधारणतः पालेभाज्या कोवळ्या असतानाच खाल्ल्या जात असतात. त्यामुळं कमी उन्हात जर त्या वाढवल्या तर त्यांचे सर्व गुण अन चव अबाधित रहाते.

आपल्या बागेत किती उन येतं, दिवसाच्या कुठल्या वेळांत ते बागेमधल्या कुठल्या भागात अन किती प्रमाणात अन तीव्रतेत असतं याचा अभ्यास सुरुवातीचे काही दिवस तसंच वर्षभरांतल्या वेगवेगळ्या मोसमात करुन त्याप्रमाणं नियोजन करुन भाज्या लावण्याच्या जागा ठरवाव्यात. अर्थात आपण कितीही अभ्यास केला, अन त्याप्रमाणं ठरवलं तरीही शेवटी तो निसर्ग आहे हे एक अन सभोवतीच्या इमारती व मोठी झाडं वगैरेंमुळं सर्वच दिवस सारखे नक्कीच नसणार.

यासाठी आपल्या उपलब्ध जागेनुसार आपण झाडांची अन कुंड्यांची रचना करुन त्याप्रमाणं मिळणाऱ्या उन अन सावली यांमधे आपण भाज्या लावून त्यांची गरज भागवु शकतो. जास्त उन लागणाऱ्या भाज्या मधल्या मोकळ्या जागेत लावून वा त्या ठिकाणी कुंड्या ठेवून मोठ्या झाडांच्या पडणाऱ्या सावलीमधे कमी उन्हाची अन सूर्यप्रकाशाची गरज असणाऱ्या भाज्या आपण लावू शकतो. बागेत सावली असणारा भाग नक्कीच असतो. त्या भागात सावलीत वाढणाऱ्या भाज्या लावून तीही जागा आपण उपयोगात आणू शकतो.

बागेच्या ज्या भागात थेट उनच नव्हे तर सूर्यप्रकाशही अभावानंच पडत असेल तिथं आपण फुलझाडं वा ओर्नॅमेंटल झाडं लावु शकतो. ओर्नॅमेंटल वा इनडोअर प्रकारात मोडणारी झाडं अशा भागात छान वाढतात. ज्या भाज्यांना भरपूर उन आवश्यक असतं अन जी आपण एका रांगेत जर लावत असू तर अशा झाडांच्या रांगा उत्तर दक्षिण ठेवल्या तर सर्वच झाडांना सकाळ ते संध्याकाळ समान उन मिळेल. उन्हात वाढणाऱ्या भाज्यांच्या मुळांपाशी कुंडीत अर्धसावलीत वाढणाऱ्या भाज्या लावल्या तर एकाच खतात दोन भाज्या तर घेता येतातच, पण कमी जागेत जास्त भाज्या आपल्याला मिळू शकतील.

पूर्ण उन्हाची गरज असलेल्या भाज्या अर्ध उन्हात अन अर्ध उन्हात होणाऱ्या भाज्या जर सावलीत लावल्या तर त्या फळणार नाहीत असं नाही तर त्यांना लागणारी फळं रंग अन आकारानं कमी असतील. चव तीच असेल पण संख्या कमी असेल. आणि कळी ते पक्व भाजी हा काळही जास्त असेल. कारण एकच. त्यांना वाढीसाठी आवश्यक असणारं उन कमी प्रमाणात मिळेल अन त्यामुळं मिळणारी जीवनसत्वं अन अन्नद्रव्यं कमी मिळतील ज्यांची उणीव आपण खतांद्वारे भरून काढु शकणार नाही. म्हणून आपल्या जागेनुसार काय लावायचं ते ठरवा अन त्याप्रमाणंच बागेकडून अपेक्षा ठेवा. शेवटी आपल्या बागेत पिकलेला टोमॅटो बाजारातल्याप्रमाणं दोन इंच व्यासाचा नसला तरी तो आपण स्वतः पिकवला आहे अन त्याला कुठलं खत अन पाणी कुठलं दिलं आहे ते आपल्याला माहीत आहे अन त्यावर आपला अंकुश आहे हे महत्वाचं.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

तयारी हिवाळी बागेची

तयारी हिवाळी बागेची गेल्या लेखात पावसाळ्यानंतर आपल्या बागेत काय कामं करायची ते आपण पाहिलं. त्याप्रमाणं बरीच कामं झालीही असतील. नसतील झाली तर ती उरकुन घ्या. कारण बाग जेवढी स्वच्छ अन आटोपशीर तेवढी कामं करायला मजा तर येतेच पण कीड अन इतर रोग यांपासुनही आपली बाग मुक्त रहाण्यास मदत होते. अजुनही कुठं किडींना लपण्यासाठी जागा शिल्लक असेल तर तीही स्वच्छ करुन घेतलेली बरी.

हिवाळ्यातलं उन तितकंसं तीव्र नसतं, अर्थात ऑक्टोबर हीट जर तुमच्या भागात जास्त तीव्र असेल तर उन्हाळ्यात जशी आपल्या बागेची काळजी घेता तशीच ती याही महिन्यात घ्यावी लागेल. पण त्यानंतर मात्र सर्वत्र उत्साहाचं अन प्रसन्न वातावरण असतं. आपापल्या घरांतही सणासुदीचं अन उल्हासाचं वातावरण असतं. बागेत फुलपाखरं बागडत असतात. फुलझाडंही भरभरुन फुलत असतात. या दिवसांत बागकाम करण्यातही खूप उत्साह असतो. कारण कितीही काम केलं तरी घाम नाही अन त्यामुळं येणारा शिणवठा वा थकवाही नाही.

या सीझनमधे बागेत खूप भाज्याही घेता येतात. त्याची तयारी दोन आठवड्य़ांपूर्वी सांगितल्याप्रमाणं तुम्ही केलीच असेल, नसेल केली तर ती लगेचच करायला घ्या. या दिवसांत उन्हाचा तडाखा कमी असल्यामुळं सर्व प्रकारच्या पालेभाज्या आपल्याला लावता येतील. तसंच कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची वा भोपळी मिरची, मुळा, गाजर, वाटाणा, हरभरा, वाल वगैरेंसह वांगी टोमॅटो अन मिरचीही आपल्याला घेता येतील. उन कमी म्हणजे पाण्याची गरज कमी रहाणार. म्हणजेच कमी पाण्यात आपल्याला भरपूर पीक घेता येईल.

पावसाळी पिकं घेण्यासाठी तुम्ही काही रोपं बागेत लावली असतील अन त्यापासून भाज्याही घेतल्या असतील. आता त्यांना भाज्या येणार नाहीत किंवा आल्याच तर त्या संख्येनं अन आकारानं खूपच कमी अन लहान असतील. झालंच तर त्यांच्या अंगाखांद्यावर अन मुळाशी किडींचं आगार तयार झालं असेल. त्यामुळं अशी खराब झालेली झाडं अन वेली पूर्णपणं काढून घ्या. जर मोकळी जागा भरपूर असेल ते उन्हात वाळण्यासाठी पसरुन ठेवा. रोज किंवा एक दिवसाआड ते उलट सुलट करा म्हणजे उष्णतेनं कीड असलीच तर मरुन जाईल. त्यानंतर त्यांचे तुकडे करुन कंपोस्टमधे टाका. वांगी, मिरची सारखी काही झाडं तीन-चार वर्षं टिकतातही अन फळंही देत रहातात. त्यामुळं अशी झाडं ठेवलीत तरी चालेल. फक्त अशा झाडांची खोलवर छाटणी करुन घ्या. मूळ खोडापासून चार पाच इंच फांद्या ठेवुन फांद्यांची टोकं छाटा. म्हणजे नवीन फूट येऊन अधिक फळं मिळतील.

यानंतर आपली बागेसाठीची जागा, आपली आवड वगैरे गोष्टींचा विचार करुन काय काय भाज्या, फुलझाडं लावायची याचं व्यवस्थित नियोजन करुन घ्या. त्यासाठी काय काय लागेल, म्हणजे कुंड्या, खतं अन मुख्य म्हणजे बिया वगैरे गोष्टी ठरवुन घ्या अन त्याची व्यवस्था करा. काय़ लावायचं ते ठरल्यावर त्या त्या प्रकाराची उन्हाची गरज, व्यवस्थित अन पूर्ण वाढ होण्यासाठी लागणारी जागा, पुढं जाऊन सपोर्ट हवा असल्यास तो कसा देता येईल हे पहा अन त्यानुसार जागा निवडा. वर उल्लेख केलेल्या भाज्यांपैकी काही भाज्या अन काही फुलझाडं यांची रोपं करुन घेणं गरजेचं असतं. ती थेट त्यांच्यासाठी नियोजित केलेल्या जागी लावता येत नाहीत. म्हणून जर आधी रोपं तयार करण्यास ठेवली नसतील तर ती लगेचच ठेवा. त्यासाठी सीडलिंग ट्रे हवाच असं काही नाही. एखाद्या मोकळ्या कुंडीत किंवा पेपर कप्समधेही आपल्याला रोपं तयार करता येतील. पाणी वा सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या, मॅक़डीचे कप्स अन ग्लासेस. आईसक्रीमचे कप्स देखील चालतील. हे जर गेल्या दोन आठवड्यांत केलं नसेल तर त्यासाठी आपल्याकडं ऑक्टोबर महिना आहे. फक्त या महिन्यातलं हवेतलं तापमान लक्षात घेता रोपं उगवुन ती किमान सहा ते आठ इंच मोठी होईपर्यंत त्यांच्यावर थेट उन पडणार नाही पण सूर्यप्रकाश मात्र मिळेल याची काळजी घ्या.

हिवाळी बागेत ज्या भाज्या लावल्या जातात त्यांची संख्या इतर ऋतुंमधल्या भाज्यांपेक्षा निश्चितच जास्त असते. पण यासोबतच या भाज्यांचा लावणीपासून ते काढणीपर्यंतचा काळ तुलनेनं खुपच अल्प असतो. अन म्हणूनच सर्वांनी, निदान नवीन बागकर्मींनी या मोसमात भाज्यांचं पीक घेणं चांगलं. कारण त्यामुळं भाज्यांसोबतच बागकामामधला आत्मविश्वास अन उत्साह दोन्हीही वाढेल. हाताला यश मिळालं की ते काम पुढं नेण्यात उत्साह टिकून रहाण्यास मदत होते.

या मोसमात एरवी वर्षभर आपण घेत असलेल्या वांगी, टोमॅटो, भेंडी याव्यतिरिक्त कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, सिमला मिरची, कारली, काकडी, पालक, माठ, अंबाडी, कोथिंबीर, लेट्यूस, गाजर, मुळा, बटाटा, पांढरा व लाल, बीट, कांदा, लसूण, इत्यादी भाज्या तसंच वाटाणा / मटार, चवळी, फरसबी, घेवडा सारख्या शेंगवर्गीय भाज्या देखील या दिवसांत आपण आपल्या बागेत घेऊ शकतो. यासोबतच ऍस्टर, शेवंती, झेंडू, डेलिया, पिटुनिया, होलीहॉक, कार्नेशन, झिनिया, (आवडत अन चालत असेल तर) कॉसमॉस वगैरेंसारखी फुलझाडं अन सर्वांचा ऑल टाईम फेवरिट गुलाबही आपण लावु शकतो. बागेत फुलझाडं लावताना नेहमी भाज्यांच्या आसपास अन भाज्यांच्या दोन तीन कुंड्यांच्या जवळ एखादं फुलझाड किंवा जर वाफे करुन भाज्यांची लागवड केली असल्यास वाफ्यांच्या भोवती दोन चार फुलझाडं लावण्यानं कीडीपासून संरक्षण अन परागीभावनाची नैसर्गिक सोय असा दुहेरी फायदा होतो.

या मोसमात भाज्यांची लागवड करताना खतांची फारशी गरज पडत नाही. कारण फारसं उष्ण नसलेलं वातावरण, हवेतला गारवा अन शुद्ध हवा याचा झाडांच्या पोषक वाढीसाठी फार फायदा होतो. त्यामुळं भाज्यांसाठी वाफे तयार करताना वा कुंड्या भरताना भरपूर कंपोस्ट, हिरवळीचं खत अन एरवी जे काही पॉटिंग सॉईलसाठी वापरत असाल ते थोड्या प्रमाणात वापरलंत तरी चालेल. अर्थात नीमपेंड अन बोनमिल वा स्टेरामील याचा योग्य तो वापर करण्यास विसरु नका. या दोन गोष्टी रोपांची फुलण्या-फळण्यासाठी लागणारी टॉनिक्स आहेत. त्यातही फळभाज्यांची खतांची गरज ही पालेभाज्या अन फुलझाडं यांच्यापेक्षा जास्त असते. त्यामुळं तयार करण्यात येणारा वाफा किंवा कुंड्या हे झाडांच्या कोणत्या प्रकारांसाठी वापरणार आहात हे पाहून त्यानुसार खतांची विभागणी करा.

बिया पेरल्यानंतर वा रोपं ट्रान्स्प्लांट केल्यानंतर मल्चिंग करणं अतिशय गरजेचं आहे. उन्हाळ्यात आपण मल्चिंग करतो ते झाडांना दिलेल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून. पण या दिवसांत मल्चिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे झांडांच्या मुळांशी सम तापमान राखलं जातं. थंडी वा हवेतील गारवा कमी जास्त होतच रहातो, पण मल्चिंगमुळं मुळांजवळचं तापमान योग्य त्या प्रमाणात राखलं जातं. याच बरोबर पाण्याचं प्रमाणही राखलं जात असल्यामुळं जास्त पाणी देण्याचीही गरज भासत नाही. एवढंच नाही तर या दिवसांत ड्रिप सिस्टिम वगैरेंचीही फारशी गरज पडत नाही.

रोपं लहान असताना किंवा बिया पेरल्या असताना जर अचानक पाऊस आला तर रोपांचं पावसापासून संरक्षण करण्याला पहिलं प्राधान्य द्या. बागेत नियमित लक्ष द्या. खास करुन सकाळच्या वेळी. कोवळ्या उन्हात बागेत जर फुलपाखरं किंवा मधमाशा दिसत असतील तर परागीभवन नैसर्गिकरित्या होईल याची खात्री बाळगा. पण जर फुलपाखरं नसतील किंवा कमी प्रमाणात असतील तर परागीभवन तुम्हालाच करावं लागणार हे ध्यानात ठेवा. त्यासाठी छोटा पेंट ब्रश अथवा इअर बड्स वगैरे हाताशी लागतील अशा ठिकाणी ठेवा. लक्षात ठेवा परागीभवनाअभावी कारली, दुधी, काकडी वगैरेंसारखी फळं बाल्यावस्थेतच काळी वा पिवळी पडून गळुन जातात. परागीभवन नैसर्गिकपणं होत नसेल तर ते तुम्हालाच करायचं आहे. एकदा परागीभवन झालं. की फळाची वाढ सुरु होते अन पुढच्या टोकाचं फूल सुकुन गळुन पडतं.

रोपांवर कीड अन रोग पडणं हे अगदीच कॉमन आहे. कितीही काळजी घेतलीत तरी ते होतच असतं. निसर्गाचं चक्रच आहे ते. यासाठी वरचेवर झाडांची, पानांच्या मागच्या बाजूची पहाणी करत रहा. त्यासोबतच बुंध्याजवळची मातीही हलकेच, मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घेत मोकळी करत रहा. दर पंधरा-वीस दिवसांनी कुंडी वा वाफा यांच्या आकारानुसार नीमपेंड मातीत मिसळून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी कडुलिंबाचा हिरवा पाला आपल्या गरजेच्या प्रमाणात आणून तो हातानंच चुरडून एखाद्या बादलीत वा टबात पाणी घेऊन त्यात दोन-तीन दिवस भिजत ठेवावा. नंतर ते पाणी गाळून घेऊन बाटलीबंद करुन सावलीत ठेवावं अन दर दहा-पंधरा दिवसांनी स्प्रे बॉटलमधे थोडं घेऊन त्यात दहापट साधं पाणी मिसळून ते सर्व झाडांवर फवारावं. यामुळं बहुतांश कीड नष्ट होईल. असा तयार केलेला अर्क सावलीत ठेवल्यास सहा महिने तरी चांगला राहील. समजा वास आलाच तरी काळजीचं काही कारण नाही. पुन्हा सहा महिन्यांनी असाच अर्क तयार करुन ठेवल्यास पुढच्या सहा महिन्यांचीही सोय होईल. लक्षात घ्या की आपण जर भाज्यांवर कीटकनाशक फवारणार आहोत तर ते सेंद्रीय अन आपल्या पोटात त्याचा थोडा अंश चुकुन गेलाच तर आपल्याला अपाय होणार नाही असंच असायला हवं. त्यामुळं बाजारात तयार मिळणारं कुठलंही कीटकनाशक शक्यतो वापरु नका. कारण आपल्या बागेत तयार होणाऱ्या भाज्या आपण खाणार आहोत. त्या शोभेसाठी लावलेल्या नाहीत. आणि किटकनाशक फवारताना ज्या भाज्या काढणीसाठी तयार होत आल्या आहेत त्यांच्यावर फवारणी करु नका. फळं काढायच्या अन पालेभाज्या तोडायच्या तीन चार दिवस आधी फवारणी करणं टाळा. म्हणजे काळजीचं काही कारण उरणार नाही.

हिवाळ्यात अन्नाचं पचन उतम प्रकारे होत असतं. खाण्याचे भरपूर अन विविध प्रकार करावेसे वाटतात. अशा दिवसांत आपल्या बागतेल्या आपणच पिकवलेल्या भाज्या खाण्यामधलं अन सूप वगैरे पिण्यामधलं सुख हे अतुलनीय आहे. आशा आहे की या टीप्स आपल्याला उपयोगी पडतील अन स्वनिर्मितीच्या आनंदासह तुमच्या बागेतल्या सेंद्रीय पद्धतीनं तुम्हीच पिकवलेल्या भाज्या खाण्याचाही आनंद तुम्हाला मिळेल.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

पावसाळ्यानंतरची बागेतील कामे

पावसाळ्यानंतरची बागेतील कामे


पावसाळा आता बऱ्यापैकी संपत आला आहे. शेवटचा तडाखा देऊनच जरी तो जाणार असला तरी ते दिवसही फार दूर नाहीत. चार ऑक्टोबरपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु होईल त्यामुळं साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस गेलेला असेल. त्यानंतर आपल्याला बागेत प्रचंड कामं असतील. पावसानं, त्यातुनही शेवटी काहीसा धसमुसळेपणानं पडलेल्या पावसामुळं बागेत खूपच पडझड झाली असेल. आपापल्या रहाण्याच्या ठिकाणानुसार या पडझडीचं प्रमाण कमीअधिक असु शकेल. पण तरीही त्यामुळं कामं कमी होणार नाहीत.

त्यातुन आपल्याला हिवाळ्यासाठीही बागेची तयारी करायची आहे. पण ते सारं नंतर आधी आपल्याला आपली बाग सावरायची आहे. तर वादळानंतर किंवा खूप दिवसांनी परत येऊन आपलं बंद घर उघडून जसं आपण पदर खोचुन किंवा बाह्या सरसावुन कामाला लागतो तसंच बागेतही पुष्कळ कामं करायची आहेत. ती कुठली ते आपण क्रमाक्रमानं पाहू.

बागेची साफसफाई : सर्वात आधी बाग छोटी असो की मोठी, ती साफ करायला घेणं महत्वाचं. पावसाळ्यात झाडं अस्ताव्यस्त वाढून एकमेकांत गुंतली असतील तर ती सोडवुन घेऊन प्रत्येकाला आपापल्या पायावर उभं करावं लागेल. कुंड्यांमधे किंवा झाडांच्या आळ्यांत आपण पावसाळ्यापूर्वी मल्चिंग केलं असेल. त्यातलं सारंच डिकंपोज झालं नसेल. काटक्यांचे काही अवशेष अन पालापाचोळ्यामधल्या जाडसर पानांचेही अवशेष तसेच असणं शक्य आहे. त्यामधले मोठे तुकडे काढून एका ठिकाणी गोळा करुन घ्या. सगळा कचरा एकत्र केल्यावर त्याला दोन दिवस मोकळी हवा खाऊ द्या. नंतर जमेल तसं हे सगळं बारीक करा. काड्याकाटक्या आतुन पोकळ झाल्याच असतील. त्या लगेचच साध्या हातानंही मोडतील. पानं मात्र हातानं कुस्करुन मोडणार नाहीत. थोडीच असतील तर कात्रीनं कापून घ्या अन जास्त असतील तर राहुद्या तशीच. नंतर ढीगाच्या आकारानुसार एखादं पोतं किंवा ड्रम अन बाग जमिनीवरची असेल तर एका बाजुला ढीग करुन त्यावर जे काही कल्चर किंवा पूर्ण तयार झालेलं कंपोस्ट असेल तर ते घालुन घ्या. एखादी बुरशी पावडर असेल तर तीही आकाराच्या प्रमाणानुसार चमचा दोन चमचे घातलीत तर उत्तम. याचं तीन ते चार आठवड्यात उत्तम कंपोस्ट तयार होईल.

मल्चिंगच्या अवशेषांसोबतच काही तण उगवले असतील. पक्षांच्या कृपेनं काही नको ती रोपं, वेली अन गवत उगवलं असेल. ते कुंडीतल्या आपण लावलेल्या झाडाच्या मुळावर उठण्याची शक्यता असते. या अशा नको त्या रोपांमधे वा तणांमधे बहुतेक वेळा, उंबर, पिंपळ यासोबतीनंच नाजुक फुलांच्या वेली अन मायाळू सारख्या वेलीही दिसतील. यापैकी जी हवीत ती रोपं काढून घेऊन त्यांची वेगळी व्यवस्था करा. बाकीचं तण कंपोस्टच्या ढीगात जाऊद्या, अर्थातच तुकडे करुन. नाहीतर ते तिथं पुन्हा नव्यानं जोम धरुन उभं रहायचं. यानंतर झाडांभोवतीची माती मोकळी करुन घ्या. कुंड्यांना पाणी वाहुन जाण्यासाठी केलेली छिद्रं बुजली असतील तर तीही मोकळी करुन घ्या.

झाडांची छाटणी : पावसाळ्यात झाडांची अफाट वाढ झाली असेल. पावसादरम्यान जर बागेत लक्ष दिलं नसेल तर रोपं जागा मिळेल तशी वाढली असतील. कुंड्या जवळ जवळ असतील तर ती एकमेकांत गुंतलीही असतील. भाज्यांची रोपं असतील तर आता पावसाचा जोर कमी होत आल्यानं त्यांवर फुलं किंवा क्वचित फळंही धरली असतील. तेव्हा सारा गुंता हलक्या हातानं सोडवुन घ्या. शक्यतो फळं वा फुलं असलेल्या फांद्या तुटणार नाहीत किंवा दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. खराब वा रोगग्रस्त पानं अन फांद्या छाटुन वेगळ्या ठेवा. या नंतर आपल्याला नष्ट करायच्या आहेत. अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या छाटून घेऊन झाडाला व्यवस्थित आकार द्या.

हेच आपल्याला आंबा, चिकू वगैरे फळझाडांच्याही बाबतीत करायचं आहे. लगेचच येणाऱ्या पुढच्या सीझनला आपल्याला भरपूर फळं हवी असतील तर आताच हे करणं गरजेचं आहे. जमिनीलगतच्या साऱ्या फांद्या छाटून घ्या. ज्या फुलझाडांच्या फांद्यांपासून नवीन रोपनिर्मिती होणं शक्य असेल त्या फांद्यांमधून पेन्सिलीच्या जाडीएवढ्या फांद्या वेगळ्या काढून ठेवा. तुम्हाला हव्या असतील तर रोपं करण्यासाठी ठेवा किंवा कुणाला द्यायच्या असतील तर देऊन टाका. मोठ्या फळझाडांच्या फांद्या छाटतानाखालच्या फांद्या छाटुन घ्या. झाडाच्या सर्व भागावर उन्ह पडेल अशा पद्धतीनं फांद्यांचा आकार अन संख्या कमी करा. छाटलेल्या फांद्या जमेल तेवढे छोटे तुकडे करुन कोपऱ्यात रचुन ठेवा. याचा उपयोग अजुन बारीक तुकडे करुन मल्चिंगसाठी होईल किंवा सरळ फांद्या वेली वा तोमॅटो वगैरेंसारख्या फळभाज्यांना आधार म्हणून उपयोगी पडतील. बाकी वाकड्यातिकड्या फांद्या जाळून त्याची राख उपयोगात आणता येईल. झाडावरच्या फांद्या छाटलेल्या उघड्या भागावर कीटकनाशक किंवा हळद लावा. त्यामुळं बुरशी वा इतर कुठली कीड लागणार नाही.

खतं देणं : पावसामुळं आपण वेळोवेळी दिलेली खतं वाहून गेली असतील. खास करुन कुंड्यांमधे हे शक्य आहे. त्यामुळं आता नेहमीप्रमाणं खतं देण्यास सुरुवात करण्यास हरकत नाही. कुंडीमधे खत देण्याची पद्धत अन प्रमाण हे याआधी अनेकदा सांगितलं आहेच. कुंडीतील मातीचा वरचा एक इंचाचा थर भरेल एवढं खत माती मोकळी करुन देऊन त्यावरुन माती सारखी करुन घ्यायची आहे. जमिनीवरच्या झाडांनाही त्यांच्या आकारानुसार अन वयानुसार खतं द्यायची आहेत. मोठ्या फळझाडांना साधारण दोन ते तीन घमेली शेणखत आळ्यातली माती उकरुन त्यात मिसळून द्यायचं आहे. कुंड्यांमधे खत देताना शेणखताऐवजी कंपोस्ट दिल्यास छोट्या झाडांना ते पचायला सोपं जाईल. या सोबतच बागेच्या सर्व प्रकारात खताच्या प्रमाणात नीमपेंड, बोनमील अन सोबतीला चमचाभर ट्रायकोडर्मा द्यावी. झाडांच्या मुळांतली माती अजुन काहीशी ओलसर असेल त्यामुळं बुरशीजन्य रोग लागु नयेत म्हणून ही काळजी घ्यायची आहे. यानंतर खतं नियमितपणं द्यायची आहेत.

पाणी देणं : खतं दिल्यानंतर पाऊस अजिबात नसेल तर थोडं पाणी देऊन खतं ओली होतील याची काळजी घ्या. नंतर पुढच्या पाच सहा दिवसांत पाऊस पडला नाही तर पाणी द्या. तुमच्या भागात ऑक्टोबर हीट किती आहे हे पाहून पाण्याच्या पाळ्या ठरवुन घ्या. कुठं रोज पाणी द्यावं लागेल तर कुठं चार पाच दिवसांतुन पाणी द्यावं लागेल. जमिनीवरच्या बागेत जर पाऊस उत्तम पडला असेल तर एवढ्या पाणी देण्याची गरज नाही. पाऊस अल्प प्रमाणात झाला असेल तर पानं कोमेजल्यासारखी वाटली तरच पाणी द्यावं. जमिनीवरच्या बागेतली झाडं पाण्याच्या शोधासाठी मुळं मातीत खोलवर पाठवत असताट. त्यामुळं तिथं चिंतेचं कारण नाही. यासाठी फक्त बागेचं नियमित निरीक्षण करणं गरजेचं आहे. सकाळी वा संध्याकाळी पानं मलूल पडली असतील तरच पाणी देणं गरजेचं आहे. दुपारच्या तीव्र उन्हात पानांचं मलूल पडणं हे नैसर्गिकच आहे.

पाऊस कमी होत असतानाच ही कामं करुन घ्या कारण नंतर लगेचच आपल्याला हिवाळीबागेचं अन त्या सीझनमधे लावायच्या भाज्या अन फुलझाडं यांचं नियोजन करायचं आहे. तेव्हा घ्या हातात खराटा अन सरकवा चपला पायात आणि जा बागेत.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya 

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...