कंपोस्टमधील बिया
पडलाय कधी असा प्रश्न तुम्हाला? पडला असेल तर त्याचं उत्तर इथं खाली देतो. अन नसेल पडला तरीही या उत्तराचा उपयोग तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी होईल हे नक्की, अगदी प्रश्न न पडताही.
सर्वात प्रथम एक लक्षात घ्या की कंपोस्टमधे जे जे काही मृत आहे फक्त आणि फक्त तेच डिकंपोज होत असतं. वाळलेला पालापाचोळा अन काड्या-काटक्या या तर मेलेल्याच असतात हे आपल्याला त्यांच्याकडं पाहूनच कळतं. पण हिरवा पाला जो छाटणी केलेल्या फांद्यांवरुन तुम्ही स्वतःच कंपोस्टमधे टाकलेला असतो. तो तर छान हिरवागार असतो. तोही मृतच असतो. झाडापासुन तुम्ही ज्या क्षणी त्याला वेगळं करता तेव्हाच त्याचं "प्रानपखेरू" उडून गेलेलं असतं. हाती असतं ते त्याचं कलेवर. अन म्हणूनच तो मृत पाला डिकंपोज होतो. फक्त तो हिरवा असल्यानं त्यातलं नत्र कंपोस्टमधला ओलसरपणा टिकवुन ठेवतं अन सुक्या पाचोळ्याला कुजायला मदत करतं. याआधी सांगितलेलं लक्षात असेलच की सुका पालापाचोळा कुजण्यासाठी त्याला नत्र लागतं. मग ते हवेतुन मिळो वा जमिनीतून किंवा अशा ओल्या हिरव्या पाल्यातुन. पण नत्र योग्य प्रमाणात मिळाल्याशिवाय सुका पाचोळा वा इतर काहीही कुजू शकत नाही.
तर पुन्हा आपल्या प्रश्नाकडं वळू. अशा कंपोस्टात पडलेली वा टाकलेली बी कशी रुजु शकते? ती तर कधीचीच काढलेली असते किंवा सडलेल्या टोमॅटोतुन ती कंपोस्ट बिनमधे गेलेली असते. म्हणजे ती मृतच असायला हवी. तर ते तसं नसतं. बिया जेव्हा फळात तयार होतात, मग ते फळ असो की फळभाजी वा शेंग, त्या तयार होत असताना त्यामधे फळातले गुण, चव वगैरे सारं जमा होत असतं. फळ पिकू लागतं अन ते कुणीतरी येऊन काढण्याची वेळ जसजशी जवळ येउ लागते तेव्हा झाड आपली पुढची पिढी तयार होण्यासाठी त्या बियांच्या पाठवणीची तयारी करु लागतं. फळ कुणीतरी खाल्ल्यावर वा जमिनीवर पडून फुटल्यावर त्या बिया वेगळ्या होतात. कधी त्या खाल्ल्याही जात असतात तर कधी काढून बाजूला टाकल्या जातात. अशा बियांमधे एक कप्पा असतो ज्याला कोटिलेंडन (cotyledon) असं म्हणतात. यामधे एका ठराविक कालावधीपर्यंत बीला जिवंत ठेवण्यासाठी झाड उर्जा म्हणजेच एनर्जी देऊन ठेवतं. बी फळापासून वेगळी झाल्यावर या ठराविक कालावधीत तिला योग्य ओलसरपणा, उष्णता, उजेड म्हणजे सुर्यप्रकाश वगैरे मिळाल्यावर ती रुजते.
आता या कालावधीत जर ती बी खाल्ली गेली म्हणजे मुंग्या, चिमण्यांसारखे पक्षी वगैरेंनी किंवा आपणही खाल्ली तर ती रुजण्याचा प्रश्नच येत नाही. तसंच तिला योग्य ते तापमान, ओलसरपणा अन प्रकाश वगैरे काही मिळालं नाही तरीही ती रुजत नाही. म्हणजेच प्रत्येक बीच्या नशिबी रुजणं असतंच असं नाही. थोड्याच बिया अशा नशिबवान असतात ज्या योग्य वेळी रुजतात. अन ज्या बियांना योग्य वेळ अन तापमान वगैरे मिळत नाही त्या त्यांच्या नियत काळानंतर जागच्या जागीच मरुन जातात अन कंपोस्टमधील इतर सेंद्रीय गोष्टींप्रमाणं डिकंपोज होतात. आपल्याला ते कळतही नाही. म्हणजे "जंगलमें मोर नाचा, किसने देखा"सारखा प्रकार.
जशी आपली एक पिढी असते. अगदी खापर खापर पणजोबांपासून ते खापर खापर नातवंडापर्यंत, मग ते जगाच्या पाठीवर कुठंही असो. ते सारे एका अदृश्य धाग्यानं बांधलेले असतात तसंच झाडांचंही असतं. फक्त त्याचं रेकॉर्ड नसल्यानं कुठलं ब्रीड कुणाकडं वाढतंय याचा पत्ता कुणाला नसतो. पण प्रत्येक झाड हे आपल्या पुढच्या पिढीची तयारी त्याचा शेवट जवळ येऊ लागल्यावर किंवा त्याच्या आयुष्यात स्थैर्य म्हणजेच स्टॅग्नन्सी आल्यावर करु लागतं. तसंही फळांचा सीझन गेल्यावर ते झाड नवं रूप अन पर्यायानं नवा जन्मच घेत असतं. झाड फळणारं असेल तर त्याच्या फळांमधे बिया तयार होऊन त्या मानव वा पशु पक्षी यांच्यामार्फत जमिनीवर पसरुन रुजतात तर कधी फळ पिकून फुटुन त्यातील बिया वाऱ्याच्या मदतीनं इतस्ततः पसरुन तिथं त्या योग्य वेळी रुजतात. उदा, काटेसावर, कॉसमॉस वगैरे.
जी झाडं फळत नाहीत अन जी फांद्यां रुजवूनच तयार होत असतात अशा झाडांच्या फांद्यांवर नवीन अंकूर फुटतात. काही झाडांच्या अशा नवीन फांद्या मातीला टेकल्यावर त्यांना मुळं फुटतात अन नवीन रोप तयार होतं. मग हळूहळू त्य़ाचीही स्वतःची एक जीवनसाखळी तयार होते. एकमेकांत गुंतलेली दिसली तरी अशी झाडं वेगवेगळी असतात. उदा. अडुळसा, कण्हेर, गुलबक्षी, वगैरे. ती वेगळी केल्यावर दुसरीकडंही वाढू लागतात. तर काही झाडांच्या जमिनीच्या लेव्हलच्याही वर असलेल्या फांद्यांना मुळं फुटुन ती जमिनीच्या दिशेनं खाली येऊन मातीत रुजतात. उदा. गुळवेल वगैरे.
हे सगळं म्हणजे बियांमधे उर्जा देणं किंवा फांद्यांना मुळं फुटून ती जमिनीच्या दिशेनं नेऊन ती मातीत रुजवण्याचं काम निसर्गच करत असतो. मग त्याला तुम्ही निसर्ग म्हणा की देव म्हणा. हा सगळा श्रद्धा अन भावना या दोघा बहिणींचा प्रश्न आहे. पण हे कार्य विनाखंड निसर्गात होतच असतं. एका ठराविक कालावधीनंतर. कधी झाड स्वतःचं स्वतः करतं तर कधी मानव वा इतर कुठला पशूपक्षी किंवा वारा, पाऊस यांच्या मदतीनं करतं. पण हे काम अव्याहत सुरु असतं.
त्यामुळंच तुमच्या कंपोस्टमधे पडलेली बी नशीबवान असेल तर ती तिथंच रुजते, तिथल्या जीवजंतूंना अन उष्णतेत होणाऱ्या कमीअधिक बदलांना तोंड देत पुरुन उरते, फळते फुलते अन मग तुम्हाला संधी मिळते फोटो काढून पोस्ट करायला "माझ्या कंपोस्टमधे आपोआप आलेल्या झाडाला लागलेले टोमॅटो."
आता यानंतर अजुन एक प्रश्न किंवा उपप्रश्न मनात उभा रहातो. अन तो म्हणजे बाजारातुन आणलेल्या टोमॅटो, मिरची वा झेंडू वगैरेंच्या बिया रुजत टाकल्या. बऱ्याचशा रुजल्याही नाहीत. ज्या रुजल्या त्या फळल्या-फुलल्या नाहीत अन ज्यांना फळं वा फुलं आली ती आणलेल्या फळा-फुलासारखी मोठी व गेंदेदार नव्हती, असं का?
तर बाजारातली बव्हंशी फळं-फुलं वा फळभाज्या या हायब्रिड बियाणं वापरुन पिकवलेल्या असतात. हायब्रीड म्हणजे दोन एकाच प्रकारच्या पण वेगवेगळ्या प्रजातींचा केलेला संकर. म्हणजे उदाहरणार्थ, एका जातीच्या टोमॅटो वा वांग्याच्या फुलांतला पुंकेसर दुसऱ्या जातीच्या टोमॅटो वा वांग्याच्या फुलांतील स्त्रीकेसरावर ठेवून केलेला संकर. अशा पद्धतीतुन येणारं फळ हे तिसऱ्याच पद्धतीचं असतं. या अशा फळातील बिया म्हणजेच हायब्रीड बिया. अशा क्रॉस पोलिनेशनपासून घेतलेल्या फळांमधील बियांमधे, उदा. टोमॅटोतील बियांमधे दोन्ही प्रजातींचे गुण असु शकतात किंवा एकाच कुणातरी प्रजातीचे गुण असु शकतात. अन म्हणूनच आपण जेव्हा बाजारातुन आणलेल्या टोमॅटो वा झेंडूपासुन रोपं करतो तेव्हा तसेच टोमॅटो वा झेंडूची फुलं सहसा मिळत नाहीत.
ब्रॅण्डेड कंपन्या जेव्हा हायब्रीड बिया त्यांच्या फार्मवर तयार करतात तेव्हा तेही काही सोपं काम नसतं अशा बियांची पहिली बॅच निघते जिला फर्स्ट जनरेशन किंवा F1 types म्हणतात, ती ते वर्षानुवर्षं आपल्याच फार्मवर टेस्ट करतात. अन मनासारखे रिझल्ट्स मिळाल्यावरच मग बाजारात आणतात. पण तरीही आपण अशा विकत घेतलेल्या बियांपासुन येणाऱ्या फळांमधुन निघालेल्या बिया तशीच फळं देतील याची खात्री नसते. अन म्हणूनच शेतकरी असो वा आपल्यासारखा कुंडीकरी. दर सीझनला नवीन बियाच विकत घेतो.
याच्याविरुद्ध एक प्रकार आहे अन तो म्हणजे ओपन पॉलिनेशनचा. यात एकाच झाडावर सरळ सरळ पोलिनेशन केलेलं असतं अन यातुन वर्षानुवर्षं, पिढ्यान पिढ्या एकाच प्रकारची फळं वा फुलं, जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता. म्हणून जे ऑनलाईन बिया मागवतात त्यांनी कटाक्षानं OP म्हणाजेच ओपन पोलिनेटेड बिया मागवाव्यात. म्हणजे दर वेळेस नवीन बिया घ्यायला नको.
आशा आहे की बियांच्या बाबतीतले मनात येणाऱ्या व न आलेल्याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखातुन मिळाली असावीत. बिया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणं किंवा सोयीप्रमाणं कुठल्याही वापरा, हायब्रीड घ्या वा ओपन पोलिनेटेड. फक्त आपण काय वापरत आहोत हे नक्की पाहून घ्या. अन त्याप्रमाणंच त्या बियांकडून जी हवी ती अन तेवढीच अपेक्षा ठेवा.
बियांचा अजुन एक प्रकार म्हणजे देशी वाणाची बियाणं, हेअरलूम बियाणं. हा सर्वात खात्रीशीर प्रकार. यांच्याकडून तुम्ही रंग, चव, आकार याविषयी पूर्ण खात्री ठेवू शकता असा. पण त्य़ाविषयी पुन्हा कधीतरी. अहं, लेखांची संख्या वाढावी म्हणून नाही तर सगळं एकदम खाऊन पचायला सोपं जावं म्हणून. सावकाश खाल तर जास्त खाल. मला काय, मी लिहित राहीन. तुम्हीच कंटाळाल.
©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
माझा हा लेख व आधीचेही लेख माझ्या https://www.facebook.com/Vaanaspatya या ब्लॉगवरही उपलब्ध आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा