वांग्याची फुलगळ

वांग्याची फुलगळ



वांग्यांचे विविध प्रकार आहेत. छोटी वांगी, मोठी, भरीत करण्याची वांगी, लांब वांगी वगैरे. तसंच यात रंगही बरेच आहेत. प्रत्येक प्रकारच्या वांग्यांचा आहारात वापरही वेगवेगळा आहे. तसं हे पीक फार काटक. तीव्र उन्हाचे दिवस तसंच तीव्र थंडीचे दिवस सोडता इतर दिवसांत याची फार काळजी घेण्याची गरज नसते. अर्थात उन्हाच्या दिवसांतही सकाळ संध्याकाळ पाणी दिल्यास रोपं छान तग धरतात. थंडीत रोपांची वाढ संथ असते. त्यामुळं योग्य ते खतपाणी देत राहिल्यास कडक थंडीचे दिवस सरल्यावर वांग्याला पुन्हा बहर येतो.

एकदा वांगी काढून झाल्यावर इतर पिकांप्रमाणं ही रोपं काढून टाकण्याची गरज नसते. खोलवर छाटणी करुन खतपाणी दिल्यावर पुन्हा नवीन फूट येऊन वांगी मिळू शकतात. फक्त नंतरचे बहर पहिल्या बहराएवढे नसल्यामुळं व्यापारी तत्वावर वा मोठ्या प्रमाणात शेती करणारे सहसा नवीन रोपं लावतात. वांग्यांची लागवड ही रोपं तयार करुन ती ट्रान्स्प्लांट करुन केली जाते. वांग्याच्या रोपांवर येणारी फुलं ही द्विलिंगी असतात. म्हणजे या रोपांवर नर फुलं अन मादी फुलं असं वेगळं नसुन एकाच फुलांत दोन्ही केसर, पुंकेसर अन स्त्रीकेसर असतात. त्यामुळं वाऱ्याच्या मदतीनं किंवा फुलपाखरं, मधमाशी वगैरेंच्या मदतीनं परागीभवन होतं. कधी परागीभवन न झाल्यास हातानंही करता येतं.

कधी कधी रोपांवर भरपूर प्रमाणात असलेली फुलं गळून पडू लागतात. खतपाणी वगैरे आपण सगळं काही वेळेवर करुनही फुलं पूर्ण फुलुन गळून पडतात. तसं फुलं गळून पडणं हे कॉमनच असतं. कारण रोपाचा जीव लक्षात घेता सर्व फुलांचं रुपांतर फळांमधे झालं तर रोपाला ते सहनही होणार नाही. पण हीच फुलगळ जर जास्त प्रमाणात होत असेल तर मात्र आपण काळजी घ्यायला हवी. या लेखात आपण फुलगळ होण्याची कारणं अन त्यावरचे उपाय हे पहाणार आहोत.

पाण्याची कमतरता : वांग्याच्या रोपांची तहान अन भूकही जास्त असते. त्यामुळं त्यांना वेळच्यावेळी खतं अन पाणी देणं आवश्यक असतं. जमिनीत वा मोठ्या कुंडीत जर वांग्याची रोपं असतील तर त्यांची मुळं फूट - दीड फूट खोलवर गेलेली असतात. कुंडी लहान असेल तर मुळं कुंडीच्या तळापर्यंतही जातात. मुळाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेल किंवा तिथवरची माती ओली होईल एवढं पाणी या पिकाला देणं आवश्यक असतं. याबरोबरीनंच खोडाशेजारी मातीवरच्या भागात किमान ३ ते ४ इंचांचं मल्चिंग केल्यास मातीमधे ओलावा टिकून रहाण्यास मदत होते. तेव्हा वांग्यांच्या रोपांजवळील माती ही नेहमीच ओलसर (मॉईस्ट) राहील याची खबरदारी घेणं गरजेचं असतं. अती किंवा सतत पाणी देण्यापेक्षा मल्चिंगचा फायदा निश्चितच जास्त होतो. त्यामुळं पाल्यापाचोळ्याचा वा अन्य कसलाही जाडसर थर मल्चिंग म्हणून द्यावा. अर्थात त्यामुळं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळं नियमितपणं नीमपेंड मल्चिंगमधे टाकणंही तितकंच आवश्यक असतं.

परागीभवन न होणं : वर सांगितल्याप्रमाणं वांग्याचं पीक हे सेल्फपोलिनेटिंग प्रकारात मोडतं. म्हणजेच पोलिनेशन, अर्थात परागीभवनासाठी हे मधमाशी वा अन्य कुठल्याही कीटक वा पक्षांवर अवलंबुन रहात नाही. सामान्यतः वाऱ्याच्या मदतीनं परागीभवन होत असतं. परंतु वहाता वारा नसेल किंवा हवेत उष्मा जास्त असेल तेव्हा हे परागीभवन होत नाही. कधीकधी हवेतील आर्द्रतेमुळं फुलांतील परागकण ओलसर वा चिकट होत असल्यानंही ते फुलांतील स्त्रीकेसरांपर्यंत पोहोचु शकत नाहीत. अनुभवांवर आधारित जर हवामानाचा अभ्यास किंवा एक दोन फुलं गळल्यावर जर आपापल्या बागेतील परागीभवन न होण्याकरिता जबाबदार असलेली कारणं शोधल्यास आपण योग्य तो उपाय करु शकतो. त्यामुळं परागीभवनाकरिता वाऱ्यावर अवलंबून न रहाता आपणच हातानं परागीभवन करावं.

कृत्रिम परागीभवन करण्याचे पर्याय : यासाठी आपण आधी वांग्याच्या फुलाची रचना पाहूया. फुलाला सर्वात बाहेरच्या भागात किमान ५ पाकळ्या असतात. वांग्याच्या जातीनुसार या पाकळ्यांचा रंग असतो. पर्पल, पांढरा किंवा गुलाबी रंग साधारणतः आपल्याकडे दिसतात. फुलांचा आकारही लहान मोठा असतो. म्हणजे छोट्या वांग्यांची फुलं लहान असतात तर भरीत वगैरे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वांग्यांची फुलं आकारानं मोठी असतात. वांग्याच्या रोपांवर फुलं उमलली की ती साधारणतः तीन दिवस दिवसाच्या वेळी पूर्ण उमललेल्या अवस्थेत असतात व रात्री पाकळ्या मिटुन घेतलेल्या असतात. या तीन दिवसांत परागीभवन झालं नाही तर पुढचे काही दिवस ती अर्धवट उमलल्या अवस्थेत रहातात. याही दिवसांत काही कारणानं परागीभवन झालं नाही तर अशी फुलं सुकुन जाऊन गळून जातात.

पाकळ्यांनंतर असतात ते पिवळ्या रंगाचे पुंकेसर. संख्येनं जातीनुसार ५ ते १० असतात. त्याच्या आतल्या भागात पुंकेसरांना चिकटुन किमान ६ परागकोष असतात. त्याच्या आतल्या बाजुला असतात स्त्रीकेसर. अन या स्त्रीकेसरांच्या गराड्यात असतो स्टिग्मा, जो असतो एक नाजुकसा दांडा. फुलाच्या अगदी मध्यभागी. या दांड्याच्या मुळाशी असतात ओव्हरीज.

नैसर्गिकरित्या जेव्हा परागीभवन होत असतं तेव्हा परागकोषांतील परागकण या स्टिग्मावर चिकटतात अन ओव्हरीजमधे असलेल्या बीजांडांशी एकरूप झाल्यावर फळ तयार होतं. पण ही क्रिया जर नैसर्गिकरीत्या झाली नाही तर आपल्याला ती कृत्रिमरीत्या करावी लागते. यासाठी फुलावर हलक्या हातानं मारलेली टिचकीही कधी पुरेशी ठरते. पण तरीही जर परागीभवन होत नसेल तर छोटासा रंगाचा ब्रश घेऊन तो परागकोषांवर हलकेच फिरवुन मधल्या स्टिग्मावर अथवा त्या संपूर्ण दांड्यावर फिरवावा.

बरेंचदा फुलं एवढी छोटी असतात की ब्रश वा बोट नक्की लावायचं कुठं अन फिरवायचं कुठं असा प्रश्न पडतो. अशा वेळी फुलाचा पाकळ्यांनंतरचा भाग अंगठा व शेजारील दोन बोटांचा चंबू करुन त्यात घेऊन हलक्या हातानं दाबावा. त्यानंही परागीभवन होऊ शकतं. हे करण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी, जेव्हा तापमान कमी असतं अन हवेत ओलावा असतो.

नैसर्गिकरीत्या परागीभवन होण्यासाठी वांग्यांच्या रोपांचे वाफे वा कुंडीत लावली असल्यास कुंड्या अशा जागी ठेवाव्यात की जिथं वारा भरपूर प्रमाणात मिळू शकेल. वाफा वा कुंड्या उंच ठिकाणी ठेवल्यास असा प्रश्न येत नाही. तसंच वांग्यांभोवती जवळच मोठी व दाट पानं असलेली रोपं वा झाडं लावू नयेत. जमल्यास दोन ओळींमधे फुलझाडं लावल्यास अशी वेळच येणार नाही.

अयोग्य तापमान : वांग्याच्या पीकाला जास्त तापमान मानवतं. पण तापमान जर खाली आलं किंवा थंडीच्या दिवसांत वांग्याच्या रोपांची वाढ संथ गतीनं होत असते. सहाजिकच या दिवसांत फुलगळ जास्त प्रमाणात होत असते.

खतांची कमतरता : वांग्याच्या रोपांच्या सुदृढ अन निकोप वाढीसाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्यं अन खतं जर कमी प्रमाणात दिली गेली की एक तर फुलं धरत नाही किंवा धरलीच तर ती जास्त प्रमाणात गळतात. यासाठी नायट्रोजन व फॉस्फरस आवश्यक त्या प्रमाणात पुरवणं गरजेचं ठरतं. रोपाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी प्रोटीन्स नायट्रोजन पुरवतो तर फॉस्फरसमुळं फुलं अन फळं जोमदार होण्यास मदत होते.

अतीउष्णता : तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांतही वांग्यांची फुलगळ होते. जर उन्हाचा तडाखा असह्य झाला तर रोपांची वाढही मंदावते अन दिवसा पानं कोमेजल्यासारखी दिसतात. या काळात रोपाच्या दृष्टीनं आपला जीव वाचवणं हे पहिलं प्राधान्य असल्यामुळं त्यावर एक तर फुलं धरत नाही वा धरली असल्यास लवकर वाळतात अन गळून जातात. यासाठी अशा दिवसांत कुंड्या थेट उन्हाचा तडाखा बसणार नाही अशा ठिकाणी ठेवाव्यात किंवा हलवणं शक्य नसल्यास रोपांवर मध्यान्ही सावली येईल अशा बेतानं मांडव घालावा.

वांग्यांप्रमाणेच मिरची, टोमॅटो वगैरे पिकांमधेही होणाऱ्या फुलगळीसाठी हीच कारणं प्रामुख्यानं जबाबदार आहेत. त्यामुळं योग्य त्या प्रमाणात खतं, अन्नद्रव्यं, पाणी अन पिकाच्या गरजेप्रमाणं उन्ह व तापमान हे सगळं व्यवस्थित राखल्यास फुलगळ न होता आपल्याला भरपूर प्रमाणात पीक घेता येईल. तेव्हा आपापल्या भागातील हवामान, तापमान याचा अभ्यास करुन अन कंपोस्ट, शेणखत अन गांडूळखत हे आलटून पालटून दर दहा ते पंधरा दिवसांच्या अंतरानं देत गेल्यास अन पावसाचे दिवस वगळता एरवी रोपांभोवतीची माती ओलसर राखण्याइतपत पाणी देत राहिल्यास फळं भरपूरही येतील अन ती सकस व सुदृढही असतील.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...