बिया - देशी, हायब्रिड आणि जीएमओ
आपण मोठ्या हौसेनं बाग करायला घेतो. कुठून कुठून रोपं, फांद्या आणुन लावतो. कुणी फुलझाडांच्या बिया देतं. त्याही आपण बागेत लावतो अन बाग जराशी वाढली, वाऱ्यावर डोलू लागली की आपला उत्साह अन आत्मविश्वास दोन्ही वाढतं. बऱ्यापैकी अनुभवही गाठीशी जमा झालेला असतो. मग इकडचं तिकडचं वाचून, फोटो पाहून आपल्यालाही वाटू लागतं की आपणही बागेत भाज्या लावूया. किमान एक पट्टा तरी फक्त भाज्यांसाठी ठेवूया. मग त्यादृष्टीनं आपण तयारी करायला लागतो. जागा वा कुंड्या ठरवतो. माती तयार करुन ठेवतो वगैरे वगैरे सगळं करतो.
मग मुख्य प्रश्न येतो अन तो म्हणजे बिया. यासाठी आपण नर्सरी तरी शोधतो किंवा ऑनलाईन कुठं मिळतात ते पहायला सुरुवात करतो. नर्सरीत गेल्यावर आपण ज्या बिया मागू त्या ते छोट्या पाकीटातुन लगोलग आपल्या समोर ठेवतात. पण ऑनलाईन शोधाल तर त्यात आपल्याला विविध प्रकार दिसतात. कुठं हायब्रिड असं लिहिलेलं असतं तर कुठं ओपी म्हणजेच ओपन पोलिनेटेड असं कंसात लिहिलेलं असतं. तर अजुन एक प्रकार असतो अन तो म्हणजे हेअरलूम. किंमती पाहिल्यात तर हायब्रिडपेक्षा ओपीची किंमत थोड्याफार फरकानं सारखीच असते. पण यांच्या किंमतीत अन हेअरलूम बियांच्या किंमतीत मात्र फारच मोठा फरक असतो. अर्थात त्यामागची गणितं अन मार्केटींग गिमिक्स याबाबतीत आपण पूर्णतया अनभिज्ञ असतो.
मग आपल्याला प्रश्न पडतो की हे असं का? काय फरक आहे तिन्ही प्रकारांत की किंमतीत एवढी तफावत असावी? तरी आपल्याला हे ठाऊक नसतं की हे ओपी अन हेअरलूम सर्वसाधारणपणं एकच आहे. पण अजुन एक प्रकार बियांमधे आहे अन तो म्हणजे जीएमओ. म्हणजेच जेनेटिकली मोडिफाईड ऑर्गॅनिझम्स. या बिया साधारणपणं व्यापारी तत्वावर अन मोठ्या प्रमाणावर शेती करणाऱ्यांसाठी उपलब्ध असतात. रिटेलमधे अजुन तरी अशा बिया उपलब्ध नाहीत.
काय आहे ही भानगड, काय फरक आहे या हायब्रिड, हेअरलूम अन जीएमओ बियांमधे? हेच आपण जाणून घेऊया. अन मग ठरवूया की आपल्या बागेसाठी अन पर्यायानं आपल्या रोजच्या आहारासाठी आपण कुठल्या प्रकारच्या म्हणजे आपल्या बोली भाषेत कुठल्या वाणाच्या बिया निवडाव्या.
देशी वाणाच्या बिया : हेअरलूम बिया म्हणजे ज्या पूर्वापार, अगदी एखाद्या वारसासारख्या चालत आल्या आहेत त्या. त्यांना आपण देशी वाणाच्या बियाही म्हणतो. तर अशा बिया या मुख्यत्वे तयार झालेल्या असतात त्या नैसर्गिक रित्या पिकं घेऊन अन फुलांचं निसर्गतःच परागीभवन होऊन. म्हणजेच ओपन पोलिनेशन होऊन. अर्थातच सर्वात पहिलं झाड जेव्हा लावलं गेलं असेल त्यात असलेले सारेच गुण आता जी कुठली अन कितवी पिढी सुरु असेल तिच्यामधेही तेच गुण असणार. जसे आपले डीएनए आहेत तसेच ते अशा झाडांचेही असतात. त्यामुळं चव, रंग, आकार या बाह्य गोष्टींमधेच नव्हे तर त्यांतील गुणधर्म, रोपांची रोगांना तोंड देण्याची क्षमता वगैरेंही सगळं सारखंच असणार. थोड्याफार फरकानं सगळंच सारखं. त्यामुळं कोणत्या वेळी झाड कसं वागेल, कुठल्या सीझनला किती फळं येतील हे आपण खात्रीशीर सांगू शकतो. म्हणजे पूर्वापार जे भाज्यांचे हंगाम, ठराविक भाज्यांसाठी वा पिकांसाठी ठराविक भूभाग, ठराविक माती अन ठराविक हवामान हे जे सगळं निश्चित केलं होतं ते जर व्यवस्थित पाळलं तर एक झाड जेवढी फळं, उदा. टोमॅटो दहा वर्षांपूर्वी देत होतं त्याच झाडाच्या बियांची आताची पिढीही कमी अधिक प्रमाणात तेवढेच टोमॅटो देईल, तेही त्याच चवीचे, रंगाचे अन आकाराचे. म्हणजे थोडक्यात तेव्हा बिया जर विकत आणलेल्या असतील, तेही त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणं तर त्या आजही खात्रीशीररित्या उगवणार अन फळणार याची खात्री. म्हणजेच आजच्या व्यवहार्य भाषेत सांगायचं झाल्यास वन टाईम पर्चेस.
हायब्रीड बिया : यापेक्षा वेगळ्या असतात त्या हायब्रीड बिया. या व्यापारी दृष्टीकोन समोर ठेवुन तयार केल्या जात असतात. होय, तयार केल्या जातात. निसर्गाचीच मदत घेऊन पण काहीसं अनैसर्गिकपणं. हेअरलूम अथवा देशी वा स्थानिक बियाणांमधेही पुष्कळ प्रकार असतात. म्हणजे उदा. टोमॅटो. त्यामधेही विविध प्रकार असतात. एखादा लाल रंगाचा तर एखादा रसाळ. कुठला जास्त गोड असेल तर कुठल्याची कांती तुकतुकीत असेल. एखादा गोल तर एखादा लंबगोलाकार असेल. एखादा आकारानं मोठा तर एखादा अगदीच छोटा असेल. यापैकी पर्म्युटेशन-कॉम्बिनेशन करत कुठल्याही दोन प्रकारच्या रोपांवर प्रयोग करत, कृत्रिमरीत्या परागीभवन करत एखादं नवीन वाण जन्माला घातलं जातं. कुटुंब एकच असल्यानं असा संकरही फलदायी होतो. फक्त यश येण्यासाठी अन त्याची खात्री पटण्यासाठी असंख्य प्रयोग अन त्याला हवा तेवढा वेळ मात्र द्यावा लागतो. त्यासाठी जमिनीचा काही भाग केवळ याच प्रयोगासाठी द्यावा लागतो. म्हणजे त्या जमिनीतून इतर व्यापारी पिकं घेता येत नाहीतच. पण या नवीन वाणाची वाढ, त्यावर वाढीदरम्यान होणारे परिणाम, रोग, कीड या सगळ्याची नोंद ठेवणं वगैरे सगळंच आलं. म्हणजेच हे खर्चाचं काम. व्यापारी तत्वांवर बिया विकणाऱ्या कंपन्याच हे करु शकतात. नेहमीच्या काही एकरांमधे वा हेक्टरांमधे शेती करुन त्यावरच गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांचं हे कामच नव्हे.
अशा कंपन्यांसाठीही हे सोपं काम नसतं. म्हणजे नवीन टोमॅटोपासून बिया कमवायच्या अन त्या लावून नवीन वाणाचा टोमॅटो घ्यायचा असं सोपं गणित नसतं हे. अनेक प्रकारच्या चाचण्या, नवीन वाण पारंपारिक रोगांना तोंड देत आहे की नाही, नवीन काही रोग तर पडत नाहीत ना वगैरे सगळं पहायचं असतं. अन हे सगळं इन्स्टंट नसतं. कृत्रिम असलं तरी प्रत्येक गोष्टीला निसर्गतः जो कालावधी लागतो, ज्याला जस्टेशन पिरियड म्हणतात तो तर द्यावाच लागतो. प्रयोगांदरम्यान एखाद्या पिकाचा कालावधी फार फार तर आठ दहा दिवसांनी कमी जास्त करता येतो, नाही असं नाही. पण तो अगदीच निम्मा नाही करता येत.
यश दृष्टीच्या टप्प्यात आल्यानंतर आपल्याच शेतात ते पीक मोठ्या प्रमाणावर घ्याय़चं. फार काही त्रास होत नसेल व अपयशही नसेल तर मग मोठ्या प्रमाणात बिया पकडून (हे बिया पकडणं म्हणजे एक कला आहे. यावर पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिन.) त्या ठराविक काळात बाजारात आणणं, त्यासाठीचं मार्केटिंग करणं हेही बरंच वेळखाऊ अन खर्चिक काम असतं. अन वाटतं तसं साधं सरळही नसतं. कारण अशा बिया तुम्ही घेतल्या अन त्याही देशी वाणांसारख्या पिढ्याऩपिढ्या चालवल्या तर मग पुढच्या सिझनला कंपन्या काय विकणार? आज ना उद्या सॅच्युरेशन येणार अन हळूहळू कंपनीला देशी वाणाचं कुलूप लागणार? कसं परवडायचं ते?
म्हणून मग चाचण्यांच्या दरम्यान अनेक प्रयोग केले जातात त्याच दरम्यान कुठंतरी येणाऱ्या बियांपासून नवीन रोपं होणार नाहीत अन झालीच तर त्याला मातृवृक्षासारखी फळं लागणार नाहीत याची दक्षता घेतली जाते. अन म्हणूनच हायब्रिड फळांची पुढची पिढी तशीच्या तशी तयार होताना आपल्याला दिसत नाही. कधी बिया रुजतच नाहीत, रुजल्याच तर त्या फळतच नाहीत. फळल्याच काही तर फळं कशी निघतील हे त्यांचा आधुनिक ब्रह्मदेव म्हणजे ती विक्रेती कंपनीही सांगू शकणार नाही.
म्हणून मग नवा सिझन, नवी खरेदी. त्याशिवाय दुकान कसं चालणार? बरं, या संकरित वाणाचा पाया भक्कम नसल्यामुळं त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. किंवा ठराविक रोगांनाच ते सक्षमपणं तोंड देऊ शकतात. एक छोटं अन दैनंदिन व्यवहारातलं उदाहरण घेऊया. काही वर्षांपूर्वी घरातले डास साध्या कसल्याशा धुरीनंही निघून जात असत. काहीच दिवसांत अशा सामान्य धुरीला ते सरावले. मग त्या धुरीत आली मिरची वा कडुलिंबाची पानं, मग त्याचाही सराव झाल्यावर आल्या विविध कंपन्या. कुठं कासव छाप आली तर कुठं गुडनाईटच्या कागदी वड्या. त्याचाही परिणाम हळूहळू कमी होत गेला पण डास नाही. मग आले लिक्विड रिपेलंट्स. आता त्यालाही डास सरावले आहेत. पण हे सरावणं नाही तर त्यांची प्रतिकारशक्ती वाढत गेली आहे. पिढ्या दर पिढ्या हे बदल त्यांच्या जनुकांमधे होत गेले.
हेच अशा बियांमधे होत जातं. कंपन्यांना बिया विकताना ठाऊक असतं कुठले रोग पडू शकतील ते. मग ते त्या अनुषंगानं कीटकनाशकंही विकतात. कधी स्वतःच्याच नावानं तर कधी कुणाशी करार करुन. मग त्यांच्याकडं तयार होणाऱ्या बियाही त्या त्या कीटकनाशकांना तोंड देण्यास तयार होतात पण दुसरेच कुठलेतरी रोग शिरतात. मग त्यासाठी दुसरं औषध. ते स्ट्रॉन्ग असेल तर त्यावरचा उतारा म्हणून दुसरं औषध असा नेव्हर एंडिंग खेळ सुरु रहातो. तोपर्यंत दुसऱ्या कॉम्बिमेशनच्या बिया तयार झालेल्या असतात. त्या बिया मागच्या बियांच्यापुढं दोन पावलं कशा आहेत अन त्यांची रोगप्रतिकारशक्ती कशी उत्तम आहे. अन त्यादरम्यान बस्तान बसवलेल्या रोगावरही हे नवीन बियाणं कसं मात करतं वगैरे परिणामकारकरित्या सांगितलं जातं अन आपण नवीन जाळ्यात अडकतो. हेही अडकणं पिढी दर पिढी सुरु रहातं.
जीएमओ : जीएमओ म्हणजे जेनेटिकली मोडिफाईड ऑर्गॅनिझम्स. हे केवळ बियांमधेच नसतं तर जगामधल्या कुठल्याही प्रकारात होऊ शकतं. अगदी माणसातसुद्धा. पण आपण इथं यावरचा विचार बियांपुरताच मर्यादित ठेवू. याआधीच्या लेखात अन वर सांगितल्याप्रमाणं वनस्पतींमधेही डीएनए असतो. त्यांचेही परंपरागत चालत आलेले जीन्स असतात. प्रयोगशाळेत अशा जीन्समधे फेरफार करुन नवीन बियाणं जन्माला घातलं जातं. फारसे दृष्य बदल केले जात नाहीत. निदान सध्या तरी. प्रथम हा प्रयोग मका अन कापसावर केला गेला. या दोन्ही पिकांवर ठराविक प्रकारचे रोग पडतात. त्यांचं प्रमाण इतकं असतं की शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड असतं.
मातीमधे निसर्गतःच एक विशिष्ट बॅक्टेरिया असतो. Bacillus thuringiensis (Bt) या नावाचा. संपूर्ण सेंद्रीय. याचं काम म्हणजे काही ठराविक किडींचा नायनाट करणं. परंतु हा जीवाणू नैसर्गिक पद्धतीनं कुठल्या वनस्पतीमधे जाऊन त्यांवर पडणाऱ्या किडींचा सामना नाही करु शकत, म्हणून मग अशा बॅक्टेरियाचे काही अंश ज्या बियांवर प्रयोग करायचा आहे त्यांच्या जीन्समधे फेरफार करुन समाविष्ट केले जातात. पुढं मग अशा बिया तयार करुन त्यावरही विविध चाचण्या अन निरीक्षणं करुन बाजारात आणल्या जातात. अशा बियांपासून घेतलेल्या पीकांवर विशिष्ट किडी पडत नाहीत. सुरुवातीला मका अन कापूस यांवरच केलेल्या प्रयोगांची व्याप्ती वाढत जाऊन ती वांगी, पपई वगैरे पिकांवरही आता होऊ लागली आहे. अजुन तरी यावर प्रयोग सुरु असले तरी अमेरिकेत मात्र अशा बियांचा वापर वाढता आहे.
या बियांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कीटकनाशकांचा वापर अन त्यांच्यावरचा खर्च कमी करणं अन ते तसं सिद्धही झालं आहे. कीड कमी म्हणजेच उत्पादन जास्त. एकीकडं खर्च कमी अन उत्पादनही जास्त. म्हणजे दुप्पट फायदा. फक्त अशा बियाणांपासून घेतलेलं पीक खाऊन माणसांवर काही परिणाम होतो का याची चाचणी अन चाचपणी अजुनही सुरु आहे. आतापर्यंत तरी कुठं काही दुर्घटना घडल्याचं पुढं आलेलं नसलं तरी याबाबतीत अजुनही सावधानता बाळगली जात आहे.
आता प्रश्न येतो तो म्हणजे अशा जीएमओ बियांचा पुनर्वापर होऊ शकतो की नाही हा. तर अशा बियांपासून पिकं घेतल्यावर त्यांच्यापासून बियांची नवीन पिढी निर्माण होत असते. फक्त जीएमओ बिया बनवणाऱ्या कंपन्या आपली मक्तेदारी टिकून रहाण्यासाठी अन भावी विक्री सुरु व अबाधित रहाण्यासाठी ग्राहक शेतकऱ्याकडून एका करारावर सही करुन घेत असतात, ज्यायोगे तो शेतकरी प्रत्येक सीझनला नवीन बियाणं विकत घेईल. तसंही व्यापारी तत्वावर शेती करणारे शेतकरी पुनुरुत्पादित बियांपेक्षा नवीन बियांनाच जास्त प्राधान्य देत असतात. पण सध्या तरी जीएमओ बियांचे तोटे दिसत नसले तरी कीटकनाशक असो की बॅक्टेरियाचं प्रमाण, अती असणं हे वाईटच.
तर बियाणांच्या बाबतीत या तीनही प्रकारांचा सर्वंकष विचार करता, अधिक अन निसर्गापासून काहीशी फारकत घेत तर कधी त्य़ावर मात करत केलेले प्रयोग याचा विपरीत परिणाम काय होईल हे आजच सांगता येत नाही. रासायनिक खतं अन हायब्रीड बिया यांपासून होणारे नवनवीन व जीवघेणे आजार, वाढता खर्च अन त्या प्रमाणात मिळणारा अल्प परतावा हेही पहाता खात्रीशीर अशी आपली देशी बियाणं कधीही चांगली असं म्हणणं हेच योग्य ठरेल. नव्याची कास कितीही धरायची म्हटलं तरीही जेव्हा जीवाचा अन उत्तम आरोग्याचा प्रश्न आहे म्हटल्यावर त्याच्याशी खेळ न करणंच श्रेयस्कर ठरेल.
आता आपल्या बागेत काय़ वापरायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त हायब्रीड बिया वापरल्यावर होणारा किडींचा त्रास अन त्यावर करावा लागणारा कीटकनाशकांचा फवारा, त्यावरचा खर्च अन दर लगवडीला बिया विकत घेणं आणि त्यासमोर देशी बियांची लागवड करुन नैसर्गिक चवीचं अन उत्तम पोषणमूल्यं असलेलं अन्न व त्यासाठी लागणारे अल्प कष्ट अन अल्प खर्च हे दोन्ही मुद्दे विचारात घेऊन त्याप्रमाणं ज्याचं त्यानं ठरवायचं आहे.
लेखात सर्वच बाजूंचा विचार केला असला आणि तो एकांगी ठरणार नाही याची काळजी घेतली असली तरी आजवरच्या अनुभवातुन आलेल्या शहाणपणामुळं अन सद्यस्थितीतल्या पूर्वी कधीही होत नसलेल्या आजारांकडं पहाता देशी वाणाचाच वापर करणं इष्ट ठरेल यात शंका नाही.
©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
माझा हा लेख व आधीचेही लेख माझ्या https://www.facebook.com/Vaanaspatya या ब्लॉगवरही उपलब्ध आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा