परागीभवन
बागकर्मींना खासकरुन नवीन बागकर्मींना नेहमी एक प्रश्न पडत असतो की फळभाज्यांच्या रोपांवर फुलं येतात अन गळून जातात. काकडी, कारली, दुधी, डांगर वा लाल भोपळा, शिराळी वा दोडकी, घोसाळी वगैरे धरत नाही अन धरलंच तर बोटभर होऊन काळं पडून गळून पडतं.
यामागं प्रामुख्यानं एकच कारण असतं अन ते म्हणजे पॉलिनेशन, अर्थात परागीकरण वा परागीभवन. फुलांमधे परागीकरण झालं नाही तर फळधारणा होत नाही. ज्या वेलींवर नर अन मादी अशी दोन वेगवेगळी फुलं येतात त्यांमधे जी मादी फुलं असतात त्यांच्या मागल्या बाजूस छोटी फळं असतात अन नर फुलांच्या मागल्या म्हणजे देठाकडच्या बाजूला काहीही नसतं. परागीभवन म्हणजे नर फुलांतले पूंकेसर मादी फुलांतल्या स्त्रीकेसरांवर पडावे लागतात. हे काम वाऱ्यानंही होतं किंवा मधमाशी, भुंगे, फुलपाखरं वगैरेंद्वारे होत असतं. जर असं परागीकरण झालं नाही तर मादी फुलाच्या मागल्या बाजूला असलेली छोटी बाल्यावस्थेतली फळं गळून पडतात.
मिरची, टोमॅटो, वांगी वगैरे रोपांवर एकाच प्रकारची फुलं असतात. या फुलांना द्विलिंगी फुलं म्हणतात. अशा फुलांमधे आतल्या बाजूला स्त्रीकेसर असतात तर बाहेरच्या भागात पूंकेसर गोल करुन उभे असतात. या दोघांचं मिलन वाऱ्याच्या हलक्याशा झुळुकीनं होत असतं. किंवा फुलपाखरं वगैरेंद्वारेही होत असतं. (वांग्याच्या फुलांची परागीभवनाअभावी होणारी फुलगळ या माझ्या लेखात ही माहिती विस्तृतपणं दिली आहे. त्याची लिंक इथं देत आहे https://vaanaspatya.blogspot.com/2021/06/blog-post_44.html. ) जे वांग्याच्या बाबतीत तेच इतरही एकेरी पण द्विलिंगी फुलं असलेल्या रोपांबाबतीत आहे.
प्रत्येक फुलाचं आयुष्य फारच मर्यादित असतं. दोन ते तीन दिवस फार फार तर. याच काळात परागीकरण झालं तरच पुढचं सगळं सुरळीत घडून येतं. अन नाहीच झालं तर फुल आपलं आयुष्य आपलं विहित कार्य न करताच संपवुन टाकतं.
हे परागीकरण होण्याचे दोन ठोस उपाय. एक म्हणजे आपण हातानं परागीकरण करावं. छोटा पेंटब्रश घेऊन अथवा बोटाच्या हलक्याशा स्पर्शानं आधी नर अन मग मादी फुलाला मध्यभागी स्पर्श करुन असं परागीकरण घडवून आणायचं. पण यासाठी हवा तो अभ्यास अन योग्य वेळ.
दुसरा यापेक्षा जास्त महत्वाचा, नैसर्गिक अन खात्रीशीर उपाय म्हणजे जैवविविधतेत ढवळाढवळ न करता जे काही होत आहे ते होऊ देणं.
पण आपल्याला तर आपल्या बागेत आपल्याशिवाय इतर कुठलाही प्राणी आलेला चालत नाही. दिसला किडा की मार, कर काहीतरी फवारणी, काढ फोटो अन टाक पोस्ट एखाद्या बागकामाशी संबंधित समूहावर, मग लोक बसलेले असतातच हातात स्प्रे बॉटल्स घेऊन. लगेच सगळे "जाणकार" सांगतात तंबाखूचं पाणी अन इतर केमिकल्स फवारायला. अन आपल्या झाडावरची कीड आपलं झाडच नव्हे तर गच्चीवरचं कॉंक्रीटही खाईल या भितीनं या जाणकारांचे अनुयायी फवारणी करुन किड्यांना अन अळ्यांना यमसदनी देतात पाठवुन अन पुढच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी स्वतः जाणकाराच्या भूमिकेत शिरुन सज्ज होऊन बसतात.
मान्य की झाडावरची प्रत्येक अळी अन किडा हा परागीकरण करत नाही. पण तसंही परागीकरण करणारे पक्षी म्हणा अथवा फुलपाखरं म्हणा, ते परागीकरण कराय़चंच असं ठरवून फुलांवर बसत नाहीत. ती त्यांच्याकडून नकळत घडणारी एक क्रिया असते. त्यांच्या मध खाण्याच्या अथवा इतर कुठलं खाद्य भक्षण करताना घडलेली पण सृष्टीच्या फायद्याचीच.
तसंही जशी आपल्यात प्रतिकारशक्ती असते जी साध्या सर्दी पडशावर मात करु शकते, कुठल्याही औषधाशिवाय. तशीच प्रतिकारशक्ती झाडांतही असते. तीही हलक्या प्रमाणातले रोग केवळ सहनच करु शकतात असं नाही तर त्यावर मातही करु शकतात. पण आपण आपल्या झाडांवर ती वेळच येऊ देत नाही. जसं आपण आपल्या बाळाला बिसलेरीचं पाणी अन शुद्ध सकस असं (आपल्या मते) पॅकबंद खाणं देऊन त्याला खरं तर दुबळं करत असतो तसंच आपण आपल्या झाडांच्याही बाबतीत करत असतो.
नैसर्गिक दृष्ट्या कुजवण्याऐवजी आपण मिक्सरमधून ओला कचरा बारीक करुन गांडूळांना अन विविध जीवाणूंना खायला देतो, पालापाचोळा अन काडीकचरा श्रेडरमधून बारीक करुन कंपोस्ट बनवायला ठेवतो. हाही प्रकार निसर्गाच्या विरुद्धच आहे. पण आपण हे सगळं झटपटच्या नादात करत रहातो. मोठ्या फांद्या डिकंपोज होण्यासाठी निसर्गानंही उपाय केलेच आहेत की. वाळवी आहे, विविध बुरशा आहेत. ते तरी काय़ करत असतात? मोठे ओंडके फोडून त्याची मातीच तर करत असतात. पण आपण पडलो दयाळू अन सर्व आजच हवं असा अट्टाहास करुन बसलेले.
असो. विषय मोठा आहे. सध्या फक्त एवढंच की परागीकरण योग्य रितीनं होऊ द्या. म्हणजे फळभाज्या मुबलक प्रमाणात मिळतील. बागेत येणाऱ्या पाखरांना मज्जाव करु नका. येत नसतील तर ती येण्यासाठी विविध उपाय करा. बागेत केवळ भाजीपाला घेण्याऐवजी फुलपाखरांना आकर्षित करुन घेणारी फुलझाडंही लावा. वर्षभर प्रत्येक ऋतुमधे वेगवेगळी फुलं फुलत असतात. अशी झाडं बागेत लावा. ती एकाच जागी ठेवण्याऐवजी बागभर पसरुन ठेवा. म्ह्णजे फुलपाखरांचा संपुर्ण बागेत संचर राहील. मधमाशा आल्या तर स्वतःला नशीबवान माना. त्यांच्यासारखं परागीभवन करणारा निसर्गात दुसरा कुणीच नाही.
झालंच तर बागेत विविध पक्षी येण्यासाठी त्यांना खाऊ म्हणून ज्वारी, बाजरी वगैरेंचे चार पाच दाणे पेरा. ज्वारी-बाजरीची कणसं साधारण तीन साडेतीन महिन्यांत धरतात. ते कोवळे दाणे खाण्यासाठी चिमण्या वगैरे बागेत येतील. ज्वारी-बाजरीबरोबरच चवीत बदल म्हणून कुठल्या रोपांवर कीड असेल तर तीही ते गट्टम करतील. म्हणजे किडीसाठी वेगळा उपाय करण्याचीही गरज पडणार नाही. पक्षांना पिण्यासाठी थोडं पाणीही ठेवलंत तर उत्तम.
जर अशी निसर्गातली जैवविविधता तुमच्या बागेत नांदू लागली तर परागीभवन वगैरे गोष्टी आपोआप होतील अन बाग फळा-फुलांनी बहरलेली असेल.
फोटो इंटरनेटवरुन साभार.
®वानस्पत्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा