नैसर्गिक स्त्रोतांचा सुयोग्य वापर

नैसर्गिक स्त्रोतांचा अल्प नव्हे सुयोग्य वापर



परवा एक आर्टिकल वाचलं. पाण्याचा अतिवापर कसा टाळता येईल यावरचं होतं. प्रत्येक गोष्ट, त्यातही नैसर्गिक स्त्रोत सजगपणं तोलून मापून वापरायच्या पद्धतीवरुन अन त्याचा खोलवर विचार करुन त्यावर सोल्युशन शोधून ती अंमलात आणण्यावरुन आर्टिकल अर्थातच युरोप-अमेरिकेतलं असणार हे उघडच आहे. आपल्यापैकीही बऱ्याचजणांनी ते वाचलं असेल. कारण ते लाईक केलेली काही नांवं ओळखीची दिसली. तर यामधे पाण्याचा वापर कमी करण्यासाठी चर्चिलेल्या अनेक उपायांपैकी काही उपाय मला भावले. अन विशेष म्हणजे ते अनुकरणीयही आहेत.

पहिला म्हणजे स्थानिक वाणाच्या बियांचा अन झाडांचा वापर करणं. यामधे कसं असतं, आपापल्या भागातील बियांना अन झाडांना आपल्या वातावरणाशी जुळवुन घेण्याची सवय त्यांच्या जीन्समधेच असते. त्यामुळं स्थानिक बिया न रुजण्याचं प्रमाणही अगदीच नगण्य असतं तेच रोपं अन फांद्यांपासून वृद्धी करण्याबाबत. अशा फांद्या नैसर्गिक अन वातावरणातील बदलांना तोंड देऊन जीव धरतात अन फुललात-फळतातही. स्थानिक वातावरणातील नैसर्गिक स्त्रोत म्हणजे पाणी, हवामानातील बदल हे रक्तातच म्हणजे त्यांच्या गुणसूत्रातच असल्यामुळं ते सहन करण्याची ताकदही अर्थातच त्यांच्यात असते.

दुसरा म्हणजे त्या त्या सीझनप्रमाणं फळं अन फुलं यांची लागवड करणं. आजकाल जग छोटं झाल्यामुळं अन व्यापारी दृष्टीकोनातुन आपण आपल्याकडं न होणारी फळंही लावतो अन अशा फळांत किती अन कसे पौष्टिक गुणधर्म आहेत वगैरे लेखही सोशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळं वाचायला मिळतात अन मग आपणही बहुसंख्येनं त्याला बळी पडतो. अवोकॅडो, किवी ही काही उदाहरणं. पण या फळांना लागणारं पाण्याचं प्रमाण, त्यांच्या निकोप वाढीसाठी लगणारं हवामान आपल्याकडं नसल्यानं आपण त्याची भरपाई भरपूर खतपाणी करुन करतो. त्यांच्या वाढीचा सिझनही आपण पहात नाही.

वास्तविक पहाता साधारणपणं कुठलीही बी पेरल्यावर, सुरुवातीची काळजी घेतल्यावर रुजतेच. रुजल्यावर त्याचं रोप वाढू लागतं अन तशा आपल्या अपेक्षाही वाढत जातात. मग सुरु होते त्या रोपाला वाढवण्याची अन त्यावर फळं धरायला लावण्याची धडपड. त्यासाठी गुगल, यु ट्युब, बागकामाला वाहून घेतलेले विविध समूह अन आपल्यासारखे ब्लॉग्ज असतातच. एवढ्या सगळ्या पर्यायात प्रॅक्टिकल सल्ले हे नकारात्मक सल्ल्यांत गणले जातात अन मग "माझ्या मावशीच्या शेजाऱ्यांच्या नणंदेच्या माहेरी अस्संच झाड होतं, कित्ती फळं लगडलेली म्हणून सांगू! फोटोमधे फक्त फळंच दिसत होती, एकही पान म्हणून दिसत नव्हतं, अगदी औषधालाही." असा एखादा सल्ला वा अभिप्राय आपल्या आशा अंकुरित करतो अन मग आपण त्या रोपाच्या खनपटीस बसतो. 

निसर्गनियमाप्रमाणं झाड फळायच्या वयात आल्यावर थोडीशी फळं देतंही. पण त्याचा आकार छोटा रहातो. अंगभूत गुणांमुळं चव, रंग अन रुप मात्र तेच रहात असल्यामुळं फाळांची संख्या अन आकार यासाठी आपण सरसकट खतांची कमतरता हेच कारण समजतो अन अधिक मात्रेत खतं देतो. खतांची मात्रा जेवढी अधिक तेवढंच पाण्याचंही प्रमाण अधिक. घरच्या बागेत घेतलेल्या नेहमीच्या भाज्यांचं कॉस्टिंग जिथं आपण काढत नाही तिथं या अशा फळांचं कुठनं काढणार? युरोप-अमेरिकेत पिकणारी फळं आपण महाराष्ट्रातल्या आपल्या गॅलरीतल्या अठरा-वीस इंची कुंडीत घेतल्याच्या कौतुकात आपण आकंठ बुडलेलो असल्यानं आल्या खर्चाचं गणित आपल्या डोक्यातही येत नाही. पण त्यासाठी जेवढं पाणी लागलं तेवढ्या पाण्यात स्थानिक वाणाची किती तरी फळं त्यांच्या मूळ आकारात अन तेही चव व रंग-रुपासह घेता आली असती हे आपण विसरतो.

तिसरं म्हणजे, पाण्याचा सुयोग्य वापर होण्यासाठी सेंद्रीय पद्धतीवर भर द्यायला हवा. रासायनिक खताची कास निदान आपण आपल्यापुरताच भाजीपाला पिकवणाऱ्या कुंडीकऱ्यांनी तरी सोडायला हवी. या ना त्या स्वरुपात अन "थोडं तरी रासायनिक खत द्यावंच लागतं हो, तुम्ही काहीही म्हणा, पण त्याशिवाय गत्यंतर नाही" असं स्वतःचंच लंगडं समर्थन करत आपल्यापैकी बरेचजण रासायनिक खतं वापरतात. मग ते एनपीके असो की डीएपी. चमचाभर असो की चिमूटभर. झाडांना ती घेण्यासाठी अतिरिक्त पाणी द्यावंच लागतं. पण अजुनही आपण "वरलिया रंगा"च भुलत असल्यामुळं अशा खतांचा वापर करण्यासोबत आपण त्याचा कळत-नकळत प्रसार अन प्रचारही करत असतो.

हे सगळं एका दिवसांत किंवा एकट्यानं करुन थांबणार नाही हे मलाही माहीत आहे. पण सुरुवात करायला काय हरकत आहे? झालंच तर कुंड्यांना योग्य प्रमाणात पाणी देण्याबरोबरच अधिकचं वाहून जाणारं पाणी तसंच वाहून जाऊन वाया घालवण्याऐवजी ते अडवुन त्याची साठवणूक करुन पाण्याच्या पुढच्या पाळीला आपण तेच वापरु शकतो. कल्पना पुष्कळ आहेत. आपापल्या सोयीनुसार, कुवतीनुसार अन बजेटनुसार त्यांचा वापर करायला हवा. तरच आपलं बागेसाठीचं बजेट कोलमडणार नाही. आता जर आपण आपल्या बाल्कनीत अन गच्चीत भाजीपाला यशस्वीरीत्या घेत असाल तर बागकामाचा पहिला टप्पा आपण यशस्वीपणे पार पाडला आहे असं समजायला हरकत नाही. आता गरज आहे पुढच्या वर्गात जायची. त्यादृष्टीनं केवळ विचार न करता कृतीही करायला हवी. अन तीही लगेचच. कारण पाऊस सरासरीपेक्षा कितीही जास्त झाला अन पावसाळा कितीही लांबला तरी फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच पाण्याचं रेशनिंग सुरु होत असतं. त्यामागची कारणं कितीही राजकीय असली तरी वस्तुस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आपल्यांत नाही, अन असलं तरी त्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे आपणच पाण्याचा वापर योग्य तो ठेवण्याची गरज आहे. आत्ता सुरुवात कराल तर सवय लागेपर्यंत पाण्याचं रेशनिंगची वेळ येईल.

बघा, विचार करा. शेवटी बागही तुमचीच अन खर्चही तुमचाच.

फोटो इंटरनेटवरुन साभार.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...