बागेतील तण - अनावश्यक की आवश्यक
या पावसाळी दिवसांत बागेत, कुंडीत अनावश्यक गवत / तण वाढतं. ज्या बिया आपण पेरल्या नाहीत किंवा कुठलंही कटींग आणून लावलं नसेल तर जे काही उगवुन आलंय ते तण असं समजायला हरकत नाही. अर्थात, काही हव्या त्या अन उपयोगी झाडांच्या बिया वाऱ्यानं उडून येऊन किंवा खताबरोबर वा पक्षांद्वारे कुंडीत अथवा बागेत नक्कीच रुजु शकतात. अशी रोपं ओळखून हवी असल्यास त्यांचं अन्यत्र अन योग्य जागी स्थानांतरण करावं किंवा जे योग्य असेल ते करावं. पण तण मात्र काढून टाकणं कधीही श्रेयस्कर ठरतं. अन्यथा आपण आपल्या रोपाला वा झाडाला जे खत घालतो ते हे तण गट्टम़् करुन टाकतं अन आपलं झाड खुरटतं. असं होऊ नये, आपण दिलेला खाऊ आपल्याच बाळानं खावा असं वाटत असेल तर असं तण उपटण्याचीच गरज असते.
पावसाळी तण ओळखण्याचा माझा अनुभवातुन आलेला मार्ग म्हणजे जे गवत सहजासहजी उपटलं जातं ते अनावश्यक तण. अर्थात हा काही रामबाण मार्ग नाही. हा झाला एक ठोकताळा. आता अनुभवातुन नुसतं पाहूनच मी सांगू शकतो कुठलं गवत कामाचं आहे अन कुठलं अनावश्यक ते. पण निदान मी रहातो त्या भागात तरी दोन प्रकारचं तण, एक गवताचा प्रकार आहे अन एक छोट्या म्हणजे पूर्ण वाढल्यावर गुडघ्याएवढं होणारं रोपटं आहे ज्याची मुळं मातीत घट्ट रोवली गेलेली असतात. हे दोन प्रकार मात्र काळजीपूर्वक काढावे लागतात. कारण ओलसरपणामुळं बरेंचदा जमिनीच्या लेव्हलवर ते तुटुन हातात येतं अन मुळं तशीच राहुन जातात. त्यानंतर पावसाळा लांबला वा नंतर एक दोन सरी जरी आल्या तरी ते पुन्हा फुटतं अन दरम्यानच्या काळात मुळं खोलवर जात असल्यामुळं मुळापासून काढण्यासाठी आजुबाजुला थोडं खणावं लागतं.
तण उपटताना घ्यायची काळजी म्हणजे ते मुळासकट उपटावं. आपल्या मुख्य झाडाला धक्का लागणार नाही याची काळजी घेत गवत मुळासकट काढावं. वाटल्यास छोटं खुरपं अथवा काहीही टोकदार हत्यार ते घेऊन मुळासकट काढावं. बरेंचदा काही प्रकारच्या गवताची मुळं गुच्छानं वाढतात. असं गवत उपटताना बरीचशी माती सोबत घेऊन वर येतं. कुंडीत आधीच माती वा पॉटिंग मिक्स कमी असतं. जे काही असतं ते पावसानं खाली बसलेलं असतं. त्यात हे गवत वर येताना जर माती वर आणत असेल तर मुख्य झाडाला धक्का नक्कीच बसतो. त्यामुळं पूर्ण काळजी घेतच गवत काढावं. मुख्य झाडाच्या बुंध्याभोवती हाताचा पंजा दाबून धरत ते हलणार नाही अन वर येणार नाही याची काळजी घेतच गवत उपटुन काढावं. एरवीही कुंडीमधे कुठलंही गवत वा तण नजरेस पडताच उपटुन तुकडे करुन जागेवरच गाडावं. म्हणजे मातीत मिसळून द्यावं. ते तिथंच कुजुन मुख्य झाडाला नत्राचा पुरवठा करेल.
पाऊस सुरु असताना, थोडी उघडीप मिळाल्यावर खासकरुन जमिनीवरील बागेमधील तण काढणं सोपं जातं. माती ओली असते. तण काढण्यास फार उशीर करु नये. तण फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच, म्हणजे त्यानं फुलं धरुन बिया तयार होण्यापूर्वीच काढलं तर पुन्हा उगवण्यासाठी बिया रहात नाहीत.
काढलेलं गवत तुकडे करुन कंपोस्टमधे अथवा गांडूळखतासाठी जे काही टब, माठ, कुंडी वगैरे वापरत असाल त्यामधे किंवा बागेत जागा असेल तर खड्डा खणून त्यामधे वा बागेतच ढीग करुन किंवा सर्व झाडांत अन कुंड्यांमधे टाकून त्यावर माती पसरुन द्यावी. अशा हिरवळीच्या खतातुन आपल्या झाडांना चांगलं खाद्य मिळू शकतं. अशा खताचे फायदे खालीलप्रमाणे;
- हे खत मातीत नत्र वाढवतं.
- जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवतं.
- मातीची पाणी व अन्नद्रव्यं धरून ठेवण्याची क्षमता वाढवतं.
- मातीत फायदेशीर सूक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवतं
- सर्वात महत्वाचं म्हणजे हे खत आपल्याला फुकटात उपलब्ध असतं.
बरेच जण आपल्या बागेत, शेतात तणनाशक फवारतात. पण त्यामुळं नुकसानच जास्त होत असतं. कधी आपण पेरलेल्या बियाच या औषधाची शिकार होत असतात किंवा मातीच्या तेवढ्या भागाची रुजवण्याची क्षमताच कमी वा नाहीशी होते. त्यापेक्षा उगवलेलं तण ते कोवळं असतानाच काढलं तर ते सोपंही पडतं अन त्यापासून सुंदर, नैसर्गिक अन आपण लावलेल्या रोपांना वा पिकाला लगेचच उपलब्ध होणारं खतही मिळतं.
बागेत तण उगवणं ही आपली माती सुपीक असल्याची एक प्रकारे पावतीच असते. पण तरीही बागेत तण येऊ नये म्हणून काही नैसर्गिक उपायही आहेत.
- बाग जर केवळ कुंडीमधलीच असेल तर नियमितपणे माती खुरपणीच्या सहाय्यानं खुरपत रहाणं, म्हणजेच खालीवर करत रहाणं. हे करत असताना अर्थातच झाडांच्या मुळांना धक्का लागु न देण्याची काळजी घ्यावी.
- नेहमीच कुंडीत मल्चिंगचा वापर केल्यास तण उगवण्यास जागाच रहाणार नाही.
- कुंड्यांमधे मुख्य झाडाच्या मुळापाशी पालक, कोथिंबीर वा तत्सम पालेभाज्या घेत राहिल्यास उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करता येतो. यामधे एकाच खतपाण्यात आपल्याला दोन पिकंही मिळतात अन तणांना रुजण्यासही जागा मिळत नाही.
- जमिनीवरची बाग असेल तर झाडांच्या आळ्यांमधेही मुळांना धक्का पोहोचू न देता माती नियमितपणं खालीवर करत रहाणं हा उपाय आहे.
- अशा बागेतही मल्चिंग फायद्याचं ठरतं.
- मोठ्या झाडांच्या आळ्यातही पालेभाज्या लावल्यास भाज्याही मिळत रहातील अन तण उगवणंही नियंत्रणात ठेवता येईल.
- बागेमधील मोकळी जागा नियमित खराट्यानं/बुताऱ्यानं व्यवस्थित झाडत राहिलं अन त्या जागेवर सततचा वावर राहिला तर कालांतरानं अशा जागेवर तण उगवत नाही. बाग साफ ठेवण्याच्या अनंत फायद्यांपैकी हाही एक फायदा असल्यानं बाग नेहमीच साफसूफ अन स्वच्छ ठेवावी.
तण उगवणं हे नक्कीच मातीची सुपीकता दर्शवतं. आपली माती जिवंत आहे अन अशा मातीमधे पेरलेल्या वा पेरल्या गेलेल्या बिया त्यात रुजतात हेच तणांद्वारे ती दर्शवत असते. त्यामुळं तणांकडं सकारात्मक दृष्टीनं पहावं. पण अर्थातच ते आपण लावलेल्या झाडांच्या मुळावर उठू नये याचीही दक्षता घेणं गरजेचं असतं. तणानं त्याच्या वाढीच्या काळात मातीमधुन घेतलेली अन्नद्रव्यं ते काढून जागेवरच गाडल्यास मुख्य झाडाला ते अनायसेच उपलब्ध होत असल्यामुळं तणांचे फायदेच पुष्कळ आहेत. फक्त त्याकडं वेळच्या वेळी पहाणं अन योग्य ती कारवाई करणं गरजेचं असतं.
©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya
महत्वपूर्ण माहिती 👍👍👍🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
उत्तर द्याहटवा