बागेतील रोपांवरील रोग व कीड - भाग २
रोपांवरील रोग - करपा आणि ब्लॉसम एंड रॉट
करपा :
बागेतील रोपांवरील पानांवर सुरुवातीला काळपट तपकिरी रंगाचे ठिपके दिसु लागतात. सर्वच प्रकारातील झाडांवर. फुलझाडं असो वा भाज्या. छोटी फळझाडं असो की आंबा, पेरू सारखी मोठी झाडं. पानांवर असे ठिपके पडतात. नवी कोवळी पानं अन नव्या फुटणाऱ्या फांद्यांवर हे ठिपके पडुन ते वाढत जातात. मध्यभागी खोलगट भाग असलेल्या अशा ठिपक्यांचा आकार वाढत जातो. पानं वाळल्यासारखी दिसू लागतात. कधी फांद्यांवरही असा रोग पसरत जाऊन छोटी रोपं मरणपंथाला लागतात. खास करुन पावसाळ्यात याचा प्रादुर्भाव जास्त असतो. वारा, पाऊस, कीटक, माती, पाणी अन बागकामाची हत्यारं यांच्या माध्यमातुन याचा प्रसार होतो. पावसाळ्यात तर याचा प्रसार फारच लवकर अन मोठ्या प्रमाणात होतो.
हा एक बुरशीजन्य रोग आहे. याची सुरुवात होते तेव्हा रोपांच्या पानांवर छोटे तपकिरी ठिपके दिसतात. वेळीच जर उपाय केले नाहीत तर हे ठिपके पसरत जातात. मोठे होत होत ते रोपांच्या पानांवर व छोट्या फांद्यांवर, खोडावर पसरु लागतात. फळांवरही असे तेलकट डाग दिसु लागतात. मोठ्या झाडांच्या नवीन फुटींवर असे डाग होऊन ते पसरत जातात. प्रमाण अधिक असेल तर पानं गळतात.
⦁ असा रोग दिसताक्षणीच रोगग्रस्त पानं काढून दूर फेकून द्यावीत किंवा शक्य असेल तर जाळून टाकावीत.
⦁ रोगाचा प्रसार जास्त असेल तर असं रोपही काढून फेकून द्यावं.
⦁ मोठ्या झाडांवर रोग दिसल्यास तेवढा भाग कापून टाकून दूरवर नेऊन टाकावा. कापलेल्या भागी झाडाला बुरशीनाशक किंवा बोर्डो पेस्ट लावावी.
⦁ बियाणं निरोगी अन खात्रीशीर वापरावं. बियाणं पेरण्यापुर्वी ते ट्रायकोडर्मासारख्या बुरशीमधे मिसळून मगच पेरावं.
⦁ रोपांची पुनर्लागवड करतानाही बुरशीनाशकात किंवा ट्रायकोडर्मासारख्या बुरशीच्या पाण्यामधे दहा मिनिटं मुळं बुडवुन ठेवुन मगच लागवड करावी.
⦁ बागकामाची हत्यारं वापरल्यानंतर स्वच्छ व निर्जंतुक करावीत.
⦁ ज्या झाडावर असा रोग पडला असेल त्याच्या फळांपासून पुढील लागवडीसाठी बिया घेऊ नयेत.
⦁ अशी पानं वा रोपं कंपोस्टमधे वापरु नयेत.
⦁ नीमतेलाचा स्प्रे नियमितपणं करत रहावं. साधारणतः दर आठ ते दहा दिवसांनी नीमतेल किंवा कडुलिंबाच्या पाल्यापासुन घरीच अर्क करुन तो रोपांवर फवारावा.
⦁ फळं व फळभाज्या मातीला टेकणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
⦁ नेहमी कंपोस्टचा भरपूर वापर करावा. कंपोस्टमधील विविध घटकांमधून झाडाला आवश्यक ती सर्वच अन्नद्रव्यं अन पोषकद्रव्यं मिळत असल्यानं त्य़ांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
⦁ पाणी देताना नेहमीच कुंडीतल्या मातीमधे द्यावं. उन्हाळ्यात पानांवर फवारलं तरी ते जास्त वेळ पानांवर रहाणार नाही याची काळजी घ्यावी.
⦁ कॉपरयुक्त कुठलंही औषध फवारावं. फक्त ते कमी प्रमाणात वापरावं. कारण मातीमधे तांब्याचं प्रमाण वाढल्यास ते गांडुळांसाठी अपायकारक होऊ शकतं.
⦁ पिकांचा फेरपालट करावा. कुंडीतील बहुवर्षायु झाडांचं दर दीड ते दोन वर्षातुन रिपॉटिंग करावं. जुन्या कुंडीतील माती दहा-बारा दिवस उन्ह देऊन निर्जंतुक करुन पुन्हा नीमपेंड वगैरे गोष्टी घालून पुनर्जिवीत करुन मगच वापरण्यास घ्यावी. अशा मातीमधे आधी काढलेलं पीक सोडून वेगळं पीक घ्यावं वा इतर दुसऱ्या प्रकारच्या रोपासाठी ती माती वापरावी.
----------------------
ब्लॉसम एंड रॉट :
हा रोग फळभाज्या, त्यातही टोमॅटो, वांगी, सर्व प्रकारच्या मिरच्या आणि भोपळ्यातील सर्व प्रकारांवर पडत असतो. मातीमधील कॅल्शिअमची कमतरता याला कारणीभूत असते. रोपांवर येणाऱ्या पहिल्या काही फळांमधे सहसा हा रोग सापडतो. सुरुवातीला फळाच्या तळाशी काळसर तपकिरी डाग दिसतो. वेळीच उपचार केल्यास तो डाग म्हणजे रोगाची झालेली लागण थांबवता येते, पण काढून टाकता येत नाही. वेळीच लक्ष न दिल्यास हा डाग वाढत जातो.
हा रोग प्रामुख्यानं कुंडीमधील झाडांवरच पडतो. जमिनीवरील झाडांवर पडत नाही. याचं कारण म्हणजे जमिनीवरील झाडांना त्यांना आवश्यक असलेली जीवनसत्वं, पोषकद्रव्यं घेण्यासाठी मुळं खोलवर पाठवता येतात. परंतु कुंडीत हे शक्य नसतं. त्यामुळं कुंडीतील रोपांना आपण देऊ त्या खतांवर अन पाण्यावरच अवलंबुन रहावं लागतं.
रोपं आपल्या वाढीच्या काळात मातीमधुन कॅल्शिअम घेत असतात. जमिनीमधे कॅल्शिअम आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध असतो. तो रोपं आपल्या मुळांवाटे घेऊ शकतात. कुंडीमधल्या मातीमधला कॅल्शिअम जेव्हा रोपं घेऊन संपवतात तेव्हा ती या रोगाला बळी पडतात. कधी कधी पाणी देण्यात अनियमितता होते. कधी पाणी जास्त होतं तर कधी जास्त मोठा खंड पडतो. म्हणजेच मातीमधे ओलसरपणा राखला जात नाही. हे सतत होत राहिल्यास मातीत कॅल्शिअम असुनही मुळांना तो घेता येत नाही.
वर उल्लेखिलेली फळं जेव्हा आकारानं पूर्ण होत असताना कच्चीच असतात किंवा पिकण्याच्या मार्गावर असतात तेव्हा एखाद दुसऱ्या फळावर खालच्या बाजुनं एखादा व्रण असल्यासारखा डाग येतो. हा डाग वाढत जाऊन फळाचा खालचा भाग व्यापतो. अशी फळं प्रभावित भाग काढून टाकून खाता येतात.
⦁ असं होऊ नये म्हणून पाण्याच्या वेळा नियमितपणं पाळाव्यात. कधी काही कारणानं खंड पडलाच तर पुढच्या वेळी पाणी देताना बॅकलॉग भरुन न काढता ते नेहमीच्याच प्रमाणात द्यावं.
⦁ कुंड्या सुटसुटीतपणं ठेवल्यास सगळ्या बाजुंनी निरीक्षण करता येतं. रोपांवर फळं धरल्यापासुन नियमितपणं निरीक्षण करत रहावं. काही विकृती दिसल्यास त्वरित उपाय योजावेत.
⦁ पाण्याचा निचरा योग्य होत आहे याची खात्री करावी. खास करुन पावसाळ्यात पाणी साचुन रहाणार नाही हे पहावं. पावसात खंड पडल्यास अन मातीचा वरचा भाग कोरडा दिसल्यास थोडं पाणी द्यावं.
⦁ कुंडीत ओलसरपणा रहाण्यासाठी मल्चिंग अवश्य करावं.
⦁ कॅल्शिअमचा नैसर्गिक स्त्रोत म्हणजे बोनमील अन अंड्यांच्या कवचांचा चुरा. रोपांची पुनर्लागवड करत असतानाच पॉटिंगमिक्समधे कुंडीच्या आकारमानाप्रमाणं एक ते दोन चमचे बोनमील किंवा अंड्याच्या कवचांचा चुरा घालावा.
⦁ दर पंधरा दिवसांनी कंपोस्ट अन शेणखत वा गांडूळखत आळीपाळीनं देत असताना त्यातही अर्धा ते एक चमचा बोनमील वा अंड्यांच्या शेल्सचा चुरा घालावा.
⦁ खतं योग्य प्रमाणात अन योग्य त्या अंतरानंच द्यावीत. उगीचच जास्त खतं घालू नयेत. साधारणतः सेंद्रीय खतं देताना कुंडीचा वरचा एक इंचाचा थर भरेल एवढंच द्यावं. देताना माती मोकळी करुन खत घालून ते मातीत मिसळून घ्यावं.
⦁ माती ओली होईल इतपतच पाणी द्यावं.
⦁ रोपांना फळं येत असताना जास्त खतं देऊ नयेत.
⦁ कुंडीतील माती उकरताना मुळांना इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. तुटलेली मुळं पाणी अन अन्नद्रव्यं व्यवस्थितपणं घेऊ शकत नाहीत.
फोटो स्त्रोत : माहितीचं आंतरजाल
क्रमशः
©राजन लोहगांवकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा