बियांची साठवण - भाग २

बियांची साठवण - भाग २

आपण आपल्या बागेत भाज्यांचं पीक घेतो, (आता भाषा बदलायला हवी. भाज्या लावतोऐवजी पीक घेतो म्हटल्यावर नैतिक जबाबदारी वाढते अन कामात अधिक गांभीर्यही येतं. ) तर त्या पिकांचं आयुष्य असतं तीन ते चार महिन्यांचं. वांगी, मिरची वगैरे काही पिकं सोडल्यास इतर फळभाज्या अन पालेभाज्या यांची पुढील लागवड करण्यासाठी बियांची गरज असते. गरज यांच्याही बियांची असते. फक्त दर सीझननंतर भरीव छाटणी केल्यास नवीन फूटींवरही पुढच्या सीझनला भाज्या मिळतात. फक्त पहिल्या खेपेपेक्षा संख्या अन क्वचित आकार कमी पडतो. असं साधारण तीन ते चार सीझन चालतं. नर्सरी वा बियाणांच्या दुकानातुन मिळणाऱ्या बिया या जर हायब्रीड असतील तर दर वेळच्या लागवडीसाठी आपल्याला बिया विकत आणाव्या लागतात. पण जर आपण देशी बियाणं वापरत असू तर पुढील लागवडीसाठी लागणाऱ्या बिया आपल्या आपणच तयार करुन त्या साठवु शकतो. असं केल्यानं वेळ आणि पैसा तर वाचतोच पण आपल्याला खात्रीशीर बियाणं उपलब्ध होतं.

साधारणतः, आपापल्या विभागातील जमीन, हवामान, पाऊसमान याचा विचार भाज्याच नव्हे तर कुठलंही पीक घेत असताना केला जात असतो. हे अगदी पुर्वापार चालत आलेलं आहे अन त्यामागं अभ्यास आहे, अनुभव आहे. निसर्गतः कुठलीही बी, तिला आवश्यक तो ओलावा, तापमान अन उर्जा मिळाल्यावर ती रुजतेच. परंतु तिची पुढील वाढ, त्या बीपासुन आलेलं झाड फुलणं, फळणं यासाठी माती, हवामान, सुर्यप्रकाश अन त्यामधली तीव्रता या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात अन त्या आपण पुरवू शकत नाही. अन्यथा बर्फाळ प्रदेशातही नारळाची झाडं दिसु शकली असती. श्रम अन पैसा वाचवण्यासाठी स्थानिक वाणाची अन पीक प्रकाराची निवड केली जाते.

आपण जेव्हा पहिल्यांदाच कुठल्या बिया वापरणार असू तर त्यासाठी देशी वा हेअरलूम प्रकारातील बिया निवडल्या अन त्या दर सीझननंतर आपण साठवत जाऊन पुढील लागवडीसाठी त्याच वापरल्या तर आपल्या येथील हवामानास तोंड देण्यास अशा बिया पिढी दर पिढी सक्षम होत जातात. बियांच्या साठवणीमागं हाही एक मुद्दा महत्वाचा असतो.

साठवणीसाठी अन पुढील लागवडीसाठी बिया धरण्यासाठी योग्य रोपाची निवड, रोपावरील फळ काढण्याचा योग्य कालावधी आणि बियांवर प्रक्रिया करुन त्यांची योग्य पद्धतीनं साठवण या प्रमुख गोष्टींकडं लक्ष द्यायची गरज असते. हे सारं अतिशय सोपं काम आहे. फक्त त्याची योग्य ती पद्धत जाणून घेणं गरजेचं आहे अन तीच आपण पाहूया.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर हायब्रीड बिया लावल्या असतील तर अशा झाडांपासून मिळणाऱ्या बिया या पुनर्लागवडीसाठी उपयोगी पडत नाहीत.

ज्या रोपांमधे वा भाज्यांच्या प्रकारांमधे सेल्फ पोलिनेशन आणि ओपन पोलिनेशन होत असतं अशीच रोपं बियांच्या साठवणीकरता निवडवीत.

बागेत जर हायब्रीड आणि देशी किंवा ओपन पोलिनेटेड बिया या दोन्ही प्रकारांतील बिया पेरल्या असतील तर बियांच्या पुढील साठवणूकीसाठी देशी प्रकारातील सुदृढ अन निरोगी झाडांची निवड करुन ती वेगळी ठेवावीत. वाऱ्यामुळं वा एकमेकांजवळ ठेवल्यामुळं क्रॉस पोलिनेशन होण्याची शक्यता असते अन येणारी पुढील पिढी कशी येईल हे सांगता येत नसतं म्हणून ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं.

बियांच्या साठवणूकीसाठी निवडलेल्या रोपांवर काही फळं, शक्यतो प्रथम आलेल्या फळांपैकी काही फळं ही तशीच रोपांवर ठेवून ती पूर्ण पिकू द्यावीत. पिकत असताना त्यांच्यात होत असलेले बदल यांवर लक्ष ठेवावं. फळं वा शेंगा पूर्ण तयार होत असताना त्यांचा आकार एका मर्यादेपर्यंत वाढून त्यानंतर वाढ थांबते अन रंग बदलु लागतो. काही फळांच्या बाबतीत त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. असे बदल नजरेस पडताच ती गळून खाली पडायच्या आधीच काढून घेऊन सावलीत ठेवावी.

सर्वसाधारणपणं सर्वच प्रकारच्या बियांच्या साठवणूकीची पद्धत एकच असली तरी काही फळांच्या बाबतीत खास काळजी घ्यावी लागते. कशी ते पुढे पाहूया.

टोमॅटो : जर तुम्ही एकापेक्षा अधिक प्रकारचे देशी टोमॅटोंचं पीक घेत असाल तर अशी रोपं वेगवेगळी ठेवून त्याची व्यवस्थित नोंद करावी. शक्य असेल तर प्रत्येक प्रकारातील दोन ते तीन रोपं वेगळी ठेवल्यास उत्तम होईल. प्रत्येक प्रकारांतील तीन ते चार टोमॅटो झाडांवर पूर्ण पिकू द्यावेत. पूर्ण पिकलेले टोमॅटो अर्धे कापून त्यातील गर स्वच्छ केलेल्या चमच्यानं एखाद्या भांड्यात काढून घ्यावा. भांडं पारदर्शक असल्यास उत्तम. हे करण्यापूर्वी हात अन भांडं दोन्हीही स्वच्छ केलेलं असावं. काढलेला गर तसाच ३ - ४ दिवस सावलीत ठेवावा. भांड्यावर झाकण ठेवावं. याला मुंग्या लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. टोमॅटोच्या बियांवर एक पातळसा पापुद्रा असतो. तो आपल्याला काढायचा आहे. पण तो बिया धुवुन हातानं काढताना बियांना इजा होण्याची शक्यता असल्यामुळं आपल्याला भरपूर काळजी घेण्याची गरज असते.

या ३ - ४ दिवसांत गर रोज एकदाच स्वच्छ चमच्यानं हलवत रहावं. या दरम्यान वरच्या बाजूला पांढरट थर जमा होईल. तो साचू देऊ नये. अन म्हणूनच चमच्यानं ढवळणं गरजेचं असतं. असा पांढरा थर जर जास्त असेल अन तो वेगळा करता येत असेल तर तो चमच्यानंच काढून टाकावा. ३-४ दिवसांनी भांड्यात बिया खाली बसलेल्या दिसतील. मग चमच्यानं हलकेच वरचा गर काढून टाकावा. आता भांड्यात फक्त बिया राहिल्या असतील. त्यांवर पाणी घालून ठेवावं. काही बिया वर तरंगताना दिसल्या तर त्या काढून टाकाव्यात. नंतर २ ते ३ वेळा बिया पाण्यानं व्यवस्थित धुवुन घेऊन त्या कागदावर अथवा एखाद्या प्लेटमधे वाळवत ठेवाव्यात. बिया पूर्ण कोरड्या झाल्यावर त्या झिप लॉक पिशवीमधे, वा कागदाच्या पाकिटात किंवा एखाद्या हवाबंद डबीमधे ठेऊन वर लेबल लावून त्यावर बीचा प्रकार, साठवण्याची तारीख हे सगळं लिहावं. म्हणजे पुढच्या सीझनला हे सारं उपयोगी पडेल. डबी वा पिशवी जे काही बिया ठेवण्यासाठी वापरलं असेल ते साधारण तापमानात व कोरड्या ठिकाणी ठेवावं.

वांगी : वांग्याचे जेवढे प्रकार लावले आहेत त्यापैकी प्रत्येकी किमान एक तरी रोप वेगळं काढून इतर रोपांपासून दूर ठेवावं. त्यावरील वांगी पूर्ण तयार होऊ द्यावीत. वांगी आधी पिवळी होऊन मग तपकिरी रंगाची होतील. त्वचेचा तुकतुकीतपणा जाईल. कडकपणा जाऊन मऊ पडतील. पूर्ण पिकल्यावर वांगी एक तर झाडावरुन गळून पडतील किंवा हात लावताच सहजासहजी हातात येतील. अशी वांगी काढून चार पाच दिवस घरातच उघड्यावर ठेऊन द्यावीत. नंतर सुरीनं हलकेच कापून घ्यावीत. आतला गर कोरडा पडला असेल. त्यातच तपकिरी रंगाच्या बिया दिसतील. टोकदार सुरीनं बियांना न दुखवता त्या वेगळ्या कराव्या. एखाद्या भांड्यात घेऊन त्या दोन तीन वेळा धुऊन घेऊन सगळा गर गेला असल्याची खात्री करावी. नंतर गाळून घेऊन एखाद्या कागदावर वा प्लेटमधे पसरुन ठेवाव्यात. वाळल्यावर कागदी पाकीटात ठेऊन देऊन वर प्रकार व तारीख वगैरे डिटेल्स लिहून ठेवाव्यात.

मिरची वर्गीय फळं : मिरचीचा जो प्रकार आपण लावला असेल त्यापैकीही प्रत्येकी एक ते दोन रोपं वेगवेगळी ठेऊन देऊन त्यावरील किमान ५ ते ६ पळं बियांसाठी राखून ठेवावीत. आपल्याला अधिक बिया हव्या असतील तर जास्त फळं ठेवावीत. हिरव्या मिरच्या झाडावरच पिकुन लाल होतील. त्यांची वाढ पूर्ण होत आली की त्या सुरकुततील. पूर्ण सुरकुतलेल्या मिरच्यांची सालं जाड होतील. मिरच्या झाडावरच वाळल्या तरी चालेल. अशा वाळलेल्या मिरच्या झाडावरुन काढून घेऊन कागदावर त्यातील बिया काढून घ्याव्यात. हे करताना शक्यतो चमचा वा सुरी वापरावी. उपलब्ध असतील तर हातमोजे वापरावेत. कारण मिरचीचा तिखटपणा हातांना लागतो अन त्याचा त्रास होतो. बिया कागदावर वा प्लेटमधे काढून घेऊन त्या ३-४ दिवस पूर्ण वाळू द्याव्या. अशा वाळलेल्या बिया पिशवीत वा डब्यामधे ठेऊन त्यावर लेबल लिहून वर सांगितल्याप्रमाणं सारा तपशील लिहून थंड, कोरड्या ठिकाणी ठेवाव्या.

शेंग वर्गीय फळं : घेवडा, चवळी, मूग, वाटाणा वगैरे ज्या शेंगवर्गीय भाज्या आहेत त्यांच्या शेंगा जर तुम्ही कोवळ्या असताना भाजीसाठी काढत असाल तर काही शेंगा वेलींवर वा झुडूपांवरच पूर्ण पिकून वाळू द्याव्यात. शेंगा पूर्ण तयार होत असताना तुम्हाला त्या फुगीर दिसतील. म्हणजेच आतले दाणे तयार होत असतील. शेंगा वाळत आल्यावर शेंगांचा वरचा भाग तपकिरी होईल. हाताला अशा शेंगा कडक लागल्यावरच काढून घ्याव्यात. तशाच राहिल्या तर त्या फुटतील अन बिया इतस्ततः पडतील. काढलेल्या शेंगा कुठल्याही खोलगट भांड्यात वा डब्यात वाळण्यासाठी ठेवाव्यात. वरच्या भागावर कापड बांधावं किंवा एखादं झाकण हलकेच ठेवावं जेणेकरुन आत हवा तर जाईल पण वाळताना शेंगा जर फुटल्याच तर बिया बाहेर उडणार नाहीत. शेंगा पूर्ण वाळल्यावर त्या फोडून आतील सशक्त बियाच फक्त एखाद्या हवाबंद डब्यात वा पिशवीत ठेऊन त्यावर लेबल लावुन सारा तपशील लिहावा. काही बिया पोचट वा अशक्त दिसल्या तर त्या फोडून कंपोस्टमधे टाकाव्यात. शेंगा न फोडता ठेवल्यास उत्तम. त्यामुळं हवेचा संपर्क न होता बिया सुरक्षित रहातील.

पालेभाज्या : पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, माठ, लेट्युस वगैरेंचीही काही सशक्त अन निरोगी रोपं तशीच ठेवावीत. वेळ पूर्ण होत असतानाच यांच्यावर तुरे येतील. फुलतील अन नंतर त्यांच्यातच बिया तयार होतील. फुलं येऊन ती वाढू लागल्यावर अशा रोपांवरील पानं निबर होऊ लागतील. भाजीसाठी काढलेल्या कोवळ्या पानांपेक्षा यांची चव काहीशी कडवट असेल. म्हणून पानं काढू नयेत. तसंही बियांचं पोषण होण्यासाठी रोपांवर पानं असणं गरजेचंच असतं. फुलांमधेच बिया असतील. फुलांचा रंग बदलेल. ती वाळू लागतील. रोपही मान टाकू लागेल. बियांचं वजन त्यांच्या दांड्याला पेलवेनासं झाल्यावर ते बाजुला कलंडु लागेल. ज्या रोपांवर म्हणजे उदा. पालक वगैरेंवर अनेक फुलांच तुरा येतो त्या तुऱ्यातल्या खालच्या भागातल्या बिया लवकर पक्व होऊन वाळू लागतात. त्यामुळं खालच्या भागातल्या बिया अथवा फुलं तपकिरी रंगाकडं झुकू लागताच ती काढून घेऊन घरात कागदावर सावलीत पण उजेड पडेल अशा ठिकाणी ठेवावीत. इतर भाज्यांच्या बाबतीत फुल बरंचसं वाळल्यावर ते हलक्या हातानं काढून घेऊन घरात आणुन एखाद्या कागदाच्या पाकीटात ते ठेऊन द्यावं. पाच सहा दिवसांत ते पूर्ण वाळेल. मग हातानं हलकेच चुरगळून बिया काढून घ्याव्यात. इतर कचरा, बीवरची वाळलेली सालं व पाकळ्यांचे तुकडे दूर करावेत. वेगळ्या केलेल्या बिया काढून डबीमधे वा कागदाच्या पाकीटात ठेऊन वर लेबल लावुन बियांची माहिती लिहावी.

वेलवर्गीय भाज्या : दुधी, लाल भोपळा, काकडी, शिराळी, घोसाळी, कारली, पडवळ वगैरेंच्याही बाबतीत थोड्याफार फरकानं असंच असतं. वेलींवर काही फळं ठेऊन देऊन ती पुर्ण तयार होऊ द्यावीत. ज्या फळांमधे पाण्याचा अंश जास्त असतो, उदा. काकडी, कारली, पडवळ, इ. ती फळं निबर झाल्यावर त्यांना बाहेरुन हलक्या हातानं छेद देऊन आतला गर काढून घेऊन तो एखाद्या भांड्यात घेऊन आतल्या बियांपासून गर वेगळा करुन घ्यावा. भांड्यात राहिलेल्या बिया एक दोन वेळा धुऊन घेऊन, वर तरंगणाऱ्या बिया काढून टाकाव्यात. खाली राहिलेल्या बिया कागदावर वाळत ठेवाव्यात. वाळल्यावर त्या कागदाच्या पाकिटात ठेऊन वर नोंद करुन ठेवावी.

दुधी, शिराळी, घोसाळी वगैरेंची निबर फळं वेलींवरुन तोडून घेऊन वाळवावी. काही दिवसांतच यातला गरही वाळून जातो अन आतमधे वाढ होत असताना तया झालेल्या शिरा उरतात. अशी वाळलेली फळं हलवुन पाहिल्यास आतल्या बियांचा आवाजही येतो. अशी वाळलेली फळं तशीच ठेऊन दिल्यास बिया खराब होत नाहीत. पुढील लागवड करताना ही वाललेली फळं फॊडून आतल्या बिया घ्याव्यात. तसं करायचं नसेल तर बिया काढून घेऊन त्या कागदाच्या पाकिटात ठेऊनही देऊ शकता.

इतर भाज्या, कंदमुळं प्रकारातल्या भाज्यांच्या बिया घेण्यासाठीही ती वेगळी ठेवुन पूर्ण तयार होऊ द्यावीत. अशा रोपांची पानं वा मुळं खाण्यासाठी घेऊ नयेत. यथावकाश यांच्यावर फुलं येऊन, परागीभवन होऊन शेंगा अथवा फुलांचे गुच्छ तयार होतात. ते वाळू लागताच काढून घेऊन पूर्ण वाळू देऊन सावकाश बिया काढून घ्याव्या. आपण साठवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया या एकत्र करु नयेत. मोठ्या फळांच्या बिया मोजक्याच असतील तरीही त्य़ासाठी वेगळी पिशवी वा डबी वापरावी.

भेंडी, गवार सारख्या भाज्यांची काही फळं रोपांवर तशीच निबर होऊन वाळू द्यावी. भेंडीच्या टोकाकडची बाजू विलग होऊ लागताच अशा भेंड्या काढून घेऊन दोरा बांधून वा रबर बॅंड लाऊन वाळवत ठेवाव्या. गवारीच्या शेंगाही काढून वाळवत ठेवाव्या. वाळल्यावर जेव्हा हव्या तेव्हा आतील बिया काढून पेराव्या.

साधारणतः परसबागेत लावल्या जाणाऱ्या जवळपास सर्वच भाज्यांच्या बिया कशा साठवाव्या यावर वर लिहिलं आहे. कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली यांच्या बिया साठवणं खुप जिकिरीचं काम असतं अन ते एका सीझनमधे होत नाही. अन म्हणूनच त्यावर लिहिलं नाही. याव्यतिरिक्त काही प्रकार असल्यास अन त्याची माहिती हवी असल्यास तसं विचारावं. आशा आहे की वर दिलेली माहिती आपणांस उपयोगी ठरेल.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...