बागेतील रोपांवरील रोग व कीड
भाग १
प्रस्तावना
आपण आपल्या बागेत विविध प्रकारची झाडं लावत असतो. फुलझाडं, फळझाडं तसंच विविध प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या. या साऱ्यांपैकी काही सीझनल झाडं असतात तर काही बहुवर्षायु. काहींचं जीवन एकदाच फुलुन वा फळं देऊन संपून जातं तर काही अनेक वर्षं आपल्या बागेत असतात. ऋतुप्रमाणं जशी फुलं वा फळं येतात तशीच ऋतुप्रमाणं या झाडांवर कीड पडत असते तर काही रोगही पडत असतात. आपण कितीही काळजी घेतली तरीही बरेंचदा कीड येणं अन रोग पडणं मात्र आपण टाळू शकत नाही. या लेखात आपण अशा किडी व रोगांविषयी जाणून घेणार आहोत. लेखनमर्यादेमुळं अन लेखांत सुटसुटीतपणा येण्यासाठी म्हणून लेखाचे जसे भाग केले आहेत तसंच कीड अन रोग असेही दोन प्रमुख भाग केले आहेत.
सर्वप्रथम आपण कीड वा रोग हे का पडतात याची कारणं जाणून घेऊया. रोप वा झाड हे कमकुवत असेल, त्याला वेळच्यावेळी सुयोग्य असा आहार मिळत नसेल, त्याची वाढ सुदृढ होत नसेल तर ते रोगाला हमखास बळी पडतं. तसंच बागेत स्वच्छता नसेल, काडीकचरा इतस्ततः पडला असेल, त्यात पाणी मुरत असेल तर अशा ठिकाणी बुरशीजन्य कीड जन्माला येऊन ती वाढते अन त्यांना जेव्हा आहाराची गरज पडते तेव्हा ते बागेतील झाडांकडं मोर्चा वळवतात. सुरुवातीला आपल्या हे लक्षात येत नाही. पण जेव्हा येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. वनस्पतींमधला रस हाच या किडींचा आहार असतो. ते त्यावरच जगत असतात. त्यांच्या या रसशोषणामुळं आपण दिलेल्या खतपाण्याच्या मदतीनं वनस्पतींची कितीही चांगली वाढ झाली तरी त्यांच्यात फुलण्याची अन फळण्याची ताकद रहात नाही. आलीच काही फुलं अन फळं तर तीही रोगट निघतात, यासाठीच बाग नियमितपणं स्वच्छ ठेवणं अत्यंत गरजेचं असतं.
त्याप्रमाणंच कुंड्यांमधे वा जमिनीवरच्याही झाडांच्या मुळाशी जास्त पाणी साचुन रहात असेल, पाण्याचा योग्य निचरा होत नसेल तरीही मूळकूज, हुमणी यांसारखे रोग अन कीड यांचा त्रास होत असतो. जास्त पाणी म्हणजे झाड उत्तम बहरतं हा बरेचजणांचा गैरसमज असतो. त्यामुळं कित्येकजण अगदी पावसाळ्यात पाणी पडतं त्याप्रमाणं झाडांवर पाण्याचा वर्षाव करत असतात. झाडाची पाण्याची गरज ओळखून त्याप्रमाणं अन तेवढंच पाणी देणं हेच योग्य असतं.
काही बियाणंही रोगट असतात. अशी बियाणं आपल्या साध्या नजरेला रोगट दिसतही नाहीत. त्यामुळं तज्ञ सांगतात त्याप्रमाणं बियाणं लावण्यापूर्वी ती निर्जंतुक करुन घ्यावीत. गोमुत्र, जीवामृत, वेस्ट डिकंपोजरचं द्रावण यापैकी जे काही असेल त्यात ती भिजवुन मगच लावावीत. ट्रायकोडर्मा वगैरेंसारख्या पावडरीमधेही ती भिजवुन घ्यावीत. केवळ बियाणंच नव्हे तर रोपं पुनर्लावडीसाठी घेतानाही अशाच प्रकारे ट्रीटमेंट करुन लावावीत. म्हणजे कीड वा रोग पडण्याची बहुतांश कारणं वेळच्यावेळीच दूर केली जातात.
विकतची सेंद्रीय खतं वा घरी केलेलं कंपोस्ट वगैरेंमधेही कीड असते किंवा किडींची अंडी असतात. अशी कीड वा अंडी, आपण रोपांना ती दिल्यावर अन पाणी घातल्यावर कार्यरत होतात अन स्वतः जिवंत रहाण्यासाठी झाडांचं शोषण सुरु करतात. यासाठी घरचं कंपोस्ट पूर्णपणं तयार झाल्याशिवाय अन ते थंड झाल्याशिवाय म्हणजेच त्याची क्युअरिंग स्टेज पूर्ण झाल्याशिवाय वापरण्यास घेऊ नये. विकत घेतलेली सेंद्रीय खतंही, उदा. शेणखत, नीमपेंड, बोनमील, स्टेरामील इत्यादी घरी आणल्यावर काही दिवस सावलीत उघडी करुन ठेवावीत अन मगच वापरायला घ्यावीत. इतर खतं देतानाच त्यासोबतीनं नीमपेंड जरुर द्यावी. तसंच ट्रायकोडर्मा वा तत्सम मित्रबुरशी पावडर मिसळावी. म्हणजे खतांत असलेली त्रासदायक कीडीचा नायनाट होईल.
बागेत कुंड्या ठेवतानाही झाडांची दाटी होईल अशा ठेवू नयेत. त्यातही एकाच प्रकारची झाडं जवळ जवळ ठेवू नयेत. कीड अन रोगांमधेही प्रकार असतात. प्रत्येक रोग वा कीड हे ठराविक प्रकारच्याच झाडांवर येत असतात. काही आजार वा कीड सामायिक असतीलही. पण टोमॅटोवर पडणारी कीड कोथिंबीरीवर पडणार नाही. वांग्यावर पडणारी कीड भेंडीवर सापडणार नाही. यासाठी अन रोगांचा वा किडींचा प्रसार मर्यादित ठेवण्यासाठी एकाच जागी समसमान रोपांच्या कुंड्या ठेवणं शक्यतो टाळावं.
किडींवर वा रोगांवर औषधं नक्कीच आहेत, सेंद्रीयही आहेत अन रासायनिकही आहेत. पण शक्यतो ती वेळ येऊच नये म्हणून एक तर आपणच काळजी घ्यावी अन कीडीला निसर्गतःच विरोध करतील अशी झाडं मुख्य झाडाच्या कुंडीत वा आळ्यात लावावी. जेणेकरुन किडीचं निर्मूलन वा नियंत्रण नैसर्गिक रित्याच होईल अन आपलं नुकसान होणार नाही.
इथुन पुढं ही लेखमालिका दोन प्रमुख भागात विभागुन देण्यात येईल. पहिला भाग म्हणजे वनस्पतींवर पडणारे रोग अन दुसरा भाग म्हणजे विविध प्रकारची कीड. याबाबतीत सर्वंकष माहिती देण्याचा प्रयत्न राहीलच. पण कुठं काही त्रुटी असल्यास वा कुणी अन्य अन जास्त परिणामकारक उपाय करत असतील त्यांनी कमेंटमधे तसं लिहिण्यास हरकत नाही. आशा आहे की नवोदित बागकर्मींसाठी अन कुंडीकऱ्यांसाठी ही नवी मालिका उपयोगी पडेल.
क्रमशः
©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा