काकडी कडू कशी होते?

काकडी कडू कशी होते?



बरेंचदा आपण पहातो काकडी खाताना कडू निघते. त्यातही दोन्ही टोकं कडू निघण्याचं प्रमाण अधिक असतंच पण संपूर्ण काकडीही कधीकधी कडू निघते. आधी आपण काकडी कडू कशी अन कधी होते ते पाहूया.

काकडी, शिराळी/दोडकी, सर्व प्रकारचे भोपळे, कारली, हे सगळे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. कुकुर्बिट फॅमिली नांव या कुटुंबाचं. या कुटुंबाचं एक नैसर्गिक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फळ चवीला जरी वेगवेगळं अन काही प्रमाणात वेगवेगळ्या गुणधर्मांचं असलं तरी वेलींच्या वाढीपासून ते फळं तयार होऊन काढेपर्यंत, म्हणजे वेलीच्या संपूर्ण आयुष्यात त्यात एक कडवट रसायन असतं. कुकुर्बिटासिन हे त्याचं नांव. हे रसायन संपूर्ण वेलीला कडवट ठेवतं. याचं कारण म्हणजे वेल ऐन भरात असताना कुठल्याही प्राण्यानं अथवा गायी-गुरांनी खाऊ नये म्हणून निसर्गानं घेतलेली खबरदारी असते ही.

हे कुकुर्बिटासिन साधारणपणे वेलीचं खोड अन पानं यांपुरतंच मर्यादित असतं. पण कधीकधी ते फळांमधे उतरतं अन ते तिथंच मुक्काम करतं. पण ते शक्यतो फळांच्या दोन्ही टोकांकडेच जाऊन थांबतं. संपूर्ण फळभर व्यापून रहात नाही. प्रत्येक गोष्टीला जसे अपवाद असतात तसेच या गोष्टीतही आहेत. अन म्हणूनच कधीकधी अख्खी काकडी अथवा दोडका कडू निघतो. लाल भोपळ्यांत हे फारच क्वचित दिसतं. कदाचित त्याचा आकार अन हे रसायन यांचं गुणोत्तर पहाता तो कडवटपणा आपल्याला जाणवत नसावा.

असं होण्याचं कारण म्हणजे वाढीदरम्यान वेलीला ताण सहन करावा लागला तरच कडवटपणा जास्त प्रमाणात येतो. कधी संपूर्ण काकडी कडू तर कधी मधला भाग वगळता इतर भागात ती कडू निघते. आता ताण म्हणजे काय? तर, अती थंडी. अती उन्ह, दिवसा तीव्र उन्ह अन रात्री थंड हवामान, वेलीला मार लागणं (हे होण्याचं कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीनं सर्रास टूजी अन थ्रीजी कटींग करणं.) वेलीला पाणी कमी पडून ती वाळू लागणं. अन्नद्रव्य, त्यातही प्रामुख्यानं नत्र कमी पडणं, पानांवर बुरशीजन्य रोग पडणं वगैरे वगैरे.

आपण हे सगळं टाळू शकतो. अगदी हवामानावरही काही प्रमाणात मात करु शकतो. (पॉलीहाऊसमधे हवामान कंट्रोल केल्यामुळं तिथं उत्पादन घेतलेल्या काकड्यांमधे कडवटपणाचं प्रमाण अगदीच नगण्य असतं) वेल असलेली जागा स्वच्छ ठेवणं, खतपाणी वेळच्या वेळी देणं, शेंडा मारणं, म्हणजेच आधुनिक भाषेत टूजी अन थ्रीजी कटींग काळजीपूर्वक करणं, वेल फुलांवर असताना अन फळं भरताना खताची अन अन्नद्रव्यांची कमतरता भासू न देणं. वेलीवर छोटी फळं असताना तयार झालेली फळं हातानं तोडताना वेलीला धक्का बसणं टाळावं. तयार फळं वेलीवरुन काढताना नेहमी हलक्या हातानं अन कात्री वा कटर तेही धारदार वापरावेत. वरचेवर वेलींचं निरिक्षण करुन कसलाही रोग नाही, अगदी फळमाशीही नाही याची खात्री करणं अन दिसलीच लक्षणं तर वेळ न घालवता उपाय करणं. हे सगळं केलंत तर सालासह काकडी खाऊ शकाल.

आता मुख्य प्रश्न, काकडीकडे नुसतं पाहून ती कडू आहे हे कसं ओळखायचं? तर यासाठी काही ठोस असा रामबाण उपाय नाही की उघड लक्षणं नाहीत. ठोकताळा म्हणजे काकडीवर असलेले डाग किंवा काटेरी असणं, फळाचा आकार विकृत असणं, वगैरे असल्यास ते फळ कडू असण्याची शक्यता जास्त असते. आता काही अनुभवी शेतकरी नुसत्या नजरेनं कडू काकडी कशी ओळखत असतील हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. कारण आजही आपल्याकडे असे शेतकरी आहेत जे गाढवाच्या कानांची स्थिती अन कावळ्यानं घरटं किती उंचीवर अन कुठल्या झाडावर बांधलंय हे पाहून पाऊस केव्हा येईल अन किती येईल हे सांगतात अन ते शंभर टक्के खरं निघतं. फक्त दुर्दैवानं हे कुठंच लिहिलेलं सापडणार नाही.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...