बागेतील मश्रूम्स (अळंबी) काय़ दर्शवितात
कुंडीतील अथवा जमिनीतील बागेमधे पावसाळ्यात ठिकठिकाणी मश्रूम्स उगवलेले दिसतात. साधारणपणं पाऊस सुरु होऊन महिना झाल्यावर म्हणजे माती पूर्णपणं ओली झाल्यावर अचानक आपली नजर कुंड्यांमधे वा जमिनीवर, झाडांच्या आळ्यांमधे उगवलेल्या विविध रंगांच्या अन आकारांच्या अळंब्यांकडे जाते. कधी त्या बॉलपेनाच्या रिफीलच्या आकाराच्या दांड्यांवर रुपयाच्या नाण्याएवढ्या आकाराच्या काळपट पांढऱ्या असतील किंवा कधी तपकिरी रंगाच्या तर कधी पावासारख्या फुगलेल्या अन मध्यभागी एक दीड इंची व्यासाचा दांडा असलेल्या पिवळट रंगाच्या असतील. कधी पाच सहा इंचांच्या असतील तर कधी बोटभर वा त्याहुनही कमी उंचीच्या असतील. पाऊस कमी झाल्यावर या आपोआप निघुनही जातात किंवा जास्त पाऊस पडल्यास जागीच कुजुन जात मातीत मिसळुनही जात असतात. पण तरीही, आपण न पेरता किंवा काहीही न करता या अळंब्या किंवा मश्रूम्स बागेत येतात कुठून? काय कारण असतं? किंवा यांचा बागेसाठी उपयोग असतो की बागेला वा झाडाला यांच्यापासून अपाय होतो का? पाहूया आपण पुढं.
अळंबी हा बुरशीचाच एक प्रकार आहे. जमिनीवर पडलेल्या फांद्या, वाळलेली पानं, काटक्या, ज्या ज्या काही कुजणाऱ्या गोष्टी आहेत, डिकंपोज होणाऱे घटक आहेत त्यांचं विघटन करण्यासाठी निसर्गात जे काही घटक आहेत त्यांपैकीच बुरशी हाही एक घटक आहे. कुंडीत अथवा जमिनीवरील बागेमधील झाडांच्या बुंध्याशी आपण उन्हाळ्यात जेव्हा मल्चिंगसाठी पालापाचोळा, लाकडाच्या ढलप्या, वाळलेला काडीकचरा घालत असतो तसंच आपण बागेत जर वाफे केले असतील अन या वाफ्यांमधेही भरपूर पालापाचोळा व वाळलेल्या फांद्यांचे तुकडे वगैरे घातलं असेल तर हे सगळं कुजताना बुरशी तयार होऊन ती या सगळ्यातले मोठे भाग कुजवण्याच्या कामाला लागते. चार दोन पाऊस झाल्यावर सगळीकडे ओलावा निर्माण झाल्यावर ही बुरशीही वाढीला लागते.
वाढीदरम्यान या बुरशीची टोकं ओल्या झालेल्या मातीबाहेर येऊन डोकावतात. जसं एखाद्या झाडाला फळं लागतात तशीच ही बुरशीची फळं असं म्हणता येईल. कारण जमिनीच्या पृष्ठभागावर आलेल्या या अळंब्या तोडल्या तरी आत, वरच्या थराच्या खाली असलेल्या बुरशीला काहीही अपाय होत नाही. ती तिचं काम करतच असते. या अळंब्यांच्याद्वारे ती आपल्या बिया ज्या सामान्य नजरेला दिसतही नाहीत त्या पसरवत असते अन त्याद्वारे आपला प्रसारही करत असते. अशा बिया अशाच कुठल्यातरी जागी जाऊन रुजतात जिथं ओलावाही आहे अन त्यांना खाण्यासाठी पुरेसं अन्नही आहे.
बागेतील एखाद्या ठिकाणी आपण ना वाफा केलेला असतो ना कुठला विघटनशील पदार्थ तिथं पडलेला असतो. तरीही अशा ठिकाणी आपल्याला अळंब्या दिसून येतात. पण अशा ठिकाणी जर खणून पाहिलं तर एखाद्या तोडलेल्या झाडाचा बुंधा किंवा मोठी मृत मुळं सापडतील. ती कुजुन मातीमधेच मिसळणार असतात. पण त्य़ासाठी त्यांचं विघटन होणं गरजेचं असतं अन तेच काम तिथं तयार झालेली बुरशी करत असते अन अशाच बुरशीचं फळं मातीतुन जागा मिळताच वरच्या भागात येऊन आपल्याला अळंबीच्या स्वरुपात दिसते. बागेतील मातीमधे अशी बुरशी तिला जोपर्यंत खाद्य मिळत राहील तोपर्यंत वर्षानुवर्षं असते. योग्य ओलावा अन वातावरण मिळाल्यावर तिचा फळस्वरुप कोंब बाहेर येऊन आपल्याला अळंबीच्या रुपात दिसतो.
बागेमधे अळंब्या असणं हे माती चांगली असण्याचंच लक्षण असतं. मातीमधे भरपूर सेंद्रीय द्रव्यं असुन त्यामधे रोपांना अन झाडांना सहज घेता येण्यासारखी पुष्कळ अन्नद्रव्यं उपस्थित आहेत हेच अळंब्यांच्या असण्यानं सिद्ध होत असतं. ज्याप्रमाणं मातीमधे गांडूळं असणं हे एक माती उत्तम प्रतीची असण्याचं लक्षण आहे त्याप्रमाणंच अळंबी असणं म्हणजेही मातीची प्रत उत्तम असल्याचं द्योतक आहे.
जर कुंड्यांमधे अथवा जमिनीवरच्या झाडांच्या आळ्यांमधे अळंब्या उगवल्या असतील तर त्यापासुन तुमच्या झाडाला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. उलट त्यांच्या असण्यामुळं झाडांना पोषक तत्वं अन अन्नद्रव्यं सहजी उपलब्ध होतील. त्यामुळं अशा अळंब्या काढण्याचा चुकुनही विचार करु नका. अन जर काढायच्याच असतील तर एक तर त्या जागेवरच दाबुन मातीमधे मिसळून द्या किंवा काढून कंपोस्टबिनमधे टाका. त्यांच्यामुळं कंपोस्टींगची प्रक्रिया जलद होण्यास मदतच होईल. अर्थात मातीवर दिसणारी अळंबी काढली म्हणजे मातीखालची बुरशी जात नसते. ती तशीच तिथं राहुन आपलं काम करत रहाते. अर्थात अळंब्या काढल्या तर त्यांच्याद्वारे होणारा प्रसार थांबुन नवीन ठिकाणी बुरशी तयार होणार नाही अन तिथं कालांतरानं अळंबीही उगवणार नाही. पण शक्यतो असं करु नये. वर सांगितल्याप्रमाणं अळंब्या बागेत असणं हे बागेसाठी फायद्याचंच आहे.
त्यापेक्षा उत्तम उपाय म्हणजे बागेत पाणी साचू न देणं. माती जास्त ओलसर राहिली तरच अळंब्या उगवत असतात. त्यामुळं जिथं अळंबी आहे तिथं पाणी जास्त आहे हे नक्की. त्यामुळं अशा जागी पाणी साचत असेल तर ते का अन निचरा होत नसेल तर काही उपाय करायची गरज आहे का ते पहावं.
प्रत्येक अळंबी किंवा मश्रूम हा खाण्याजोगाच असतो असं नाही. बुरशीचे काही प्रकार विषारीही असतात. त्यामुळं जर तुमच्याकडं लहान मुलं असतील किंवा ज्यात त्यात नाक खुपसणारी कुत्री वा इतर पाळीव प्राणी असतील तर त्यांना अशा अळंब्यांपर्यंत पोहोचू देऊ नका. ते ऐकत नसतील तर मात्र अळंब्या काढणं हाच एकमेव उपाय आहे. खाण्यासाठी लावण्यात येणाऱ्या अळंब्या वेगळ्या असतात. हवं असल्यास त्यांच्या लगवडीविषयी माहिती काढून त्या योग्य जागी लावाव्यात. पण पावसाळ्यात वा अतीओलसरपणामुळं आपोआप आलेल्या अळंब्या कुठल्याही परिस्थितीत खाऊ नये.
पपई वगैरेसारख्या ज्या झाडांमधे रूटरॉटचा म्हणजे मुळं कुजण्याचा धोका असतो त्या झाडांच्या मुळाशी वा आळ्यात जर अळंब्या असतील तर अशा ठिकाणची माती खुरप्यानं काळजीपूर्वक खुरपुन मोकळी करुन घ्यावी. ओलसरपणा जास्त असेल तर कोरडी माती वा तत्सम काही लगेच टाकावं जेणेकरुन अधिकचा ओलसरपणा निघुन जाईल.
एकंदरीत पहाता बागेत मश्रूम्स असणं हे आपली माती सुपीक असल्याचंच लक्षण आहे. त्यामुळं मश्रूम्स काढून न टाकता त्यांना तसंच राहु दिलं तरी काही बिघडत नाही. फक्त अतीओलसरपणामुळं आपल्या मुख्य झाडाला काही त्रास होणार नाही ना याची काळजी घ्या.
©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya
छान माहिती. कृपया पावसाळ्यात सतत पाऊस असताना खते कोणती व कशी द्यावी याची माहिती द्यावी
उत्तर द्याहटवानक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.
उत्तर द्याहटवा