झाडांची खतांची भूक
आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक खतं टाळणं हेच तर असतं. खतं सेंद्रिय असली तरी बहुतांश खतं आपण विकत घेतो. काही बागकर्मी कंपोस्ट अन गांडूळखत जरी घरी करत असले तरी त्यासाठी अनंत कष्ट तर घ्यावे लागतातच पण ती तयार होण्यासाठी बराचसा वेळही खर्च करावा लागतो. मग अशा खर्चिक गोष्टी आपण अगदी काटकसरीनं नाही, पण योग्य प्रमाणातच वापरायला हव्यात. ज्या झाडांची, मग त्या भाज्या असोत की फुलझाडं, फळझाडं असोत की वेली, प्रत्येकाला असलेल्या खतांच्या भूकेनुसारच आपण त्यांना खतं द्याय़ला हवीत. सेंद्रीय खतं जास्त प्रमाणात दिली गेल्यास नुकसान जरी काही होत नसलं तरीही ते जास्तीचं खत ज्या झाडाची भूक जास्त असेल त्या झाडाला वेळीच मिळालं तर आपल्यालाच फुलं अन फळं जास्त मिळणार आहेत. मग त्यानुसार आपण खतांचं नियोजन का करु नये?
कंपोस्ट हे खत आहे की जमिनीची सुपीकता वाढवणारा एक घटक आहे हा वादचा मुद्दा आहे. परंतु निव्वळ कंपोस्टमधे झाडांना वाढीसाठी अन फळण्या-फुलण्यासाठी लागणारी सारीच जीवनसत्वं, अन्नद्रव्यं नसतात. त्यामुळं झाडाच्या पूर्ण वाढीसाठी सेंद्रीय खतं जी प्राण्यांच्या विविध उत्सर्गांपासुन तयार केली जातात ती वापरायला हवी. अशा खतांसोबत मातीमधे कंपोस्ट दिलं गेल्यास या खतांचं विघटन अन झाडांच्या मुळांना ते विघटीत स्वरुपात घेणं शक्य होतं. म्हणून महिन्यातुन एकदा किंवा खत देण्याच्या प्रत्येक वेळी कुंडीच्या आकारमानानुसार कंपोस्ट दिल्यास दिलेलं खत कारणी लागतं. कारण शेणखत वा बोनमील आपल्याला हव्या त्या रुपात बदलुन घेणं मुळांना शक्य नसतं. हे काम कंपोस्टच करु शकतं किंवा अन्य कुठले जीवाणूंचे स्त्रोत असलेलं खत करु शकतं, उदा. गुळपाणी वा गुळ अन ताक यांचं मिश्रण वगैरे.
बाग जर जनिमीवरची असेल तर खतांचा एवढा विचार वा प्लानिंग करण्याची फारशी गरज नसते. आपापल्या भुकेप्रमाणं झाडं जमिनीत अन्नाच्या शोधात आपली मुळं खोलवर वा इतस्ततः पाठवत असतात अन त्यांना हवी ती अन्नद्रव्यं ती मातीमधुन मिळवत असतात. जमिनीवरच्या बागेत वर्षातुन दोनवेळा म्हणजे पावसाळ्याच्या आधी अन हिवाळा संपत असताना झाडाचं वय अन पसारा याचा विचार करुन शेणखत दिलं की तेवढं पुरेसं होत असतं. पाऊस अन एरवी वरुन दिलेलं पाणी यावर बागा फुलत अन फळत रहातात. परंतु गच्चीवरची बाग वा कुंड्यांमधे लावलेल्या बागेला मात्र वरुनच खतं द्यावी लागतात. खतं मग ती अन्नद्रव्यं असो की खुराक असो, आवश्यकतेनुसार दिली तरच त्याचा सुयोग्य किंवा ज्याला ऑप्टिमम वापर म्हणतात ते होईल. अर्थात बागांच्या दोन्ही प्रकारांत जमीन अन पॉटिंग मिक्स सुपीक असेल तर खतांची फारशी गरजही पडत नाही. फक्त कुंडीमधल्या बागेत दिलेल्या पाण्यासोबत बरीचशी खतं वापरली गेल्यामुळं किंवा वापर न होता वाहून जात असल्यामुळं आपल्याला नियमितपणं खतं द्यावी लागतात.
सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जी झाडं फळं देतात, मग त्या फळभाज्या असोत की केवळ फळं, अशा झाडांना जास्त खाद्याची गरज असते. यांच्या तुलनेत जी झाडं केवळ फुलझाडंच आहेत वा केवळ शोभेची झाडं आहेत त्यांची भूक मध्यम असते. अशा झाडांचा जेव्हा फुलण्याचा हंगाम असतो त्याआधी दिलेली खतं त्यांना हंगामभर फुलण्यासाठी पुरेशी होत असतात. अर्थात, जी झाडं वर्षभर फुलत असतात त्यांना मात्र वेळोवेळी खतं देणं गरजेचं असतं. वेळीच मिळणारा चौरस आहार झाडांची तब्येत गुटगुटीत अन निरोगी ठेवण्याच्या दृष्टीनं महत्वाचा असतो. अशा झाडांवर सहसा रोग पडत नाही अन पर्यायानं कीटकनाशकांवरचा खर्च अन वेळ दोन्हीही वाचतं.
खतं मग ती सेंद्रिय असोत की रासायनिक, ती मुळांना खाण्यायोग्य असतील तेव्हाच ती झाडांना मिळतात अन तेव्हाच त्या खतांचा झाडांवर झालेला परिणाम आपल्याला दिसतो. सेंद्रिय खतांच्या तुलनेत रासायनिक खतं पाण्यात लवकर विरघळतात अन ती मुळांना घेण्यासाठी लवकर उपलब्ध होत असतात. सेंद्रिय खतं ही मुळांना खाण्यायोग्य अवस्थेत पोहोचण्यासाठी पुष्कळ वेळ लागतो. एक तर सेंद्रिय म्हणून दिलेल्या पण डिकंपोज न झालेल्या कुठल्याही गोष्टी, उदा. केळीची सालं, अंड्याची टरफलं वगैरे गोष्टी पूर्णतः डिकंपोज झाल्याशिवाय मुळांना घेता येत नाहीत. म्हणून अशा कुठल्याही गोष्टी आधी कंपोस्टमधे घालून त्याचं पूर्णपणे कंपोस्ट करुन घेऊन मगच ते झाडांना द्यावं. हवं तर झाडांचं ऍसिडिक अन अल्कलाईन असं विभाजन करुन त्याप्रमाणं कंपोस्ट बनवावं किंवा सरसकट एकाच प्रकारचं कंपोस्ट बनवुन ते झाडांना त्या त्या प्रमाणात द्यावं.
झाडांना कोणती खतं द्याय़ची यासोबतच तितकंच, किंबहुना जास्त महत्वाचं काय असेल तर ती द्याय़ची कशी. झाडाच्या खोडापाशी खतं देणं अन आपल्या पोटावर मध्यभागी कच्चे डाळ-तांदूळ ठेवणं दोन्हीही सारखंच. अशा प्रकारे खतं दिली तर झाडाची अन आपली भूक भागणं केवळ अशक्य. म्हणून खतं जर द्रवस्वरुपात असतील तर ती पानांवर फवारावी किंवा कुंडीतील झाडांना खोडापासून काही अंतर सोडून मातीमधे बांगडी पद्धतीनं म्हणजे गोलाकार द्यावीत. अशी खतं दिल्यावर लगेचच पाणी देऊ नये. म्हणजे ती खतं पाण्यासोबत वाहून जाणार नाहीत. गांडूळखत, शेणखत आदी घनरुपातील खतं जमिनीवरच्या अन कुंडीमधल्या बागेत खोडापासून काही अंतर सोडून गोलाकार पद्धतीनं, माती थोडी बाजुला करुन त्यामधे घालावी अन माती पुर्ववत सारखी करावी. वरुन लगेचच माती ओलसर होईल एवढंच पाणी देऊन ही खतं मातीत मिसळण्याची प्रक्रिया सुरु करुन द्यावी. पूर्णतः डिकंपोज झालेले किंवा कुजलेले खत मातीत मिसळून जाण्यास किमान २ ते ४ आठवडे लागतात. त्यामुळं आधी दिलेलं खत पूर्णपणं मातीमधे रुपांतरित झालं नसेल तर पुन्हा खत देऊ नये. जसं आपण तोंडात घेतलेला घास चर्वणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अन ९०%-९५% भाग घशाखाली उतरल्याशिवाय दुसरा घास घेत नाही तसंच. काही कारणानं खत देण्याच्या दोन हप्त्यांमधला कालावधी वाढला असेल तर खत देताना ती घनस्वरुपात देण्याऐवजी द्रवस्वरुपात दिल्यास ती मुळांना घेण्यासाठी लवकर उपलब्ध होतील.
सर्वसाधारणपणं प्रत्येक बागेत जी झाडं असतात वा ज्या भाज्या लावल्या जातात त्यांचं आपण तीन भागांमधे वर्गीकरण करुया. एक म्हणजे खतांची जास्त भूक असलेली झाडं, दुसरा मध्यम भूक असलेली झाडं अन तिसरा म्हणजे अल्प भूक असलेली झाडं. या प्रकारांमधे जी नांवं खाली दिली आहेत ती सर्वसमावेशक नसुन ती झाडांच्या वेगवेगळ्या प्रजाती, वाण, हवामान, पाऊसमान, माती, पाणी यानुसार बदलू शकते. काही झाडं ही या तीन प्रकारांमधील कुठल्याही दोन प्रकारांमधील सीमारेषेवर असतात. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवणं गरजेचं आहे अन ते म्हणजे झाडांचा फुलण्या-फळण्याचा सीझन जेव्हा असतो तेव्हा त्या सीझनभर त्यांची खतांची अन अन्नद्रव्यांची गरज ही परमोच्च असते. अगदी आपल्यासारखंच. आपल्याही वाढीच्या अन कष्ट करण्याच्या काळात आपला आहार जास्तही असतो अन पौष्टिकही असतो. तरच आपण कष्टाची कामं विनासायास करु शकतो. जसं आपण वृद्धत्वाकडं झुकत जातो तसा आपला आहार कमी होत जातो, अगदी तसंच झाडांचंही आहे. तेव्हा हे सारं लक्षात ठेवूनच खतांचं अन त्यांच्या वारंवारिता व प्रमाण यांचं नियोजन करावं. झाडं लावलेली माती, मग ती जमिनीवरच्या बागेत असो की कुंडीमधल्या, जर ती सुपीक अन अन्नद्रव्यांनी युक्त असेल तर वरखतांची गरज जास्त भासत नाही. खासकरुन बहुवर्षीय झाडं अन ज्या झाडांची खतांची गरज अल्प वा काहीशी मध्यम आहे त्यांना वरखतांची फारशी गरज नसते.
जास्त भूक : टोमॅटो, कोबीवर्गीय पिकं म्हणजे कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, टरबूज, मिरची, पालक, काकडी, कारली, पडवळ, वांगी. दुधीभोपळा, लाल भोपळा, भेंडी, कलिंगड, पपई, केळी, पेरू, लिंबू व इतर लिंबूवर्गीय फळझाडं, आंबा, नारळ, अळू, आलं, हळद, गुलाब, कमळ, कुमुदिनी, रेन लिली वगळता सर्व लिली प्रकार, वगैरे.
मध्यम भूक : मका, लसूण, लेट्युस, बटाटा, मुळा, गवार, कोथिंबीर, सीताफळ, अनंत, मोगरा, काजू, चिकू, सोनटक्का, प्राजक्त, सदाफुली, जास्वंद, वगैरे.
अल्प भूक : चवळी व अन्य शेंगवर्गीय वेली, बीट, गाजर, वाटाणा, कांदा, कढीपत्ता, सुरण, शेवगा, पुदीना, अननस, रताळी, चाफा, कवठी चाफा, सोनचाफा, शेवंती, रेन लिली, बकुळ, गोकर्ण, वगैरे.
गच्चीवर बाग असलेल्यांनी या यादीनुसार व आपल्या अनुभव अन निरिक्षणानुसार ही झाडं असलेल्या कुंड्यां एकत्र वा जवळजवळ ठेवल्यास झाडांच्या गरजेनुसार खतं देता येतील. त्यानुसार वेळ व दिवस ठरवता येईल. त्यामुळं वेळ अन कष्ट तर वाचतीलच. पण एखाद्या झाडाला गरज नसताना जास्त खत दिलं जाणार नाही किंवा गरज असतानाही खत दिलं नाही असं होणार नाही. दुसरं म्हणजे हे जे वर्गीकरण केलं आहे त्याप्रमाणं आपली खताची मात्रा अन दोन हप्त्यांमधला कालावधी ठरवावा. अर्थात जास्त भूक म्हणजे अख्खं ताट भरुन अन्न वाढायचं असं नव्हे तर झाडाच्या वयानुसार अन कुंडीच्या आकारानुसार खताची मात्रा अन ते देण्याचा कालावधी हे ठरवायचं आहे. अपचन किंवा अजीर्ण हे फक्त आपल्यालाच होतं असं नव्हे तर ते झाडालाही होत असतं.
घनस्वरुपामधली खतं दिल्यावर झाडांना लगेचच पाणी देणं गरजेचं असतं. अन्यथा खतांमधील उष्णतेमुळं मुळं जळून जाण्याची शक्यता असते. यासाठी खतं दिल्यावर पुढचे चार ते पाच दिवस कुंडीमधली माती ओलसर राहील याची काळजी घ्यावी लागते. ज्या खतांमधे नत्र जास्त प्रमाणात आहे अशी खतं दिल्यावर तर पाणी देणं टाळू नये. नत्र जास्त झाल्यास मुळं जळतात.
आशा आहे की या लेखानुसार अन मुख्य म्हणजे आपापल्या अनुभव अन निरिक्षणानुसार तुम्ही खतांचं नियोजन कराल अन कमी कष्टांत आपल्या बागेतुन जास्त उत्पादन घ्याल.
©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya