घरच्या बागेतल्या कुंडीत पिकवा भुईमूग.

घरच्या बागेतल्या कुंडीत पिकवा भुईमूग.



तुमची बाग गच्चीवरची असो की जमिनीवरची, त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बरंच काही लावत असाल. फुलझाडं असतील तसंच फळझाडंही. फळभाज्या असतील अन पालेभाज्या वा कंदवर्गीय भाज्यादेखील असतील. या साऱ्यासाठी वेगवेगळ्या कुंड्या असतील. पण जर कुंडीत एकच फळझाड असेल किंवा फुलझाड असेल तर त्या कुंडीमधली माती, तुम्ही देत असाल ते खत अन पाणी फक्त त्या झाडापुरतंच मर्यादित असेल तर त्याला अर्थशास्त्रीय भाषेत वेस्टेज ऑफ रिसोर्सेस म्हणता येईल. हे अगदीच अक्षम्य असं दर्शवायचं असेल तर त्यालाच क्रिमिनल वेस्टेज ऑफ रिसोर्सेस देखील म्हणता येईल.


यापुर्वी मी बरेंचदा आंतरपीकं किंवा कंपॅनिअन प्लँटिंग यावर लिहिलं आहे. कधी लेखनाच्या ओघात त्यावर लिहिलं असेल तर कधी वेगळे लेखही लिहिले असतील. त्याबद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास, कुंडीतील खत, माती अन देण्यात येणारं पाणी या साऱ्यावर जसं कुंडीतलं मुख्य झाड पोसलं जात असतं तसंच त्याला त्रास न देता, उलट त्याला वाढीमधे अन फुलण्या-फळण्यामधे सहकार्य करत जर दुसरं काही लावलं तर त्याला आंतरपीकं किंवा कंपॅनिअन प्लँटिंग असं म्हणतात. या पद्धतीमधे पिकं घेताना सहसा जमिनीच्या वरच्या भागात एक अन खालच्या भागात एक अशा जोड्या लावल्या जातात. म्हणजे वांगी टोमॅटोसारखं फळझाड असेल तर तिथं कंदवर्गीय म्हणजे बटाटा, रताळं यासारखं पीक घेतलं जातं. यावर सविस्तर लेख याच ठिकाणी शोधल्यास मिळतील.


आंतरपीकं घेताना जर द्विदल प्रकारातील पिकं घेतली तर मुख्य पिकासाठी लागणारं नत्र आपोआप उपलब्ध होऊ शकतं. कारण द्विदल धान्यांची मुळं हवेतील नत्र शोषून घेऊन ते जवळील मातीमधे उपलब्ध करुन देत असतात. मुळांपासच्या मातीमधे जर नत्र भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल तर झाडाची शाखीय वाढ उत्तम रीतीनं होते. शाखा जेवढ्या जास्त तेवढी फुलं अन फळं जास्त हे साधं गणित आहे. सगळी कडधान्यं द्विदल प्रकारात मोडत असतात. भुईमूग हेही एक द्विदलवर्गीय पीक असल्यानं तसंच त्याच्या मुळावरील गाठींमुळं वातावरणातील नत्र वायू जमिनीत स्थिर होण्यास मदत होते.


भुईमूग हे जमिनीखाली वाढणारं पीक आहे. त्यामुळं याच्या वाढीसाठी जमीन भुसभुशीत असणं गरजेचं असतं. वाळू अन सेंद्रिय पदार्थ विपुल प्रमाणात असलेल्या मातीमधे भुईमूगाच्या मुळांची वाढ चांगली होऊन त्यावर अधिक प्रमाणात शेंगा धरण्यास मदत होते. ज्या कुंड्या, विशेषतः फळझाडांच्या कुंड्या भरताना जर त्यामधे वाळू किंवा इतर काही घटक, जसं की भाताचं तूस, लिफ मोल्ड वगैरे भरुन जोडीला कंपोस्ट अन शेणखत मुबलक प्रमाणात घातलं असेल अन माती भुसभुशीत असेल तर अशा कुंड्यांमधे भुईमूग लावता येईल.


भुईमूग लावण्यासाठी जर वेगळी व्यवस्था करणार असाल तर कुंडी किमान दहा इंच खोल असावी. पुठ्ठ्याचा खोका किंवा आयताकृती कुंडी घेतल्यास रोपांची दाटी होणार नाही अन वरचा भाग व खालचा भाग या दोन्ही भागांना वाढण्यासाठी पुरेशी जागा राहील. कुंडी भरताना मातीमधे शेणखत, कंपोस्ट, वाळू, वाळू नसेल तर भाताचं तूस किंवा वाळलेल्या पाला-पाचोळ्याचा चुरा मिसळावा. माती भुसभुशीत रहावी म्हणून त्यामधे वाळू किंवा पालापाचोळा अन कंपोस्ट असणं गरजेचं आहे.


ज्यांची बाग जमिनीवर आहे त्यांनी मोठ्या झाडांच्या बुंध्याशी, आळ्यात लगवड करावी किंवा जागा असेल तर गादी वाफा तयार करुन घ्यावा. वाफ्याची लांबी अन रुंदी जागेच्या उपलब्धतेनुसार घ्यावी पण उंची मात्र आठ ते दहा इंच ठेवावी. वाफा भरुन घेताना त्यामाधे भरपूर पालापाचोळा चुरुन घातल्यास माती भुसभुशीत रहाण्यास मदत होईल. त्यासोबतच शेणखत अन कंपोस्ट देखील भरपूर घालावं म्हणजे शेंगा वाढताना लागणारं सेंद्रीय खत मुळांना उपलब्ध राहील. वाफ्याच्या सभोवार पाणी साचून रहाणार नाही, पण वाफा मात्र नेहमी ओलसर राहील याची दक्षता वाफा बनवत असतानाच घ्यावी.


पेरणीसाठी जे शेंगदाणे लागतील ते शक्यतो भुईमूगाच्या टरफलासह शेंगा असतील त्या वापराव्या. पेरताना टरफलं हलक्या हातानं, आतले दाणे दुखावणार नाहीत, ते जोडामधुन वेगळे होणार नाहीत अन त्यावरचं सालही निघणार नाही याची काळजी घ्यावी. घरात जे शेंगदाणे असतील अन ते जर नुकतेच आणले असतील तर त्यातीलही दाणे पेरणीसाठी वापरु शकता. फक्त दाणे अख्खे असावे. त्याची सालं निघालेली नसावीत. दाणे पेरणीसाठी निवडताना टपोरे घ्यावेत. दबलेले, छोटे, कोवळे तसंच जुने, बुरशी आलेले दाणे घेऊ नयेत. शेंगदाण्याचं शेल्फ लाईफ साधारणतः सहा महिने असतं. त्यानंतर ते खवट होऊ लागतात. असे दाणे पेरल्यास ते उगवणार नाहीत अन उगवलेच तर येणारं पीकही सकस नसेल. म्हणून नुकतेच आणलेले दाणे घ्यावेत किंवा नर्सरीतुन पेरणीसाठी असलेले दाणे आणावेत.


कुंडीच्या आकारमानाप्रमाणं दाणे पेरताना दोन दाण्यांमधलं अंतर चार ते पाच इंच ठेवावं. मातीमधे बोटानं दीड ते दोन इंच खोल खड्डा करुन त्यात दाणा पेरुन माती सारखी करुन घ्यावी. वाफा केला असेल तरीही दोन दाण्यांतलं अंतर चार ते पाच इंचच ठेवावं. एकापेक्षा अधिक रांगा होतील एवढा वाफा बनवला असेल तर दोन ओळींमधलं अंतर फूटभर ठेवावं. दाणे पेरून झाल्यावर लगेचच पाणी द्यावं.


लागवड वेगळ्या कुंडीमधे केलेली असो वा कुठल्या झाडाच्या मुळाशी किंवा जमिनीवरच्या वाफ्यांवर, पेरणी करुन पाणी दिल्यावर लगेचच सुक्या पाचोळ्याचं मल्चिंग करुन घ्यावं. त्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन तर होणार नाहीच, पण पीकवाढीसाठी आवश्यक असलेलं तापमानही राखलं जाईल. शेण वा मातीमधुन इतर तणांच्या बिया येऊन जर त्या रुजल्या असतील तर असं तण दिसताक्षणी काढून त्याचे तुकडे करुन जागेवरच टाकावं. त्याचं मल्चिंग म्हणून असलेल्या इतर पालापाचोळ्यासोबतच खत होऊन जाईल. भुईमूगाची रोपं वाढत असताना मात्र तण उपटून काढणं टाळावं. त्यामुळं भुईमूगाच्या रोपांच्या मुळांना धक्का लागु शकतो.


भुईमूगाला पाणी देताना कुंडी वा वाफा ओलसर (मॉईस्ट) राहील याची काळजी घ्यावी. पाण्याचा ताणही देऊ नये अन अती पाणीही देऊ नये. मातीचा वरचा इंचभराचा थर कोरडा दिसत असेल तरच पाणी द्यावं. बटाटा वाढताना जसं आपण मातीची भर देतो तसं भुईमूगाची रोपं वाढताना केल्यास अधिक शेंगा मिळू शकतील.


पेरणीच्या पंधरा ते वीस दिवसांनंतर दर दोन ते तीन आठवड्यांच्या अंतरानं रोपांवर कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेलं द्रावण फवारल्यास कुठलीही कीड लागणार नाही. कडुलिंबाचा पाला हातानं चुरडून दोन दिवस पाण्यात भिजत ठेवावा. नंतर ते पाणी गाळून घेऊन बाटलीत भरुन ठेवावं. पाला कंपोस्टमधे किंवा सर्व कुंड्यांच्या वर थोडा थोडा टाकुन द्यावा. हे पाणी दसपट साध्या पाण्यात मिक्स करुन ते बागेत फवारावं. अर्क जास्त झाला असेल तर बाटलीत भरुन सावलीत ठेवावा. असा अर्क तीन महिन्यांत वापरुन टाकावा.


भुईमूगाच्या शेंगा काढणीसाठी तयार होण्यासाठी त्याच्या वाणानुसार साडेतीन ते चार महिने लागतात. आपण छोट्या प्रमाणात अन तेही दुकानातून घेतलेल्या दाण्यांमधुन काही दाणे घेऊन पेरणार असल्यामुळं तो दाणा कुठल्या वाणाचा आहे हे आपल्याला माहीत असणं शक्य नाही. त्यामुळं शेंगा काढणीसाठी नक्की कधी तयार होतील हे सांगता येणार नाही. रोपांचा पाला पिवळा पडू लागल्यावर एखादं रोप हलकेच बाहेर काढून शेंगांचा आकार पहावा. शेंग योग्य त्या आकाराची झाली असेल, टरफल कडक झालं असेल तर एखादी शेंग काढून ती फोडून पहावी. तिचा आतला भाग काळसर झाला असेल तर शेंग काढणीसाठी तयार आहे असं समजावं.


आपापल्या आवडीनुसार वापरासाठी शेंगा काढून घ्याव्या. म्हणजे उकडून वा भाजून शेंगा खायच्या आहेत की पक्व दाणे काढून ते घरात वापरण्यासाठी घ्यायचे आहेत हे ठरवुन त्यानुसार शेंगा काढाव्यात. जर दाणे वापरण्यासाठी शेंगा काढायच्या असतील तर शेंगा पूर्णपणं पक्व होऊ द्याव्या. नंतर सर्व शेंगा काढून घेऊन वाळवाव्या अन मग सावकाश फोडून आतले दाणे वापरण्यासाठी घ्यावेत. किंवा रोपं दोरीला टांगून ठेऊन शेंगा वाळवाव्या अन नंतर वापरासाठी फोडून घ्याव्या. वाळलेली रोपं कंपोस्टमधे किंवा इतर कुंड्यांमधे पसरुन द्यावी. त्यांच्या मुळांवरील गाठींमधे असलेलं नत्र इतर झाडांना उपलब्ध होईल.


शेंगा काढल्यानंतर वेगळी कुंडी वापरली असेल तर त्यामधील माती किंवा वाफ्यावर लागवड केली असल्यास तो वाफा लगेचच इतर कुठल्याही रोपांसाठी वा पिकांसाठी वापरु नये. किमान आठवडाभर ती माती उन्हात वाळवुन घ्यावी. नंतर त्यात पुन्हा शेणखत, कंपोस्ट, नीमपेंड वगैरे घटक घालून मगच ती माती वापरांत घ्यावी.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...