केळी लागवडीची वेगळी पद्धत
ज्या बागप्रेमींची बाग जमिनीवर आहे त्यांच्यापैकी बहुतांशजणांच्या बागेत केळीची झाडं असतीलच. फारशी देखभालीची गरज नसलेलं अन वर्षातुन एकदा भरपूर केळी देऊन निवृत्त होण्यापूर्वी केळीचं झाड एक दोन नवीन रोपं देऊनच जातं. ही नवीन रोपं काढून दुसरीकडं लावली किंवा आहे तिथंच वाढवली तर पुढच्या वर्षभरात पुन्हा केळी अन पुन्हा काही रोपं असा क्रम सुरुच रहात असतो. ज्यांची बाग गच्चीवर वा बाल्कनीत आहे त्यांच्याऐकीही काहीजणांकडं केळीची झाडं कुंड्यांमधे लावलेली असतील.
केळीची झाडं बागेत जमिनीवर लावल्यावर त्यांना फारशा देखभालीची गरज भासत नाही. नियमितपणं मिळणारं पाणी अन इतर झाडांसोबतच मिळणारं खत यावर ही झाडं व्यवस्थित वाढतात अन आपल्या नियत वेळेनुसार फळं देतात. भरपूर उन अन वेळच्यावेळी पाणी मिळाल्यास साधारणतः दहा ते बारा महिन्यात केळीच्या झाडावर फुल येतं अन त्यातुनच एक एक करत फण्या निघतात अन साधारण चार ते पाच महिन्यांत केळी पिकतात. एखादी फणी पिकल्यावर घड काढून घेऊन पोत्यानं झाकुन ठेवल्यास आठवड्याभरात तो पिकतो अन आपल्या कष्टाचं फळ आपल्याला खायला मिळतं. अगदी फारसे कष्ट घेतले नसले तरीही. त्यानंतर केळीचं ते झाड काढून त्याची विल्हेवाट लावावी लागते किंवा नाही केल्यास ते जागीच डिकंपोज होतं. असं तोडलेलं झाड कंपोस्टमधे टाकता येतं किंवा तुकडे करुन मल्चिंग म्हणून वापरता येतं. अर्थात अती ओलसरपणामुळं बुरशीजन्य रोग लागु नयेत याची काळजी घेणं गरजेचं असतं.
साधारणतः जिथं घरात वापरलं जाणारं पाणी बाहेर बागेत निघतं अशा ठिकाणी केळीची झाडं लावली जातात. त्यामुळं त्यांना वेगळं पाणी देण्याची गरज पडत नाही. बाथरुम वा किचन सिंकमधुन बाहेर बागेत जाणाऱ्या पाण्यावर केळीची झाडं छान पोसली जात असतात. पण अशा ठिकाणी जर उन्हाची उणीव भासत असेल तर किंवा उनच मिळत नसेल तर तिथं केळीची झाडं लावण्यात काहीच अर्थ नसतो. कारण जितकं उन जास्त तितकी केळीची वाढ उत्तम होते.
याशिवाय केळीला सेंद्रीय खत जास्त मानवतं. केळीच्या झाडाची खताची भूक फारच तीव्र असते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तर केळीला आवश्यक असतेच, पण सेंद्रीय खतं जर भरपूर प्रमाणात मिळत असतील तर केळीच्या झाडाची वाढ उत्तम रितीनं होते अन येणारी फळंही छान सुदृढ असतात. या साऱ्या गोष्टींचा विचार केल्य़ास सामान्यतः केळीची झाडं बागेत अशा ठिकाणी लावली जातात जिथं भरपूर उन मिळतं. मग अशा ठिकाणी खड्डा खणून केळ लावली जाते अन तिला नियमितपणं पाणी दिलं जातं अन खतं दिली जातात.
परंतु जर केळीला लागणाऱ्या सेंद्रीय खतांची गरज जर आपण जागीच भागवु शकलो तर? हे असं करण्यासाठीच एक वेगळी पद्धत आपल्याला वापरता येईल. कशी ते पाहूया.
केळीचा एक कंद जरी आपण लावला तरी त्या कंदाची पूर्ण वाढ होईपर्यंत त्याला आजुबाजुनं नवीन कोंब फुटत रहातात. अगदी मुख्य कंदाला वा झाडाला चिकटून नवीन कोंब फूटून ते मातीबाहेर येतात अन वाढत रहातात. ते जर वेळीच काढून दुसरीकडं लावले नाहीत तर ते तिरके वाढतात. मग जेव्हा त्यांना फुल येऊन घड धरल्यावर तो जसजसा मोठा होत जातो तसे आधीच तिरकं असलेलं झाड जमिनीकडं अधिक झुकू लागतात. घडाचं वजन अशा तिरक्या वाढलेल्या झाडाला सहन झालं नाही किंवा जोराचा वारा सुटल्यास केळीचं झाड मध्यावर तुटून कोसळण्याची शक्यता असते. कारण केळीच्या खोडामधे पाण्याचाच जास्त भाग असतो. त्यामधे कुठंही इतर फळझाडांमधे असतं तसं कठिण असं लाकूड नसतं. यासाठी अशा वाढलेल्या झाडांना घड वाढण्याच्या काळात आधार द्यावा लागतो. पण हे टाळण्यासाठी म्हणून मातीमधुन आलेले कोंब मुळासह हलक्या हातानं मुख्य झाडापासून कापून काढून दुसरीकडं लावावे लागतात.
या लेखात आपण केळीचा कंद लावण्याची जी पद्धत पहाणार आहोत ती शेतीच्या पर्माकल्चर या प्रकारामधे वापरली जाते. पर्माकल्चर म्हणजे पर्मनंट ऍग्रीकल्चर. या पद्धतीत शेती करताना पारंपारिक पद्धतीमधे दर वर्षी किंवा ठराविक कालावधीनंतर जसं आपण नांगरणी वा खतं देण्यासाठी खोदणं किंवा माती उकरणं वगैरे करत असतो ते केलं जात नाही. झाडं लावताना किंवा प्रथमच शेती लावताना जी काय नांगरट असेल किंवा खड्डा खणणं असेल तेवढंच केलं जातं. नंतर शेतीला वा झाडांना निरंतर सेंद्रीय खतं जागच्या जागीच मिळण्याची व्यवस्था केली जाते.
या पद्धतीमधे केळ लावण्यासाठी आधी जागा ठरवुन घेऊन जागेच्या उपलब्धतेनुसार मध्यभागी जमेल तितका मोठा अन खोल खड्डा करुन घ्यायचा. खड्ड्यातून काढलेली माती खड्ड्याच्या बाजुनं ओढून घेऊन उंचवटा करुन घ्यायचा. हा खड्डा कंपोस्टनं भरुन घ्यायचा. खड्डा भरेल एवढं कंपोस्ट तयार नसेल तर बागेतला पालापाचोळा, काड्या वगैरे त्यात घालून भरुन घ्यायचा. पुढचे काही दिवस घरातुन निघणारा ओला कचरा म्हणजे भाज्यांची देठं, फळांच्या साली, पालेभाज्यांच्या काड्या वगैरे यातच टाकत रहायचं. कंपोस्ट करताना जे जे आपण त्यात टाकतो, अगदी कल्चरसुद्धा या खड्ड्यात टाकत रहायचं.
खड्ड्याच्या भोवती जो उंचवटा केला आहे त्यामधे केळीची रोपं वा कंद जे काही आहे ते ठराविक अंतरावर लावायचं. याप्रमाणं खड्ड्याच्या भोवती केळीची लागवड कराय़ची. त्याला आवश्यक तेवढं पाणी ठराविक दिवसांच्या अंतरानं देत रहायचं. केळीला लागणारं कंपोस्ट मध्यभागी असलेल्या खड्ड्यात तयार होत राहील. तोपर्यंत केळीची झाडं सेट होऊन त्यांची मुळं मधल्या खड्ड्यात तयार होत असलेलं खत घेऊन त्यावर पोसत रहातील. खड्ड्यातलं खत तयार होत आल्यावर त्यात जागा होईल. ती जागा बागेतला पाचोळा, ओला-सुका कचरा टाकून भरत राहिल्यावर ही कंपोस्टिंगची प्रक्रिया सतत सुरुच राहील. अशा पद्धतीमधे केळीच्या झाडांना वेगळं खत देण्याची गरज भासत नाही. जर शेणखत, गांडूळखत अन नीमपेंड वगैरे काही द्यायचं असेल तर तेही या खड्ड्यातच टाकल्यावर खड्ड्याभोवतीच्या केळीच्या झाडांना ते मिळत राहील.
खड्ड्यात कंपोस्ट भरपूर उपलब्ध आहे, केळीच्या दोन झाडांमधे जागाही आहे म्हटल्यावर या जागेचा अन अधिकच्या खताचा फायदा करुन घेण्यासाठी म्हणून या जागेत इतर काही आपण लावू शकतो. फक्त जे काही लावणार आहोत ते केळीला त्रासदायक ठरु नये एवढी काळजी घ्यायला हवी. म्हणून ज्याला आपण आंतरपीक म्हणतो त्या प्रकारातील सहचर रोपांची म्हणजेच कंपॅनिअन प्लाण्ट्सची लागवड आपण यात करु शकतो.
केळीच्या दोन रोपांमधे आपण रताळी, हळद, आलं, अळू, गवतीचहा इत्यादी लावू शकतो. केळीला दिलेल्या पाण्यावर अन मधल्या खड्ड्यात असलेल्या कंपोस्टवर या साऱ्यांची चांगली वाढ होत रहाते. त्यामुळं जेव्हा आपण केळीचा घड काढून घेतल्यावर ते झाड काढण्यासाठी खोदू तेव्हा त्याच वेळी अपल्याला तयार रताळी, आलं वा हळद मिळू शकेल. नियमित मिळणाऱ्या पाण्यामुळं अन खाली सावली असल्यामुळं अळूची पानंही आपल्याला वर्षभर सतत मिळत राहील. रताळी लावल्यास तो वेल खाली पसरुन हिरवं मल्चिंगही त्याठिकाणी मिळेल अन उन्हाळ्यात पाण्याचं बाष्पीभावन होणंही टाळता येईल.
पर्माकल्चरमधे या प्रकाराला केळीचं वर्तुळ म्हणजेच बनाना सर्कल म्हणतात. यासाठी मोठी जागा घेतल्यास वर्षभर आपल्याला घरची केळी नियमितपणं मिळत रहातील. केळीचा एक कंद लावयावर काही वर्षांतच भरपूर कंद आपल्याला त्यापासून याठिकाणी लावण्यास मिळतील. शक्य असल्यास अन आवड असल्यास केळीचे विविध प्रकारही आपण यामधे लावू शकतो. कारण केळीच्या झाडांमधे काही भेदभाव नसतो. विभिन्न जातीची केळीची दोन झाडं एकमेकांसोबत नक्कीच रहातात. त्यात क्रॉस पोलिनेशन वगैरे काहीच नसल्यानं ते आपापली वाढत रहातात अन आपल्या नियत वेळी फुलून आपल्या नैसर्गिक गुणांनुसार फळं देत रहातात.
कमी कष्टाच्या अन अत्यंत कमी देखभालीच्या या प्रकारामधे तेवढ्याच कमी कष्टांत जास्त फळं देणारं हे पीक ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या बागेत अथवा शेताच्या एखाद्या कोपऱ्यात अवश्य लावावं
©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा