गच्चीवर मोठी झाडं लावताना घ्यावयाची काळजी.

गच्चीवर मोठी झाडं लावताना घ्यावयाची काळजी.



आजवर गच्चीवर आपण फुलझाडं लावली, भाजीपालाही घेतला. त्यासाठी कुंड्यांपासून ते वाफे करण्यापर्यंत सार्ख काही केलं जे हीच झाडं जमिनीवर लावताना केलं असतं. ज्यांना शक्य आहे, ज्यांच्याकडं गच्चीवर जागा आहे, स्ट्रक्चरही भक्कम आहे अशांनी मोठी फळझाडंही लावण्यास हरकत नाही. फक्त त्यासाठी काही अभ्यास, काही पूर्वकाळजी घेणं गरजेचं आहे. ती काय आहे हे आपण या लेखात पाहू. पावसाळा जरी दोन महिन्यांवर आला असला तरी आपण गच्चीवर काय अन कसं लावायचं याची तयारी आतापासून करायला हवी.

मोठी झाडं जर जमिनीवर लावल्यास ती पूर्ण वाढल्यावर त्यांची मुळं किती खोल जातात हे आधी पहाय़ला हवं. त्यानुसार आपण कुंडी वा इतर तत्सम वस्तु अशी झाडं लावण्यासाठी घेऊ शकतो. अर्थातच जमिनीवर ही झाडं लावल्यास ती केवळ खालच्या दिशेनंच वाढतात असं नाही तर ती आसपासच्याही भागात पसरत जात असतात. आपण कुंडी कितीही खोल घेतली तरी तिचा व्यास मर्यादितच रहाणार आहे. परिणामी जी मुळं अन्यथा आजुबाजुस पसरली असती तीही खालच्या बाजुस वळून वाढणार आहेत. त्यामुळं काही काळानंतर कुंडीमधे मुळांची दाटी होणारच. यासाठी झाडाच्या वाढीनुसार अन वयानुसार त्याचं रिपॉटिंग एक ते दोन वर्षांआड करणं गरजेचं होतं. अशा रिपॉटिंगच्यावेळेस त्यावेळी असलेल्या कुंडीपेक्षा किमान दीडपट मोठी कुंडी घेणं क्रमप्राप्त ठरेल. हे कुंडी बदलणं क्रमाक्रमानं करणं योग्य ठरतं. रोप लहान असतानाच मोठी कुंडी घेणं शक्यतो टाळावं. कारण मोठी होणारी झाडं निसर्गतः आपला पाया अर्थात आपली रूट सिस्टिम भक्कम करण्याला प्राधान्य देत असतात. त्यामुळं आपण रोप लावताना मोठ्या कुंडीत लावलं तर त्याची वाढ पृष्ठभागावर कमी दिसते अन झाड वाढत नाही अशी शंका आपल्या मनात येते.

झाडांची मुळं मुख्यत्वे दोन प्रकारची असतात. काही झाडांना एक सोटमूळ असतं अन त्याला उपमुळं फुटलेली असतात तर काही झाडांना केसांसारखी अनेक मुळं असतात. झाडांची सोटमुळं दोन कामं करतात. एक म्हणजे जमिनीवरचा झाडाचा भार सांभाळणं अन झाडाला लागणारं पाणी मिळवण्यासाठी आवश्यक तितकं खोल जाणं. उत्तम प्रतीच्या जमिनीमधे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळं अशा मातीमधे लावलेल्या फळझाडांची सोटमुळं जास्तीत जास्त दीड फूट म्हणजे १८ इंच खोल मातीमधे जातात.

केसांसारखी मुळं असतात ती मुख्यतः झाडाचा भार सांभाळत असतात अन त्याबरोबरच झाडाच्या वाढीसाठी लागणारं पाणी अन अन्नद्रव्यं शोधण्यासाठी झाडाच्या आसपास पण साधारण एक फूटभर मातीमधे जात असतात. पाणी अन अन्नद्रव्य यांसोबतच ही मुळं झाडाला लागणारा प्राणवायुही पुरवणं हे यांचं काम असल्यानं ही मुळं मातीमधे फार खोलवर जात नाहीत. त्यामुळं कुंडीमधे हवा खेळती ठेवणं, बाहेरच्या भागाला भरपूर छिद्रं करुन ती नेहमी मोकळी रहातील हे पाहिल्यास ही मुळंही फार दूरवर पसरणार नाहीत. ज्या मातीमधे प्राणवायु कमी असतो किंवा जी माती घट्ट म्हणजे  कॉम्पॅक्ट असते तिथं ही मुळं वाढत नाहीत अन परिणामी झाडांची वाढ होत नाही. अर्थात आपण जर वांगी, टोमॅटो या रोपांची केशमुळं अन त्यांचा आकार व मोठ्या झाडांच्या केशमुळं अन त्यांचा आकार वा व्यास यांची तुलना केल्यास मोठ्या वाढणाऱ्या झाडांच्या केशमुळांचा पसारा अन व्यास व व्याप्ती मोठीच असते. म्हणून कुंडीची खोली अन व्यास निवडताना याही मुद्द्याचा विचार करणं महत्वाचं असतं.

हेच दुसऱ्या शब्दांत किंवा सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास झाडाला लागणारं पाणी जमिनीच्या वरच्या भागात उपलब्ध असेल अन त्याला वाढीसाठी लागणारी सारी अन्नद्रव्यं व प्राणवायु अन योग्य माती वरच्या थरात उपलब्ध असेल तर सोटमुळं जास्त खोलवर जाणार नाहीत अन केशमुळंही फार दूरवर पसरणार नाहीत. आपण जर झाडाची पाणी अन अन्नद्रव्याची योग्य ती सोय केली तर मोठी होणारी झाडंही मोठ्या कुंड्यांमधे लावू शकतो. मातीचा वरचा भाग जितका कोरडा तितकी मुळं खोल अन आजुबाजुस पसरलेली असणार हे ध्यानात ठेवल्यास अन त्यानुसार खतपाणी केल्यास अशी झाडं आपण गच्चीवरही लावू शकतो. रहाता राहिला प्रश्न वजनाचा. तर पूर्ण वाढलेलं झाड अधिक त्यावर लगडलेली फळं यांचं वजन आणि गच्चीची वजन पेलण्याची क्षमता या दोन्हीचा विचार करुनच झाडांची निवड अन योग्य ती संख्या हे ठरवुन लागवड करावी.

मुळांच्या या दोन प्रमुख प्रकारांशिवाय त्यांचा अजून एक प्रकार असतो. ती म्हणजे योगायोगानं वा काही खास कारणानं फुटलेली मुळं अर्थात Adventitious Roots. या प्रकारातली मुळं झाडांच्या जमिनीच्या वरच्या भागावर कधी झाडांच्या बेचक्यांमधे फुटतात तर कधी ती जमिनीशी समांतर पसरत जाऊन त्यातुन एखादा कोंब मातीच्या वर येतो. ही अशी मुळं केव्हाही फुटू शकतात. खास करुन जेव्हा झाडाचं अस्तित्व, त्याची मुख्य मुळं संकटात आल्यावर ते संपण्याची भिती उत्पन्न झाली की अशी मुळं फुटतात. म्हणजे उदाहरणार्थ, पूरसदृश स्थिती निर्माण झाली अन झाडं पाण्याखाली गेली की वरच्या भागावर अशी मुळं फुटून ती झाडासाठी आवश्यक असणारं अन्न अन प्राणवायू झाडाला उपलब्ध करुन देण्याचं काम करतात. बरेंचदा झाडाची नवीन पिढी वेगानं निर्माण करायची असेल तरीही अशी मुळं फुटुन नवे कोंब मातीमधुन वर येतात. कधी मुख्य मुळांना दुखापत झाली अन त्यांची काम करण्याची शक्यताच धोक्यात आली तरीदेखील अशी मुळं फुटतात. कधी झाडाच्या मोठ्या पसाऱ्याला आधार देण्यासाठीही अशी मुळं फुटतात. उदा. वड, पिंपळ अशा झाडांना फुटलेल्या मुळांना आपण पारंब्या म्हणतो. मुळांच्या या प्रकारावर अजुन बरंच काही लिहिता येईल, पण या लेखाचा तो विषय नसल्यानं या प्रकारच्या मुळांची एवढी तोंडओळख पुरेशी आहे. अर्थात यामागं निसर्गाचा त्याचं चक्र अविरत सुरु रहाण्यासाठी किती विचार असतो याची कल्पना यावी.

मोठ्या वाढणाऱ्या झाडांची मुळं खोलवर किंवा आजुबाजूस वाढत असताना ती पुष्कळ जागा घेत असतात. अशावेळी इतर झाडांची मुळं जवळपास आल्यास दोन्ही झाडांमधे अन्नद्रव्यं अन पाणी वगैरेंसाठी स्पर्धा उत्पन्न होते. म्हणून आपण लावलेल्या झाडाची मुळं वाढीदरम्यान किती जागा व्यापतील याचा हिशेब करुनच जवळपास वा त्या कुंडीत कुठली इतर झाडं वा रोपं लावता येतील याचा आधी विचार करुनच त्यानुसार लागवड करावी. हे विशेषतः सहचर लागवड अर्थात कम्पॅनिअन प्लांटिंग करत असताना मुख्य झाड अन दुय्यम स्थानी लावणार असलेलं झाड यांच्या वाढीच्या अन त्यांच्या अन्नाच्या गरजा यांचा विचार करुनच करावं.

मोठ्या झाडांची लागवड कुंडीमधे करताना जी माती वा पॉटिंग सॉईल किंवा जे मिश्रण निवडाल तेही आधी ठरवुनच घ्यावं. मुळांच्या वाढीसाठी लागणारं पाणी, मुख्य अन्नद्रव्यं अन मुख्य म्हणजे प्राणवायु यांचा विचार करता मातीमधे घालण्यासाठीचे घटक निवडावेत. गरजेपुरतं पाणी टिकून रहाण्यासाठी माती जास्त घेतली तर ती कालांतरानं घट्ट होऊन प्राणवायुची कमतरता भासणार. प्राणवायुसाठी हवा खेळती रहावी म्हणून वाळू जास्त घातली तर पाण्याचा निचरा लवकर होणार. तेव्हा सारे घटक हे झाडाची दीर्घकालीन गरज लक्षात घेऊनच निवडावेत. म्हणून सुरुवातीच्या काळात झाडाची चांगली वाढ होण्यासाठी नियमित खतपाणी करण्यावर कटाक्षानं लक्ष द्यावं.

झाडं एकदा वाढू लागली की फळांचा एक सीझन झाल्यावर त्यांची आपण छाटणी करत असतो. त्यामुळं झाडांचा आकारही मर्यादित ठेवण्यास मदत होते अन नवीन फूट येऊन त्यावर फळं धरली जातात. पण अशा छाटणीनंतर जशा नवीन फांद्या फुटत असतात तशीच नवीन मुळंही फुटत असतात. झाडांमधे फांद्या आणि मुळं यांचं गुणोत्तर व त्यांच्यामधे असलेलं संदेशवहन अन अन्नद्रव्यांची देवाणघेवाण हे निसर्गतःच अगदी सुयोग्य पद्धतीनं आखलेलं असतं. यासाठीच छाटणी करत असतानाही ती योग्य प्रमाणातच करावी लागते. छाटणी जर जास्त प्रमाणात झाली तर झाडाची वाढ काही काळासाठी थांबते. क्वचितप्रसंगी झाड दगावण्याचीही शक्यता असते किंवा काही काळासाठी झाड फळं देणं बंद करतं. म्हणून मुळांनी सद्यस्थितीमधे कुंडीचा व्यापलेला भाग, किती छाटणी केली तर नवीन मुळं फुटतील अन त्यांना सामावुन घेण्यासाठी किती जागा असेल वा लागेल याचा विचार करुनच कुंडी निवडावी. हा मुद्दा खासकरुन रिपॉटिंगच्या वेळी ध्यानात ठेवावा.

खाली आपल्याकडं लावल्या जाणाऱ्या काही फळझाडांची यादी, त्यांची मुळं कशी असतात व कुंड्या वा पिंपांमधे ती लावायची झाल्यास दोन वर्षांमधे काय आकाराच्या कुंड्या वा इतर तत्सम वस्तु घ्याव्या लागतील याची यादी देत आहे. ज्या झाडांना सोटमुळं आहेत त्यांना उपमुळंही फुटत असतात अन तीही अन्नग्रहणाचं व पाणी अन प्राणवायु घेण्याचं काम करीत असतात. त्यामुळं त्यांची वाढही लक्षात घेणं गरजेचं आहे. जमिनीवर लावली असता ही झाडं ३०-४० फुट वा त्याहीपेक्षा मोठी होणारी आहेत. आपण जर जागेअभावी वा वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुंडीमधे लावणार असु तर दर वर्षी वा एक वर्षाआड त्यांची योग्य तेवढी छाटणी करणं गरजेचं आहे. नर्सरींमधे या साऱ्यांची कलमं वा ड्वार्फ व्हरायटीजही मिळतात. ती जर घेऊन लावल्यास सारंच काम सोपं होऊन जाईल अन फळंही लवकर मिळण्यास सुरुवात होईल. फक्त अशी कलमं वा ड्वार्फ व्हरायटीज खात्रीशीर असायला हव्यात.

पेरू - केशमुळं - १८ इंच खोल व १८ ते २० इंच व्यास

पपई - सोटमूळ - १८ इंच खोल व १८ ते २२ इंच व्यास

केळ - केशमुळं - १८ इंच खोल व १८ ते २२ इंच व्यास

सिताफळ - सोटमूळ - २४ इंच खोल व १८ ते २० इंच व्यास

आंबा - सोटमूळ - २४ इंच खोल व २४ इंच व्यास

चिकू - केशमुळं - २४ इंच खोल व २४ इंच व्यास

लिंबू - मिश्र - २४ इंच खोल व २४ इंच व्यास

अंजिर - केशमुळं - २४ इंच खोल व २४ इंच व्यास

काजू - सोटमूळ - ४० इंच खोल व ४० इंच व्यास

शेवगा - सोटमूळ - ३० इंच खोल व २०-२४ इंच व्यास


तळटीप : हा लेख स्वानुभवावर आधारित तर आहेच, पण आवश्यक तिथं इंटरनेटचा आधार घेतला आहे. सोबतचे फोटो माझ्या घराच्या गच्चीवरील आहेत.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...