विचित्र आकाराची फळं आणि भाज्या

 विचित्र आकाराची फळं आणि भाज्या




आपण भाज्या अन फळांच्या बिया विकत घेतो, त्या आपल्या बागेत पेरतो अन यथावकाश त्या तयार झाल्या की झाडांवरुन तोडतो. मग त्या फळभाज्या असोत की फळं. तसंच मुळा, गाजर, बीट वगैरे कंदवर्गीय भाज्याही लावतो अन ठराविक कालावधीनंतर ते तयार झाले की मातीमधुन बाहेर काढतो. पण काही वेळा फळं अथवा टोमॅटो किंवा भोपळी मिरची बाजारात ज्या आकाराची असतात किंवा आणलेल्या बियांच्या पाकीटावर जशी दाखवलेली आसतात तशी आकारानं नसतात. एका बाजुनं दबलेली तरी असतात किंवा काकडी वगैरे अर्धगोल आकारात वळलेली असतात. गाजर अन मुळेही सरळ नसतात तर कधी दोन पाय असल्यासारखी दिसतात. बीटही गोलमटोल न रहाता लंबगोल आकाराची येतात.

आपल्या कष्टाला आलेलं असं विचित्र आकाराचं फळ (किंवा मूळ) पाहून आपलं मन खट्टू होतं. आपलं काय चुकलं म्हणून असं विकृत आकाराचं फळ आपल्या हाती आलं असा आपण विचार करु लागतो. पण थांबा. तुम्ही जगात असे एकटेच नाही ज्यांच्या बागेत असे दोन पायांचे मुळे अन गाजरं आली आहेत किंवा ज्यांच्या बागेमधल्या टोमॅटो किंवा भोपळी मिरचीवर खालच्या बाजूला डाग आहे. किंवा गाजरांचा रंग कधी फिका तर कधी चक्क पांढरट आला आहे. बटाटे लहान किंवा विचित्र आकाराचे येणं, डबल कांदे येणं, लसूण आकारानं लहान असणं वगैरे अगदी नैसर्गिक आहे.

व्यापारी तत्वावर अन आपल्यापेक्षा आकारानं कितीतरी पटीनं मोठी शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातही अशी विचित्र आकाराची फळं अन कंदवर्गीय भाज्या येत असतात. अगदी प्रत्येक हंगामात. फक्त तशी फळं वा भाज्या आपल्यासमोर येत नाहीत. विक्री करताना ते अन बाजारातले विक्रेते चांगल्या आकाराची अन रंगाची फळं अन भाज्या ग्राहकांना दिसतील अशा तऱ्हेनं मांडत असतात. अशी विचित्र आकारांची फळं अन भाज्या पल्प किंवा सॉस वगैरे बनवणाऱ्या कंपन्यांकडे जातात किंवा हॉटेल्स व ज्युस सेंटर्स कमी भावात घेतात. कारण पल्प वा हॉटेल अन ज्युस सेंटर्स जे पदार्थ आपल्याला विकत देतात तिथं आकार अन रंगाशी काहीही देणंघेणं नसतं. दोघांनाही, विकणाऱ्यांनाही अन विकत घेणाऱ्यांनाही. तर कधी अशी विचित्र आकाराची फळं वा भाज्या शेतातच टाकून दिली जातात. तिथं त्य़ांचं खत होतं. आता अशी फळं वा भाज्या कुणा गरजूंसाठी अन्न म्हणून नक्कीच उपयोगात येऊ शकतात. पण काढणीच्या वेळी अथवा पुढच्या एक दोन दिवसांत अशा गरजूंनी शेतात जागेवर जाणं गरजेचं असतं. मुद्दामहून फारसं कुणी अशी फळं आणून कुणाला देण्याच्या भानगडीत पडत नाही.

तर हे असं का होतं? अशी फळं अन भाज्या खाणं चुकीचं तर नाही ना? मुळीच नाही. जसं वर म्हटलं तसं असे चित्र-विचित्र आकार येणं अगदीच नैसर्गिक असतं. हा काही कुठला रोग नसतो की अशी फळं खाल्ल्यावर आपल्याला अपाय व्हावा. उलट अशी नैसर्गिक पद्धतीनं आलेली फळं ही जास्त उत्तम, चविष्ट अन सर्वगुणसंपन्न असतात. कारण मोठा आकार किंवा अधिक गडद रंग येण्यासाठी त्यावर कुठलंही रासायनिक खत किंवा औषध आपण फवारलेलं नसतं.

या अशा आकाराच्या भाज्यांना अन फळांना कधी निसर्ग जबाबदार असतो तर कधी परागीभवन व्यवस्थित झालेलं नसतं. कधी उन्हाचा तडाखा जास्त बसतो तर कधी पाणी कमी जास्त होतं. तर कधी आपलीही चूक असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ माती मोकळी नसल्यानं मुळा, गाजर, बीटसारख्या कंदवर्गीय भाज्यांना वाढण्यासाठी वावच मिळाला नसेल तर ते सरळ कसे वाढणार? ते जागा मिळेल तसे वाढणार. झालंच तर आकारानं लहान असलेल्या गाजराच्या बिया पेरताना एकाच जागी पाच सहा पडल्या अन नंतर रोपं उगवुन आल्यानंतर जर आपण त्यांची विरळणी केली नसेल तर एकाच ठिकाणी दाटी होऊन ती रोपं एकमेकांशी स्पर्धा करत जागा मिळेल तशी वाढणार.

इतकंच नाही तर आपण सेंद्रीय खतं दिल्यावर अन कुंडीत वाढीसाठी वाव मिळाला नाही तर केवळ मुळवर्गीय भाज्यांच्याच बाबतीत असं होतं असं नाही तर कोबी, फ्लॉवर वगैरेही आकारानं लहान येतात. पण चवीच्या बाबतीत मात्र कुठंही तडजोड नसते. उलट रासायनिक खतं नसल्यानं त्यांची नैसर्गिक चव आपल्याला अनुभवता येते. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यानं टोमॅटोंनाही तडा जातो. पण असे टोमॅटो किंवा तळाशी खराब झालेले टोमॅटो ज्याला ब्लॉसम एंड रॉट म्हणतात ते टोमॅटोही तेवढा खराब झालेला भाग कापून उरलेला भाग आपण नक्कीच खाऊ शकतो. त्यामुळं कुठलाही अपाय होत नाही. अर्धवर्तुळाकार काकड्या किंवा इतर वेलवर्गीय भाज्यांच्या विचित्र आकाराला जर कुठली कीड अथवा फळमाशी जबाबदार नसेल तर अशा भाज्याही आपण नक्कीच खाऊ शकतो.

शेवटी काही झालं तरी हे आपल्या कष्टाचं फळ आहे. मग ते आकारानं वेडंवाकडं का असेना. आपण ते खायलाच हवं. फक्त असं जेव्हा घडतं अन त्यात आपलीच जर काही चूक असेल तर पुढच्या वेळी ती टाळणं महत्वाचं. अन सर्वात महत्वाचं म्हणजे बाजारातल्याप्रमाणं घरच्या बागेतले टोमॅटो वा सिताफळं गोल अन टपोरीच असायला हवीत अशी अपेक्षा ठेऊ नका. कारण आपली बाग जर कुंड्यांतली असेल तर आपण देऊ त्या अन त्याच खतपाण्यावर ती झाडं पोसली जात असतात. तेव्हा त्यांच्या वाढींवर अन फुलण्या-फळण्यांवर मर्यादा या पडणारच. जर आपली बाग जमिनीवरची असेल अन आपण केवळ सेंद्रिय खतंच वापरणार असु अन त्यांच्या वेळाही जर आपण काटेकोरपणं पाळणार नसु तर मिळेल तो आकार गोड मानुन घ्यायलाच हवा. चव तर गोड असणारच आहे, अन तो गोडवाही नैसर्गिकच असणार आहे.

तेव्हा फार विचार करु नका. अशी फळं हाती आली म्हणून नाराजही होऊ नका. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वकष्टानं स्वतःच्या बागेत काही पिकवलेलं आहे. ते तुमच्या कष्टांचं फळ आहे. ते गोडच असणार हा विश्वास मनात बाळगा अन त्यांचा आस्वाद घ्या.


फोटो स्त्रोत : इंटरनेट


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...