अती पावसात बागेची काळजी कशी घ्याल



जुलै महिना तसा सगळीकडंच अतीपावसाचा. जुन महिन्यात जास्त पाऊस पडला तरी उन्हाळ्यात सगळीकडं कोरडं ठक्क झालेलं असतं. त्यामुळं जुनमधला पाऊस मातीमधे आतपर्यंत जाऊन सगळं भिजवतो. सगळीकडं हिरवंगार अन ताजं टवटवीत दिसू लागतं. पण जुलै महिन्यात हे सगळं चित्र पालटू लागतं. पाऊस रौद्र रूप धारण करु लागतो. काही ठिकाणी छतही गळू लागलेलं असतं. रस्त्यांमधे, रेल्वे रुळांवर सगळीकडं पाणी साचु लागतं. इतर गोष्टी जास्त महत्वाच्या असल्यामुळं सहाजिकच बागेकडं थोडंफार दुर्लक्षच होतं.

जुलै संपता संपता वाराही जोर धरु लागतो. त्यामुळं जमिनीवरची आसुपालव वगैरेंसारखी झाडं जमिनीला डोकं टेकवु पहातात, मुळं फारशी खोलवर न जाणारी पण सहा-सात फुटांपेक्षाही उंच झालेली पपई, केळीसारखी झाडं कलु लागतात. त्यात त्यांच्यावर फळं असतील तर हे हमखास होतंच. गच्चीवरच्या बागेतही बऱ्यापैकी पडझड व्हायला सुरुवात झालेली असते. पावसाला सुरुवात होण्यापुर्वी कितीही काळजी घेतलेली असली तरी थोडंफार नुकसान हे होतच असतं. जमिनीवरच्या जुन्या झाडांच्या काही वाळलेल्या फांद्या खाली पडतात तर काही फांद्या हा हा म्हणता एवढ्या वाढतात की त्या लगेच छाटणंही गरजेचं होऊन जातं. अशातच कारंदं किंवा कुठल्याही मॉर्निंग ग्लोरी कुटुंबातील वेल भराभर वाढून मुख्य झाडाचा श्वास गुदमरुन जाईल अशा प्रकारे त्यांना वेढे घालुन बसलेले असतात. उन्हाळ्यात छाटलेल्या झाडांना पालवी फुटून तिची दाटीही प्रमाणाबाहेर झालेली असते. बरं, घरातुन पहाताना हे सगळं डोळ्यांना दिसत असुनही चिखलात जाण्याची इच्छाही होत नसते.

पण थोडी उघडीप मिळताच हे सगळं सावरणं गरजेचं असतं. नाहीतर पावसाळ्यानंतर बागेची दुरवस्था झालेली असते. ती सावरण्यात पाठ-कंबर एक होते. अन तो पसारा अन कचरा काढल्यावर काय दिसतं तर बरीचशी झाडं अन वेली रोगाला बळी पडली आहेत. भाज्यांच्या वेली अन रोपांवर काही भाज्या लागल्या होत्या पण त्या एक तर पावसानं सडून गेल्या आहेत किंवा निबर झाल्या आहेत. काही विकृत आकारात वाढल्या आहेत तर काही गळून पडल्या आहेत. तेव्हा हा पसारा आवरण्यात बराच वेळ जातो. अशातच बागकामाच्या मूडला किंवा इंटरेस्टलाच सुरुंग लागू शकतो. ते तर फारच भयानक.

पाऊस जेव्हा आक्रमक असतो अन त्यामुळं आपण बागेत पाऊलही ठेऊ शकत नाही तेव्हा काय काय घडतं पहा;

विविध रोग : सगळी बाग ओलीगच्च झालेली असते. उन्ह जवळपास नसतंच अन असलं तरी त्यात फारशी उष्णता नसते. त्यामुळं बागेतील झाडांवर विविध प्रकारचे बुरशीजन्य रोग हल्ला करतात. थोडी उघडीप मिळाल्यावर मावाही हल्ला करतो. बुरशी लागलेल्या फांद्या अन पानं तोडली तर रोपावरील तेवढा भाग तसाच नवीन रोगासाठी उघडा पडतो. अधुनमधुन पडणाऱ्या पावसामुळं त्या उघड्या भागावर काही लावताही येत नाही की कसलं औषधही फवारता येत नाही. फवारलेली औषधं पाऊस पडल्यावर वाहुन जातात. उन्हाळ्यात केलेल्या मल्चिंगमुळं बुरशीला रहाण्यासाठी तयार घर मिळतं. 

कीटक अन किड : ओलसरपणा आवडणारे प्राणी म्हणजे शंख अन गोगलगायी. तसंच इतरही असंख्य प्रकारच्या अळ्या. हे सगळे आपल्या झाडांवर हल्ला करतात. कोवळी पानं खाऊन फस्त करतात. यापैकी पुढं जाऊन फुलपाखरं होणाऱ्या अळ्या सोडल्यास इतर सारेच त्रासदायक असतात. त्यांची संख्या नियंत्रणात असेल तर ठीक, पण संख्या जास्त असेल तर मात्र बागेचं काही खरं नाही.

परागीभवनात अडथळे : नैसर्गिकरित्या परागीभवन करणारे कितीतरी सैनिक पावसामुळं आपलं काम करु शकत नाहीत. त्यामुळं कित्येक मादीफुलं परागीभवनाअभावी तशीच गळुन पडतात. त्यामुळं फळं अन फळभाज्यांच्या उत्पन्नातही घट होते.

फळं तडकणे : टोमॅटो, लिंबू वगैरे काही फळं आहेत ज्यांना पाणी जास्त झाल्यास ती तडकतात. झाडानं जास्त पाणी प्याय़लं की अशा फळांची त्वचा फाटते. अशी फाटलेली जागा बुरशीजन्य रोगांनाही आमंत्रण देते. म्हणून पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं, अन वरुन संततधार लागली तर त्यापासुनही बचाव करण्याची गरज असते.

अनावश्यक गवत : बागेत वावर कमी असेल तर तसंच रोपां-झाडांमधली माती नियमितपणं खुरपणं थांबल्यावर तण अन गवत वाढत जातं. तणांची वाढही इतकी प्रचंड वेगानं होत असते की दोन दिवसांपूर्वी दोन इंचांचं एखाद्या मिलीमिटरएवढी जाड दांडी असलेलं रोपटंही आठ दहा इंचांचं होऊन त्यावर कळ्या आलेल्या असतात. तण वेळेत काढले नाहीत तर नंतर कामही वाढतं, अन तेव्हा ते अधिक कष्टाचंही होतं. अन तोपर्यंत किडींनाही नवीन आश्रय मिळतो.

यासाठी, पावसाची उघडीप मिळताच पायात रबरी बूट, हातात मोजे. डासांपासून बचाव म्हणून अंगभर कपडे घालायचे अन बागेत उतरायचं. जवळ धारदार कात्री वा सिकेटर, खुरपं घ्यायचं. पालापाचोळा, गवत अन छाटलेल्या फांद्या ठेवण्यासाठी एखादा टब किंवा टोपलीही घ्यायची अन लागायचं कामाला.

सर्वात आधी आपण लावलेल्या झाडांना मोकळा श्वास घेता येईल याची व्यवस्था करा. आळ्यातलं वा कुंडीमधलं गवत काढून याचे तुकडे करुन ते तिथंच गाडा. रोपांवर वेल चढले असतील तर तेही सावकाश हलक्या हातानं सोडवुन घेऊन त्याचेही तुकडे करुन जागीच गाडा. हे करत असताना मुख्य झाडाआ धक्का लागणार नाही. त्यावर काही फुलं अथवा फळं असतील तर ती तुटणार नाहीत याची काळजी घ्या. आळी मोकळी झाल्यावर आळ्यांमधे पाणी साचून रहातंय का ते पहा. साचत असेल तर आळं तोडून पाणी वाहून जाईल याची व्यवस्था करा. आळ्यांमधली पानं व इतर काडीकचरा अन नंतर गवत घातलं असेल तर ते मातीमधे व्यवस्थित मिसळून घ्या. थोडी नीमपेंड पसरुन घाला. कोरडं कंपोस्ट अथवा चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर ते वरुन पसरुन द्या. यामुळं अधिकचा ओलावाही शोषला जाईल अन पावसाळ्याच्या सुरुवातीला दिलेल्या खतांमधली अन्नंद्रव्यं जर वाहून गेली असतील तर तीही पुन्हा झाडांना मिळतील. हे खासकरुन कुंड्यांसाठी अवश्य करावं.

कुंड्यांमधे झाडं असतील तर त्यांच्याभोवती पाणी साठून रहाणार नाही याची काळजी घ्या. कुंड्या विटांवर वा तत्सम काही वस्तूंवर ठेऊन खालून पाणी आत शोषलं जाणार नाही याची काळजी घ्या. त्यांची पाणी वाहून जाण्यासाठी केलेली छिद्रं मोकळी करुन घ्या. छतावरुन पडणारं पाणी जर जवळपासच्या झाडांजवळ किंवा वाफे केले असतील तर तिथं जमा होत असेल तर त्याला योग्य ती दिशा देऊन झाडांपाशी मुरणार नाही हे बघा. वाफे पावसाच्या जोरानं खाली बसले असतील तर त्यांच्या कडा उंचावुन घ्या. जेणेकरुन बाहेरचं पाणी आत घुसणार नाही. अर्थात मधे खोलगटपणा करु नका. नाहीतर त्यावर पडलेलं पाणी तिथंच साठेल. शक्य तेवढं करुनही काही झाडं पावसाच्या माऱ्याला तोंड देणार नाहीत असं वाटत असेल तर त्याच्या फांद्या काढून काही रोपं तयार करायला ठेवा. म्हणजे तुमच्याकडं पर्यायी व्यवस्था उपलब्ध असेल.

वर्षभर बागेत प्रचंड कामं असतात. फक्त प्रत्येक ऋतुप्रमाणं ती बदलत असतात. पावसाळ्यात तसा बऱ्यापैकी आराम असला तरी बागेचा पावसापासून बचाव करणं हे सगळ्यात महत्वाचं काम असतं. अन ते ठराविक दिवसांनी करावंच लागतं. तेव्हा चिखलात हातच नव्हे तर पायही घालण्याची तयारी ठेवा. पण हो, स्वतःला सांभाळूनच. उगीच पाय घसरुन पडाल. आकाश रात्री बघायला छान वाटतं. पण दिवसा बागेत पाठीवर पडून ते तितकंसं छान नाही वाटत.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...