गच्चीवरचा पोर्टेबल मांडव (DIY)

गच्चीवरचा पोर्टेबल मांडव (DIY)




आपल्यापैकी बरेचजणांची बाग गच्चीवर आहे. मग ती गच्ची स्वतःच्या बंगल्याची असो की सोसायटीची असो. अशा गच्चीवर कुंड्यांमधे फुलझाडं, फळझाडं, भाज्या वगैरे तर आपण नेहमीच लावत असाल. पण जेव्हा वेलवर्गीय भाज्या किंवा फुलं लावता तेव्हा त्या वेलींना वर चढण्यासाठी आधार देण्याची गरज असते. अशा वेळी काही कायमस्वरुपी व्यवस्था असेल तर उत्तमच. पण एखादा मांडव जो आपल्या गरजेप्रमाणं केव्हाही कुठंही हलवता येऊ शकेल किंवा काढून ठेवता येत असेल, अन हे सारं कमी खर्चात अन स्वतः, म्हणजे बाहेरील कुणाचीही मोबदला देऊन मदत न घेता करता येत असेल तर? मी माझ्या घराच्या गच्चीवर गेल्याच महिन्यात असा एक मांडव तयार केला. अगदी एकट्यानं. वय अन कंबरेच्या दुखण्यामुळं बंधनं आली आहेत म्हणून मला दोन दिवस लागले. त्यात सतत पाऊसही सुरु होता. पण सारं साहित्य तयार असेल तर तुम्ही सिमेंटच्या क्युअरिंगचे चोवीस तास वेगळे काढलेत तर अक्षरशः तासाभरात हा मांडव उभा करुन त्यावर वेली सोडू शकता. लागणारं साहित्य अन सोबत जोडलेल्या फोटोंवरुन तुम्हालाही कल्पना येईल अन तुम्हीही असा मांडव तुमच्या गच्चीवर उभा करु शकाल. याहीपेक्षा सुंदर अन स्टर्डी.

साहित्य : १० फूट लांबी बाय ६ फूट रुंदी बाय ७ फूट उंचीच्या मांडवासाठी

अर्धा इंच व्यासाचे पीव्हीसी पाईप्स ६ (आपली गरज अन उपलब्ध जागेप्रमाणं ही संख्या वाढू शकेल.)
थ्री वे कनेक्टर्स  ४
कपलर्स २
पत्र्याचे डबे किंवा प्लास्टिकच्या कुंड्या अथवा रंगाच्या बादल्या ४
सिमेंट ४ किलो
वाळू व/वा विटांचा चुरा ४ घमेली
करवत किंवा करवतीप्रमाणं दाते असलेली सुरी.
जाळी बांधण्यासाठी नायलॉन दोरी किंवा काथ्या

हार्डवेअर स्टोअरमधे हे पाईप्स, त्याला लागणारे कपलर्स, कनेक्टर्स मिळतात. माझी गरज वर दिलेल्या मापानुसार असल्यानं मी असे ६ पाईप्स आणले. दुकानदार विकताना हे पाईप जरी दहा फूट असल्याचं सांगत असले तरी ते ३ ते ४ इंच कमीच असतात. हे अशासाठी सांगितलं की कागदावर गणितं सोडवून साहित्य आणण्यापेक्षा प्रत्यक्ष साहित्य पाहूनच मापं घ्यावीत. (हेलपाटे वाचवण्यासाठी उरलेलं सामान तसंच्या तसं असल्यास परत घेण्याच्या बोलीवरच घ्यावं.)

(एक सूचना : अर्धा इंच व्यासाचे पाईप्स दोऱ्या बांधताना दिल्या गेलेल्या ताणामुळं वाकतात किंवा नंतर दुधी भोपळा वगैरेंच्या वजनानंही वाकतात. त्यामुळं एक इंच व्यासाचा पाईप घेतला तरी चालेल.) 

मला उंची दहा फूट नको होती कारण माझ्या पत्नीला उभ्याने, स्टूल वा शिडीचा वापर न करताही भाज्या सहजासहजी काढता याव्यात म्हणून. तर या सोयीसाठी म्हणून ७ फूटांची उंची घेण्याचं ठरवलं. त्यानुसार सात फूट लांबीचे चार पाईप्स कापून घेतले. हे जे चार छोटे तुकडे मिळाले ते एका कपलरच्या सहाय्यानं दोन तुकडे जोडून घेतल्यामुळं मांडवाच्या रुंदीसाठीचे दोन पाईप्स तयार झाले. ते प्रत्येकी झाले साधारण सव्वासहा फूट लांब. ही झाली माझ्या मांडवाची रुंदी. दहा फूटी दोन पाईप्स लांबीसाठी वापरले. त्यामुळं मांडवाचा आकार झाला १० (९’९") बाय ६’३" बाय ७ फूट.

माझ्याकडं पत्र्याचे चार डबे होते. १५ लिटर तेलाचे असतात ते. त्यांना खाली अन बाजूंना आधी लोखंडी टोच्याच्या सहाय्यानं छिद्रं पाडून घेतली. नंतर त्यात पाईप मध्यभागी उभा धरुन बाजुनं डबा अर्धा भरेल एवढा विटांचा चुरा टाकला. (मला वाळू मिळणं खूपच कठीण गेलं. त्यामुळं मी तो नाद सोडून दिला.) हातोडीच्या सहाय्यानं विटांचा चुरा व्यवस्थित दाबून घेऊन पाईप त्यात विनाआधार उभा राहील असं पाहिलं. त्यावर पाणी मारुन तो चुरा ओलसर करुन घेऊन त्यावर एक किलो सिमेंट पिठल्यासारखं ओलसर कालवुन घेऊन ओतलं. डबा व्यवस्थित हलवल्यावर ते सिमेंट सरळ लेव्हलला येतं. असे चारही डबे करुन त्यात पाईप उभे केले. सिमेंट वाळल्यावर रात्रभर डब्यात वर एक दीड इंच राहील एवढं पाणी भरून ठेवलं. 

सकाळी सिमेंट घट्ट बसलेलं दिसलं. पाईप हलवुन पाहिला तर तो व्यवस्थित उभा होता. डब्यातल्या सिमेंटच्या लेव्हलवर येतील अशी चारही बाजूंनी छिद्रं करुन घेतली अन त्यातील पाणी वाहून जाऊ दिलं. अर्धा डबाच का, कारण एक तर पूर्ण डबा भरण्याएवढी आपली गरज नाही. अन दुसरं म्हणजे डब्याच्या वरच्या उरलेल्या अर्ध्या भागात माती घालून काही रोपं, शक्यतो पोलिनेटर्सना आकर्षित करुन घेणारी फुलझाडं लावता यावीत किंवा चिनी गुलाब सारखी मुळांची वाढ कमी असणारी रोपं लावता यावीत यासाठी. यानंतर या पिलर पाईपच्या टोकाला थ्री वे कनेक्टर बसवला. डबे योग्य त्या अंतरावर अन हवे तिथं ठेवल्यावर वरचे लांबी अन रुंदी वाले पाईप्स जोडून घेतले. हा झाला मांडवाचा सांगाडा. हे कनेक्टर्स जोडताना ते वारंवार निघू नयेत म्हणूण सोल्युशनही हार्डवेअरच्या दुकानात मिळतं. पण मग असे पाईप्स त्यातुन सोडवता येत नाहीत. त्यामुळं मांडव एकदा फिक्स झाला की काढता येत नाही. म्हणून मी सोल्युशन वापरलं नाही. ज्यांची इच्छा आहे ते सोल्युशन वापरुन मांडव कायमस्वरुपी करु शकतात.

हा झाला सांगाडा. नंतर यावर उभ्या आडव्या अशा नायलॉनच्या दोऱ्या बांधून झाल्यावर तयार झाला पोर्टेबल मांडव. नायलॉनच्या दोऱ्यांऐवजी तुम्ही काथ्याही वापरु शकता. पण उन्ह-पाऊस यामुळं काथ्या लवकर खराब होतो अन हे काम दर वर्षी करावं लागतं. म्हणून मी काथ्या वापरला नाही. नायलॉनची दोरी वापरलीत तर ती किमान ५ वर्षं तरी नक्कीच टिकेल. या मांडवाचं आयुष्य किमान आठ ते दहा वर्षं धरुन चालायला हरकत नाही. वापरलेले पाईप्स कसे आहेत यावर सारं अवलंबुन आहे. पण हे पाईप बऱ्यापैकी टिकतात.

दोऱ्या बांधताना आपण त्या घट्ट बांधतो अन त्यामुळं वरच्या चौकटीचा शेप बदलुन समोरासमोरच्या दोन्ही बाजू आत वळुन आयताचा आकार जातो. त्यामुळं दोऱ्या बांधताना सैलसर बांधल्या तर उत्तम. फक्त फळं लागल्यावर त्या खाली झुकतील. हे टाळण्यासाठी थोड बजेट वाढवावं लागेल. म्हणजे मोठ्या लांबीच्या मध्यभागी समोरासमोर दोन उभे पाईप घेऊन, चार पायांएवढीच उंची घेऊन ते पाईप वरच्या आडव्या पाईपला "टी" कनेक्टरनं जोडून घ्यायचे. म्हणजे ते खाली झुकणार नाहीत. किंवा दुसरा पर्याय म्हणजे इथं "टी" कनेक्टर घेण्याऐवजी चार कोपऱ्यांसाठी घेतलेला थ्री वे कनेक्टर घेऊन वरही रुंदीच्याच मापाएवढा पाईप लावून लांबीच्या दोन्ही बाजू वरच्याही बाजूनं जोडून घ्यायच्य़ा. हे दोन वाढीव खांब खाली टेकण्यासाठी तुम्ही अजुन दोन डबे घेऊन तेही आधीच्याच पद्धतीनं विटांचा चुरा अन सिमेंटच्या सहाय्यानं पाया बनवु शकता अन त्यातही हवी ती रोपं लावू शकता.

मांडव तयार केल्यावर त्यावर तुम्ही वेली चढवु शकता. उन्हाळ्यात जेव्हा वेलवर्गीय भाज्या नसतील तेव्हा याच मांडवावर पातळसर कापडं, जुन्या साड्या किंवा ओढण्या घालून शेडनेट करुन नाजूक रोपांचं तीव्र उन्हापासून संरक्षण करु शकता. तसंच टोमॅटो, वांगी सारखी रोपं ज्यांना आधार लागतो तीही या मांडवाखाली ठेवुन वरुन दोऱ्या सोडून त्या रोपांना बांधू शकता. तसंच चवळी वगैरेंसारख्या वेलीही यावर आपण चढवु शकता. फक्त मांडवावर जास्त दाटी होणार नाही अन मुख्य म्हणजे क्रॉस पॉलिनेशन होणार नाही यासाठी मोजक्याच वेली यावर चढवाव्यात.

पहा करुन. दोऱ्या बांधल्यावर अन वेली चढल्यावर मूळचा आयताकार नक्कीच जातो. कधी तर चार खांब ९० अंशात न राहून वरच्या बाजूनं वयोवृद्ध झाल्यासारखे वाकलेलेही दिसतील, पण हरकत नाही. आपलं लक्ष्य आहे वेलवर्गीय भाज्या घेणं, मांडव बांधणं नव्हे. मांडव हे एक माध्यम आहे किंवा वेलींची ती गरज आहे. साध्य नव्हे.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...