एप्सम सॉल्ट - बागेत वापरावं की वापरु नये?

एप्सम सॉल्ट - बागेत वापरावं की वापरु नये?



आजकाल बागकामातले सारेच तज्ञ कुठल्याही प्रश्नावर दोन उत्तरं हमखास देत असतात. एक म्हणजे कांद्याच्या सालींचं पाणी आणि दुसरं म्हणजे एप्सम सॉल्ट. या कांद्याच्या सालींच्या पाण्यावर नंतर केव्हातरी, पण आज एप्सम सॉल्टवर चर्चा करुया. बागकामांतील तज्ञ, अनेक ऑनलाईन सल्ले देणाऱ्या साईट्स अन ब्लॉगर्स पॉटींग मिक्स तयार करण्यापासून ते रोपांना फळं-फुलं धरेनाशी झाल्यावर एप्सम सॉल्ट वापरण्याचाच सल्ला देत असतात. परंतु याचा नियमित किंवा अती वापर केल्यास फारसा फायदा तर होत नाहीच पण तोटेच जास्त होतात.

काय असतं हे एप्सम सॉल्ट? तर एप्सम सॉल्ट म्हणजेच मॅग्नेशिअम सल्फेट अर्थात MgSO4 हे आहे एक रासायनिक संयुग. यात असतं मॅग्नेशिअम, सल्फर आणि ऑक्सिजन. हे अर्थातच कुठंतरी "बनवलं" जातं. म्हणजेच हे ना नैसर्गिक आहे ना सेंद्रिय. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास या एप्सम सॉल्टमधे असतं मॅग्नेशिअम, सल्फर आणि थोडं पाणी. खरंतर हे एप्सम सॉल्ट जे बनवलं जातं अन मेडिकल दुकानांतुन विकलं जातं ते वेगळ्याच म्हणजे औषधी उपचार व इतर शारिरीक व्याधींवरील उपचार वगैरे या कारणांसाठी असतं. बागेतील उपयोगांसाठी ते बनवलेलंच नसतं. अन्यथा ते नर्सरीज किंवा ऍग्रीकल्चरल स्टोअर्समधे उपलब्ध असतं. 

वनस्पतींना वाढीसाठी अन फुलण्या-फळण्यासाठी त्यांच्या जीवनकालात जी काही अन्नद्रव्यं लागतात त्यामधे मॅग्नेशिअम हे एक अत्यल्प प्रमाणात लागणारं अन्नद्रव्य आहे. म्हणजे ज्याला आपण दुय्यम अन्नद्रव्यं म्हणजेच सेकंडरी न्युट्रिअंट म्हणतो ते. आणि पृथ्वीच्या पाठीवरच्या बहुतांश भागातील मातीमधे हे मॅग्नेशिअम आवश्यक त्या प्रमाणात असतंच. काही ठिकाणी ते जास्तही असु शकतं. पण अजिबात नाही असा भूभाग अभावानंच असेल.

मॅग्नेशिअमबरोबरच या एप्सम सॉल्टमधे असलेला दुसरा घटक म्हणजे सल्फेट. सल्फेटमधे असतं सल्फर आणि ऑक्सिजन. हा सल्फेटही मातीमधे उपलब्ध असतो अन तोही वनस्पतींसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांपैकी एक दुय्यम अन्नद्रव्य म्हणजेच सेकंडरी न्युट्रिअंटच आहे. मातीमधील हा सल्फेटही वनस्पतींची मुळं झाडाच्या आवश्यकतेनुसार हवा तेवढाच शोषून घेत असतात.

असं असताना हे दोन्ही घटक वेगळे वरतुन देण्याची आवश्यकता नसते. किंबहुना ते तसे दिले गेल्यास मातीमधील त्यांचं नैसर्गिकरीत्या असलेलं प्रमाण अन रेशोच आपण बिघडवत असतो. जर आपण बागेतील त्यातही खास करुन कुंडीतील झाडांना नियमितपणं कंपोस्ट देत असाल तर हे दोन्ही घटक वनस्पतींसाठी उपलब्ध होतच असतात.

तथाकथित वा स्वयंघोषित जाणकार, तज्ञ मंडळींकडून वनस्पतींमधील काही रोगांवर अन लक्षणांवर हे एप्सम सॉल्ट वापरण्यासाठी सांगितलं जातं. उदा.

टोमॅटोवर पडणाऱ्या "ब्लॉसम एंड रॉट"साठी. याला कारणीभूत असतं ते म्हणजे कॅल्शिअमची कमतरता वा पाणी देण्यामधली अनियमितता. ती भरुन काढण्यासाठी कॅल्शिअमच देण्याची आवश्यकता असते. त्याऐवजी मॅग्नेशिअम देऊन चालणार नाही. अन पाणीही नियमितपणं द्यावं लागतं. या कारणासाठी जर एप्सम सॉल्ट दिलं तर कुंडीत मॅग्नेशिअमचं प्रमाण वाढेल अन मुळं मॅग्नेशिअमच जास्त घेतील, कॅल्शिअम वरुन दिला गेला तरी. परिणामी मूळ रोग तसाच राहील किंवा वाढेलही कारण कॅल्शिअमची कमतरता तशीच रहाणार. म्हणून या रोगासाठी कॅल्शिअमयुक्त खतंच देणं अन मल्चिंगसारखे उपाय प्रभावी ठरत असतात.
वनस्पतींची पानं पिवळी पडणं ही तशी साधारण बाब असते. पण पानं अकाली पिवळी पडणं वा हिरवेपणा कमी होणं यासाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात. त्यातही मुख्यत्वे लोहाची कमतरता हे कारण जास्त जबाबदार असतं. ती भरुन काढण्यासाठी लोहयुक्त खतं देणंच गरजेचं असतं. एप्सम सॉल्ट ही कमतरता भरून काढू शकत नाही. खारं तर एप्सम सॉल्टच काय पण हा रोग कुठल्याही फवारणीनं आटोक्यात येत नाही, तर त्यासाठी जे उपाय करायचे असतात ते मातीतुनच करायचे असतात. अन आपल्या बागेत त्यासाठी (सेंद्रीय) खतांचीच मदत होते.
बियांची उगवण चांगली अन उगवण्याची टक्केवारी वाढवण्यासाठी म्हणूनही एप्सम सॉल्ट वापरायला सांगितलं जातं. निसर्गतः जेव्हा वनस्पतींच्या पुढील पिढीसाठी बियांची निर्मिती केली जाते तेव्हा त्या बियांमधे माती, पाणी अन हवा यांच्या संपर्कात येईपर्यंत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी जे काही लागतं ते सारं काही आतमधेच उपलब्ध करुन ठेवलेलं असतं. हे निसर्गतःच होत असतं. आपण जेव्हा या बिया आपल्या बागेत लावतो तेव्हा फक्त या तीन गोष्टी त्यांना उपलब्ध करुन देण्याची गरज असते, मानवाचा हस्तक्षेप असलाच तर तो इतकाच. अन्यथा बिया या तीन आवश्यक गोष्टी मिळाल्यावर रुजतच असतात. त्यामुळं एप्सम सॉल्ट दिल्यामुळं बिया हमखास रुजतात हा भ्रम आहे. काही प्रकारच्या बिया वा कंद तर हवा अन पाणी यांच्या संपर्कात आल्यावरही रुजत असताना आपण पहातो. उदा. कारंद, कांदा, सूबाभूळ, कडधान्यं वगैरे वगैरे.
इनडोअर प्लांट्ससाठीही एप्सम सॉल्ट देण्यास सांगितलं जातं. इनडोअर प्लांट्सची पाण्याची गरज अल्प असते. यांचं पॉटींग मिक्सही एरवीपेक्षा वेगळं असतं. या वनस्पतींना लागणारी अन्नद्रव्यं कंपोस्ट वा इतर सेंद्रीय खतांमधुन मिळतच असतात. अशा रोपांना पाणी जास्त दिलं जात नसल्यानं खतं अन अन्नद्रव्यं वाहून जाण्याची शक्यता नसते. त्यामुळं जी अन्नद्रव्यं नियमित अन जास्त प्रमाणात वापरली जात नाहीत ती वाहून न जाता कुंडीतच रहात असतात. परिणामी ती मुळांना उपयोगी ठरण्याऐवजी त्रासदायक ठरत असतात. छोट्या आकाराच्या कुंडीतल्या मातीत जास्त प्रमाणात घातलेलं मॅग्नेशिअम अन सल्फेट उपयोगाविना तसंच पडून राहिल्यास ते मुळांना अपायकारकच ठरतं.
झाडांवर फुलं फळं कमी लागत असतील तरीही एप्सम सॉल्ट वापरण्यास सांगितलं जात असतं. मुळात म्हणजे झाडं जर फुलांना अन फळांना जन्म देण्यास सक्षम असतील तर आणि तरच ती फुलतात वा फळतात. दुसरं म्हणजे झाडांना फुलण्यासाठी योग्य अन पोषक वातावरण असेल तर ती फुलणारच. या दोन्ही गोष्टींसाठी योग्य ती खतं योग्य त्या प्रमाणात देणं, वेळच्या वेळी पाणी देणं हेच सर्वात जास्त महत्वाचं असतं. रोपांसाठीची माती मुख्य अन्नद्रव्यांनी युक्त असेल तर फुलं वा फळं येणं हे होतच असतं. जर फुलं वा फळं येत नसतील तर त्याची कारणं वेगळी असु शकतील. ती शोधण्याची अन त्यावर उपाय करण्याची गरज असते. परंतु केवळ कुणीतरी सांगतंय म्हणून काहीही उपाय करणं चुकीचं असतं. केवळ चुकीचंच नव्हे तर त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. त्यामुळं खतपाणी वेळच्यावेळी करणं हाच उपाय करणं आवश्यक आहे.

इथं एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे अन ती म्हणजे मातीमधे सर्वच अन्नद्रव्यं एका ठराविक प्रमाणात निसर्गतःच असतात. आपण जेव्हा वरखतं देत असतो तेव्हा हे प्रमाण बिघडत असतं. पीकं घेतल्यानंतर मातीमधली अन्नद्रव्यं नक्कीच कमी होत असतात अन त्यांचं गुणोत्तरही बदलत असतं. पण जेव्हा आपण पीकांच्या एका हंगामानंतर थोडे दिवस त्या मातीला विश्रांती देत असतो तेव्हा हे गुणोत्तर निसर्गतःच पूर्ववत होत असतं. अन यासाठीच बागेतील वापरलेल्या मातीला काही काळ विश्रांती दिली जात असते. जमिनीवरील बागेतही हे पथ्य पाळलं जात असतं. फक्त मातीमधली मुख्य अन्नद्रव्यं म्हणजे उदा. एन, पी, के, कॅल्शिअम वगैरे पीकांच्या वाढीदरम्यान जास्त प्रमाणात वापरली जात असल्यानं अन त्यांचं पुनर्भरण होण्याचा वेग तुलनेनं मंद असल्यामुळंच ती खतांद्वारे दिली जातात. अन्यथा तीही आपल्याला द्यावी लागली नसती.

परंतु जी अन्नद्रव्यं दुय्यम अन्नद्रव्य म्हणजेच सेकंडरी न्युट्रिअंट्स या सदरात मोडतात ती वनस्पती अल्प प्रमाणात घेत असतात अन ती मातीमधे पुन्हा नैसर्गिक रित्या तयारही होत असतात. त्यामुळं ती वरुन देण्याची आवश्यकता नसते. एक नैसर्गिक सत्य आपण लक्षात घ्यायला हवं अन ते म्हणजे जे अधिकचं असतं अन जे वापरलं जात नसतं ते कुठंतरी साचत रहातं. मग ते फॅट म्हणजे मेद असो वा इतर काहीही. एप्सम सॉल्टद्वारे मिळणारं अधिकचं मॅग्नेशिअम अन सल्फेट हेही कुठं ना कुठ साचतच जात असतं. एप्सम सॉल्ट हे पाण्यात विरघळणारं अन परिणामी प्रवाही असल्यामुळं ते आपल्या गच्चीवरल्या बागेतुन वहात जाऊन जमिनीतच कुठं ना कुठं साचत जातं. म्हणजेच आपण नकळत मातीमधील अन्नद्रव्यांचं गुणोत्तर बिघडवत असतो. वेगळ्या शब्दांत सांगायचं झाल्यास हेही एक प्रकारचं प्रदूषणच. अन त्याला आपलाच हातभार लागत असतो.

पण मग एप्सम सॉल्ट बागेत वापरायचं की नाही? तर बागेपेक्षा ते मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या शेतीमधे जास्त फायद्याचं होऊ शकेल. अर्थात जर मातीचं परीक्षण केल्यावर त्यात मॅग्नेशिअम अन सल्फेटची तीव्र कमतरता असेल तरच. अन अशा मातीत घेतल्या जाणाऱ्या पीकाची या अन्नद्रव्यांची ती गरज असेल तरच. अन्यथा जगात या एप्सम सॉल्टविनाही असंख्य बागा फुललेल्या अन फळलेल्या आहेतच की. तेव्हा अशा गरज नसलेल्या गोष्टींचा वापर आपल्या बागेत करु नये. त्यामुळं फायदा तर काहीच होत नाही, उलट झालंच तर नुकसानच जास्त आहे, तुमच्या बागेला अन पर्यावरणालाही.

©राजन लोहगांवकर
®वानस्पत्य
https://vaanaspatya.blogspot.com/
https://www.facebook.com/Vaanaspatya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...