पावसाळ्यानंतरची बागेतील कामे

पावसाळ्यानंतरची बागेतील कामे


पावसाळा आता बऱ्यापैकी संपत आला आहे. शेवटचा तडाखा देऊनच जरी तो जाणार असला तरी ते दिवसही फार दूर नाहीत. चार ऑक्टोबरपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु होईल त्यामुळं साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस गेलेला असेल. त्यानंतर आपल्याला बागेत प्रचंड कामं असतील. पावसानं, त्यातुनही शेवटी काहीसा धसमुसळेपणानं पडलेल्या पावसामुळं बागेत खूपच पडझड झाली असेल. आपापल्या रहाण्याच्या ठिकाणानुसार या पडझडीचं प्रमाण कमीअधिक असु शकेल. पण तरीही त्यामुळं कामं कमी होणार नाहीत.

त्यातुन आपल्याला हिवाळ्यासाठीही बागेची तयारी करायची आहे. पण ते सारं नंतर आधी आपल्याला आपली बाग सावरायची आहे. तर वादळानंतर किंवा खूप दिवसांनी परत येऊन आपलं बंद घर उघडून जसं आपण पदर खोचुन किंवा बाह्या सरसावुन कामाला लागतो तसंच बागेतही पुष्कळ कामं करायची आहेत. ती कुठली ते आपण क्रमाक्रमानं पाहू.

बागेची साफसफाई : सर्वात आधी बाग छोटी असो की मोठी, ती साफ करायला घेणं महत्वाचं. पावसाळ्यात झाडं अस्ताव्यस्त वाढून एकमेकांत गुंतली असतील तर ती सोडवुन घेऊन प्रत्येकाला आपापल्या पायावर उभं करावं लागेल. कुंड्यांमधे किंवा झाडांच्या आळ्यांत आपण पावसाळ्यापूर्वी मल्चिंग केलं असेल. त्यातलं सारंच डिकंपोज झालं नसेल. काटक्यांचे काही अवशेष अन पालापाचोळ्यामधल्या जाडसर पानांचेही अवशेष तसेच असणं शक्य आहे. त्यामधले मोठे तुकडे काढून एका ठिकाणी गोळा करुन घ्या. सगळा कचरा एकत्र केल्यावर त्याला दोन दिवस मोकळी हवा खाऊ द्या. नंतर जमेल तसं हे सगळं बारीक करा. काड्याकाटक्या आतुन पोकळ झाल्याच असतील. त्या लगेचच साध्या हातानंही मोडतील. पानं मात्र हातानं कुस्करुन मोडणार नाहीत. थोडीच असतील तर कात्रीनं कापून घ्या अन जास्त असतील तर राहुद्या तशीच. नंतर ढीगाच्या आकारानुसार एखादं पोतं किंवा ड्रम अन बाग जमिनीवरची असेल तर एका बाजुला ढीग करुन त्यावर जे काही कल्चर किंवा पूर्ण तयार झालेलं कंपोस्ट असेल तर ते घालुन घ्या. एखादी बुरशी पावडर असेल तर तीही आकाराच्या प्रमाणानुसार चमचा दोन चमचे घातलीत तर उत्तम. याचं तीन ते चार आठवड्यात उत्तम कंपोस्ट तयार होईल.

मल्चिंगच्या अवशेषांसोबतच काही तण उगवले असतील. पक्षांच्या कृपेनं काही नको ती रोपं, वेली अन गवत उगवलं असेल. ते कुंडीतल्या आपण लावलेल्या झाडाच्या मुळावर उठण्याची शक्यता असते. या अशा नको त्या रोपांमधे वा तणांमधे बहुतेक वेळा, उंबर, पिंपळ यासोबतीनंच नाजुक फुलांच्या वेली अन मायाळू सारख्या वेलीही दिसतील. यापैकी जी हवीत ती रोपं काढून घेऊन त्यांची वेगळी व्यवस्था करा. बाकीचं तण कंपोस्टच्या ढीगात जाऊद्या, अर्थातच तुकडे करुन. नाहीतर ते तिथं पुन्हा नव्यानं जोम धरुन उभं रहायचं. यानंतर झाडांभोवतीची माती मोकळी करुन घ्या. कुंड्यांना पाणी वाहुन जाण्यासाठी केलेली छिद्रं बुजली असतील तर तीही मोकळी करुन घ्या.

झाडांची छाटणी : पावसाळ्यात झाडांची अफाट वाढ झाली असेल. पावसादरम्यान जर बागेत लक्ष दिलं नसेल तर रोपं जागा मिळेल तशी वाढली असतील. कुंड्या जवळ जवळ असतील तर ती एकमेकांत गुंतलीही असतील. भाज्यांची रोपं असतील तर आता पावसाचा जोर कमी होत आल्यानं त्यांवर फुलं किंवा क्वचित फळंही धरली असतील. तेव्हा सारा गुंता हलक्या हातानं सोडवुन घ्या. शक्यतो फळं वा फुलं असलेल्या फांद्या तुटणार नाहीत किंवा दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. खराब वा रोगग्रस्त पानं अन फांद्या छाटुन वेगळ्या ठेवा. या नंतर आपल्याला नष्ट करायच्या आहेत. अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या छाटून घेऊन झाडाला व्यवस्थित आकार द्या.

हेच आपल्याला आंबा, चिकू वगैरे फळझाडांच्याही बाबतीत करायचं आहे. लगेचच येणाऱ्या पुढच्या सीझनला आपल्याला भरपूर फळं हवी असतील तर आताच हे करणं गरजेचं आहे. जमिनीलगतच्या साऱ्या फांद्या छाटून घ्या. ज्या फुलझाडांच्या फांद्यांपासून नवीन रोपनिर्मिती होणं शक्य असेल त्या फांद्यांमधून पेन्सिलीच्या जाडीएवढ्या फांद्या वेगळ्या काढून ठेवा. तुम्हाला हव्या असतील तर रोपं करण्यासाठी ठेवा किंवा कुणाला द्यायच्या असतील तर देऊन टाका. मोठ्या फळझाडांच्या फांद्या छाटतानाखालच्या फांद्या छाटुन घ्या. झाडाच्या सर्व भागावर उन्ह पडेल अशा पद्धतीनं फांद्यांचा आकार अन संख्या कमी करा. छाटलेल्या फांद्या जमेल तेवढे छोटे तुकडे करुन कोपऱ्यात रचुन ठेवा. याचा उपयोग अजुन बारीक तुकडे करुन मल्चिंगसाठी होईल किंवा सरळ फांद्या वेली वा तोमॅटो वगैरेंसारख्या फळभाज्यांना आधार म्हणून उपयोगी पडतील. बाकी वाकड्यातिकड्या फांद्या जाळून त्याची राख उपयोगात आणता येईल. झाडावरच्या फांद्या छाटलेल्या उघड्या भागावर कीटकनाशक किंवा हळद लावा. त्यामुळं बुरशी वा इतर कुठली कीड लागणार नाही.

खतं देणं : पावसामुळं आपण वेळोवेळी दिलेली खतं वाहून गेली असतील. खास करुन कुंड्यांमधे हे शक्य आहे. त्यामुळं आता नेहमीप्रमाणं खतं देण्यास सुरुवात करण्यास हरकत नाही. कुंडीमधे खत देण्याची पद्धत अन प्रमाण हे याआधी अनेकदा सांगितलं आहेच. कुंडीतील मातीचा वरचा एक इंचाचा थर भरेल एवढं खत माती मोकळी करुन देऊन त्यावरुन माती सारखी करुन घ्यायची आहे. जमिनीवरच्या झाडांनाही त्यांच्या आकारानुसार अन वयानुसार खतं द्यायची आहेत. मोठ्या फळझाडांना साधारण दोन ते तीन घमेली शेणखत आळ्यातली माती उकरुन त्यात मिसळून द्यायचं आहे. कुंड्यांमधे खत देताना शेणखताऐवजी कंपोस्ट दिल्यास छोट्या झाडांना ते पचायला सोपं जाईल. या सोबतच बागेच्या सर्व प्रकारात खताच्या प्रमाणात नीमपेंड, बोनमील अन सोबतीला चमचाभर ट्रायकोडर्मा द्यावी. झाडांच्या मुळांतली माती अजुन काहीशी ओलसर असेल त्यामुळं बुरशीजन्य रोग लागु नयेत म्हणून ही काळजी घ्यायची आहे. यानंतर खतं नियमितपणं द्यायची आहेत.

पाणी देणं : खतं दिल्यानंतर पाऊस अजिबात नसेल तर थोडं पाणी देऊन खतं ओली होतील याची काळजी घ्या. नंतर पुढच्या पाच सहा दिवसांत पाऊस पडला नाही तर पाणी द्या. तुमच्या भागात ऑक्टोबर हीट किती आहे हे पाहून पाण्याच्या पाळ्या ठरवुन घ्या. कुठं रोज पाणी द्यावं लागेल तर कुठं चार पाच दिवसांतुन पाणी द्यावं लागेल. जमिनीवरच्या बागेत जर पाऊस उत्तम पडला असेल तर एवढ्या पाणी देण्याची गरज नाही. पाऊस अल्प प्रमाणात झाला असेल तर पानं कोमेजल्यासारखी वाटली तरच पाणी द्यावं. जमिनीवरच्या बागेतली झाडं पाण्याच्या शोधासाठी मुळं मातीत खोलवर पाठवत असताट. त्यामुळं तिथं चिंतेचं कारण नाही. यासाठी फक्त बागेचं नियमित निरीक्षण करणं गरजेचं आहे. सकाळी वा संध्याकाळी पानं मलूल पडली असतील तरच पाणी देणं गरजेचं आहे. दुपारच्या तीव्र उन्हात पानांचं मलूल पडणं हे नैसर्गिकच आहे.

पाऊस कमी होत असतानाच ही कामं करुन घ्या कारण नंतर लगेचच आपल्याला हिवाळीबागेचं अन त्या सीझनमधे लावायच्या भाज्या अन फुलझाडं यांचं नियोजन करायचं आहे. तेव्हा घ्या हातात खराटा अन सरकवा चपला पायात आणि जा बागेत.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...