तयारी हिवाळी बागेची

तयारी हिवाळी बागेची 



गेल्या लेखात पावसाळ्यानंतर आपल्या बागेत काय कामं करायची ते आपण पाहिलं. त्याप्रमाणं बरीच कामं झालीही असतील. नसतील झाली तर ती उरकुन घ्या. कारण बाग जेवढी स्वच्छ अन आटोपशीर तेवढी कामं करायला मजा तर येतेच पण कीड अन इतर रोग यांपासुनही आपली बाग मुक्त रहाण्यास मदत होते. अजुनही कुठं किडींना लपण्यासाठी जागा शिल्लक असेल तर तीही स्वच्छ करुन घेतलेली बरी.

हिवाळ्यातलं उन तितकंसं तीव्र नसतं, अर्थात ऑक्टोबर हीट जर तुमच्या भागात जास्त तीव्र असेल तर उन्हाळ्यात जशी आपल्या बागेची काळजी घेता तशीच ती याही महिन्यात घ्यावी लागेल. पण त्यानंतर मात्र सर्वत्र उत्साहाचं अन प्रसन्न वातावरण असतं. आपापल्या घरांतही सणासुदीचं अन उल्हासाचं वातावरण असतं. बागेत फुलपाखरं बागडत असतात. फुलझाडंही भरभरुन फुलत असतात. या दिवसांत बागकाम करण्यातही खूप उत्साह असतो. कारण कितीही काम केलं तरी घाम नाही अन त्यामुळं येणारा शिणवठा वा थकवाही नाही.

या सीझनमधे बागेत खूप भाज्याही घेता येतात. त्याची तयारी दोन आठवड्य़ांपूर्वी सांगितल्याप्रमाणं तुम्ही केलीच असेल, नसेल केली तर ती लगेचच करायला घ्या. या दिवसांत उन्हाचा तडाखा कमी असल्यामुळं सर्व प्रकारच्या पालेभाज्या आपल्याला लावता येतील. तसंच कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची वा भोपळी मिरची, मुळा, गाजर, वाटाणा, हरभरा, वाल वगैरेंसह वांगी टोमॅटो अन मिरचीही आपल्याला घेता येतील. उन कमी म्हणजे पाण्याची गरज कमी रहाणार. म्हणजेच कमी पाण्यात आपल्याला भरपूर पीक घेता येईल.

पावसाळी पिकं घेण्यासाठी तुम्ही काही रोपं बागेत लावली असतील अन त्यापासून भाज्याही घेतल्या असतील. आता त्यांना भाज्या येणार नाहीत किंवा आल्याच तर त्या संख्येनं अन आकारानं खूपच कमी अन लहान असतील. झालंच तर त्यांच्या अंगाखांद्यावर अन मुळाशी किडींचं आगार तयार झालं असेल. त्यामुळं अशी खराब झालेली झाडं अन वेली पूर्णपणं काढून घ्या. जर मोकळी जागा भरपूर असेल ते उन्हात वाळण्यासाठी पसरुन ठेवा. रोज किंवा एक दिवसाआड ते उलट सुलट करा म्हणजे उष्णतेनं कीड असलीच तर मरुन जाईल. त्यानंतर त्यांचे तुकडे करुन कंपोस्टमधे टाका. वांगी, मिरची सारखी काही झाडं तीन-चार वर्षं टिकतातही अन फळंही देत रहातात. त्यामुळं अशी झाडं ठेवलीत तरी चालेल. फक्त अशा झाडांची खोलवर छाटणी करुन घ्या. मूळ खोडापासून चार पाच इंच फांद्या ठेवुन फांद्यांची टोकं छाटा. म्हणजे नवीन फूट येऊन अधिक फळं मिळतील.

यानंतर आपली बागेसाठीची जागा, आपली आवड वगैरे गोष्टींचा विचार करुन काय काय भाज्या, फुलझाडं लावायची याचं व्यवस्थित नियोजन करुन घ्या. त्यासाठी काय काय लागेल, म्हणजे कुंड्या, खतं अन मुख्य म्हणजे बिया वगैरे गोष्टी ठरवुन घ्या अन त्याची व्यवस्था करा. काय़ लावायचं ते ठरल्यावर त्या त्या प्रकाराची उन्हाची गरज, व्यवस्थित अन पूर्ण वाढ होण्यासाठी लागणारी जागा, पुढं जाऊन सपोर्ट हवा असल्यास तो कसा देता येईल हे पहा अन त्यानुसार जागा निवडा. वर उल्लेख केलेल्या भाज्यांपैकी काही भाज्या अन काही फुलझाडं यांची रोपं करुन घेणं गरजेचं असतं. ती थेट त्यांच्यासाठी नियोजित केलेल्या जागी लावता येत नाहीत. म्हणून जर आधी रोपं तयार करण्यास ठेवली नसतील तर ती लगेचच ठेवा. त्यासाठी सीडलिंग ट्रे हवाच असं काही नाही. एखाद्या मोकळ्या कुंडीत किंवा पेपर कप्समधेही आपल्याला रोपं तयार करता येतील. पाणी वा सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या, मॅक़डीचे कप्स अन ग्लासेस. आईसक्रीमचे कप्स देखील चालतील. हे जर गेल्या दोन आठवड्यांत केलं नसेल तर त्यासाठी आपल्याकडं ऑक्टोबर महिना आहे. फक्त या महिन्यातलं हवेतलं तापमान लक्षात घेता रोपं उगवुन ती किमान सहा ते आठ इंच मोठी होईपर्यंत त्यांच्यावर थेट उन पडणार नाही पण सूर्यप्रकाश मात्र मिळेल याची काळजी घ्या.

हिवाळी बागेत ज्या भाज्या लावल्या जातात त्यांची संख्या इतर ऋतुंमधल्या भाज्यांपेक्षा निश्चितच जास्त असते. पण यासोबतच या भाज्यांचा लावणीपासून ते काढणीपर्यंतचा काळ तुलनेनं खुपच अल्प असतो. अन म्हणूनच सर्वांनी, निदान नवीन बागकर्मींनी या मोसमात भाज्यांचं पीक घेणं चांगलं. कारण त्यामुळं भाज्यांसोबतच बागकामामधला आत्मविश्वास अन उत्साह दोन्हीही वाढेल. हाताला यश मिळालं की ते काम पुढं नेण्यात उत्साह टिकून रहाण्यास मदत होते.

या मोसमात एरवी वर्षभर आपण घेत असलेल्या वांगी, टोमॅटो, भेंडी याव्यतिरिक्त कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, सिमला मिरची, कारली, काकडी, पालक, माठ, अंबाडी, कोथिंबीर, लेट्यूस, गाजर, मुळा, बटाटा, पांढरा व लाल, बीट, कांदा, लसूण, इत्यादी भाज्या तसंच वाटाणा / मटार, चवळी, फरसबी, घेवडा सारख्या शेंगवर्गीय भाज्या देखील या दिवसांत आपण आपल्या बागेत घेऊ शकतो. यासोबतच ऍस्टर, शेवंती, झेंडू, डेलिया, पिटुनिया, होलीहॉक, कार्नेशन, झिनिया, (आवडत अन चालत असेल तर) कॉसमॉस वगैरेंसारखी फुलझाडं अन सर्वांचा ऑल टाईम फेवरिट गुलाबही आपण लावु शकतो. बागेत फुलझाडं लावताना नेहमी भाज्यांच्या आसपास अन भाज्यांच्या दोन तीन कुंड्यांच्या जवळ एखादं फुलझाड किंवा जर वाफे करुन भाज्यांची लागवड केली असल्यास वाफ्यांच्या भोवती दोन चार फुलझाडं लावण्यानं कीडीपासून संरक्षण अन परागीभावनाची नैसर्गिक सोय असा दुहेरी फायदा होतो.

या मोसमात भाज्यांची लागवड करताना खतांची फारशी गरज पडत नाही. कारण फारसं उष्ण नसलेलं वातावरण, हवेतला गारवा अन शुद्ध हवा याचा झाडांच्या पोषक वाढीसाठी फार फायदा होतो. त्यामुळं भाज्यांसाठी वाफे तयार करताना वा कुंड्या भरताना भरपूर कंपोस्ट, हिरवळीचं खत अन एरवी जे काही पॉटिंग सॉईलसाठी वापरत असाल ते थोड्या प्रमाणात वापरलंत तरी चालेल. अर्थात नीमपेंड अन बोनमिल वा स्टेरामील याचा योग्य तो वापर करण्यास विसरु नका. या दोन गोष्टी रोपांची फुलण्या-फळण्यासाठी लागणारी टॉनिक्स आहेत. त्यातही फळभाज्यांची खतांची गरज ही पालेभाज्या अन फुलझाडं यांच्यापेक्षा जास्त असते. त्यामुळं तयार करण्यात येणारा वाफा किंवा कुंड्या हे झाडांच्या कोणत्या प्रकारांसाठी वापरणार आहात हे पाहून त्यानुसार खतांची विभागणी करा.

बिया पेरल्यानंतर वा रोपं ट्रान्स्प्लांट केल्यानंतर मल्चिंग करणं अतिशय गरजेचं आहे. उन्हाळ्यात आपण मल्चिंग करतो ते झाडांना दिलेल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून. पण या दिवसांत मल्चिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे झांडांच्या मुळांशी सम तापमान राखलं जातं. थंडी वा हवेतील गारवा कमी जास्त होतच रहातो, पण मल्चिंगमुळं मुळांजवळचं तापमान योग्य त्या प्रमाणात राखलं जातं. याच बरोबर पाण्याचं प्रमाणही राखलं जात असल्यामुळं जास्त पाणी देण्याचीही गरज भासत नाही. एवढंच नाही तर या दिवसांत ड्रिप सिस्टिम वगैरेंचीही फारशी गरज पडत नाही.

रोपं लहान असताना किंवा बिया पेरल्या असताना जर अचानक पाऊस आला तर रोपांचं पावसापासून संरक्षण करण्याला पहिलं प्राधान्य द्या. बागेत नियमित लक्ष द्या. खास करुन सकाळच्या वेळी. कोवळ्या उन्हात बागेत जर फुलपाखरं किंवा मधमाशा दिसत असतील तर परागीभवन नैसर्गिकरित्या होईल याची खात्री बाळगा. पण जर फुलपाखरं नसतील किंवा कमी प्रमाणात असतील तर परागीभवन तुम्हालाच करावं लागणार हे ध्यानात ठेवा. त्यासाठी छोटा पेंट ब्रश अथवा इअर बड्स वगैरे हाताशी लागतील अशा ठिकाणी ठेवा. लक्षात ठेवा परागीभवनाअभावी कारली, दुधी, काकडी वगैरेंसारखी फळं बाल्यावस्थेतच काळी वा पिवळी पडून गळुन जातात. परागीभवन नैसर्गिकपणं होत नसेल तर ते तुम्हालाच करायचं आहे. एकदा परागीभवन झालं. की फळाची वाढ सुरु होते अन पुढच्या टोकाचं फूल सुकुन गळुन पडतं.

रोपांवर कीड अन रोग पडणं हे अगदीच कॉमन आहे. कितीही काळजी घेतलीत तरी ते होतच असतं. निसर्गाचं चक्रच आहे ते. यासाठी वरचेवर झाडांची, पानांच्या मागच्या बाजूची पहाणी करत रहा. त्यासोबतच बुंध्याजवळची मातीही हलकेच, मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घेत मोकळी करत रहा. दर पंधरा-वीस दिवसांनी कुंडी वा वाफा यांच्या आकारानुसार नीमपेंड मातीत मिसळून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी कडुलिंबाचा हिरवा पाला आपल्या गरजेच्या प्रमाणात आणून तो हातानंच चुरडून एखाद्या बादलीत वा टबात पाणी घेऊन त्यात दोन-तीन दिवस भिजत ठेवावा. नंतर ते पाणी गाळून घेऊन बाटलीबंद करुन सावलीत ठेवावं अन दर दहा-पंधरा दिवसांनी स्प्रे बॉटलमधे थोडं घेऊन त्यात दहापट साधं पाणी मिसळून ते सर्व झाडांवर फवारावं. यामुळं बहुतांश कीड नष्ट होईल. असा तयार केलेला अर्क सावलीत ठेवल्यास सहा महिने तरी चांगला राहील. समजा वास आलाच तरी काळजीचं काही कारण नाही. पुन्हा सहा महिन्यांनी असाच अर्क तयार करुन ठेवल्यास पुढच्या सहा महिन्यांचीही सोय होईल. लक्षात घ्या की आपण जर भाज्यांवर कीटकनाशक फवारणार आहोत तर ते सेंद्रीय अन आपल्या पोटात त्याचा थोडा अंश चुकुन गेलाच तर आपल्याला अपाय होणार नाही असंच असायला हवं. त्यामुळं बाजारात तयार मिळणारं कुठलंही कीटकनाशक शक्यतो वापरु नका. कारण आपल्या बागेत तयार होणाऱ्या भाज्या आपण खाणार आहोत. त्या शोभेसाठी लावलेल्या नाहीत. आणि किटकनाशक फवारताना ज्या भाज्या काढणीसाठी तयार होत आल्या आहेत त्यांच्यावर फवारणी करु नका. फळं काढायच्या अन पालेभाज्या तोडायच्या तीन चार दिवस आधी फवारणी करणं टाळा. म्हणजे काळजीचं काही कारण उरणार नाही.

हिवाळ्यात अन्नाचं पचन उतम प्रकारे होत असतं. खाण्याचे भरपूर अन विविध प्रकार करावेसे वाटतात. अशा दिवसांत आपल्या बागतेल्या आपणच पिकवलेल्या भाज्या खाण्यामधलं अन सूप वगैरे पिण्यामधलं सुख हे अतुलनीय आहे. आशा आहे की या टीप्स आपल्याला उपयोगी पडतील अन स्वनिर्मितीच्या आनंदासह तुमच्या बागेतल्या सेंद्रीय पद्धतीनं तुम्हीच पिकवलेल्या भाज्या खाण्याचाही आनंद तुम्हाला मिळेल.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...