सेंद्रीय ते सेंद्रिय व्हाया रासायनिक

सेंद्रीय ते सेंद्रिय व्हाया रासायनिक


एक काळ होता जेव्हा शेती निसर्गचक्रावर अवलंबून होती. तीन प्रमुख ऋतु असायचे, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. हे चक्र निरंतर अन वेळापत्रकानुसार सुरु असायचं. त्यात फारसा खंड पडायचा नाही. तिघंही आपापली वेळ पाळायचे. थोडंफार पुढंमागं होत असे, पण त्यानं फारसा फरक पडायचा नाही. ना माणसांवर ना शेतीवर ना निसर्गावर. शेतांमधे कुठल्याही रसायनाविना अन्नधान्य पिकत असे अन ते सर्वांना पुरुनही उरत असे.

मग हळूहळू लोकसंख्या वाढू लागली तसं शेतात पिकणारं धान्य कमी पडू लागलं. त्यातुनच जरी साठेबाजी अन कृत्रिम तुटवडा हे जन्माला आलं असलं तरी शेतात पिकणारं धान्य अन भाजीपाला वगैरे कमी पडत गेलं. मग शेती करण्याच्या पद्धतीत बदल येत गेला. त्य़ापाठचं आंतरराष्ट्रीय अन आपल्याइथलंही राजकारण सोडलं तरी शेतांमधे रासायनिक खतांचा वापर सुरु झाला. अन एक दोघांना मिळणारं यश पाहून बहुतांश शेती रासायनिक खतांवरच पोसली जाऊ लागली. आकर्षक दिसतं तेच विकलं जातं या नव्या अर्थशास्त्राला सारेच बळी पडले. पिकवणारेही अन ग्रहण करणारेही. गबर झाले ते राजकारणी अन रासायनिक खतं अन हायब्रिड बियाणं बनवणाऱ्या कंपन्या. बळी तो कान पिळी या तत्वानुसार मग ते करतील ते, अन म्हणतील ती पूर्व दिशा होऊ लागलं अन कळत नकळत आपण सारेच यांच्या आहारी गेलो.

या रासायनिक खतांचा दुष्परिणाम दिसण्यासाठी अन ते नको असं म्हणण्यासाठी तीन ते चार पिढ्या जाव्या लागल्या. आज जरी रासायनिक खतांविरोधात बरीच जागरुकता निर्माण झाली असली तरी अजुन बरंच मैदान मारायचं आहे. त्यासाठी अजुन एक ते दोन पिढ्या जाव्या लागतील. अर्थात हे जसं कुणा एकट्या दुकट्याचं काम नाही तसंच प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून रहायचीही गरज नाही. ज्याचं प्रॉडक्ट उत्तम त्याची विक्री उत्तम असा साधा सरळ हिशोब ठेवल्यास सारं काही पुन्हा पहिल्यासारखं होईल. फक्त धीर न सोडता, एक व्रत म्हणून हे कार्य स्वीकारल्यास ते अशक्य नाही. आजवरच्या साऱ्याच सरकारांनी जनतेला आपल्यावर अवलंबून ठेवलं. हे जोखड झुगारुन देता येऊ शकतं. फक्त त्यासाठी हिंमत असायला हवी.

हे झालं शेतीमधे वापरलं जाणाऱ्या खतांविषयी. त्याविरोधात जरी जनजागृती होत असली अन त्याला यश मिळु लागलं तरी या रासायनिक खतं बनवणाऱ्या कंपन्याही काही हातावर हात ठेऊन गप्प बसणार नाहीत. शहरी अन निमशहरी माणसांतला उच्चशिक्षित बिनडोकपणा अन त्यांच्यातला आळस व अशा लोकांची आपसांमधलीच स्पर्धा वगैरे सगळं या कंपन्यांनी बरोबर हेरलं आहे. अन आता त्यांचं टार्गेट हे शेती अन शेतकरी न रहाता आणि शेतकऱ्यांच्या गळी आपली प्रॉडक्ट्स उतरवताना राज्यकर्त्यांना हाताशी धरुन त्यांचे खिसे भरण्यापेक्षा कमी खर्चात अन माध्यम बदलून त्यांनी आपली कार्यप्रणाली बदलली आहे.

आता त्यांचं टार्गेट झालं आहे हेच हाती मोठमोठ्या डिग्र्या अन त्या जोरावर लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवणारे पण कुठल्या तरी सेलिब्रिटीचं डोळे झाकून अनुकरण करणारे वस्तुतः अर्धशिक्षित लोक. म्हणून मग यांच्यासाठी प्रिंट अन इलेक्ट्रॉनिक मिडियामधे विविध अन मोठमोठ्या जाहिराती येत रहातात. कुठं कृत्रिम अन प्रयोगशाळेत जन्माला घातलेला कॅल्शिअम तर कुठं जे व्हिटामिन सुर्याच्या किरणांपासून फुकट मिळत असतं ते डी३. कुठं कसली टॉनिक्स तर कुठं कसले काढे, तेही आयुर्वेदिक आहेत असं वर वर भासवणारे. त्यासाठी भलेमोठे बोजड अन अगम्य शब्द जन्माला घालून जे नसेल तर आपला मृत्यु अटळ आहे असा लोकांचा समज करुन देणारे.

कुठलातरी हिरो वा क्रिकेटर काम किंवा व्यायाम करता करता मधेच खिशातुन एक बाटली काढतो अन एक गोळी तोंडात टाकून पुन्हा ट्रेडमिलवर चालायला तरी लागतो किंवा पळायला अथवा जिना चढायला लागतो. लोक येडे, सलमान किंवा धोनी करतो म्हणून आपणही केलंच पाहिजे याला आपलं कर्तव्य मानतो अन मेडीकल स्टोअरमधून लगेच ती बाटली आणतो.

आता आपल्याला एवढ्या कॅल्शिअमची गरज आहे का? एका गोळीतून आपल्याला किती कॅल्शिअम मिळेल, आपली दिवसभराची कॅल्शिअमची गरज किती आहे. आपण जे अन्न रोज खातो, त्यातुन आपल्याला किती कॅल्शिअम मिळतो वगैरे गोष्टींमधे तो पडतही नाही. एक माणूस सोडला तर निसर्गातला कुठलाही सजीव आपल्या नित्य गरजेपेक्षा अधिक काही खातही नाही अन साठवुन तर कधीच ठेवत नाही. पण माणसाला मात्र हे काही कळत नाही. जीभेचे चोचले अन जीभच या सगळ्याला कारणीभूत आहे असं म्हणत आवडेल ते तो खात सुटतो. आणि बाहेर एवढा गोंगाट असतो की त्याला आतला आवाज ऐकुही येत नाही.

मग अती झालं की औषधं सुरु होतात. एका औषधाचा परिणाम घालवण्यासाठी किंवा न्युट्रल करण्यासाठी दुसरं औषध. दुसऱ्यासाठी तिसरं, त्यात प्लासिबो थिअरी आहेच, म्हणजे अजुन एक दोन औषधं. मग त्याचं लंगडं समर्थन करण्यासाठी म्हणून ऑफिसात, प्रवासात प्रौढी मिरवत मी दिवसभरात किती गोळ्या खातो हे सांगितलं जातं. त्य़ात आपण चुकीचं काही करत आहोत याहीपेक्षा मी कसा औषधं अन व्हिटामिन्स घेतो अन त्यावर किती खर्च करतो हे सांगण्याचा उद्देश जास्त असतो.

साधारणतः प्रौढ व्यक्तीला दिवसभरात १००० ते १२०० मिलिग्रॅम कॅल्शिअम पुरेसा होत असतो. सतरा-अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांची हीच गरज १३०० मिलिग्रॅम असते. आपण जर आपला आहार नेहमीचाच पण पौष्टिक ठेवला तर कॅल्शिअमची ही गरज त्यातुन नक्कीच पुरवली जात असते. अगदीच गरीब जे असतील त्यांना ज्या गोळ्या वा सकस आहार जास्त गरजेचा आहे त्यांना मात्र ते फुकट वा स्वस्तात मिळत नाही. अन ज्यांना गरज नाही त्यांच्यावर भडीमार होत असतो.

आपलं शरीर मात्र एका मर्यादेपलिकडं जास्त काही मिळाल्यावर ते विविध मार्गांनी टाकून देतं अन टाकता नाही आलं तर मग शरिरात विकृती निर्माण करतं. म्हणजे उदा. कॅल्शिअम जरुरीपेक्षा जास्त झाल्यास डायरिआ किंवा कॉन्स्टिपेशन यापैकी तब्येतीनुसार काहीही होतं, उलट्या, मळमळ, रक्तदाब, सांधेदुखी वगैरेही बरंच काही होऊ शकतं.

पण आपल्या नित्याच्या आहारात आमटी, भात, पोळी, भाजी, ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरेंपैकी ऋतुमानाप्रमाणं कशाचीही भाकरी, कधी थालिपिठं, कधी कडधान्यांच्या उसळी तर कधी इडली डोसांसारखे आंबवलेले पदार्थ, कच्च्या कोशिंबिरी, या सोबतच दूध, दही, ताक, लोणी, तूप अन सीझनप्रमाणं उपलब्ध असलेली फळं, अंजिर, बदाम, काजू सारखे ड्रायफ्रूट्स व चणे, फुटाणे, शेंगदाणे हे सगळं उपलब्धता, तब्येत अन मुख्य म्हणजे बजेट यानुसार खात राहिल्यास बाहेरुन कुठल्याही व्हिटामिन वा सप्लिमेंटची आवश्यकताच भासणार नाही. याला रोजच्या किमान दहा मिनिटांच्या व्यायामाची जोड असेल तर कुठलाही आजार होणार नाही. पण या सगळ्यापेक्षा लोकांना एक गोळी तोंडात टाकून घोटभर पाणी पिणं जास्त सोयीचं वाटतं.

म्हणून म्हणतो, आजपासून तीस चाळीस वर्षांनी "से नो टू केमिकल सप्लिमेंट्स" अशी चळवळ चालवण्यापेक्षा आजच अशा गोळ्या घेणं टाळा. शरिराला हवी असलेली व्हिटामिन्स आपल्या आहारातुनच मिळवा. डाळ, तांदूळ, गहु, ज्वारी, बाजरी वगैरे आपल्यापैकी प्रत्येकाला घरी उगवणं शक्य नसेल पण निदान भाज्या, फळं हे तर आपण नक्कीच घरी पिकवु शकतो. अंजिरासारख्या फळातुन भरपूर कॅल्शिअम मिळू शकतो. हे अंजिराचं झाड आपण किमान दोन अडीच फूट खोल कुंडीत आपल्या गच्ची-बाल्कनीतल्या बागेत नक्कीच लावू शकतो. नियमित केलेल्या छाटणीनं त्याची उंची चार फूटांपर्यंत मर्यादित ठेवुन अधिक फांद्या फुटतील याची काळजी घेतली तर सेंद्रिय खतांवर आपण आपल्यापुरती अंजिरं नक्कीच घेऊ शकतो.

भाज्यांसाठीही देशी बियाणं वापरलीत तर उत्तम चवीच्या भाज्या, शेणखत अन घरी स्वतः बनवलेलं कंपोस्ट यावरच घेऊन कुठल्याही रासायनिक खतांच्या वापराशिवाय घरच्या घरी घेऊ शकतो. त्यामुळं उत्तम आहाराबरोबरच स्वतःची गरज स्वतःच भागवण्याचं समाधान मिळून सुदृढ मानसिकताही निर्माण होईल. शरीर कितीही स्ट्रॉंग असलं तरी मन कमकुवत असेल तर कशाचाही उपयोग होत नाही. पण आपल्या घरच्याच बागेत भेंडी, वांगी, टोमॅटो, काकड्या, कारली, दुधी, पडवळ वगैरे तयार होत असताना पहाण्याचा आनंद अन सुख काही वेगळंच असतं. हे ना शब्दांत मांडता येणार ना पैशांनी विकत घेता येणार.

हे सगळं अगदी छोट्यातल्या छोट्या म्हणजे ७०-८० स्क्वे.फूंच्या बाल्कनीतही शक्य होतं. यापेक्षा मोठी बाल्कनी किंवा मोठा टेरेस असेल तर मग कसलंच बंधन नाही. रहिवासी सोसायट्यांमधे तर हे सगळं सामुहिक तत्वावर केलं तर संपूर्ण सोसायटीलाही पुरुन उरतील एवढ्या प्रमाणात विविध भाज्या तुम्ही घेऊ शकता. बागकाम करण्यासारखा दुसरा स्ट्रेसबस्टरही नाही अन व्यायामाचा दुसरा प्रकारही नाही. दिवसभरातल्या बागेमधे घालवलेल्या अर्ध्या तासानंही मन उत्साही होतं अन तिथल्या कामामुळं मधुमेह वगैरे गोष्टीही दूर रहातात. हे स्वानुभवाचे बोल आहेत त्यामुळं कुठलंच रेफरन्स बुक नाही की कुठली वेबसाईट नाही जिचा पत्ता देऊन तुम्हाला क्रॉसचेक करता येईल.

बाग करायला सुरुवात तर करा. केल्यावर जशा शाळेतल्या, कॉलेजातल्या वा नोकरीच्या पहिल्या दिवशी अडचणी आल्या तशा येतीलही. पण आजवर जशी प्रत्येक अडचणीवर मात केलीत तशी यावरही कराल. आणि मुख्य म्हणजे निसर्गासारखा क्षमाशील दुसरा कुठलाच गुरु वा शिक्षक नाही. कितीही चुकलात तरी तो या ना प्रकारे त्याची भरपाई करतच असतो. अन लागलीच काही मदत वा मार्गदर्शन तर माझ्यासारखे असंख्य लोक आहेत जे स्वतः बाग करतातच पण त्याहीपेक्षा दुसऱ्याला जास्त उद्युक्त करुन हे काम अधिकाधिक लोकांनी करुन आपलं शारिरिक अन मानसिक आरोग्य उत्तम ठेवावं याला जास्त महत्व अन प्राधान्य देत असतात.

तेव्हा जे बाग करतात त्यांनी केवळ फुलांची बाग न करता भाज्या, फळं यांकडंही लक्ष द्यावं, जे बाग करत नाहीत त्यांनी सुरुवात करावी. काहींनी आलेल्या अपयशातुन विचार रद्द केला असेल त्यांनी आत्मपरीक्षण करुन चुका शोधाव्या अन त्या कशा टाळता येतील हे पाहून पुन्हा नव्यानं सुरुवात करावी. देश आत्मनिर्भर व्हायचा तेव्हा होईल, आपण तर होऊया. आपण झालो तर आपोआपच सगळं होईल.

चला सुरुवात करुया. पाऊस पुन्हा सुरु होतोय, आपणही सुरु होऊया.

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

४ टिप्पण्या:

  1. उत्तम लेख. हा लेख वाचून सामाजिक सजगता (social awareness) सेंद्रिय (म्हणजेच कृत्रिम रासायनिक खत टाळून) शेतीमालाचे उत्पादन आणि वापर नक्कीच वाढेल. 🙏👍

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान !! आपले सर्वच लेख महितीपूर्ण आहेत, माझ्यासारख्या नवीन बागकाम करणार्‍यांना फारच उपयोगी ..

    उत्तर द्याहटवा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...