कोकोपीट.

कोकोपीट.



कोकोपीटप्रेमींनो कोकोपीट वापरण्याआधी याचा विचार करा

आजकाल, शहरी बागप्रेमींकडे, खासकरुन ज्यांच्या बागा कुंड्यांमधे आहेत अशा लोकांकडून कोकोपीटकरता जास्त मागणी आहे. जे कोकोपीट विकतात किंवा त्याचा प्रचार करतात ते याच्या तोट्यांबद्दल कधीही सांगणार नाहीत. याच्या प्रमाणापेक्षा जास्त वापरामुळं होणारं नुकसान लगेचच नजरेस दिसत नसल्यामुळं ते तुमच्या लक्षातही येणार नाही, आणि तसंही कुठलाही नर्सरीवाला, रोपविक्रेता किंवा खतविक्रेता रोप मेलं तर ते बागकाम करणाऱ्याचीच चूक कशी आहे हेच सांगतो आणि अंग झटकुन टाकतो. ज्याचं रोप मेलं त्याला नुकसानभरपाई नको असते तर आपलं रोपटं मेल्याचं दुःख असतं. पण अशा वेळी असे विक्रेते कोरडी सहानुभुतीही दाखवत नाहीत.

कोकोपीटचे फायदे जे कुणी कोकोपीट वापरतात ते तर जाणतातच. ते मी इथं सांगणार नाही. मी फक्त त्याचे तोटे सांगेन आणि समजा वापरायचंच असेल तर काय काळजी घ्यायला हवी तेही सांगेन. त्यानंतर तुमचं तुम्हीच ठरवा कोकोपीट वापराय़चं की नाही ते.

मुळात कोकोपीट बनतं कसं हे जाणून घेणं गरजेचं आहे. कोकोपीटची मागणी ही आजकालचीच. गेल्या काही वर्षात त्यानं शहरी बागेत स्थान मिळवलं अन अल्पावधीतच बस्तान बसवलं. याला कारण त्याची उपयुक्तता नसून शहरी बागकर्मींचा आळस अन सुटसुटीतपणे, हात लाल-काळे न करता बाग करता येणं हीच दोन प्रमुख कारणं.

नारळ काढून घेतल्यावर जे बाहेरचं आवरण उरतं त्यापासून इतर अनेक उपयुक्त गोष्टी बनतात, जसं की, काथ्या, दोर, कॉयरच्या गाद्या, डोअरमॅट्स वगैरे. हे सर्व बनवण्याच्या प्रोसेसमधे या बाह्यकवचामधून काही पावडर बाहेर पडते. पूर्वी अशी पावडर कचऱ्यात फेकून दिली जायची. पण कशी कोण जाणे, याची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कुठल्यातरी सुपीक डोक्यात रुजली अन जन्माला आला बागेमधे, कुंडीमधे वापरण्यासाठीचा एक प्रकार, कोकोपीट.

नारळाचं बाह्यआवरण सुटं करण्याकरता ते पाण्यात बुडवुन ठेवावं लागतं. नारळ बव्हंशी तयार होतात ते समुद्रकिनारच्या प्रदेशात. सहाजिकच एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली शहाळी अथवा नारळ काढून उरलेला कचरा भिजवण्यासाठी लागणारं पाणी हे समुद्राचंच अथवा खाडीचंच. त्यामुळे अशा प्रकारे बनवलेल्या गाद्या अथवा इतर वस्तु आणि कोकोपीट यामधे मीठ असणं स्वाभाविकच आहे. इतर वापराच्या गोष्टींमधे मीठ असलं काय अन नसलं काय, फारसा फरक पडत नाही.

पण जेव्हा कुंडीत हे असं अतिरिक्त मीठ असलेलं कोकोपीट वापरलं जातं तेव्हा त्याचे दुष्परिणाम जास्त असतात अन ते अल्पावधीतच दिसून येतात. जेव्हा कोकोपीट थोड्या प्रमाणात पॉटिंग मिक्समधे वापरलं जातं तेव्हा त्यापासून होणारं नुकसान कमी असतं किंवा मिक्समधल्या इतर घटकांची गुणवत्ता कमी होऊन ते नुकसान रोपांवर दिसून येत नाही. इतर घटकांची गुणवत्ता कमी झाली तरी ते आपल्या लक्षातही येत नाही आणि आपण इतर उपाय करत रहातो. त्यामुळे कंपोस्ट वगैरे चांगले घटक देऊनही अपेक्षित परिणाम दिसत नाहीत.

पण मग कोकोपीटमधलं हे जास्तीचं मीठ कसं काढायचं?

बरेचदा कोकोपीटचा ठोकळा आणल्यावर तो पाण्यात ठेवला जातो आणि कोकोपीट मोकळं झाल्यावर वापरलं जातं. पण अशा पद्धतीमधे सारंच मीठ धुतलं जात नाही. बाजारात वा ऑनलाईन मिळणाऱ्या कोकोपीटच्या ठोकळ्यावर "वॉश्ड" लिहिलेलं असलं तरी असं ते धुतलेलं नसतं. कोकोपीटमधलं सारं मीठ काढण्यासाठी ते वारंवार पाण्यात धुणं हाच एक सेंद्रिय उपाय आहे. पण साध्या पाण्यानं कितीही वेळा धुतलं तरी कोकोपीटमधलं मीठ पूर्णपणे जात नाही.

अर्थात रासायनिक पद्धतीमधे कोकोपीट मीठरहित करण्यासाठी वा त्यामधलं मीठ योग्य प्रमाणात राखून त्याचा रोपांसाठी योग्य तो वापर करण्याकरिता कॅल्शियम नाय़ट्रेटचा वापर करुन ते "बफर" करता येतं. यामधे रोपासाठीही अधिकचं नत्र अन कॅल्शियम मिळण्याचे फायदे आहेत. पण ही झाली रासायनिक पद्धत. जी मी सुचवणार नाही. ज्यांची रासायनिक पद्धत वापरण्याची तयारी आहे त्यांनी ती वापरावी. किंवा कुणाला कॅल्शियम नाय़ट्रेटसाठी सेंद्रिय पर्याय ठाऊक असेल तर तो सांगावा.

मी एवढंच सुचवेन की कोकोपीटमधे रोपांच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारची अन्नद्रव्यं वा पोषणमुल्य नाहीत. अन त्याचा जास्तीचा वापर म्हणजे आपल्या बागेसाठी नसते प्रश्न स्वतःच निर्माण करणे किंवा असे प्रश्न कमी करण्यासाठी रासायनिक उपायांचा वापर करुन दुसरे प्रश्न उभे करणे.

अर्थात, निर्णय तुमचाच आहे. कारण तेच, बागही तुमचीच अन जीवनही तुमचंच.

फोटो : इंटरनेटवरुन साभार

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...