गच्चीवरील_भाजीपाला - गवार

गच्चीवरील_भाजीपाला

लेखांक ०४

गवार


गवारीच्या शेंगांचा समावेश आहारात नियमित असावा. उतम आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. गवारीच्या शेंगा गुच्छात येत असल्यामुळं त्यांना इंग्रजीमधे क्लस्टर बीन्स असं म्हणतात.

गवारीला सहा ते आठ तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. हे पीक उष्ण हवामानाला चांगला प्रतिसाद देत असल्यामुळं मार्च ते सप्टेंबर या कालावधीत घेतल्यास घरच्या बागेत भरघोस शेंगा मिळु शकतील. अती पावसाच्या दिवसांत लागवड करणं टाळावं. जोरदार पाऊस सुरु होण्यापुर्वीच रोपं जोमदार होतील याची दक्षता घ्यावी.

गवारीच्या रोपाला सोटमूळ असतं जे जमिनीत खालच्या दिशेनं सरळ जातं. त्यामुळं घरच्या बागेत जर हे कुंडीत अथवा इतर कशात म्हणजे डबा वा तत्सम गोष्टीत लावायचं झाल्यास १०-१५ लिटर्सची कुंडी पुरेशी होते. फक्त कुंडीची खोली १२ ते १५ इंच असावी. कुंडी भरण्याची पद्धत नेहमीचीच. तळाशी आवश्यक तेवढी छिद्रं, खाली नारळाच्या शेंड्या अन पालापाचोळा, वर कंपोस्ट/शेणखत युक्त माती. रोपांच्या जन्मापासूनच सशक्त वाढ होण्यासाठी म्हणून आधीच भरपूर नीमपेंड वगैरे सगळं नेहमीचंच.

पूर्ण वाढलेलं रोप अगदी पाच फूटांपर्यंत उंच वाढतं. सहसा गवारीच्या रोपांना आधाराची गरज भासत नाही. पण जर गच्चीवर वाऱ्याचं प्रमाण जास्त असेल तर दहा बारा इंचांच्या कुंडीत चार पाच फूटांचं रोप म्हणजे गुणोत्तर व्यस्तच. त्यामुळं रोप सरळ उभं रहाण्यासाठी आधार असलेला बरा. त्यात गवारीची रोपं वाढत असतानाच त्यांना सरळ वळण दिलेलं बरं. कारण कधी कधी ती मधेच वाकून वाकडी तिकडीही वाढतात.

कुंडी तयार झाल्यावर गवारीच्या बिया थेट पेराव्यात. रोपं करुन घेणं शक्यतो टाळावं. कारण एकच. अन ते म्हणजे रोपाला एकच मुख्य मूळ असतं. उपमुळं फारच कमी असतात. बाल्यावस्थेतील रोपाला तर उपमुळं केसांपेक्षाही पातळ असतात. अन रोप ट्रान्सप्लांट करताना मुख्य मूळाला इजा पोहोचली तर रोप कामातनं जाईल. म्हणून बिया जिथं आपल्याला रोपं लावायची आहेत त्याच ठिकाणी लावाव्यात. बिया सुरुवातीला नर्सरीतुनच आणाव्यात अथवा कुणाकडे घरगुती उपलब्ध असल्यास त्या वापराव्यात. गवारीच्या बियांची उगवण तशी जलद होते. अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही कोंब बाहेर पडलेला दिसेल. पण तरी सरासरी सहा ते सात दिवसांत बिया अंकुरतात. एका लहान कुंडीत एकच बी अन जर कुंडी मोठी असेल तर आठ ते दहा इंचांचं अंतर ठेऊन बिया मातीत अर्धा इंच खोल पेराव्यात. जमिनीत अथवा गच्चीवर वाफा केला असेल तर दोन ओळींत दीड फूटांचं अंतर अन दोन रोपांत आठ ते दहा इंचांचं अंतर ठेऊन बिया पेराव्यात.

या पीकात मल्चिंगचा फायदा होतो. बिया पेरल्यापासूनच मल्चिंग केल्यास बिया रुजणं अन जोमदार रोपं वाढणं या सगळ्या काळात मल्चिंगचा उत्तम उपयोग होतो. बिया पेरल्यापासून दीड पावणेदोन महिन्यांत फुलं येऊ लागतात. या काळात खतं देणं गरजेचं असतं. रोपांना कंपोस्ट, शेणखत, गांडूळखत यापैकी जे उपलब्ध असेल ते नियमितपणं देणं पीकवाढीच्या दृष्टीनं उपयुक्त ठरतं. या पिकात परागीकरण हातानं करण्याची गरज नसते, सेल्फ पोलिनेटिंग प्रकारात हे पीक मोडतं. फुल रोपावर दिसल्यानंतर साधारणपणे दोन आठवड्यात शेंगा काढणीला येतात.

शेंगा एका दांडीला इंग्रजी व्ही आकारात दोन बाजूंना वाढत जातात. शेंगा कोवळ्या असताना काढल्या तर त्या चविष्ट असतात. निबर झाल्यावर रेषाही जास्त वाढतात अन चवही कडवटपणाकडं झुकते. शेंगांच्या गुच्छातील खालच्या शेंगा तयार होत आल्या की त्या कात्री अथवा कटरच्या सहाय्यानं हलकेच काढाव्यात. हातानं खुडताना रोपाला अन वरील बाजूच्या कोवळ्या शेंगांना दुखापत होण्याची शक्यता असते. 

चार जणांच्या कुटुंबाला एकवेळच्या भाजीसाठी अंदाजे पंचवीस ते तीस रोपं पुरेशी होतात. शेंगा काढाय़ला सुरुवात केल्यापासून पुढे दीड ते दोन महिने शेंगा मिळत रहातात. बियांसाठी ठेवलेल्या शेंगा काढल्यावर रोपं काढून कंपोस्टमधे टाकावीत किंवा इतर झाडांसाठी मल्चिंग म्हणून वापरावीत. मातीला हवा अन उन्ह देऊन एक दोन आठवड्यांनी गवार सोडून इतर कुठल्याही झाडासाठी वापरावी.


© राजन लोहगांवकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...