गच्चीवरील_भाजीपाला - चवळी

गच्चीवरील_भाजीपाला

लेखांक ०५

चवळी


चवळीचा जेवणातील वापर हा कोवळ्या शेंगांची भाजी तसंच कडधान्याची उसळ या प्रकारे केला जातो. चवळी ही आहाराच्या दृष्टीनं अतिशय पौष्टिक आहे. भरपूर प्रथिनं असलेलं हे एक पीक आहे.

आपल्या बागेत लावण्यासाठी म्हणून हे अतिशय सोपं असं पीक आहे. ज्याला बागकामाची अगदी जुजबी माहिती आहे तोही हे पीक आपली बाग कितीही छोटी असली तरी घेऊ शकतो.

हे पीक प्रत्येक बागकर्मीनं घेणं गरजेचं आहे अन याचं प्रमुख कारण म्हणजे या पीकामुळं माती सकस होते. मुळांवर असलेल्या नत्राच्या गाठींमुळं मातीत भरपूर प्रमाणात नत्र उपलब्ध होतो. म्हणून वेगळ्या कुंड्यांत तर याची लागवड तर करावीच. पण मोठ्या कुंड्यांमधे अथवा जमिनीवर बाग असणाऱ्यांनी मध्यम वा मोठ्या झाडांच्या आळ्यांत दोन चार चवळीचे दाणे अवश्य पेरावेत. यामुळं चवळीच्या शेंगा किंवा बिया तर भाजीसाठी मिळतीलच. पण झाडांजवळची मातीही सकस होऊन मुख्य झाडाच्या वाढीसाठी ते उपयुक्त होईल. अशा पद्धतीनं जर चवळी लावली तर तिला आधार देण्यासाठी मांडव अथवा इतर कशाची गरजही भासणार नाही.

घरात कडधान्य म्हणून जर चवळी आणत असाल तर त्यातीलच काही बिया या पेरणीसाठी घ्याव्यात. याचं कारण असं की चवळी कडधान्य म्हणून दोन आकारांत उपलब्ध असते. छोटे, उडदापेक्षा थोडेसे मोठे दाणे अन वालापेक्षा थोडे मोठे दाणे. ज्याला जसे आवडतात तसे ते घरात आणले जातात. त्यातलेच काही दाणे घेऊन मोठ्या आकाराच्या कुंडीत पेरले की बाकी काम ते दाणे अन निसर्ग दोघंही एकमेकांच्या सहाय्यानं करतात. पण ज्यांना चवळी खास भाजीकरता म्हणून वेगळी लावायची आहे त्यांच्यासाठी पुढील माहिती.

वेगळी कुंडी अथवा इतर कुठलाही कंटेनर घ्यायचा असेल तर १० ते १५ लिटर्स क्षमतेचा अन किमान १०-१२ इंच खोली असलेला कंटेनर पुरेसा होतो. मोठी कुंडी असेल तर दोन रोपांत फूटभर अंतर ठेवलं तरी पुरेसं होतं. जमिनीवर वाफा करुन हे पीक घेणार असाल तर दोन रोपांत १ फूट अन दोन ओळींत दीड ते दोन फूट एवढं अंतर ठेवावं.

घरातीलच चवळी घेणार असाल तर त्याबद्दल माहिती असणं अपेक्षित नाही. पण जर नर्सरीतून बिया आणणार असाल तर तिथं दोन पर्याय उपलब्ध असतील. एक म्हणजे वेलीसारखा वाढणारा अन दुसरा झूडूप प्रकारामधला म्हणजेच ड्वार्फ प्रकार. झुडूप प्रकाराला आधाराची फारशी गरज पडत नाही. पण या प्रकारात दोन रोपांत दीड ते दोन फूट अंतर ठेवणं गरजेचं असतं. वेल प्रकार घेतलात तर त्याच्या आधाराची सोय आधीच करुन ठेवावी लागते.

चवळी पेरल्यापासून ४-६ दिवसांतच अंकुरुन येते अन वेलीची वाढही फार लवकर होते. त्यामुळेच आधाराची सोय वेळेवरच करणं गरजेचं असतं. बिया पेरण्यासाठी, खास करुन कडक आवरण असलेल्या बिया पेरण्याची एक पद्धत मी अनुभवातुन शिकलो आहे, अन ती म्हणजे सकाळी कुंडी पॉटींग मिक्सने भरुन, पाणी देऊन दिवसभर ठेवायची आणि संध्याकाळी बिया पेरायच्या. याचं कारण असं की दिवसभर कुंडीतील माती आवश्यक तेवढी गरम होते अन संध्याकाळी बिया त्यात पेरुन पाणी दिल्यावर रुजण्याची प्रक्रिया लगेचच सुरु होते. घरात तुम्ही उसळींसाठी मूग, मटकी, कडवे वाल अथवा पावटे सारखी कडधान्यं कशी भिजवता? तसंच. फक्त घरी हे एक दिवस पाण्यात भिजवल्यावर मोड येण्यासाठी फडक्यात बांधून ठेवता. इथं ते आपण करत नाही. इथं फडक्याऐवजी माती ते काम करते. या पद्धतीनं उगवणही चांगली होते अन लवकरही होते.

बिया पेरताना कुंडीतील मातीवर बोटानंच अर्धा-पाऊण इंचाचा खड्डा करुन त्यात बी पेरुन माती सारखी करुन घ्यावी. वरुन पाणी द्यावं. रोज आवश्यक तो ओलावा राखण्यासाठी गरजेनुसार पाणी द्यावं. बी पेरल्यावर लगेचच हलकंसं मल्चिंग केल्यास नंतर कोंब रुजुन आल्यावर अथवा रोप वाढल्यावर ते करताना रोपाचे कोंब किंवा दांडे तुटण्याची शक्यता रहात नाही. हलकंच मल्चिंग केलं तर कोंबाला बाहेर येण्यास कसलाही अडसर रहात नाही व आवश्यक तो ओलावा अन उष्णता राखली जाते.

या वेलीला भरपूर अन जलद वाढ असते. त्यामुळे वेल साधारण ५-६ फुटांच्या वर जाऊ लागल्यास शेंडा खुडावा, म्हणजे आडवी वाढ होऊन शेंगा जास्त मिळू लागतील. झुडूप प्रकारात शेंडा खुडण्याची गरज नसते. आपण जी खतं पॉटिंग मिक्समधे घातली आहेत ती चवळीच्या वाढीसाठी पुरेशी असतात. पण जास्त अन उत्तम पीक हवं असल्यास दर १०-१२ दिवसांनी ओंजळभर कंपोस्ट अथवा इतर कुठलंही सेंद्रीय खत दिलं तर उत्तम. अशी खतं देताना मल्चिंग बाजूला करुन मातीचा वरचा अर्धा एक इंचाचा थर मोकळा करुन खत द्यावं. वेलीची उपमुळं वरपर्यंत येत असतात. माती हलकी करताना ती दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

चवळीच्या वेलींवर मावा अन मुंग्या या हमखास हल्ला करतातच. त्यामुळे रोज किंवा किमान दिवसाआड तरी वेलींचं निरीक्षण करावं. माव्याची कीड नजरेस पडताच पाण्याच्या स्प्रेनं काढून टाकावी. गोमूत्र किंवा नीम ऑईल वापरुन द्रावण तयार करुन ते फवारावं. मुंग्या असतील तर हळद फवारली तरी त्या जातील. मावा कीड आली की त्यांचा खात्मा करण्यासाठी लेडीबग्जही येतीलच. पण ते येईपर्यंत वाट न पहाता उपाय़ केले तर नुकसान होत नाही किंवा आटोक्यात रहातं.

बिया रुजुन आल्यानंतर साधारण दीड-पावणेदोन महिन्यांनंतर वेलींवर फुलं येऊ लागतात. या काळात पाण्याची कमतरता भासू देऊ नये. परागीकरण हे आपोआप होत असल्यामुळे त्यामधे आपल्याला लक्ष घालण्याची गरज भासत नाही. फुलं धरल्यावर १०-१२ दिवसांतच शेंग तोडण्यास तयार होते. कोवळ्या शेंगा हव्या असल्यास हव्या तेवढ्या मोठ्या झाल्यावर काढू शकता. नुसत्या हातानंही शेंगा वेलींवरुन काढता येतात. एकदा शेंगा येऊ लागल्यावर पुढील दीड दोन महिने शेंगा येत रहातात.

शेंगांची संख्या कमी होऊ लागल्यावर वेल निवृत्तीकडे जात आहे असं समजून पुन्हा शेंगा हव्या असतील तर दर महिन्याला चवळी पेरावी. जर तुम्ही कुंड्यांमधे वांगी, टोमॅटो, भोपळा वगैरे लावलं असेल तर अशा कुंड्यांत एक दोन चवळीच्या बिया तर नक्कीच पेरा. त्यामुळे मुख्य रोपांना नत्राचा पुरवठा अगदी मुळाजवळच उपलब्ध राहील व तुम्हालाही एकाच खतपाण्यात दोन पिकं मिळतील.

चवळी कडधान्य म्हणून हवी असेल किंवा पुढील लागवडीसाठी बिया हव्या असतील तर हव्या तेवढ्या शेंगा वेलींवरच पिकू द्या. वाळल्या की काढून घ्या. कडधान्य म्हणून हव्या असतील तर उन्हात वाळवा आणि थंड झाल्या की घरात डब्यात ठेवा. लागवडीसाठी हव्या असल्यास उन्हात न वाळवता सावलीतच वाळवा आणि लगेच पेरा किंवा हवं तेव्हा पेरा. वेल काढून नेहमीप्रमाणे मल्चिंगसाठी किंवा कंपोस्टमधे वापरा. पण एक खास, या वेलीची मुळं मात्र जी झाडं मोठी होणार आहेत, ज्यांची नत्राची गरज जास्त आहे अशा झाडांच्या मुळांशी मातीत गाडुन टाका.


© राजन लोहगांवकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...