गच्चीवरील_भाजीपाला
लेखांक ०३
टोमॅटो
टोमॅटोचं आहारातील महत्व मी सांगण्याची गरज नाही इतकं हे पीक कॉमन आहे. काही भाज्या अथबा कंद हे आपल्या रोजच्या आहारात एवढे कॉमन आहेत की त्यांचं डाएटच्या दृष्टीनं कुठलंही महत्व सांगण्याची गरज नाही. बोटॅनिकल सायन्सच्या दृष्टीनं टोमॅटो हे एक फळ असलं तरी त्याचा भाजी म्हणून जगभर वापर होत असतो. असं हे फळ विविध रुपात येतं. त्याचा वापरही आपण कच्च्या, हिरव्या स्वरुपात करु शकतो अन पिकलेल्या लाल रसरशीत टोमॅटोही आपण कच्चा अथवा शिजवुन खाऊ शकतो. या लेखात आपण टोमॅटोच्या सर्व प्रकारच्या अगदी चेरी टोमॅटोसह, लागवडीविषयी पाहू.
टोमॅटोची लागवड ही रोपं तयार करुन नंत्र ती ट्रान्स्प्लान्ट करुन करतात. यासाठी आपण आधी टोमॅटोची रोपं कशी करायची ते पाहू. आपल्याकडे जर सीडलिंग ट्रे असेल तर तो वापरावा. नसेल तरी काही बिघडत नाही. जर वापरलेले पेपर कप्स असतील तर ते किंवा एखादा स्ट्रॉबेरी वा द्राक्षासारख्या फळांसोबत जी पुठ्ठ्याची खोका किंवा प्लास्टीकचे बॉक्सेस, कोल्डड्रिंकच्या बाटल्या इ. काहीही वापरावं. किंवा एखाद्या कुंडीत ज्यामधे मध्यम आकाराचं झाड लावलेलं असेल व मातीचा पृष्ठभाग मोकळा असेल तर त्याचाही वापर करावा.
जे काही आपण वापरणार आहोत त्याला खालच्या भागात आकाराप्रमाणे योग्य तेवढी छिद्रं करुन घ्यावी. त्यामधे अर्ध्यापेक्षा जास्त भागात पॉटींग मिक्स भरुन घेऊन ते स्प्रेनं ओलसर करुन घ्यावं. अशा समतल केलेल्या पृष्ठभागावर बिया हलकेच पसरुन घ्याव्यात. वर अर्धा ते पाऊण इंच पॉटींग मिक्सचा थर देऊन स्प्रेनं पाणी देऊन ओलसर करुन घ्यावं. बिया एक तर नर्सरीतुन विकत आणाव्यात किंवा घरातच जे टोमॅटो आहेत त्यातीलच एक टोमॅटो दोन तीन दिवस वेगळा काढून ठेवावा. असा टोमॅटो पूर्ण पिकला की त्यातून बिया काढून घेऊन स्वच्छ धुऊन घेऊन त्या पेराव्या. धुण्याची आवश्यकता असतेच असं नाही. पण मुंग्या लागू नयेत म्हणून घेतलेली खबरदारी आहे ही. त्यानंतर हे ट्रे थेट उन्ह मिळणार नाही पण सूर्यप्रकाश मात्र मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. माती सतत ओलसर राहील हे पहावं.
साधारण चार ते पाच दिवसांत अंकुर फुटलेले दिसून येतील. दिवसांतून किमाण एकदा तरी स्प्रेनं पाणी देत रहां. साधारण तीन ते चार आठवड्यांत रोपं सहा ते आठ इंच मोठी होतील. त्यावर किमान चार-पाच पानं असतील. रोपांची दाटी असेल तर काही रोपं वाकडी तिकडी वाढतील. शक्य झालं तरच त्यांना सरळ दिशा द्यावी. नाहीच जमलं तरी हरकत नाही. रोपं ट्रान्सप्लांट करताना योग्य ती काळजी घेता येईल.
बिया पेरल्यापासून दोन आठवड्यांनी रोपं कशात लावायची आहेत हे ठरवुन घ्या. त्याप्रमाणं कुंड्या, कंटेनर, मोठे खोके किंवा वाफे, जे काही असेल ते तयार करुन घ्या. टोमॅटोच्या एका रोपासाठी १५-२० लिटर्स क्षमतेची कुंडी अथवा कंटेनर पुरेसा होतो. खोली मात्र एक ते दीड फूटाची असायला हवी. कुंडी अथवा कंटेनर मोठा असेल किंवा वाफ्यात लागवड करणार असाल तर दोन रोपांमधे दीड फुटाचं अंतर राहील याची काळजी घ्यावी. जमिनीवर आणि दोन अथवा जास्त ओळींमधे लावणार असाल तर दोन ओळींमधे किमान दोन फूटांचं अंतर राहील याची काळजी घ्यावी. कुंड्या पॉटींग मिक्सने भरुन घेऊन ते योग्य तेवढं ओलं करुन घेऊन आठवडाभर सेट होण्यासाठी ठेऊन द्याव्या.
रोपं वीतभर उंचीची झाली की आधी तयार केलेल्या कुंड्यांमधे मधोमध टोच्या, किंवा स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्यानं आवश्यक तेवढा खड्डा करुन त्यात लावून खोडाभोवती माती हलक्या हातानं दाबून घ्यावी. जास्त जोर दिल्यास खोड पिचण्याची शक्यता असते. असं रोप पुन्हा उभं रहाणार नाही. म्हणून भरपूर काळजी घेणं आवश्यक आहे. आधी सांगितल्याप्रमाणे काही रोपं वाकडी वाढली असतील. ती सरळ उभी रहातील अशा प्रकारे मातीमधे घालून वर माती हलकेच दाबून घ्यावी.
टोमॅटोच्या रोपांना एकदा टोमॅटो धरु लागले की आधाराची गरज असते. म्हणून कुंडीमधे रोप लावल्यावर लगेचच एखादी चार पाच फूट लांब, एक दॊड इंच व्यासाची पण भक्कम अशी दांडी खोचून ठेवावी. रोप सुतळीनं अथवा शू लेसइतक्या जाडीच्या कुठल्याही धाग्यानं काठीला हलकेच बांधून घ्यावं. खोडाला गच्च आवळून बांधू नये. रोप वाढल्यावर जर अशी दांडी लावणार असाल तर टोमॅटोच्या मुळांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीपासुनच ही तयारी केलेली बरी. जमिनीमधे वाफ्यांवर जर रोपं लावली असतील तर अशा काठ्या लावु शकता किंवा दुसरा पर्याय म्हणजे वाफ्याच्या दोन आडव्या टोकांना मोठ्या काठ्या किंवा बांबू लावून दोन्ही काठ्या ता किंवा काथ्या अथवा जाडसर काहीही एकमेकांत बांधून ठेवाव्या. प्रत्येक दोपाच्या वर येईल अशा प्रकारे मधल्या दोराला सुतळीचा अथवा काथ्याचा तुकडा बांधून तो लोंबत ठेवावा. रोपं जसजशी मोठी होत जातील तसं हे काथ्या अथवा सुतळ रोपाभोवती गुंडाळून घेऊन त्याला वाढण्यासाठी मार्ग करुन द्यावा.
रोपं कुंडीत सेट झाल्यावर दोन ते तीन आठवड्यात त्याची वाढ दिसून येईल. सर्वात खालच्या बाजूला जी पानं असतील ती हलकेच काढून टाकावी. ती रोगमुक्त असतील तर मल्चिंग म्हणून तिथेच टाकली तरी चालेल. शेंडा खुडल्यास रोपाची वाढ आडवी होण्यास मदत होईल. आडवी वाढ झाल्यास टोमॅटोचं उत्पादन अधिक होतं. खोड अन पानं यामधल्या बेचक्यात नवीन फूट दिसेल. ती तशीच ठेवली तर वाढू लागेल. रोपाच्या खालच्या भागावरील अशी फूट काढून टाकावी. त्यामुळं अशा ठिकाणी जाणारा अन्नद्रव्यांचा प्रवाह थांबवुन वरच्या भागाकडे जास्त प्रमाणात जातो व पर्यायानं उत्पन्न जास्त मिळतं.
टोमॅटोसाठी जी काही अन्नद्रव्यं लागतील ती आपण आपल्या पॉटींग मिक्समधे घातली आहेतच. पण टोमॅटोला वाढीदरम्यान कॅल्शियमची जास्त गरज पडते. परिणामी टोमॅटोला ज्यात कॅल्शियम जास्त आहे ते खत देणं फार गरजेचं असतं. यासाठी सुरुवातीपासूनच कुंड्यांमधे बोनमील अथवा फिशमील घालावं. तसंच दर दहा बारा दिवसांनी कुंडीच्या आकाराप्रमाणं एक दोन चमचे या दोन्हीपैकी आळीपाळीनं घालत रहावं.
टोमॅटोच्या रोपावर नर फूल अन मादी फुल असं वेगळं काही नसतं. याला लागणाऱ्या फुलांमधे दोनही केसर असतात. अर्थात टोमॅटो सेल्फ पोलिनेटींग या प्रकारात मोडतो. असं असलं तरी यासाठीही वाऱ्याची अथवा मधमाशा, गांधीलमाशांची गरज असते. सर्व असुनही जर फुलं टोमॅटोमधे रुपांतरीत न होता गळून पडत असतील तर मानवी हस्तक्षेपाची गरज असते. अशा वेळी टोमॅटोच्या फुलांना हलकेच टिचकी मारावी म्हणजे परागीकरण होण्यास मदत होईल.
टोमॅटोला पाणी देताना नेहमी ते मातीच्या पृष्ठभागावरच द्यावं. पानांवर फवारु नये. पानं ओली राहिली की बुरशीजन्य रोगांची शक्यता अधिक वाढते. टोमॅटोच्या रोपांवर अधिक आढळणारा रोग म्हणजे नागअळी. मिलीबग्जही असतातच. म्हणून रोपांचं नियमित निरीक्षण करणे हे उत्तम. गोमूत्र दहापट पाण्यात मिसळून ते नियमित फवारल्यास कीड आटोक्यात रहाते. पण सकाळी लवकर जर निरीक्षण केलं तर बरीच कीड नजरेस पडेल. असे कीडे हाताने उचलून नष्ट करावे.
टोमॅटो हे संथ गतीनं वाढणारं पीक आहे. फुलाचा टोमॅटो झाल्यावर तो आपल्या किचनमधे येण्यास दोन महिनेही लागू शकतात. तेव्हा टोमॅटो पिकतच नाही किंवा टोमॅटो कधी काढायचा असे प्रश्न पडण्याची आवश्यकता नाही. शक्यतो टोमॅटो झाडावर पूर्ण पिकू द्यावा. कच्चे टोमॅटो हवे असल्यास योग्य त्या आकाराचे झाल्यावर काढून घेऊन वापरु शकता. ज्या टोमॅटोंवर लालसर किंवा पिवळट झाक आली असेल असे टोमॅटो काढून घेऊन ठेऊ शकता. आठवड्याभरात ते पिकतील. पूर्ण पिकलेले टोमॅटो नुसत्या हातानेही काढता येतील. पण कच्चे अथवा कच्चट असतील ते कात्री वा कटरच्या सहाय्याने काढावे. टोमॅटोचं झाड साधारणपणे तीन ते चार महिने टोमॅटो देत रहातं. त्यानंतर मात्र ते काढून टाकावं. अर्थातच रोपावर कुठल्याही प्रकारचा रोग नसेल तर ते कंपोस्टमधे किंवा तुकडे करुन मल्चिंगसाठी वापरण्यास हरकत नाही. पण रोग असेल तर ते दूर फेकुन द्यावं वा नष्ट करावं. माती सावलीत पसरुन ठेऊन तिला विसावा द्यावा. अशा मातीत लगेचच टोमॅटो अथवा वांगी लावू नयेत.
टोमॅटो तळाशी काळे पडणे: (यावर नेहमी प्रश्न येत असल्यामुळं यासाठी वेगळं लिहिलं आहे.)
टोमॅटोमधे अजून एक प्रकारचा रोग म्हणजे टोमॅटो तळाशी काळे पडणे व सडणे. (फोटोमधे दाखवल्याप्रमाणे). या रोगाला इंग्रजीमधे Blossom end rot (BER) असं म्हणतात. याला प्रामुख्यानं कॅल्शियमची कमतरता हेच कारण असतं. पण इतरही कारणं असतात, जसं की, पाणी अती होणं किंवा पाण्याच्या पाळीत खंड पडणं, अतीपाऊस अथवा पाऊसच नाही, नत्राचा डोस अती होणं, झाडांची अती काळजी करणं वगैरे. हा रोग टोमॅटोशिवाय भोपळी मिरची, भोपळा, वांगी याही पिकात उद्भवतो. मातीमधे कॅल्शियमची कमतरता असणं फार क्वचित घडतं. कारण जेव्हा आपण कुंडी भरतो तेव्हा याचा विचार केलेला असतोच. पण कधी कधी मातीत किंवा खतात असलेला कॅल्शियम झाडाला घेणं जमत नाही त्यावेळी कॅल्शियमची कमतरता भासून असा रोग पडणं शक्य असतं.
असं झाल्याचं दिसेल किंवा तसं होऊच नये म्हणून दर आठ-पंधरा दिवसांतून ताकाचं पाणी, चिमूटभर हिंग मिसळून खोडाच्या बाजूनं द्यावं. तरीही कॅल्शियमची कमतरता असेल तर नर्सरीमधे हर्बल कॅल्शियमच्या गोळ्या मिळतात किंवा शालेय वस्तुंच्या दुकानात खडू मिळतात. अर्धा खडू अर्धा लिटर पाण्यात पावडर करुन घालून पूर्ण विरघळू द्यावा. असं पाणी मातीमधे घालावं. अर्थात सगळे उपाय एकदम करु नयेत. ताकाच्या पाण्यानं हा प्रॉब्लेम सुटू शकतोच.
याव्यतिरिक्तही एक सेंद्रिय उपाय आहे अन तो म्हणजे घरीच कॅल्शियमयुक्त द्रावण बनवणं. एक लिटर पाणी घेऊन त्यात १००-२०० मिली. ताक किंवा निरसं दूध (म्हणजे रॉ मिल्क, न तापवलेलं) घ्यावं. दूध किंवा ताकाऐवजी, अंडी उकडल्यावर रहातं ते पाणीही वापरता येईल. एक चमचा एप्सम सॉल्ट, व २०० मिली कंपोस्ट टी. (कंपोस्ट टी कसा बनवाल. एक लिटर पाणी घेऊन त्यामधे तयार कंपोस्ट, तयार शेणखत किंवा गांडूळखत यापैकी जे काही असेल ते ओंजळभर मिसळावं. आठवडाभर ते गोणपाटानं झाकून ठेवावं. रोज ते आठवणीनं ढवळावं. नंतर हे तयार द्रावण गाळून घ्यावं. उरलेला गाळ कंपोस्टमधे किंवा पॉटींग मिक्समधे किंवा झाडांमधे घालावा. उरलेला कंपोस्ट टी बागेतील इतर झाडांवर फवारावा.) हे सगळं छानपैकी ढवळून स्प्रे बॉटलच्या सहाय्यानं टोमॅटोच्या रोपांवर फवारावं. अशी फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी. हे दर पंधरा दिवसांतून करत राहिलात तर रोपांना आवश्यक तो कॅल्शियम मिळत राहील अन तोही त्यांना त्वरित उपलब्ध होईल अन या रोगाला तोंडही देण्याची वेळ येणार नाही.
एक लक्षात घ्या. टोमॅटो पिकलेला असेल अन त्याच्या थोड्याच भागात जर असा प्रॉब्लेम असेल तर तेवढा भाग कापून टाकून उर्वरित चांगला भाग खाण्यास काही हरकत नाही. त्यापासून काहीही अपाय होत नाही.
© राजन लोहगांवकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा