गच्चीवरील_भाजीपाला
लेखांक ०६
मिरची
मिरचीच्या आहारातील उपयोगाबद्दल काहीही लिहिण्याची आवश्यकता नाही. हिरवी असो की लाल, मिरची ही आपल्या दैनंदिन आहारात, फ्रीजमधे अन मसाल्याच्या-मिसळणाच्या डब्यात लाल तिखटाच्या स्वरुपात असतेच असते. अशी मिरची दर वेळी विकत आणण्यापेक्षा आपण घरच्याच बागेत लावली तर? चार माणसांच्या कुटुंबात रोज मिरची अशी लागते तरी किती? मग काय हरकत आहे घरीच मिरची लावायला? चला तर मग पाहुया काय़ काय़ करायला लागतं घरच्याच बागेतुन हवी तेवढी ताजी, टवटवीत हिरव्या गार रंगाची मिरची नियमितपणे घेण्यासाठी. एकदम सोपं आहे ते. मिरचीची लागवड करण्यासाठी आपल्याला आधी रोपं बनवुन घ्यावी लागतात. त्यामुळं आधी आपण रोपं कशी बनवायची ते पाहू आणि मग कुंडी केवढी घ्यायची वगैरे पाहू.
बाजारात जशा पुष्कळ प्रकारच्या मिरचा असतात त्याप्रमाणेच आपला मिरचीचा वापरही वेगवेगळा असतो. म्हणजे लहान तिखट, काळपट हिरव्या लवंगी मिरच्या आपण पदार्थात तिखटपणासाठी वापरतो तर लांब पोपटी हिरव्या रंगाच्या मिरच्या खर्डा, ठेचा, लोणचं वगैरेंसाठी वापरतो. यातच काही जाडसर असतात त्यांची आपण भजी करतो तर लांब हिरव्या अन भोपळी किंवा सिमला मिरचीप्रमाणे जाड सालीच्या मिरच्या भरली मिरची म्हणून भाजीसाठी वापरतो. सिमला मिरची ही मिरचीच असली तरी तिची लागवड अन सगळंच वेगळं असल्यामुळं तिच्यावर वेगळा लेख नंतर लिहीन. आता फक्त साधी मिरचीच.
तर आपल्याला हव्या त्या प्रकारच्या मिरच्यांचं बी आपण नर्सरीतुन तर आणू शकतोच. पण बाजारातुन अथवा दारावर येणाऱ्या भाजीवाल्याकडून मिरच्या घेताना हव्या त्या प्रकारच्या मिरच्यांमधे दोन तीन मिरच्या जास्त झालेल्या अथवा पिवळ्या अथवा लाल होण्याच्या मार्गावर असलेल्या किंवा लाल झालेल्या घ्याव्या. अशा मिरच्या भाजीवाले सहसा बाजूला काढून ठेवतात. त्यातीलच दोन तीन मागितल्या तर ते नाही म्हणत नाहीत.
अशा मिरच्या व्यवस्थित धूवुन कोरड्या करुन कागदावर ठेवायच्या. ३-४ दिवसांतच त्या पुर्ण लाल होतील. फक्त सडू लागल्या नाहीत ना ते अधुन मधुन पहायचं. मिरचीच्या स्कीनमधलं पाणी बरंचसं कमी झालेलं असेल. कातडी चिवट झाली असेल. सुरीनं अशा मिरचीची स्कीन कापायची. आतमधे देठाच्याखाली बिया मधल्या कापसाप्रमाणे सॉफ्ट दांड्याला लगडुन बसलेल्या नजरेस पडतील. त्या सुरीच्या टोकानंच कागदावर काढून घ्यायच्या. बोट अजिबात लावायचं नाही. तो तिखटपणा फार त्रासदायक असतो. कागदावर बिया काढून घेतल्यावर हलकेच पुडी बांधुन अथवा घडी घालून ठेवायची.
दोन-तीन दिवसांनी, सिडलिंग ट्रे किंवा पेपर ग्लासेस अथवा फळांचे छोटे खोके तळाशी छिद्रं करुन घेऊन त्यात तयार पॉटिंग मिक्स घालुन पाणी फवारुन तयार ठेवायचं. वरच्या थरावर टोच्यानं हलकेच ओळी आखून घ्यायच्या अन त्यामधे मिरचीच्या बिया पेरायच्या. जमल्यास वेगवेगळ्या जातींकरता वगेवगेळे ट्रेज किंवा खोकी घ्यावीत. नाहीच जमलं तर ओळी वेगळ्या करुन त्यावर खूण करुन ठेवावी. वरुन हलकेच माती पसरुन घेऊन पाणी स्प्रे करावं अन खोकं सावलीत पण सुर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवावं. साधारण सव्वा ते दीड महिन्यात रोपं लागवडीसाठी तयार होतात. रोपं वाढीवर असताना त्यावर नीमपेंड किंवा नीमतेल बेस्ड द्रावण दर आठ दहा दिवसांनी थोडं थोडं फवारलं तर पुढे किडीचा सामना फारसा करावा लागणार नाही.
या मधल्या काळात रोपं ज्यामधे लावणार आहात ते कंटेनर्स अथवा कुंड्या तयार करुन ठेवाव्या. मिरचीच्या रोपांसाठी २० लिटर्स क्षमतेची अन १६ ते १८ इंच खोलीची कुंडी पुरेशी होते. मिरचीचं पूर्ण वाढ झालेलं झाड हे एका झूडूपाप्रमाणे असल्यामुळे एका कुंडीत शक्यतो एकच रोप लावावं. वाफ्यांत लागवड करायची असेल तर दोन रोपांत दीड फूट अन दोन ओळींत दोन फूट अंतर राखावं. रोपांची पुनर्लागवड केल्यावर माती व्यवस्थित दाबून घेऊन पाणी द्यावं. मल्चिंगचा फायदा सर्वच पिकांत होतो. तसाच तो याही पिकाला होतो. तेव्हा लगेचच हलक्या हातानं सुका पालापाचोळा अथवा वाळलेलं गवत अंथरुन घ्यावं. मिरचीच्या पिकाला भरपूर सूर्यप्रकाश मानवतो. पण तापमान ३० डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं की फुलगळ सुरु होते. त्यासाठी कडक उन्हाळ्यात किमान दिवसा तरी कुंड्या मोठ्या झाडांच्या सावलीत ठेवाव्या. जमिनीवर वाफे करुन मिरची लावणाऱ्यांनीही हा मुद्दा लक्षात ठेऊनच वाफे बनवावेत किंवा अती उन्हाच्या दिवसांत वाफ्यांवर जुन्या ओढण्या वगैरे मांडवासारख्या बांधून उन्हाची तीव्रता कमी करता येईल असं पहावं. रोपं कुंडीत अथवा वाफ्यात सेट झाल्यावर शेंडा आणि फांद्यांच्याही टोकाचा भाग खुडल्यास जास्त फुटवे येऊन मिरच्याही जास्त मिळतात.
रोपं ट्रास्प्लांट केल्यापासून दीड ते दोन महिन्यांत फुलं येतात. मिरचीची रोपं ही स्वयंपरागीभवन या प्रकारात मोडणारी असल्यामुळे परागीभवनासाठी मधमाशा, फुलपाखरं वगैरे किंवा हातानं काही करण्याची गरज नसते. एकाच फुलांत दोन्ही केसर असल्यामुळे परागीभवनाची प्रक्रिया वाऱ्याच्या झोतामुळे होते. पण फुलं जर गळत असतील तर फुलांवर हलकेच टिचकी मारुन किंवा रोप हलकेच हलवलं की परागीभवन होतं. फुलं रोपांवर दिसल्यावर साधारणपणे महिन्याभरात मिरच्या काढणीसाठी तयार होतात. एकदा मिरच्या काढाय़ला सुरुवात झाल्यावर पुढचे अडीच-तीन महिने मिरच्या मिळत रहातात. नंतर मिरच्या मिळणं कमी होत जातं. अशा वेळी रोपांच्या अर्ध्या अधिक फांद्या खोडाजवळ दोन तीन इंच ठेवुन छाटाव्या. छाटणीस सुरुवात खालच्या फांद्यांपासून करावी. नंतर महिन्याभरात नवीन फूट येऊन पुन्हा यथावकाश मिरच्या मिळत रहातात. नंतर मात्र रोपांना आराम द्यावा अन नवीन लागवड वेगळ्या कुंड्यांत करावी. मिरच्यांच्या सलग पुरवठ्यासाठी कुंड्यांचा एक अख्खा लॉट एकाच वेळी रिप्लेस करु नये. यासाठी दर महिन्याला ५-६ रोपं लावत गेल्यास मिरच्यांचा पुरवठा अखंड होतो.
मिरची आपण इतर झाडांवरील कीड मारण्यासाठी म्हणून वापरत असलो तरी तीही रोगाला बळी पडतेच. भुरी रोग पडल्यावर त्यावर त्वरित अन वेळच्या वेळी उपचार करणं आवश्यक असतं. यासाठी दिवसाआड रोपांची पहाणी करणं गरजेचं असतं. पानांमागे पांढऱ्या पावडरसदृश काही दिसल्यावर लगेचच कडुलिंबाच्या पानांचा अर्क अथवा गोमुत्र फवारावं. जास्त बाधीत असलेली पानं त्वरित काढून नष्ट करावीत. याशिवाय फुलकीडे व मावा, भुरी या किड्यांद्वारे लीफ कर्ल म्हणजे पानं चुरगळल्यासारखी दिसणे या रोगाचाही प्रसार होतो. वेळेत लक्ष न दिल्यास हा रोग संपूर्ण झाडावर पसरुन झाड रोगट दिसू लागतं. रोपं ट्रान्स्प्लांट केल्यावर सेट झाल्यापासून वेळच्या वेळी कंपोस्ट, शेणखत यांच्या सोबतीनं थोडं थोडं बोनमीलही देत राहिल्यास झाडं सक्षम होतील व कुठल्याही रोगाला बळी पडणार नाहीत.
© राजन लोहगांवकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा