गच्चीवरील_भाजीपाला - कारली

गच्चीवरील_भाजीपाला

लेखांक ०२

कारली


कारली त्यांच्या कडू चवीमुळं बरेचजणांची नावडती असली तरी त्यांचं आहारातलं महत्व अनन्यसाधारण आहे. कारल्यांचा कडवटपणा कमी करुन ती खाणं शक्य असतं. आहारात कारल्यांचा समावेश असला तर आरोग्यासाठी ते हितकारकच आहे. कारली आपण आपल्या बागेत घेऊ शकतो.

कारल्याच्या वेलीला दिवसभरात किमान सहा ते आठ तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. वेल नाजूक असल्यामुळं आधाराची गरज असते. मांडव घालणं शक्य नसेल तर कुंड्यांमधे काठ्या रोवून त्यांचा आपसांत बांधून मांडव करता येईल. वेलही नाजूक अन फळांचं वजनही फारसं नसल्यामुळं फार भक्कम अन टिकाऊ मांडवाची गरज नसते. एक वेल दहा-पंधरा लिटर्सच्या कुंडीत अथवा डब्यात छान वाढतो.

कुंडी भरताना त्यात माती, कंपोस्ट/शेणखत, नीमपेंड योग्य प्रमाणात घेऊन नेहमीप्रमाणे आधी तळाशी योग्य तेवढी छिद्रं करुन घेऊन त्यावर नारळाच्या शेंड्या, पालापाचोळा व्यवस्थित भरुन घेऊन माती, खत व नीमपेंड यांनी भरुन घ्यावी. कारल्याच्या बिया कुठल्याही नर्सरीतून मिळतील. अथवा बाजारातून कारली विकत घेताना निबर/जाडसर झालेलं अथवा पिवळं पडू लागलेलं एखादं कारलं घ्यावं. ते सावलीत ठेवुन द्यावं. दोन तीन दिवसांत ते पिकून उकलेल अन आतल्या लालसर बिया उघड्या पडतील. त्या व्यवस्थित काळजीपूर्वक काढून घेऊन धुऊन घ्याव्या व सुकू द्याव्या.

कुंडीतल्या मातीत एक इंच खोलवर बी पेरुन माती सपाट करुन घ्यावी. माती ओलसर राहील अशा प्रकारे पाणी देत रहावं. आठवड्याभरात बी रुजून येते.

वेल वाढत जाईल तसं तिला आधार देण्याची तयारी आधीच करुन ठेवावी. वेल वाढेल तसं तिला वळण देत मांडवावर चढवावं. कारल्याच्या वेलीवर नर फूलं अन मादी फुलं वेगवेगळी असतात. फुलाच्या मागच्या भागात छोटं कारलं असेल तर ते मादी फूल. साधारणतः परागीभवनाचं काम मधमाशा, गांधीलमाशा, फुलपाखरं करतातच, पण समजा बागेत माशा अन फुलपाखरं नसतील तर परागीभवन हातानं करावं. परागीभवन होण्यासाठी आणि किमान चारजणांच्या एका वेळेसाठी आवश्यक तेवढी कारली निघण्यासाठी आणि नर व मादी फुलांचं योग्य ते प्रमाण साधण्यासाठी बागेत एका वेळी किमान पाच ते सहा वेल लावावेत. जर मादी फुलांची गळ लक्षणीय असेल किंवा बाल्यावस्थेतील फळं पिवळी पडून गळत असतील तर परागीभवन योग्य त्या पद्धतीनं होत नसल्याची ती खूण आहे. अशा वेळी हातानं परागीभवन करावं.

परागीभवन व्यवस्थित झाल्यावर हळूहळू कारल्याची वाढ होऊ लागते. वेलीवर फुलं असताना आणि परागीभावन झाल्यावर कारली वाढीवर असताना खताचा आणि आवश्यकता भासल्यास पाण्याचा खंड पडू देऊ नये. फळांच्या पोषणासाठी खतपाणी वेळच्यावेळी मिळणं गरजेचं असतं. चांगलं परागीभवन होऊनही वाढीच्या काळात कुपोषण झालं तरीही फळगळ होऊ शकते किंवा कारली अशक्त राहू शकतात अथवा रोगाला बळी पडू शकतात. फळगळीशिवायचा रोग म्हणजे फळमाशी. ही फळ नाजूक अवस्थेत असतानाच आत शिरून संसार थाटते. कारली एक तर वेलीवर चटकन लक्षात येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याभोवती कागद अथवा प्लास्टीकची पिशवी बांधून ठेवणं कठीण. त्यामुळे फळमाशीसाठी सापळे लावणं उत्तम. वेलींच्या संख्येप्रमाणे प्लास्टीकच्या बाटलीचं तोंड कापून घेऊन, आत कुठलाही चिकट द्रव ठेवावा. उदा, तेल, जेली, पातळ केलेला गुळ वगैरे. त्यावर छोट्या वाटीत गोड वासाच्या फळाचे तुकडे ठेवावे. बाटलीला सर्व बाजूंनी भोकं पाडून घ्यावी व वरच्या भागाला प्लास्टीकचा कागद गुंडाळून घ्यावा. बाजूच्या भोकांतून माशा आत जाऊन बाहेर पडण्याच्या नादात खालच्या चिकट द्रवावर पडून चिकटतील. गच्चीवरच्या बागेसाठी अशा दोन ते तीन बाटल्या पुष्कळ होतात.

कारलीच्या वेलाला जरी उन्ह भरपूर आवश्यक असलं तरी जर तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसच्यावर जात असेल तर अर्धसावलीत वेल बांधावा. दुपारचं थेट उन्ह पडणार नाही याची काळजी घ्यावी. अती उन्हामुळं फळं मलूल पडतात.

परागीभवन झाल्यापासून साधारण १२ ते १५ दिवसांत कारली काढण्याजोगी होतात. जास्त उशीर केल्यास कारली निबर होतील. वेलीवरच दोन कारली पूर्ण वाढू द्यावी. म्हणजे पुढच्या लागवडीसाठी घरीच बिया तयार होतील. बिया रुजुन आल्यापासून दोन ते अडीच महिन्यांनी कारली मिळू लागतात आणि पुढे एक ते दीड महिना कारली मिळत रहातात. बियांसाठी ठेवलेली कारली वाळू लागताच काढून घ्यावीत व वेलीचा पसारा आवरुन कंपोस्टमधे टाकावा. सर्व कुंड्या एका जागी सावलीत रिकाम्या करुन घ्याव्यात व आतील मातीला एक दोन आठवडे आराम द्यावा. हीच माती पुन्हा लगेच कारली लावण्यासाठी वापरु नये.


© राजन लोहगांवकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...