गच्चीवरील_भाजीपाला
लेखांक ०७
भेंडी
साधारणपणे प्रत्येक घरात दर आठ-दहा दिवसांनी भेंडी खाल्ली जातेच. भेंडीमधे असलेली पोषणमुल्य पहाता तिचं नियमित सेवन हे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय फायद्याचं आहे. भेंडीचं पीक घेणं हे सर्वात सोपं काम आहे. फारशी देखभाल न लागणारं हे पीक प्रत्येक बागेत घ्यावं. कुंडीचा आकार अन खतपाणी याबाबत फारसं चोखंदळ नसलेलं हे पीक आपल्या गच्ची-बाल्कनीमधील बागेत घ्यायलाच हवं.
भेंडीसाठी साधारणपणे १५ ते २० लिटर्स क्षमतेची कुंडी पुरेशी होते. भेंडीच्या रोपाला एक मुख्य मूळ असतं जे सरळ खाली मातीमधे जातं. ते जेवढं खाली जाऊ शकेल तेवढी झाडाची उंची जास्त होते अन पर्यायानं उत्पादनही जास्त मिळतं. अर्थात नर्सरीतून जेव्हा आपण बिया आणतो तेव्हा तुमच्या आवडीनुसार अन महत्वाचं म्हणजे बागेतील नियोजित जागेनुसार तुम्ही उंच वाढणारी जात हवी की बुटकी म्हणजे ड्वार्फ जात हवी, हिरवी भेंडी हवी की लाल हवी हे ठरवून त्याप्रमाणे बियाणं घ्यावं.
भेंडीच्या बिया थेट पेरतात. म्हणजे रोपं करुन ती ट्रान्सप्लांट करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे आधी कुंड्या तयार करुन घ्याव्यात. पॉटिंग मिक्स भरुन घेऊन ते भिजवुन घेऊन सेट होऊ द्यावं. हे काम सकाळी करुन दिवसभर कुंडी उन्हात ठेवली अन संध्याकाळी बिया पेरल्या तर हमखास उगवण होते. बिया पेरताना बोटानंच मातीत एक इंच खोल खड्डा करुन त्यात बी पेरुन माती समतल करुन घ्यावी. कुंडी मोठी असेल किंवा भेंडी जमिनीत अथवा वाफ्यामधे लावणार असाल तर दोन रोपांत फूटभर अन दोन ओळींत दोन फूट अंतर राखावं.
साधारण आठवड्याभरात बिया रुजुन कोंब बाहेर पडलेले दिसतील. या दरम्यान माती कोरडी होऊ देऊ नये. मातीत ओलावा कायम राहील याची काळजी घ्यावी. मल्चिंग केल्यास ओलावा कायम टिकून राहील व पाण्याचीही बचत होईल. दर आठ ते दहा दिवसांनी कंपोस्ट, गांडूळखत, शेणखत वा इतर कुठलंही सेंद्रिय खत आळीपाळीन देत जावं.
भेंडीच्या रोपांची वाढ फार वेगानं होते. महिनाभरात रोपं दीड-दोन फूट वाढतात. बिया रुजून आल्यावर महिना-सव्वा महिन्यातच रोपं फुलांवर येतात. या पिकात परागीभवनाचा काही प्रश्न नसतो. झाडावर फुल दिसल्यावर ८ ते १० दिवसांतच भेंडी तयार होऊन काढता येते. चांगलं खतपाणी असेल तर रोजच नवीन फुलं येऊन भेंड्याही पुष्कळ मिळु लागतील.
भेंडी साधारण ५-६ इंचांची झाली की लगेचच कटर अथवा कुठल्याही धारधार हत्याराच्या साह्यानं तोडावी. भेंडीच्या देठाजवळ काटे असतात. नुसत्या हातानं तोडायल गेलं तर ते कधी टोचू शकतात, तसंच देठ काहीसं चिवट असल्यानं भेंडी तोडताना झाडाला इजा होऊ शकते. रोपाचं खोड आतुन पोकळ असल्यानं ते तुटण्याची शक्यता असते. तसं झाल्यास वरच्या भागावरची फुलं वाया जाऊ शकतात.
भेंडी लवकर काढली नाही तर ती निबर होऊ लागते. अशा भेंड्या स्वैपाकात वापरण्यासाठी निरुपयोगी असतात. बियांसाठी मात्र आपल्या गरजेनुसार ५-६ भेंड्या झाडावर पूर्ण पिकू द्याव्या. झाडांवर तयार असणाऱ्या भेंड्या कदाचित आपली दैनंदिन गरज भागवू शकणार नाहीत. पण त्या झाडावर ठेवुनही काही उपयोग बसतो. त्यामुळं तयार होणाऱ्या भेंड्या काढून घरात ठेवाव्यात. एकदा भेंड्या येऊ लागल्या की रोज किंवा दिवसाआड मिळत रहातात. अशा भेंड्य़ा साठवुन आपली भाजीची गरज भागवु शकता.
भेंडीवर पडणारे रोग म्हणजे पानं खाणाऱ्या अळ्या, मावा वगैरे. यासाठी भेंडीच्या रोपांची रोज सकाळी तपासणी करावी. अळ्या पानं खाऊ लागल्या की अक्षरशः एका दिवसात झाडाची सर्व पानं खाऊन टाकतात. कीड दिसताक्षणी ती हातानं काढून टाकावी. पानांच्या भेंडोळ्या असतील तर अशी पानंही काढून टाकावीत. नीमतेल पाण्यात मिसळून झाडांवर स्प्रे करावं.
भेंड्या येऊ लागल्यावर साधारणपणे दोन महिने भेंड्या मिळत रहातात. चारजणांच्या कुटुंबाकरिता ३५ ते ४० रोपं असली तरी पुष्कळ होतात. त्यामुळे जागेच्या उपलब्धतेनुसार दर दोन महिन्यांनी नवीन बिया पेरल्या की वर्षभर आपल्याला भेंड्या मिळू शकतात.
© राजन लोहगांवकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा