गच्चीवरील_भाजीपाला
लेखांक ०१
या लेखमालेतील हा पहिलाच लेख असल्यामुळे आपण आधी काही बेसिक व भाज्या वाढवताना ज्या उपयोगी गोष्टी लागतील त्या पहाणार आहोत. प्रत्यक्ष भाजी लावण्याआधीपासूनच या सगळ्यांचं नियोजन करणं गरजेचं असतं. भाजीच्या प्रत्येक प्रकारात मी कुंडी किती मापाची घ्यायची हे सांगणार आहेच. त्यामुळे ते इथे सांगण्याची आवश्यकता नाही.
पॉटींग मिक्स :
जेव्हा आपण कुठलंही झाड, मग ते फुलझाड असो की फळझाड, वेल असो की रोप, जमिनीत लावतो तेव्हा त्याच्या
मुळांना वाढीसाठी अनिर्बंध जागा असते. अशा झाडांची मुळं अन्नद्रव्यांसाठी मातीत
कुठल्याही दिशेने वाढू शकतात. पण जेव्हा आपण झाडांसाठी कुंडी वापरतो तेव्हा
मुळांच्या वाढीवर मर्यादा पडतात. त्यांची वाढ तर मर्यादित रहातेच पण त्यांना
अन्नद्रव्यांसाठीही आपल्यावरच अवलंबून रहावं लागतं. त्यामुळे कुंडीतील रोपांना
त्यांच्या पूर्ण लाईफसायकलमधे म्हणजे उगवणीपासून ते शेवटपर्यंत खतपाणी, अन्नद्रव्य या गोष्टींची कधीही कमतरता भासू नये याची काळजी आपल्याला
घ्यावी लागते.
यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे कुंडीत बिया पेरण्याआधीही आपण काय माध्यम वापरतो हे असतं. केवळ माती घेऊन काम भागत नाही. तर मातीमधे इतर घटकांचंही योग्य ते प्रमाण घ्यावं लागतं. या मिश्रणाला सर्वमान्य भाषेत "पॉटींग मिक्स" असं म्हणतात. उत्तम पॉटिंग मिक्सचे गुण म्हणजे रोपांच्या वाढीसाठी लागणारी सारी अन्नद्रव्यं त्यात भरपूर प्रमाणात असावीत. योग्य तेवढं पाणी धरुन ठेवण्याची क्षमता असावी. पाणी जास्त झालं तर ते वाहून जाण्याचा अर्थात पाण्याचा निचराही योग्य व्हायला हवा. कुंडीमधे हवा खेळती ठेवण्याची गरज असते. पॉटींग मिक्स ती गरज पुर्ण करण्यासाठी सक्षम असायला हवं. अशा मिक्समधे रोपांच्या वाढीसाठी मदत करणारे जीवाणू भरपूर असायला हवेत. मिक्समधे कुठल्याही प्रकारची कीड नसावी. कुंडी वजनालाही हलकी असायला हवी. म्हणजे इमारतीच्या स्ट्रक्चरलाही हानी पोहोचणार नाही व आपल्यालाही कुंड्या हलवताना त्रास होणार नाही.
आता जर आपल्या या मिक्सला असं सर्वगुणसंपन्न करायचं असेल तर सहाजिकच नुसत्या मातीनं हे काम होणार नाही. त्यासाठी आपण यामधे काय काय घटक घालायचे ते थोडक्यात पाहू. माती वापरायलाच हवी असं नाही. पण जर वापरायची असेल तर ती लाल माती असावी. काळी माती कुंड्यांमधे शक्यतो वापरु नये. कारण काळी माती चिकटपणा या अंगच्या गुणामुळे कालांतराने घट्ट बसते. म्हणून काळी माती वापरायची असल्यास त्यात लाल माती एकास एक प्रमाणात घालावी. यानंतर गांडूळखत, कंपोस्ट, कोकोपीट, शेणखत, नीमपेंड, मासळीखत असल्यास अन ते घालायची तयारी असेल तरच, वाळू असेल तर उत्तम आणि लाकडाची राख.
माती मिक्समधे घालण्यापूर्वी तिला आठवडाभर चांगलं उन्ह दाखवण्याची गरज असते. त्यामुळे मातीत असलेली कीड व कीडीची अंडी दोन्हींचा नाश होतो. पावसाळ्यात उन्ह दाखवणं शक्य नसेल तर आपण नीमपेंडीची अधिकची मात्रा किंवा ते घालण्याची वेळ वाढवू शकतो. माती ३०%, वाळू आणि कोकोपीटचं मिश्रण २०%, ३०% कंपोस्ट आणि गांडूळखत यांचं मिश्रण किंवा दोन्हीपैकी जे असेल ते, १०% शेणखत, व उर्वरीत भागात नीमपेंड, लाकडाची राख, मासळीखत घालून घ्यावं. हे सगळं मिक्स करुन घेऊन त्यावर जीवामृत किंवा वेस्ट डिकंपोजरचं पाणी फवारुन सगळं मिश्रण झाकून ठेऊन १५-२० दिवस सावलीत ठेवावं. गांडूळं उपलब्ध असल्यास तीही यात सोडावी म्हणजे मिश्रणाची गुणवत्ताही वाढेल.
कुंडी भरताना आधी जास्तीचं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य तेवढी छिद्रं आहेत याची खात्री करुन घ्यावी. झालंच तर मुळांमधे हवा खेळती रहाण्यासाठी कुंडीच्या भिंतींनाही छिद्रं करुन घ्यावी. खालच्या भागात नारळाच्या शेंड्या, उसाची चिपाडं, पालापाचोळा घालून वर दिलेल्या पद्धतीनं तयार केलेलं मिक्स घालून कुंडी भरुन घ्यावी. त्यात गांडूळं सोडल्यास उत्तम. अशा सर्वगुणसंपन्न पॉटींग मिक्स भरलेल्या कुंडीत एकदा रोपं वाढू लागली की आकाराच्या मर्यादेमुळे, झाडांच्या वाढीमुळे, उन्हा-पावसामुळे अन आपण घालत असलेल्या पाण्यामुळे त्यामधील अन्नद्रव्यं कमी होत रहातील. तेव्हा ती वरचेवर देणं गरजेचं आहे. खताअभावी किंवा खताच्या कमतरतेमुळे फळधारणा न होणं, फळं गळणं, वेली, रोपं अशक्त रहाणं वगैरे गोष्टी होऊ लागतात अन मग मिळणारी भाजी अत्यल्प येते. त्यामुळं उगवणीपासून नियमितपणे, खासकरुन फुलं आल्यापासून ते फळांची वाढ योग्यरितीने होण्यासाठी खतं नियमितपणे देणं गरजेचं असतं. प्रत्येक भाजीची खतांची गरज अन भूक वेगवेगळी असली तरी ते वेळापत्रक सांभाळणं गरजेचं असतं. बागकाम हा छंद जरी असला तरी त्याचीही एक शिस्त आहे अन ती पाळणं गरजेचं असतं.
जे कुंड्य़ांऐवजी आपल्या परसबागेत जमिनीमधे भाज्या घेणार आहेत त्यांनी भाज्या कुठे लावायच्या हे आधी ठरवुन घ्यावं. निश्चित केलेल्या जागेवरची माती किमान सहा ते आठ इंच मोकळी करुन घ्यावी. मोकळ्या केलेल्या मातीत कंपोस्ट, शेणखत व / वा गांडूळखत, नीमपेंड, लाकडाची राख वगैरे गोष्टी मिसळून घेऊन ढीग करावा. त्यावर जीवामृत किंवा वेस्ट डिकंपोजरचं पाणी शिंपडून आठ ते दहा दिवस असे ढीग किंवा वाफे सेट होण्यासाठी सोडावे. या दिवसांत बागेत इतरत्र कुठे गांडूळं दिसली तर तीही मातीमधे सोडावीत.
पोर्टेबल मांडव :
पुढील काही भागात आपण कुंडीत वेलवर्गीय
भाज्यांबद्दलही माहिती करुन घेणार आहोत. वेलींसाठी आधार म्हणून मांडव बनवण्याची
गरज भासते. जर गच्चीवर कायमस्वरुपी मांडव करुन घेतला असेल तर प्रश्नच नाही. पण
ज्यांच्याकडे तशी सोय नाही व कमी खर्चात काही करण्याची इच्छा असेल तर त्य़ासाठी एक
पर्याय;
आधी मांडवाचा आकार किती घ्यायचा आहे हे ठरवुन घ्यावं. चार पत्र्याचे किंवा प्लास्टीकचे डबे घेऊन त्यामधे डब्याच्या एक दोन इंच बाहेर येईल एवढा एक-दीड इंची पीव्हीसी पाईपचा तुकडा मधोमध ठेवून बाजूनं अर्धा डबा भरेल इतपत सिमेंट घालून पक्का करुन घ्यावा. सिमेंट पक्कं झाल्यावर डब्याच्या वरच्या भागात माती घालून त्यात हवं ते लावता येईल. म्हणजे चिनी गुलाब किंवा उन्ह सहन होईल असे सक्युलंट्स वगैरे. नंतर त्या पाईपमधे अर्धा इंची पाईप उभे करुन वरची टोकं एल्बोनं जोडून घ्यावीत. विकतचे पाईप्स दहा फूटांचे असतात. तेव्हा आपला मांडव दहा बाय दहा बाय दहा फूट नक्कीच होईल. जागेप्रमाणे कमी जास्त आकार घेण्यास हरकत नाही. चौकट तयार झाली की मग सहा ते आठ इंचांवर नायलॉनच्या दोरीनं उभी आडवी जाळी बांधून घ्यावी. वेली वाढल्यावर अशा जाळीवर सोडता येतील. समजा मांडवाच्या दोन बाजू दहा फूटांपेक्षा जास्त घ्यायच्या असतील तर दोन्ही बाजूंना सपोर्ट म्हणून अजून दोन डबे तसेच बनवुन घेऊन त्यात उभे सपोर्ट द्यावे. म्हणजे मांडव मधे वाकणार नाही. यासाठी लागणाऱ्या डब्यांत इतर काही लावण्याऐवजी समजा वेलीच लावायच्या असतील तर सिमेंटऐवजी पॉटींग मिक्सही वापरता येईल. पण मग मांडवाचा सांगाडा सरळ राहीलच याची खात्री देता येणार नाही. तुम्ही पीव्हीसी पाईप्स ऐवजी बांबूही वापरु शकता. फक्त बांबू चार पाच वर्षांत पावसामुळे कुजण्याची शक्यता आहे. म्हणून पीव्हीसी पाईप्स. अशा मांडवाला साधारण हजारभर रुपये खर्च येईल. अर्थात तो स्थानपरत्वे कमी अधिक होऊ शकतो. तसंच यात क्रिएटिव्हिटीलाही पुष्कळ वाव आहे.
परसबागेत वर दिल्याप्रमाणेही मांडव करु शकता किंवा कायम स्वरुपी फॅब्रिकेटेड मांडव तयार करुन घेऊ शकता. जागेचा प्रश्न असेल तर मोठ्या झाडांच्या आळ्यात वेलवर्गीय भाज्या लावून वेली झाडांवर सोडू शकता. फक्त वर लागलेल्या फळभाज्या वेलीला अन मुख्य झाडाला धक्का न बसू देता काढता येतील याची काळजी घ्या.
वेलींना वळण देण्यासाठी, तोडण्यासाठी तसंच फळं काढण्यासाठी शक्यतो हत्यारं वापरावीत. नखांनी तोडणं किंवा वेली कट करताना ओढून तोडणं वगैरे टाळावं. वेली दिसायला जरी नाजूक असल्या तरी त्यांचे तंतू मानवी केसांपेक्षाही भक्कम असतात.
इथून पुढे आपण कुंडीत भाज्या कशा लावायच्या ते पहाणार आहोत.
तळटीप : आता ज्यांना भाज्या लावण्याची इच्छा आहे पण पॉटींग मिक्स तयार नाही वा करता येणार नाही त्यांनी माती-कंपोस्ट-कोकोपीट-वाळू-नीमपेंड-शेणखत-गांडूळखत या गोष्टी ज्या व जेवढ्या उपलब्ध असतील त्या वापरुन सुरुवात करायला हरकत नाही. फक्त पीकवाढीच्या काळात खतं कमी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसंच आज कारल्याचं बी पेरल्यावर उद्या लगेचच मांडवाची गरज पडणार आहे असं नाही तर त्यासाठी दोन आठवडे तरी किमान लागतील. तेवढ्या काळात तुम्ही मांडव तयार करु शकता, अर्थात त्याचीही गरज असेल तरच. वेलींना आधारासाठी इतर काही सोय करता आली तरी चालेल.
©राजन लोहगांवकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा