छोटीसी बाग

छोटीसी बाग


आपण माणसं कुठंही रहात असू. अगदी जगाच्या पाठीवर कुठंही. झालंच तर रहाण्याचं ठिकाण कुठलंही असु दे, चाळीतली एखादी सिंगल रूम असु दे किंवा बादशाही थाटाचा महाल असु दे किमान एक तरी झाड आपण लावतोच. अगदीच काही नाही तर लहानशा डब्यात तुळस तरी असतेच असते. पुर्वीचे ब्लॅक-ऍण्ड-व्हाईट मराठी चित्रपट आठवून पहा. चाळीतल्या कॉमन गॅलरीत प्रत्येक दारासमोर डालडाच्या पत्र्याच्या डब्यात तुम्हाला तुळस दिसणारच.

या साऱ्याच्या मागचं कारण एकच. आपण कितीही उंच भराऱ्या मारल्या तरी आपली मुळं ही मातीतच आहेत. या मातीबद्दल प्रत्येकाच्या मनात ओढ आहेच. कुणी ती जाणतं तर कुणाला कल्पनाही नसते. कुणी ती दाखवतं तर कुणी न दाखवता ती ओढ अन ते प्रेम जपतं. हे माती अन निसर्गावरचं प्रेम असंच प्रत्येक माणसा-माणसाच्या मनात कायम अन चिरंतन राहील. अगदी जगाच्या अंतानंतरही. पण हे प्रेम जपण्याच्या मार्गात अनंत अडचणी येत असतात. त्यात जागेची अडचण ही सर्वात मोठी. त्यानंतर मग सोसायटीतली अडेलतट्टू कार्यकारिणी अन त्यानंतर असते बजेट नावाची अडचण.

तर ही जागेची अडचण आपल्याला सहज सोडवता येईल. त्यासाठीच हे एवढे शब्द खर्ची घातले. हा लेख वाचल्यावर तुम्ही जागेच्या अडचणीवर तर मात करु शकालच, पण त्यासोबतच बजेटचीही अडचण दूर होईल. हं, फक्त सोसायटीची अडचण मात्र तुमची तुम्हालाच दूर करावी लागेल. त्यावर मी तरी काही सांगू शकणार नाही. लेख वाचल्यावर, किंवा वाचत असतानाही तुमच्या क्रिएटिव्ह डोक्यात अजुनही काही कल्पना येतील. त्या अंमलात आणून घरी बाग फुलवलीत की माझा हा लेख सार्थकी लागेल. तुम्ही आवर्जुन सांगितलं नाहीत तरी मला समाधान मिळेल एवढं नक्की.

आजच्या ऑनलाईनच्या अन पॅकेज्ड फूडच्या जमान्यात घरोघरी असंख्य अन विविध आकाराची खोकी अन प्लास्टिक कंटेनर्स जमा झालेले असतात. सगळेच असं काही भंगारात देत नाहीत. काही फेकुनही देत असतात. तर असं काही फेकून वा विकुन टाकण्याऐवजी आपण तेच सारं कल्पकतेनं वापरायचं. कार्डबोर्डची खोकी जी किमान चार इंच तरी खोल असतील त्यात तुम्ही पालक, मेथी, शेपू वगैरेंसारख्या पालेभाज्या व मेथी-पुदीन्यासारखे मसाले लावू शकता. एवढंच काय तर कांदा लसूणही त्यात लावू शकता. कांदा लसणाची पात नियमित काढत राहिलात तर तीन-चार वेळा नक्कीच काढता येईल. काही खोकी वा डबे जे दहा ते बारा इंच खोल असतील त्य़ात मुळा, बीट सारख्या कंदभाज्या व टोमॅटो, वांगी, मिरची सारख्या फळभाज्याही लावु शकता. यातल्या प्रत्येक भाजीच्या लागवडीसंदर्भात माझे जुने लेख आहेत ते शोधुन तुम्ही ती ती लागवड करु शकता. खोकी ठेवण्यासाठी जर काही अडचण असेल तर पीव्हिसी पाईप्सपासून तुम्ही उपलब्ध जागेनुसार ते कापून एल्बोज अन टी जंक्शन्स वगैरे वापरुन घरच्या घरी स्टॅन्डही बनवुन त्यावर ठेवू शकता. (केवळ संदर्भासाठी म्हणून असे रॅक्स वा स्टॅन्ड्स कसे बनवायचे यासाठी एक व्हिडिओ लिंक सोबत जोडत आहे. हे जरी शू रॅकसाठी असलं तरी आपापल्या आवश्यकतेनुसार लांबी-रुंदी व दोन कप्प्यांतील गॅप तुम्ही ठेवु शकता. https://www.youtube.com/watch?v=WHeZUWd6U5M )

हा झाला बजेटच्या दृष्टीनं केलेला विचार. पण बजेट हा अडसर नसेल पण जागाच कमी असेल तर तुम्ही जागेच्या मापात बसतील असे खोके बनवुन घेऊ शकता. आंब्याच्या पेट्या नुकत्याच सगळीकडं उपलब्ध आहेत. अशा पेट्यांना काहीही करण्याची गरज नाही. या दोन ते तीन वर्षं आरामात टिकू शकतात. हवं असल्यास तुम्ही त्यांना आतुन बाहेरून वॉर्निश लावून व्यवस्थित वाळवुन घेऊन त्या वापरायला घेऊ शकता. कुणाला यात केमिकलबद्दल काही हरकत असेल तरीही काही बिघडत नाही. तसेही वापरलेत तरी चालेल. मेडिकल स्टोअर्समधे थर्माकोलचे रिकामे बॉक्सेस मिळतात. तसंही ते टाकुनच देत असतात. तुम्ही मागितलेत तर ते फुकटही देऊ करतील. तेही आणून त्यात खोली अन लांबी-रुंदीनुसार तुम्ही लागवड करु शकता.

या अशा छोटेखानी बागेचे तेही मातीविना बागेचे काही फायदे आहेत. अन ते म्हणजे;

कीड : अशा खोक्यांत मातीच वापरली नाही तर त्याअनुषंगानं येणारी कीडही नसेल. जी काही पेरलेल्या बियांवाटे व लावलेल्या रोपांमुळं येईल तिचं निर्मूलन करणंही सोपं होईल. अन परवाच सांगितल्याप्रमाणं जर भाज्यांचा फेरपालट करत राहिलात तर कीडही वेळीच मरुन जाईल. तसंच एकाच खोक्यात जर एकापेक्षा जास्त मित्रपिकं घेतलीत तर ती एकमेकांच्या सहाय्यानं कीडीचा नायनाट करतील.

हाताळण्यास सोपी : अशी बाग ही जमिनीतली वा गच्ची-बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यांमधली नसल्यानं तुम्हाला खाली वाकून काम करावं लागत नाही. आत जी माती वा जे काही पॉटींग मिक्स तुम्ही उपलब्धतेनुसार वापरलं आहे ते नियमित वापरानं हलकंच राहिलेलं असणार आहे. त्यामुळं अनावश्यक गवत वाढलंय, तण वाढलेत वगैरे समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागणार नाही. मातीही घट्ट झाली आहे असं देखील होणार नाही.

अल्प खर्च : जमिनीवरची वा कुंड्यांतली बाग असल्यावर त्यांची वेळोवेळी खुरपणी, खतं अन मुबलक प्रमाणात वापरलं जाणारं पाणी हे सगळं आलं. पण मोकळी खोकी अन तीही एका खाली एक अशी रचल्यावर कमी पाण्यात काम होतं. झालंच तर खतंही कमी दिलेली चालतात. कारण वजन कमी ठेवण्यासाठी आपण माती न वापरता कंपोस्ट, ओला-सुका कचरा यांचं मिश्रण वगैरे गोष्टीच वापरलेल्या असल्यानं ते सारं त्यांत लावलेल्या रोपांना आवश्यक ती अन्नद्रव्यं अन पोषणमुल्य जागीच उपलब्ध करुन देत असतं. त्यामुळं खतांवर अन पर्यायानं कीटकनाशकांवर केला जाणार खर्चही टाळता येतो.

सुलभ वापर : कंबरदुखी वा पाठदुखी असणाऱ्यांसाठी व घरातील मुलांसाठीही ही बाग करणं वा अशा बागेत काम करणं अतिशय सोपं जातं. कारण यात वारंवार वाकायची गरज नसते. त्यामुळं कंबर वा पाठ दुखतेय असं काहीच काम नसतं. तसंच फक्त अधुन मधुन थोडं पाणी घालणं अन टोमॅटो, वांगी, मिरची वगैरेंची वाढ पहाणं ही सोपी कामं असल्यानं बच्चेमंडळीही अशा बागेत लक्ष घालतात.

हलविण्यास सोपी : अशी बाग जरुर पडल्यास एका जागेहुन दुसऱ्या जागी सहजतेनं हलवता येते. तेही झाडांना फारसा धक्का न लावता. त्यामुळं नुकसान काहीच होत नाही. जमिनीवरची बाग तर हलवणं शक्यच नसतं. पण कुंड्यांमधे वा मोठ्या ड्रम्समधे जर झाडं लावलेली असतील तर ते काम मदतनीसांशिवाय अन खर्च केल्याशिवाय होणं कठीणच असतं. त्या तुलनेत अशी बाग कुठल्याही कारणासाठी हलविणं सोपं पडतं. मग ते शिफ्टींग असो की साफसफाईसाठी असो. थोड्याच वेळात अन कष्टात बाग हलवुन पुन्हा नव्या जागी अतिशय सोप्या पद्धतीनं लावता येते.

चाळीत रहणारे व बंदिस्त बिल्डींगमधे रहाणारे अशांसाठी अशी बाग फारच उपयुक्त ठरते. बागेत काम केल्यानं थकवा जातो वगैरे गोष्टी आज सर्वमान्यच आहेत. पण त्यासाठी लागणारी मोठी बाग सर्वांनाच मिळते असं नाही. बरेचजण निवृत्त झाल्यावर आपण मोठं घर घेऊ अन स्वतःची बाग करु म्हणून स्वप्नं पहात असतात. ती खरी होईपर्यंत आपलं वय वाढलेलं असतं अन त्या वयात ती जमिनीवरची बाग फुलवणं कठीण होऊन बसतं. तसं जरी नाही झालं तरी ती तशी बाग होईल तेव्हा होईल. पण ती होईपर्यंत वाट पहाण्यापेक्षा आता उपलब्ध जागेत जास्तीत जास्त झाडं लावली वा पिकं घेतली तर ते उत्तमच आहे की. निदान मोठी बाग करेपर्यंत प्रॅक्टीस तरी होईल. अशा बागांचा अजुन एक फायदा म्हणजे यामधे आपण आपल्याला हवी ती पिकं घेऊ शकतो. सीझन वगैरेंचा विचार करण्याची गरज आपल्याला नसते. आपल्याला जे हवं ते आपण आपल्याला हवं तेव्हा पेरुन उगवु शकतो. अती पावसानं पालेभाज्या खराब झाल्या वगैरे आपल्या बाबतीत कधीच नसतं. कारण आपली बाग पोर्टेबल असल्यानं आपण ती केव्हाही हलवु शकतो.

तेव्हा मंडळी, जे जागा नाही म्हणून बाग नाही असा विचार करत असतील त्यांनी लगेचच कामाला लागावं. पाऊस सुरु होण्यास आता फार वेळ नाही. पण त्याआधी आपली जागा अन त्या जागेत काय केल्यावर आपल्याला जास्तीत जास्त बाग फुलवता येईल याचा लगेचच विचार करा अन लागा कामाला. ज्यांच्याकडं जमिनीवरची वा गच्ची-बाल्कनीमधली बाग असुनही जर थोडीशी जागा उपलब्ध असेल व अशा जागेचा वापर करायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठीही हा लेख उपयुक्त ठरु शकेल. काही लागलंच तर आहोतच आम्ही सांगायला.


© राजन लोहगांवकर

वानस्पत्य®

४ टिप्पण्या:

  1. सुचवलेल्या कल्पना आवडल्या. माझी काही झाडं पेट फूडच्या जाड्या प्लास्टिक सदृश पिशव्यांमध्ये लावली आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. मस्तच. त्याला योग्य तेवढी छिद्रं पाडली असतीलच. फक्त पावसाळ्यात पाणी साचू देऊ नका. प्लास्टिकच्या असतील तर आत बुरशी किंवा शेवाळं जमा होतं. पाणी जरी वाहून गेलं तरी मातीचा जो भाग पिशवीच्या आतल्या जागेवर आहे तिथं हमखास शेवाळं जमा होतं. माती मुळांना धक्का लागणार नाही अशा बेतानं नियमितपणं हलवत रहा.

    उत्तर द्याहटवा
  3. या ब्लॉगची उपयुक्तता नावापासूनच सुरु होते आहे. वानस्पत्य! किती छान नाव. आणि अर्थपूर्ण ही. संपूर्ण सजीव सृष्टीचे अस्तित्वच या हिरव्या देवतांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे कारण सजीवाला आवश्यक अन्न निर्मिण्याची शक्ती केवळ या हरित शक्तीने सुसज्ज देवतांपाशी आहे. मला खात्री आहे की परसबागेशी संबंधित असलेल्या अनेक विषयांना यातील लेख स्पर्श करतील आणि परसबागेच्या छंदाला साजरे करणारे असंख्य लोक आणि त्या छन्दाला आत्मसात करण्याची इच्छा असणारे लोक, सर्वांनाच त्यातील सर्व माहिती एकाच ठिकाणी विस्तृत स्वरूपात मिळेल. हा अत्यंत स्वागतार्ह आणि आवश्यक उपक्रम आहे आणि शिक्षणाच्या इतर अनेक मार्गांनी ( पुस्तके, पत्रिका, व्हिडीओ, एक्स्प्लेनर व्हिडीओ इत्यादी) याला आपल्याला जोड देता येईल आणि भविष्यात परसबागेच्या छंदासाठी हा एक वन शॉप स्टॉप ( सर्व आवश्यक माहिती एका ठिकाणी ) व्हावा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मनःपूर्वक धन्यवाद सर. आपलं प्रेम असंच निरंतर राहो. आपया या प्रेमाच्या उर्जेमुळं मला ननवीन लेख लिहिण्यास बळ लाभो हीच सदिच्छा. पुन्हा एकदा धन्यवाद.

      हटवा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...