पृथ्वीवरील सजीवसृष्टी - भाग १

पृथ्वीवरील सजीवसृष्टी - भाग १


कधी तुम्ही अशी परिस्थिती पाहिली असेल. तुमच्या घराजवळच्या उकीरड्यावर तुम्ही किंवा कुणीतरी खरकटं अन्न टाकलं आहे वा एखादा प्राणी कुठल्याही कारणानं मरुन पडलेला आहे. ना महानगरपालिकेची गाडी आली आहे ना कुत्री वा कावळे ते काही खात आहेत. दोन तीन दिवस तो घाण वास अन दुर्गंधी यानं तुमचं डोकं उठलं आहे. पण नंतर हळूहळू जसा तो दुर्गंध कमी कमी होत जातो तसंच ते मृत प्राण्याचं शरीरही आक्रसत आपलं रूप बदलत जातं. पुढच्याच काही दिवसांत तिथं दिसते ती केवळ माती. मग ते मृत प्राण्याचं शरीर गेलं कुठं? कुणी केली असेल त्याची माती?


जवळ जाऊन पाहिलंत तर तुम्हाला दिसतील काही किडे, मुंग्या वगैरे. हे झालं सहजपणे दिसणाऱ्या किड्या-मुंग्यांचं. पण आपल्या सामान्य नजरेला म्हणजे सूक्ष्मदर्शक वा भिंगांशिवाय न दिसणारेही असंख्य प्रकारचे कीडे, जीवाणू व अनंत प्रकारच्या बुरशी असतात ज्यांनी या सगळ्या घाणीचं अन मेलेल्या प्राण्यांच्या शरीराचं मातीमधे वा इतर कुणा किड्यांना खाता येईल अशा स्वरुपात रुपांतर अन विघटन केलेलं असतं. अन विघटन म्हणजे काय तर शरीराच्या काही भागाची माती होते, काही भागाचा कार्बन डाय ऑक्साईड होऊन तो मातीत मिसळला जातो तर काही भागाची साखर अन क्षार होऊन तेही मातीत मिसळले जातात.


हे बारीक कीडे, जीवाणू अन बुरशी हेही पृथ्वीवरील त्याच सजीवसृष्टीचा भाग आहेत ज्यात आपण माणसं व अन्य इतर लहान मोठे प्राणी रहात आहोत. इतर सारे सजीव प्राणी जो कचरा वा वेगवेगळ्या स्वरुपात घाण करतात त्याची माती बनवून जमीन सुपीक बनवणं तसंच पृथ्वीवरची जागा आपल्यासारख्यांना व इतर प्राण्यांना रहाण्यायोग्य करणं हेच यांचं काम असतं. अन ते इमाने इतबारे कुठल्याही ड्युटी अवर्स अन मोबदला व लेबर युनियन्स या शिवाय सतत चोवीस तास अन वर्षाचे बाराही महिने करत असतात. ते जर नसते तर आपण कल्पनाही करु शकणार नाही इतकी घाण अन दुर्गंधी आपल्या आजुबाजुच्या परिसरात अन वातावरणात निर्माण झाली असती. या साऱ्या जीवाणूंपैकी काही तर आपल्या शरिरातच असतात जे आपण ज्या क्षणी मृत्यु पावतो त्या क्षणापासूनच आपलं काम सुरु करत असतात.


हे डिकंपोजिंग होणं हा इकोसिस्टिमचाच एक भाग आहे. निसर्गात मुख्यत्वेकरुन तीन प्रकारच्या इकोसिस्टिम्स आहेत. एक जमिनीवरची, एक समुद्रामधली अन एक नद्या, सरोवरं, तळी वगैरेंमधली. पुढं यांतच वेगवेगळ्या इकोसिस्टिम्स तयार होतात. पण सर्वच बाबतीत मृत शरिरांचं अन बायोडिग्रेड होणाऱ्या साऱ्याच वस्तुंचं डिकंपोजिंग करण्यासाठी शरीरात, वातावरणात, हवेत व पाण्यात जे असंख्य सूक्ष्म व अतीसुक्ष्म जीवाणू यांचं असणं हे महत्वाचं आहे. याच बरोबरीनं त्यांना डिकंपोजिंगची म्हणजेच विघटनाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे वातावरण, त्यातील ओलावा, त्यांना लागणारं अन्न वगैरे.


ही डिकंपोजिंग किंवा बायोडिग्रेडेशनची प्रक्रिया कुठलाही जिवंत प्राणी मेल्याक्षणापासूनच सुरु होत असते. जिवंतपणीच्या साऱ्या हालचाली अन क्रिया-प्रक्रिया थांबताच शरिरातील रसायनं व एन्झाईम्स यामुळं ही कुजवण्याची प्रक्रिया जशी सुरु होते तशीच आपल्या शरिरातील काही बॅक्टेरियांमुळंही होत असते. ज्या ज्या म्हणून विघटनशील गोष्टी निसर्गात आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं, मग तो मृत मनुष्य असो की एखादा अवाढव्य प्राणी असो किंवा एखाद्या महाकाय वृक्षापासुन ते अगदी टीचभर गवतापर्यंत काहीही असो. प्रत्येक गोष्टीचं निसर्गतः ती मृत पावल्यावर विघटन होतच असतं. हे जसं जमिनीवर होतं तसंच ते समुद्रात मरण पावणाऱ्या त्यातील जीवांच्या शरिरांचं अन कचऱ्याचंही होत असतं. अन नद्या, नाले, सरोवरं अन तळी यांमधेही मृत पावणाऱ्या जीवांचं अन त्यात पडणाऱ्या कचऱ्याचंही होत असतं. यातलं मनुष्यासह इतर प्राणीमात्रांची विघटनक्रिया अन ओल्या सुक्या पालापाचोळ्याची व झाडा-रोपांची विघटनक्रिया यात जसं साम्य आहे तसंच काही गोष्टी वेगळ्याही आहेत. तसंच तुलनेनं कोरड्या वातावरणात म्हणजे जमिनीवर अन समुद्र वा नदी नाले यांमधे ज्या पद्धतीनं विघटन होतं त्या मधील जीवाणूही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही पद्धतींमधे प्राणवायु हा महत्वाचा घटक असतो तर काही पद्द्धतींमधे प्राणवायूचा अभाव असतो. म्हणजे आपण ज्यांना एरोबिक अन अनेरोबिक पद्धती म्हणतो त्या पद्धती. हे सगळं समजण्यास जरी फारसं क्लिष्ट नसलं तरी आपल्या बागकामाच्या दृष्टीनं अन विशेषतः कंपोस्ट करण्याच्या वा पिकं घेण्याच्या दृष्टीनं त्याचा आपल्याला जास्त विचार करण्याची गरज नाही.


निसर्गातील झाडं वा वनस्पती यांचे मृत अवशेष यांचा विचार केल्यास ते तुटून जमिनीवर पडल्या क्षणापासून त्यांचं विघटन होणं सुरु होतं. वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू अशा अवशेषांभोवती वा आतमधे जमा होतात अन आपलं काम सुरु करतात. हे समजुन घेण्याच्या सोयीसाठी अशा अवशेषांना आपण कचरा म्हणू. हा कचरा जेवढा छोट्या तुकड्यांत असेल तेवढं त्य़ाचं विघटन लवकर होतं. तसंच लहान रोपांचं विघटन जसं लवकर होतं तसं त्य़ांच्या तुलनेत मोठ्या वृक्षांचं, त्यांच्या खोडांचं अन फांद्यांचं विघटन होण्यास खूपच जास्त वेळ लागतो. याचं कारण म्हणजे बऱ्याचशा झाडांमधे, विशेषतः त्यांच्या सालींमधे अन खोडांमधे लिग्निन असतं. हे लिग्निन झाडांच्या पेशीभित्तिका म्हणजेच सेल वॉल्स भक्कम करतं. त्याशिवाय झाडांच्या शरिरात पाणी व अन्नद्रव्यं यांचं वहन करण्यास मदत करतं. या लिग्निनचं विघटन लवकर होत नाही. किंबहुना बहुतांश जीवाणू याचं विघटन करु शकत नाहीत. हे काम निसर्गतः करणं काही प्रकारच्या बुरशींनाच शक्य होतं. त्यामुळं कधी एखादा ओंडका वाऱ्या-पावसात भिजला आहे अन त्यावर बुरशी वा शेवाळं किंवा विशिष्ट प्रकारचे मश्रूम्स तयार झाले आहेत असं तुमच्या पहाण्यात आलं असेल. निसर्गानं निर्मिलेली ही विघटन क्रियाच असते.


क्रमशः

©राजन लोहगांवकर

वानस्पत्य®


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...