पृथ्वीवरील सजीवसृष्टी - भाग २

पृथ्वीवरील सजीवसृष्टी भाग २


मागील लेखात आपण पाहिलं की जो काही विघटनशील कचरा विविध कारणांनी तयार होत असतो तो निसर्गतःच विघटीत करुन पुन्हा मातीत मिसळण्यासाठी असंख्य जीवाणू अन बुरशी हवेत, मातीत अन पाण्यात असतात. त्यांचे विविध गट असुन ते एकमेकांना सहाय्य करत अशा कचऱ्याचं विघटन करुन ते मातीत मिसळतात. ही विघटन क्रिया होत असताना अन ती पुर्ण झाल्यावर जे काही जमिनीवर पडत असतं वा मातीत मिसळत असतं त्यात प्रमुख घटक असतो अन तो म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड.

आपण नेहमी "ग्लोबल वॉर्मिंग" बद्दल ऐकत असतो. सार्वत्रिक सरासरी तापमान वाढल्यामुळं हवेतला उष्मा प्रमाणाबाहेर वाढला असल्याचं आपण अनुभवत असतो. त्याहीसोबत हवामानातील बदल म्हणजे ’क्लायमेट चेंज’ झाल्याचंही पहात असतो. अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत हिवाळा, उन्हाळा अन पावसाळा यांचं एक ठराविक कॅलेंडर असायचं. त्यात अगदीच नाममात्र बदल किंवा ते पुढंमागं व्हायचं. पण तिन्हीपैकी प्रत्येक सीझन तीन-साडेतीन महिने सलग असायचाच. पाऊस वर्षातुन कधीही पडलाय असं फारसं व्हाय़चं नाही. दुष्काळ पडायचा, त्याची तीव्रताही फार असायची. पण ते फारच क्वचित घडायचं.

आता हे सारं लक्षणीयरीत्या बदललंय. उन्हाळा बारा महिने असतो. पाऊस देखील कधीही पडतो. हिवाळ्याचा काळ आक्रसला आहे. कधीही पडणाऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांना ना काही प्लानिंग करता येत ना होणारं नुकसान वाचवता येत. बरं, हे सगळं मानवामुळं घडलं आहे हे ठाऊक असुनही लगेचच त्यावर काही उपाय करता येत नाही. कारण आज जे काही आपण पहात आहोत वा अनुभवत आहोत ते एकाच दिवसांत वा एका ठराविक प्रदेशातलं नसुन हे फलित आहे वर्षानुवर्षं निसर्गाला गृहीत धरुन अन "काय फरक पडतो?" या उथळ विचारांतुन केलेल्या कृतीचं.

जेव्हा केव्हा अतीवृक्षतोडीतुन हे ग्लोबल वॉर्मिंग जन्माला आलं अन त्याचे दुष्परिणाम सर्वदूर पसरले तेव्हा त्यावर फारसा विचार न करता केवळ वृक्षलागवड करणं यावरच भर दिला गेला. एक जुनं पुराणं झाड, तेही स्थानिक वातावरणाच्या साथीनं वाढलेलं, तोडल्यावर तेथील परिसंस्थेचं काय नुकसान झालं. दृष्य अन अदृष्य स्वरुपात किती फरक पडला हे पाहिलं गेलंच नव्हतं. तसंही पर्यावरण, जंगल, शेती या विषयांना आपल्याकडंच नाही तर जगात कुठंही फारसं महत्व दिलं जात नाही. पाश्चिमात्य देशांत व जपान वगैरेंसारखा देशांत निदान या दृष्टीनं पुष्कळसं काम झालं आहे, होतही आहे. परंतु आपल्याकडं मात्र फारसं महत्व अजुनही दिलेलं नाहीये.

प्रत्येक गोष्टीत राजकारण अन पैसा करणं यातुन हे पर्यावरण अन वृक्षारोपणही सुटलेलं नाही. आजही जरी याविषयी जागरुकता वाढली असली तरी त्यात प्लानिंग नाही. म्हणूनच कुणी म्हणतं मला अमूक एक भागात एक लाख आंब्याची झाडं लावायची आहेत तर कुणी म्हणतं मी अडीच लाख वडाची झाडं या या भागात लावणार आहे. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करणं हा तर आपला स्थायिभाव. तुम्ही कधी एकाच ठिकाणी एकाच प्रकारची झाडं निसर्गतः आलेली पाहिली आहेत काय? निसर्गातही वैविध्य आहे. आपण ते पहातच नाही. जर स्थानिक वातावरणाचा अन हवामानाचा विचारच करायचा नसेल तर मग काश्मिरातही आपल्याला नारळाची झाडं दिसली असती अन राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशातही सफरचंदं अन केशराचे मळे दिसले असते. परंतु असं घडताना दिसत नाही. अगदी कुणी हट्टानं कराय़चा प्रयत्न केला तरीही त्याला एक तर यश मिळत नाही किंवा मिळालंच तर फारच मर्यादित स्वरुपात दिसेल. अन त्यासाठी जी वातावरणनिर्मिती करावी लागेल ती कृत्रिमच असेल अन खर्चिकही. तेव्हा असं काही निसर्गाविरुद्ध करण्यापेक्षा त्याच्याच साथीनं त्याचंच पुनर्भरण करणं यातच शहाणपण आहे.

जेव्हा एक झाड उभं रहातं तेव्हा ते त्याच्या वाढीच्या काळात आजुबाजुला असंख्य बदल घडवुन आणत असतं. ते कधी स्वतः तर कधी त्याच्या साथीनं विविध सजीव हे करत असतात. त्यावर असंख्य पक्षी व जीवाणू येऊन रहातात. ऋतुमानाप्रमाणं त्याच्या गळणाऱ्या पानांचं अन तुटणाऱ्या फांद्यांचं विघटन करुन आसपासची माती समृद्ध करत असतात. त्याच्या मुळांमुळं माती जशी धूप न होता एकाच ठिकाणी थांबत असते तसंच जमिनीमधला पाण्याचा साठाही वाढत रहातो. जीवाणू वाढले की आजूबाजूच्या कचऱ्याचं विघटन होऊन तो मातीत मिसळत असतो. त्यातुनच मातीमधला सेंद्रीय कर्ब वाढत जातो. जो काबन हवेत सोडला गेला असता तो मातीत मिसळल्यानं हवेतील उष्णता कमी होतेच पण अशा सेंद्रीय कर्बयुक्त मातीत उगवणारी रोपंही जोमदार होतात. ती अधिक फुलं अन फळं देतात. झालंच तर असे पदार्थ कुजताना व गुराढोरांचं शेण न कुजता तसंच राहिलं तर वातावरणात मिथेन वायु सोडला जातो तोही मर्यादित स्वरुपात रहातो.

आता या जमिनीतील सेंद्रीय कर्बाची पातळी कमी होणं अन मिथेन वायुची निर्मिती जास्त होणं या दोन्ही गोष्टींसाठी आपण बागकर्मी थेट जबाबदार जरी नसलो तरी आपण आपल्याला शक्य आहे तो खारीचा वाटा उचलत निदान जमिनीतील सेंद्रीय कर्बाचं प्रमाण नक्कीच वाढवु शकतो. आपल्या गच्चीवरच्या बागेतुनही आपण कुंडी-वाफ्यांमधला कर्ब वाढवला तर त्याचं दृष्यमान फळ म्हणजे अधिक पीक हे तर आपण नक्कीच मिळवु शकतो.

आपण जेव्हा एखादी बी पेरुन तिचं रोप-झाड-फळ या मार्गानं त्या झाडाचं आयुष्य संपल्यावर ते मातीतुन काढतो तेवढ्या काळात ते झाड मातीतुन बराचसा कार्बन घेत असतं. वनस्पती जेव्हा कार्बन घेते तेव्हा तो सेंद्रीय स्वरुपात उपलब्ध असतो. म्हणजेच सेंद्रीय कर्ब. रोपानं आपल्या संपूर्ण आयुष्यात वा एका सीझनमधे त्याला हवा तेवढा कर्ब घेतल्यावर सहाजिकच मातीतील कर्बाची पातळी कमी होते.

पुढील सीझनसाठी वा एक रोप काढून त्याजागी नवं रोप लावुन पीक घेण्यासाठी त्या मातीतुन घेतल्या गेलेल्या कर्बाचं पुनर्भरण करणं गरजेचं असतं. नैसर्गिक रीत्या हे हवेतील कार्बनमुळं होतच असतं. पण ज्या वेगानं रोपानं कार्बन खाल्ला आहे त्याच वेगात जर तो पुन्हा मातीत उपलब्ध करुन द्यायचा झाला तर त्यासाठी आपणच काहीतरी करायला हवं. अन यासाठी सर्वात सोपा अन सेंद्रीय दृष्ट्या व नैसर्गिक दृष्ट्याही योग्य उपाय म्हणजे मातीमधे कंपोस्ट भरपूर प्रमाणात मिसळणं.

कंपोस्टमुळं मातीला हवी ती अन्नद्रव्यं मिळतातच. पण मातीमधे हवा खेळती रहाते अन मातीमधे ओलावाही रहातो. मुख्य म्हणजे मातीतली कर्बाची पातळीही वाढते अन राखलीही जाते. जेव्हा एखादं पीक घेत असताना त्याला पूरक अशी मित्रपीकं घेऊनही हा सेंद्रीय कर्ब मातीमधे वाढवता येतो. पण तो मातीमधे फक्त वरच्याच काही भागात साठून रहातो. जर कर्ब जमिनीत खोलवर हवा असेल तर कंपोस्टसारखं दुसरं नैसर्गिक साधन नाही. ज्यांची बाग जमिनीवरची आहे त्यांनी रोपं-झाडं लावलेल्या ठिकाणी तयार कंपोस्ट तर घालावंच. तेही मातीत जितकं खोलवर देता येईल तेवढं द्यावं. पण बागेच्या इतर भागात जिथं रोपं लावली नाहीत तिथं बागेतला काडीकचरा जिरवावा. अगदी माती खणूनच द्या असं नाही तर नुसता वर पसरला तरी तुमच्या रोजच्या वावरण्यामुळं अन थंडी-वारा-उन-पावसामुळं तो विघटीत होऊन मातीतच मिसळला जाऊन तीही माती सुपीक होईल अन कर्ब वाढून थंडावा निर्माण होईल. माती सुपीक झाली की खतांवर होणारा खर्चही वाचेल अन त्यासाठी लागणारे कष्टही वाचतील. तसंच बागेत थंडावा राहिला तर आपण देत असलेल्या पाण्याचंही बाष्पीभवन फारसं होणार नाही. पर्यायानं पाण्यावरचा खर्च अन ते देण्याचे कष्टही कमी होतील.

तेव्हा बागेत निर्माण होणारा अतिरिक्त काडीकचरा जाळून टाकण्याऐवजी बागेत सगळीकडं पसरा. बाग नीटनेटकी करण्याच्या फंदात फारसं न पडता झाडांच्या बुंध्याशीही अन मोकळ्या जागीही काडीकचरा पसरुद्या. तो जागीच कुजुद्या. त्यासाठी आवश्यक भासलं तर ताक वा वेस्ट डिकंपोजरचं पाणी अधुन मधुन शिंपडा म्हणजे असा कचरा विघटीत होण्यास मदतही होईल अन ती प्रक्रिया लागणारा वेळही कमी होईल. बऱ्याचजणांची तक्रार असते की मातीमधे मुंग्या आहेत. या मुंग्याही कचऱ्याचं विघटनच करत असतात वा त्याला अप्रत्यक्षपणं मदत करत असतात. जमिनीत घुसुन त्या माती भुसभुशीत करत असतात. अशा मातीत हवा खेळती रहाते. पाणीही आतपर्यंत जातं. तेव्हा अशा काडीकचऱ्यावर ताक वा गुळाचं पाणी शिंपडल्यावर मुंग्या झाल्या तरी घाबरण्याचं वा काळजी करण्याचं काहीएक कारण नाही. इतर जीवाणू त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण झाला तर काही पलटावार करत नाहीत, मुंग्या करतात. म्हणून मुंग्या होऊच देऊ नये हा त्यावर उपाय नाही.

याबरोबरीनंच बागेतल्या मातीत कर्ब अन नत्र योग्य प्रमाणात राहील याची काळजी घ्या. रासायनिक खतं तर टाळाच. पण सेंद्रिय खतंही अशी द्या की ज्यामुळं हे नत्र अन कर्बाचं गुणोत्तर योग्य प्रमाणात राखलं जाईल. कर्ब नत्र यांच्या गुणोत्तरात जेवढी तफावत जास्त तेवढा सेंद्रीय काडीकचरा विघटीत होण्यास लागणारा वेळ जास्त. त्यामुळं काडीकचऱ्याच्या अन सुक्या पालापाचोळ्याच्या तुलनेत त्याला पुरक असा ओला कचरा किंवा शेणाची स्लरी वा गुळ-ताक यांचं मिश्रण वा वेस्ट डिंकोपजरचं द्रावण किंवा कल्चरमिश्रित पाणी घातल्यास कचऱ्याचं विघटनही लवकर होईल अन असा रुपांतरीत झालेला कर्ब रोपांच्या वाढीसाठी लवकर उपलब्ध होईल.

चला तर मग, आजच्या या दिवशी आपण वृक्षारोपण तर करुच, पण ते योग्य ते प्लानिंग करुन करु. जेणेकरुन मातीमधल्या कर्बाची पातळी वाढेल. तो जमिनीत खोलवर राहील अन त्यायोगे वातावरणातील तापमानही नियंत्रित राहील याची काळजी घेऊ. एक झाड तोडलं म्हणून त्याऐवजी दहा झाडं लावुन झालेलं नुकसान भरुन निघत नाही हे समजुन घेऊन नवीन झाडं लावतानाच पुढील काळात होणाऱ्या बदलांचा अन विकासाचा विचार करुनच झाडं लावू. आपल्या पिढीनं ज्या चुका केल्या त्यांची शिक्षा येणाऱ्या पिढीला मिळणार नाही अन पुढील पिढ्या निरोगी आयुष्य जगतील यासाठी आपण हे कार्य करु. मी आजवर एकही झाड तोडलं नाही म्हणून मी कशाला काही करु असा संकुचित विचार न करता किमान एक तरी झाड लावा. निसर्गासारखंच क्षमाशील व्हा.

आपणां सर्वांना हिरव्या कंच शुभेच्छा.

समाप्त

©राजन लोहगांवकर

वानस्पत्य®

२ टिप्पण्या:

  1. छान माहिती दिलीत सर... सरकार ने जर शेतकरयांना वृक्षारोपण मोहिम मध्ये सामावून घ्यायला हवे जनजागृती करणं आवश्यक आहे...कारण बरेच शेतकरी आजही बांधावर आग लावून टाकतात त्यात हजारो मोठाली झाड जळून खाक होतात व त्याबरोबर कित्येक औषधी वनस्पती देखील नष्ट होत आहे...

    उत्तर द्याहटवा
  2. खरं आहे. पण आजवरचा अनुभव पहाता ज्याच्यासाठी सरकारी योजना असतात त्याला कधीही विचारलं जात नाही. त्याला काय हवंय, त्याची गरज काय आहे हे कधीही पाहिलं जात नाही. साधं रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक बनवताना कुठल्या सेक्टरमधे किती वाजता किती गर्दी असते हेही पहात नाहीत तिथं या अशा गोष्टींमधे ते काय ज्याला मध्यवर्ती ठेवलंय त्याला विचारणार?
    शेतकऱ्यांनी अन सामान्य जनतेनंही प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडं पहाणं सोडून द्यायला हवं. जेवढं शक्य आहे तेवढं एकमेकांच्या मदतीनंच करुन आपले प्रश्न आपणच सोडवायला हवेत. तसं जेव्हा घडेल तेव्हाच काहीतरी ठोस होऊ शकेल.
    प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. आशा आहे की लेख आपल्याला आअडला असावा.

    उत्तर द्याहटवा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...