पावसाळ्यातील प्राणी

पावसाळ्यातील प्राणी



आता पावसाळ्यात बरेचसे प्राणी, गांडूळं, गोगलगायी, शंख, लहान लहान किडे, छोटे सरपटणारे जीव, वेगवेगळ्या रंगाचे कीडे, कधी एकएकटे तर कधी समूहानं, जथ्थ्यानं बागेत वावरताना दिसतील. प्रत्येक प्राण्याचं एक विहित कार्य आहे. ते पार पाडण्यासाठी ते जन्माला आलेले आहेत. कुणी परागीभवनासाठी तर कुणी या ओल्या गच्च दिवसांत पक्षांसाठी अन्न म्हणून जन्माला आलेले आहेत. यातीलच काही पुढं फुलपाखरं बनतील व तुमच्या बागेतील फुलांसोबतीनंच तुमच्या बागेलाही देखणी करतील.

हे सारे निरुपद्रवी आहेत. एवढंच नव्हे तर यापैकी बरेचसे बिनविषारीही आहेत. जे विषारी असतील त्यांच्यांमुळं तुमच्या जीवाला अपाय नक्कीच होणार नाही. काही किडे वा अळ्या झाडांची पानं खातील. ते त्यांचं अन्नच आहे. कीड लागून खराब झालेली पानं अन अशा अळ्यांनी उदा. फुलपाखरांच्या अळ्यांनी खाल्लेली पानं ही नजरेसच वेगळी दिसतात. जर झाडाला खरंच कीड लागली असेल तरच त्यावर उपाय करा. फुलपाखरांच्या अळ्यांनी पानं खाल्ली तर नवीन पानं येतील. त्यासाठी अळ्यांना मारू नका. झाड अगदीच मरेल असं वाटलं तर आणि तरच त्यावर उपाय करा. अन्यथा काही गोष्टी निसर्गावर सोडा. फुलपाखरांच्या अळ्यांची तर भूक प्रचंड असते. कित्येकदा झाडं अक्षरशः निष्पर्ण करुन टाकतात त्या. पण शेवटचं पान खाल्लं जात नाही तोवर नवीन पालवी फुटायला सुरुवातही झालेली असते. तिकडंही लक्ष द्या. सगळी पानं गेली म्हणून झाडही काही लगेच मरत नाही.

अळ्यांव्यतिरिक्त खेकडे, विविध रंगांचे बेडूक वा इतरही प्राणी जमिनीवरच्या बागेत या दिवसांत दिसतील. बेडूक तर बिचारा चावणारही नाही. उलट तो तुमच्या बागेतले उपद्रवी कीडे अन कीटक खातो. उदा, गोगलगायी वगैरे. म्हणजे तो तुम्हाला मदतच करत असतो. फक्त त्याची जाहिरात तो करत नसल्यानं तुम्हाला ते कळत नाही. पण खेकडा मात्र त्रास दिल्यावर वा पाय पडल्यावर नांगी मारेल. त्यानं कुणीही मरणार नाही. फक्त रक्त तेवढं काढेल. पण म्हणून त्याच्या टाळक्यात दगड घालायलाच हवा असं काही नाही. ते बिचारे वर्षभर जमिनीत खोलवर जाऊन बसलेले असतात. जिथं ओलसरपणा असेल तिथवर ते खोल जाऊन बसतात. पाऊस पडून माती खोलवर ओली झाली की ते वर येतात अन आपल्या बिळाच्या जवळपास असलेली कोवळी पानं, गवत, फळं वा फुलं खातात. माझ्या तर कितीतरी नुकत्याच अंकुरलेल्या शिराळी वगैरेंच्या वेली यांनी फस्त केल्या आहेत. अगदी दर वर्षी करतात. पण त्याला काही इलाज नाही. मांजर, कावळे, भारद्वाज सारखे डेअरिंगबाज किंवा गनिमी कावा करणारे पक्षी अन प्राणी यांची शिकार करतात. काळे खेकडे असतील तर माणसं रात्रीच्या वेळी मशाल पेटवून अन खेकड्यांना काहीतरी खाय़चा पदार्थ आहे असं भासवुन बिळाबाहेर आणतात अन कौशल्यानं पकडतात अन खातात. (शिजवुन की कच्चं ते मला माहीत नाही त्यामुळं लिहिलं नाही.) 

तर या खेकड्याचाही बागेतली कोवळी पानं खाण्यापलिकडं आपल्याला काहीच उपद्रव नाही. खेकडे मारण्यासाठी काही तज्ञ औषधं सुचवतील. पण एक लक्षात घ्या. त्यांची बिळं असतात खोलवर गेलेली. तुम्ही जे औषध टाकणार ते असणार रासायनिक. कडुलिंबाचं किंवा मिरचीचं नक्कीच नसणार. असं रसायन बिळांतून प्रवास करत जमिनीत मुरणार. वरच्या भागातल्या तुमच्या बागेचं नुकसान करणार अन खाली, म्हणजे जमिनीतल्या पाण्याच्या साठ्यातही मिसळून ते खराब करणार. त्यापेक्षा त्या खेकड्याला बागेतली पानं खाऊद्या किंवा तो खेकडा मांजरीच्या वा कुठल्या पक्षाच्या पोटात जाणार असेल तर जाऊद्या. उगीच निसर्गाचा समतोल बिघडवू नका. हे प्राणी वा पक्षी जेव्हा खेकडा खातात तेव्हा त्याच्या शरिराचा टणक भाग म्हणजे पाय, नांग्या वगैरे तसाच टाकून देतात. तो भाग मात्र ज्या झाडांना कॅल्शियमची आवश्यकता असते त्यांच्या बुंध्याशी मातीत शक्य तेवढे बारीक तुकडे करुन पुरुन त्यावर माती ओढून घ्या. कॅल्शियमचा नैसर्गिक स्त्रोत आहे तो. खुपच फायद्याचा होईल तो त्या झाडासाठी.

त्यामुळं दिसला कीडा की त्याला मार असं काही करु नका. अन दुसरं महत्वाचं म्हणजे प्रत्येक किड्याचं नांव अन जात, पोटजात, धर्म, गोत्र, शाकाहारी की मांसाहारी, चालतो की उडतो या गोष्टी आपल्याला कळायलाच हव्यात असं काही नाही. असेलच रस अशा गोष्टीत अन करायचाच असेल अभ्यास तर त्य़ासाठी एखादं ऍप आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल करुन घ्यावं.

अन सर्वात महत्वाचं म्हणजे लगेच घाबरुन जाऊ नका. तुमच्याहीपेक्षा झाडाला स्वतःची काळजी जास्त आहे. ते बरोबर काय़ ते करतं. आपण फक्त पायात चपला, शूज अन हातात मोजे वगैरे घालणं, बागकाम केल्यावर हात स्वच्छ धुऊन मगच चहाचा कप तोंडाला लावणं एवढी काळजी घ्यावी. किड्या-कीटकांनाही पावसाची मजा घेऊ द्या. जगा व जगु द्या. आनंद घ्या अन इतरांनाही घेऊ द्या. पाऊस केवळ माणसालाच आवडतो असं नाही. माणसाशिवायही इतर पुष्कळ प्राणी आहेत ज्यांना पाऊस आवडतो. तेव्हा इतर किड्यांकडं अन प्राण्यांकडं केवळ ते आपल्यामुळं डिस्टर्ब तर होत नाहीत ना हे पहाण्यासाठीच त्यांच्याकडं लक्ष द्या. त्यांना जेव्हा आपली भिती वाटेल तेव्हाच ते हल्ला करतील अन्यथा साधी मुंगीही आपल्या अंगावरुन न चावता चालत जाते. आपल्या मनात जेव्हा तिला मारण्याचा विचार येतो तेव्हाच त्या लहरी पकडून ती हल्ला करते. तोवर नाही.

पावसाळ्याच्या आपणां सर्वांना ओल्या गच्च शुभेच्छा. मजा करा अन मजेतच बागही करा.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

माझा हा लेख व आधीचेही लेख माझ्या  https://www.facebook.com/Vaanaspatya या ब्लॉगवरही उपलब्ध आहेत.

२ टिप्पण्या:

  1. माझ्या घरात ४/५ वर्षापासून वाळा नावाचा सरपटणारे किडे पावसाळ्यात निघतात. त्यांचा सोर्स समजत नाही. कृपया उपाय सांगा. मला इन्सेक्ट फोबिया आहे. ग्राउंड फ्लोरला बेडरूम मध्ये आणि हॉल मध्ये निघतात. बंगल्याच्या आवारात अनेक झाडी, वेली, कुंड्या आहेत, लॉन पण. एका कॉर्णेरला फाऊंडेशन करतांना ब्लॅक soil लागली होती. ३२ वर्ष चा बांधकाम आहे. कृपया उपाय सांगा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तसा वाळा हा अगदीच निरुपद्रवी प्राणी आहे. मुंग्या, कीडे, वाळवी वगैरे याचं खाद्य. तसा तो मऊ मातीमधेच सापडतो. हा फक्त पावसाळ्यातच बाहेर येतो. एरवी बिळात झोपुन रहातो. घरामधल्या हार्ड फरशी वा इतर सर्फेसवर येत नाही. आला तरी फार काळ तग धरुन रहात नाही. यावर उपाय असा काही नाही. दिसला की कशात तरी धरुन दूरवर मातीमधे सोडून देणे हेच करता येतं.

      हटवा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...