सप्तपर्णी - समज-गैरसमज आणि आरोप-प्रत्यारोप

सप्तपर्णी - समज-गैरसमज आणि आरोप-प्रत्यारोप


सप्तपर्णी हे देशी की विदेशी झाड हा वाद जसा जुना आहे तसाच सप्तपर्णी विषारी की बिनविषारी, अर्थात हे झाड माणसाच्या तब्येतीला योग्य की अयोग्य हेही वाद जुनेच आहेत. कोर्टात एखादी केस पिढ्याऩ पिढ्या चालते तसेच हे वादही चालूच आहेत. दोन्ही बाजूंनी कितीही सबळ पुरावे दिले तरीही. बरं, यातले बहुतांश पुरावे हे गुगल, विकिपिडिया अथवा अन्य कुठुनतरी घेतलेले असतात. अभ्यास वगैरे काही नसतं. फक्त प्रतिवाद करताना आत्मविश्वास दाखवला की झालं. समोरचा कितीही अभ्यासू असला तरी उच्चशिक्षणामुळं आलेल्या विनयानं गप्प बसतो. त्यामुळं आपलं पांडित्य आपोआप सिद्ध होतं. असो. तसंही आपसांत वाद घातले की काही लोकांना बरं वाटतं. अन वाद घालण्यासाठी अभ्यास करायलाच हवा असं कुठं लिहिलं आहे?

सप्तपर्णीचा दुस्वास किंवा या झाडाला विरोध करणारे बरेच लोक आहेत. टक्केवारी काढायची झाल्यास विरोध करणारेच स्पष्ट बहुमताच्या आधारे जिंकतील. मी तरी हे झाड कुणी आवड म्हणून आपल्या अंगणात लावल्याचं पाहिलं नाही. मीही कधी लावलं नाही अन लावणारही नाही. कारण घरापासून दीडशे मीटर्सवर मेन रोड आहे अन तिथं दुतर्फा हीच झाडं आहेत. घरबसल्या वास अथवा सुगंध येत असल्यावर पुन्हा अंगणातली जागा का अडवू?

या फुलांचा गंध सुरुवातीला फारच मोहक असतो. पण जसजशी सगळी झाडं फुलू लागली की सहन होण्यापलिकडे जातो. इथुनच मग या झाडाच्या प्रेमात असलेला माणूस विरोधात जाऊन बसतो. अन मग आधीपासूनच तिथं बसलेले हा जणू आपलाच विजय आहे अशा थाटात त्याच्याशी वागतात.

मग असं असुनही हे झाड सगळीकडे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी किंवा सोसायट्यांमधे का दिसतं? कारण सोपं आहे. याचं रोप लावा अन विसरुन जा. पावसाळ्यात मिळणाऱ्या पाण्यावर हे वर्ष काढतं. ना कसल्या खताची मागणी ना पाण्याची मागणी. आपण आपल्या बागेतल्या झाडाची जशी काळजी घेतो तसं या झाडांच्या बाबतीत मुळीच नसतं. देखभालच नाही म्हणजे खर्च नाही. वेगळा माळी ठेवायला नको. सहाजिकच खर्च शून्य. हेच कारण आहे ही झाडं सार्वजनिक ठिकाणी असण्याचं.

पक्षांचं म्हणाल तर पावसाळ्यात त्यांना विणीच्या काळात अंडी घालायला अन पिल्लं मोठी होईपर्यंत आडोसा लागतो. त्यामुळं ती ज्या झाडावर घरटं बांधणं शक्य आहे तिथं बांधत असतात. कधी तर घराच्या वळचणीलाही बांधत असतात. त्यामुळं सप्तपर्णीच्याही झाडावर तुम्हाला पक्षी बसलेले दिसतील अन त्यांची घरटीही दिसतील. मी तरी ती नेहमीच पहात असतो. त्यामुळं निदान माझ्यासाठी तरी हे ऐकीव किंवा गुगलवरुन शोधलेलं विधान नाहीये.

आता, या झाडाच्या उपयोगांबद्दल आणि औषधी गुणांबद्दल बोलणाऱ्यांना जे सज्जन लोक विरोध करतात त्यांना खरं तर हे पक्कं माहित असतं की सार्वजनिक ठिकाणी झाडं कुणा व्यक्तीनं अथवा या झाडाबद्दल चांगलं लिहिणाऱ्यानं लावलेली नसून ती जागोजागच्या महानगरपालिका व सोसायटीमधल्या मूठभर लोकांच्या कमिटीनं लावली आहेत. पण यांना विरोध करणं सर्वांनाच जमत नाही. म्हणून जिथं म्हणून या झाडाविषयी चांगलं लिहिलं असेल तिथं जाऊन कचरा केला की यांना धन्यता वाटते. सोबतीला गुगल वगैरे संदर्भ फेकले की समोरचा थंड पडतो.

आपल्या समूहावर सर्च ऑप्शन आहे. त्या खिडकीवर एखादा शब्द टाईप करुन दुर्बिणीवर टॅप केलं की तो शब्द असलेल्या असंख्य पोस्ट्स समोर दिसू लागतात. आता या पोस्ट्स म्हणजे काय़ असतं, तर आजवर अनेकांनी लिहिलेल्या पोस्ट्स, ज्यात माहिती जशी असते तसेच प्रश्नही असतात.

गुगल म्हणजे काय आहे? दिलेल्या जागी आपण आपला प्रश्न टाईप करुन एंटर हीट केलं की असंख्य पोस्ट्स अथवा लेख यांची यादी विविध साईट्ससह आपल्यासमोर दिसते. तेही सतराशे साठ कोटी सर्चेस ४ सेकंदात असं लिहिलेलं दिसतं. अन जेवढी पानं तेवढे गुगलच्या स्पेलिंगमधले "ओ" दिसतात. आता या यादीत जसे त्या विषयाच्या बाजूनं लिहिलेले लेख असु शकतील तसेच विरोधीही. गुगलचं काम तेवढंच. त्यामुळं गुगलवर अमकं लिहिलंय म्हणजे ते खरंच असतं वगैरेंमधे काही तथ्य नसतं. माझा जर एखाद्या गोष्टीला विरोध आहे तर मी विरोधी लिखाण वाचून माझ्या म्हणण्याला पुष्टी मिळवणार अन माझंच कसं खरं असं दाखवणार.

विकिपिडियाचंही तेच. तिथं तर तुम्ही आम्ही कुणीही तिथला लेख एडीट करु शकतो. त्यांना तुमचं म्हणणं पटलं किंवा तुम्ही ते पटवुन दिलं की तुम्ही एडिट केलेली माहिती फायनल. अर्थात पुन्हा कुणी ती एडीट करेपर्यंतच.

त्यामुळं, समोर आलेला लेख, मग तो एखाद्या ब्लॉगवर असो की बागकामासंबंधी कुठल्याही समूहावर आलेला असो. तो पूर्ण वाचावा. पटला तर लाईक करुन किंवा त्यावर कमेंट करुन पुढं जावं. नाही पटला तर सभ्य शब्दांत आपलं म्हणणं मांडावं. लेख लिहिणारा कुठं म्हणतोय की मी लिहिलंय तेच खरं आहे आणि तेच फायनल आहे म्हणून? बर, लेख आला म्हणून काही कुणी लगेच नर्सरीत जाऊन ते झाड आणून लावणार नाही.

तर मंडळी, सप्तपर्णी चांगली की वाईट, उपयुक्त की धोकादायक, औषधी की विषारी वगैरे पुष्कळ वैचारिक प्रवाह आहेत. आजवर या झाडामुळं कुणाचा जीव गेलेला जसं मी ऐकलं नाही तसंच याच्या मुळं कुणाचा जीव वाचलेलाही ऐकलं नाही.

अन तसंही कुठलं झाड अथवा रोपटं औषधी आहे वगैरे कुणीही सांगितलं तरी ते तुम्ही सांगणारा वैद्यकीय क्षेत्रातला नसेल तर ऐकूच नये. आजवर काही झाडं, जसं तुळस, दुर्वा वगैरे गोष्टी या औषधी असल्याचं सिद्ध झालं आहे त्यामुळं ते सेवन करायला हरकत नाही. पण एकसारखी दिसणारी पण विरोधी गुणधर्म असलेली पुष्कळ झाडं आहेत. त्यामुळं कुठंतरी वाचलं म्हणून दिसलं झाड की काढ पानं, काढ रस अन ओत तोंडात असं मुळीच करु नका. जीवाचा प्रश्न असतो. जीवन असेल तरच जीवन की बगिया महकेल. नाहीतर काय कराय़चीत ती फुललेली बाग?

जाता जाता, या सप्तपर्णीवर वाद घालणाऱ्या दोन्ही पक्षांना नम्र विनंती की हाती भक्कम पुरावे असल्याशिवाय बोलू नका अन वाद तर त्याहुनही घालु नका. सप्तपर्णीच्याच बाबतीत नाही तर कुठल्याही झाडाच्या बाबतीत. 


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

२ टिप्पण्या:

  1. स्वानुभव खरा आणि आरोग्य म्हटले की वैद्याचा शब्द प्रमाण. औषध म्हणून काही मात्रा त्यांनी दिली की ती सेवन करायची. गुण प्रकृतीनुसार मिळणार. ☺️

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अगदी खरं. झाड वा त्याची पानं वगैरे औषधी आहेत असं कुणीही सांगितलं तरी जोपर्यंत वैद्य अथवा डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत ते न घेतलेलंच बरं. तुळस वगैरेंवर खूप संशोधन झालेलं आहे अन ते जगन्मान्यही आहे. त्यामुळं ते सेवन करण्यास हरकत नाही.
      प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

      हटवा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...