कंपोस्ट अन त्यामधले विविध जीव

कंपोस्ट अन त्यामधले विविध जीव



सामान्यतः जे घरी कंपोस्ट करत असतात त्यांच्या दृष्टीनं कंपोस्ट म्हणजे ओल्या सुक्या कचऱ्याचं योग्य ते प्रमाण राखून ठराविक कालावधीनंतर हाती आलेलं काळं वा मातकट रंगाचं अन मातीसदृश वा चहापावडरसारखं दाणेदार मॅटर. या दरम्यान त्यात आवश्यक ओलावा राखणं अन अधुनमधुन वरखाली करणं एवढंच. पण हे कचऱ्याच्या मोठमोठ्या तुकड्यांचं मग ती फळांची सालं असोत की वाळक्या फांद्यांचे तुकडे, या साऱ्यांचं रुपडं पालटून दाणेदार पावडर कशी होते याबाबत फारशी जागरुकता नाही. अन त्यातुनच "माझ्या कंपोस्टबिनमधे मुंग्या आहेत किंवा अळ्या आहेत वा अगम्य कीडे आहेत" सारखे प्रश्न येऊ लागतात. तर काय काय असतं आपल्या कंपोस्टच्या ढिगाऱ्यात अन काय भूमिका असते त्यांची. काय काम करतात हे सारे आपल्या कंपोस्टात. चला पाहू या.

कंपोस्टींगच्या तीन अवस्था असतात हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. एक सुरुवातीची म्हणजे इनिशिएशन किंवा मेसोफिलिक फेज. कंपोस्टींग नुकतंच सुरु झालेलं असतं. तापमानही अगदीच नॉर्मल, म्हणजे बाहेर हवेत असेल तेवढंच किंवा ओलं मॅटर जास्त असेल किंवा पांणी घातलं असेल तर त्याहुनही कमी. म्हणजे २० डिग्री सेल्सिअस वगैरे. नंतरची फेज म्हणजे थर्मोफिलिक फेज. यावेळी आतले जीवाणू व इतर जंतु कामाला लागलेले असतात. सहाजिकच तापमान वाढलेलं असतं. अगदी ७०-८० डिग्री सेल्सिअसपर्यंतही जातं. क्वचित जास्तही वर जातं. यानंतर शेवटची फेज म्हणजे मॅच्युरेशन किंवा क्युरिंग फेज. यात सगळं जड अन जाड मॅटर आत जन्माला आलेल्या पठ्ठ्यांनी खाऊन फस्त केलेलं असतं. सगळा आकार उकार गायब झालेला असतो. सगळं मातीत मिसळण्याची सुरुवात झालेली असते. तापमान खाली खाली येत ओलसरपणामुळं २०-३० डिग्रीपर्यंत येत रहातं. अन ही फेज पूर्ण झाल्यावर उरतं ते पूर्ण तयार झालेलं कंपोस्ट, काळं सोनं.

कंपोस्टींगची प्रक्रिया एकदा सुरु झाली की त्यामधे बरेचसे जीवाणू, किटक, बुरशा वगैरे उत्पन्न होऊन कामाला लागतात. प्रत्येकजण आपापली निसर्गानं नेमून दिलेली कामं करायला लागतो. अगदी दिवसाचे चोवीस तास. कुठल्याही सुट्टीविना अन वर्किंग अवर्सविना. जीवात जीव असेपर्यंत प्रत्येक जीव जन्माला आल्यापासुन त्याचं नेमून दिलेलं काम करत असतो. कंपोस्टिंगच्या तीनही फेजेसमधे अन त्या त्या तापमानात तग धरुन हे सगळे आपापलं काम करत असतात. काही जीव आपल्याला सहज दिसतात तर काही दिसण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राची मदत घ्यावी लागते. काही तर इतके सूक्ष्म असतात की दुर्बिणीतुनही आपल्याला दिसत नाहीत. या प्रत्येकाची कचऱ्याचं विघटन करण्याची पद्धतही निरनिराळी असते. या सगळ्यांची वर्गवारी साधारणपणं पुढं दिलेल्या तीन प्रकारांत केली जाते;

पहिली फळी : यामध्ये प्रामुख्यानं येतात ते म्हणजे अत्यंत बारीक बुरशी, बॅक्टेरिया, ऍक्टिनोमायसेट्स (बुरशीचीच एक प्रजात. फक्त यामुळं मनुष्य व प्राणी यांना रोग होऊ शकतो. अन म्हणूनच कंपोस्ट वापरताना सहसा हातमोजे घालावेत किंवा नाही घातले तर नंतर लगेचच हात स्वच्छ पाण्यानं धुवावेत. तसंच घरच्या पाळीव प्राण्यांना यात नाक खुपसण्यापासून रोखावं.) गोगलगायी, गांडुळं, माशा, पांढऱ्या अळ्या अन नेमाटोड्स. हे कंपोस्टमधल्या सेंद्रीय पदार्थांवर जगतात. कंपोस्टमधल्या जैविक पदार्थांचं विघटन करतात.

दुसरी फळी : यामध्ये येतात त्या माशा, पंख असलेले कीटक, नेमाटोड्स, अळ्या, वगैरे. काही एकपेशीय कीडेही
असतात. शाळेत आपण अमिबा हे नांव वाचलं असेल. तसेच काही प्राणी या दुसऱ्या फळीत मोडतात. यांचं प्रमुख अन्न म्हणजे पहिल्या फळीतले कीटक अन कंपोस्टमधलं ऑर्गॅनिक मॅटर. हे सगळे कंपोस्टमधल्या विघटीत होणाऱ्या पदार्थांचे टिश्युज मोडण्यास मदत करतात.

तिसरी फळी : यामध्ये येतात त्या मुंग्या, घोण वा गोम, माशा, रोव्ह बीटल्स म्हणजे पंख अन दोन ऍन्टिनासारख्या सोंडी असलेला किडा व विविध प्रकारच्या माशा. दुसऱ्या फळीतले किटक हे यांचं अन्न.



कंपोस्टिंगची प्रोसेस जेव्हा सुरु होते तेव्हा त्यात जीवाणू, कीटक अन विविध प्रकारच्या बुरशा उत्पन्न होतात. मधल्या भागात जसं जसं तापमान वाढू लागतं तसे काही कीटक मरुन जातात. अन डिकंपोजिंगची प्रक्रिया मंदावत जाते. यासाठीच अधुन मधुन कंपोस्ट वरखाली हलवण्याची गरज असते. त्यामुळं तापमान कमी होतं अन पुन्हा नवीन कीटक, बॅक्टेरिया वगैरे त्यात येतात.

ऍक्टिनोमायसेट्स ही बुरशी व इतरही काही प्रकारच्या बुरशा कंपोस्टमधील फांद्यांच्या तुकड्यांमधलं लिग्निन तोडतात. त्यामुळं फांद्यांचे तुकडे, वाळक्या काटक्या वगैरेंचं विघटन होऊ लागतं. कंपोस्टिंगच्या सुरुवातीच्या काळात अन शेवटच्या काळात या जास्त ऍक्टिव्ह असतात. मधल्या काळात जेव्हा तापमान वाढलेलं असतं तेव्हा या काम करु शकत नाहीत.

याव्यतिरिक्त सोल्जर फ्लाईज अन त्यांच्या अळ्या याही कंपोस्टमधे असतात. गांडूळांप्रमाणंच कंपोस्टमधील सेंद्रीय पदार्थांचं विघटन करुन नत्रयुक्त मॅटरमधे रुपांतर आपल्या विष्ठेद्वारे हे करत असतात. तेही गांडूळांपेक्षा जास्त वेगानं. कंपोस्टमधे शिळं अन्न, मटण वगैरे असेल तर हे नेहमी असतातच. यांना ओलसरपणा फार आवडतो. त्यामुळं कंपोस्टमधे जर जरुरीपेक्षा जास्त ओलावा असेल तर यांची संख्या वाढते. म्हणून कंपोस्टमधे आवश्यक तेवढाच ओलसरपणा ठेवावा. बरेचजणांना यांची किळस वाटते. पण या काही अपाय करत नाहीत अन यांना पंख फुटल्यावर त्यांचं प्रौढ माशांमधे रुपांतर झाल्यावर त्या तसंही उडूनच जाणार असतात. या माशांच्या पायांवर केस नसल्यामुळं त्या कुठलाही आजार वा जंतु यांचा प्रसार करु शकत नाहीत. तरीही या अळ्या नको असतील तर कोरडं मॅटर म्हणजेच ब्राऊन मटेरिअल घालून अधिकचा ओलसरपणा कमी करावा. आवश्यकता भासल्यास नीमपेंडही घालावी.

वर उल्लेखिलेले बहुतांश कीटक, माशा, बुरशा हे कंपोस्टमधे असतात. अन हे असतात म्हणूनच ओल्या-सुक्या कचऱ्याचं, शिळ्या पदार्थांचं विघटन होऊन आपल्याला उत्तम काळं सोनं मिळतं. याशिवायही काही जीवाणू अन बॅक्टेरियाही असतात. अर्थात कंपोस्टच्या प्रत्येक बॅचमधे हे सारे असतीलच असं नाही. कारण प्रत्येक जीवाची रहाण्याची, अन्नाची अन तापमानाची गरज निरनिराळी असते. त्या त्या परिस्थितीनुसार ते ते जीवाणू व कीटक कंपोस्टमधे येतात अन आपलं कार्य करुन नाहीसे होतात.

यातले बरेचसे किळसवाणे वाटले अन वरवर अपायकारक भासले तरीही त्यांच्यापासून आपल्याला काहीही त्रास होत नाही. ते त्यांचं काम तिथंच कचऱ्यात राहून करत असल्यामुळं आपण तिथं जाऊन त्यांना डिस्टर्ब करण्याची गरज नसते. त्यांना त्यांचं काम करु द्यावं. कंपोस्ट जेव्हा वरखाली करायचं असेल तेव्हा हातमोजे घालावेत. अधिक काळजी घ्यायची असल्यास तोंडाला मास्क बांधावा. शक्यतो नुसत्या हातानं कंपोस्ट हलवु नये. अन सर्वात महत्वाचं म्हणजे कंपोस्ट हलवुन झाल्यावर हात स्वच्छ पाण्यानं धुवावेत. मग कसलंच टेन्शन रहाणार नाही. निसर्गामधल्या प्रत्येक जीवाला काही अर्थ आहे, त्याचं निश्चित असं काम आहे. माणूस सोडल्यास इतर कुठलाही जीव दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करत नाही की नाक खुपसत नाही. तेव्हा जगा व जगू द्या. हे कीटक अन जीवाणू जे काही करत असतात ते आपल्याच फायद्याचं असतं. नाहीतर कचऱ्याच्या डोंगरानं एव्हरेस्टशी स्पर्धा केली असती अन सगळीकडं दुर्गंधी पसरलेली असती.

नोंद : आवश्यक तिथं इंटरनेटवरील काही साईट्सचा आधार घेतला आहे

फोटो सौजन्य डेली डंप - कंपोस्ट ऍट होम

©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

माझा हा लेख व आधीचेही लेख माझ्या https://www.facebook.com/Vaanaspatya याही ब्लॉगवर उपलब्ध आहेत.

२ टिप्पण्या:

  1. ऊत्तम माहिती. मी आजवर माझ्या कंपोस्ट टाकीत शिळ अन्न टाकायला कचरत होतो. फक्त भाज्यांचा कचरा टाकायचो.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अभिप्रायासाठी धन्यवाद. थोड्य़ाफार प्रमाणात शिळं अन्न टाकाय़ला काहीच हरकत नाही. अन्न जास्त झालं तरच कीड अन दुर्गंधी येते. अन्यथा नाही. त्यामुळं अन्न जर जास्त असेल तर त्याप्रमाणात कोरडा कचरा टाकावा किंवा अन्न ढीगाच्या मध्यभागी जाईल अशा पद्धतीनं टाकावं अन एक दिवसाआड ढीग हलवावा.

      हटवा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...